आहारातून आरोग्याकडे..

Submitted by हेम on 21 March, 2012 - 12:07

ऑक्टो. २०१० मध्ये पावसाळ्यात बंद असलेलं जॉगिंग सुरु केलं तेव्हा वजन होतं ६५ किलो. साधारणपणे दररोज ६ कि.मी. आरामात धावणं व्हायचं. मार्चात उन्हाच्या चाहुली तिव्र व्हायला लागल्या की जॉगिंग थांबायचं. जेवणामध्येही बदल नाही. दरवर्षीचा हा सरासरी परिपाठ. आता डोंगर चढायचा खुळा छंद असल्याने, व हा सिझन भटकण्याचा असल्याने शारीरीक क्षमतेसाठी हे पाळावं लागायचं. ही क्षमता कमी पडली तर ट्रेकमध्ये 'बघणं' कमी व दमणं जास्त होतं. मार्चात जॉगिंग थांबवलं तेव्हा वजन झालेलं ६९ किलो... !!
मी चक्रावलो. खाण्यात बदल नाही. जंक फुड -कोल्ड्रिंक्स-हॉटेलिंग वगैरेंना फाट्यावर मार देऊनही हे असं कां ते कळेना! ऑगस्ट २०११ - वजन ७३ किलोवर गेलं. आता स्वतःमध्ये होणारे बदल टिपायला सुरुवात झाली होती. यावर्षी अॅसिडीटीमध्ये प्रचंड वाढ झालेली होती, केस गळायला सुरुवात झालेली.., सूर्य वर येतांना मानेकडून वरपर्यंत डोकेदुखीही चढत यायची. ..अशी अवस्था! बरं, अॅसिडीटीवर आजूबाजूला कोणाला सल्ला विचारणार? डॉक्टरांपासून सगळेच जाडजूड! ..आणि प्रत्येकजण सल्ला देतांना दुसर्या कोणाकडून तरी ऐकलेला किंवा डॉकने दिलेला सल्ला पुढे सुपुर्द करायची. आता चाळीशीत आलायस,.. असं चालायचंच आता हळूहळू! वगैरे नकारात्मक रडे सल्ले तर खूपच!! ..आणि प्रॉब्लेम प्रत्येकाला, पेक्षा घरातल्या प्रत्येकाला तरी!!
* * *

ऑक्टो. २०११ मध्ये दिवाळीच्या आधी एका मित्राने त्याच्याकडे बोलावलं.- '.. मुंबईचे एक माधव जोशी म्हणून एक न्युट्रीशिअन आहेत. .त्यांचं १ तासाचं आहार व आरोग्य या विषयावर बोलणं आहे, तेव्हा तू ये. ' म्हटलं येतो. गेलो. त्यांच्या व्याख्यानामध्ये त्यांनी कांय खावे यापेक्षा कांय खाऊ नये आणि ते कां खाऊ नये हा भाग स्पष्ट केला. त्यांच्या भाषेत सांगायचं तर ..
६ गोष्टी पुर्णपणे बंद करा, पेक्षा गटारात फेका.
१) साखर २) चहा/कॉफी ३) सर्व बेकरी पदार्थ ४) रिफाइंड तेल ५) लोणचं ६) पापड. आणि हे कां खाऊ नका हे त्यांनी वेगळ्या पद्धतीने विषद केलं त्याकडे नंतर येऊच..!!

मी मुळांत प्रचंड गोड खाणारा. Happy मस्तपैकी लालसर होईपर्यंत खरपूस भाजलेल्या बेसनाचा एक लाडू मी कधीच खाल्लेला नाही.. एकावेळी जोडी लागायची. Happy साहजिकच माझ्या मर्मावरच हा माणूस घाला घालतोय म्हटल्यावर मी व्याख्यानानंतर अर्धा-पाऊण तास या न खाण्याच्या पदार्थांवरून त्यांच्याशी काथ्याकूट केला, विशेषतः साखरेवरुन! त्यांनीही माझे समाधान होईपर्यंत व्यवस्थित उत्तरे दिली पण जीभेच्या मेंदूचे काही समाधान होत नव्हते. Happy माझे बॉडी पॅरॅमिटर्स काढले. बहुतेक सगळे सीमारेषेवर.. ओलांडली नसली तरी माझ्यासाठी तो धक्काच होता.
झालं! त्या मिनिटाला मी साखर, चहा/कॉफी, सगळे बेकरी पदार्थ, लोणचे व पापड यांना माझ्या जीभेपासून तलाक दिला. रिफाईंड तेलावर माझा डायरेक्ट कंट्रोल नसल्याने त्याला शक्य तितके नाही या वर्गात ठेवले.
घरी आल्यावर हा निर्णय सांगितला. माझ्यापुरता मी पाळणार, तुम्हांला त्रास नाही असं जरी सांगितलं तरी माझ्या या निर्णयाचा घरात कुठेतरी परिणाम होणार होताच. दिवाळीचा सगळा फराळ घरात तयार होता. पण तिथे मी जीभ जिंकली. हे पदार्थ पूर्ण बंद केल्यावर पहिले दोन दिवस डोकेदुखीचा प्रचंड त्रास झाला. आता या त्रासाचं शास्त्रीय कारण मला सांगता येणार नाही. दिवाळी संपल्यावर मी आधी किती साखर/ गोड खायचो ते उरलेल्या पदार्थांवरुन लक्षात येतच होते. खरा त्रास कंपनीत होणार होता. सर्व सहकार्यांबरोबर दिवसभरांत त्यांच्या चहाच्या वेळी, जेवतांना त्यांना माझी बाजू समजावून सांगतांना पार कावायला व्हायचं. कारण याचा नेमका परिणाम कांय नी कधी माहित नव्हतं. कॅलेंडरच्या तारखेवर पहिल्या दिवसापासून 'खाल्ले नाही' म्हणून फुली मारायला लागलो. सलग फुल्यांचे दिवस वाढत गेले तशी स्वतःशी कमिटमेंट पक्की होत गेली. बाकी माझ्या जेवणांत काही बदल नव्हता. जॉगिंगही नियमित सुरु होते.
४३ वा दिवस. मी बाबांना (वडीलांना) घेऊन नियमित तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेलो होतो. तिथल्या वजनकाट्यावर वजन केलं. ७१ किलोग्रॅम.....!! आनंदाने उडीच मारली. आधी माधव जोशींना फोन लावला. ते हसत म्हणाले.."उतरवली की नाही तुझी चरबी..!! नुसत्या या ६ गोष्टी बंद करुन एवढा फरक पडला, आता मी सांगेन तसं खायला लागल्यावर तुझी घडी नीट बसेल की नाही बघ..परवा नाशिकला येतोय, तेव्हाच तुझे पॅरामिटर्स काढूया! " मलाही त्याबद्दल जाम उत्सुकता लागली. ते आल्यानंतर पॅरॅमिटर्स काढले, ते खाली देतोय. कंसामध्ये नंतरचे म्हणजे पहिल्या ४५ दिवसांत बदललेले पॅरामीटर्स. आता तर आणखी सुधारीत आहेत.
वजन- ७५.४ (७०.९)
चरबी %- २६ (२१.२)
स्नायू %- ५३ (५२.८)
पाणी %- ५२ (५६)
व्हिसरल फॅट %- ९ (७)
मेटॅबोलिक वय- ५५(४०)
फिजिक रेटींग- २ (५)
बोन मास- २.८ (२.८)

यावेळी त्यांना प्रश्न केला की एका महिन्यांत एकदम ४.५ किलो वजन कमी होणं कितपत योग्य, त्यांवर "ही अनावश्यक चरबी गेलीय. आता यापुढे १ किलोसाठीसुद्धा तुला किती घाम गाळावा लागेल हे लवकरच कळेल तुला!" असं सांगून त्यांनी स्नायू वाढवण्यासाठीचे व्यायाम आणि शिफ्टच्या वेळेप्रमाणे कसा आहार घ्यायचा ते सांगितलं. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळा जिन्नस वाण्याच्या दुकानांत व भाजी मंडईत मिळणारा. आता सध्या मी या ६ गोष्टी+प्रिझर्वेटीव्ज्+कृत्रिम रंग असलेले पदार्थ टाळूनही मस्त चमचमीत खातोय. अगदी गोडासकट. कारण साखरेऐवजी सेंद्रिय गूळ, रिफाइण्ड तेलाऐवजी घाण्याचं किंवा फिल्टर तेल, चहाऐवजी गुजराथी लोकांकडे असतात ते उकाळे वापरायला हरकत नाही असं माधव जोशी सांगतात. पण हे ऑप्शनसुद्धा कशाला हवेत तर शेवटी आपल्याला हे आजीवन पाळायचे आहे म्हणून. माझ्या बदललेल्या पॅरामीटर्सचा कागद पाहून आता माझ्या कुटुंबातच कांय, पण गंमत करणार्या सहकार्यांनीही या गोष्टी पाळायला सुरुवात केली आहे व त्यांनाही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. माझ्या एका पन्नाशीच्या मधुमेही व गोळ्या सुरु असलेल्या सहकार्याची उपाशीपोटी साखर नेहमी १५० ते १६० यायची. त्याने या गोष्टी वर्ज्य केल्यावर एका महिन्यांत ती ११८ पर्यंत उतरली. त्याला आता डॉक्टरांनी गोळ्यांचा डोस परत नीट ठरवण्यासाठी बोलावणे केले आहे. त्याचेही बाकी खाणे व्यवस्थित सुरु आहे.
माझी अॅसिडीटी पहिल्या १० दिवसातच गेली. वजन ६७ वर स्थिर आहे. आता थोडे वजन वाढवायचे आहे पण स्नायूंचे.
वाढलेल्या ढेरीचे आता सपाट पोटांत रुपांतर झाल्याने Rock Climbing चा आता मी पुन्हा आनंद घ्यायला लागलो आहे. उर्जा क्षमता (एनर्जी लेव्हल) खूप वाढली आहे. एकूण सध्या आरोग्यदायी चाललंय!

आता या माधव जोशींबद्दलची थोडी माहिती देतो...
श्री. माधव जोशी बँकेत नोकरीला होते. रसायनशास्त्राचे पदवीधर. १९८२ च्या सुमारास ते नाना पालकर स्मृती समितीत रुग्णसेवा करत असत. त्यावेळी अनेक व्याधींनी ग्रस्त रुग्ण आणि त्यामुळे ग्रस्त त्यांचे कुटुंब बघून आपण कधीच 'रुग्ण' व्हायचे नाही अशी खुणगाठ त्यांच्या मनाशी बांधली गेली. पण...वयाच्या पन्नाशीच्या आधीच गुडघे, कंबर व पाठ्दुखी सुरु झाली. साहजिकच डॉक्टरांनी बरीच बंधनं घातली. आरोग्याचा शोध घेता घेता स्वतःच अनारोग्याच्या मार्गाला लागले. आपले आरोग्य परत मिळवण्यासाठी त्यांनी नाना तर्हेचे सगळे उपाय करुन पहिले पण तात्पुरता परिणाम दिसे, परत ये रे माझ्या मागल्या किंवा आणखी काही तरी नविन उद्भव! योगासने, रेकी, आहारशास्त्र, निसर्गोपचार, प्राणायाम, कपालभाती या सगळ्या गोष्टींचा प्रयोगशील अभ्यास या दरम्यान झाला. सरतेशेवटी ते एका निष्कर्षाप्रत आले, तो म्हणजे आपल्या रक्ताचा पी.एच.

त्यांच्या भाषेत सांगायचं तर ..
"आपल्या आरोग्याचा संबंध आपल्या रक्ताच्या ७.४ या पी.एच. शी आहे. पी.एच. म्हणजे power of hydrogen. म्हणजे एखाद्या द्रवातील हायड्रोजन आयनची संख्या. ते ० ते १४ या रेंजमध्ये मोजलं जातं. '०' ph म्हणजे अत्यंत अॅसिडीक- '७' ph म्हणजे उदासिन आणि '१४' ph म्हणजे अल्कली. आपल्या रक्ताचा ph '७.४' म्हणजे किंचित अल्कली आहे. आपल्या शरीरात चालू असलेल्या चयापचय व श्वसन क्रियेमुळे रक्ताचा ph सतत प्रभावित होत असतो. ph कमी झाला तर त्याला अॅसोडोसिस म्हणतात. जास्त झाला अल्कलॉसिस म्हणतात. पैकी आपण अॅसिडोसिसचाच विचार करुया. या प्रकारात ph कमी होऊन अॅसिडचं प्रमाण वाढतं. निसर्गतः निर्माण होणार्या ph च्या असंतुलनाला नियंत्रित करण्यासाठी निसर्गानेच शरीरात पुरेशी व्यवस्था केलेली असते पण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपण निसर्गतः निर्माण होणार्या ph च्या अंसंतुलनात बरीच भर टाकत असतो, ती अशी-
१- अॅसिडोसिस निर्माण करणारं अन्न (मांस, मासे, अंडी, डाळी, धान्ये) यांचा अतिरेक व दूध, फळे, भाज्या, मोड आलेली धान्ये, नाचणी या अल्कली अन्नाचं कमी सेवन.
२- साखर, वनस्पती तूप, शितपेयं, चहा, दारु, तंबाखू यांचं सेवन
३- अॅसिडोसिस निर्माण करणारी औषधे सेवन
४- प्रिझर्वेटिव्ज, कृत्रिम रंग असलेलं अन्न सेवन
आणि इथे गडबड होते.
आता साखर कां नको?
साखर कशी बनते हे सामान्यपणे कुणालाही माहित नसतं. साखरेमध्ये तिच्या पचनासाठी लागणारे कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व फॉस्फरस हे ३ घटक नसतात. उसाच्या रसात किंवा सेंद्रिय गुळांत ते असतात. उसाच्या रसाची ज्यावेळी साखर बनवतात त्यावेळी त्यांत फॉर्मल डिहाईडसारखी घातक रसायने मिसळली जातात. यामुळे हे ३ घटक साखरेतून नष्ट होतात. अशी साखर पोटांत गेल्यावर पचनासाठी लागणारे हे घटक आपल्या शरीरातून घेतले जातात. उदा. कॅल्शिअम हाडांतून नाहीतर दातांतून घेतले जाते. परिणामी हाडे/ दात लवकर ठिसूळ होतात. मात्र एवढा उपद्व्याप करून साखरेपासून शरीराला काहीही फायदा मिळत नाही. कर्बोदके इतर खाण्यातून मिळतातच की!
आपल्या जेवणात ८०% अॅसिडीक व २०% अल्कली पदार्थ असतात. ते प्रमाण उलट करायचं म्हणजे २०% अॅसिडीक व ८०% अल्कलाईज्ड. ते कोणते ते वर १ नं.च्या मुद्द्यांत आलं आहेच. "
माधव जोशींनी या विषयावर 'सात पुर्णांक चार दशांश' या नांवाचं पुस्तकही प्रकाशित केलं आहे. त्यांतही या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे मांडल्या आहेत.

तळटीपः लेख थोडा विस्कळीत वाटेल. अनुसरुन बरेच विषय आहेत. थोडक्यांत मांडण्याचा प्रयत्न केलाय. या विषयांतील अनेक तज्ञ इथेही आहेत. त्यांच्याही सूचना/ मार्गदर्शन मिळेल. उदा. इथे उल्लेखलेल्या आहारासंबंधी, साखर-रिफाइण्ड तेल कसे बनते? त्यांत रसायने मिसळतात कां? त्यांचा शरीरावरील परिणाम वगैरे माहिती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त प्रेरणादायक आणि माहितीपूर्ण लेख. मी पण हे सगळं आज, आताच सोडून देतेय.

हम्म्म! चांगला लेख आहे. पण साखर अचानक बंद केल्याने त्रास होऊ शकतो (जर आहारात पुरेसे कार्ब्स नसतील तर नक्कीच). त्यामुळे हळूहळू सोडावी असं माहीत आहे.

मी स्वतः २ वर्षापूर्वी साखर बंद केली होती . काही त्रास वगिरे झाला नाही. बाकी नेहेमिचेच जेवण गेत होते. पण मी ३-४ महिनेच स्वतःवर ताबा ठेवू शकले Sad
पहिले २ महिने वजनात फरक दिसला नाही पण नंतर मात्र भराभर ८-१० पौंड उतरले. जोडीने भरपूर घाम येईतो व्यायाम होताच.
आता परत नो शुगर बँडवॅगन मध्ये चढायला हवं

लेख आवडला. खरं तर प्रत्येकाने तारतम्यानेच हे ठरवायला पाहिजे. चहा नको म्हणजे दूध, साखर घातलेला चहा नको. पण बाजारात चहा (म्हणजे टि) चे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यापैकी आवडीचे
काही प्रकार घरात ठेवावेत. व रोज एखादा (दूध साखर न घालता ) घ्यावा. बरेच फायदे होतात.

तसेच बाजारी लोणच्याच भरमसाठ मीठ असते, पण ताजे केलेले लोणचे, ज्यात कमी मीठ व तेल असेल, पण त्यात हिंग, मोहरी, लिंबाचा रस असेल, तेही प्रमाणात, म्हणजे लोणच्याइतकेच घेणे चांगले.

साखर तर मी कधीच सोडून दिलीय. आधी महिनाभर स्पार्टेम वगैरे वापरले आता तेही नसते.

मस्त लेख!! मी ही जानेवारीपासून ते पदार्थ सोडलेत.(लोणची पापड कधीच खात नव्हते. पण बेकरी, चहा/कॉफी व साखर हे फार जायचे पोटात!) साखर पूर्णपणे बंद जमत नाहीये, कमिटमेंटसाठी तुमचा उपाय वापरून पाहिन. तरीदेखील नुसते हे पदार्थ विशेषतः साखर बंद करून वजन कमी होते. आणि साखर(प्रोसेस्ड फुड) असल्याने काहीच कामाची नाही!
तुमचा लेख वाचून परत उत्साह आला! थँक्स!

नताशा, साखर एकदम पूर्णपणे बंद केल्याने अजिबात त्रास होत नाही. हा स्वानुभव आहे. आपल्याला आहारातील पुरेशा कार्ब्जपेक्षा पुरेशा प्रोटीनची काळजी घ्यायला हवी. सध्या प्रत्येकाचा आहार पाहिलात तर ती व्यक्ती किती कर्बोदके खाते हे वेगळं सांगायला नकोय. ते खायला फार कष्टी व्हावे लागत नाही. आणि लेख नीट वाचल्यावर लक्षात येईल की साखरेऐवजी सेंद्रीय गुळ खायचा आहे.

एक विश्लेषणः माधव जोशींच्याच पुस्तकातून..
साधारण ५० वर्षांपूर्वी प्रतिमाणशी वर्षाला सरासरी १८ कि. गुळ खाल्ला जायचा. तेव्हा हाडांच्या डॉक्टरांकडे अनुवंशिक अस्थिविकार, अपघातात हाड मोडलेले असेच पेशंटस् जायचे.
आता आपण सरासरी २० कि. साखर वर्षाला प्रतिमाणशी खात आहोत. हाडवैद्याकडे गर्दी बघा किती आणि त्यांतही हाड मोडलेले कमी.. हाडरोग असलेले वाढले आहेत.

दिनेशदा,
धन्यवाद. लोणचे त्यांतील मीठामुळेच वर्ज्य आहे. ३र्‍या दिवशी खराब होणारे लोणचे पहिल्या दिवशी खा..
चहाचे ऑप्शन्स तुम्ही सांगताय खरं पण अ‍ॅसिडीटीचं मूळ तिथेच आहे. चेहरा सुजल्यासारखा दिसणं हे तर सध्या कॉमन झालंय. चहा पूर्ण बंद केल्यावर अ‍ॅसिडीटी, सूजेवर नक्कीच फरक दिसतो.

>>डॉक्टरांपासून सगळेच जाडज>><<

हाहा, हे असच दिसतं.

हेम,
तुम्ही तुमच्या जेवणात नक्की काय पदार्थ केलेत व कसे शिजवलेत त्या रेसीपीची थोडीफार माहीती द्या ना?

तेलाशिवाय कसे काय बनवले? मी दोन वर्षे केलेले साखर्,गूळ, ब्रेड , भात वगैरे... पण माझ्या हायपोच्या गोळ्या चालू होत्या. तरी फारसा फरक नाही पडला.

वजन पुन्हा दोन वर्षाने वाढले.

हेम, मला अजूनही नीट समजलं नाहीये की हे नमूद केलेले पदार्थ वर्ज्य करणं म्हणजे काय - भाजी, आमटी शिजवताना जे मीठ, गूळ इ. इ. घालतो ते चालतं का? की वरून जे घेतो - दही-साखर, साखरांबा, तूप-मीठ्-भात असं वाढीव असतं ते बंद करणं??
माझी एक मैत्रिण म्हणाली की पांढरा भात, मैदा हे पदार्थ पण साखर म्हणूनच बघावेत. आणि त्या प्रमाणे आहार बदलावा. Uhoh

>>पांढरा भात, मैद>><<
मलाही माझ्या डॉक तेच सांगितले. पण मग बरीच दमछक व्हायचे जेवण काय करायचे विचार करून...
तरी बरेच पाळलं.. पण कठीण असते ते.

म्हणून हेम ह्यांना विचारलेय की रोजच्या जेवणात काय खायचे मग?

सकाळची तीच तीच ओटमील खिचडी खावून वैतगले.

अप्रतिम लेख. Happy

माधव जोशीं यांच्याशी सम्पर्क करायचा असल्यास काय करावे लागेल?
ते वैयक्तिक मार्गदर्शन देतात का? फी कसे घेतात? पुण्यात अध्ये मध्ये येतात की नाही?
अशी थोडीशी डीटेल माहिती हवी आहे. मिळेल ना?

मीठ कमी करायचे म्हणजे वरुन घ्यायचे नाही. दिवसाला २/३ ग्रॅम मीठ पुरते (आपण सगळे मिळून १५ ग्रॅम घेतो)
ताटात वेगळे मीठ वाढून घ्यायचे नाही.
अ‍ॅसिडीटी चा सबंध खाण्यापेक्षा वेळेवर न खाण्याशी आहे. तसेच तणाव, अति तिखट, तेलकट खाण्याशी आहे.
मसालेदार चविष्ट म्हणजेच तिखट आणि तळकट, असे विचित्र समीकरण होऊन बसलेले आहे.

लेख विस्कळीत असला तरी नीट कळला.
झंपी, तेल बंद नाही पण घाणीवरच तेल प्रमाणात वापरायला हरकत नाही.

मला अजूनही नीट समजलं नाहीये की हे नमूद केलेले पदार्थ वर्ज्य करणं म्हणजे काय - भाजी, आमटी शिजवताना जे मीठ, गूळ इ. इ. घालतो ते चालतं का? की वरून जे घेतो - दही-साखर, साखरांबा, तूप-मीठ्-भात असं वाढीव असतं ते बंद करणं??
साखर पूर्ण बंद. कशातही घातलेली.
मीठ
भाजी- आमटीत आपण चवीपुरते मीठ घालतो ते ठिक. दिनेशदा म्हणतात ते बरोबर आहे. लोणच्यात प्रिझर्वेटीव म्हणून प्रमाणापेक्षा अतिजास्त घातले जाते म्हणुन लोणचे नको.
गूळ
गुळ म्हणजे सेंद्रीय गूळ. यांत केमिकल्स नसतात. पचनाला आवश्यक घटक शाबूत असतात त्यामुळे सेंद्रीय गूळ चालेल. माझे गोड खाणे सुरु आहे. मी फक्त साखरेऐवजी सेंद्रीय गूळ वापरतो. आतापर्यंत शेवयांची खीर, रसमलई, बासुंदी, दुधी हलवा, गाजर हलवा इ. अनेक पदार्थ गुळात बनवून झाले आहेत. मात्र हे रिचवायला जोडीला व्यायाम हा हवाच. Happy (श्रीखंड बनवतांना चक्क्यांत काकवी टाकून श्रीखंड होते कां पहायला हवे. भीम कांय टाकीत होता हे कळायला हवे! Happy )
तेल
तेलाबद्द्ल मंजू यांचे बरोबर. घाण्याचे किंवा फिल्टर तेल जरुर तिथे वापरावे. (तेही कमीच). रिफाइण्ड तेलात रसायने असतात.

आता भात वगैरे.
भात, आमटी, भाजी, पोळी हे सर्व अ‍ॅसिडीकमध्ये मोडते. जेवतांना थोडासा बदल करुन डाळींची आमटी करण्याऐवजी मोड आलेल्या धान्यांची म्हणजे ऊसळींची आमटी करावी. पोळीऐवजी पराठे करा. पालेभाज्या आणल्यावर त्याचे देठ वगैरे फेकून न देता ते मिक्सरमध्ये बारीक करा व हा चोथा पराठ्यांत घाला. या चोथा आत झाडूचे काम करतो. याशिवाय हे देठ, पाने वगैरे कुकरमध्ये शिजवून, मिक्सरमधून काढा, तूपात घालून वरुन मीरपूड व चवीपुरते मीठ घालून मधल्या वेळेत सूप करुन प्या.
नागली/नाचणीचा वापर भरपूर करा. यात कॅल्शिअम आहे आणि शिवाय अल्कली आहे. नाचणीची भाकरी खा. आंबील प्या. गूळ घालून लाडूही छान होतात. मी साजूक तूपातील नागलीची नानकटाई बेकरीतून बनवून आणली आहे.
ट्रेकला जातांना जवळ भरपूर गुळाच्या चिक्क्या ठेवा.
आता नाश्त्याबद्द्ल पुढील प्रतिसादात.. Happy

महत्वाची गोष्ट धाग्यात लिहायची राहूनच गेली..
माधव जोशींचा फोन नंबर- ९८६९४७३४२२. ते कांदीवली(पू) ला रहायला आहेत. माझा संदर्भ दिला तरी चालेल. (नाशिकहून हेमंत). वैयक्तिक मार्गदर्शन देतील.

हेम, आवड म्हणून आपण गोड खातोच. मला स्वतःलाही गोड खुप आवडतं. माझं म्हणणं आहे की सेंद्रिय गुळ जरी रसायनरहित असला तरी ते "गोड"च आहे. माझ्यामाहिती प्रमाणे गोड खाललं की शरीर इन्सुलिन सोडतं आणि इन्सुलिन रिलीज झालं की शरिर फॅट स्टोरेज मोड मध्ये जाते.
आपल्या सण वारांमुळे अगदी गोड न खाणं जमत नाही मला मान्य आहे पण शक्यतो टाळावेच.

अ‍ॅसिडिटीने चेहरा सुजलेला दिसतो का हो?>>>>. हे वाक्य मी आता पाहिले. अ‍ॅसिडिटीनी चेहरा सुजल्याचे कधी ऐकले नाहीये पण हायपोथायरॉईडिस्म असल्यास चेहरा आणि पुर्ण शरिरावरच सुज असल्याचे जाणवते हे मात्र नक्की माहितीये. तसं असेल तर एकदम सिरियस म्हणजे ताबडतोब डॉ कडे जाण्याचे लक्षण आहे.

बुवा,
आपण म्हणताय ते बरोबर आहे ..मात्र हे रिचवायला जोडीला व्यायाम हा हवाच असंही मी पुढे म्हटलंय.
अ‍ॅसिडीटी व सूज..
माधव जोशींकडेच एक केस होती. एका महिलेला हा त्रास होता. सकाळी सुज यायची व दुपारनंतर सूज कमी व्हायची. चहा सोडल्याबरोबर आठवड्याभरात सूज येणं बंद झालं.
झंपी,
हो, त्याशिवाय मधुर म्हणुनही मिळतो.

हेम, तुम्ही साधारण तुमच्या जेवणात कसे काय बदल केले ते शक्य असल्यास लिहा ना.
म्हणजे सकाळी नाश्ता मध्ये काय, दुपारी व रात्री वगैरे?

हेम

लेख बूद्धीला चालना देणारा आहे. आवडला !!

साखर, तेल व मैदा हे सर्व रिफाइंड फूडचे प्रकार आहेत.
जे जे रिफाइंड असतात ते पदार्थ प्रक्रियेतून पांढरे शुभ्र केले जातात.
तेल उत्पादना मध्ये जास्तीत जास्त तेल, तेल बीयांतुन पिळवटून काढण्यासाठी केमिकल्सचा (सोल्व्ह्ण्सचा)
वापर केला जातो, ह्या केमिकल्सचा काही अंश ह्या तेलात राहतोच आणी म्हणूनच ही रिफाइंड तेल
शरीराला घातकच.

लोणच्यांचा आपल्या जेवणातला सामावेश फार महत्वाचा आहे, खास करून लोणची बहूतेक वेळा भाता बरोबर
दिली जातात. केवळ लोणंच्याच्या विचारांनेच तोंडाला पाणी सुट्ते, लाळ तोंडात येते.

कार्बोदकांचे पचन हे जठरां पेक्षा तोंडात होते अस म्ह्णतात. म्हणजे भाता सारख्या कार्बोदका मध्ये लाळ
मिसळणे म्हणजे पचनाची पहीली प्रक्रिया ! लोणच्यामूळे ही प्रक्रीया सुलभ होते.

पूर्वी लोणची घरांघरांत बनवली जात पण आता बाजारी लोणच्याच्या प्रत वारी बद्दल त्यात वापरलेल्या तेला
बद्दल शंकाच आहे.

जेवणात लोणची वापरावी का ह्या बद्द्ल तुमच तुम्ही ठ रवा !!

छान माहितीपूर्ण लेख. पूर्वी आहारात काकवीपण वापरली जायची.त्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम्,पोटॅशियम्,लोह,साखरेपेक्षा थोडी कमी गोड्,कॉपर इत्यादी मिनरल्स आहेत्.आपल्याकडे आता सहजपणे मिळतही नसावी.पण विदेशात ब्लॅकस्ट्रॅप मोलॅसेसचे फॅड आले आहे. काहीजणांनी आपले केस परत काळे होत असल्याचा दावाही केला आहे.तेंव्हा आता सर्वजण परत निसर्गाकडे वळत आहेत ही चांगली गोष्ट आहे.

माझ्या दिरांच्या घरी सगळेजण माधव जोशींच्या सल्ल्याने आहार घेत आहेत. गेल्या वर्ष-दिड वर्षात घरात चहा-साखर आणलंच गेलं नाहीये. क्वचीत कधी गुळ वापरून गोड पदार्थ घरी केला जातो. नैसर्गिकरित्या शरिरात जाणारी साखर शरिराला पुरते असं ते म्हणतात. बेकरी पदार्थ, लोणची-पापड पण खूप क्वचीत महिन्या-दोन महिन्यातून एकदा खाल्ले जातात.

रिफाइंड तेल पूर्ण बंद नाहीये. पण तळण बंद. कमी तेलाच्या भाज्या-आमट्या. बाकी जेवणातल्या भाज्या आणि इतर पदार्थ नेहेमीचेच. सोबत व्यायाम आहेच. १५-१६ किलो वजन उतरलंय दिरांचं. अ‍ॅसिडिटी आणि इतर पचनाच्या तक्रारी बंद झाल्यात.

हा आहार ते अगदी बारा महिने चोवीस तास नाही पाळत. मधून्-अधून कधीतरी बाहेरचे जेवण, लग्न-कार्यात काहीतरी गोड खाणं होतं. पण त्यावर खूप कंट्रोल ठेवलाय. असं काही खावं लागलंच तर पोर्शन कंट्रोल करतात.

माझं मुळात वजन कमी आहे. त्यात रक्तात साखरेचं प्रमाणही कमी आहे त्यामूळे मी मात्र या भानगडीत पडले नाहीये.

@झंपी, जेवणातील बदल वरील प्रतिसादात नमूद केले आहेत. मुख्य जेवणांत आणखी एक. मुगाची खिचडी करतांना डाळीऐवजी मोड आलेले मूग टाका. कुळीथ/ बेसनाच्या पिठल्याबरोबर नाचणीची भाकरी. भाताबरोबर डाळीच्या आमटीऐवजी मोड काढलेल्या उसळींची आमटी..म्हणजे जोडीतील एक अ‍ॅसिडीक व एक अल्कली असे घ्या. रात्री जेवणांत ग्रीन सॅलड भरपूर घ्या. (साहजिकच मूळ अन्न थोडं कमी जातं)
नाश्ता खातांना तेवढ्याच प्रमाणात कांदा-कोथिंबीर-खोबरे व टोमॅटो बारीक चिरुन-खवून नाश्त्याबरोबर खा. बरोबर दही घ्या.
प्रोटीनपीठ= गहू-मूग-मसूर-मटकी-नागली या धान्यांना मोड आणून कडक वाळवून दळून आणा.
हे प्रोटीनपीठ कटलेट, रगडापॅटीस, धिरडी, थालीपीठ या सगळ्या गोष्टी बनवतांना त्या पीठांत निम्म्या प्रमाणात घाला.
शरीराला ज्यापासून काहीही मिळत नाही ते सर्व बंद. उदा. साखर-साबुदाणा.
.. पण महत्त्वाचे म्हणजे साखर-चहा-बेकरीपदार्थ-रिफा.तेल-लोणचं-पापड पूर्ण बंद करा. याने शरीरातील आम्लता कमी होईल व अन्न अंगी लागेल.

@अल्पना, साखर व वजन कमी एवढ्यावरच ही भानगड संपत नाही. मग मीही आता याचा पिच्छा सोडला असता. Happy
उदा. बॉडी मास. एक महत्त्वाचे विश्लेषण आहे. सध्या १८ ते २५ वयोगटातील सगळ्या मुलींच्या कुरकुरी म्हणजे त्यांच्या टाचा दुखतात, केस गळतात आणि पाळीच्या तक्रारी. या सगळ्या जणीचं कॅल्शिअम काढलंत तर २.० च्या आत भरेल. कारण कोल्ड्रिंक्स, जंक फुड, वडापाव आणि अवेळी झोपा. या सगळ्या मुलींचे हे ६ पदार्थ बंद केले आणि नागलीचे पदार्थ आहारात सुरु केले की फरक पडतो. त्वचेचा पोतदेखील झळझळेल. पोषण आतून हवं. Happy

Pages