नारळाचं दुध घालून टोमॅटोचं सार

Submitted by सायो on 11 July, 2008 - 14:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

टोमॅटो- मोठे ४, नारळाचं दुध -१ छोटा कॅन, आलं-लसूण पेस्ट १ छोटा चमचा प्रत्येकी, हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे, कढिपत्ता ५,६ पानं, चिरलेली कोथिंबीर, फोडणीचं साहित्य, मीठ, साखर चवीप्रमाणे.

क्रमवार पाककृती: 

प्रथम टोमॅटो मायक्रोवेव्हला शिजवून घ्यावेत. गार झाले की सालं काढून घ्यावीत. जाड बुडाच्या पातेलीत तेल गरम करून त्यात जिरं टाकावं. जिरं तडतडल्यावर त्यावर कढिपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकून परतावे. त्यावर शिजलेले टोमॅटो टाकून थोडे ठेचावेत व पाच एक मिनीटं शिजू द्यावेत. त्यावर आलं लसणीची पेस्ट घालून परत थोडे शिजू द्यावे. मग सगळं मिश्रण मिक्सरमधून काढावं. पुन्हा गॅसवर ठेवून त्यात नारळाचं दूध घालून चांगली उकळी काढावी. चवीप्रमाणे मीठ, साखर घालावी व वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

वाढणी/प्रमाण: 
साधारण चार जणांसाठी.
माहितीचा स्रोत: 
शेजारणीची रेसिपी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टोमॅटो शिजवून घेतले हे छान. मी एका घरी, कच्चे टोमॅटो ब्लेंड करुन केलेले सार चाखले होते. अजिबात आवडले नव्हते !

(ग्रुप सार्वजनिक करणार का ?)

आडो, मी पुलाव बरोबर आपलं नेहमीचं टॉम सार करते... त्याला लवंग + दालचिनीची फोडणी आणि वरतुन थोडं फ्रेश क्रिम.... अफाट लागतं Happy

आता हे सार करुन बघेन नेक्स्ट टाईम Happy

खूपच छान सायो! मिस्कर मधून काढावेच लागते का? नुसते रवीने ढवळले तर ?

ते म्हणतात ना- खिचडी के चार यार- पापड, सार, घी, आचार - ते खरे आहे Happy

नारळाचं दूध कॅन्ड वापरायचं नसेल तर अर्धा किलो टोमॅटोंसाठी एका मध्यम आकाराच्या नारळाच्या एका वाटीच्या खोबर्‍याचं दूध घ्यायचं.

मी हल्ली नारळाचं दूध काढायचे कष्ट न घेता टोमॅटो शिजवतानाच त्यात ओलं खोबरं घालते आणि नंतर सगळं एकत्र ब्लेंड करून गाळून फोडणी देऊन उकळायला ठेवते.

सानी, वर लाजोने लिहिलंय तसं करुन बघा किंवा मंजूडीने सांगितलेली आयडियाही चांगली आहे फ्रोजन/ ताजा नारळ मिळत असल्यास.

अरे धन्स सायो! मी प्रतिसाद नव्हते वाचले. लाजोने ऑलरेडी सुचवलंय की क्रिम Happy आम्ही घरी सिमिलर सार करतो, पण तूप घालून आणि त्यात नारळाचे दूध नसते.
पण हे सार लय भारी लागणार हे नक्की!

मला आत्ताच लक्षात आलं की मी हल्ली फोडणीत लसूण न घालता नुसताच आल्याचा तुकडा घालते. कोथिंबीरही ब्लेंड करताना घालते. त्याने मस्त लालसर हिरवा रंग येतो साराला.

मस्त. आमच्याकडेपण खिचडीबरोबर सार कंपल्सरी लागतं. नारळाचं दुध न घालता मी मंजूनी लिहिल्याप्रमाणे ओल्या नारळाचा चव घालून करते नेहेमी. आता एखाद्या वेळी नारळाचं दुध घालून करेन.

मी वर सांगितलेल्या व्हेरिएशनमध्ये आम्ही पण लसूण नाही घालत फोडणीत. मी (ही रेसिपी ट्राय करतांना) यातही नव्हते घालणार. त्याने उग्र चव येते, असं मला वाटतं आणि सारासाठी सुटेबल नाही ती चव.

ही रेसिपी ज्या मैत्रिणीने दिली तिने सांगताना लसूण सांगितला असावा. पण मला स्वतःला तुम्ही (सानी) म्हणताय तसंच वाटतंं म्हणून नुसतं आलंच घालते.

सायो, तुझ्या रेसिपीज करायला सोप्या पण एकदम चविष्ट असतात ( my type Wink )
नारळाचं दूध घालून सार मला माहिती आहे पण केलंच नाहीये जास्त वेळा. आता करेन.
तू सांगितलेले मिक्स व्हेजी पराठे पण बरेचदा केले हल्लीच.

Pages