नारळाचं दुध घालून टोमॅटोचं सार

Submitted by सायो on 11 July, 2008 - 14:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

टोमॅटो- मोठे ४, नारळाचं दुध -१ छोटा कॅन, आलं-लसूण पेस्ट १ छोटा चमचा प्रत्येकी, हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे, कढिपत्ता ५,६ पानं, चिरलेली कोथिंबीर, फोडणीचं साहित्य, मीठ, साखर चवीप्रमाणे.

क्रमवार पाककृती: 

प्रथम टोमॅटो मायक्रोवेव्हला शिजवून घ्यावेत. गार झाले की सालं काढून घ्यावीत. जाड बुडाच्या पातेलीत तेल गरम करून त्यात जिरं टाकावं. जिरं तडतडल्यावर त्यावर कढिपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकून परतावे. त्यावर शिजलेले टोमॅटो टाकून थोडे ठेचावेत व पाच एक मिनीटं शिजू द्यावेत. त्यावर आलं लसणीची पेस्ट घालून परत थोडे शिजू द्यावे. मग सगळं मिश्रण मिक्सरमधून काढावं. पुन्हा गॅसवर ठेवून त्यात नारळाचं दूध घालून चांगली उकळी काढावी. चवीप्रमाणे मीठ, साखर घालावी व वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

वाढणी/प्रमाण: 
साधारण चार जणांसाठी.
माहितीचा स्रोत: 
शेजारणीची रेसिपी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नारळाचं दूध काढायचे कष्ट न घेता टोमॅटो शिजवतानाच त्यात ओलं खोबरं घालते >> मी पण.

फोडणीमध्ये भाजलेले धणे - जिरे कुटून घालावे. अगदी बारीक पूड नव्हे आणि थोडी कोथिंबीर फोडणीत घातली की अप्रतिम स्वाद लागतो.

साराला मी आलं लसूण नारळाचं दूध वाटताना घालते.

एरव्ही टमेटो सूप करायचं असेल तर आलं लसणाची गोळी एका पुरचुंडीत बांधून ती सोडते सुपात. उकळी आली, सूप झालं की काढून टाकते. छान मंद स्वाद लागतो आलं लसणाचा.

माझ्या सासुबाई पण असेच सार करतात. नारळाच्या दुधाऐवजी नारळ+जीरे याचे वाटण घालतात. दाटपणा येण्यासाठी १-२ चमचे तांदुळाचे पिठ लावतात्. पण लसुण घालत नाही. साजुक तुपाची फोड्णीत
जीरे,कडिपत्ता , मिरची घातल्याने चव खुप छान येते.

इकडच्या ऱोमा टोमॅटो ना आंबटपणा नसतो. साराला आंबटपणा येण्यासाठी मी २-३ चमचे दही घालते.

मस्त! थँक्स सायो!

सायोन दिलेल्या मापानुसार सार केलत तर एक बदल म्हणून आल-लसूण पेस्ट्च्या ऐवजी दोन टीस्पून सांबार मसाला टाका. ती चव पण मस्त लागते.

मस्त रेसिपी.

मी टॉमेटो, एक हिरवी मिरची, थोडं आलं एकत्र उकळते. थोडं गार झालं की ओलं खोबरं घालून हँड ब्लेंडरने वाटते. जिरं , हिरवी मिरचीची फोडणी.

आता मायक्रोवेव्हमधून करून पाहीन

काल हे केलं होतं, लसूण घातला नाही. हि.मिर्ची, आलं, पुदिना किंचीत वाटुन ती पेस्ट वापरली.
कढईने तळ गाठला. Happy सोबत भात आणि मांदेली!

मी हल्ली नारळाचं दूध काढायचे कष्ट न घेता टोमॅटो शिजवतानाच त्यात ओलं खोबरं घालते आणि नंतर सगळं एकत्र ब्लेंड करून गाळून फोडणी देऊन उकळायला ठेवते.
>>>
करेक्ट. मी पण असेच करते. फोडणीला आलं घातल्याने ही अजुन छान चव येते.

कुठल्याही प्रकारच्या भाताबरोबर खायला छानच लागते हे सार.

काल केलं... एकदम झकास झालं. मी टॉमॅटो शीजताना कढईत खोबरे घातले. मग एकदम वाटुन काढले. बरोबर पुलाव आणि डेझर्ट म्हणुन डायेट गाजर हलवा केला होता काल. एकदम फाकडु बेत झाला.

काल हे सार केले होते. टोमॅटो कुकरमध्ये उकडून, थोड्याशा तुपाच्या फोडणीत जिरे/आले/हिरवी मिरची चालून मग एकत्र मिक्सरमध्ये फिरवले. मस्त चव आली होती. आता हे सार नेहमी केलं जाणार.

एक प्रश्न आहे,
प्रथम टोमॅटो मायक्रोवेव्हला शिजवून घ्यावेत >>>>
टोमॅटो चिरून शिजवायचे कि पूर्ण? आणि पाण्यात ठेऊन शिजवायचे कि तसेच? साधारण किती वेळ ठेवायचे?
माझी आई नारळ घालून करायची. पण ती गरम पाण्यात चाळणि ठेऊन शिजवायची बहुतेक.
मला फार फार आवडय्चे लहानपणी सार. तुमची पाककृती वाचून ते दिवस आठवले. धन्स सायो.

सॉरी, इथे न आल्यामुळे तुमच्या प्रश्नाला उत्तर देता आलं नाही.
मायक्रोवेव्हेबल बोलमध्ये थोड्या पाण्यात टोमॅटो अख्खे ठेवावेत- साधारण ८ मिनिटं शिजवावेत. शिजल्यावर सालं काढून मग पुढची कृती करावी.

_/\_
कुपया कोलंबीचे लोणचे क्रुती/ रेसीपी dyavi,THANKS

Pages