खुप वर्षांपुर्वी भारताबाहेर स्थायिक झालेल्या माझ्या एका बालमैत्रिणीचा गेल्या आठवड्यात फ़ोन
आला होता, आम्ही प्राथमिक शाळेत एकत्र जात होतो.
तिच्या बोलण्यात असे काहिसे शब्द आले, कि मला एकदम तिच्या आणि माझ्या आईचे बोलणे
आठवले. त्या दोघी बोलताना हे शब्द सर्रास वापरत असत. तिला मी हे सांगितल्यावर म्हणाली,
कि माझ्याशी बोलताना तिला पण तेच दिवस आठवले होते. आणि माझ्याशी मराठीत बोलताना
असे शब्द अगदी अजाणता तिच्या बोलण्यात आले.
आता माझ्या आईच्या बोलण्यातही हे शब्द येत नाहीत. पण ते शब्द, आणि त्यांचे खास उच्चार
माझ्या लख्ख लक्षात आहेत.
सहज आठवले म्हणून नोंदवतोय.
१) अय्या आणि इश्श्य.
हे शब्द इतके प्रचलित होते कि त्या काळी मुलींना या दोन शब्दांशिवाय आश्चर्य आणि लज्जा
व्यक्तच करता येत नसे. माझ्या शाळेतल्या मुलीदेखील हे शब्द खुपच वापरायच्या. अय्या म्हणतांना
किंवा तो म्हणून झाल्यावर तोंडावर रुमाल (तोही लेडीज हातरुमाल) ठेवल्याशिवाय तो उद्गार पूर्ण
होत नसे. इथे मी लज्जा हा शब्द वापरलाय, त्याला पण त्याकाळी खुपच मर्यादित अर्थ होता.
अय्या या शब्दाचा एक मस्त उच्चार लताने, शागिर्द मधल्या, दिलवील प्यारव्यार मै क्या जानू
रे, या गाण्यात केलाय.
२) बावळट्ट
मुलांना उद्देशून किंवा कुणाही मूर्ख व्यक्तीला (पण खास करुन पुरुषांनाच) उद्देशून हा शब्द वापरला
जात असे. बरं हा शब्द नुसताच नव्हे तर त्याचा उच्चार साधारण बावळट्ट्चै असा असायचा.
या शब्दाला मुर्ख एवढाच अर्थ होता असे नाही, पण मुलांनी काहिही केलं, तरी हा शब्द वापरला
जायचा. आणि काय असेल ते असो, मुलींनी बावळट म्हंटलेलं मुलांना पण आवडत नसे.
३) गडे
हा शब्द मैत्रिण किंवा मित्र (त्या काळात मित्राशी बोलायची फ़ारशी प्रथा नव्हती म्हणा) दोघांनाही
उद्देशून असे. हा शब्द उच्चारायचे प्रसंगही खास असत. म्हणजे एखादी उसनी घेतलेली, वस्तू किंवा
सुटे पैसे परत करायला गेल्यावर हा शब्द हमखास उच्चारला जात असे. असं नाही गडे, त्याचं
काय एवढं.. वगैरे. यायचं ना गडे असे जे त्याचे आताचे चावट रुपांतर आहे, तसे ते बोलण्यात नसायचे.
नका गडे माझ्याकडे पुन्हा पुन्हा पाहु, डोळे हे जुल्मी गडे.. हि गाणी त्याच काळातली.
४) किनै
कि नाही, या शब्दांचा हा गोड उच्चार त्याकाळी खुपच वापरात असे. लहान मुली मोठ्यांकडे काही
मागायचं असेल (मागून मागून काय ते, भातुकलीसाठी गूळ, शेंगदाणे वगैरे) तर सुरवात अशी
व्हायची, किनै आई आम्ही दुपारी भातुकली करणार आहोत..
किंवा मला किनै हे नै आवडत.
५) नै
मराठीत मधे ह असणारे शब्द फ़ारच कमी आहेत (नेहमी, साहजिकच ..) ह हा वर्ण कुठल्याच गटात
(ओष्ठ्य, दंत्य, तालव्य ) न येता स्वतंत्र येतो त्यामूळे त्याचा इतर अनेक अक्षरांशी संयोग होऊ
शकतो (क-ख, ग-घ, त-थ..) म्हणून बहुदा ह मधे असलेले शब्द उच्चारताना आपली किंचीत धांदल उडते.
नाही या शब्दाचा उच्चार, इतका स्पष्ट लहान मूलेच करतात. आपण सहसा नाय असाच उच्चार करतो.
६) बै
आता मायबोलीवर हा शब्द परत दिसायला लागला आहे. त्या काळात आम्ही आमच्या शिक्षिकेंना
बाई असेच म्हणत असू. त्या काळातल्या गाण्यातही ( बाई बाई मनमोराचा कसा पिसारा, काय बाई
सांगू ) हा शब्द असे. एकंदरीत या शब्दाला आदराचे वलय होते (जिजाबाई, लक्ष्मीबाई)
मग का कुणास ठाऊक, बहुतेक हिंदीच्या (आठवा तिसरी कसम मधली हिराबाई) प्रभावाने असेल,
या शब्दाचा स्तर खुपच खाली गेला. हिंदी चॅनेल्सवर या शब्दाचा अर्थ कामवाली बाई असाच धरला
जाऊ लागला.
सरकारी कार्यालयात तर मॅडम बाई, असा एक विचित्र शब्दप्रयोग कानावर पडतो. हा शब्दप्रयोग आशा
खाडिलकरने गायलेल्या एका धमाल गाण्यात आलाय.
नोकरी कसली ही, हि तर डोक्यावर टांगती तलवार
आता तूम्हीच सांगा, आहेत कि नाही, इथली कार्टी
एकापेक्षा एक तालेवार.... असा मुखडा होता.
या बाई शब्दाबाबत माझी एक मजेदार आठवण आहे. माझा पुतण्या लहान असताना छायागीत बघून,
हि माधुरी का ? हि ममता का ? असे विचारायचा. वहिनीला ते आवडायचे नाही, ती म्हणायची, त्या
काय तूझ्याएवढ्या आहेत का, नावाने हाका मारायला. मग त्याने त्यांना दिक्षितबाई, कुलकर्णीबाई असे
म्हणायला सुरवात केली.
वरचे दोन्ही शब्द मिळून नैबै असा शब्द पण कॉमन होता. पण त्या मानाने तै (ताई) असा उच्चार तितका
प्रचलित नव्हता. वार्यावरची वरात मधल्या कडवेकर मामी पण, मालुताई अशीच हाक मारायच्या.
७) वन्सं
मोठ्या नणंदेला उद्देशून हा शब्द वापरला जाई. मला वाटतं लहान नणंदेला पण वन्संच म्हणत असत.
सासू खालोखाल छळणारी म्हणून हि ख्यातनाम होती. शास्त्रीय चीजांमधे पण बहुदा हि जानी दुष्मनच असे.
( अब मै तो ईख खाये मरुंगी, ननदीया मारे बोल...पारंपारिक ठुमरी - श्रुती साडोलीकर
किंवा
बैरन ननदीया, लागे डराने - छोटा खयाल - राग बिभास. पंडीता मालिनी राजूरकर)
मला वाटतं कोल्हापूर किंवा बडोद्याला मराठ्यांच्या मधे मोठ्या नणंदेला दिवानसाब असा पण शब्द वापरात
होता. सौभद्र नाटकातही, रुक्मिणी, सुभद्रेला उद्देशून वन्स हाच शब्द वापरते.
आता बहुदा हे नाते मित्रत्वाचे झाल्याने, हा शब्द मागे पडला.
८) मामंजी
सासरेबुवांना उद्देशून हा शब्द वापरला जात असे. याचा मामा या शब्दाशी संबंध नसावा. कारण मामेभावाशी
लग्न करण्याची प्रथा कधीच नव्हती. आत्येबहीणीशी करत असत म्हणून, जावई सासूला, आत्याबाई असे
पण म्हणत असे.
आता सासुला आई (किंवा मम्मी) आणि सासरेबुवांना बाबा, पप्पा असेच काहीतरी म्हणतात. मामंजी हा
शब्द ताईबाई आता होणार लगीन तूमचं या गाण्यात पण आलाय. (मामंजीना जमाखर्च द्या ..) त्यामानाने
भावोजी हा शब्द अजून वापरात आहे.
९) पाटपाणी
संध्याकाळचे जेवण तयार झाले कि मुलांनी पाटपाणी घ्यायची प्रथा होती. अगदी ताटाखाली आणि टेकायला पाट नसला तरी बसण्यासाठी एक पाट असायचाच. आता जमिनीवर बसण्यासाठी आपण सतरंजी वगैरे अंथरतो, पण त्या काळात अगदी आमच्याकडेही पाटावर बसायची प्रथा होती.
पाणी घ्यायचे म्हणजे माठातील गार पाणी तांब्यात काढून घ्यायचे. पेल्याला फुलपात्र किंवा भांडे असा शब्द
खास करुन, ब्राम्हणांच्या घरी वापरात होता.
१०) झाकपाक
रात्रीचे जेवण झाले कि झाकपाक करणे हे बायकांचे अत्यावश्यक काम असायचे. फ़्रिज नसल्याने उरलेली
भाजी आमटी, दुसर्या भांड्यात काढून ती व्यवस्थित झाकून ठेवावी लागे. तापवलेले दूध थंड करुन त्यावर
जाळीचे झाकण ठेवणे, विरजण लावणे हे पण करावे लागे. दूधदुभत्यासाठी जाळीचे कपाट असे.
रात्री कुठे बाहेर जायचे असेल, किंवा अगदी अंगणात गप्पा मारत बसायचे असेल. (बरोबर बिनाका गीतमाला
किंवा पुन्हा प्रपंच ऐकायचे असेल) तर आईला हे सगळे आटपूनच यावे लागे.
११) दिवेलागण
वीजेचे दिवे नव्हते त्यावेळी नगरपालिकेतर्फ़े लांब बांबूच्या सहाय्याने रस्त्यावरचे दिवे लावणारा एक माणुस
सायकलवरुन यायचा. वीजेचे दिवे आले तरी, त्याचे बटण त्या खांबावरच असायचे आणि ते लावायला
माणूस येतच असे.
हा काळ मी मुंबईत बघितला नाही, पण गावाला कंदिलाच्या काचा साफ़ करणे, बाकिच्या दिव्यातील वाती
साफ़ करणे हा रोजचा उद्योग असायचा.
या दिवेलागणीला अनेक संदर्भ होते. या वेळेच्या आत मुलांनी खेळ आटपून घरात यावे, हातपाय धुवून
शुभंकरोति म्हणावे आणि अभ्यासाला लागावे, अशी शिस्त होती.
सांजवात करणे, तुळशीसमोर दिवा लावणे हेही होतेच. दिवेलागण हा स्बद मागे पडला तरी तिन्हीसांजा
मात्र अजून वापरात आहे.
१२) केरवारा
केराचा आणि वार्याचा काय संबंध होता ते माहित नाही. पण केर कधी काढायचा याचे मात्र आडाखे
होते. केर शक्यतो सकाळी किंवा दुपारी काढला जायचा. पण तो संध्याकाळचा कधीच काढला जात नसे.
संध्याकाळची वेळ, हि लक्ष्मीची वेळ मानली जात असे.
तसेच एखादा माणूस घराबाहेर पडल्यावर लगेचच केर काढणे अशुभ मानले जात असे. कारण घरातील
व्यक्ती मृत झाली तरच असे करत असत. सखाराम बाइंडर या नाटकात पण लक्ष्मी घराबाहेर पडायच्या
आधी केर काढूनच जाते. आता या शब्दा ऐवजी झाडू मारा, किंवा झाडूपोछा हाच शब्द रुढ झालाय.
त्या मानाने धुणंभांडी हा शब्द अजून वापरात आहे.
१३ ) मोलकरीण
मोलकरीण हा शब्द सर्रास वापरात होता. सुलोचना, रमेश देव, सीमा देव यांच्या या नावाचा चित्रपट
पण होता. बायका नोकरी करायचे प्रमाण कमी असल्याने, मोलकरीण आणि घरतील बाई यांचा संवाद असायचा.
आता का कुणास ठाऊक पण या शब्दाला थोडी गौण छटा आलीय. त्याजागी कामवाली बाई किंवा
(नुसतीच) बाई असा शब्द जास्त प्रचलित आहे.
१४ ) शेकशेगडी
लहान बाळाला अंघोळ वगैरे घालून झाली, कि शेक दिला जात असे. त्यासाठी पाळण्याखाली किंवा
बाजेखाली शेगडीत निखारे ठेवून त्यावर धूप टाकला जात असे. कधी कधी बाळाच्या जावळाला पण
याचा शेक देत असत.
त्या काळी बाळंतीणीची खोली म्हणून एक अंधारी खोली राखीव असे आणि त्या खोलीत शिरल्याबरोबर
असा वास येत असे. हा प्रकार अगदी शहरातही केला जात असे.
१५ ) बिर्हाड बाजलं
बिर्हाड या शब्दाचा नेमका अर्थ सांगणे कठीण आहे. पण साधारण मुक्कामाचे ठिकाण असे म्हणता येईल.
नाटक कंपनीचा मुक्काम जिथे असे त्या जागेला बिर्हाड म्हणत असत. पुर्वी कोकणातून एकटाच माणूस
आधी नोकरीला येत असे. (चाकरमानी) त्याचा जम बसला, एखादी जागा भाड्याने घेतली कि तो गावाहून
बायकामूलांना बोलावून घेत असे. त्यालाही बिर्हाड केले वा बिर्हाड आणले, असा शब्द वापरात होता.
बाजलं म्हणजे अर्थातच लाकडाची सुतळीने विणलेली खाट.
या नावाचे एक नाटकही होते, त्या नाटकातले माझ्याच पावलांची असे एक सुंदर नाट्यगीत, आरती नायकच्या आवाजात यू ट्यूबवर उपलब्ध आहे.
१६ ) पागडी
घर भाड्याने घेताना किंवा विकत घेताना पागडी म्हणून काही रक्कम द्यायची प्रथा होती. साधारण डीपॉझिट
असा याचा अर्थ होता.
१७ ) नहाण
त्याकाळात शॉवर्स नव्हते आणि मुलींचे केसही लांब असायचे. त्यामूळे केसांवरुन अंघोळ हा एक सोहळा
असायचा. शिकेकाई, रिठा असा सगळा सरंजाम करावा लागायचा. आई किंवा मोठी बहीण अंधोळ घालायची
आणि मग केस खसाखसा पुसून बारीक दाताच्या फ़णीने विंचरणे हा पण एक उद्योग असायचा.
मुलगी वयात येणे यासाठी पण नहाण येणे (किंवा पदर येणे) असा शब्द होता. २२ जून १८९७ या चित्रपटात सीताबाईला चाफेकळीला नहाण आलं, असे एक गाणे होते.
१८) चूल
शहरात साधारण ५० वर्षांपूर्वीच शिजवण्यासाठी गॅसचा वापर सुरु झाला. पाईपनेदेखील गॅस पुरवला जात असे.
बॉम्बे गॅस असे त्या कंपनीचे नाव होते. त्यांचा एक लोखंडी स्तंभ किंग्ज सर्कलच्या ऑपेरा हाऊसजवळ,
आताआतापर्यंत होता. अगदी गॅस नसला तरी स्टोव्ह वापरात होते. पण बायकांच्या बोलण्यात चूल हाच शब्द होता. अगदी रुचिरातही अनेकवेळा हा शब्द आलाय. घरोघरी मातीच्या चुली, चूल आणि मूल, चूलीपुढचे शहाणपण असे शब्दप्रयोग अनुषंगाने येतच.
१९) नांदणे
आपण नांदा सौख्यभरे असा आशिर्वाद जरी अजून देत असलो तरी, नांदणे हे क्रियापद मात्र फारसे वापरत
नाही. एखादी बाई सारखी माहेरी जात असली, तर ती नीट नांदत नाही असे म्हंटले जात असे. आणि
बर्याच नवरेमंडळींची बायको नीट नांदत नाही, हि समस्या असे.
त्याकालच्या लावण्यांमधे पण हा शब्द असे. नांदायला मला बाई जायाचं नांदायला अशी रोशन सातारकरची
लावणी होती, येऊ कशी तशी मी नांदायला पण तिचीच होती. कशी नांदायला येऊ मी बाई, अशी पुष्पा
पागधरेची लावणी होती.
२०) बोडकं / डोंबलं
हि अगदी अभिमानाची गोष्ट आहे, कि केशवपनाची दूष्ट रुढी आपण त्यागलीय. अर्थात त्यामागे आपल्या
समाजसुधारकांचे प्रयत्न होतेच. पण पुर्वी अगदी शहरातही लाल आलवण नेसलेल्या विधवा दिसत.
त्यांचा बोडक्या बाया, असा अत्यंत अपमानास्पद उल्लेख केला जात असे. त्यांचे केस नसलेले डोके
हा पण चेष्टेचाच विषय असे. त्यापैकी अनेक जणी असे उल्लेख हसण्यावारी नेत. (दुसरा उपायच नसे.)
घाल माझ्या बोडक्यावर, डोंबलं माझं, कुणाला कश्याच तर बोडकीला केसाचं असे शब्दप्रयोग सर्रास होत
असत.
२१ ) बोळकं
या शब्दाला दोन अर्थ होते. दात नसलेले तोंड, मग ते तान्ह्या बाळाचे असो कि वृद्ध माणसाचे, त्याचा
उल्लेख बोळकं म्हणूनच करत असत. हसण्याला, पसरलं बोळकं असा शब्द प्रयोग करत.
एका प्रकारच्या भांड्याला पण बोळकं असा शब्द होता. (मला खात्री नाही) पण शालू हिरवा या
गाण्यात
चूल बोळकी इवली इवली, भातुकलीचा खेळ गं, अशी ओळ आहे.
२२) संसार
मराठीत आणि हिंदीत काही शब्दांचे (चेष्टा, यातायात ) अगदी वेगवेगळे अर्थ आहेत त्यपैकी हा
एक. संसार म्हणजे नेमके काय हेही सांगणे कठीण आहे. कारण घरातील नीट लावलेल्या वस्तू,
भांडीकुंडी यांना पण हा शब्द वापरत आणि नवर्याबरोबरच्या सहजीवनालाही. संसार नीट कर
असा सल्ला पोक्त बायका नववधूला देत असत. माझा घर माझा संसार असे एक नाटक होते.
(म्हणजे घर आणि संसार वेगळे होते ना.)
मज काय ऊणे या संसारी वगैरे गाणी आहेतच पण एका पटक्यात पण असाच सल्ला दिलाय
बिकट वाट वहीवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको
संसारी तू ऐस आपुल्या, उगाच भटकत फिरु नको.
२३) पदर
पदर हा शब्द साडीसाठी वापरला जात असेच. पण आणखी एका संदर्भात हा शब्द वापरात होता.
सोयरीक जमवताना, नातेवाईकांची चौकशी करताना, तूमचा पदर कुठे कुठे लागतो, असे विचारले
जात असे.
पदर येणे, पदर घेणे, पदर संभाळणे याला साडीच्या संदर्भात असले तरी वेगवेगळे अर्थ होते.
डोईचा पदर आला खांद्यावरी, जनी म्हणे मी वेसवा झाले.. असा संत जनाबाईचा अभंग आहे.
मराठ्यांमधे डोक्यावर पदर घेणे आवश्यक होते तर ब्राम्हणात दोन्ही खांद्यावर. याला अनेक
संदर्भ आहेत. मराठा स्त्रिया उन्हातान्हात राबणा-या त्यामूळे डोक्यावर पदर घेणे आवश्यक होते.
राजस्थानचा संदर्भ असल्याने थोडाफ़ार घुंघटाशी सबंध होता तर ब्राम्हण स्त्रियांच्या केसांचा खोपा
आणि त्यावरचे दागिने दिसण्यासाठी पदर अनावश्यक होता. तसेच त्या समाजात विकेशा स्त्रिया
डोक्यावरुन पदर घेत असत. (यासंदर्भात जास्त माहिती प्रतिक्रियांमधून मिळेलच.)
२४) झक
झक मारली आणि तूझ्याशी लग्न केले, असा शब्द्प्रयोग त्या काळातल्या संसारीक भांडणात येत असे. झक या शब्दाचा नेमका अर्थ मला कळला नाही कधी.
आता आपण त्यासाठी पागल कुत्तेने काटा है, असे शब्द वापरतो नाही का ?
२५ ) रंजीस
हा शब्दही कमी ऐकायला येतो हल्ली. चेहरा उतरलेला असणे अशा अर्थी हा शब्द वापरात
होता. रुणा लैलाच्या, रंजीशही सही या गझलेशी त्याचा सबंध नव्हता.
भाषा प्रवाही असते. जूने शब्द विस्मरणात जाणार आणि नवे प्रचारात येणार, हा नियमच आहे.
झणिं, झडकरी, एकसमयावच्छेदेकरुन, सत्वर, वृथा, मूढ असे शब्द तर त्याआधीच वापरातून
मागे पडले होते.
मला आठवले तसे अनेक शब्द तूम्हालाही आठवतील आणि ते प्रतिसादातही येतीलच.
पण हे शब्द म्हणजे तरुणाईची भाषा नव्हती आणि यापैकी बहुतेक एखाद्या वस्तूशी संबंधित नव्हते, पण या शब्दांशी माझ्या शाळकरी वयातल्या आठवणी निगडीत आहेत हे नक्की.
पलंग, दिवाण हे पण शब्द आहेत.
पलंग, दिवाण हे पण शब्द आहेत. तसेच बेडशिट ला माझे आजी-आजोबा पलंगपोस म्हणतात.
उशीचा आभ्रा हा शब्द अजुन ही आहे बहुतेक.
आणि लोडासाठी खोळ.
आणि लोडासाठी खोळ. तंबोर्यासाठी पण खोळ च.
अशोक. >> येशेल ची कहाणी मस्त.
अशोक. >> येशेल ची कहाणी मस्त.
>>> गॅसबत्ती मधला भाग खातात
>>>
गॅसबत्ती मधला भाग खातात हे नवलच (तो कसला बनवलेला असतो ?)
हा सिल्क चा असतो. बदलतात तेंव्हा कडक झालेले असते जळून. ते जिभेवर ठेवल्यास चुरचुरित खारट आंबट चव लागते. अन मुले काय खातील सांगता येत नाही. गुलमोहोराच्या कळ्या / पाकळ्यांपासून काय वाट्टेल ते.
अशोक, किती अनोखी कहाणी !
अशोक,
किती अनोखी कहाणी ! कोल्हापूरात तर तेलाच्या दुकानाबाहेरच्या पाट्यांवर पण येशेल लिहिलेले बघितलेय.
मला आठवतेय, माझ्या आईची आत्या (कोल्हापूरला असे ती) गॅस सिलिंडरला पण बर्शेन म्हणत असे.
घासलेट माझ्या आठवणीत वापरात होता. रॉकेल (रॉक ऑईल का ?) पण वापरात होता. त्या मानाने केरोसिन कमी वापरात होता.
माझी वहीनी कोकणस्थ ब्राम्हण. त्यामूळे आमच्या घरात नवीन शब्द वापरात आले. पोळ्या आणि चपात्या हा वाद अजून मिटलेला नाही.
पण तिला बिचारीला जेवण वाढताना बास, पुरे असे शब्द वापरायला संकोच वाटतो. त्यांच्या घरी या शब्दाला आता बास ! असा अर्थ होता आणि आमच्या घरात हे शब्द वापरणे (किमान जेवण वाढताना) निषिद्ध होते.
'बोघनं' हा ही एक खान्देशातला
'बोघनं' हा ही एक खान्देशातला शब्द.
बोघनं - भांडं
सतेलं- छोटं पातेलं
गंज- दुध तापवायचं उभट आकाराचं पातेलं
बारदान- गोणपाट
पावशी- विळी
अमिर खानच्या 'आल इज वेल' वरुन आठवलं... पुर्वी म्हातार्या बायका अलार्मला 'आला राम' म्हणायच्या.
मी-आर्या,
मी-आर्या,
नमस्कार, मी आजच सदस्य झाले.हा
नमस्कार,
मी आजच सदस्य झाले.हा विषय आवडला. मी इथे भाग घेईन.
स्नेहा
स्नेहा नक्कीच. आर्या, मला
स्नेहा नक्कीच.
आर्या, मला लहानपणी आलाराम हाच शब्द योग्य वाटायचा.
मधे एक काळ असा होता कि इंग्रजांच्या प्रभावामूळे कि काय,
म्हातार्या बायका सर्रास इंग्रजी शब्द वापरु लागल्या होत्या.
टिळक आणि आगरकर या नाटकात अशी एक बाई होती,
आणि ती भुमिका, भक्ती बर्वे करत असे.
इंग्रजी शब्दाची काही मराठी रुपे
त्या आल इज वेल चे रुळलेले रुप म्हणजे..आलबेल
तसेच Damn Beast चे झाले, ड्यॅंबिस आणि
Damn Rat चे झाले, डांबरट
'बोघनं' हा ही एक खान्देशातला
'बोघनं' हा ही एक खान्देशातला शब्द
बघोणं. बोघ्न्ं नाही.:)
दिनेश ~ तुमच्या मातोश्रींची
दिनेश ~
तुमच्या मातोश्रींची आत्या 'बर्शेन' म्हणत असे म्हणजे नक्की ती माझी आई आणि तिच्या वयासम त्या काळातील अनेक स्त्रियांच्या ओळखीतील असणार असेच मी म्हणेन. कोल्हापुरात प्रथम 'बर्शेन' याच कंपनीने 'गॅस शेगडी' चे Public Demonstration शहरातील प्रसिद्ध अशा दसरा चौक [मुस्लिम बोर्डिंग आवारात] केले होते आणि त्यावेळेच्या स्त्रियांच्या दमदार कथाकहाण्यामध्ये आता रॉकेलचा स्टोव्ह आणि लाकडाची चूल गायब होऊन 'आपोआप जाळ' येणार्या मशीनमधून स्वयंपाक करता येणार अशी धारणा झाली. त्यावेळी 'लायटर' अस्तित्वात नव्हते. माकडछाप आणि खार छाप काडेपेट्याही बर्शेनच्या एजन्टसनी प्रथम बुकिंग करणार्यांना 'मोफत' देऊ केल्या होत्या.
त्यामुळे झाले असे की, पुढे 'एस्सो', एच.पी. वा तत्सम कंपन्यांनी गॅस पुरवठ्यामध्ये आघाडी घेतली तरी 'बर्शेन' ही पायोनिअर कंपनी झाल्याने या भागातील स्त्रियांच्या तोंडी 'गॅस=बर्शेन' हेच सूत्र बसले. पुढे घरी दुसरा 'एच.पी.' चे सिलेन्डर आले तरी ज्यावेळी त्या कंपनीची व्हॅन बिल्डिंगच्या दारात येई त्यावेळी आई 'बरं झालं बाई, बर्शेन संपत आलाच होता' असेच हटकून म्हणे.
अर्थात आपण शिकलेली माणसे देखील मुलाला आदेश देताना म्हणतोच "या कागदपत्राच्या दोन झेरॉक्स घेऊन ये." ~ प्रत्यक्षात त्या मशिनला 'फोटो कॉपीअर' असे म्हटले पाहिजे कारण 'झेरॉक्स' ही अन्य कंपन्यांप्रमाणे त्या क्षेत्रातील एक आहे. पण झाले आहे असे की, ते नामच जगभर 'फोटो कॉपिंग' शी इतके समरस झाले आहे की जरी दुकानदाराकडे 'कॅनन' 'फुजी' वा 'रिको' अशा कंपनीचे मॉडेल असले तरी तो स्वतःच आपल्या दुकानाची जाहिरात "इथे पाठपोट झेरॉक्स करून मिळतील' अशीच करतो.
"डालडा' चे तरी दुसरे काय झाले ?
वरील सारखेच निरमा बद्दल अजुन
वरील सारखेच निरमा बद्दल अजुन भांडीवाल्या काही बायका गावाकडे जरा निरमा द्या असेच म्हणतात.
आणि वाहनांच्या बाबतीत (गावाकडे तरी जीप बद्दल)
@इब्लिस >>बघोणं. बोघ्न्ं
@इब्लिस
>>बघोणं. बोघ्न्ं नाही.
कदाचित थोडा गावठी अन्गाचा एक शब्द भगुणं हा या पासुन आला असेल.
पूर्वी Aluminium च्या भांड्यांना जर्मनची भांडी म्हणत. का ते माहित नाही. कुणाला माहिती असेल सांगा की.
आग्पेटी = काडेपेटी = match
आग्पेटी = काडेपेटी = match sticks
मला माझ्या लहानपणीचा एक शब्द आठवतोय - गिरमीट. आम्ही ते कशाला तरी म्हणायचो ते नाही आठवत. आणि करकटक म्हणजे कंपास.
>>> पूर्वी Aluminium च्या
>>> पूर्वी Aluminium च्या भांड्यांना जर्मनची भांडी म्हणत. का ते माहित नाही. कुणाला माहिती असेल सांगा की.
ती अॅल्युमिनियमची नसून जर्मेनियम या मिश्र धातूची असायची म्हणून जर्मनची भांडी असा अपभ्रंश झाला.
"तद्वत्" (म्हणजे "त्याप्रमाणे") असा शब्दप्रयोग कै. ना. सी. फडके यांच्या लेखात अनेकदा असायचा. हा शब्द आता क्वचितच वाचायला मिळतो.
आता हे शब्द मराठी
आता हे शब्द मराठी पाठ्यपुस्तकात असतात का /
पृथःकरण, उर्ध्वपातन, संपृक्त द्रावण,प्राणवायू, कर्बद्वीप्राणिल वायू.. . कसे भारदस्त शब्द होते.
यापैकी पृथक हा शब्द पाठ्यपुस्तकाच्या बाहेर पण वाचला होता. खास करुन मसाले पृथक पृथक ठेवावे, असे त्याकाळच्या पाककलेच्या पुस्तकात लिहिलेले असे. मग तो शब्द दिसला नाही कुठे. कुंतीचे नाव पृथा असे होते असे पुढे वाचले पण त्याचा संदर्भ तिच्या आडव्या बांध्याशी आणि रुंद तळव्याशी जोडल्याचे पण वाचल्यासारखे वाटते.
--
लहानपणी ताटात भात वगैरे टाकला, की डोक्यावर थापीन असे आई सहज म्हणायची. तो शब्दप्रयोगही आता वापरात नाही.
धनश्री, मला वाटते, गिरमीट हा
धनश्री, मला वाटते, गिरमीट हा शब्द टोकयंत्र्(शार्पनर) साठी वापरत होते.
गिरमीट = सुताराचे हाताने भोक
गिरमीट = सुताराचे हाताने भोक पाडायचे हत्यार = हॅन्ड ड्रील.
पृथा = पृथ्वीची मुलगी (जमिनीत सापडली होती म्हणून)
अॅल्युमिनीयम = जर्मन सिल्व्हर ?
बाबु त्याकाळात मुली अशा
बाबु त्याकाळात मुली अशा जमिनीत तयार होत होत्या वाटतं.
सीतेची कहाणी पण तशीच ना.
आम्ही शाळेत पेन्सिलीला आवर्जून शिसपेन्सिल म्हणायचो (त्यात शिसे
नसते, हे त्यावेळी माहित नव्हते.) आणि पाटीवरची ती, दगडी पेन्सिल.
प्रज्ञा, गिरमिट म्हणजे ड्रिल
प्रज्ञा,
गिरमिट म्हणजे ड्रिल च. हाताने चालवायचे, त्याला 'धनुकली' असायची दोरीची, अन खिळा ठोकून त्याचे 'ड्रिल बिट' बनायचे.
धनश्री,
अहिराणीला स्वतः ची लिपी नाही. उच्चार कोसाकोसावर थोडे थोडे बदलतात. तुमचं ही बरोबर असेल कदाचित.
बागुलबुवा,
पृथा = पृथ्वीची मुलगी : पृथा हे कुंतीचे नांव आहे. थोडी थोराड अंगाबांध्याची असा अर्थ होतो त्याचा. कुंती तशीच होती. असे वर्णन आहे..
"पेन्शन" हा तसा निरुपद्रवी
"पेन्शन" हा तसा निरुपद्रवी आणि सहजगत्या उच्चारला जाऊ शकणारा शब्द आहे. पण पूर्वी सरकारी (अजून शासकीय झाले नव्हते) आणि मिलिटरी नोकरीतून 'रिटायर' झालेल्यांनादेखील 'पेन्सीली' त निघाला असे संबोधत. [उच्चारीही 'पेन्सुल']
एखादा पोरगा बिनकामाचा आहे असे ठरल्यास आणि घोड्यासारखा नुसता चरत असल्यास गल्लीत असलेला आणि पेन्सिलीत निघलेला पेन्शनर त्या पोराच्या बापाला देई ~ 'कशाला गंप्याला घरात बसवतोस, घाल की त्याला एमटीत' असा मोफत सल्ला देई.
पण मला कॉलेजला जाऊन एनसीसीमध्ये कॅडेट होईतोपर्यंत ते एमटी प्रकरण काय समजले नव्हते. पुढे त्याचा फुल फॉर्म एका जवानाकडूनच 'मिलिटरी ट्रेनिंग' असा होतो हे समजले.
@दिनेशदा >>आता हे शब्द मराठी
@दिनेशदा
>>आता हे शब्द मराठी पाठ्यपुस्तकात असतात का /
पृथःकरण, उर्ध्वपातन, संपृक्त द्रावण,प्राणवायू, कर्बद्वीप्राणिल वायू.. . कसे भारदस्त शब्द होते.
आई ग, मला सातवी-आठवीच्या वर्गात बसल्याचा भास झाला या शब्दांनी.
पण खरच भन्नाट शब्द होते ना.
दहावीत बाईंनी २ शब्द १० वेळा लिहून घेतले होते ते म्हणजे - पुनर्नवीकरणीय उर्जा आणि अपुनर्नवीकरणीय उर्जा. अजून लक्षात आहेत.
>>लहानपणी ताटात भात वगैरे टाकला, की डोक्यावर थापीन असे आई सहज म्हणायची. तो शब्दप्रयोगही आता वापरात नाही>> मी वापरते ना माझ्या मुलीशी बोलताना.
आणि कधी कधी ती वेळ खरच येते. एकदा दूध पिण्यासाठी मुलीने माझं रक्त आटवण्यास सुरुवात केली. मग मी माझा शब्द खरा करण्यासाठी म्हणून तिला "दुधो नहाओ" आशिर्वाद दिला.
तेव्हापासून १० मिनीटात कप रिकामा होतो. हे वागणं जरा अमानुष वाटतं, पण आई बोलते ते करते हे समजल आहे तिला. 
खरच एक शब्दकोश बनवला पाहिजे
खरच एक शब्दकोश बनवला पाहिजे आता. मला तर वाटत की चित्रशब्दकोश असावा कारण एकाच गोष्टीची अनेक रुपे अनेक नावांनी ओळखली जातात. मूळ भाषा विसरणे हे मराठीत आहे की बाकीच्या भाषांमधे सुध्दा ही कीड लागली आहे कुणास ठाउक!!
धन्यवाद दिनेशदा.सुंदर लेख आणि
धन्यवाद दिनेशदा.सुंदर लेख आणि सगळ्यांच्या छान छान प्रतिक्रिया. आपली मायबोली खरंच भाग्यवान आहे! जगभरात तिचे इतके आस्थेवाईक पायिक आहेत.
चिडणे: क्रोधागारात जाणे आजीचे
चिडणे: क्रोधागारात जाणे
आजीचे काही शब्दः
झुटुकपाळण्या घालणे म्हणजे काहीही काम न करता उगाचच इकडून तिकडे गडबडीने जाणे
मिडकणे: सारखे दमल्यासारखे सुस्कारे टाकणे
झिपर्या: केसांच्या बटा
मांडवशोभा, काचापाणी, नेसूचे, नऊवारी साडीचे केळं..बापरे आज्जीच्या आठवणीने किती शब्द आठवले
मांडवबळ !! -- उवाच हा पण शब्द
मांडवबळ !!
--
उवाच हा पण शब्द एकेकाळी निदान पुस्तकात तरी फार दिसायचा.
प्रविष्ठ व्हावे हा शब्द पत्रात शेवटी यायचा (अर्थ कधीच कळला नाही).
खुषाली सांगणे, खुषाली कळवणे, नमस्कार सांग, उलट-टपाली, दिसताक्षणीच हेही पत्रातले शब्दप्रयोग.
आशिर्वाद पण एकतर सप्रेम तरी असायचे, नाहीतर अनेक तरी.
वाईट बातमी कळवण्यासाठी, देवाज्ञा झाली.. असे लिहायचे.
---
सरकारी कागदपत्रात काही विचित्र संयोग झालेले असायचे
अॅक्टान्वये, डिटेलवार, इथे टपाल याचा अर्थ वेगळा असायचा.
---
कोर्टाच्या संदर्भात.. नाझर ऑफिस, रोजनामा, सामनेवाले, मे. ( मेहरबान) हे शब्द.
मस्त बाफ दिनेशदा १५ वा शब्द
मस्त बाफ दिनेशदा
१५ वा शब्द माहित नव्हता
दिनेशदा... आलाराम, डँबीस
दिनेशदा... आलाराम, डँबीस शब्दावरुन अजुन एक इंग्रजीमिश्रीत शब्द आठवला.
'कानबाई लागणे': मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सिमेवर 'बिजासन' घाट आहे. (तिथेच अनेकांची कुलदेवी असलेली 'बिजासनी' देवीचं स्थान आहे म्हणुन त्याला बिजासन घाट नाव पडले). घाटाच्या पलिकडे म्.प्र्.मधील 'सेंधवा' हे कापसाचं मार्केट असलेलं गाव. अर्थात दोन्ही राज्यांच्या सिमेवर असल्याने या घाटातुन सतत ट्रक्सची/बसेसची वाहतुक सुरु असते. पुर्वी बैलगाड्या,घोड्यावरुन वाहतुक व्हायची. त्यावेळेस घाटात खुप लुटमार व्हायची. म्हणुन ब्रिटीश काळापासुन घाटाच्या एका बाजुला वाहतुक थांबुन ठेवत. वाहनांचा ग्रुप जमला की पोलीस वाहने सोडत..त्याला 'कॅन्व्हॉय' (कॅन्व्हॉय= कारवाँ) म्हणतात.
त्यावेळी अशा गाड्या थांबवुन ठेवल्या की बसमधले, किंवा इतर ड्रायव्हर लोक म्हणत,"कानबाई लागली वाटतं".
आमच्या काकांचा गाड्यांचा व्यवसाय होता...तेव्हा कधी तिकडुन यायला उशीर झाला.. तर आजी विचारायची,"काय रे, कानबाई लागली होती का?"
(टीपः 'कानबाई' ही खान्देशातील एक प्रथा आहे- गौरी बसवतात तशी. अर्थात त्याचा इथे संबंध नसला तरी उच्चारसाधर्म्याने म्हणत असावेत)
आर्या, काय मस्त संदर्भ आहे हा
आर्या, काय मस्त संदर्भ आहे हा ?
वाईवरुन सातारा हा शब्दप्रयोग पण पश्चिम महाराष्ट्रात फार केला जात असे. आता मला वाटते चांगल्या रस्त्यामूळे असा काही प्रॉब्लेम नाही.
मी एकदा पूण्यावरुन गोव्यासाठी बस पकडली होती. साधारणपणे या बसेस सातारा-कोल्हापूर्-गगनबावडा-तळेरे मार्गे जातात, पण ही (राज ट्रॅव्हल्स) पूणे-पाचगणी-महाबळेश्वर-- अशी गेली.
---
पुर्वी गुन्हेगारांच्या संदर्भात
भामटा, सोद्या, मवाली, गुंड असे काही शब्द वापरात होते, त्यापैकी गुंड च अजून थोडाफार वापरात आहे.
पुर्वी अतिरेक हा शब्द वापरात होता, तरी अतिरेकी हा शब्द नव्हता !!
दिनेश ~~ "सोद्या"हे विशेषनाम
दिनेश ~~
"सोद्या"हे विशेषनाम गुन्हेगारी संदर्भातील [च] असेल असे वाटत नाही. कोल्हापूर-बेळगांव भागात वेश्या वा नायकिणीच्या मिळकतीवर मोफत चरणार्या हरकाम्याला 'सोद्या' म्हटले जाते. आजही यांची अशा वस्तीतून लक्षणीय अशी संख्या आहे. दिवसभर 'मालकिणी' ची पडेल ती कामे करणे आणि रात्रीच्यावेळी 'गिर्हाईक' शोधणे ही यांची प्रमुख कामे. पण तसे हे पापभिरू (आणि यल्लमादेवीला मानणारे असल्याने) गुन्हेगारीच्या व्याख्येत आपण येऊ शकू असे कार्य करीत नाहीत.
Pages