हरवलेले शब्द

Submitted by दिनेश. on 26 August, 2011 - 06:18

खुप वर्षांपुर्वी भारताबाहेर स्थायिक झालेल्या माझ्या एका बालमैत्रिणीचा गेल्या आठवड्यात फ़ोन
आला होता, आम्ही प्राथमिक शाळेत एकत्र जात होतो.
तिच्या बोलण्यात असे काहिसे शब्द आले, कि मला एकदम तिच्या आणि माझ्या आईचे बोलणे
आठवले. त्या दोघी बोलताना हे शब्द सर्रास वापरत असत. तिला मी हे सांगितल्यावर म्हणाली,
कि माझ्याशी बोलताना तिला पण तेच दिवस आठवले होते. आणि माझ्याशी मराठीत बोलताना
असे शब्द अगदी अजाणता तिच्या बोलण्यात आले.
आता माझ्या आईच्या बोलण्यातही हे शब्द येत नाहीत. पण ते शब्द, आणि त्यांचे खास उच्चार
माझ्या लख्ख लक्षात आहेत.
सहज आठवले म्हणून नोंदवतोय.

१) अय्या आणि इश्श्य.

हे शब्द इतके प्रचलित होते कि त्या काळी मुलींना या दोन शब्दांशिवाय आश्चर्य आणि लज्जा
व्यक्तच करता येत नसे. माझ्या शाळेतल्या मुलीदेखील हे शब्द खुपच वापरायच्या. अय्या म्हणतांना
किंवा तो म्हणून झाल्यावर तोंडावर रुमाल (तोही लेडीज हातरुमाल) ठेवल्याशिवाय तो उद्गार पूर्ण
होत नसे. इथे मी लज्जा हा शब्द वापरलाय, त्याला पण त्याकाळी खुपच मर्यादित अर्थ होता.
अय्या या शब्दाचा एक मस्त उच्चार लताने, शागिर्द मधल्या, दिलवील प्यारव्यार मै क्या जानू
रे, या गाण्यात केलाय.

२) बावळट्ट

मुलांना उद्देशून किंवा कुणाही मूर्ख व्यक्तीला (पण खास करुन पुरुषांनाच) उद्देशून हा शब्द वापरला
जात असे. बरं हा शब्द नुसताच नव्हे तर त्याचा उच्चार साधारण बावळट्ट्चै असा असायचा.
या शब्दाला मुर्ख एवढाच अर्थ होता असे नाही, पण मुलांनी काहिही केलं, तरी हा शब्द वापरला
जायचा. आणि काय असेल ते असो, मुलींनी बावळट म्हंटलेलं मुलांना पण आवडत नसे.

३) गडे

हा शब्द मैत्रिण किंवा मित्र (त्या काळात मित्राशी बोलायची फ़ारशी प्रथा नव्हती म्हणा) दोघांनाही
उद्देशून असे. हा शब्द उच्चारायचे प्रसंगही खास असत. म्हणजे एखादी उसनी घेतलेली, वस्तू किंवा
सुटे पैसे परत करायला गेल्यावर हा शब्द हमखास उच्चारला जात असे. असं नाही गडे, त्याचं
काय एवढं.. वगैरे. यायचं ना गडे असे जे त्याचे आताचे चावट रुपांतर आहे, तसे ते बोलण्यात नसायचे.
नका गडे माझ्याकडे पुन्हा पुन्हा पाहु, डोळे हे जुल्मी गडे.. हि गाणी त्याच काळातली.

४) किनै

कि नाही, या शब्दांचा हा गोड उच्चार त्याकाळी खुपच वापरात असे. लहान मुली मोठ्यांकडे काही
मागायचं असेल (मागून मागून काय ते, भातुकलीसाठी गूळ, शेंगदाणे वगैरे) तर सुरवात अशी
व्हायची, किनै आई आम्ही दुपारी भातुकली करणार आहोत..
किंवा मला किनै हे नै आवडत.

५) नै

मराठीत मधे ह असणारे शब्द फ़ारच कमी आहेत (नेहमी, साहजिकच ..) ह हा वर्ण कुठल्याच गटात
(ओष्ठ्य, दंत्य, तालव्य ) न येता स्वतंत्र येतो त्यामूळे त्याचा इतर अनेक अक्षरांशी संयोग होऊ
शकतो (क-ख, ग-घ, त-थ..) म्हणून बहुदा ह मधे असलेले शब्द उच्चारताना आपली किंचीत धांदल उडते.
नाही या शब्दाचा उच्चार, इतका स्पष्ट लहान मूलेच करतात. आपण सहसा नाय असाच उच्चार करतो.

६) बै

आता मायबोलीवर हा शब्द परत दिसायला लागला आहे. त्या काळात आम्ही आमच्या शिक्षिकेंना
बाई असेच म्हणत असू. त्या काळातल्या गाण्यातही ( बाई बाई मनमोराचा कसा पिसारा, काय बाई
सांगू ) हा शब्द असे. एकंदरीत या शब्दाला आदराचे वलय होते (जिजाबाई, लक्ष्मीबाई)
मग का कुणास ठाऊक, बहुतेक हिंदीच्या (आठवा तिसरी कसम मधली हिराबाई) प्रभावाने असेल,
या शब्दाचा स्तर खुपच खाली गेला. हिंदी चॅनेल्सवर या शब्दाचा अर्थ कामवाली बाई असाच धरला
जाऊ लागला.
सरकारी कार्यालयात तर मॅडम बाई, असा एक विचित्र शब्दप्रयोग कानावर पडतो. हा शब्दप्रयोग आशा
खाडिलकरने गायलेल्या एका धमाल गाण्यात आलाय.
नोकरी कसली ही, हि तर डोक्यावर टांगती तलवार
आता तूम्हीच सांगा, आहेत कि नाही, इथली कार्टी
एकापेक्षा एक तालेवार.... असा मुखडा होता.
या बाई शब्दाबाबत माझी एक मजेदार आठवण आहे. माझा पुतण्या लहान असताना छायागीत बघून,
हि माधुरी का ? हि ममता का ? असे विचारायचा. वहिनीला ते आवडायचे नाही, ती म्हणायची, त्या
काय तूझ्याएवढ्या आहेत का, नावाने हाका मारायला. मग त्याने त्यांना दिक्षितबाई, कुलकर्णीबाई असे
म्हणायला सुरवात केली.
वरचे दोन्ही शब्द मिळून नैबै असा शब्द पण कॉमन होता. पण त्या मानाने तै (ताई) असा उच्चार तितका
प्रचलित नव्हता. वार्‍यावरची वरात मधल्या कडवेकर मामी पण, मालुताई अशीच हाक मारायच्या.

७) वन्सं

मोठ्या नणंदेला उद्देशून हा शब्द वापरला जाई. मला वाटतं लहान नणंदेला पण वन्संच म्हणत असत.
सासू खालोखाल छळणारी म्हणून हि ख्यातनाम होती. शास्त्रीय चीजांमधे पण बहुदा हि जानी दुष्मनच असे.

( अब मै तो ईख खाये मरुंगी, ननदीया मारे बोल...पारंपारिक ठुमरी - श्रुती साडोलीकर
किंवा
बैरन ननदीया, लागे डराने - छोटा खयाल - राग बिभास. पंडीता मालिनी राजूरकर)

मला वाटतं कोल्हापूर किंवा बडोद्याला मराठ्यांच्या मधे मोठ्या नणंदेला दिवानसाब असा पण शब्द वापरात
होता. सौभद्र नाटकातही, रुक्मिणी, सुभद्रेला उद्देशून वन्स हाच शब्द वापरते.
आता बहुदा हे नाते मित्रत्वाचे झाल्याने, हा शब्द मागे पडला.

८) मामंजी

सासरेबुवांना उद्देशून हा शब्द वापरला जात असे. याचा मामा या शब्दाशी संबंध नसावा. कारण मामेभावाशी
लग्न करण्याची प्रथा कधीच नव्हती. आत्येबहीणीशी करत असत म्हणून, जावई सासूला, आत्याबाई असे
पण म्हणत असे.
आता सासुला आई (किंवा मम्मी) आणि सासरेबुवांना बाबा, पप्पा असेच काहीतरी म्हणतात. मामंजी हा
शब्द ताईबाई आता होणार लगीन तूमचं या गाण्यात पण आलाय. (मामंजीना जमाखर्च द्या ..) त्यामानाने
भावोजी हा शब्द अजून वापरात आहे.

९) पाटपाणी

संध्याकाळचे जेवण तयार झाले कि मुलांनी पाटपाणी घ्यायची प्रथा होती. अगदी ताटाखाली आणि टेकायला पाट नसला तरी बसण्यासाठी एक पाट असायचाच. आता जमिनीवर बसण्यासाठी आपण सतरंजी वगैरे अंथरतो, पण त्या काळात अगदी आमच्याकडेही पाटावर बसायची प्रथा होती.
पाणी घ्यायचे म्हणजे माठातील गार पाणी तांब्यात काढून घ्यायचे. पेल्याला फुलपात्र किंवा भांडे असा शब्द
खास करुन, ब्राम्हणांच्या घरी वापरात होता.

१०) झाकपाक

रात्रीचे जेवण झाले कि झाकपाक करणे हे बायकांचे अत्यावश्यक काम असायचे. फ़्रिज नसल्याने उरलेली
भाजी आमटी, दुसर्‍या भांड्यात काढून ती व्यवस्थित झाकून ठेवावी लागे. तापवलेले दूध थंड करुन त्यावर
जाळीचे झाकण ठेवणे, विरजण लावणे हे पण करावे लागे. दूधदुभत्यासाठी जाळीचे कपाट असे.
रात्री कुठे बाहेर जायचे असेल, किंवा अगदी अंगणात गप्पा मारत बसायचे असेल. (बरोबर बिनाका गीतमाला
किंवा पुन्हा प्रपंच ऐकायचे असेल) तर आईला हे सगळे आटपूनच यावे लागे.

११) दिवेलागण

वीजेचे दिवे नव्हते त्यावेळी नगरपालिकेतर्फ़े लांब बांबूच्या सहाय्याने रस्त्यावरचे दिवे लावणारा एक माणुस
सायकलवरुन यायचा. वीजेचे दिवे आले तरी, त्याचे बटण त्या खांबावरच असायचे आणि ते लावायला
माणूस येतच असे.
हा काळ मी मुंबईत बघितला नाही, पण गावाला कंदिलाच्या काचा साफ़ करणे, बाकिच्या दिव्यातील वाती
साफ़ करणे हा रोजचा उद्योग असायचा.
या दिवेलागणीला अनेक संदर्भ होते. या वेळेच्या आत मुलांनी खेळ आटपून घरात यावे, हातपाय धुवून
शुभंकरोति म्हणावे आणि अभ्यासाला लागावे, अशी शिस्त होती.
सांजवात करणे, तुळशीसमोर दिवा लावणे हेही होतेच. दिवेलागण हा स्बद मागे पडला तरी तिन्हीसांजा
मात्र अजून वापरात आहे.

१२) केरवारा

केराचा आणि वार्‍याचा काय संबंध होता ते माहित नाही. पण केर कधी काढायचा याचे मात्र आडाखे
होते. केर शक्यतो सकाळी किंवा दुपारी काढला जायचा. पण तो संध्याकाळचा कधीच काढला जात नसे.
संध्याकाळची वेळ, हि लक्ष्मीची वेळ मानली जात असे.

तसेच एखादा माणूस घराबाहेर पडल्यावर लगेचच केर काढणे अशुभ मानले जात असे. कारण घरातील
व्यक्ती मृत झाली तरच असे करत असत. सखाराम बाइंडर या नाटकात पण लक्ष्मी घराबाहेर पडायच्या
आधी केर काढूनच जाते. आता या शब्दा ऐवजी झाडू मारा, किंवा झाडूपोछा हाच शब्द रुढ झालाय.
त्या मानाने धुणंभांडी हा शब्द अजून वापरात आहे.

१३ ) मोलकरीण

मोलकरीण हा शब्द सर्रास वापरात होता. सुलोचना, रमेश देव, सीमा देव यांच्या या नावाचा चित्रपट
पण होता. बायका नोकरी करायचे प्रमाण कमी असल्याने, मोलकरीण आणि घरतील बाई यांचा संवाद असायचा.
आता का कुणास ठाऊक पण या शब्दाला थोडी गौण छटा आलीय. त्याजागी कामवाली बाई किंवा
(नुसतीच) बाई असा शब्द जास्त प्रचलित आहे.

१४ ) शेकशेगडी

लहान बाळाला अंघोळ वगैरे घालून झाली, कि शेक दिला जात असे. त्यासाठी पाळण्याखाली किंवा
बाजेखाली शेगडीत निखारे ठेवून त्यावर धूप टाकला जात असे. कधी कधी बाळाच्या जावळाला पण
याचा शेक देत असत.
त्या काळी बाळंतीणीची खोली म्हणून एक अंधारी खोली राखीव असे आणि त्या खोलीत शिरल्याबरोबर
असा वास येत असे. हा प्रकार अगदी शहरातही केला जात असे.

१५ ) बिर्‍हाड बाजलं

बिर्‍हाड या शब्दाचा नेमका अर्थ सांगणे कठीण आहे. पण साधारण मुक्कामाचे ठिकाण असे म्हणता येईल.
नाटक कंपनीचा मुक्काम जिथे असे त्या जागेला बिर्‍हाड म्हणत असत. पुर्वी कोकणातून एकटाच माणूस
आधी नोकरीला येत असे. (चाकरमानी) त्याचा जम बसला, एखादी जागा भाड्याने घेतली कि तो गावाहून
बायकामूलांना बोलावून घेत असे. त्यालाही बिर्‍हाड केले वा बिर्‍हाड आणले, असा शब्द वापरात होता.
बाजलं म्हणजे अर्थातच लाकडाची सुतळीने विणलेली खाट.
या नावाचे एक नाटकही होते, त्या नाटकातले माझ्याच पावलांची असे एक सुंदर नाट्यगीत, आरती नायकच्या आवाजात यू ट्यूबवर उपलब्ध आहे.

१६ ) पागडी

घर भाड्याने घेताना किंवा विकत घेताना पागडी म्हणून काही रक्कम द्यायची प्रथा होती. साधारण डीपॉझिट
असा याचा अर्थ होता.

१७ ) नहाण

त्याकाळात शॉवर्स नव्हते आणि मुलींचे केसही लांब असायचे. त्यामूळे केसांवरुन अंघोळ हा एक सोहळा
असायचा. शिकेकाई, रिठा असा सगळा सरंजाम करावा लागायचा. आई किंवा मोठी बहीण अंधोळ घालायची
आणि मग केस खसाखसा पुसून बारीक दाताच्या फ़णीने विंचरणे हा पण एक उद्योग असायचा.

मुलगी वयात येणे यासाठी पण नहाण येणे (किंवा पदर येणे) असा शब्द होता. २२ जून १८९७ या चित्रपटात सीताबाईला चाफेकळीला नहाण आलं, असे एक गाणे होते.

१८) चूल

शहरात साधारण ५० वर्षांपूर्वीच शिजवण्यासाठी गॅसचा वापर सुरु झाला. पाईपनेदेखील गॅस पुरवला जात असे.
बॉम्बे गॅस असे त्या कंपनीचे नाव होते. त्यांचा एक लोखंडी स्तंभ किंग्ज सर्कलच्या ऑपेरा हाऊसजवळ,
आताआतापर्यंत होता. अगदी गॅस नसला तरी स्टोव्ह वापरात होते. पण बायकांच्या बोलण्यात चूल हाच शब्द होता. अगदी रुचिरातही अनेकवेळा हा शब्द आलाय. घरोघरी मातीच्या चुली, चूल आणि मूल, चूलीपुढचे शहाणपण असे शब्दप्रयोग अनुषंगाने येतच.

१९) नांदणे

आपण नांदा सौख्यभरे असा आशिर्वाद जरी अजून देत असलो तरी, नांदणे हे क्रियापद मात्र फारसे वापरत
नाही. एखादी बाई सारखी माहेरी जात असली, तर ती नीट नांदत नाही असे म्हंटले जात असे. आणि
बर्‍याच नवरेमंडळींची बायको नीट नांदत नाही, हि समस्या असे.
त्याकालच्या लावण्यांमधे पण हा शब्द असे. नांदायला मला बाई जायाचं नांदायला अशी रोशन सातारकरची
लावणी होती, येऊ कशी तशी मी नांदायला पण तिचीच होती. कशी नांदायला येऊ मी बाई, अशी पुष्पा
पागधरेची लावणी होती.

२०) बोडकं / डोंबलं

हि अगदी अभिमानाची गोष्ट आहे, कि केशवपनाची दूष्ट रुढी आपण त्यागलीय. अर्थात त्यामागे आपल्या
समाजसुधारकांचे प्रयत्न होतेच. पण पुर्वी अगदी शहरातही लाल आलवण नेसलेल्या विधवा दिसत.
त्यांचा बोडक्या बाया, असा अत्यंत अपमानास्पद उल्लेख केला जात असे. त्यांचे केस नसलेले डोके
हा पण चेष्टेचाच विषय असे. त्यापैकी अनेक जणी असे उल्लेख हसण्यावारी नेत. (दुसरा उपायच नसे.)
घाल माझ्या बोडक्यावर, डोंबलं माझं, कुणाला कश्याच तर बोडकीला केसाचं असे शब्दप्रयोग सर्रास होत
असत.

२१ ) बोळकं

या शब्दाला दोन अर्थ होते. दात नसलेले तोंड, मग ते तान्ह्या बाळाचे असो कि वृद्ध माणसाचे, त्याचा
उल्लेख बोळकं म्हणूनच करत असत. हसण्याला, पसरलं बोळकं असा शब्द प्रयोग करत.
एका प्रकारच्या भांड्याला पण बोळकं असा शब्द होता. (मला खात्री नाही) पण शालू हिरवा या
गाण्यात
चूल बोळकी इवली इवली, भातुकलीचा खेळ गं, अशी ओळ आहे.

२२) संसार

मराठीत आणि हिंदीत काही शब्दांचे (चेष्टा, यातायात ) अगदी वेगवेगळे अर्थ आहेत त्यपैकी हा
एक. संसार म्हणजे नेमके काय हेही सांगणे कठीण आहे. कारण घरातील नीट लावलेल्या वस्तू,
भांडीकुंडी यांना पण हा शब्द वापरत आणि नवर्‍याबरोबरच्या सहजीवनालाही. संसार नीट कर
असा सल्ला पोक्त बायका नववधूला देत असत. माझा घर माझा संसार असे एक नाटक होते.
(म्हणजे घर आणि संसार वेगळे होते ना.)

मज काय ऊणे या संसारी वगैरे गाणी आहेतच पण एका पटक्यात पण असाच सल्ला दिलाय

बिकट वाट वहीवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको
संसारी तू ऐस आपुल्या, उगाच भटकत फिरु नको.

२३) पदर

पदर हा शब्द साडीसाठी वापरला जात असेच. पण आणखी एका संदर्भात हा शब्द वापरात होता.
सोयरीक जमवताना, नातेवाईकांची चौकशी करताना, तूमचा पदर कुठे कुठे लागतो, असे विचारले
जात असे.
पदर येणे, पदर घेणे, पदर संभाळणे याला साडीच्या संदर्भात असले तरी वेगवेगळे अर्थ होते.
डोईचा पदर आला खांद्यावरी, जनी म्हणे मी वेसवा झाले.. असा संत जनाबाईचा अभंग आहे.
मराठ्यांमधे डोक्यावर पदर घेणे आवश्यक होते तर ब्राम्हणात दोन्ही खांद्यावर. याला अनेक
संदर्भ आहेत. मराठा स्त्रिया उन्हातान्हात राबणा-या त्यामूळे डोक्यावर पदर घेणे आवश्यक होते.
राजस्थानचा संदर्भ असल्याने थोडाफ़ार घुंघटाशी सबंध होता तर ब्राम्हण स्त्रियांच्या केसांचा खोपा
आणि त्यावरचे दागिने दिसण्यासाठी पदर अनावश्यक होता. तसेच त्या समाजात विकेशा स्त्रिया
डोक्यावरुन पदर घेत असत. (यासंदर्भात जास्त माहिती प्रतिक्रियांमधून मिळेलच.)

२४) झक

झक मारली आणि तूझ्याशी लग्न केले, असा शब्द्प्रयोग त्या काळातल्या संसारीक भांडणात येत असे. झक या शब्दाचा नेमका अर्थ मला कळला नाही कधी.
आता आपण त्यासाठी पागल कुत्तेने काटा है, असे शब्द वापरतो नाही का ?

२५ ) रंजीस

हा शब्दही कमी ऐकायला येतो हल्ली. चेहरा उतरलेला असणे अशा अर्थी हा शब्द वापरात
होता. रुणा लैलाच्या, रंजीशही सही या गझलेशी त्याचा सबंध नव्हता.

भाषा प्रवाही असते. जूने शब्द विस्मरणात जाणार आणि नवे प्रचारात येणार, हा नियमच आहे.

झणिं, झडकरी, एकसमयावच्छेदेकरुन, सत्वर, वृथा, मूढ असे शब्द तर त्याआधीच वापरातून
मागे पडले होते.

मला आठवले तसे अनेक शब्द तूम्हालाही आठवतील आणि ते प्रतिसादातही येतीलच.
पण हे शब्द म्हणजे तरुणाईची भाषा नव्हती आणि यापैकी बहुतेक एखाद्या वस्तूशी संबंधित नव्हते, पण या शब्दांशी माझ्या शाळकरी वयातल्या आठवणी निगडीत आहेत हे नक्की.

गुलमोहर: 

इब्लिस, भाषेची प्रगति होती ती अशी.
त्याचा अर्थ विवाहबाह्य संबंध.
सध्या गावोगावी एकाच माणसाचे होताहेत ते. वाचताय ना ?

अजून काही शब्द, एवढ्यातच आजेसासुबाईंच्या तोंडून ऐकले....

"उन-उन" भात/पोळी,
कढत कढत आमटी,
जरा निजले आहे,
मुगाचे सालासुद्धा बिरडे (म्ह़णजे नेहमी साले काढूनच बिरडे करावे पण कधीतरी साले ठेवून केले म्हणजे सालासुद्धा)
कुटाणा

मस्त लेख दिनेशदा, बर्‍याच शब्दांची उत्पत्ती आज कळली. बाकी झक, बोडकं / डोंबलं हे शब्द आजही वापरात आहेत हे मी छातीठोकपणे सांगू शकते Proud

>> सध्या गावोगावी एकाच माणसाचे होताहेत ते. वाचताय ना ?
नाही समजले.

विनोदाचा भाग म्हणजे, एका समारंभातील सुंसंवादिकेने, प्रमुख पाहुण्यांचा श्रीफळ व अंगवस्त्र (शाल म्हणायचे होते. पण आम्ही सुसंवादक नेहेमीच भारदस्त शब्द वापरतो बुवा) देऊन सत्कार केल्याचे आठवते Rofl

भरतजी, मलासुद्धा ते "जरी मी कोठे बसशी, तरी तव मुर्ती दिसती " असंच काहीसं ऐकायला येत.
पण , परत नव्याने शब्द वाचायला मजा वाटते.

दिनेशदा मस्त
वळण - पु. ल. - मुलगा किन्वा मुलगी सरळ वळणाचा/वळणाची कशी असू शकते ही भुमितीला कोड्यात टाकणारी व्याख्या
हादगा - भोन्डला - हे शब्द कुणाला माहीतच नसतात. माझ्या लहानपणी आम्ही नवरात्रीत ९ दिवस खेळायचो, आता फक्त गरबा/दान्डिया माहीत असतो. मी गेली ६ वर्षे भोन्डला करते. लेकीच्या, माझ्या आणि साबान्च्या मैत्रिणीन्ना आवर्जून बोलावते

तेलाची घाणी हा शब्द पण मुंबईत वापरात होता, ब्रॅंडेड तेले उपलब्ध व्हायच्या आधी अशा
घाणी होत्या. तिथे मोठ्या पिंपात तेल असायचे आणि ते हातपंपाने काढून देत असत.
आणि तेल आणायचे तर घरुन बरणी घेऊन जावे लागे. पोस्ट्मन हे पहिले नावाने मिळणारे
तेल.

दीपा, हादगा तर माझ्या लहानपणीच मागे पडला होता.(मुंबईत)
मग आईच्या एका मैत्रिणीने चालू केला होता.
अक्कण माती, चिक्कण माती, खळगा तो खणावा..हे गाणं मला
अजून पाठ आहे. आम्ही मूले फक्त खिरापत ओळखण्यासाठी आणि
खाण्यासाठी जायचो.

आणखी एक शब्द.. वारभर कापड. घरी आलेल्या सवाष्ण बाईची ओटी भरायची आणि
मूलांना वारभर कापड द्यायचे. तसे नाही दिले तर माघारी उद्धार व्हायचा. (वारभर कापड
पण नाही दिले..)

मामाच्या गावाला जाऊया, गाण्यात या ओळी येतातच..

मामा मोठा तालेवार, रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊ या...

  • खानदेशाकडे भोंडल्या ला 'भुलाबाई' किंवा 'गुलाबाई' म्हणतात.
  • ते वारभर कापड ब्लाऊजपीस चं equivalent होतं. सगळ्याच मुलांना वारभर पुरत नाही.
  • मामा च्या गावात, आम्ही कोट विजारी पेक्षा परकर पोलकी लेवू या म्हणत असू.

शिटा, प्यॅशिंजरं, स्टापचा माणूस, रातराणी, वस्तीची गाडी, मेधा हायवे, मोड (सुटे पैसे)
दिनेशदा,
यात मी ऐकलेले काही शब्द ऐड करतो ....मास्तर, पाव्हणं

दिनेशदा ~

तीनचार दिवस बाहेरगावी असल्याने मायबोलीवर आलो नाही आणि आज आल्याआल्या 'हरवलेले शब्द' सापडले. फार हावरटासारखे सर्व शब्द आणि त्यामागील तुमच्या भावना वाचून काढल्या. सुंदरच.

१. कोल्हापूर ग्रामीण भागात 'दिवाणसाब' अजून अस्तित्वात आहे तसेच धाकट्या दिराला 'बाळासाब' (बाळासाहेब नव्हे) असे म्हणणार्‍याही नांदत्या मुली सापडतील.

२. "मोलकरीण' चित्रपटाची आठवण काढल्यामुळे अगदी गलबलून गेलो. तुम्ही सुलोचना, रमेश देव आणि सीमा यांचा उल्लेख केला आहे, पण त्याचबरोबर 'परशुराम सामंत' यांचेही नाव येणे फार गरजेचे आहे, इतका जातिवंत अभिनय त्यानी केला आहे त्या चित्रपटात. विशेषतः आता कलेक्टर झालेला मुलगा अन्य ऑफिसर्ससमवेत बोलत असतो. त्यावेळी खेड्यातून फाटक्या कपड्यात आलेल्या बापाला पाहून मुलगा [रमेश देव] 'बाप' म्हणून ओळखत नाही आणि त्या बंगल्यात आता हा आपल्याला 'बाबा' म्हणून हाक मारेल अशी अपेक्षा धरून त्याच्या चेहर्‍याकडे पाहणारा केविलवाणा बाप, सामंतानी जबरदस्त सादर केला होता.

३. झाकपाक ~ यासारखेच 'शिळंपाकं काढून ठेव गं बाजूला' असा आदेश सासूकडून सुनबाईला जात असे. आजही असेल.

४. आमच्याकडे "झक मारून झुणका खाल्ला" असा एक फटका वादात नेहमीच सापडतो. याचा ढोबळ अर्थ असा की फार मोठे कामे करूनही क्षुल्लक लाभ झाला. 'झक मारणे" म्हणजे मासेमारी. दिवसभर नदीवर तंगून मिळाले ते ८-१० मासे. पण घरी सावकार आल्यामुळे व्याजापोटी ते सारे मासे त्यालाच द्यावे लागल्याने शेवटी बायकोने भाकरीबरोबर झुणका दिला [झुणका हे स्वयपाकातील स्वस्तातील आणि झटपट होणारे व्यंजन समजले जाते, म्हणून त्याला जास्त महत्व नाही, या अर्थाने].

धन्यवाद

अशोक, ते झक आणि झुणका..आठवलंच नाही.
त्या सासरेबुवांच्या राजापुरी पंचाचा सुनबाई तिरस्कार करते असापण प्रसंग आहे नाव?

वर्षू, गंगावन आता क्वचितच वापरतात आणि शब्दही मागे पडला.
तसेही आता "डोक्यावर घरटे" क्वचितच दिसते.

१. "मोलकरीण" मध्ये सासरेबुवा [परशुराम सामंत] आणि सूनबाई [सीमा] एकमेकासमोर कधीच आल्याचे दर्शविलेले नाही. मुलाकडून झालेला तो अपमान आणि त्यामुळे त्यांच्या मानी स्वभावाला बसलेला धक्का इतका तीव्र असतो की ते गावी येताच देव्हार्‍यात बसून 'मुलाच्या नावाने आता आंघोळच करतो' असे म्हणत प्राणच सोडतात. फार हृदयद्रावक प्रसंग आहे तो.

२. आमच्याकडे दिवेलागणीची वेळ टळून गेल्यानंतरही मुलगी घरी आली नसली की आई/आजी तिच्या नावाने बोटे मोडत 'कुठे उलथली हाय ही टवळी ?' असा धोशा लावत असत. काहीवेळी 'टवळी' च्या जागी 'भवानी' ही असायचे, पण भाव तोच.

काळाच्या ओघात ही विशेषनामे आता दुर्मिळ झालेली दिसतात.

मला असं वाटतं की मामंजी हा शब्द मामाशी संबंधित आहे. कारण साटे-लोटे हा एक प्रकार असतो की ज्यात जर एखाद्या मुलीचे दुसर्या घरात लग्न झाले तर तिच्या भावाचे तिच्या नणंदेशी लग्न होणे ह्याला साटे-लोटे म्हणतात. त्या प्रकारात आत्येभावाशी लग्न झाले तर तिची सासू तिची आत्या असते आणि सासरे मामा. (माझ्या सासरी असा हा साटे-लोटे प्रकार आहे).
आणि माझ्या माहेरी (मराठवाड्यात) माझ्या चुलत बहिणी आमच्या आत्याच्या यजमानांना (हाही शब्द त्या यादीत टाकता येईल) 'मामा' असं संबोधतात.

"साटे-लोटे हा एक प्रकार"

~ हा प्रकार तर इकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या भागात आजही आहे. 'साटे-लोटे' ची व्युत्पत्ती आहे ती 'साटे' या शब्दात ज्याचा आजच्या व्यवहारात 'संचय' असा अर्थ होतो. एखादी गुंतवणूक अशाप्रकारे करायची की त्या बदल्यात घेणार्‍यानेही काहीतरी द्यावे लागायचे. त्यातूनच 'साटेखत' हा कायद्याशी निगडीत उतारा येतो.

अशा 'बार्टरिंग मेथड' मधूनच साटे-लोटे ही दोन घराण्यातील वैवाहिक संबंधातील टर्म अस्तित्वात आली. म्हणजे वर मनस्विता यानी खुलासा केल्याप्रमाणे वधुपिता वरपित्याशी पहिल्या लग्नाची बोलणी करतेवेळीच अपेक्षा करतो की वराची धाकटी बहिण पुढे या घरात 'सून' म्हणून यावी. या प्रस्तावाला वरपित्याची अनुमती मिळाली की झाला मग तो 'साटे-लोटे' चा संबंध.

अशोक, माझे आजोळ मलकापूरचे.
बहीणीने नवरदेवाचे दार अडवले, कि अशी मागणी व्हायची नाही का?
साटंलोटं सारखाच एक प्रकार, सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा !
पण त्याला काही खास शब्द नाही ना ?
गडनी, तायनी, तायडे, तिठा...

मलकापूर ? आंब्याच्या अलिकडचे ना ? अहो, मग मी पंधरवड्यापूर्वी मार्लेश्वर आणि गणपतीपुळ्याला जाताना मलकापूर इथूनच गेलो होतो, इतकेच काय त्या रात्रीचे जेवणही मलकापूरच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या 'बालाजी' हॉटेलमध्येच घेतले होते.

सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा ! ~ हा प्रकार तर आमच्याच नात्यात घडला आहे. दोन वर्षापूर्वी माझ्या चुलत बहिणीच्या दोन्ही मुलांना एकाच घरातील दोन मुली सांगून आल्या होत्या रितसर. आणि तो संबंध आमच्या सर्व नातेवाईकांना पसंत पडल्याने ती दोन्ही लग्ने एकाच मांडवात एकाच मुहूर्तावर झालीदेखील. [गंमत म्हणजे या दोन बहिणींना आणखीन एक धाकटी बहीण आहे, पण माझ्या बहिणीला तिसरा मुलगा नसल्याने तो होऊ शकत असलेला 'तिहेरी' योग हुकला....अन्यथा वर्तमानपत्रात बातमीच झळकली असती.]

अशा विवाहसंबंधाला इकडे तर तिठा असे संबोधिले जाते. तिठा ही एक + चिन्हाची खूण असते [कुंभारकामात], तिचा ढोबळ अर्थ असा की दोन घरातील दोन मापे इकडे आणि तिकडे आणली-दिली. [सरोजिनी बाबर यांच्या एका पुस्तकात या बाबतीत अधिकचा खुलासा वाचल्याचे स्मरते, पण नेमके ते पुस्तक आता हाताशी नाही.]

रामायणातही सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा झालेले उदाहरण आहेच. सीता आणि उर्मिला.

सरोजिनी बाबर यांच्या एका पुस्तकात >> एक होता राजा असं ते पुस्तक आहे.
सीता अन उर्मिला या बहिणी होत्या ही माझ्याकरता नवीन माहिती आहे.

@ इब्लिस
"एक होता राजा" नावाबद्दल धन्यवाद. नक्की नगर वाचन मंदिरात उपलब्ध असणार.

"सीता अन उर्मिला या बहिणी होत्या ही माझ्याकरता नवीन माहिती आहे."

~ होय. आणि इतकेच नव्हे तर भरतची पत्नी "मांडवी" आणि शत्रुघ्नची पत्नी "श्रुतकिर्ती" या देखील सख्ख्या बहिणीच. तसेच सीता आणि उर्मिला यांच्या या दोघी चुलतबहिणी होत्या. मांडवी आणि श्रुतकिर्ती या कुशध्वज राजाच्या कन्या, जो जनकचा धाकटा भाऊ होता.

म्हणजे त्या चार बहिणी एकाच घरात दिल्याने सख्ख्या-चुलत जावा झाल्या.

हो तेच ते.
तिठा म्हणजे टी जंक्शन पण ना ? मलकापूरला तसे म्हणतात, पण उच्चार तिट्टा.
आणि कोल्हापूरची पापाची तिकटी ?
सीता सख्खी नव्हती ना, म्हणून तर तिला तशी वागवली, सासरी.
ही माझी आवडती ओवी पण त्याच संकलनातली आहे बहुतेक.

राम म्हणू नये राम, नाही सीतेच्या तोलाचा
सीता माझी हिरकणी, राम हलक्या दिलाचा.

होय. तो मलकापुरी 'तिट्टा' उच्चार योग्यच आहे. आपल्या भागात [विशेषतः आडरस्त्याच्या गावाच्या वेशीवर एस.टी. थांबा असतो, ज्याला 'हात दाखवा बस थांबवा' अशीही कार्यालयीन व्याख्या दिली गेली आहे. अशा थांब्याला 'तिट्टा' म्हणतात.] मराठी मुलूख असलेल्या कर्नाटकाच्या भागात तर "मी शिप्पूर तिट्ट्याला थांबतो, तू तिथेच ये", "वाळकी तिट्ट्याला थांबू नकोस, तिथं हुबळी गाडी थांबत नाही..." अशा निरोपांची देवाणघेवाण सर्रास चालते.

कोल्हापुरची 'पापाची तिकटी' हा एक प्रसिद्ध चौकच आहे. 'पापा परदेशी' या नावाच्या व्यापार्‍याने चोख धंद्याने आणि एकूणच सामाजिक कार्यामुळे तिथे फार मोठे नाव कमाविले होते. त्यांचेच नाव त्या चौकाला पडले, जे पुढे नगरपालिकेच्या दप्तरातही नोंदविले गेले.

२. सीता 'टेक्निकली' सख्खी बहीण नव्हती हे खरे. पण तिचा विवाह झाला तो मात्र सर्वात ज्येष्ठ असलेल्या 'राजकुमारी' च्या तोर्‍यात. कदाचित थोरली तिथे दिली म्हणून जनकाने धाकटीही आता तिथेच देवू या असा विचार केला असणार. त्यामुळे बायॉलॉजिकल टर्मनुसार त्या दोघी जरी सख्ख्या मानल्या गेल्या नसल्या तरी त्यांचे नाते महाकाव्यात तसेच मानले गेले आहे.

पायरव तर आहेच. त्यामानाने चाहुल अजून वापरात आहे.

कोल्हापूरी चारणे (भरवणे) हे क्रियापद मुंबईत अजिबात चालत नाही. माझे मामा
मग हास्यास्पद ठरतात. खरे तर मुंबईत हे क्रियापद वापरतच नाहीत.
गायीला चारा देणे असाच शब्द आहे, वापरात.

आणिक एक हरवलेला शब्द.
चेंदणे :
१. कुटणे या अर्थी
२. हादडणे. भरपेट खाणे.

दिनेशदा, पैसे 'चारणे' म्हणजे खाऊ घालणे च होते ना.

दिनेश ~~

आपल्या कोल्हापुरातील 'चारणे' जसे मुंबईत चालत नाही, तद्वतच मला आलेला अगदी नूतन अनुभव म्हणजे पुण्यात 'मिळाले' चालत नाही. उदा. मुलाच्या मेव्हणीला मी कोल्हापुरातील एका घरगुती कार्यक्रमाचे फोटो कुरिअरने पाठविले. दोन दिवसानंतर तिला मोबाईलवरून सहज विचारले, "फोटो मिळाले का ?" तर तिचे उत्तर, "नाही ना मामा, फोटो अजून भेटलेच नाहीत". मला क्षणभर हे "भेटणे' प्रकरण लक्षात आलेच नाही. आपल्याकडे पीर एकमेकाच्या भेटीला जातात इतपतच त्याचे प्रयोजन माहीत. पण पत्र न येणे, फोटो न मिळणे याला सरसकट पुण्यात 'भेटणे' क्रियापद वापरले जाते, असे अनुभवास आले.

इब्लिस ~~

'चेंदणे' फार दिवसानी पाहण्यात आलेले क्रियापद. थॅन्क्स. अशाच पंगतीतील आणखीन् एक म्हणजे "झेंदरणे". म्हणजे चालता चालता मी कुठे तरी झाडाला वा भिंतीला धडकलो आणि डोक्याला टेंगूळ आले तर आम्ही "आयला डोकं झेंदरलं नुस्तं" असे म्हणतो. साधारणतः हकनाक कळ आली या अर्थाने वापरतात.

"चारणे" हे क्रियापद लाचेच्या संदर्भात उपयोगात आणले गेले आहे बर्‍याच गोष्टीतून. यावर शासनाचे अमुकतमुक खाते म्हणजे तिथल्या कर्मचार्‍यांसाठी 'राखीव चराऊ क्षेत्र" आहे, असेही म्हटले जाते.

@अशोक.
भेटणे म्हणजे मिळणे या अर्थी बर्‍याचदा वापरला जातो.
असाच एक गमतीदार प्रकार खानदेशी ऐकायला मिळतो. "आठवण पडली" म्हणजे विसरलो. याद पड गई चं भाषांतर असणारे ते.

असो. चेंदायची वेळ झाली. चला..

Pages