खुप वर्षांपुर्वी भारताबाहेर स्थायिक झालेल्या माझ्या एका बालमैत्रिणीचा गेल्या आठवड्यात फ़ोन
आला होता, आम्ही प्राथमिक शाळेत एकत्र जात होतो.
तिच्या बोलण्यात असे काहिसे शब्द आले, कि मला एकदम तिच्या आणि माझ्या आईचे बोलणे
आठवले. त्या दोघी बोलताना हे शब्द सर्रास वापरत असत. तिला मी हे सांगितल्यावर म्हणाली,
कि माझ्याशी बोलताना तिला पण तेच दिवस आठवले होते. आणि माझ्याशी मराठीत बोलताना
असे शब्द अगदी अजाणता तिच्या बोलण्यात आले.
आता माझ्या आईच्या बोलण्यातही हे शब्द येत नाहीत. पण ते शब्द, आणि त्यांचे खास उच्चार
माझ्या लख्ख लक्षात आहेत.
सहज आठवले म्हणून नोंदवतोय.
१) अय्या आणि इश्श्य.
हे शब्द इतके प्रचलित होते कि त्या काळी मुलींना या दोन शब्दांशिवाय आश्चर्य आणि लज्जा
व्यक्तच करता येत नसे. माझ्या शाळेतल्या मुलीदेखील हे शब्द खुपच वापरायच्या. अय्या म्हणतांना
किंवा तो म्हणून झाल्यावर तोंडावर रुमाल (तोही लेडीज हातरुमाल) ठेवल्याशिवाय तो उद्गार पूर्ण
होत नसे. इथे मी लज्जा हा शब्द वापरलाय, त्याला पण त्याकाळी खुपच मर्यादित अर्थ होता.
अय्या या शब्दाचा एक मस्त उच्चार लताने, शागिर्द मधल्या, दिलवील प्यारव्यार मै क्या जानू
रे, या गाण्यात केलाय.
२) बावळट्ट
मुलांना उद्देशून किंवा कुणाही मूर्ख व्यक्तीला (पण खास करुन पुरुषांनाच) उद्देशून हा शब्द वापरला
जात असे. बरं हा शब्द नुसताच नव्हे तर त्याचा उच्चार साधारण बावळट्ट्चै असा असायचा.
या शब्दाला मुर्ख एवढाच अर्थ होता असे नाही, पण मुलांनी काहिही केलं, तरी हा शब्द वापरला
जायचा. आणि काय असेल ते असो, मुलींनी बावळट म्हंटलेलं मुलांना पण आवडत नसे.
३) गडे
हा शब्द मैत्रिण किंवा मित्र (त्या काळात मित्राशी बोलायची फ़ारशी प्रथा नव्हती म्हणा) दोघांनाही
उद्देशून असे. हा शब्द उच्चारायचे प्रसंगही खास असत. म्हणजे एखादी उसनी घेतलेली, वस्तू किंवा
सुटे पैसे परत करायला गेल्यावर हा शब्द हमखास उच्चारला जात असे. असं नाही गडे, त्याचं
काय एवढं.. वगैरे. यायचं ना गडे असे जे त्याचे आताचे चावट रुपांतर आहे, तसे ते बोलण्यात नसायचे.
नका गडे माझ्याकडे पुन्हा पुन्हा पाहु, डोळे हे जुल्मी गडे.. हि गाणी त्याच काळातली.
४) किनै
कि नाही, या शब्दांचा हा गोड उच्चार त्याकाळी खुपच वापरात असे. लहान मुली मोठ्यांकडे काही
मागायचं असेल (मागून मागून काय ते, भातुकलीसाठी गूळ, शेंगदाणे वगैरे) तर सुरवात अशी
व्हायची, किनै आई आम्ही दुपारी भातुकली करणार आहोत..
किंवा मला किनै हे नै आवडत.
५) नै
मराठीत मधे ह असणारे शब्द फ़ारच कमी आहेत (नेहमी, साहजिकच ..) ह हा वर्ण कुठल्याच गटात
(ओष्ठ्य, दंत्य, तालव्य ) न येता स्वतंत्र येतो त्यामूळे त्याचा इतर अनेक अक्षरांशी संयोग होऊ
शकतो (क-ख, ग-घ, त-थ..) म्हणून बहुदा ह मधे असलेले शब्द उच्चारताना आपली किंचीत धांदल उडते.
नाही या शब्दाचा उच्चार, इतका स्पष्ट लहान मूलेच करतात. आपण सहसा नाय असाच उच्चार करतो.
६) बै
आता मायबोलीवर हा शब्द परत दिसायला लागला आहे. त्या काळात आम्ही आमच्या शिक्षिकेंना
बाई असेच म्हणत असू. त्या काळातल्या गाण्यातही ( बाई बाई मनमोराचा कसा पिसारा, काय बाई
सांगू ) हा शब्द असे. एकंदरीत या शब्दाला आदराचे वलय होते (जिजाबाई, लक्ष्मीबाई)
मग का कुणास ठाऊक, बहुतेक हिंदीच्या (आठवा तिसरी कसम मधली हिराबाई) प्रभावाने असेल,
या शब्दाचा स्तर खुपच खाली गेला. हिंदी चॅनेल्सवर या शब्दाचा अर्थ कामवाली बाई असाच धरला
जाऊ लागला.
सरकारी कार्यालयात तर मॅडम बाई, असा एक विचित्र शब्दप्रयोग कानावर पडतो. हा शब्दप्रयोग आशा
खाडिलकरने गायलेल्या एका धमाल गाण्यात आलाय.
नोकरी कसली ही, हि तर डोक्यावर टांगती तलवार
आता तूम्हीच सांगा, आहेत कि नाही, इथली कार्टी
एकापेक्षा एक तालेवार.... असा मुखडा होता.
या बाई शब्दाबाबत माझी एक मजेदार आठवण आहे. माझा पुतण्या लहान असताना छायागीत बघून,
हि माधुरी का ? हि ममता का ? असे विचारायचा. वहिनीला ते आवडायचे नाही, ती म्हणायची, त्या
काय तूझ्याएवढ्या आहेत का, नावाने हाका मारायला. मग त्याने त्यांना दिक्षितबाई, कुलकर्णीबाई असे
म्हणायला सुरवात केली.
वरचे दोन्ही शब्द मिळून नैबै असा शब्द पण कॉमन होता. पण त्या मानाने तै (ताई) असा उच्चार तितका
प्रचलित नव्हता. वार्यावरची वरात मधल्या कडवेकर मामी पण, मालुताई अशीच हाक मारायच्या.
७) वन्सं
मोठ्या नणंदेला उद्देशून हा शब्द वापरला जाई. मला वाटतं लहान नणंदेला पण वन्संच म्हणत असत.
सासू खालोखाल छळणारी म्हणून हि ख्यातनाम होती. शास्त्रीय चीजांमधे पण बहुदा हि जानी दुष्मनच असे.
( अब मै तो ईख खाये मरुंगी, ननदीया मारे बोल...पारंपारिक ठुमरी - श्रुती साडोलीकर
किंवा
बैरन ननदीया, लागे डराने - छोटा खयाल - राग बिभास. पंडीता मालिनी राजूरकर)
मला वाटतं कोल्हापूर किंवा बडोद्याला मराठ्यांच्या मधे मोठ्या नणंदेला दिवानसाब असा पण शब्द वापरात
होता. सौभद्र नाटकातही, रुक्मिणी, सुभद्रेला उद्देशून वन्स हाच शब्द वापरते.
आता बहुदा हे नाते मित्रत्वाचे झाल्याने, हा शब्द मागे पडला.
८) मामंजी
सासरेबुवांना उद्देशून हा शब्द वापरला जात असे. याचा मामा या शब्दाशी संबंध नसावा. कारण मामेभावाशी
लग्न करण्याची प्रथा कधीच नव्हती. आत्येबहीणीशी करत असत म्हणून, जावई सासूला, आत्याबाई असे
पण म्हणत असे.
आता सासुला आई (किंवा मम्मी) आणि सासरेबुवांना बाबा, पप्पा असेच काहीतरी म्हणतात. मामंजी हा
शब्द ताईबाई आता होणार लगीन तूमचं या गाण्यात पण आलाय. (मामंजीना जमाखर्च द्या ..) त्यामानाने
भावोजी हा शब्द अजून वापरात आहे.
९) पाटपाणी
संध्याकाळचे जेवण तयार झाले कि मुलांनी पाटपाणी घ्यायची प्रथा होती. अगदी ताटाखाली आणि टेकायला पाट नसला तरी बसण्यासाठी एक पाट असायचाच. आता जमिनीवर बसण्यासाठी आपण सतरंजी वगैरे अंथरतो, पण त्या काळात अगदी आमच्याकडेही पाटावर बसायची प्रथा होती.
पाणी घ्यायचे म्हणजे माठातील गार पाणी तांब्यात काढून घ्यायचे. पेल्याला फुलपात्र किंवा भांडे असा शब्द
खास करुन, ब्राम्हणांच्या घरी वापरात होता.
१०) झाकपाक
रात्रीचे जेवण झाले कि झाकपाक करणे हे बायकांचे अत्यावश्यक काम असायचे. फ़्रिज नसल्याने उरलेली
भाजी आमटी, दुसर्या भांड्यात काढून ती व्यवस्थित झाकून ठेवावी लागे. तापवलेले दूध थंड करुन त्यावर
जाळीचे झाकण ठेवणे, विरजण लावणे हे पण करावे लागे. दूधदुभत्यासाठी जाळीचे कपाट असे.
रात्री कुठे बाहेर जायचे असेल, किंवा अगदी अंगणात गप्पा मारत बसायचे असेल. (बरोबर बिनाका गीतमाला
किंवा पुन्हा प्रपंच ऐकायचे असेल) तर आईला हे सगळे आटपूनच यावे लागे.
११) दिवेलागण
वीजेचे दिवे नव्हते त्यावेळी नगरपालिकेतर्फ़े लांब बांबूच्या सहाय्याने रस्त्यावरचे दिवे लावणारा एक माणुस
सायकलवरुन यायचा. वीजेचे दिवे आले तरी, त्याचे बटण त्या खांबावरच असायचे आणि ते लावायला
माणूस येतच असे.
हा काळ मी मुंबईत बघितला नाही, पण गावाला कंदिलाच्या काचा साफ़ करणे, बाकिच्या दिव्यातील वाती
साफ़ करणे हा रोजचा उद्योग असायचा.
या दिवेलागणीला अनेक संदर्भ होते. या वेळेच्या आत मुलांनी खेळ आटपून घरात यावे, हातपाय धुवून
शुभंकरोति म्हणावे आणि अभ्यासाला लागावे, अशी शिस्त होती.
सांजवात करणे, तुळशीसमोर दिवा लावणे हेही होतेच. दिवेलागण हा स्बद मागे पडला तरी तिन्हीसांजा
मात्र अजून वापरात आहे.
१२) केरवारा
केराचा आणि वार्याचा काय संबंध होता ते माहित नाही. पण केर कधी काढायचा याचे मात्र आडाखे
होते. केर शक्यतो सकाळी किंवा दुपारी काढला जायचा. पण तो संध्याकाळचा कधीच काढला जात नसे.
संध्याकाळची वेळ, हि लक्ष्मीची वेळ मानली जात असे.
तसेच एखादा माणूस घराबाहेर पडल्यावर लगेचच केर काढणे अशुभ मानले जात असे. कारण घरातील
व्यक्ती मृत झाली तरच असे करत असत. सखाराम बाइंडर या नाटकात पण लक्ष्मी घराबाहेर पडायच्या
आधी केर काढूनच जाते. आता या शब्दा ऐवजी झाडू मारा, किंवा झाडूपोछा हाच शब्द रुढ झालाय.
त्या मानाने धुणंभांडी हा शब्द अजून वापरात आहे.
१३ ) मोलकरीण
मोलकरीण हा शब्द सर्रास वापरात होता. सुलोचना, रमेश देव, सीमा देव यांच्या या नावाचा चित्रपट
पण होता. बायका नोकरी करायचे प्रमाण कमी असल्याने, मोलकरीण आणि घरतील बाई यांचा संवाद असायचा.
आता का कुणास ठाऊक पण या शब्दाला थोडी गौण छटा आलीय. त्याजागी कामवाली बाई किंवा
(नुसतीच) बाई असा शब्द जास्त प्रचलित आहे.
१४ ) शेकशेगडी
लहान बाळाला अंघोळ वगैरे घालून झाली, कि शेक दिला जात असे. त्यासाठी पाळण्याखाली किंवा
बाजेखाली शेगडीत निखारे ठेवून त्यावर धूप टाकला जात असे. कधी कधी बाळाच्या जावळाला पण
याचा शेक देत असत.
त्या काळी बाळंतीणीची खोली म्हणून एक अंधारी खोली राखीव असे आणि त्या खोलीत शिरल्याबरोबर
असा वास येत असे. हा प्रकार अगदी शहरातही केला जात असे.
१५ ) बिर्हाड बाजलं
बिर्हाड या शब्दाचा नेमका अर्थ सांगणे कठीण आहे. पण साधारण मुक्कामाचे ठिकाण असे म्हणता येईल.
नाटक कंपनीचा मुक्काम जिथे असे त्या जागेला बिर्हाड म्हणत असत. पुर्वी कोकणातून एकटाच माणूस
आधी नोकरीला येत असे. (चाकरमानी) त्याचा जम बसला, एखादी जागा भाड्याने घेतली कि तो गावाहून
बायकामूलांना बोलावून घेत असे. त्यालाही बिर्हाड केले वा बिर्हाड आणले, असा शब्द वापरात होता.
बाजलं म्हणजे अर्थातच लाकडाची सुतळीने विणलेली खाट.
या नावाचे एक नाटकही होते, त्या नाटकातले माझ्याच पावलांची असे एक सुंदर नाट्यगीत, आरती नायकच्या आवाजात यू ट्यूबवर उपलब्ध आहे.
१६ ) पागडी
घर भाड्याने घेताना किंवा विकत घेताना पागडी म्हणून काही रक्कम द्यायची प्रथा होती. साधारण डीपॉझिट
असा याचा अर्थ होता.
१७ ) नहाण
त्याकाळात शॉवर्स नव्हते आणि मुलींचे केसही लांब असायचे. त्यामूळे केसांवरुन अंघोळ हा एक सोहळा
असायचा. शिकेकाई, रिठा असा सगळा सरंजाम करावा लागायचा. आई किंवा मोठी बहीण अंधोळ घालायची
आणि मग केस खसाखसा पुसून बारीक दाताच्या फ़णीने विंचरणे हा पण एक उद्योग असायचा.
मुलगी वयात येणे यासाठी पण नहाण येणे (किंवा पदर येणे) असा शब्द होता. २२ जून १८९७ या चित्रपटात सीताबाईला चाफेकळीला नहाण आलं, असे एक गाणे होते.
१८) चूल
शहरात साधारण ५० वर्षांपूर्वीच शिजवण्यासाठी गॅसचा वापर सुरु झाला. पाईपनेदेखील गॅस पुरवला जात असे.
बॉम्बे गॅस असे त्या कंपनीचे नाव होते. त्यांचा एक लोखंडी स्तंभ किंग्ज सर्कलच्या ऑपेरा हाऊसजवळ,
आताआतापर्यंत होता. अगदी गॅस नसला तरी स्टोव्ह वापरात होते. पण बायकांच्या बोलण्यात चूल हाच शब्द होता. अगदी रुचिरातही अनेकवेळा हा शब्द आलाय. घरोघरी मातीच्या चुली, चूल आणि मूल, चूलीपुढचे शहाणपण असे शब्दप्रयोग अनुषंगाने येतच.
१९) नांदणे
आपण नांदा सौख्यभरे असा आशिर्वाद जरी अजून देत असलो तरी, नांदणे हे क्रियापद मात्र फारसे वापरत
नाही. एखादी बाई सारखी माहेरी जात असली, तर ती नीट नांदत नाही असे म्हंटले जात असे. आणि
बर्याच नवरेमंडळींची बायको नीट नांदत नाही, हि समस्या असे.
त्याकालच्या लावण्यांमधे पण हा शब्द असे. नांदायला मला बाई जायाचं नांदायला अशी रोशन सातारकरची
लावणी होती, येऊ कशी तशी मी नांदायला पण तिचीच होती. कशी नांदायला येऊ मी बाई, अशी पुष्पा
पागधरेची लावणी होती.
२०) बोडकं / डोंबलं
हि अगदी अभिमानाची गोष्ट आहे, कि केशवपनाची दूष्ट रुढी आपण त्यागलीय. अर्थात त्यामागे आपल्या
समाजसुधारकांचे प्रयत्न होतेच. पण पुर्वी अगदी शहरातही लाल आलवण नेसलेल्या विधवा दिसत.
त्यांचा बोडक्या बाया, असा अत्यंत अपमानास्पद उल्लेख केला जात असे. त्यांचे केस नसलेले डोके
हा पण चेष्टेचाच विषय असे. त्यापैकी अनेक जणी असे उल्लेख हसण्यावारी नेत. (दुसरा उपायच नसे.)
घाल माझ्या बोडक्यावर, डोंबलं माझं, कुणाला कश्याच तर बोडकीला केसाचं असे शब्दप्रयोग सर्रास होत
असत.
२१ ) बोळकं
या शब्दाला दोन अर्थ होते. दात नसलेले तोंड, मग ते तान्ह्या बाळाचे असो कि वृद्ध माणसाचे, त्याचा
उल्लेख बोळकं म्हणूनच करत असत. हसण्याला, पसरलं बोळकं असा शब्द प्रयोग करत.
एका प्रकारच्या भांड्याला पण बोळकं असा शब्द होता. (मला खात्री नाही) पण शालू हिरवा या
गाण्यात
चूल बोळकी इवली इवली, भातुकलीचा खेळ गं, अशी ओळ आहे.
२२) संसार
मराठीत आणि हिंदीत काही शब्दांचे (चेष्टा, यातायात ) अगदी वेगवेगळे अर्थ आहेत त्यपैकी हा
एक. संसार म्हणजे नेमके काय हेही सांगणे कठीण आहे. कारण घरातील नीट लावलेल्या वस्तू,
भांडीकुंडी यांना पण हा शब्द वापरत आणि नवर्याबरोबरच्या सहजीवनालाही. संसार नीट कर
असा सल्ला पोक्त बायका नववधूला देत असत. माझा घर माझा संसार असे एक नाटक होते.
(म्हणजे घर आणि संसार वेगळे होते ना.)
मज काय ऊणे या संसारी वगैरे गाणी आहेतच पण एका पटक्यात पण असाच सल्ला दिलाय
बिकट वाट वहीवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको
संसारी तू ऐस आपुल्या, उगाच भटकत फिरु नको.
२३) पदर
पदर हा शब्द साडीसाठी वापरला जात असेच. पण आणखी एका संदर्भात हा शब्द वापरात होता.
सोयरीक जमवताना, नातेवाईकांची चौकशी करताना, तूमचा पदर कुठे कुठे लागतो, असे विचारले
जात असे.
पदर येणे, पदर घेणे, पदर संभाळणे याला साडीच्या संदर्भात असले तरी वेगवेगळे अर्थ होते.
डोईचा पदर आला खांद्यावरी, जनी म्हणे मी वेसवा झाले.. असा संत जनाबाईचा अभंग आहे.
मराठ्यांमधे डोक्यावर पदर घेणे आवश्यक होते तर ब्राम्हणात दोन्ही खांद्यावर. याला अनेक
संदर्भ आहेत. मराठा स्त्रिया उन्हातान्हात राबणा-या त्यामूळे डोक्यावर पदर घेणे आवश्यक होते.
राजस्थानचा संदर्भ असल्याने थोडाफ़ार घुंघटाशी सबंध होता तर ब्राम्हण स्त्रियांच्या केसांचा खोपा
आणि त्यावरचे दागिने दिसण्यासाठी पदर अनावश्यक होता. तसेच त्या समाजात विकेशा स्त्रिया
डोक्यावरुन पदर घेत असत. (यासंदर्भात जास्त माहिती प्रतिक्रियांमधून मिळेलच.)
२४) झक
झक मारली आणि तूझ्याशी लग्न केले, असा शब्द्प्रयोग त्या काळातल्या संसारीक भांडणात येत असे. झक या शब्दाचा नेमका अर्थ मला कळला नाही कधी.
आता आपण त्यासाठी पागल कुत्तेने काटा है, असे शब्द वापरतो नाही का ?
२५ ) रंजीस
हा शब्दही कमी ऐकायला येतो हल्ली. चेहरा उतरलेला असणे अशा अर्थी हा शब्द वापरात
होता. रुणा लैलाच्या, रंजीशही सही या गझलेशी त्याचा सबंध नव्हता.
भाषा प्रवाही असते. जूने शब्द विस्मरणात जाणार आणि नवे प्रचारात येणार, हा नियमच आहे.
झणिं, झडकरी, एकसमयावच्छेदेकरुन, सत्वर, वृथा, मूढ असे शब्द तर त्याआधीच वापरातून
मागे पडले होते.
मला आठवले तसे अनेक शब्द तूम्हालाही आठवतील आणि ते प्रतिसादातही येतीलच.
पण हे शब्द म्हणजे तरुणाईची भाषा नव्हती आणि यापैकी बहुतेक एखाद्या वस्तूशी संबंधित नव्हते, पण या शब्दांशी माझ्या शाळकरी वयातल्या आठवणी निगडीत आहेत हे नक्की.
<<मी एकदा पूण्यावरुन
<<मी एकदा पूण्यावरुन गोव्यासाठी बस पकडली होती. साधारणपणे या बसेस सातारा-कोल्हापूर्-गगनबावडा-तळेरे मार्गे जातात, पण ही (राज ट्रॅव्हल्स) पूणे-पाचगणी-महाबळेश्वर-- अशी गेली.<<<
असा पण रुट आहे?
मग काय त्या बसेस पुढे पोलादपुरला गोवा हायवेला लागतात की काय???
मस्त झालाय लेख !
मस्त झालाय लेख ! आवडला...
बरेचसे शब्द नव्याने आवडले
शब्द हरवले कारण त्या वस्तू
शब्द हरवले कारण त्या वस्तू हरवल्या.
या लेखात असे अनेक शब्द आणि वस्तू आहेत जे मी पहिल्यांदाच ऐकले.हा आणखी एक.
कांडप.
माजघर
रहाटगाडगं हा शब्द आलाय का चर्चेत? मी तो फक्त जीवनाचे रहाटगाडगे याच संदर्हात ऐकलाय. हे आहे का रहाटगाडगं? याला हिंदीत काय म्हणतात? फिलॉसॉफिकल चित्रपटगीतात या अर्थाचा शब्द ऐकल्यासारखं वाटतंय.
हो आर्या, तसाच रुट आहे.
हो आर्या, तसाच रुट आहे. गोव्यावरुन अहमदाबादला जाणारी बस,
सावंतवाडी-अंबोली-बेळगाव-कोल्हापूर-पुणे-ठाणे-वसई---अशी जाते.
अशोक, त्या संदर्भात मी भाड्या हा शब्द ऐकलाय. अर्थात कोल्हापूरला ती कौतूकाची
उपाधी आहे.
भरत, गाडग्याचे रहाट मी वसईला बघितले आहेत, ते रेड्यांच्या मदतीने चालवायचे.
देवरुखला मावशीच्या घरी पायरहाट होता, विहिरीच्या काठावर बसण्यासाठी चिरेबंदी
बैठक होती, त्यावर बसुन सायकल चालवल्याप्रमाणे रहाट फ़िरवायचा. पायात फार
जोर लागायचा.
आज लोकसत्तामधे दुधाणी आणि घुसळखांब या शब्दांबद्दल लेख आहे. पण माझ्या
लहानपणी मालवणमधे तरी दूधाची सुबत्ता नव्हती. काकांच्या म्हशी होत्या, म्हणून
आमच्याघरी दूध असायचे. माझ्या आजोबांनी कधी आयूष्यात दूधाची चव बघितली
नव्हती. टिळकांसाठी चहाही सोडला होता. त्यांच्यामते तांदळाच्या पेजेसारखे काही
पोषक नाही. आणि ते तसे खरेही आहे म्हणा.
दिनेशदा त्याच मलिकेतल्या
दिनेशदा त्याच मलिकेतल्या लेखांच्या लिंक्स दिल्यात वर.
दिनेश ~ "भाड्या" ही
दिनेश ~
"भाड्या" ही कोल्हापूर-निपाणी-बेळगांव भागात काहीशी कौतुकमिश्रीत वा कृतकोपाची शिवी आहे, जी आई आपल्या कामचुकार पोराला उद्देश्यून वापरते : जसे
"आरं नऊ वाजलं की, उठं की भाड्या आता आण जा साळंला." किंवा
गावकामगार पाटील निरोप्याची वाट पाहात चावडीत बसून :
"कवा दरनं वाट पाहत्योया मी, परं ह्यो भाड्या भीमा कधी येईल तव्वा खरं".
इथे 'भाड्या' चा वापर प्रखर शिवी म्हणून नक्कीच नाही.
पण 'भाडखाऊ" हे मात्र जळजळीत घाणेरड्या शिवीसदृश्य विशेषण आहे. अर्थ स्पष्टच आहे की वेश्या वा नायकिणीच्या जीवावर जगणार्या पुरुषाला उद्देश्यून भांडणारा संतापून म्हणत असतो.
मयेकर, लेखाच्या लिंक्स
मयेकर, लेखाच्या लिंक्स वाचल्या. माझं लहानपण डोळ्यासमोरून तरळून गेले. पोहे कांडताना हळदीची पाने पण वापरायचे ना! तो एक खूप छान वास यायचा.
माजघर सारवणे, त्यावर नक्षी काढणे, सगळे सगळे डोळ्यासमोर उभं राहिलं!
ते ताक करताना वापरायचा घुसळखांब--हो हो मी पण लहानपणी गंमत म्हणून केलेत ती कामे!
माडी, या शब्दाला कोकणात एक
माडी, या शब्दाला कोकणात एक प्रकारचे मादक पेय असा अर्थ आहे (ताडीमाडी विक्री केंद्र !!)
पुण्यात आणि कोल्हापूरला वरचा मजला असा अर्थ आहे. पण माड्या चढणे याला जरा वेगळा
अर्थ आहे.
मुंबईत मात्र हा शब्द कधीच बापरात नव्हता फारसा.
नाही दिनेश, 'वरचा मजला' असा
नाही दिनेश, 'वरचा मजला' असा माडीचा अर्थ इथे कोल्हापुरात नाही.
"माडी" चा सरळसोट अर्थ आहे जिना. [माड्या चढणे याला वेगळा म्हणजे 'बावणखणी' अर्थ आहे. पूर्वीच्या बैठका साधारणतः वरच्या मजल्यावर असलेल्या कोठ्यावर व्हायच्या, त्यावरून 'माड्या चढणे' ही टर्म अस्तित्वात आली. "अमर भूपाळी" तसेच 'राम जोशी' चित्रपटातून शांतारामबापूंनी मुद्दाम अशा माड्यांचा उपयोग त्या अर्थाने केल्याचे लक्षात येते.]
वरचा मजला याला 'माळा' असेही इकडे म्हटले जाते.
भुंड टेक हा एक शब्द भरीला.
भुंड टेक हा एक शब्द भरीला.
सगळा लेख अन प्रतीसाद वाचतोय , मस्त!
"दिव्याला निरोप दे" असे
"दिव्याला निरोप दे" असे माझ्या मामेबहिणीला सांगितल्यावर ती दिव्याकडे बघतच राहीली!
आता ह्याला निरोप कसा द्यायचा?
(काही कारणाने दिवा नको असेल तर )देवापुढे लावलेला दिवा/समई " विझव" असे कधी म्हणत नाहीत, तर त्याला 'निरोप दे' असे म्हटले जाते. मग त्या दिव्याला नमस्कार करुन हलकेच फुंकर घालयची पद्धत आहे.
'काठवट' हा शब्द/ भांड्याचा
'काठवट' हा शब्द/ भांड्याचा प्रकार माहित आहे का?
जुन्या काळी (फार जुनाही नाही, आजी च्या वेळी) भाकरी थापायला / कणीक मळायला एक लाकडी परात असे. त्याला दोन बाजुनी लाकडी कान सुद्धा असत.. त्याला काठवट म्हणतात.
असाच एक जुना ग्रामीण अपशब्द -
'गैबानं' = वेडा, चक्रम
"ते तसलंच आहे, येडं गैबानं"!!
दिनेशदा खूप शब्द असे आहेत की
दिनेशदा खूप शब्द असे आहेत की आपल्या लहनपणीच ते लुप्त झाले. हल्ली मुलांना हे शब्द माहीत नाहीत.हे माझ्या लहानपणी वापरण्यात येणारे काही आठवलेले शब्द..
ओसरी : ओसरीवर खेळा रे असं आमच्या लहानपणि म्हटलं जायचं. ओसरी म्हणजे घरासमोरची मोकळी
जागा.
आडणी : एका गोलाला तीन पाय आलेली लोखंडाची तिपाई. माठ किंवा घागर ठेवायला उपयोगात आणतात.
सोम्यागोम्या : कुणितरी खोडसाळ अनोळखी माणूस. "असेल कुणी सोम्या गोम्या " असं म्हटलं जायच.
चतरंगी : चालु बाई. अहो ती महा चतरंगी आहे.
आवरासावर : पसारा नीट आवरायचा असेल तर . चला आता जरा आवरा सावर करावी. असे म्हणायचे.
पाटपाणी. : स्वयंपाक झाला की मुलींना म्हणायचे "चला आता पाटपाणी घ्या."म्हणजे जेवायला वाढायची तयारी
करा.
चांभार चौकशी : कुणी आगाउपणानी काही विचारलं तर म्हणायचे तिला/त्याला फार चांभार्चौकशी लागते.
चोंबडेपणा किंवा चोंबडा : उगाच मधेमधे बोलणार्याला म्हणायचे,
अजून खूप शब्द आहेत.'फडताळं' 'कारभारीण' 'जरा दम धर' 'धक्काबुक्की' वगैरे. आठवतील तसे लिहीन. लहानपण आठवून दिल्याबद्दल धन्यवाद.
>>> ओसरी : ओसरीवर खेळा रे असं
>>> ओसरी : ओसरीवर खेळा रे असं आमच्या लहानपणि म्हटलं जायचं. ओसरी म्हणजे घरासमोरची मोकळी जागा.
ओसरीला पडवी असाही एक शब्द आहे.
ओसरी, पडवी हे खास कोकणातले
ओसरी, पडवी हे खास कोकणातले शब्द आहेत. देशावर घरांना पडवी नसतेच.
तिथे माजघर हा शब्द जास्त प्रचलित.
पूण्याला आता हि पद्धत नाही बहुतेक, पण पुर्वी मुंबईत ज्याला पहिला मजला
म्हणायचे त्याला तिथे दुसरा मजला म्हणायचे.
सोम्यागोम्या सारखाच अलाणाफलाणा हा मूळ हिंदी शब्द पण होता वापरात.
दिव्याला निरोप दे, हि कल्पनाच सुंदर आहे. नारळ वाढवणे, बांगड्या वाढवणे
हे पण त्याच प्रकारातले.
पुर्वी अंधार पडला, कि सापाचे आणि सश्याचे नाव घेत नसत, मग त्याला
लांबडे आणि लांबकान्या असे म्हणायचे.
आमच्या कोकणात, ओसरी म्हणजे
आमच्या कोकणात,
ओसरी म्हणजे घराची पुढची जागा. ह्याला दारं खिडक्या नसतात. पण कौलारू छत असतं. आणि बरेच वेळा खांब असतात पुढच्या बाजूला ज्यावर छत टेकलेलं असतं.
गावकडील छायाचित्रात मितच्या छायाचित्रात ओसरी दिसते आहे.
पडवी म्हणजे घराची मागची जागा (खोली). माजघर, ओसरी आणि पडवीच्यामधली एक खोली.
बरोबर आहे. ओसरी म्हणजे छत
बरोबर आहे. ओसरी म्हणजे छत असतं. खांब असतात. घराच्या समोर असते.
आजी यातले बरेच शब्द अजून
आजी यातले बरेच शब्द अजून वापरते
... छान आहे लेख !
ह्या धाग्यावर मी आधी काही
ह्या धाग्यावर मी आधी काही लिहिलेय की नाही आठवत नाही. पण दिनेशदांनी लीस्ट दिली आहे, त्यातले बरेचसे शब्द (खाली लिहिलेत ते) माझ्या सासरी व माहेरी अजूनही वापरतात.
अय्या
पाटपाणी (माझ्या माहेरी बाबांमुळे रूढ झालेला शब्द आहे. विदर्भात जेवणाची पाने घेणे ह्या अर्थी असे बोलतात.)
झाकपाक
दिवेलागण
केरवारा
मोलकरीण
शेकशेगडी
नहाण (केस धुवायचे असतील त्या दिवशी 'आज मला नहायचे आहे' असेच म्हणतो आम्ही.)
चूल (चूल हा प्रकार आता खेडोपाड्यातही वापरात क्वचित असला तरीही हा शब्द कालबाह्य झालेला नाही. रस्त्यावरचे भिकारी, रोजंदारीवर काम करणारे आणि ज्या शहरात्/गावात काम मिळेल त्या प्रमाणे बिर्हाड हलवणारे लोक अजूनही रस्त्याच्या कडेला चूलीवरच स्वयंपाक करताना दिसतात की!)
बोळकं
झक
>> पुर्वी अंधार पडला, कि
>> पुर्वी अंधार पडला, कि सापाचे आणि सश्याचे नाव घेत नसत, मग त्याला
लांबडे आणि लांबकान्या असे म्हणायचे. -- माझी आजी कधी गाढव असा शब्द वापरत नसे, एखादा उनाड मुलगा लाथा मारत असेल तर ती त्याला तू लांब कान्या ( गाढव) झाला आहेस का असे विचारायची. अजून एक म्हणजे कोकणात औषध म्हणून बिब्बा वापरतात , पण काळोख पडला कि त्याला बिब्बा न म्हणता "काळा " असे संबोधायची पद्धत होती.
अजून काही जुने शब्द
१) चिरगुटे - कपडे (विशेषत: इतस्थ पसरलेले)
२) वळकट्या = गोल गुंडाळून ठेवलेल्या चादरी वगैरे
३) बाव = विहीर
४) बागुरडा = झुरळ
५) सरबरीत = खुळचट , मूर्ख
र.च्या.का.ने. भाषेचा वापर न टिकवल्या मुळे येणारा काळ या छोट्या चित्रफिती मध्ये दाखवला आहे, प्रस्तुत धाग्याबरोबर "बादरायण संबंध " सोडून हि लिंक येथे देण्याचे धाडस करीत आहे, चू.भू.द्या.घ्या.
(सब टायटल - क्लोज कॅप शन - ओन करायला विसरू नका)
http://www.youtube.com/watch?v=ufvA_VNj--M
झक हा शब्द संस्कृत झष पासून
झक हा शब्द संस्कृत झष पासून आलेला आहे असे मी एका बिरबलाच्या गोष्टीत वाचले आहे.
झष = मासा
पण तरीही ' झक मारणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट होत नाही...
झक मारली आणि झुणका केला, असे
झक मारली आणि झुणका केला, असे पूर्ण वाक्य आहे ते. मासे मारुनही खाता आले नाहीत / खाण्याजोगे नव्हते, असे काहीसे.
Pages