खुप वर्षांपुर्वी भारताबाहेर स्थायिक झालेल्या माझ्या एका बालमैत्रिणीचा गेल्या आठवड्यात फ़ोन
आला होता, आम्ही प्राथमिक शाळेत एकत्र जात होतो.
तिच्या बोलण्यात असे काहिसे शब्द आले, कि मला एकदम तिच्या आणि माझ्या आईचे बोलणे
आठवले. त्या दोघी बोलताना हे शब्द सर्रास वापरत असत. तिला मी हे सांगितल्यावर म्हणाली,
कि माझ्याशी बोलताना तिला पण तेच दिवस आठवले होते. आणि माझ्याशी मराठीत बोलताना
असे शब्द अगदी अजाणता तिच्या बोलण्यात आले.
आता माझ्या आईच्या बोलण्यातही हे शब्द येत नाहीत. पण ते शब्द, आणि त्यांचे खास उच्चार
माझ्या लख्ख लक्षात आहेत.
सहज आठवले म्हणून नोंदवतोय.
१) अय्या आणि इश्श्य.
हे शब्द इतके प्रचलित होते कि त्या काळी मुलींना या दोन शब्दांशिवाय आश्चर्य आणि लज्जा
व्यक्तच करता येत नसे. माझ्या शाळेतल्या मुलीदेखील हे शब्द खुपच वापरायच्या. अय्या म्हणतांना
किंवा तो म्हणून झाल्यावर तोंडावर रुमाल (तोही लेडीज हातरुमाल) ठेवल्याशिवाय तो उद्गार पूर्ण
होत नसे. इथे मी लज्जा हा शब्द वापरलाय, त्याला पण त्याकाळी खुपच मर्यादित अर्थ होता.
अय्या या शब्दाचा एक मस्त उच्चार लताने, शागिर्द मधल्या, दिलवील प्यारव्यार मै क्या जानू
रे, या गाण्यात केलाय.
२) बावळट्ट
मुलांना उद्देशून किंवा कुणाही मूर्ख व्यक्तीला (पण खास करुन पुरुषांनाच) उद्देशून हा शब्द वापरला
जात असे. बरं हा शब्द नुसताच नव्हे तर त्याचा उच्चार साधारण बावळट्ट्चै असा असायचा.
या शब्दाला मुर्ख एवढाच अर्थ होता असे नाही, पण मुलांनी काहिही केलं, तरी हा शब्द वापरला
जायचा. आणि काय असेल ते असो, मुलींनी बावळट म्हंटलेलं मुलांना पण आवडत नसे.
३) गडे
हा शब्द मैत्रिण किंवा मित्र (त्या काळात मित्राशी बोलायची फ़ारशी प्रथा नव्हती म्हणा) दोघांनाही
उद्देशून असे. हा शब्द उच्चारायचे प्रसंगही खास असत. म्हणजे एखादी उसनी घेतलेली, वस्तू किंवा
सुटे पैसे परत करायला गेल्यावर हा शब्द हमखास उच्चारला जात असे. असं नाही गडे, त्याचं
काय एवढं.. वगैरे. यायचं ना गडे असे जे त्याचे आताचे चावट रुपांतर आहे, तसे ते बोलण्यात नसायचे.
नका गडे माझ्याकडे पुन्हा पुन्हा पाहु, डोळे हे जुल्मी गडे.. हि गाणी त्याच काळातली.
४) किनै
कि नाही, या शब्दांचा हा गोड उच्चार त्याकाळी खुपच वापरात असे. लहान मुली मोठ्यांकडे काही
मागायचं असेल (मागून मागून काय ते, भातुकलीसाठी गूळ, शेंगदाणे वगैरे) तर सुरवात अशी
व्हायची, किनै आई आम्ही दुपारी भातुकली करणार आहोत..
किंवा मला किनै हे नै आवडत.
५) नै
मराठीत मधे ह असणारे शब्द फ़ारच कमी आहेत (नेहमी, साहजिकच ..) ह हा वर्ण कुठल्याच गटात
(ओष्ठ्य, दंत्य, तालव्य ) न येता स्वतंत्र येतो त्यामूळे त्याचा इतर अनेक अक्षरांशी संयोग होऊ
शकतो (क-ख, ग-घ, त-थ..) म्हणून बहुदा ह मधे असलेले शब्द उच्चारताना आपली किंचीत धांदल उडते.
नाही या शब्दाचा उच्चार, इतका स्पष्ट लहान मूलेच करतात. आपण सहसा नाय असाच उच्चार करतो.
६) बै
आता मायबोलीवर हा शब्द परत दिसायला लागला आहे. त्या काळात आम्ही आमच्या शिक्षिकेंना
बाई असेच म्हणत असू. त्या काळातल्या गाण्यातही ( बाई बाई मनमोराचा कसा पिसारा, काय बाई
सांगू ) हा शब्द असे. एकंदरीत या शब्दाला आदराचे वलय होते (जिजाबाई, लक्ष्मीबाई)
मग का कुणास ठाऊक, बहुतेक हिंदीच्या (आठवा तिसरी कसम मधली हिराबाई) प्रभावाने असेल,
या शब्दाचा स्तर खुपच खाली गेला. हिंदी चॅनेल्सवर या शब्दाचा अर्थ कामवाली बाई असाच धरला
जाऊ लागला.
सरकारी कार्यालयात तर मॅडम बाई, असा एक विचित्र शब्दप्रयोग कानावर पडतो. हा शब्दप्रयोग आशा
खाडिलकरने गायलेल्या एका धमाल गाण्यात आलाय.
नोकरी कसली ही, हि तर डोक्यावर टांगती तलवार
आता तूम्हीच सांगा, आहेत कि नाही, इथली कार्टी
एकापेक्षा एक तालेवार.... असा मुखडा होता.
या बाई शब्दाबाबत माझी एक मजेदार आठवण आहे. माझा पुतण्या लहान असताना छायागीत बघून,
हि माधुरी का ? हि ममता का ? असे विचारायचा. वहिनीला ते आवडायचे नाही, ती म्हणायची, त्या
काय तूझ्याएवढ्या आहेत का, नावाने हाका मारायला. मग त्याने त्यांना दिक्षितबाई, कुलकर्णीबाई असे
म्हणायला सुरवात केली.
वरचे दोन्ही शब्द मिळून नैबै असा शब्द पण कॉमन होता. पण त्या मानाने तै (ताई) असा उच्चार तितका
प्रचलित नव्हता. वार्यावरची वरात मधल्या कडवेकर मामी पण, मालुताई अशीच हाक मारायच्या.
७) वन्सं
मोठ्या नणंदेला उद्देशून हा शब्द वापरला जाई. मला वाटतं लहान नणंदेला पण वन्संच म्हणत असत.
सासू खालोखाल छळणारी म्हणून हि ख्यातनाम होती. शास्त्रीय चीजांमधे पण बहुदा हि जानी दुष्मनच असे.
( अब मै तो ईख खाये मरुंगी, ननदीया मारे बोल...पारंपारिक ठुमरी - श्रुती साडोलीकर
किंवा
बैरन ननदीया, लागे डराने - छोटा खयाल - राग बिभास. पंडीता मालिनी राजूरकर)
मला वाटतं कोल्हापूर किंवा बडोद्याला मराठ्यांच्या मधे मोठ्या नणंदेला दिवानसाब असा पण शब्द वापरात
होता. सौभद्र नाटकातही, रुक्मिणी, सुभद्रेला उद्देशून वन्स हाच शब्द वापरते.
आता बहुदा हे नाते मित्रत्वाचे झाल्याने, हा शब्द मागे पडला.
८) मामंजी
सासरेबुवांना उद्देशून हा शब्द वापरला जात असे. याचा मामा या शब्दाशी संबंध नसावा. कारण मामेभावाशी
लग्न करण्याची प्रथा कधीच नव्हती. आत्येबहीणीशी करत असत म्हणून, जावई सासूला, आत्याबाई असे
पण म्हणत असे.
आता सासुला आई (किंवा मम्मी) आणि सासरेबुवांना बाबा, पप्पा असेच काहीतरी म्हणतात. मामंजी हा
शब्द ताईबाई आता होणार लगीन तूमचं या गाण्यात पण आलाय. (मामंजीना जमाखर्च द्या ..) त्यामानाने
भावोजी हा शब्द अजून वापरात आहे.
९) पाटपाणी
संध्याकाळचे जेवण तयार झाले कि मुलांनी पाटपाणी घ्यायची प्रथा होती. अगदी ताटाखाली आणि टेकायला पाट नसला तरी बसण्यासाठी एक पाट असायचाच. आता जमिनीवर बसण्यासाठी आपण सतरंजी वगैरे अंथरतो, पण त्या काळात अगदी आमच्याकडेही पाटावर बसायची प्रथा होती.
पाणी घ्यायचे म्हणजे माठातील गार पाणी तांब्यात काढून घ्यायचे. पेल्याला फुलपात्र किंवा भांडे असा शब्द
खास करुन, ब्राम्हणांच्या घरी वापरात होता.
१०) झाकपाक
रात्रीचे जेवण झाले कि झाकपाक करणे हे बायकांचे अत्यावश्यक काम असायचे. फ़्रिज नसल्याने उरलेली
भाजी आमटी, दुसर्या भांड्यात काढून ती व्यवस्थित झाकून ठेवावी लागे. तापवलेले दूध थंड करुन त्यावर
जाळीचे झाकण ठेवणे, विरजण लावणे हे पण करावे लागे. दूधदुभत्यासाठी जाळीचे कपाट असे.
रात्री कुठे बाहेर जायचे असेल, किंवा अगदी अंगणात गप्पा मारत बसायचे असेल. (बरोबर बिनाका गीतमाला
किंवा पुन्हा प्रपंच ऐकायचे असेल) तर आईला हे सगळे आटपूनच यावे लागे.
११) दिवेलागण
वीजेचे दिवे नव्हते त्यावेळी नगरपालिकेतर्फ़े लांब बांबूच्या सहाय्याने रस्त्यावरचे दिवे लावणारा एक माणुस
सायकलवरुन यायचा. वीजेचे दिवे आले तरी, त्याचे बटण त्या खांबावरच असायचे आणि ते लावायला
माणूस येतच असे.
हा काळ मी मुंबईत बघितला नाही, पण गावाला कंदिलाच्या काचा साफ़ करणे, बाकिच्या दिव्यातील वाती
साफ़ करणे हा रोजचा उद्योग असायचा.
या दिवेलागणीला अनेक संदर्भ होते. या वेळेच्या आत मुलांनी खेळ आटपून घरात यावे, हातपाय धुवून
शुभंकरोति म्हणावे आणि अभ्यासाला लागावे, अशी शिस्त होती.
सांजवात करणे, तुळशीसमोर दिवा लावणे हेही होतेच. दिवेलागण हा स्बद मागे पडला तरी तिन्हीसांजा
मात्र अजून वापरात आहे.
१२) केरवारा
केराचा आणि वार्याचा काय संबंध होता ते माहित नाही. पण केर कधी काढायचा याचे मात्र आडाखे
होते. केर शक्यतो सकाळी किंवा दुपारी काढला जायचा. पण तो संध्याकाळचा कधीच काढला जात नसे.
संध्याकाळची वेळ, हि लक्ष्मीची वेळ मानली जात असे.
तसेच एखादा माणूस घराबाहेर पडल्यावर लगेचच केर काढणे अशुभ मानले जात असे. कारण घरातील
व्यक्ती मृत झाली तरच असे करत असत. सखाराम बाइंडर या नाटकात पण लक्ष्मी घराबाहेर पडायच्या
आधी केर काढूनच जाते. आता या शब्दा ऐवजी झाडू मारा, किंवा झाडूपोछा हाच शब्द रुढ झालाय.
त्या मानाने धुणंभांडी हा शब्द अजून वापरात आहे.
१३ ) मोलकरीण
मोलकरीण हा शब्द सर्रास वापरात होता. सुलोचना, रमेश देव, सीमा देव यांच्या या नावाचा चित्रपट
पण होता. बायका नोकरी करायचे प्रमाण कमी असल्याने, मोलकरीण आणि घरतील बाई यांचा संवाद असायचा.
आता का कुणास ठाऊक पण या शब्दाला थोडी गौण छटा आलीय. त्याजागी कामवाली बाई किंवा
(नुसतीच) बाई असा शब्द जास्त प्रचलित आहे.
१४ ) शेकशेगडी
लहान बाळाला अंघोळ वगैरे घालून झाली, कि शेक दिला जात असे. त्यासाठी पाळण्याखाली किंवा
बाजेखाली शेगडीत निखारे ठेवून त्यावर धूप टाकला जात असे. कधी कधी बाळाच्या जावळाला पण
याचा शेक देत असत.
त्या काळी बाळंतीणीची खोली म्हणून एक अंधारी खोली राखीव असे आणि त्या खोलीत शिरल्याबरोबर
असा वास येत असे. हा प्रकार अगदी शहरातही केला जात असे.
१५ ) बिर्हाड बाजलं
बिर्हाड या शब्दाचा नेमका अर्थ सांगणे कठीण आहे. पण साधारण मुक्कामाचे ठिकाण असे म्हणता येईल.
नाटक कंपनीचा मुक्काम जिथे असे त्या जागेला बिर्हाड म्हणत असत. पुर्वी कोकणातून एकटाच माणूस
आधी नोकरीला येत असे. (चाकरमानी) त्याचा जम बसला, एखादी जागा भाड्याने घेतली कि तो गावाहून
बायकामूलांना बोलावून घेत असे. त्यालाही बिर्हाड केले वा बिर्हाड आणले, असा शब्द वापरात होता.
बाजलं म्हणजे अर्थातच लाकडाची सुतळीने विणलेली खाट.
या नावाचे एक नाटकही होते, त्या नाटकातले माझ्याच पावलांची असे एक सुंदर नाट्यगीत, आरती नायकच्या आवाजात यू ट्यूबवर उपलब्ध आहे.
१६ ) पागडी
घर भाड्याने घेताना किंवा विकत घेताना पागडी म्हणून काही रक्कम द्यायची प्रथा होती. साधारण डीपॉझिट
असा याचा अर्थ होता.
१७ ) नहाण
त्याकाळात शॉवर्स नव्हते आणि मुलींचे केसही लांब असायचे. त्यामूळे केसांवरुन अंघोळ हा एक सोहळा
असायचा. शिकेकाई, रिठा असा सगळा सरंजाम करावा लागायचा. आई किंवा मोठी बहीण अंधोळ घालायची
आणि मग केस खसाखसा पुसून बारीक दाताच्या फ़णीने विंचरणे हा पण एक उद्योग असायचा.
मुलगी वयात येणे यासाठी पण नहाण येणे (किंवा पदर येणे) असा शब्द होता. २२ जून १८९७ या चित्रपटात सीताबाईला चाफेकळीला नहाण आलं, असे एक गाणे होते.
१८) चूल
शहरात साधारण ५० वर्षांपूर्वीच शिजवण्यासाठी गॅसचा वापर सुरु झाला. पाईपनेदेखील गॅस पुरवला जात असे.
बॉम्बे गॅस असे त्या कंपनीचे नाव होते. त्यांचा एक लोखंडी स्तंभ किंग्ज सर्कलच्या ऑपेरा हाऊसजवळ,
आताआतापर्यंत होता. अगदी गॅस नसला तरी स्टोव्ह वापरात होते. पण बायकांच्या बोलण्यात चूल हाच शब्द होता. अगदी रुचिरातही अनेकवेळा हा शब्द आलाय. घरोघरी मातीच्या चुली, चूल आणि मूल, चूलीपुढचे शहाणपण असे शब्दप्रयोग अनुषंगाने येतच.
१९) नांदणे
आपण नांदा सौख्यभरे असा आशिर्वाद जरी अजून देत असलो तरी, नांदणे हे क्रियापद मात्र फारसे वापरत
नाही. एखादी बाई सारखी माहेरी जात असली, तर ती नीट नांदत नाही असे म्हंटले जात असे. आणि
बर्याच नवरेमंडळींची बायको नीट नांदत नाही, हि समस्या असे.
त्याकालच्या लावण्यांमधे पण हा शब्द असे. नांदायला मला बाई जायाचं नांदायला अशी रोशन सातारकरची
लावणी होती, येऊ कशी तशी मी नांदायला पण तिचीच होती. कशी नांदायला येऊ मी बाई, अशी पुष्पा
पागधरेची लावणी होती.
२०) बोडकं / डोंबलं
हि अगदी अभिमानाची गोष्ट आहे, कि केशवपनाची दूष्ट रुढी आपण त्यागलीय. अर्थात त्यामागे आपल्या
समाजसुधारकांचे प्रयत्न होतेच. पण पुर्वी अगदी शहरातही लाल आलवण नेसलेल्या विधवा दिसत.
त्यांचा बोडक्या बाया, असा अत्यंत अपमानास्पद उल्लेख केला जात असे. त्यांचे केस नसलेले डोके
हा पण चेष्टेचाच विषय असे. त्यापैकी अनेक जणी असे उल्लेख हसण्यावारी नेत. (दुसरा उपायच नसे.)
घाल माझ्या बोडक्यावर, डोंबलं माझं, कुणाला कश्याच तर बोडकीला केसाचं असे शब्दप्रयोग सर्रास होत
असत.
२१ ) बोळकं
या शब्दाला दोन अर्थ होते. दात नसलेले तोंड, मग ते तान्ह्या बाळाचे असो कि वृद्ध माणसाचे, त्याचा
उल्लेख बोळकं म्हणूनच करत असत. हसण्याला, पसरलं बोळकं असा शब्द प्रयोग करत.
एका प्रकारच्या भांड्याला पण बोळकं असा शब्द होता. (मला खात्री नाही) पण शालू हिरवा या
गाण्यात
चूल बोळकी इवली इवली, भातुकलीचा खेळ गं, अशी ओळ आहे.
२२) संसार
मराठीत आणि हिंदीत काही शब्दांचे (चेष्टा, यातायात ) अगदी वेगवेगळे अर्थ आहेत त्यपैकी हा
एक. संसार म्हणजे नेमके काय हेही सांगणे कठीण आहे. कारण घरातील नीट लावलेल्या वस्तू,
भांडीकुंडी यांना पण हा शब्द वापरत आणि नवर्याबरोबरच्या सहजीवनालाही. संसार नीट कर
असा सल्ला पोक्त बायका नववधूला देत असत. माझा घर माझा संसार असे एक नाटक होते.
(म्हणजे घर आणि संसार वेगळे होते ना.)
मज काय ऊणे या संसारी वगैरे गाणी आहेतच पण एका पटक्यात पण असाच सल्ला दिलाय
बिकट वाट वहीवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको
संसारी तू ऐस आपुल्या, उगाच भटकत फिरु नको.
२३) पदर
पदर हा शब्द साडीसाठी वापरला जात असेच. पण आणखी एका संदर्भात हा शब्द वापरात होता.
सोयरीक जमवताना, नातेवाईकांची चौकशी करताना, तूमचा पदर कुठे कुठे लागतो, असे विचारले
जात असे.
पदर येणे, पदर घेणे, पदर संभाळणे याला साडीच्या संदर्भात असले तरी वेगवेगळे अर्थ होते.
डोईचा पदर आला खांद्यावरी, जनी म्हणे मी वेसवा झाले.. असा संत जनाबाईचा अभंग आहे.
मराठ्यांमधे डोक्यावर पदर घेणे आवश्यक होते तर ब्राम्हणात दोन्ही खांद्यावर. याला अनेक
संदर्भ आहेत. मराठा स्त्रिया उन्हातान्हात राबणा-या त्यामूळे डोक्यावर पदर घेणे आवश्यक होते.
राजस्थानचा संदर्भ असल्याने थोडाफ़ार घुंघटाशी सबंध होता तर ब्राम्हण स्त्रियांच्या केसांचा खोपा
आणि त्यावरचे दागिने दिसण्यासाठी पदर अनावश्यक होता. तसेच त्या समाजात विकेशा स्त्रिया
डोक्यावरुन पदर घेत असत. (यासंदर्भात जास्त माहिती प्रतिक्रियांमधून मिळेलच.)
२४) झक
झक मारली आणि तूझ्याशी लग्न केले, असा शब्द्प्रयोग त्या काळातल्या संसारीक भांडणात येत असे. झक या शब्दाचा नेमका अर्थ मला कळला नाही कधी.
आता आपण त्यासाठी पागल कुत्तेने काटा है, असे शब्द वापरतो नाही का ?
२५ ) रंजीस
हा शब्दही कमी ऐकायला येतो हल्ली. चेहरा उतरलेला असणे अशा अर्थी हा शब्द वापरात
होता. रुणा लैलाच्या, रंजीशही सही या गझलेशी त्याचा सबंध नव्हता.
भाषा प्रवाही असते. जूने शब्द विस्मरणात जाणार आणि नवे प्रचारात येणार, हा नियमच आहे.
झणिं, झडकरी, एकसमयावच्छेदेकरुन, सत्वर, वृथा, मूढ असे शब्द तर त्याआधीच वापरातून
मागे पडले होते.
मला आठवले तसे अनेक शब्द तूम्हालाही आठवतील आणि ते प्रतिसादातही येतीलच.
पण हे शब्द म्हणजे तरुणाईची भाषा नव्हती आणि यापैकी बहुतेक एखाद्या वस्तूशी संबंधित नव्हते, पण या शब्दांशी माझ्या शाळकरी वयातल्या आठवणी निगडीत आहेत हे नक्की.
ग्यासओटा त्यावरून एक नवीन
ग्यासओटा
त्यावरून एक नवीन शब्द तयार झालेला आठवला.
गॅसवर चालणार्या ऑम्नी गाड्यांना 'ग्यासोट्या' असला शब्द ऐकला आहे.
रसिकांनो वर्ख हा माझा लेख
रसिकांनो वर्ख हा माझा लेख कल्हईवाल्यावरच आहे जरुर वाचा अन् प्रतिक्रिया ही कळवा
<<दुसरे म्हणजे जरी मी कोठे
<<दुसरे म्हणजे जरी मी कोठे वससी, तरी तव मुर्ती दिसशी ! असे आहे, म्हणजे मी कोठेही असो किंवा रहात असो>>
नाही हो...त्या ओळी अशा आहेत
नारी मज बहु असती
परि प्रीती तुजवरती
जाणसि हे तू चित्ती
मग का ही अशि रीती
करि मी कोठे वसती
तरी तव मूर्ती दिसती
वससी हे द्वितीयपुरुषी रूप 'मी'बरोबर आणि 'दिसशी' हे द्वितीयपुरुषी रूप 'मूर्ती'बरोबर कसे जुळणार?
मयेकर तुम्हि म्हणता ते बरोबर
मयेकर तुम्हि म्हणता ते बरोबर आहे, हे तर पुन्हा संशोधन करायलाच पाहिजे, किर्लोस्करांचे शब्द आहेत ते, इतके सहज नसणार
थोड्या दिवसांनी चाळ हा शब्द
थोड्या दिवसांनी चाळ हा शब्द देखील नाहिसा होणार आहे....
मीरा, हा चाळ शब्द आपण किती
मीरा, हा चाळ शब्द आपण किती वेगवेगळ्या प्रकारे वापरतो
रहायची चाळ, पायातले चाळ, धान्य चाळ, पुस्तक चाळ....
मालिका, या शब्दाला एकदम वेगळाच अर्थ (सिरियल्स) मिळाला, पुर्वी हा शब्द गाण्यांच्या संदर्भात.. गीतमालिका असा वापरला जात असे.
खाण्याचा डब्बा पण मागे पडला होता. टिफिन हाच शब्द जास्त रुढ झाला होता. पण सिक्स सिग्मा प्रकरणानंतर डब्बा या शब्दाला पण वजन प्राप्त झाले.
मराठीत रजनीगंधा हा शब्दच वापरात नव्हता (निशिगंधच वापरात होता) त्या चित्रपटानंतरच हा शब्द रुढ झाला.
दिनेश आणि मीरा ~ मला वाटते
दिनेश आणि मीरा
~ मला वाटते चाळ/चाळी प्रमाणे आता 'आळ/आळी' ही कुणी म्हणत नसेल. आळ = गल्ली/लेन. "माझे घर बाबू गेनू आळीत आहे...." किंवा "पैलवान आळीतून सायकल रंकाळ्याकडे ने" अशी निरोपाची देवाणघेवाण व्हायची.
"आळ" म्हणजे 'आरोप' असाही एक अर्थ आहे. उदा. : "मी त्या मुलीच्या कानातील डूल चोरले असा घरातील आजोबानी माझ्यावर आळ घेतला आहे."
("डूल" नावाचा दागिना तर अस्तित्वात आहे ना?)
खालील शब्द नीट वाचा आणि बघा
खालील शब्द नीट वाचा आणि बघा कसं वाट्तय ते.
पन्ह् ळी
पानग्या
साग, एन, सुबाभुळ, टेंभुर्णी, शीसव, चिंच, ....मजा आली का ?
'घडवंची' हा शब्द माहिती आहे
'घडवंची' हा शब्द माहिती आहे का कुणाला?
पाण्याचा माठ थोडा उंचावर ठेवण्यासाठी लोखंडी सळ्यांची घडवंची असायची. थोडक्यात स्टँड!
'वडगण' ही माहिती आहे का? ताटात सार वगैरे पातळ आमटी भातावर घेतली तर पसरायची तेव्हा ताटाला एका बाजुने उंच करण्यासाठी लाकडाचे विशिष्ट आकाराचे तुकडे ताटाखाली ठेवत. त्याला 'वडगण' म्हणत, स्पेशली खान्देशात.
'घडवंची' माहीत आहे ~ दोन्ही
'घडवंची' माहीत आहे ~ दोन्ही अर्थानी. इकडे कोल्हापूर भागात मात्र तशा थंड पाण्याच्या मातीच्या पात्राला 'माठा' ऐवजी 'डेरा' म्हणतात.
"वडगण" मात्र नवे वाटले. छानच आहे नाम. आम्ही तशा प्रकारच्या ताटाखाली फुंकणी किंवा छोटीशी स्टीलची वाटी लावत असू. तिला 'टेकू' म्हटले जाते.
घडवंची होती आमच्याकडे. आमचा
घडवंची होती आमच्याकडे. आमचा पाण्याचा माठ तिच्यावर ठेवलेला असायचा. त्याला तिपाई असे पण म्हणत त्यावरुनच टिपॉय आला असेल का ?
आर्या, प्रादेशिक मजा बघ. कोकणात ताटात एखादा पदार्थ वहात असेल तर चक्क भाताचा बांध करतात. कारण ताटात तो भरपूर असतोच.
पण त्याला खास असा शब्द नाही बहुतेक.
अशाच दोन लाकडी/ लोखंडी
अशाच दोन लाकडी/ लोखंडी अँगलसारख्या घडवंच्यांवर फळ्या टाकुन एक्स्ट्रा गाद्या, चादरी वै. ठेवत.
<<आर्या, प्रादेशिक मजा बघ. कोकणात ताटात एखादा पदार्थ वहात असेल तर चक्क भाताचा बांध करतात. कारण ताटात तो भरपूर असतोच.<< भाताचा बांध... हाहाहा गंमतच आहे दिनेशदा!
दिनेशदा मस्त आहे हा
दिनेशदा मस्त आहे हा बाफ...
लखणी, दाउत, टाक, शीस पेन्सील, शाई...
फड्ताळ, शींकी, माळा............
लुगड, झगा, गन्जी......
माजग्र, परटीणबाई....
माझ्या माहेरी कुकरमधल्या
माझ्या माहेरी कुकरमधल्या भांड्याना लंगडी म्हणतात आणी ताकाच्या भांड्याना गोलाकार तांब्यासारख्या आकाराचे असेल तर गुंडी आणी उभ भांड असेल तर गंज म्हणतात.
सासरी ह्यातला गंज माहीती आहे बाकी लंगडी आणी गुंडी माहीत नाहियेत. ती लोक बटणांना (कपड्याला लावलेल्या) गुंडी म्हणतात.
हा चाळ शब्द आपण किती
हा चाळ शब्द आपण किती वेगवेगळ्या प्रकारे वापरतो
रहायची चाळ, पायातले चाळ, धान्य चाळ, पुस्तक चाळ.... >> ह्या वरून डोक्याला जिथे थोडे टक्कल पडुन गुळगुळीत होते त्याला पण असेच "चाळ्/चळ" म्हणतात ना.
अजुन अॅक शब्द आहे टुकटुकी शाईची रिकामी दउत किंवा तत्सम बाटली झाकणाला भोक पाडुन त्यात चिंधीची वात खोवली जायची त्यात रॉकेल भरुन ती गरीब लोक वापरत>> आम्ही त्याला टेंभा म्हणत असु.
अजुन काही शब्द.
वरवंटा - मोठा दंड्गोलाकार दगड, ठेसा, चटण्या वगैरे वाटाण्यासाठी उपयोगी.
बत्तासे - साखरेच्या पाकापासुन केलेला, चकत्या सारखा थोडा परसरट (कुकी सारखा) पांढरा पदार्थ. खेड्यात लाह्या-बत्तासे प्रसाद म्हणुन देतात.
पार - १. लोखंडी पार - खोदायला, कुटायला वगैरे वापरत. २. मोठ्या झाडा सभोवती बांधलेली जागा.
बारव - तळे/नद्याकाठी वा मंदिराजवळ महादेवाच्या पिंडीच्या आकारात दगडाने बांधलेली विहिर.
आड - लहान परिघ असलेली विहिर.
दिंड - किल्ल्यातील साठवलेल्या पाण्याला दिंड म्हणायचे. जसे गोडीदिंड, खारीदिंड.
गोडतेल- खाण्यायोग्य तेलास (विषेशतः शेंगदाणा तेलास) गोडतेल म्हणत.
भुसकट- शेंगाचे टरफल वा इतर धान्याच्या वाळवून बारीक कापलेला कचरा.
बारदाण - गोणपाट किंवा धान्य भरुन ठेवण्याचे पोते.
दाभण(दाबन?)- बारदाण शिवण्याची मोठी सुई.
चोंबाळं - धान्याच्या पोत्यांचे एक-आड-एक उभे-आडवे थर रचले जातात त्या पुर्ण रचणेला चोंबाळं असा शब्द ग्रामीण भागात प्रचिलित आहे.
उचल- इसार, 'अॅड्व्हान्स' अश्या अर्थाने.
औंदा - ह्यावर्षी. "औंदा लगीन करायचय पोरीचं"
चरवी- पाणी शेंदायच भांडं.
गोधडी, दुलई, घोंगडी. - मला गोधडी आणि दुलई यातील फरक माहित नाही.
इचलकरंजी बाजूला काही ठिकाणी
इचलकरंजी बाजूला काही ठिकाणी गोडतेलाला येशेल म्हणतात.
छान लेख! खरच खुपसे शब्द
छान लेख!
खरच खुपसे शब्द विस्मरणात गेले होते.
भावोजी या शब्दाची गंमत इथे सांगावीशी वाटते- आम्ही नणंदेच्या नव-याला भावोजी म्हणायचो तर माझा मुलगा त्यांना भावोजीकाका अशी हाक मारु लागला.
माझ्या बाबांना "कर्मधर्मसंयोगाने" म्हणायची सवय होती तसेच आईचा उल्लेख ते नेहेमी "मंडळी" असा करत.
"किनै" चा उल्लेख खूपच छान,"पाटपाणी" हा शब्दही माझ्या आवडीचा, कधीतरी येतोच तोंडात मग मुलांना हसू येतं, टेबलवर पाटपाणी कसे घ्यायचे? हा त्यांचा त्यावर प्रश्न येतो:)
सुंदर लेख, वाचताना मजा आली.
च्छ
"येशेल" इचलकरंजीच नव्हे तर
"येशेल"
इचलकरंजीच नव्हे तर अगदी कोल्हापूर शहरातील दुकानात स्त्रीयाच नव्हे तर पुरुषही मागणी करताना'येशेल पाव/अर्धा/एक किलो द्या' असेच म्हणतात. दुकानदार ती ऑर्डर 'गोडेतेल' अशीच स्वीकारतो. मात्र गोडेतेल = शेंगदाणा तेल असेच गृहीत धरले जाते. सरकी अथवा पामतेल वा तत्सम पाहिजे असल्यास मुद्दाम तसे दुकानदाराला सांगावे लागते.
गोड्यातेलाला 'येशेल' का नाव पडले त्याचीही एक रोचक [पण ऐकीव] कहाणी आहे, पण इथे ते अवांतर होईल.
चुंबळ कि चोंबळ हा पण एक शब्द
चुंबळ कि चोंबळ हा पण एक शब्द होता. डोक्यावर एकावर एक हंडे घेउन नदीवरचं पाणी आणायच्या बायका..त्यावेळी हंड्यांच्या खाली कपडा गोल गोल करुन चुंबळ ठेवलेली असायची.
ग्यासबत्ती माहीत असेलच सर्वांना. पुर्वी लग्नात रात्री वरात काढायचे. तेव्हा उजेडासाठी गॅसबत्ती/ पेट्रोमॅक्स डोक्यावर घेउन लोक चालायचे. तीची एक गंमतच असायची. स्टोव्हसारखे पंप मारुन गॅस भरावा लागायचा. आतला फुलाच्या आकाराचा भाग (?)पेटवायचे. जळुन गेल्यावर तो पार्ट की काय लहान मुलं खात असत असं आई सांगते.
लोणच्याच्या अशा बरणीला बांधलेल्या कपड्याला 'दादरा' म्हणायचे हे ही आईने सांगितले.
" title="Gas"> "आतला फुलाच्या
"आतला फुलाच्या आकाराचा भाग (?)पेटवायचे."
~ त्या फुलाला 'Mantle' असे म्हटले जाते. पण जळून गेल्यावर मुलांनी वा इतर कुणी खाताना पाहिलेले नाही. नवीन माहिती मिळाली.
मलाही आठवते 'गॅसबत्ती' वरात आणि त्याचे चटके खात भलेमोठे ओझे वाहून नेणारे ते मजूर. स्त्रीयाच असत प्रामुख्याने.
'दादरा' चा उल्लेख श्री.ना.पेंडसे यांच्या 'लव्हाळी' कादंबरीत आला आहे.
मी_आर्या, गॅसबत्तीमध्ये पंप
मी_आर्या, गॅसबत्तीमध्ये पंप मारून हवा भरत असत. त्याच्या दाबामुळे तेल मँटलपर्यंत चढत राही आणि आधीच पेटवलेल्या मँटलमधल्या तेलाच्या उष्णतेमुळे ते वायूरूपात जाऊन तो वायू पेट घेई व त्यामुळे झगझगीत प्रकाश पडे.
दादरा अजूनही बांधतात, ज्या बायका लोणचे घरी करतात त्या!
निवणं म्हणून अजून एक प्रकार असे. चुलीवरचं गरमगरम पातेलं अथवा मडकं थेट जमिनीवर ठेवत नसत. त्याखाली गवताची गोल गुंडाळी ठेवत. त्याला निवणं म्हणत.त्यामुळे एक तर गोल बुडाचं मडकं असलं तर ते न कलंडता स्थिर राहू शके आणि एकदम गरम भांडं जमिनीवर ठेवल्यामुळे शेणाची जमीन भाजून पोपडे येत, ते टळे.
माझ्या आठवणीतले काही
माझ्या आठवणीतले काही शब्द:
सुतना - नागपूर भागात पायजाम्याला म्हटल्या जाते.
कलदार - नाणं
मनिला - चंद्रपूरला टी-शर्ट ला म्हणतात
पोट्टा/ पोट्टी - नागपूरला लहान मुलाला/ मुलीला म्हटले जाते.
झांपर - लहान मुलीचा फ़्रॉक
सांडशी - नागपूरला चिमट्याला म्हणतात
मोगरी - कपडे बदडायची छोटी बॅट
ढोमणभर - भरपूर
माझ्या सासूबाईंच्या बोलण्यात काही मजेशीर पण चपखल बसणारे शब्द असतात -
कडबा कूटार - नाश्त्याला नुसतच चिवडा किव्वा तत्सम गोष्टी खाल्ल्या की त्या ' कडबा कूटार खाल्ला' अस म्हणतात.
धाडणे - पाठवणे
दगडं धोंडं - अमका-तमका किंव्वा अमुक तमुक
खालील शब्द वापरले तर आजकाल आक्शेप घेतला जातो:
चांभार - हा म्हटल्यावर आजकाल असे ऐकु येते "साहेब, मला मोची म्हणा"
बोहारीण - हा म्हटल्यावर आजकाल असे ऐकु येते "बोहारीण कोणाला म्हणते?"
मूढी बरणी ज्या बरणीची वरची
मूढी बरणी ज्या बरणीची वरची कॉलर तुट्ली आहे अशी
पटकूर अंथरायचा छोटा तुकडा, मुन्डासे डोक्याला बांधायचा छोटा फेटा
अशोक, येशेल बद्दल मला
अशोक, येशेल बद्दल मला उत्सुकता आहे. नक्की वाचायला आवडेल.
गॅसबत्ती मधला भाग खातात हे नवलच (तो कसला बनवलेला असतो ?) ती बत्ती फूटून माझ्या आजोबांना अपघात झाला होता, त्यामूळे आमच्या घरात ती वापरात नव्हती. पण कंदिलापेक्षा तिचा प्रकाश मात्र जास्त पडत असे. लग्नाच्या वरातीत वगैरे असे ती.
टिल्लू, नागपूरला नागपंचमीला करायच्या एका गोड पदार्थाला दिंड असे नाव आहे.
घुमा : मोगरीला आमच्याकडे धोका म्हणतात. मोगरी म्हणजे दगडाचे एक भांडे किंवा हत्यार पण का ? मोगरीने डोके ठेचून खून केल्याच्या बातम्या वाचल्या होत्या.
मालवणला, मुलीचा चेडू / चेडवा, आणि मूलाला झील म्हणत असत. (हे शब्द गाण्यातही आलेत, सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट / झील झील झील पोरी झीला तुज्या कप्पालिला टिळा )
एखादा गायक गाताना, सहगायकांनी दिलेल्या स्वरसाथीला पण झीलच म्हणतात ना ? जयराम शिलेदारांच्या तोंडी हा शब्द ऐकला होता.
इथे तर नवा शब्दकोषच तयार होतोय>
<<मी_आर्या, गॅसबत्तीमध्ये पंप
<<मी_आर्या, गॅसबत्तीमध्ये पंप मारून हवा भरत असत. त्याच्या दाबामुळे तेल मँटलपर्यंत चढत राही आणि आधीच पेटवलेल्या मँटलमधल्या तेलाच्या उष्णतेमुळे ते वायूरूपात जाऊन ...<<
आभार हिरा!
घुमा, सांडशी शब्द आम्ही अजुनही वापरतो.
<<मनिला - चंद्रपूरला टी-शर्ट ला म्हणतात<<
माझे बाबा पुर्वी याला मॅनेला म्हणत. मला वाटतं अॅपल कट शर्टला मॅनेला म्हणत असावेत.
आत्या तर बुसकोट म्हणायची ..बुशकोटला!
<<मलाही आठवते 'गॅसबत्ती' वरात आणि त्याचे चटके खात भलेमोठे ओझे वाहून नेणारे ते मजूर. स्त्रीयाच असत प्रामुख्याने.<< हो अशोक, मोस्टली बायकाच वाहुन न्यायच्या ते डोक्यावर.
"येशेल बद्दल मला उत्सुकता
"येशेल बद्दल मला उत्सुकता आहे"
~ ओके दिनेश -
माझ्याकडील माहिती ही ऐकीव आहे. कोल्हापुरात लहानपणी ज्या चाळीत राह्यचो तिथे श्री.नाना मेहेंदळे नावाचे शिक्षक होते [ज्यांची मूकपट युगातील प्रसिद्ध देमार हीरो मा.विठ्ठल यांच्याशी घनिष्ठ मैत्रीही होती] त्यांच्याकडून 'येशेल' चा उगम ऐकायला मिळाला. [संध्याकाळी त्यांच्या कट्ट्यावर बसून अशा 'उगमी' गमतीजमती ऐकायला जाम मजा यायची].
पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस हे शेंगदाणा तेल इकडील भागात लोकप्रिय झाले होते त्याला कारण गावाबाहेर नव्याने झालेल्या सैनिकांच्या वसाहती. तेथील भटारखान्यात वापरले जाणारे तेल हे 'पीनट' किंवा 'ग्राऊंडनट' तेलाचे असे. अर्थात गावातील लोकाना 'गोडेतेल' आणि 'शेंगदाणा' साठी या संज्ञा आहेत हे माहीत असायचे कारणच नव्हते. पण या तेलासाठी 'शेल' नावाच्या कंपनी ["बर्माशेल" चे भावंड] कडे सप्लाय कॉन्ट्रॅक्ट होते. त्या कंपनीने मग स्थानिक बाजारपेठेतही हळूहळू शिरकाव केला आणि त्यावेळेच्या प्रथेनुसार टांगाघोडा गाडीवर तेलासंदर्भात माहीतीपर जाहिराती देताना मुख्य कॅच लाईन होती ~ " ये शेल का तेल है |" कारण युद्धकाळात शेल कंपनीचे झालेले नाव. पुढे ग्राहकाला शेंगदाणा तेलाची महती पटू लागल्यावर दुकानात खाद्य तेलाचे जे काही एकदोन प्रकार विक्रीसाठी असायचे त्यापैकी शेंगदाणा मागताना ग्राहक 'येशेल चे तेल द्या' असे म्हणू लागले आणि कालौघात फक्त 'येशेल' च राहिले, आजही आहेच.
भारीच कथा 'येशेल'ची!!
भारीच कथा 'येशेल'ची!!
आई ग, किती छान वाटल हे सगळ
आई ग, किती छान वाटल हे सगळ वाचून. मी यातील खूप शब्द अजुनही वापरते. बरेच नवीन शब्द आणि त्यांचा उगम मजेदार आहे. मी असे काही जुने शब्द, वाक्प्रचार वापरले की मुंबई-पुण्याच्या मैत्रिणी हसतात मला, म्हणतात तुमच्या सोलापूरच गावंढळ मराठी बोलु नको.
पण मला त्यांची कीव येते - भाषेवरच प्रेम आणि या शब्दांचे सोउंदर्य (अजुन माबो वर नीट लिहिता येत नाही
) त्यांना नाही कळणार.
हलकेच घ्या.
आता कॄपया प्रांतवाद नको.
अजुन घासलेट शब्द नाही आला - म्हणजे केरोसिन.

टमरेल - नंबर २ ला जाताना पाणी नेण्याचे पत्र्याचे डबडे - कधी कधी डालडाचा डबा असे.
पंचपाळी - काही ठिकाणी पूजेचे पंचामृत ठेवण्यासाठी वापरत, तर काही वेळा तिखट्-मसाला वगैरे ठेवण्यासाठी मोठी पंचपाळी वापरत.
ताम्हण - अजुन हा शब्द वापरतात.
दिवाणखाना - main hall, living room of house
थोडा कानडी अंगाचा अजुन एक
थोडा कानडी अंगाचा अजुन एक शब्द सोलापुर भागात वापरत असत - धणकुत येणे - म्हणजे अंगात बारीक ताप आहे आणि अंग दुखत असेल तर - आजारपणापेक्षा दमणूक, थकवा याअर्थी वापरत.
कडकी - पैसे कमी असणे
दिनेश, मस्त बाफ आणि
दिनेश, मस्त बाफ आणि प्रतिसादही.
विषयांतर होईल, पण सहज आठवलं म्हणून..
>>२२ जून १८९७ या चित्रपटात सीताबाईला चाफेकळीला नहाण आलं, असे एक गाणे होते.
ही प्रथा त्या काळीच बंद झाली असावी असं मला वाटायचं. पण हल्लीच इथे एका तेलुगु कुटुंबात यानिमित्त, मित्रमंडळींना सहकुटुंब सहपरिवार आमंत्रण देऊन, समारंभ साजरा केलेला पाहिला. त्यांच्या भाषेत 'वोणी'. त्या मुलीच्या भाषेत 'साडी पार्टी', आजच्या काळात तिने कशी काय करू दिली/करवून घेतली कोण जाणे.
अशोक,
>>'उगमी' गमतीजमती ऐकायला जाम मजा यायची].
येशेल वाचायलाही जाम मजा आली. आणखी लिहा.
Pages