हरवलेले शब्द

Submitted by दिनेश. on 26 August, 2011 - 06:18

खुप वर्षांपुर्वी भारताबाहेर स्थायिक झालेल्या माझ्या एका बालमैत्रिणीचा गेल्या आठवड्यात फ़ोन
आला होता, आम्ही प्राथमिक शाळेत एकत्र जात होतो.
तिच्या बोलण्यात असे काहिसे शब्द आले, कि मला एकदम तिच्या आणि माझ्या आईचे बोलणे
आठवले. त्या दोघी बोलताना हे शब्द सर्रास वापरत असत. तिला मी हे सांगितल्यावर म्हणाली,
कि माझ्याशी बोलताना तिला पण तेच दिवस आठवले होते. आणि माझ्याशी मराठीत बोलताना
असे शब्द अगदी अजाणता तिच्या बोलण्यात आले.
आता माझ्या आईच्या बोलण्यातही हे शब्द येत नाहीत. पण ते शब्द, आणि त्यांचे खास उच्चार
माझ्या लख्ख लक्षात आहेत.
सहज आठवले म्हणून नोंदवतोय.

१) अय्या आणि इश्श्य.

हे शब्द इतके प्रचलित होते कि त्या काळी मुलींना या दोन शब्दांशिवाय आश्चर्य आणि लज्जा
व्यक्तच करता येत नसे. माझ्या शाळेतल्या मुलीदेखील हे शब्द खुपच वापरायच्या. अय्या म्हणतांना
किंवा तो म्हणून झाल्यावर तोंडावर रुमाल (तोही लेडीज हातरुमाल) ठेवल्याशिवाय तो उद्गार पूर्ण
होत नसे. इथे मी लज्जा हा शब्द वापरलाय, त्याला पण त्याकाळी खुपच मर्यादित अर्थ होता.
अय्या या शब्दाचा एक मस्त उच्चार लताने, शागिर्द मधल्या, दिलवील प्यारव्यार मै क्या जानू
रे, या गाण्यात केलाय.

२) बावळट्ट

मुलांना उद्देशून किंवा कुणाही मूर्ख व्यक्तीला (पण खास करुन पुरुषांनाच) उद्देशून हा शब्द वापरला
जात असे. बरं हा शब्द नुसताच नव्हे तर त्याचा उच्चार साधारण बावळट्ट्चै असा असायचा.
या शब्दाला मुर्ख एवढाच अर्थ होता असे नाही, पण मुलांनी काहिही केलं, तरी हा शब्द वापरला
जायचा. आणि काय असेल ते असो, मुलींनी बावळट म्हंटलेलं मुलांना पण आवडत नसे.

३) गडे

हा शब्द मैत्रिण किंवा मित्र (त्या काळात मित्राशी बोलायची फ़ारशी प्रथा नव्हती म्हणा) दोघांनाही
उद्देशून असे. हा शब्द उच्चारायचे प्रसंगही खास असत. म्हणजे एखादी उसनी घेतलेली, वस्तू किंवा
सुटे पैसे परत करायला गेल्यावर हा शब्द हमखास उच्चारला जात असे. असं नाही गडे, त्याचं
काय एवढं.. वगैरे. यायचं ना गडे असे जे त्याचे आताचे चावट रुपांतर आहे, तसे ते बोलण्यात नसायचे.
नका गडे माझ्याकडे पुन्हा पुन्हा पाहु, डोळे हे जुल्मी गडे.. हि गाणी त्याच काळातली.

४) किनै

कि नाही, या शब्दांचा हा गोड उच्चार त्याकाळी खुपच वापरात असे. लहान मुली मोठ्यांकडे काही
मागायचं असेल (मागून मागून काय ते, भातुकलीसाठी गूळ, शेंगदाणे वगैरे) तर सुरवात अशी
व्हायची, किनै आई आम्ही दुपारी भातुकली करणार आहोत..
किंवा मला किनै हे नै आवडत.

५) नै

मराठीत मधे ह असणारे शब्द फ़ारच कमी आहेत (नेहमी, साहजिकच ..) ह हा वर्ण कुठल्याच गटात
(ओष्ठ्य, दंत्य, तालव्य ) न येता स्वतंत्र येतो त्यामूळे त्याचा इतर अनेक अक्षरांशी संयोग होऊ
शकतो (क-ख, ग-घ, त-थ..) म्हणून बहुदा ह मधे असलेले शब्द उच्चारताना आपली किंचीत धांदल उडते.
नाही या शब्दाचा उच्चार, इतका स्पष्ट लहान मूलेच करतात. आपण सहसा नाय असाच उच्चार करतो.

६) बै

आता मायबोलीवर हा शब्द परत दिसायला लागला आहे. त्या काळात आम्ही आमच्या शिक्षिकेंना
बाई असेच म्हणत असू. त्या काळातल्या गाण्यातही ( बाई बाई मनमोराचा कसा पिसारा, काय बाई
सांगू ) हा शब्द असे. एकंदरीत या शब्दाला आदराचे वलय होते (जिजाबाई, लक्ष्मीबाई)
मग का कुणास ठाऊक, बहुतेक हिंदीच्या (आठवा तिसरी कसम मधली हिराबाई) प्रभावाने असेल,
या शब्दाचा स्तर खुपच खाली गेला. हिंदी चॅनेल्सवर या शब्दाचा अर्थ कामवाली बाई असाच धरला
जाऊ लागला.
सरकारी कार्यालयात तर मॅडम बाई, असा एक विचित्र शब्दप्रयोग कानावर पडतो. हा शब्दप्रयोग आशा
खाडिलकरने गायलेल्या एका धमाल गाण्यात आलाय.
नोकरी कसली ही, हि तर डोक्यावर टांगती तलवार
आता तूम्हीच सांगा, आहेत कि नाही, इथली कार्टी
एकापेक्षा एक तालेवार.... असा मुखडा होता.
या बाई शब्दाबाबत माझी एक मजेदार आठवण आहे. माझा पुतण्या लहान असताना छायागीत बघून,
हि माधुरी का ? हि ममता का ? असे विचारायचा. वहिनीला ते आवडायचे नाही, ती म्हणायची, त्या
काय तूझ्याएवढ्या आहेत का, नावाने हाका मारायला. मग त्याने त्यांना दिक्षितबाई, कुलकर्णीबाई असे
म्हणायला सुरवात केली.
वरचे दोन्ही शब्द मिळून नैबै असा शब्द पण कॉमन होता. पण त्या मानाने तै (ताई) असा उच्चार तितका
प्रचलित नव्हता. वार्‍यावरची वरात मधल्या कडवेकर मामी पण, मालुताई अशीच हाक मारायच्या.

७) वन्सं

मोठ्या नणंदेला उद्देशून हा शब्द वापरला जाई. मला वाटतं लहान नणंदेला पण वन्संच म्हणत असत.
सासू खालोखाल छळणारी म्हणून हि ख्यातनाम होती. शास्त्रीय चीजांमधे पण बहुदा हि जानी दुष्मनच असे.

( अब मै तो ईख खाये मरुंगी, ननदीया मारे बोल...पारंपारिक ठुमरी - श्रुती साडोलीकर
किंवा
बैरन ननदीया, लागे डराने - छोटा खयाल - राग बिभास. पंडीता मालिनी राजूरकर)

मला वाटतं कोल्हापूर किंवा बडोद्याला मराठ्यांच्या मधे मोठ्या नणंदेला दिवानसाब असा पण शब्द वापरात
होता. सौभद्र नाटकातही, रुक्मिणी, सुभद्रेला उद्देशून वन्स हाच शब्द वापरते.
आता बहुदा हे नाते मित्रत्वाचे झाल्याने, हा शब्द मागे पडला.

८) मामंजी

सासरेबुवांना उद्देशून हा शब्द वापरला जात असे. याचा मामा या शब्दाशी संबंध नसावा. कारण मामेभावाशी
लग्न करण्याची प्रथा कधीच नव्हती. आत्येबहीणीशी करत असत म्हणून, जावई सासूला, आत्याबाई असे
पण म्हणत असे.
आता सासुला आई (किंवा मम्मी) आणि सासरेबुवांना बाबा, पप्पा असेच काहीतरी म्हणतात. मामंजी हा
शब्द ताईबाई आता होणार लगीन तूमचं या गाण्यात पण आलाय. (मामंजीना जमाखर्च द्या ..) त्यामानाने
भावोजी हा शब्द अजून वापरात आहे.

९) पाटपाणी

संध्याकाळचे जेवण तयार झाले कि मुलांनी पाटपाणी घ्यायची प्रथा होती. अगदी ताटाखाली आणि टेकायला पाट नसला तरी बसण्यासाठी एक पाट असायचाच. आता जमिनीवर बसण्यासाठी आपण सतरंजी वगैरे अंथरतो, पण त्या काळात अगदी आमच्याकडेही पाटावर बसायची प्रथा होती.
पाणी घ्यायचे म्हणजे माठातील गार पाणी तांब्यात काढून घ्यायचे. पेल्याला फुलपात्र किंवा भांडे असा शब्द
खास करुन, ब्राम्हणांच्या घरी वापरात होता.

१०) झाकपाक

रात्रीचे जेवण झाले कि झाकपाक करणे हे बायकांचे अत्यावश्यक काम असायचे. फ़्रिज नसल्याने उरलेली
भाजी आमटी, दुसर्‍या भांड्यात काढून ती व्यवस्थित झाकून ठेवावी लागे. तापवलेले दूध थंड करुन त्यावर
जाळीचे झाकण ठेवणे, विरजण लावणे हे पण करावे लागे. दूधदुभत्यासाठी जाळीचे कपाट असे.
रात्री कुठे बाहेर जायचे असेल, किंवा अगदी अंगणात गप्पा मारत बसायचे असेल. (बरोबर बिनाका गीतमाला
किंवा पुन्हा प्रपंच ऐकायचे असेल) तर आईला हे सगळे आटपूनच यावे लागे.

११) दिवेलागण

वीजेचे दिवे नव्हते त्यावेळी नगरपालिकेतर्फ़े लांब बांबूच्या सहाय्याने रस्त्यावरचे दिवे लावणारा एक माणुस
सायकलवरुन यायचा. वीजेचे दिवे आले तरी, त्याचे बटण त्या खांबावरच असायचे आणि ते लावायला
माणूस येतच असे.
हा काळ मी मुंबईत बघितला नाही, पण गावाला कंदिलाच्या काचा साफ़ करणे, बाकिच्या दिव्यातील वाती
साफ़ करणे हा रोजचा उद्योग असायचा.
या दिवेलागणीला अनेक संदर्भ होते. या वेळेच्या आत मुलांनी खेळ आटपून घरात यावे, हातपाय धुवून
शुभंकरोति म्हणावे आणि अभ्यासाला लागावे, अशी शिस्त होती.
सांजवात करणे, तुळशीसमोर दिवा लावणे हेही होतेच. दिवेलागण हा स्बद मागे पडला तरी तिन्हीसांजा
मात्र अजून वापरात आहे.

१२) केरवारा

केराचा आणि वार्‍याचा काय संबंध होता ते माहित नाही. पण केर कधी काढायचा याचे मात्र आडाखे
होते. केर शक्यतो सकाळी किंवा दुपारी काढला जायचा. पण तो संध्याकाळचा कधीच काढला जात नसे.
संध्याकाळची वेळ, हि लक्ष्मीची वेळ मानली जात असे.

तसेच एखादा माणूस घराबाहेर पडल्यावर लगेचच केर काढणे अशुभ मानले जात असे. कारण घरातील
व्यक्ती मृत झाली तरच असे करत असत. सखाराम बाइंडर या नाटकात पण लक्ष्मी घराबाहेर पडायच्या
आधी केर काढूनच जाते. आता या शब्दा ऐवजी झाडू मारा, किंवा झाडूपोछा हाच शब्द रुढ झालाय.
त्या मानाने धुणंभांडी हा शब्द अजून वापरात आहे.

१३ ) मोलकरीण

मोलकरीण हा शब्द सर्रास वापरात होता. सुलोचना, रमेश देव, सीमा देव यांच्या या नावाचा चित्रपट
पण होता. बायका नोकरी करायचे प्रमाण कमी असल्याने, मोलकरीण आणि घरतील बाई यांचा संवाद असायचा.
आता का कुणास ठाऊक पण या शब्दाला थोडी गौण छटा आलीय. त्याजागी कामवाली बाई किंवा
(नुसतीच) बाई असा शब्द जास्त प्रचलित आहे.

१४ ) शेकशेगडी

लहान बाळाला अंघोळ वगैरे घालून झाली, कि शेक दिला जात असे. त्यासाठी पाळण्याखाली किंवा
बाजेखाली शेगडीत निखारे ठेवून त्यावर धूप टाकला जात असे. कधी कधी बाळाच्या जावळाला पण
याचा शेक देत असत.
त्या काळी बाळंतीणीची खोली म्हणून एक अंधारी खोली राखीव असे आणि त्या खोलीत शिरल्याबरोबर
असा वास येत असे. हा प्रकार अगदी शहरातही केला जात असे.

१५ ) बिर्‍हाड बाजलं

बिर्‍हाड या शब्दाचा नेमका अर्थ सांगणे कठीण आहे. पण साधारण मुक्कामाचे ठिकाण असे म्हणता येईल.
नाटक कंपनीचा मुक्काम जिथे असे त्या जागेला बिर्‍हाड म्हणत असत. पुर्वी कोकणातून एकटाच माणूस
आधी नोकरीला येत असे. (चाकरमानी) त्याचा जम बसला, एखादी जागा भाड्याने घेतली कि तो गावाहून
बायकामूलांना बोलावून घेत असे. त्यालाही बिर्‍हाड केले वा बिर्‍हाड आणले, असा शब्द वापरात होता.
बाजलं म्हणजे अर्थातच लाकडाची सुतळीने विणलेली खाट.
या नावाचे एक नाटकही होते, त्या नाटकातले माझ्याच पावलांची असे एक सुंदर नाट्यगीत, आरती नायकच्या आवाजात यू ट्यूबवर उपलब्ध आहे.

१६ ) पागडी

घर भाड्याने घेताना किंवा विकत घेताना पागडी म्हणून काही रक्कम द्यायची प्रथा होती. साधारण डीपॉझिट
असा याचा अर्थ होता.

१७ ) नहाण

त्याकाळात शॉवर्स नव्हते आणि मुलींचे केसही लांब असायचे. त्यामूळे केसांवरुन अंघोळ हा एक सोहळा
असायचा. शिकेकाई, रिठा असा सगळा सरंजाम करावा लागायचा. आई किंवा मोठी बहीण अंधोळ घालायची
आणि मग केस खसाखसा पुसून बारीक दाताच्या फ़णीने विंचरणे हा पण एक उद्योग असायचा.

मुलगी वयात येणे यासाठी पण नहाण येणे (किंवा पदर येणे) असा शब्द होता. २२ जून १८९७ या चित्रपटात सीताबाईला चाफेकळीला नहाण आलं, असे एक गाणे होते.

१८) चूल

शहरात साधारण ५० वर्षांपूर्वीच शिजवण्यासाठी गॅसचा वापर सुरु झाला. पाईपनेदेखील गॅस पुरवला जात असे.
बॉम्बे गॅस असे त्या कंपनीचे नाव होते. त्यांचा एक लोखंडी स्तंभ किंग्ज सर्कलच्या ऑपेरा हाऊसजवळ,
आताआतापर्यंत होता. अगदी गॅस नसला तरी स्टोव्ह वापरात होते. पण बायकांच्या बोलण्यात चूल हाच शब्द होता. अगदी रुचिरातही अनेकवेळा हा शब्द आलाय. घरोघरी मातीच्या चुली, चूल आणि मूल, चूलीपुढचे शहाणपण असे शब्दप्रयोग अनुषंगाने येतच.

१९) नांदणे

आपण नांदा सौख्यभरे असा आशिर्वाद जरी अजून देत असलो तरी, नांदणे हे क्रियापद मात्र फारसे वापरत
नाही. एखादी बाई सारखी माहेरी जात असली, तर ती नीट नांदत नाही असे म्हंटले जात असे. आणि
बर्‍याच नवरेमंडळींची बायको नीट नांदत नाही, हि समस्या असे.
त्याकालच्या लावण्यांमधे पण हा शब्द असे. नांदायला मला बाई जायाचं नांदायला अशी रोशन सातारकरची
लावणी होती, येऊ कशी तशी मी नांदायला पण तिचीच होती. कशी नांदायला येऊ मी बाई, अशी पुष्पा
पागधरेची लावणी होती.

२०) बोडकं / डोंबलं

हि अगदी अभिमानाची गोष्ट आहे, कि केशवपनाची दूष्ट रुढी आपण त्यागलीय. अर्थात त्यामागे आपल्या
समाजसुधारकांचे प्रयत्न होतेच. पण पुर्वी अगदी शहरातही लाल आलवण नेसलेल्या विधवा दिसत.
त्यांचा बोडक्या बाया, असा अत्यंत अपमानास्पद उल्लेख केला जात असे. त्यांचे केस नसलेले डोके
हा पण चेष्टेचाच विषय असे. त्यापैकी अनेक जणी असे उल्लेख हसण्यावारी नेत. (दुसरा उपायच नसे.)
घाल माझ्या बोडक्यावर, डोंबलं माझं, कुणाला कश्याच तर बोडकीला केसाचं असे शब्दप्रयोग सर्रास होत
असत.

२१ ) बोळकं

या शब्दाला दोन अर्थ होते. दात नसलेले तोंड, मग ते तान्ह्या बाळाचे असो कि वृद्ध माणसाचे, त्याचा
उल्लेख बोळकं म्हणूनच करत असत. हसण्याला, पसरलं बोळकं असा शब्द प्रयोग करत.
एका प्रकारच्या भांड्याला पण बोळकं असा शब्द होता. (मला खात्री नाही) पण शालू हिरवा या
गाण्यात
चूल बोळकी इवली इवली, भातुकलीचा खेळ गं, अशी ओळ आहे.

२२) संसार

मराठीत आणि हिंदीत काही शब्दांचे (चेष्टा, यातायात ) अगदी वेगवेगळे अर्थ आहेत त्यपैकी हा
एक. संसार म्हणजे नेमके काय हेही सांगणे कठीण आहे. कारण घरातील नीट लावलेल्या वस्तू,
भांडीकुंडी यांना पण हा शब्द वापरत आणि नवर्‍याबरोबरच्या सहजीवनालाही. संसार नीट कर
असा सल्ला पोक्त बायका नववधूला देत असत. माझा घर माझा संसार असे एक नाटक होते.
(म्हणजे घर आणि संसार वेगळे होते ना.)

मज काय ऊणे या संसारी वगैरे गाणी आहेतच पण एका पटक्यात पण असाच सल्ला दिलाय

बिकट वाट वहीवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको
संसारी तू ऐस आपुल्या, उगाच भटकत फिरु नको.

२३) पदर

पदर हा शब्द साडीसाठी वापरला जात असेच. पण आणखी एका संदर्भात हा शब्द वापरात होता.
सोयरीक जमवताना, नातेवाईकांची चौकशी करताना, तूमचा पदर कुठे कुठे लागतो, असे विचारले
जात असे.
पदर येणे, पदर घेणे, पदर संभाळणे याला साडीच्या संदर्भात असले तरी वेगवेगळे अर्थ होते.
डोईचा पदर आला खांद्यावरी, जनी म्हणे मी वेसवा झाले.. असा संत जनाबाईचा अभंग आहे.
मराठ्यांमधे डोक्यावर पदर घेणे आवश्यक होते तर ब्राम्हणात दोन्ही खांद्यावर. याला अनेक
संदर्भ आहेत. मराठा स्त्रिया उन्हातान्हात राबणा-या त्यामूळे डोक्यावर पदर घेणे आवश्यक होते.
राजस्थानचा संदर्भ असल्याने थोडाफ़ार घुंघटाशी सबंध होता तर ब्राम्हण स्त्रियांच्या केसांचा खोपा
आणि त्यावरचे दागिने दिसण्यासाठी पदर अनावश्यक होता. तसेच त्या समाजात विकेशा स्त्रिया
डोक्यावरुन पदर घेत असत. (यासंदर्भात जास्त माहिती प्रतिक्रियांमधून मिळेलच.)

२४) झक

झक मारली आणि तूझ्याशी लग्न केले, असा शब्द्प्रयोग त्या काळातल्या संसारीक भांडणात येत असे. झक या शब्दाचा नेमका अर्थ मला कळला नाही कधी.
आता आपण त्यासाठी पागल कुत्तेने काटा है, असे शब्द वापरतो नाही का ?

२५ ) रंजीस

हा शब्दही कमी ऐकायला येतो हल्ली. चेहरा उतरलेला असणे अशा अर्थी हा शब्द वापरात
होता. रुणा लैलाच्या, रंजीशही सही या गझलेशी त्याचा सबंध नव्हता.

भाषा प्रवाही असते. जूने शब्द विस्मरणात जाणार आणि नवे प्रचारात येणार, हा नियमच आहे.

झणिं, झडकरी, एकसमयावच्छेदेकरुन, सत्वर, वृथा, मूढ असे शब्द तर त्याआधीच वापरातून
मागे पडले होते.

मला आठवले तसे अनेक शब्द तूम्हालाही आठवतील आणि ते प्रतिसादातही येतीलच.
पण हे शब्द म्हणजे तरुणाईची भाषा नव्हती आणि यापैकी बहुतेक एखाद्या वस्तूशी संबंधित नव्हते, पण या शब्दांशी माझ्या शाळकरी वयातल्या आठवणी निगडीत आहेत हे नक्की.

गुलमोहर: 

इब्लिस माझ्या आजोळी अजून चूल वापरतात भाकरीसाठी (गॅस आहे तरी), वैलावर साधारण भात वगैरे ठेवलेला असतो. कोकणात वायला हा शब्द, वेगळा या अर्थी वापरायचे.

हिरा, डोणी म्हणजे जनावरांसाठी पाणी काढून ठेवतात ती जागा ना ? बहुतेक दगडाची असायची ती.

प्रशांत, ते पुस्तक आहे माझ्याकडे.

रेव्यू, खरंच हे शब्द म्हणजे नुसते शब्द नाहित, तर तो काळ आणि ती माणसं पण.

चुल बोळकी इवली इवली, भातुकलीचा खेळ ग
>>>
इथे बोळकी म्हणजे धान्य भरुन ठेवायला पुर्वी जी गाडकी मडकी वापरली जायची त्या संदर्भाने घेतलाय. साधारणतः चुलीजवळ अशी गाडगी रचुन ठेवलेली असायची. तेव्हा डबे, कोठ्या असले प्रकार नव्हते.

दिनेशदा Happy खुप जुन्या आठवणी निगडीत आहेत या शब्दांशी, आजोळ, आज्जी आजोबा, मामा-मामी आणि भावंड.

lekh aavadala. chulila chulatsasu mhanale jayache te mi aikle aahe. tyamagache karan sangata yeil ka?

होय दिनेशदा
विटीदांडूत जो जमिनीवर छोटासा खड्डा करायचे त्याला "भक्का"म्हणयचो आम्ही.

"शिदोरी","शिधा","वार लावून्","माधुकरी",हे आठवले की अनुक्रमे ,शेतावर जाणे,सोवळ्या बाईना डाळ /तांदूळ काढून देणे,घरी श्रीनिवास नावाचा गुरुवारी येणारा विद्यार्थी,अन सकाळी जेवण नेणारा (अन पुढे कादंबरीत मामलेदार होणारा) असा मुलगा अशी ही ओळख पटते.

'माधुकरी', 'वार लावून जेवणे', पाण्यासाठी कावड, कोट-पाटलोण (पँटलूनचा अपभ्रंश),किरिस्ताव वगैरे शब्द आजीच्या बोलण्यात असायचे.
नंतर 'त्रस्तसंमंध', 'आग्यावेताळ', 'पिंपळावरचा मुंजां', 'तिरशिंगराव', 'आखाडसासू', 'नंदीबैल', 'भोळासांब', 'अगोचर', 'पापभिरू', 'पाप्याचं पितर', 'नटमोगरी', बकासूर, कुंभकर्ण, श्रावणबाळ, हरिश्चंद्राचा/ कर्णाचा अवतार अशा विशेषणांनी माणसांच्या स्वभावाची / सवयींची वर्णनं तिच्या तोंडी असायची.

छान लिहिलंय. मोलकरीण असते की अजून. आता त्यांची संघटना पण झालीय.
अय्याच्या जागी आजकाल आयला म्हणतात (का?)
'अरे देवा' अजून जिवंत आहे का? काल एका छापून आलेल्या लेखात जिथे `अरे देवा' अपेक्षित होतं तिथे 'ओह xx' वाचायलं मिळालं . पुन्हा तो लेख सणासुदीच्या पदार्थांशी संबंधित होता.
पदर या शब्दाला आणखी एका अर्थाचा पदर आहे.
''हृदयाचा सुंदरसा गोफ गुंफिती
पदर पदर परि शेवटी सुटत सुटत जाई"

अकु... निथळागौर आठवतोय का ?
अजागळ मुलीला या शब्दाचा सामना करावाच लागे.

मला बोडण या विधीचा अर्थ कळला नाही. बालगंधर्वांच्या संदर्भात हा शब्द वाचला होता.

@ दिनेशदा
ते बोडण भरणे असला काही प्रकार आहे ना तो?

वैल = 'इन्डयरेक्ट' हीट येणारा भाग. वैलाला भाकरी ही उभी करतात, 'मांडा' सुटण्या साठी. तशी चव गॅसवर येणे शक्य नाही. (तिखटाच्या गोंधळाचं मटण अन चुलीवरची भाकरी... ambrosia..)

विटीदांडूत जो जमिनीवर छोटासा खड्डा करायचे त्याला "भक्का"म्हणयचो आम्ही. >> गल असाही एक शब्द आहे त्याला.

दिनेशदा, निथळागौर हा शब्दच पहिल्यांदा ऐकत/ वाचत आहे. अर्थ तुम्ही म्हणताय त्यावरून अजागळ मुलीला दिले गेलेले विशेषण असा वाटतोय. त्याचा इतर काही संदर्भ आहे का?

बोडणाविषयी आंतरजालावरची माहिती : अपत्यजन्म, पुत्राचा व्रतबंध व पुत्राचा विवाह या तीन प्रसंगी कोकणस्थ समाजात (चित्पावनांकडे) बोडण भरतात. नववधू गौरीहराच्या पूजनाचे वेळी पूजलेली देवी पतिगृहीं आपल्याबरोबर नेते. ही देवी नववधूवर येणारी संकटें निवारून तिचा संसार वाढीस लावते. मुलीची वंशवृद्धि झाली म्हणजे तें वृत्त बोधन ऊर्फ बोडण भरून देवीस कळविलें जातें. तीन लेकुरवाळ्या सुवासिनी, एक कुमारिका व एक घरची म्हणजे जिचें बोडण असेल ती बाई अशा पांचजणी बोडण कालविण्यास लागतात.

अशी एखादी गौर नक्कीच नसणार ! पण हा शब्द नक्कीच वापरात होता.
कजाग बाईला म्हाळसा (खंडोबाची बायको) असे पण म्हणत.
खंडोबाला मिळंना बायको आणि म्हाळसाईला मिळंना नवरा.. अशी एक म्हण आहे.

या शब्दांना अर्थातच गावांचाही संदर्भ असतोच. विदर्भातला बडग्या आणि मारबत्ती, पुण्यामुंबईकडे अजिबात ऐकायला मिळत नाही.

गिरिराजने, कानबाई अशी एक देवी खानदेशात पूजतात असा संदर्भ सांगितला होता. या शब्दाचा उच्चार असा काही करत कि, मुसलमान राज्यकर्त्यांना तो खानभाई असा ऐकायला येई.

नाट्यगीतातल्या पण काही शब्दांचा अर्थ लागत नाही.

गरीमी कोठे बसती, तरी तव मूर्ती दिसती
(नच सुंदरी करू कोपा )

पण हे शब्द कधीकाळी वापरात असतील याची शक्यता कमी आहे कारण बहुतेक नाट्यगीते हि लोकप्रिय चीजांवर मराठी शब्दांचे खिळे ठोकून बसवली होती.

हे ललित वाचताना मला माझी आज्जीच्या तोंडचे काही टिपीकल शब्द आठवले...
ती जिन्याला दादर म्हणायची... प्लॅस्टीकच्या कागदाला मेणकागद आणि अमृतांजन/टायगर बामला मँथाल म्हणायची.

अगदी अगदी लहान केलं या लेखानं. फारच सुरेख लिहिला आहे.

तो रस्त्यावर दिवे लावणारा माणूस सोलापूरला. घरचे कन्दील साफ करणं हा आवडीचा कार्यक्रम असायचा. चुलीला पोतेरं घालणं, शेणसडा, सारवण खूप जवळचं!

शिराळशेट आठवतोय कुणाला? नागपंचमीच्या आसपास असायचा.

विदर्भात पोळ्याच्या दिवशी बडग्या आणि मारबत यांची मोठी मिरवणूक निघते. इडापिडा टळावी, सगळं दु:ख दारिद्र्य, दैन्य जावं म्हणून ही प्रथा असते. बडग्या आणि मारबत ही प्रतिकं बनवून मिरवणुकीच्या शेवटी जाळली जातात रावणदहनासारखे. बडगे सद्य परिस्थितीवर, विषयांवर आधारित असतात. जसं कसाब, अफजल गुरू, यावर्षी कदाचित लोकपालशी संबंधित काही असेल. काळी आणि पिवळी मारबत अशा दोन वेगळ्या मिरवणुका निघतात. जे नको असेल त्याचं नाव घेऊन "......... घेऊन जा गे मारबत......." अशा आरोळ्या देत ही मिरवणूक पुढे जाते. [.............च्या बैलाला हो.............. सारख]

आणखी एक शब्द - मोरी
मी कधी ऐकला नाही, भारतात सुद्धा.
काही काही शब्द हे नागपुरी भाषेत, कोल्हापुरी भाषेत असे विशिष्ठ भागातच प्रचलित होते. आता ते नसतील वापरात.
काही वर्षांनी आपण होल मराठी लँग्वेजबद्दल सिमिलर कॉमेंट्स करू! "तुम्हाला माहित आहे, मॉमला 'आई' म्हणायचे!" " वॉव, हाऊ विअर्ड!"

नववधू गौरीहराच्या पूजनाचे वेळी पूजलेली देवी पतिगृहीं आपल्याबरोबर नेते. >> अन्नपूर्णा असते ती.

गिरिराजने, कानबाई अशी एक देवी खानदेशात पूजतात असा संदर्भ सांगितला होता. या शब्दाचा उच्चार असा काही करत कि, मुसलमान राज्यकर्त्यांना तो खानभाई असा ऐकायला येई.>>
कान्ह देश तो अपभ्रंशाने खान देश अशी एक व्युत्पत्ती सांगतात. (ग्याझेटात सेउणदास यादवाचा प्रदेश सेउण्देस असे आहे. नंतर गुजरातेचा सुलतान पहिला अहमद याने हा भाग फारूकी घराण्यास दिला, त्यांची पदवी "खान" तो खानदेश.)ती कान्हूबाई, ती कानबाई. श्रावणातल्या पहिल्या/दुसर्‍या रविवारी ही बसते. अन सोमवारी दहीभाताचा नैवेद्य घेउन उठते. सवडीने डीटेल्स देइन परत. इतिहास सदरात द्यायला लगेल बहुतेक Lol

नाट्यगीतातल्या पण काही शब्दांचा अर्थ लागत नाही.>> गरिमी >> गरिमा म्हणजे (चेहर्‍यावरचे) तेज असा काहिसा अर्थ आहे. त्याला सप्तमी चा प्रत्यय 'ई' लागून गरिमी झालंय?

@झक्की : आणखी एक शब्द - मोरी >>
१. मोरी म्हणजे छोट्या घरात कमरे इतक्या भिंतीचा आडोसा करून बांधलेली बहुधा आंघोळीसाठी वापरायची जागा. २. धरणांचे 'सांडवे' असतात, तसं छोट्या बंधार्‍याच्या सांडव्यास देखिल 'मोरी' म्हणतात. ३. मोरी गाय असा एक प्रयोग वाचल्याचे आठवते. तेंव्हा ती एक (बहुधा) तपकिरी रंगाची छटा असावी..

क्रांति अगदी काही वर्षांपूर्वी मला बडग्या मारबती बद्दल काहिच माहित नव्हतं.

आणखी एकदोन खास शहारातील भेद दाखवणारे शब्द, मुंबईत अनेक मंडया आहेत
पण मंडई हा शब्द मुंबईत कधीच वापरात नव्हता. तो खास पुण्याचाच शब्द. मुंबईत
बाजार, मार्केट हेच शब्द वापरले जातात.

वाडा संस्कृति मुंबईत नव्हती असे नाही पण चाळ किंवा बिल्डिंग असाच शब्द
वापरला जात असे. वाडा हा शब्द मुंबईत क्वचितच वापरला जातो.
तसेच बोळ पण नाहीच, गल्ली किंवा लेन.

दुसरा शब्द म्हणजे चौक. मुंबईत अनेक चौक आहेत. बसवरही तशीच पाटी असते.
पण कुणीच चौक म्हणत नाहित. बस कंडक्टरकडे अमकातमका चौक म्हणुन तिकीट
मागितले तर त्याला कदाचित कळणारही नाही.

तसेच पत्ता सांगताना पुण्यात खाली जा, चौकातून उजव्या हाताला वळा मग जरा
वर जा, असे शब्द वापरले जातात. मुंबईत खाली म्हणजे रिकामे आणि वर म्हणजे
स्वर्गात. त्यामूळे पत्ता सांगताना खाली वर हे शब्दच वापरले जात नाहीत.

मोरी शब्द आमच्याकडे पण वापरात होता. मुंबईत एका माश्याला मोरी म्हणतात.
माहिमला एक मोरी नावाचा भागच आहे.

इब्लिस, मजा येतेय वाचायला.

दिनेशदा,

खरंच खूप स्मृतिविभोर व्हायला झालं लेख आणि टिप्पण्या वाचून! मला तुंदिलतनू आणि तुकतुकीत हे शब्द आठवतात.

गणराज रंगी नाचतो... या गीतात 'तुंदिलतनु तरी चपळ साजिरी...' अशी ओळ आहे. मात्र 'मांजर बघ किती तुकतुकीत दिसतंय' या वर्णनाखेरीज तुकतुकीत कुठेच सापडला नाही मला.

कासराभर हा अजून एक शब्द. पूर्वी म्हणायचे की 'सूर्य कासराभर वर आला...'. बहुधा बैलगाडीच्या बैलांचे कासरे (लगाम) उडवतांना गाडीवानाच्या डोळ्याच्याही वरपर्यंत जात. ते जेव्हढे वरपावेतो दिसंत तेव्हढा सूर्य वर आला म्हणजे 'तो कासराभर वर आला' असा काहीसा अर्थ निघू शकतो.

शहरांत 'झुंजूमुंजू' होतंच नाही. कारण रात्रभर पथदीप चालू असतात! 'तांबडं फुटलं' तरी दिसणार कसं! Sad

कुमकेची रीइन्फोर्समेंट (किंवा सपोर्ट) झाली आणि चमूची झालीये टीम.

असो.

भाषेत अनुभवांचं प्रतिबिंब पडतं. अनुभवविश्व जसजसं बदलंत जातं तसतशी भाषा बदलंत जाते.

आपला नम्र,
-गा.पै.

पूर्वी श्रीमंत लोक 'नाटकशाळा' बाळगायचे. स्वामी मध्ये राघोबादादांच्या नाटकशाळांचा उल्लेख आहे. तो कसा पडदाशीन शब्द आहे. आता डायरेक, मोकळेढाकळे आणि घसघशीत असे डझनाच्या हिशेबातले विबासं असतात, नाही? Proud

गणराज रंगी नाचतो... या गीतात 'तुंदिलतनु तरी चपळ साजिरी...' अशी ओळ आहे

ही ओळ 'तुंदिल तनु तरि चपल साजिरी' अशी आहे.(तोच चंद्रमा मधून खात्री करून घेतलीय). काल याच ओळीची शोधाशोध चालेलेली पाहिली.

दिनेशदा,
मस्त आठवणी !
नविन शब्द,माहिती मिळाली.
यातले किनै,झक,वन्सं यासारखे शब्द अजुनही गावाकडे सरास वापरले जातात.
Happy

मामी, अंगवस्त्र असा पण शब्द होता. कोल्हापूरकडे तर सवत असा थेटच शब्द वापरत.
हा शब्द बहुतेक राज्यभर वापरात होता.
विदर्भातील एका गाण्यात असा उल्लेख आहे.

मी अन माया दोन सवती, कुना एकीले नाही संतती
लोटांगण घायतो तुया पायावयती,

पैलवान, महाराष्ट्राची शान असलेल्या राज्य परिवहन मंडळाचे (म्हणजे यष्टी हो) काही खास
शब्द आहेत.

शिटा, प्यॅशिंजरं, स्टापचा माणूस, रातराणी, वस्तीची गाडी, मेधा हायवे, मोड (सुटे पैसे)

पूर्वी श्रीमंत लोक 'नाटकशाळा' बाळगायचे. स्वामी मध्ये राघोबादादांच्या नाटकशाळांचा उल्लेख आहे. तो कसा पडदाशीन शब्द आहे. आता डायरेक, मोकळेढाकळे आणि घसघशीत असे डझनाच्या हिशेबातले विबासं असतात, नाही? >>>
इश्य! अंगवस्त्र असा एक शब्द आहे समानार्थी. या शब्दांचा अर्थ 'इस्कटून' सांगाया हवा का?

विबासं म्हणजे काय?

Pages