सखुबत्ता (फोटोसकट)

Submitted by अल्पना on 15 April, 2011 - 01:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

६ मध्यम आकाराच्या घट्ट कैर्‍या (लोणच्याच्या कैर्‍या), अर्धी वाटी तिळाचं कुट, अर्धी वाटी लोनचे मसाला, अर्ध्या वाटीपेक्षा थोडा जास्त गुळ, मीठ,फोडणीसाठी २ चमचे तेल, मोहर्‍या, हिंग

क्रमवार पाककृती: 

कैर्‍यांची सालं काढून पातळ काचर्‍या कराव्यात. सोलाण्याने काचर्‍या केल्या तरी चालेल. तीळ भाजून त्याचे अर्धी वाटी कुट घ्यावे. कुटाइअतकाच कैरी लोणचे मसाला (बेडेकर, प्रविण किंवा इतर आपल्या आवडीप्रमाणे) घ्यावा. अर्ध्या वाटीपेक्षा थोडा जास्त गुळ किसून घ्यावा. गुळाचं प्रमाण अंदाजेचं चवीप्रमाणे ठरवा. कैर्‍यांच्या काचर्‍या, तिळाचं कुट, लोणचे मसाला, मीठ आणि गुळ एकत्र करावं. त्यात हिंग- मोहरीची फोडणी थंड करून घालावी.

DSC00077.jpg

वाढणी/प्रमाण: 
तुम्ही लोणच्याप्रमाणे खाता कि भाजीप्रमाणे यावर अवलंबून.
अधिक टिपा: 

या दिवसात केला तर सखुबत्ता जास्त नाही टिकणार पण लोणच्याचा सिझनमध्ये (मे-जुनमध्ये) केलेला सखुबत्ता ६-७ महिने टिकू शकतो. कदाचित त्यापेक्षा जास्त पण टिकेल पण तेवढा उरतच नाही. जास्त टिकण्याच्या दृष्टीने करायचा असल्यास तिळाच्या कुटाचं प्रमाण जरा कमी करावं लागेल.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुमॉ, तुमच्य पद्धतीचं लोणचं माझ्या बाबांना खुप आवडेल. त्यांना लोणच्यात किंवा कशातच गुळ घातलेले नाही आवडत. आईला सांगितलं मी ते लोणचं. मी पण करुन बघेन.

मी आज केलाय. इथे मिळते ती एकच मोठी कैरी घेतली त्याचे २ कप तुकडे झाले. त्यासाठी पाव कप तीळ आणि अर्धा कप लोणचे मसाला (हे चुकून झाले, मला वाटले दुप्पट Happy त्यामुळे जरा झणझणीत झाले. ). गूळ आणि थोडी साखरपण घातली.
फोटो केल्यावर लगेच काढलाय. थोड्या वेळाने चांगला खार सुटला.

sakhu1.jpg

मी आज केला सखुबत्ता!! मातोश्रीना पण रेसिपी सांगितली Happy

कैर्‍या होत्या पण मसाला नव्हता म्हणुन मग मोहरी बारीक करून घातली. मस्त लागतोय प्रकार. अल्पना रेसिपीसाठी धन्यवाद!

मसाला नव्हता म्हणुन मग मोहरी बारीक करून घातली >>> ओह.. असं चालतं का ?? आम्हाला पण ऐनवेळी लक्षात आलं मसाला लागतो पण तो नव्हता.. म्हणून मग आम्ही सुमॉच्या रेसिपीने केलं ते पण सही झालय.. थोडा गुळ घातलाच पण .. Happy
मोहरी घालायची असेल तर किती घालायची.. ??

पराग, मसाला नसला तर मिनोतीने केला तसा घरगुती मसाला बनवून करता येईल. मोहरी बारीक करून, तिखट, हळद आणि हिंग हे सगळं घालते मी मसाला नसला तर. प्रमाण मात्र अंदाजपंचेच असतं.

मी पण केला काल सखुबत्ता (हे बित्तुबंगाच्या जुळ्या बहिणीचं नाव वाटतं Proud बित्तु, :दिवा:). हा फोटो:

sakhu.JPG

एकदम जबरी प्रकार आहे. तिळाच्या कुटाची आयड्या फारच भारी. केल्यापासून नुसताच खाऊन बराच संपवला.

लोणच्याच्या मसाल्यात मोहरीची डाळ, हिंग, हळद, तिखट, आणि मेथ्या असे घटक असतात. मला १/२ कप मसाला करायचा होता म्हणून मी साधारण २.५ टेबलस्पून मोहरी, २ टेबल्स्पून लाल तिखट, १/२ टीस्पून मेथ्या, १ टीस्पून हळद आणि चवीप्रमाणे मीठ असे घातले (मम्मीचा सल्ला).
मोहरी मिक्सरवर फिरवल्यावर मग थोडी पाखडली (मम्मीचाच सल्ला) त्यामुळे बरीच फोलफटे उडून गेली.

मी पण केला हा प्रकार. न्यू जर्सी मधे एका दुकानात छोट्या कैर्‍या मिळाल्या ( इथल्या लेमन पेक्षा जरा लहान असतील ) . त्याच्या काचर्‍या पावणे दोन ते दोन कप झाल्या. त्यात दोन टेस्पून तीळ जरा भाजून त्याचं कूट, २ टे स्पून मीठ, १ टे स्पून गूळ, २ टे स्पून कैरी लोणचं मसाला घालून कालवलं. शेंगदाण्याच्या तेलात मोहरी अन चणाडाळी एवढा खडा हिंग घालून फोडणी केली.
यम्मी यम्मी. वाटीभर तरी खाऊन झालंय आत्ताच.

लालू फोटो अगदी नेहमी पाहिल्यासारखा वाटतोय. (आईच्या सारखाच दिसतोय.)

बायदवे सखुबत्ता नाही सखुबद्दा. बद्दा हा प्रकार तेलुगु असावा. तिथून तो मराठवाड्यात आला असण्याची शक्यता जास्त आहे. अर्थात मुळ माहित नाही पण मराठवाड्या बाहेर कोणाला करताना पाहिले नव्हते.

अल्पना, मस्त सखुबत्ता!!

हा फोटो: (आपण कोणाचा फोटो जास्त लाळगाळू? अशी स्पर्धा ठेवायची का? Wink )

I2.jpg

घरी लोणचं मसाला नव्हता त्यामुळे फक्त लाल तिखट घातलं. एकदम झक्कास तोंडीलावणं... म ईकितीतरी दिवसांनी 'लोणचं' हा प्रकार चाखला. अक्षरशः वाटीत घेऊन चमच्याने खावा असा हा चविष्ट सखुबत्ता! याची चव मला साधारण आंबोशीच्या लोणच्यासारखी लागली.

Pages