मराठी भाषा दिवस - स्पर्धा निकाल आणि समारोप

Submitted by संयोजक on 27 February, 2010 - 21:15

नमस्कार मंडळी,

संवाद साधणं ही सजीवांची जवळपास मूलभूत गरजच! प्राणीपक्षीसुद्धा अन्न सापडल्याची किंवा धोक्याची सूचना विशिष्ट ध्वनी करून आप्तस्वकीयांना देतात. माणसाची धाव त्यापुढची. 'भाषा' हे त्याच्यासाठी केवळ 'माहितीची देवाणघेवाण' करण्याचं माध्यम किंवा साधन नाही. ते त्याच्या जगण्यातलं एक आनंदनिधान आहे. तो भाषा 'वापरत' नाही, तो एखाद्या शिल्पासारखी भाषा 'घडवतो', तिला अलंकारांची लेणी चढवतो.. आणि हे करतांना नकळत स्वतःही अधिक सुसंस्कृत घडत जातो.

साहजिकच दोन आरसे परस्परांसमोर धरावेत तसं भाषेचं प्रतिबिंब संस्कृतीत पडतं आणि संस्कृतीचं भाषेत. 'सप्रेम नमस्कार' या आपल्या पत्रप्रदर्शनात जवळपास तीन पिढ्यांच्या जीवनाचा, विचारसरणीचा, माया/प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीचा असाच एक ह्रद्य आलेख उमटलेला आपण पाहिला.

अर्थात, तुमचं आमचं मराठीबद्दलचं प्रेम गेल्या दशकभराहून जास्त काळ मायबोलीच्या पानापानांवर झळकत आहेच. यंदाच्या 'मराठी दिवसा'च्या सोहळ्यात एक पाऊल पुढे टाकावं म्हणून मायबोलीकरांच्या पुढच्या पिढीसाठी काही उपक्रम घ्यायची कल्पना प्रशासनाने मांडली. त्यानुसार आपण लहानग्यांसाठी 'बोलगाणी' आणि मोठ्या मुलांसाठी 'इवलेसे रोप' या दोन स्पर्धा जाहीर केल्या. सांगायला अतिशय आनंद होतो की या स्पर्धांना, विशेषत: 'बोलगाणी'ला भरघोस प्रतिसाद मिळाला. त्याहून आनंदाची बाब म्हणजे सगळ्याच मुलांनी इतक्या छान प्रवेशिका पाठवल्या की त्यांत तुलना करून क्रमांक देणं हे अवघडच नाही, तर जवळपास अशक्य झालं!

तरीही जे सर्वोत्तम, त्याचं यथायोग्य कौतुक व्हावं या भावनेतून गुणांकन केलं आहे.
गुणांकन करताना स्पर्धकाचं वय विचारांत घेऊन त्यानुसार पाठांतर आणि सादरीकरण (बोलगाणी) किंवा मजकूर (इवलेसे रोप) यांचं मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला आहे. 'बोलगाण्यां'चं गुणांकन करताना माध्यमामुळे निकालावर परिणाम होऊ नये म्हणून श्राव्य आणि दृक्श्राव्य असे निरनिराळे गट केले, तर 'इवलेसे रोप'साठी आलेल्या प्रवेशिकांचं गुणांकन माध्यमाचा/सादरीकरणाचा विचार न करता केवळ मजकुरावरून केलं आहे.

प्रत्येक गटातून दोन सर्वोत्तम प्रवेशिका निवडल्या आहेत..

आणि विजेते आहेत....

बोलगाणी (श्राव्य)
बोलगाणी - प्रवेशिका १ (तोषवी)
बोलगाणी- प्रवेशिका १०- (HH)

बोलगाणी (दृक्श्राव्य)
बोलगाणी- प्रवेशिका १२- (नील्_वेद)
बोलगाणी - प्रवेशिका ३ (मिलिंदा)

इवलेसे रोप
इवलेसे रोप - प्रवेशिका ३ (संपदा)
इवलेसे रोप- प्रवेशिका ४ (मंजिरी)

या सर्व विजेत्यांना 'मायबोली खरेदी' विभागाचे $२५ चे गिफ्ट सर्टिफिकेट पारितोषिक म्हणून देत आहोत.

आधी म्हटल्याप्रमाणे बक्षिसपात्र ठरलेल्या आणि न ठरू शकलेल्या प्रवेशिकांमधे गुणांचा फरक इतका कमी होता, की एका अर्थी सगळेच स्पर्धक विजेतेच आहेत. सगळ्याच मुलांचा उत्साह, पाठांतर, उच्चार, तालासुराची/आवाजातल्या चढ-उतारांची समज पाहता यांना आपण उत्तेजन देण्यापेक्षा मराठी भाषेच्या (अनेकांना चिंता असलेल्या) भवितव्याला यांनीच उत्तेजन दिलं आहे असं म्हणता येईल. म्हणूनच 'बोलगाणी' आणि 'इवलेसे रोप' स्पर्धांमधे भाग घेणार्‍या बाकी सर्व लहानग्यांनाही आपण पारितोषिकाने गौरवणार आहोत. या सर्वांना 'मायबोली खरेदी' विभागाचे $१० चे गिफ्ट सर्टिफिकेट देण्यात येईल.

ही पारितोषिके मायबोली प्रशासन आणि काही मायबोलीकरांनी मिळून पुरस्कृत केली आहेत.

सर्व स्पर्धकांचं आणि त्यांच्या पालकांचं हार्दिक अभिनंदन! Happy

'मराठी भाषा दिवस' उपक्रमाच्या आयोजनात मायबोली आणि संयुक्ता प्रशासनासोबत संयुक्ताच्या खालील सदस्यांनी संयोजक म्हणून हातभार लावला : अमृता, बस्के, चिन्नु, रैना, सायलीमी, सायो, सिंडरेला, सीमा

स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून स्वाती_आंबोळे यांनी काम केलं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतातील मायबोलीकरांना खरेदीमध्ये काही अडचणी येत होत्या त्या आता सोडवल्या आहेत. तसेच तुमचा पत्ता (shipping address) जर भारतातला असेल तर एकूण खरेदीवर जास्त सूट (discount) दिसेल.

सर्व सहभागी स्पर्धकांचे अन् विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.

स्पर्धेच्या आयोजनासाठी मायबोली आणि संयुक्ता प्रशासनाचे तसेच अमृता, बस्के, चिन्नु, रैना, सायलीमी, सायो, सिंडरेला, सीमा ह्यांचेही हार्दिक अभिनंदन.

स्पर्धां परीक्षकांचेही हार्दिक अभिनंदन.

गुड्डु, गंगाधर मुटे हे गेल्या वर्षीचे निकाल आहेत. Happy यावर्षीची स्पर्धा अजुन संपलेली नाही. हे पहा इथे
http://www.maayboli.com/node/23047

जरुर भाग घ्या.

अ‍ॅडमिन, हा धागा बंद कराल का? लोकांच कन्फ्युजन नको व्ह्यायला.

हे गेल्या वर्षीचे निकाल आहेत. Rofl

म्हणून काय झाले? गेल्यावर्षी अभिनंदन करायचे राहून गेले होते.
आता बॅकलॉग पुर्ण झाला.

Pages