मराठी भाषा दिवस - स्पर्धा निकाल आणि समारोप

Submitted by संयोजक on 27 February, 2010 - 21:15

नमस्कार मंडळी,

संवाद साधणं ही सजीवांची जवळपास मूलभूत गरजच! प्राणीपक्षीसुद्धा अन्न सापडल्याची किंवा धोक्याची सूचना विशिष्ट ध्वनी करून आप्तस्वकीयांना देतात. माणसाची धाव त्यापुढची. 'भाषा' हे त्याच्यासाठी केवळ 'माहितीची देवाणघेवाण' करण्याचं माध्यम किंवा साधन नाही. ते त्याच्या जगण्यातलं एक आनंदनिधान आहे. तो भाषा 'वापरत' नाही, तो एखाद्या शिल्पासारखी भाषा 'घडवतो', तिला अलंकारांची लेणी चढवतो.. आणि हे करतांना नकळत स्वतःही अधिक सुसंस्कृत घडत जातो.

साहजिकच दोन आरसे परस्परांसमोर धरावेत तसं भाषेचं प्रतिबिंब संस्कृतीत पडतं आणि संस्कृतीचं भाषेत. 'सप्रेम नमस्कार' या आपल्या पत्रप्रदर्शनात जवळपास तीन पिढ्यांच्या जीवनाचा, विचारसरणीचा, माया/प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीचा असाच एक ह्रद्य आलेख उमटलेला आपण पाहिला.

अर्थात, तुमचं आमचं मराठीबद्दलचं प्रेम गेल्या दशकभराहून जास्त काळ मायबोलीच्या पानापानांवर झळकत आहेच. यंदाच्या 'मराठी दिवसा'च्या सोहळ्यात एक पाऊल पुढे टाकावं म्हणून मायबोलीकरांच्या पुढच्या पिढीसाठी काही उपक्रम घ्यायची कल्पना प्रशासनाने मांडली. त्यानुसार आपण लहानग्यांसाठी 'बोलगाणी' आणि मोठ्या मुलांसाठी 'इवलेसे रोप' या दोन स्पर्धा जाहीर केल्या. सांगायला अतिशय आनंद होतो की या स्पर्धांना, विशेषत: 'बोलगाणी'ला भरघोस प्रतिसाद मिळाला. त्याहून आनंदाची बाब म्हणजे सगळ्याच मुलांनी इतक्या छान प्रवेशिका पाठवल्या की त्यांत तुलना करून क्रमांक देणं हे अवघडच नाही, तर जवळपास अशक्य झालं!

तरीही जे सर्वोत्तम, त्याचं यथायोग्य कौतुक व्हावं या भावनेतून गुणांकन केलं आहे.
गुणांकन करताना स्पर्धकाचं वय विचारांत घेऊन त्यानुसार पाठांतर आणि सादरीकरण (बोलगाणी) किंवा मजकूर (इवलेसे रोप) यांचं मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला आहे. 'बोलगाण्यां'चं गुणांकन करताना माध्यमामुळे निकालावर परिणाम होऊ नये म्हणून श्राव्य आणि दृक्श्राव्य असे निरनिराळे गट केले, तर 'इवलेसे रोप'साठी आलेल्या प्रवेशिकांचं गुणांकन माध्यमाचा/सादरीकरणाचा विचार न करता केवळ मजकुरावरून केलं आहे.

प्रत्येक गटातून दोन सर्वोत्तम प्रवेशिका निवडल्या आहेत..

आणि विजेते आहेत....

बोलगाणी (श्राव्य)
बोलगाणी - प्रवेशिका १ (तोषवी)
बोलगाणी- प्रवेशिका १०- (HH)

बोलगाणी (दृक्श्राव्य)
बोलगाणी- प्रवेशिका १२- (नील्_वेद)
बोलगाणी - प्रवेशिका ३ (मिलिंदा)

इवलेसे रोप
इवलेसे रोप - प्रवेशिका ३ (संपदा)
इवलेसे रोप- प्रवेशिका ४ (मंजिरी)

या सर्व विजेत्यांना 'मायबोली खरेदी' विभागाचे $२५ चे गिफ्ट सर्टिफिकेट पारितोषिक म्हणून देत आहोत.

आधी म्हटल्याप्रमाणे बक्षिसपात्र ठरलेल्या आणि न ठरू शकलेल्या प्रवेशिकांमधे गुणांचा फरक इतका कमी होता, की एका अर्थी सगळेच स्पर्धक विजेतेच आहेत. सगळ्याच मुलांचा उत्साह, पाठांतर, उच्चार, तालासुराची/आवाजातल्या चढ-उतारांची समज पाहता यांना आपण उत्तेजन देण्यापेक्षा मराठी भाषेच्या (अनेकांना चिंता असलेल्या) भवितव्याला यांनीच उत्तेजन दिलं आहे असं म्हणता येईल. म्हणूनच 'बोलगाणी' आणि 'इवलेसे रोप' स्पर्धांमधे भाग घेणार्‍या बाकी सर्व लहानग्यांनाही आपण पारितोषिकाने गौरवणार आहोत. या सर्वांना 'मायबोली खरेदी' विभागाचे $१० चे गिफ्ट सर्टिफिकेट देण्यात येईल.

ही पारितोषिके मायबोली प्रशासन आणि काही मायबोलीकरांनी मिळून पुरस्कृत केली आहेत.

सर्व स्पर्धकांचं आणि त्यांच्या पालकांचं हार्दिक अभिनंदन! Happy

'मराठी भाषा दिवस' उपक्रमाच्या आयोजनात मायबोली आणि संयुक्ता प्रशासनासोबत संयुक्ताच्या खालील सदस्यांनी संयोजक म्हणून हातभार लावला : अमृता, बस्के, चिन्नु, रैना, सायलीमी, सायो, सिंडरेला, सीमा

स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून स्वाती_आंबोळे यांनी काम केलं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. सगळ्या लहान मुलांच्या सहभागामुळे खूप धमाल आली.
मराठी भाषा दिनाचे सगळेच उपक्रम एकदम 'हटके' होते. खूप आवडले.
सगळ्या प्रवेशिकांची (लेखमाला सारखी) मालिका करायला हवी म्हणजे मग सगळी सलग एका पाठोपाठ एक बघता/ऐकता/वाचता येतील.

अरे वा.. सर्व स्पर्धकांचे तसेच विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच संयोजकांना धन्यवाद. Happy
सगळीच बोलगणी आवडली. प्रत्येक प्रवेशिकेवर प्रतिक्रिया देणे शक्य झालं नाही पण प्रत्येक प्रवेशिका किमान २ वेळा तरी ऐकली ! लहान मुलांकडून पाठांतर करून घेऊन, रेकॉर्डींग करून ते योग्य स्वरूपात संयोजकांपर्यंत पोचवण्यासाठी ज्यांचा ज्यांचा हातभार लागला त्या सगळ्यांचेच आभार. Happy

गणपती उत्सव आणि दिवाळी अंक लागोपाठ येऊन गेल्यानंतर वर्षभर मायबोलीवर उपक्रम असा काहीच होत नाही. त्यामुळे मराठी दिवसा निमित्त घेतलेला वर्षाच्या ह्या काळातल हा उपक्रम खूप आवडला. हा दरवर्षी तसेच शक्य असल्यास अधिक मोठ्या प्रमाणात घेतला जावा ही प्रशासनाला विनंती.

सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचेही मनःपूर्वक अभिनंदन Happy
असे वेगवेगळे उपक्रम वरचेवर होत राहो.

सर्व बच्चे कंपनीचे आणि त्यांच्या पालकांचे खुप अभिनंदन !! Happy
एक वेगळा आणि छान उपक्रम आयोजित केल्याबद्दल संयोजकाना धन्यवाद !!

सप्रेम नमस्कार हा उपक्रम पण फारच आवडला.

सर्व सहभागी मुलांचे आणि विजेत्यांचे अभिनंदन!
रुनी आणि परागला अनुमोदन, खूप छान उपक्रम!!

सहभागी आणि विजेते सर्वांचे अभिनंदन!
अश्या सुंदर उपक्रमाबद्दल मायबोली आणि संयुक्ताचे खूप खूप आभार!

विजेत्यांचे तसेच स्पर्धकांचे अभिनंदन!!!!!
एका वेगळ्या उपक्रमाबद्दल संयोजक आणि संयुक्ताचे ही आभार!
सप्रेम नमस्कार ही कल्पना अतिशय आवडली.

विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी बच्चेकंपनीचं कौतुक करावं तेवढं कमीच.
संयोजकांचं या अभिनव उपक्रमांबद्दल आणि यशस्वीपणे हे उपक्रम पार पाडल्याबद्दल अभिनंदन आणि आभार.

बोलगाणी, निबंधलेखन आणि पत्रलेखन असे सगळेच उपक्रम अतिशय सुंदर्..विशेष कौतुक सगळ्या लहानग्यांचे आणि त्यांच्या पालकांचे..

सगळ्या छोट्या मायबोलीकरांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन !!
मराठी भाषा दिवस फारच छान साजरा झाला ! अगदी जसा असायला हवा तसा!! संयोजकांचं अभिनंदन!!

हो, मस्त झाला उपक्रम. सर्व स्पर्धांना भरपूर प्रतिसाद मिळाला म्हणून छान वाटलं. बोलगाणी, पत्र, छोट्यांचे निबंध- सगळेच उपक्रम अभिनव! संयोजकांना धन्यवाद.

परागला अनुमोदन. गणपती-दिवाळीनंतर वर्षभर असे सर्व मायबोलीकरांना सामवून घेणारे उपक्रम नसतात. ह्या निमित्ताने 'मराठी भाषा दिवस' हा मायबोलीचा पर्मनन्ट उपक्रम होऊ शकेल का यावर जरूर विचार करावा.

सर्वप्रथम सर्व सहभागी स्पर्धकांचे अन् विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. अतिशय मस्त कार्यक्रम झाला Happy (तो इतक्यात संपावा ह्याच दु:खही पण ते कधीतरी होणारच.. असो.)

मराठी भाषा दिवस - स्पर्धा ही अतिशय अभिनव संकल्पना. अन् ह्या स्पर्धेच्या उत्कृष्ठ आयोजनासाठी मायबोली आणि संयुक्ता प्रशासनाचे तसेच अमृता, बस्के, चिन्नु, रैना, सायलीमी, सायो, सिंडरेला, सीमा ह्यांचेही आभार.

'बोलगाणी' आणि 'इवलेसे रोप' मधून लहानग्यांच्या दोन पिढ्यांच्या सहभागाने मिळालेला निखळ आनंद अन् 'सप्रेम नमस्कार' मधून मिळालेला लहान, मोठे दोघांचाही स्वहस्ताक्षरातल्या स्पष्ट विचारांचा, संवादाचा, मायेचा अमूल्य ठेवा अनुभवता आला हे आमचे भाग्य थोर म्हणूनच.

येस्स स्वातीचंही खूप कौतुक आणि अभिनंदन Happy हे परिक्षण करणं म्हणजे कठीणच..

ह्या पुढेही ह्या सारखे अभिनव कार्यक्रम मायबोलीकर करतीलच त्यासाठी मनापासून शुभेच्छा.
(जरूर पडल्यास मदतीसाठी मी तयार आहे Happy )

सयुक्तामधील सर्व भगिनींनी खूप कमी वेळात इतका छान उपक्रम अमलात आणला. मराठी भाषा दिवस असतो हे या निमित्ताने इथे सर्वांना माहिती झाले. एकूनच कार्यक्रम सुरवातीपासून म्हणजे अगदी सुरवातीची जाहिरात, मधली जाहिरात, स्पर्धेचा त्वरित निकाल आणि समारोपाचे निवेदन सर्वचं गोष्टी छान तयार केलेल्या होत्या. तुम्हा सर्वजणींचे त्रिवार अभिनंदन.

मला एक वाटते की या सर्व स्पर्धांमधे भाग घेणारे बालकलाकर माबो सभासदांचीच मुले होती. एक अपेक्षा अशी होती की माबो व्यतीरिक्त म्हणजे आपल्याचं नात्यागोत्यातील लहान मुले, घरी कामाला येणार्‍या मोलकरणीची लहान मुले, शेजार्‍यांची लहान मुले, ऑफीसमधील सहकार्‍याची लहान मुले यात दिसतील... पण तसा प्रयत्न बहुतेक कुणीच केला नाही. तो करायला हवा होता.

पुढील उपक्रमासाठी सयुक्तेला शुभेच्छा.

धन्यवाद. होळीच्या सर्वांना शुभेच्छा!

कै. श्री. पु. ल. देशपांडे १९८९ साली बा. रा. त मराठी संमेलनाला आले होते. त्यांच्यासमोर येथील काही मुलांनी मराठी गाणी म्हणून दाखवली. त्यावर ते लगेच म्हणाले, 'हे जोपर्यंत चालू राहील, तोपर्यंत मराठी संस्कृतीची काळजी करण्याचे कारण नाही.' आज जवळ जवळ २१ वर्षांनी त्यांच्या या उद्गारातील सत्य प्रचितीला आले.

सर्व कलाकारांचे व त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन.

सर्व बालकलाकारांचं कौतक करावं तेवढं कमीच आहे . सगळ्यांच अभिनंदन , तुमच्यामुळे मराठी भाषा दिनाचा आनंद द्विगुणित झाला.
मायबोली प्रशासन , संयुक्ता टीम , सर्व बालकलाकार आणि त्यांचे पालक , या सर्वांचे आम्हाला एवढा सुखद अनुभव दिल्याबद्दल खुप खुप आभार.
सर्व मायबोलीकरांना होळीच्या शुभेच्छा .
-------------------------------------------
पाणी वाचवा , अपायकारक रंग टाळा !

पूनम, हा उपक्रम आता दरवर्षी राबवायचा विचार आहे.
ह्या उपक्रमात सामील होऊन दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व भावी लहानग्या मायबोलीकरांचे, त्यांच्या आईवडिलांचे खूप आभार.
हा उपक्रम राबवल्याबद्दल मायबोलीचे, संयुक्ता प्रशासनाचे आणि सर्व संयोजकांचेही आभार. एकापेक्षा एक सरस गाणी गायलेल्या नी सुंदर हस्ताक्षरात मराठीत निबंध लिहिलेल्या स्पर्धकांमधून एक,दोन विजेते निवडणं हे काम अतिशय कठीण. पण कुणावरही अन्याय होणार नाही ह्याचं भान ठेवून परिक्षकांची जबाबदारी निभावणार्‍या स्वातीचंही खूप कौतुक आणि अभिनंदन.

बी, दुसर्‍या पॅराबद्दल.....तू म्हणतोस त्यात तथ्य आहे पण हे पहिलंच वर्ष होतं. ह्यापुढे ह्यात सुधारणा होत जातील तसंच नवीन नवीन कल्पनांना वाव मिळेल हे लक्षात घ्यायला हवं नी थोडी वाटही बघायला हवी.

सर्वप्रथम सहभागी सर्वान्चे अभिनन्दन Happy पालक व पाल्य, दोघान्चेही
या अभिनव उपक्रमाची कल्पना सुचून, व ती यशस्वीपणे राबविणार्‍या प्रत्येक प्रत्यक्ष व पडद्या आडील व्यक्तिन्चे आभार Happy
मला वाटते की यावेळेस प्रथमच जाहीर केलेल्या "बक्षिस रकमेच्या" वर्गणीत सहभागी सर्वान्चे कौतुक व आभार!

झक्कीन्चे हे उदाहरण चपखल आहे!
>>>> कै. श्री. पु. ल. देशपांडे १९८९ साली बा. रा. त मराठी संमेलनाला आले होते. त्यांच्यासमोर येथील काही मुलांनी मराठी गाणी म्हणून दाखवली. त्यावर ते लगेच म्हणाले, 'हे जोपर्यंत चालू राहील, तोपर्यंत मराठी संस्कृतीची काळजी करण्याचे कारण नाही.' आज जवळ जवळ २१ वर्षांनी त्यांच्या या उद्गारातील सत्य प्रचितीला आले. <<<<<<

या अशा उपक्रमांमुळेच, मी मायबोलीचा सभासद आहे, याचाही मला अभिमान वाटतो! Happy

बी, दुसर्‍या पॅराबद्दल.....तू म्हणतोस त्यात तथ्य आहे पण हे पहिलंच वर्ष होतं. ह्यापुढे ह्यात सुधारणा होत जातील तसंच नवीन नवीन कल्पनांना वाव मिळेल हे लक्षात घ्यायला हवं नी थोडी वाटही बघायला हवी.>>> सायोनारा बरोबर आहे.. हे पहिलचं वर्ष असल्यानी वेळेअभावी आवाका कमी होणं साहजिकचं होतं. दरवर्षी हा उपक्रम तुम्ही करा.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. मलापण हा 'मराठी भाषा दिवस' उपक्रम फार आवडला. छान छान गाणी ऐकायला, पत्रं वाचायला मिळाली.. Happy
संयोजन समितीतल्या सर्वांचे आभार.

खूपच सुंदर उपक्रम. पत्र-बोलगाणी-निबंध हे सगळं वाचायला, ऐकायला खूप छान वाटलं. सर्वांचा प्रतिसादही मस्त, भरभरुन होता. 'मराठी भाषा दिन' इतक्या दणक्यात साजरा केल्याबद्दल संयोजकांचे मनापासून अभिनंदन आणि आभार.

Pages