......... वाटे हवेहवेसे
(आयुष्यातल्या वळणांवर काही क्षण असे असतात जे कायम प्रफुल्लित असतात. कोणतीच एक्सपायरी डेट नसलेले. ही रचना त्या क्षणांना आणि त्या क्षणाला स्मरणीय बनवणार्या सखीला.)
आभास चांदण्यांचे, वाटे हवेहवेसे
गंधाळल्या फुलांचे, काटे हवेहवेसे
तू लाजतेस तेव्हा, मौनास रंग नवखे
अर्थास लाभणारे, फाटे हवेहवेसे
सारे ऋतू निमाले, उरला वसंत देही
शृंगार श्रावणी जो, थाटे हवेहवेसे
स्पर्शातल्या लयीने, श्वासात ताल धरता
रोमांच रोमरोमी, दाटे हवेहवेसे
माझाच मी न उरतो, विरतो तुझ्या कलाने
जिंकून हारण्याचे, घाटे हवेहवेसे