प्राजक्त

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

(सर्वप्रथम मायबोली एडमिनचे आभार. माझेही एक रंगीबेरंगी पान असावे असे मला ठासून सांगणार्‍या दक्षिणास 'मला गवसलेला जीवनाचा अर्थ' समर्पित.)

गुज ते कुणी, हलके कानी,
सांगून जावे जसे
मिटले नयन, निमिष उघडून,
पाही कळी ती तसे

रवीकिरणे, समीप जेणे,
उघडझाप जाहली
आच्छादण्या, सुमना तान्ह्या,
मेघढाल धावली

स्पर्श छाया, उमजे काया,
नजर थेट ती नभा
नील निळाई, उरात न्हाई,
खुलली कळीची प्रभा

उषा रंगे, पुर्वेसंगे,
क्षितिजी सारे सडे
तीच पंखी, रंगपालखी,
फ़ूलपाखरू बागडे

अस्तित्वाची, उंचावरची,
खूण मनी हरखली
समाधाने, आनंदाने,
नजर धरेला झुकली

दर्पणाच्या, कुपी जळाच्या,
प्रतिबिंबाची माया
रूप अपुले, त्यास दिसले,
रम्य मनोहर छाया

अरुण लाली, देठा ल्याली,
चंद्र वरी तोलला
तन अलवार, असे गुलजार,
आसमंत गंधला

शेंदूरल्या, आसावरल्या,
गंधी धुंद पाकळी
गौर गाली, सहज उमटली,
प्राजक्ताच्या खळी

मीच उपमा, मीच संभ्रमा,
काव्यकल्पित भाषा
अलंकारी, मी शॄंगारी,
अत्युत्तमाचा घोषा

लावण्याच्या, कैफ़ी साच्या,
गेले बुडून फ़ूल
त्या गुर्मीत, फ़िरे ऐटीत,
पाहतसे घरकुल

खोड बोजड, ओबडधोबड,
घाली फ़ांदी गुंता
नच देखणे, गोजिरवाणे,
नसे जयाला चिंता

हिरवा ठसा, तुकतुकीतसा,
ठाऊक नाही पर्णा
ना साजरे, स्पर्श खरखरे,
असे मलूल जे वर्णा

भ्रमनिरासा, विझे अपेक्षा,
कुसूम पोळले मनी
झुरू लागे, दु:खावेगे,
दुज्या दिशेस फ़िरूनी

कुरूप लेणे, नको पाहणे,
जेथे जन्म जाहला,
जीवघेणे, वाटे जगणे,
श्वास कंठी दाटला

दूर जावे, तिथे पळावे,
सुरेख जेथे सारे
मोहरावे, अन विसरावे,
या क्षणाचे हे खरे

घाली साद, पुसे प्रतिसाद,
कोण जो ऐके व्यथा ?
प्राजक्तास, एक ही आस,
बदलीन जीवन कथा

पवन अवखळ, वाहे जवळ,
संधी साधते फ़ूल
उरी वारे, शाख थरथरे,
सावरू पाहे मूल

निमिष उशीर, गेले अधीर,
काय करावे आता ?
मुक बापुडे, झाड अवघडे,
पाहे फ़ूल ते जाता

वार्‍यासवे, फ़ुला जाणवे,
उडण्यातील आनंद
मौज समजे, परि ना उमजे,
हा क्षणभराचा छंद

जरा दुरून, पाहे वळून,
आहे कोणी का संगे ?
अनुकरणात, आवेगात,
कैक धावले मागे

अन थबकले, धुळीस भिडले,
काळवंडले पुरते
काही जळी, कुणी भूदळी,
सडेच पायतळी ते

खोड.. शाखा, कंप सारखा,
पर्ण पर्ण हळहळले
जोजविण्यास, पुन्हा बाळांस,
झाड जरासे लवले

ओशाळले, जसे उमगले,
कॄत्य काय जे केले ?
रागे अंध, अंतरी गंध,
चहूवरी उधळीले

चहूदिशेस, मंद सुवास,
धुंदावलेली हवा
सुखे मिटून, अपुले लोचन,
प्राजक्त निजे तेव्हा

क्षणभंगूर, जीवनी सूर,
राहो असे बोलके
आसमंती, उरलो गंधी,
हेही नसे थोडके

विषय: 
प्रकार: 

कौतुक,

रंगिबेरंगी पानासाठी अतोनात अभिनंदन.... Happy
अखेर अ‍ॅडमिननीच माझ्या मनाची हाक ऐकली म्हणायची... Proud

पहिलीच कविता, हळूवार, छान, गूढ.... Happy
(मला फार समजली नाही ही गोष्ट वेगळी.... )

कौतुक... खुपच छान... आवडली Happy
तु कविता पण करतोस हे माहित नव्हते.. तुझ्या कथा मला आवडतात Happy
अजुन लिहीत रहा.... पु ले शु Happy

प्राजक्त ओघळतो, त्याचा आवाज होत नाही !
याचा अर्थ असा नाही त्याला इजा होत नाही !>>>>
मला ही कविता आठवली.
तुमची कविता पण सुरेख !!

Happy