कैरी

कैरीचं चुट्चुटं

लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कैरी - १ मध्यम आकाराची
फोडणीसाठी :
तेल - १ मोठा चमचा
मोहरी - अर्धा चमचा
जीरे - अर्धा चमचा
हळद - दोन चिमूट स्मित
मीठ - चवीनुसार
तिखट - १/४ चमचा
गूळ - १ चमचा बारीक चिरून

क्रमवार पाककृती: 

१. कैरीच्या बारीक पातळ फोडी करून घ्याव्यात. फोडी करताना साल काढू नये.
२. तव्यात तेल गरम करून घेऊन त्यात जीरे, मोहरी चांगले तडतडवून घ्यावेत.
३. मग कैरीच्या फोडी घालून परतावे.
४. मीठ, तिखट घालून परतावे.
५.शेवटी गूळ घालून गूळ विरघळेपर्यंत परतावे.

मस्त चुट्चुटं तय्यार!!!!!!!!!!
लगेच तव्यावरून ताटात घेऊन गट्टम करावे.... स्मित

वाढणी/प्रमाण: 
दोघांसाठी........ अर्थात कैरी किती आवडते त्यावर अवलंबून....... :स्मित:
अधिक टिपा: 

एकदा फोडणी झाली की , मंद आचेवर परतावे अन्यथा फोडी पातळ असल्याने जळण्याची शक्यता...
कैरी पाडाची असली तर आणखीनच बहार!!!!!!!!!!

माहितीचा स्रोत: 
आज्जी

आमेर कोसुंदी, (बंगाली लोणचे )

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक किलो घट्ट कैर्‍या, (किंवा पाव किलो आंबोशी, म्हणजे सुकवलेल्या कैरीच्या फोडी.) तीन टेबलस्पून मोहरीची डाळ्,एक ते दोन टिस्पुन मेथीचा रवा, एक टिस्पून हळद, पाव वाटी मीठ, दोन टेबलस्पून तिखट, तीन टेबलस्पून बडीशेपेची पूड, मोठ्या लिंबाएवढा गूळ, हिंग, अर्धी वाटी शक्यतो मोहरीचे तेल.

क्रमवार पाककृती: 

वेळ आणि उन असल्यास घरी कैरीच्या लांबट फोडी करून उन्हात कडकडीत वाळवाव्यात. नाहीतर तयार अंबोशी घ्यावी.
थोडे तेल गरम करुन, त्यात मेथीचा रवा परतावा, मग हिंग परतावा व बडिशेपेची पुड परतावी. मग हळद व तिखट टाकून गॅस बंद करावा.
मोहरीची डाळ बारीक वाटावी. बाकीचे तेल गरम करुन ते थंड करुन त्यात ती टाकावी. हातानेच जरा फेटावी. मग त्यात कैरीच्या फोडी आणि वरील मसाला, मीठ व गूळ घालावा. हे सगळे आठदहा दिवस मुरु द्यावे.
खायला घेताना, सगळेच परत गरम करावे, म्हणजे फोडी मऊ होतात. मग खायला घ्यावे.
चवीला मस्तच लागते हे.

अधिक टिपा: 

आपण मोहरी फेसून जे प्रकार करतो, तशी फेसलेली मोहरी बंगाल्यांच्याकडे बाटलीत तयारच असते. हे मिश्रण खराब होत नाही. त्याला कासुंदी म्हणतात.
मला वाटते हे लोणचे अश्या कासुंदीचा वापर करुन केले तरी चालेल, पण ते कितपत टिकेल, याची शंका आहे.

कैरीचे गुजराथी लोणचे

लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

एक किलो कैरीच्या फ़ोडी, हळद आणि मीठ लावून ठेवाव्यात. त्याला पाणी सुटेल
ते निथळून, फ़ोडी सूकवून घ्याव्यात.

पाव वाटी मोहरिची डाळ, पाव वाटी धण्याची डाळ, दोन टेबलस्पून मेथीचा रवा,
एक टेबलस्पून बडीशेप (थोडी पुड करुन), दोन तीन लवंगा आणि एक इंच दालचिनी
यांचे बारिक तूकडे, दोन टिस्पून हळद, पाव वाटी लाल तिखट, अर्धी वाटी मीठ, अर्धा
चमचा मोहरी. लागेल तसे तेल.

क्रमवार पाककृती: 

तेल तापवून त्यात मोहरी व हिंग घालावा. मग मेथीची पूड घालून जरा परतावे, मग मोहरी
डाळ घालावी. बाकिचे जिन्नस घालून आच बंद करावी. हे सगळे थंड झाले कि त्यात कैरीच्या
सुकवलेल्या फ़ोडी मिसळून घ्याव्यात. मग हे बरणीत भरावे. फ़ोडी बूडतील इतके तेल गरम
करून घ्यावे, आणि ते पूर्ण थंड झाले कि बरणीत ओतावे. सतत फ़ोडींवरती तेल राहील असे पहावे.

वाढणी/प्रमाण: 
लोणच्याचे काय प्रमाण ?
अधिक टिपा: 

या मसाल्याचे प्रमाण,आणि घटकही बेन आणि भाभी प्रमाणे बदलत राहतात.
पण मला यापेक्षा बंगाली पद्धतीचे, ओमेर कासुंदी हे लोणचे जास्त आवडते. बहुतेक मी लिहिले
आहे.

कैरी कांदा लोणचे

लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ मध्यम आकाराच्या कैर्‍या,
२ मध्यम आकाराचे कांदे,
१ चमचा तिखट,
१ लहान वाटी गुळ
चवी प्रमाणे मिठ

क्रमवार पाककृती: 

पार्ल्याक्वांच्या आग्रहामुळे आईला विचारून ही पाककृती यो.जा.टा. आहे. स्मित
१. कैर्‍या आणि कांदे सालं काढून किसुन घ्यावे.
२. गुळ आणि दोन्हीचा कीस एका भांड्यात घालून ठेवून द्यावा.
३. थोड्यावेळाने गुळ विरघळून त्याला भरपूर पाणी सुटतं.
४. नंतर त्यात लाल तिखट आणि मीठ घालून नीट ढवळून घ्यावं.
लगेच खाललं तरी चालतं किंवा रात्रभर ठेवून दिलं की चांगल मुरतं.

वाढणी/प्रमाण: 
एक वाडगा भरून होतं
अधिक टिपा: 

१. तिखटाचा रंग एकदम लाल असला तर लोणच्याला मस्त रंग येतो.
२. हे लोणचं एकदम रसरशीत आणि आंबट-गोड लागतं, तिखटामुळे चांगली चव येते. शेवटी शेवटी सगळा रस संपून जातो आणि किंचित ओलसर चोथा उरतो. हा चोथा आमटीत घातला की आमटीला छान स्वाद येतो.
३. फ्रिज मधे १५ दिवस टिकतं. पण तेव्हडे दिवस उरतच नाही. स्मित
४. मार्च एप्रिल मधल्या पहिल्या हंगामच्या ताज्या आणि कोवळ्या कैर्‍या वापरून केल्या तर एकदम मस्त चव येते.

माहितीचा स्रोत: 
आज्जी