मेक्सिकन

सेव्हिचे - मेक्सिकन पद्धतीने

लागणारा वेळ: 
५ तास
लागणारे जिन्नस: 

तिलापिया किंवा रेड स्नॅपर फिले , मध्यम आकाराचे श्रिंप, बे स्कॅलप, लहान ऑक्टोपस यातील दोन ते तीन प्रकार मिळून एक पाउंड,

तीन मध्यम टॉमेटो
दोन ते तीन मध्यम लाल कांदे
दोन तीन टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
एक कप लिंबाचा रस ( लाइम, लेमन नव्हे )

दोन तीन तिखट हिरव्या मिरच्या

मीठ, मिरपूड

क्रमवार पाककृती: 

मासे, श्रिंप ऑक्टॉपस स्वच्छ धुऊन छोटे ( एक से.मी ) तुकडे करून घ्यावे
यात थोडे मीठ व तुकडे बुडतील एवढा लिंबाचा रस घालून एका काचेच्या बोल मधे घालून, झाकून फ्रीज मधे ठेवावे. निदान तीन तास तरी लागतील.
मधनं मधनं काढून हलवून परत आत ठेवावे.
लिंबाच्या रसाने प्रक्रिया होऊन मासे 'कूक' होतात व त्यांचा पारदर्शक पणा कमी होतो.

तीन ते चार तासाने लिंबाचा रस ओतून द्यावा.
मग बारीक चिरलेले टॉमेटो, कांदा, हिरवी मिरची व अजून पाव ते अर्धा कप लिंबाचा रस, मीठ, मिरपूड घालून सगळे मिश्रण सारखे करावे व परत अर्धा तास तरी फ्रीज मधे ठेवावे.

टोर्टिया चिप्स बरोबर सर्व्ह करावे.

वाढणी/प्रमाण: 
चार ते सहा जणांना अपेटायझर
अधिक टिपा: 

किनार्‍यावरून मासे गावात नेताना ते टिकवायला म्हणून लिंबाच्या रसात बुडवायची पद्धत सुरु झाली अशी दंतकथा आहे. पोर्टॉ रिको, क्युबा, मेक्सिको, एक्वाडोर, पेरु, कोस्टा रिका या व इतर देखील मध्य्-दक्षीण अमिरेकेन भागात सेव्हिचे फार प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या देशात त्याची कृती थोडी फार बदलते.
इथे ( उत्तर अमेरिकेत ) सहज मिळणारे पदार्थ वापरून करायला ही पद्धत त्यातल्या त्यात सोपी.

माहितीचा स्रोत: 
अनेक दक्षिण अमेरिकन देशांमधली खादाडी

झटपट मेक्सिकन

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

गेल्या शुक्रवारी माझी अगदी नायजेला किंवा रेचल रे सारखी परिस्थिती झाली. ऑफिसमधून येता येता एक मित्र-मैत्रिण अन त्यांची दोन मुलं जेवायला येणार असल्याचं कळलं. घरात तयार पदार्थ काहीही नव्हते. जवळच्या पिझ्झा वाल्याने घरपोच पिझ्झा पाठवणे बंद केलंय. आता काय करावे म्हणून पँट्रीत खुडबूड करत होते. तर ब्लॅक बीन्सचा एक कॅन दिसला. त्याच्याच मागे एक चिपोटले मिरच्यांचा कॅन दिसला. मग त्या दोन कॅन्सच्या आधारे हे प्रकार केले.

साहित्य
ब्लॅक बीन्स चा कॅन १६ औंसाचा
चिकन चे ब्रेस्ट / थाय पीसेस ३-४
४ कांदे
४ टोमॅटो ( किंवा एक क्रश्ड टोमॅटो चा कॅन)
एक कॅन चिपोटले इन अडोबो सॉस
कॉर्न टोर्टिया - माणशी १०-१२
तांदूळ २ कप
तेल, व्हिनेगर, सुका ओरेगानो, अडोबो सिझनिंग ( नसल्यास काही अडत नाही )
लसूण -३-४ पाकळ्या
भोपळी मिरची १ ( किंवा सेलरी पण चालेल )- मध्यम डाइस करुन घ्यावी

क्रमवार पाककृती: 

चिकनचे तुकडे बुडतील एवढं थंड पाणी एका जाड बुडाच्या पातेल्यात घालून, त्यात चिकन व अर्धा कप बारीक उभा चिरलेला कांदा घालून शिजत लावावे. ( फ्रोझन चिकन असेल तरी चालतंय )
एखादं तेज पान घालावं.

२ कप तांदळाचा भात करून घ्यावा.
उरलेला कांदा उभा पातळ चिरावा.
लसूण सोलून बारीक चिरून घ्यावा .
टोमॅटॉ बारीक चिरून घ्यावे.

ब्लॅक बीन्स सूप साठी
एका पातेल्यात २-३ टे स्पून तेल घालून ( ऑलिव्ह ऑइल चालतंय ) त्यावर २ पाकळ्या एवढा लसूण घालावा. मिनिटभरात एक कप बारीक उभा चिरलेला कांदा घालावा. कांदा परतून त्यावर फुगी मिरची घालावी. थोडं परतून त्यावर ओरेगानो ( १ टी स्पून ) , अडोबो सीझनिंग ( १ टी स्पून ) घालावे. १-२ टे स्पून व्हिनेगर घालावा व ब्लॅक बीन्स त्यात ओतावेत. थोडं पाणी घालावं. चवी पुरतं मीठ घालून उकळू द्यावं. उकळी आल्यावर मंद आचे वर ८-१० मिनिटे ठेवावं.

चिकन टिंगा साठी
एका जाड बुडाच्या पातेल्यात २-३ टे स्पून तेलावर उरलेला लसूण थोडा परतावा. त्यावर १ कप बारीक चिरलेला कांदा घालून परतावा. कांदा मऊ झाला की टोमॅटो घालावे व कॅन मधल्या २-३ चिपोटले मिरच्या बारीक चिरून घालाव्यात. त्याच कॅन मधला रस पण २-३ चमचे घालावा. मिश्रण मिळून येईपर्यंत चिकन शिजेल. त्याचे स्किन/ हाडे काढून छोटे छोटे तुकडे करावेत ( श्रेडेड चिकन तयार असेल तर साधारण दोन कप लागेल ).
ते चिकनचे तुकडे घालून मीठ घालून सगळं मिश्रण मंद गॅसवर शिजू द्यावं १०-१२ मिनिटं.

अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, थोडी कोथिंबीर, लिंबाचा रस किंवा व्हिनेगर , मीठ हे कालवून ठेवावे. हौशी मंडळींनी अर्धी हाबनेरो मिरची बारीक चिरून टाकायला हरकत् नाही.

वाढताना एका सुप बाउल मधे थोडा भात घालावा. त्यावर ब्लॅक बीन्स वाढून त्यावर थोडे कॉर्न चिप्स कुस्करून घालावेत.

टाकोज तव्यावर थोडे गरम करून
प्रत्येक टाकोवर चिकन चे मिश्रण, कांदा व आवडत असल्यास थोडे मेक्सिकन चीझ किंवा कुठेलेही व्हाईट चीझ किसून घालावे.

सोबत प्यायला
उंच बीअर ग्लास मधे एक-२ टेस्पून लाइम जूस ( लेमन नव्हे ) , १/२ टी स्पून मीठ घालून त्यावर कुठलीही लाईट बीअर हळू हळू ओतावी - याला मिचेलाडा म्हणतात . कुठल्याही तिखट पदार्थाबरोबर एकदम मस्त !

वाढणी/प्रमाण: 
४-५ मोठी माणसे
माहितीचा स्रोत: 
मैत्रिण - टिंगा करता , वेब - ब्लॅक बीन्स करता, मित्र- मिचेलाडा करता.

सालसा वगैरे

लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रसदार टोमॅटो
लाल कांदा
कोथिंबीर
हिरवी मिरची
मीठ
लिंबु

आवडीनुसार पपई, अननस, आंबा (तोतापुरी प्रकारातला)

क्रमवार पाककृती: 

प्रकार १ -
१ वाटी बारीक चिरलेला कांदा, २ वाट्या बारीक चिरलेला टोमॅटो, १/२ लिंबाचा रस, १/२ वाटी कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरुन किंवा थोड्या भरड वाटुन. हे सगळे नीट एकत्र करुन आवडी प्रमाणे मीठ घालायचे. हा झाला 'पिको दी गायो' (Pico De Gallo) सालसा. आपल्या टोमॅटोच्या कोशिंबीरीत कूट न घालता केले तर हा प्रकार होतो. मिरच्या चविप्रमाणे कमी जास्त करायच्या.

प्रकार २ -
टोमॅटो उकळत्या पाण्यात टाकायचे १ मिनीटात बाहेर काढायचे. आणि थंड पाण्यात टाकायचे. साल काढुन टाकायची. ४ टोमॅटो, १ लहान (खुपच मोठा कांदा असेल तर साधार्ण १/४ कांदा), २ हिरव्या मिरच्या, असे सगळे चॉपर मधुन काढायचे. पुरी इतके बारीक न करता भरड ठेवायचे. आवडीप्रमाणे मीठ व कोथिंबीर घालुन थोडे लिंबु पिळले आणि मिसळले की झाला सालसा तयार.

प्रकार ३ -
पिको दी गायो मधे पपई, आंबा, अननस यापैकी एका फळाचे बारीक तुकडे करुन घालायचे.

वाढणी/प्रमाण: 
किती आवडते त्यावर ठरेल!
माहितीचा स्रोत: 
मैत्रीणी, स्वनिर्मिती, वेबसाईट