चायनीज

फंडु अंडु - २ - 'मार्बल्ड टी एग्ज' (चायना)

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

३ अंडी,
१-२ टी बॅग्ज / १ टेबलस्पून चहा पत्ती (स्ट्राँग)
१ चक्री फूल,
३-४ लवंगा,
१ मसाला वेलची किंवा ३-४ साधी वेलची
४-५ मिरी दाणे,
दालचिनीची काडी,
१ चमचा साखर
थोडा सोया सॉस

tea1.JPG

क्रमवार पाककृती: 

'वर्ल्ड एग डे'

'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे' ही जाहिरात आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. अंडी खाल्याने होणारे अनेक फायदे आहेत.

ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार हा 'वर्ल्ड एग डे' म्हणुन साजरा केला जातो. इंटरनॅशनल एग कमिशन तर्फे या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

यंदाचा वर्ल्ड एग डे या शुक्रवारी १४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने अंडी वापरुन बनवलेल्या काही पाककृती या आठवड्यात देण्याचा विचार आहे.

फंडु-अंडु - १ - 'मिनी पावलोवा' (ऑस्ट्रेलिया)


फंडु अंडु - ३ - 'मोक्का साबायॉन/झाबायोन - Mocha zabaglione ' (इटली)

फंडु अंडु - ४ - 'ग्येरन झिम - Gyeran Jjim' (कोरिआ)

फंडु अंडु - ५ - डेझर्ट - 'स्नो एग्ज' (फ्रान्स)

**************************************************************************

फंडु अंडु - २- "मार्बल्ड टी एग्ज"

tea6.JPG

'चायनीज मार्बल्ड एग्ज' किंवा 'चायनीज टी एग्ज' हा चायनामधे नेहमी खल्ला जाणारा उपहाराचा पदार्थ आहे. खासकरुन चायनीज न्यु इयरच्या वेळेस ही एग्ज खुप प्रमाणात बनवली जातात कारण अशी समजुत आहे की ही अंडी म्हणजे 'गोल्ड नगेट्सच' जणू, त्यामुळे तुम्ही जितकी बनवाल आणि दुसर्‍यांबरोबर शेअर कराल तितकी भरपूर संपत्ती तुमच्याकडे येते. एरवी देखिल टेकअवे शॉप्स मधे, रेस्टॉरंट्समधे ही टी एग्ज हमखास मेन्युवर असतात.

क्रमवार पाककृती:

१. एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे. पहिली उकळी येताच त्यात अंडी उकडायला ठेवावीत.

२. ३-४ मिनीटे अंडी उकडल्यावर डावाने/चमच्याने अंडी हलकेच बाहेर काढुन एका बोल मधे ठेवावीत व वरुन गार पाणी सोडावे.

३. अंडी हाताळण्याइतपत गार झाली की एका टीस्पूनने अंड्याच्या वरच्या कवचाला हलकेच टॅप करावे. कवचाला तडे गेले पाहिजेत पण कवच निघता कामा नये.

tea2.JPG

४. आता अंडी ज्या पाण्यात उकळली त्याच पाण्यात (खराब झाले नसेल तर) वरील सर्व मसाल्याचे पदार्थ, चहा पत्ती/बॅग्ज, साखर इ इ घालावे व त्यात ही कवच क्रॅक केलेली अंडी सोडावीत. साधारण ४० मिनीटे अंडी गरम पाण्यात राहु द्यावीत (सिमरींग टेम्परेचर).

tea3.JPG

५. साधारण ४० मिनीटांनंतर गॅस बंद करुन पातेल्यावर झाकण ठेवावे.

६. पाणी कोमट झाले की हे पाणी, त्यातला मसाला, चहा आणि अंडी एका काचेच्या बोलमधे काढुन ठेवावीत व वरुन क्लिंग रॅप लावावे. हा बोल फ्रिज मधे ठेऊन द्यावा. अधुन मधुन अंडी पाण्यात हलवावीत.

७. कमीतकमी १२ तास आणि जास्तीत जास्त ३ दिवस ही अंडी पाण्यात राहु द्यावीत.

८. अंड्याची कवचे सोलुन काढावीत. अंड्याची कवचे काढल्यावर अंड्याच्या पांढर्‍या भागावर सुंदर डिझाईन उमटलेले दिसेल. तसेच टरफलाच्या आतल्याभागावर सुद्धा सुंदर नक्षी दिसेल.

tea4.JPG

९. ही सोललेली अंडी सॅलड सोबत किंवा नुसतीच स्नॅक म्हणुन खावीत. या अंड्यांना चहाचा आणि मसाल्याचा एक सुंदर स्वाद / फ्लेवर यायला लागतो.

tea5.JPG

***************

वाढणी/प्रमाण: 
एक व्यक्ती २ अंडी हे साधारण प्रमाण
अधिक टिपा: 

- पाणी उकळताना त्यात वर दिलेल्या मसाल्यासोबत बडीशेप, थोडे धणे आणि लिंबाचे / संत्र्याचे वाळवलेले साल घालु शकता.
- ओरिजीनल रेसिपी मधे चायनीज फाईव स्पाईस (चक्री फुल, दालचिनी, शेजवान पेपर, बडीशेपेची पूड आणि लवंगा) घातले जाते. त्याचबरोबर ब्लॅक टी आणि सोया सॉस पण घालतात.
- मी साधारण आपल्या मसाल्याच्या चहाचे घटक वापरले आहेत. अंड्याला खुप सुंदर स्वाद लागला होता. खल्यानंतरसुद्धा बराचवेळ तो स्वाद जीभेवर रेंगाळत होता.
- जितका जास्त वेळ अंडी पाण्यात रहातिल तितके जास्त गडद डिझाईन अंड्यावर उमटेल आणि तितका जास्त स्वाद अंड्यात उतरेल.
- अंड्याच्या या नक्षीदार टरफलांचे काय करावे बरे???? स्मित

माहितीचा स्रोत: 
चायनीज न्यु इयरच्या वेळेस एका मासिकात आलेली पाकृ आणि माझे प्रयोग

मॅग्गी

लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाणी , मॅग्गी नुडल्स चे पॅकेट , आवडत असल्यास गाजर , हिरवे वाटाणे , उकडलेली अंडी , चिकनचे पीस वगैरे

क्रमवार पाककृती: 

१) बाजारातुन मॅग्गी नुडल्स चे पॅक विकत आणावे .
२) त्याच्यावर पाककृती लिहिलेली असते ती फॉलो करावी .

वाढणी/प्रमाण: 
एकासाठी एक पॅकेट पुरते .
अधिक टिपा: 

१) हॉस्टेलवर मित्रांच्या सोबत खायला विशेष मजा येते .सोबत चहा सिगरेट असल्यास उत्तमच !

माहितीचा स्रोत: 
मॅगी नुडल्स चे पॅकेट

जिंजर तोफू विथ व्हेजीटेबल्स

लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ गाजर
१ छोटी सिमला मिरची
१ पोर्टेबेलो मश्रूम
४ तोफूचे तुकडे (२ इंच लांब, १ इंच रुंद, १/४ इंच जाडीचे)
२ टे. स्पू. किंवा थोडे जास्तच लांब पातळ चिरलेले आल्याचे तुकडे (Ginger julienne)
१ टे. स्पू. सोया सॉस
१/२ टी. स्पू. मध किंवा साखर
मीठ
१ टे. स्पू. तेल

क्रमवार पाककृती: 

गाजराचे साल काढून लांब, पातळ तुकडे करा. सिमला मिरचीचे, मश्रूमचे लांब तुकडे करा.
सोया सॉस, मध (किंवा साखर), चिमूटभर मीठ घालून चांगले हलवून एकजीव करून घ्या.
त्यात तोफूचे तुकडे दोन्ही बाजूने बुडवून घेउन किंचीत तेलावर नॉनस्टीक पॅनमधे शॅलो फ्राय करून घ्या (थोडक्यात, कॅरमलाईज्ड करून घ्या). शॅलो फ्राय करताना तोफूतल्या पाण्यामुळे तेल उडायची शक्यता आहे त्यामुळे झाकण ठेवा. थोडे मऊसर असतानाच बाहेर काढा. बाजूला ठेवा.
त्याच पॅनमधे थोडे तेल घेउन आलं घाला. गाजर, सिमला मिरची, मश्रूम घालून भराभर हलवून टॉस करत मिक्स करा. सोया सॉस-मधाचे मिश्रण घाला. चव बघून मीठ घाला. तोफू घालून परत एकदा नीट मिक्स करा. गरम गरम सर्व्ह करा.

वाढणी/प्रमाण: 
२ लोकांसाठी
अधिक टिपा: 

मधामुळे किंचीत गोडसर चव येते. तशी आवडत नसल्यास मध/साखर घातले नाही तरी चालेल.

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोग

व्हेजीटेबल हक्का नूडल्स

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ गठ्ठे (?) बारीक (Thin) राईस नूडल्स
१ कप बारीक लांब चिरलेलं गाजर
१ कप बारीक लांब चिरलेला कोबी
१ कप पातळ 'स्लाईस' केलेले मश्रूम्स
१ कप बारीक लांब चिरलेली सिमला मिरची
१/२ कप कांद्याची बारीक चिरलेली पात
आवडत असल्यास थोडी कॉलीफ्लावरची छोटी केलेली फुलं
३ टे. स्पून सोया सॉस
१/२ टि. स्पू. किंवा आवडीप्रमाणे पांढरी मिरी पावडर. (काळी मिरी पावडर वापरल्यास चव बदलेल)
४-५ लाल सुक्या मिरच्या
१ टे. स्पू. बारीक चिरलेला लसूण
मीठ
२ टे. स्पू. तेल

क्रमवार पाककृती: 

मोठ्या भांड्यात भरपूर पाणी घेऊन त्यात मीठ घालून उकळी आणावी. पाणी उकळल्यावर त्यात नूडल्स घालून हलवावे. साधारण चार पाच मिनीटांनी पाणी काढून टाकून नूडल्स, दुसर्‍या एका मोठ्या भांड्यात भरपूर थंड पाणी घेऊन त्यात टाकाव्यात. नूडल्स पाण्यात साधारण अर्धा तास तरी ठेवाव्यात. त्यामुळे स्टार्च निघून जाऊन अजिबात चिकटपणा रहात नाही आणि नूडल्सना तेल वगैरे लावायची गरज पडत नाही.
मोठ्या 'वॉक'मधे किंवा कढईमधे तेल घेऊन त्यात बारीक केलेला लसूण घाला. गॅसची आच मोठी असू दे.
मिरच्यांचे तुकडे करून घाला.
सगळ्या भाज्या घालून भराभर हलवून सोया सॉस, मिरपूड, मीठ घाला.
परत एकदा भराभर हलवून पाणी निथळलेल्या नूडल्स घाला. गॅस बंद करून नीट मिसळून घ्या. वरून बारीक चिरलेली कांद्याची पात घाला.

DSCN0955.JPG

वाढणी/प्रमाण: 
४ लोकांसाठी
अधिक टिपा: 

१. कुठलाही चायनीज पदार्थ करताना गॅसची आच मोठी असावी.
२. पसरट कढई किंवा वॉक मधे पदार्थ करावा.
३. भराभर हलवून 'टॉस' करत भाज्या, नूडल्स मिसळावेत.
४. आवडत असल्यास ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस घालून करू शकता. चव थोडी वेगळी येईल.
५. हवा असल्यास चिमूटभर अजिनोमोटो घालून करू शकता. चव रेस्टॉरंटसारखी येईल.
६. यात शक्यतो आलं घालू नका.

माहितीचा स्रोत: 
मूळ कृती व १-३ टिपा: संजीव कपूर, स्वप्रयोग

व्हेजीटेबल मनचॉव सूप

लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धी वाटी बारीक चिरलेला कोबी
अर्धी वाटी बारीक चिरलेला कॉलीफ्लॉवर
अर्धी वाटी बारीक चिरलेलं गाजर
अर्धी वाटी बारीक चिरलेले मश्रूम्स
अर्धी वाटी बारीक चिरलेला तोफू (ऐच्छिक)
अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा
अर्धी वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात
१ टे. स्पू बारीक चिरलेला लसूण
१ टे. स्पू बारीक चिरलेलं आलं
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
२ टे. स्पू. डार्क सोया सॉस
१ टि. स्पू. स्वीट चिली सॉस
२ टे. स्पू. केचप (टोमॅटो सॉस)
१ टि. स्पू. चिली सॉस
१ टि. स्पू शेजवान सॉस
चार कप व्हेजीटेबल स्टॉक किंवा १ व्हेजीटेबल bouillon cube
१ टे. स्पू. कॉर्नफ्लावर
१ टे. स्पू. तेल
चवीसाठी मीठ

क्रमवार पाककृती: 

तेलावर कांदा परतून घ्या.
लगेच लसूण, आलं घालून परता.
गाजर, कोबी, फ्लॉवर घालून परतून चार कप व्हे. स्टॉक किंवा पाणी + व्हे. bouillon घालून सगळे सॉस घाला. चव बघून मीठ, लागल्यास अजून सॉसेस घाला.
उकळी आल्यावर कॉर्नफ्लावर पाण्यात मिसळून सूप मधे घाला.
गॅस बंद करून गरम गरम सर्व्ह करा. वरून कांद्याच्या पातीने सजवा.

DSCN0953.JPG

वाढणी/प्रमाण: 
२-३ लोकांसाठी
अधिक टिपा: 

१. यात हवं असल्यास अजिनोमोटो घालू शकता. रेस्टॉरंटमधे मिळणार्‍या सूपच्या जवळपास चव येते. मी घालत नाही.
२. नॉनव्हेज सूप हवं असल्यास चिकन स्टॉक वापरा आणि शिजवलेल्या चिकनचे तुकडे घाला.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट, पाककलेची पुस्तकं आणि स्वप्रयोग

.

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

माहितीचा स्रोत: 
.

चायनीज व्हेज फ़्राईड राईस

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खाली पाककृतीत पहा

क्रमवार पाककृती: 

चायनीज फ़्राईड राईसची हि माझी ट्राईड आणि टेस्टेड रेसिपी.

तयार स्टॉक क्युब्ज वापरणार असाल तर ठिकच, पण घरी स्टॉक करण्यासाठी. कोबी फ़्लॉवरचा मधला दांडा, फ़रसबी, गाजर, कांदा अश्या भाज्या, लाल भोपळा दुधी भोपळा यांची साले. पालक माठ वैगरे भाज्यांचे ठेचुन घेतलेले देठ वैगरे एकत्र करुन ऊकळावे. त्यात एकादे तमालपत्र व मिरिपुड घालावी. हे सगळे कुकरमधे एकत्र शिजवले तरी चालेल. मग यातले फक्त पाणी गाळुन घ्यायचे.
दोन वाट्या तांदुळ घेतला तर सहा वाट्या पातळ स्टॉक लागेल. दोन वाट्या तांदुळ धुवुन निथळुन घ्यावे. मग हा स्टॉक ऊकळत ठेवावा. त्यात तांदुळ घालावेत. अधुन मधुन तळापासुन ढवळावे. तांदुळ एकमेकाना चिकटणार नाहीत ईतपत स्टॉक असावा. त्यात एखादा चमचा व्हिनीगर पण घालावे. थोड्या थोड्या वेळाने भाताचे शीत शिजले का ते बघावे. हा तांदुळ पुर्ण शिजवायचा नाही. किंचीत कणी ठेवायची.
मग लगेच सगळे एका मोठ्या गाळणीत ओतावे. गाळणी वरखाली करुन पुर्ण पाणी निथळु द्यावे. अर्धा चमचा कच्चे तेल भातला अलगद हाताने चोळावे. हा भात आधी करुन फ़्रीजमधे ठेवला तर चांगले.
आता यात घालायच्या भाज्यांसाठी, कोबी, कोवळी फ़रसबी, केशरी गाजर, सिमला मिरची, लीक, कांदे व त्याची पात, बेबी कॉर्न. मश्रुम असे जितके जमेल तितके बारिक कापुन ठेवावे. या सगळ्या भाज्या मिळुन, शिजलेला भात जेवढा असेल, म्हणजे साधारण चार वाट्या एवढे असावे. वेगळ्या चवीसाठी, मुगाचे कोंब, वांग्याचे तुकडे, सोया मीन्स, टोफु, पनीर हे पण घेता येईल.
अर्धा ईंच आले, व चार पाच लसुण पाकळ्याहि बारिक चिरुन घ्याव्यात.
एका पसरट भांड्यात तेल गरम करुन त्यात हिंग घालावा. मग त्यात आले लसुण, परतावा. आवडत असेल तर एखादी लाल व हिरवी मिरचीदेखील परतावी. मग क्रमाक्रमाने भाज्या घालाव्यात. वांगी, पनीर, सोया मीन्स, टोफु वैगरे वेगळे परतुन घ्यावे लागेल. सर्व भाज्या मध्यम जाळावर भराभर परताव्या. मग त्या आधी तयार केलेल्या भातात काट्याने मिसळुन घ्याव्यात. भातात त्या नीट मिसळल्या कि एका वेळेस थोडे थोडे करत हे मिश्रण परत गरम करावे. मीठ घालावे.
वरुन सोया सॉस, व्हीनीगरमधली मिरची, चिली ऑईल वैगरे घ्यावे. हे प्रत्येकाने आपापल्या चवीप्रमाणे घ्यावे.

माझा आवडता एक सॉस. दोन मोठे चमचे भरुन होईल एवढी लसणाची पेस्ट, एक मोठा चमचा लाल तिखट, चमचाभर सोया सॉस, दोन मोठे चमचे व्हीनीगर तयार ठेवावे. खोल कढईत दोन चमचे तेल गरम करुन त्यात चमचाभर साखर घालायची. साखर विरघळुन सगळ्या मिश्रणाला सोनेरी रंग आला कि तिखट घालावे, लगेल व्हीनीगर घालुन ऊकळु द्यावे. व्हीनीगरचा वास जाऊन, तिखटाचा वास येऊ लागला कि गॅसवरुन ऊतरावे. व जरा वेळाने लसणीची पेस्ट घालावी. सोया सॉस घालावा व नीट ढवळुन घ्यावे. हा प्रकार भात, स्प्रिं रोल, दिम सुम सगळ्याबरोबर चांगला लागतो. तिखटाचे प्रमाण आपल्या चवीप्रमाणे वाढवायला हरकत नाही.

माहितीचा स्रोत: 
दिनेश यांनी जुन्या हितगुजवर दिलेली पाककृती