कणीक सव्वा वाटी
बेसन पाऊण वाटी
कोथिंबीर, चिरुन मूठभर
हिरव्या मिरच्या बारीक चिरून २-३
जिरे, हळद, हिंग, मीठ, तेल, तूप, तांदळाची पिठी
१) एक वाटी कणीक घेऊन त्यात तेलाचे मोहन व मीठ घालून पराठ्याला भिजवतो त्यापेक्षा थोडे सैल भिजवा
२) थोडे तेल गरम करुन त्यात जिरे व हळद टाका. हिंग टाका, मग चिरलेली मिरची व कोथिंबीर घालून जरा परता.
३) बेसन टाकून थोडेच परता. मग आचेवरुन उतरुन त्यात राहिलेली पाव वाटी कणीक घालून, गरम पाण्याने मळून घ्या. वरुन थोडासा तेलाचा हात लावावा लागेल.
४) मग कणकेचे, साधारण सुपारीएवढे बारा गोळे करा.
५) बेसनाच्या मिश्रणाचे तेवढ्याच आकाराचे नऊ गोळे करा.
६) त्यांना हाताने दाबून पेढ्यासारखा आकार द्या, आणि हातानेच ते चरा चपटे करा.
७) मग आधी एक कणकेची लाटी घ्या, त्यावर तेलाचा पुसटसा हात लावून चिमूटभर पिठी लावा, त्यावर बेसनाची लाटी ठेवा, त्यावर तेल व पिठी लावून, कणकेची लाटी ठेवा. असे करत चार कणकेचे व तीन बेसनाचे गोळे वापरा. म्हणजे एकंदर सात थर झाले.
८) शक्य झाल्यास सर्वात वरची व सर्वात खालची कणकेची लाटी थोडी मोठी घ्या. त्या हातानेच जरा विस्तारून कडा बंद करता आल्या तर बघा.
९) आता दोन तळव्यांनी हि लाटी जरा दाबून घ्या आणि पिठीवर अलगद हाताने तळव्याएवढी लाटा.
१०) अगदी मंद आचेवर दोन्हीकडून सोनेरी भाजून घ्या. भाजताना शेवटच्या टप्प्यात तेल सोडा. तेल लावताना हवे तर काट्याने टोचा म्हणजे आता तेल जाईल.
११) छुंदा वा दह्याबरोबर खा. वरुन तूप घ्या
मुंबईला ताडदेवला स्वाती नावाचे एक हॉटेल आहे. तिथे खास गुजराथी पदार्थ मिळतात. तिथे खुप वर्षांपुर्वी सात घडीची पोळी खाल्ली होती. ती कल्पना मला आवडली होती, पण ती पोळी पूर्ण कणकेचीच असल्याने चव मात्र खास नव्हती. त्या कल्पनेचा मी केलेला विस्तार.
हा प्रकार करायला थोडेफार कौशल्य हवे. तूम्हाला पराठा नीट लाटायचा सराव हवा, त्यामूळे घाईगडबडीत हा पदार्थ करता येणार नाही.
तसेच भाजताना पण मंद आचेवरच भाजले पाहिजे, तरच आतले थर भाजले जातील.
बेसनाच्या जागी बाकीची पिठे पण वापरता येतील, अनेक पिठांचे थर करता येतील, तांदूळ, ज्वारी बाजरीची पिठे घेतलीत तर उकड काढावी लागेल.
उकडून कूस्करलेले गाजर, बटाटा, बीट वगैरे घेऊन, त्यात पिठ मिसळून, एकेक थर करता येतील.
घेताना गोळ्या लहानच घ्याव्यात, कारण सात गोळ्यांची मिळून एक पोळी लाटायची आहे. सात लाटण्याचा आत्मविश्वास नसेल, तर तीन, पाच अशी सुरवात करता येईल.
एकंदर सुगरणपणा ज्यादिवशी दाखवायचा असेल, त्यादिवशी या रोट्या करायच्या !!


