सांस मे सांस आये ना - झील आमिन

Submitted by बेफ़िकीर on 13 May, 2013 - 04:52

बावीस सेकंदात सनकोट काढणे, स्कार्फ काढणे, केस झटकणे, पर्स खांद्याला लटकवणे, उकडत असल्यामुळे सुस्कारे सोडणे, गर्दीमुळे अंग चोरणे, मागच्यांना पुढे जाऊ देणे, आत येणार्‍यांमुळे वैतागणे, कोणालातरी गुड मॉर्निंग म्हणणे, काहीतरी गुणगुणणे आणि मला डोळा मारणे एवढ्या क्रिया करता येतात अशी एकच जागा होती आमच्या ऑफीसला. लिफ्ट! लिफ्टच्या आत शिरताना असलेले तिचे स्वरूप चौथ्या मजल्यावर बाहेर पडताना पूर्णपणे बदललेले असायचे. चौथ्या मजल्यावर ती लिफ्टमधून बाहेर पडली की त्या मजल्याच्या नुसते अंगात यायचे. 'पुल' असे स्पष्ट लिहिलेले दार ती कायम 'पुश' करूनच उघडायची आणि ऑफीसच्या थंड एसीला घाम फुटायचा. दारात उभा असलेला चपराशी एरवी स्माईल करणे ही एक अशक्यप्राय बाब मानत असला तरी ती आत घुसताना तोंडभरून हसत सलाम ठोकायचा आणि ते पाहून ऑफीसमधल्या अधिकच थंड केबीनमध्ये बसलेल्या मनोज सिंगचा जळफळाट व्हायचा. हा असला सलाम कधी त्याच्याही नशिबी नव्हता हेड ऑफ द डिपार्टमेंट असून. ती चपराश्याला 'हाय ट्टमेटो, च्चाय बोल्दो' असे म्हणत आत जायची. टोमॅटोसारखे लालबुंद गाल आणि पिचपिचे डोळे असलेला चपराशी तिच्यासाठी खास 'टपरी चहा' मागवायचा. ऑफीसमधले बाकीचे ऑफीसमधल्या मशीनचा थर्ड क्लास चहा प्यायचे तेव्हा ती फुर्र फुर्र करत हातगाडीवरचा चहा प्यायची. एसीला घाम फुटण्याचे कारण निराळे असायचे. ही एकदाची आली की ऑफीसमध्ये इतकी वादळी हालचाल सुरू व्हायची की त्या एसीची क्षमताच पुरी पडायची नाही. ही आली की आधी रिसेप्शनच्या कोपर्‍यात बसून पेपर्स चाळायची. किती? दिड ते दोन मिनिटे. आणि तिचे पेपर चाळणे संपले की सगळ्याच्या सगळ्या माना तिच्याकडे वळायच्या. ती ताडकन उठायची आणि गेली साडे तीन वर्षे त्या ऑफीसचा प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक डेस्क, प्रत्येक खुर्ची, सर्व भिंती, घड्याळे, कंप्यूटर्स आणि खिडक्या त्यावेळी जे वाक्य ऐकण्याच्या पोझिशनमध्ये यायचे तेच वाक्य त्याच क्षणी नेहमीइतक्याच उत्साहाने आणि कोणतीही अनैसर्गीकता न डोकावू देता ती खणखणीतपणे उच्चारायची.

"जीव द्या लेकांनो"

एकदाचे हे वाक्य कानांवर आपटले की सातमजली हास्याने ऑफीस दुमदुमायचे आणि जणू पार्टी सुरू झाल्यासारखे ऑफीसचे काम सुरू व्हायचे.

"वैशाली... काऊंट?"

"सोळा मॅम"

"बिलिंग"

"वन पॉईंट फोर टू"

"टूडे?"

"सिक्स इंडेंट्स"

"अ‍ॅव्हेलेबिलिटी?"

"नाईन"

"व्हॅल्यू?"

"पॉईंट सेव्हन्टी नाईन"

"पेपर टाक, तीन महिन्याचा पगार घेऊन जा सरदारजीकडून"

वैशाली हे वाक्य ऐकून लाजरे हासत कामात डोके खुपसायची. गेली साडे तीन वर्षे ती हेच वाक्य याच वेळेला ऐकत लाजत होती. वैशालीने काय रिअ‍ॅक्शन दिली आहे हे पाहण्याचेही कष्ट न घेता ती शेजारच्या दलजीतला कोलायची.

"बसण्याचा पगार आहे का तुला?"

"चार मीटिंग्ज ठरल्या आहेत"

किती मीटिंग्ज ठरल्या आहेत हेच तिला हवे असायचे. पण तसे सरळ विचारणे अडीच पावणे तीन वर्षांपूर्वीच बंद पडलेले होते. त्यासाठी त्याच अर्थाचा एक नवा प्रश्न विचारला जाऊ लागला होता. 'बसण्याचा पगार आहे का तुला?'!

"गांधी, बांगड्या भर हातात"

"चालतंय"

गांधीचे ठरलेले उत्तर! ऑफीसमध्ये व्हिजिटर म्हणून कोणी पहिल्यांदाच आलेले असले तरीही तिच्या या सुरुवातीच्या संवादांमध्ये काडीचा फरक पडायचा नाही. गांधीला बांगड्या भरायला सांगणे आणि त्याने 'चालतंय' म्हणणे यात कोणालाही काहीही वाटायचे नाही. गांधी स्टार परफॉर्मर होता.... आणि ती?...

.... ती सुपरस्टार होती...

गांधीसाठी कासार सुचवा असे मेहेंदळ्यांना सांगत मनोज सिंग या सरदारजीच्या केबीनचा दरवाजा डाव्या खांद्याने ढकलत आत शिरतानाच "मॉर्निंग हँडसम" असे ओरडत ती साहेबासमोर बसायची तेव्हा मनोज सिंग कोलकात्याच्या झोनल मॅनेजरला फोनवरून सोलत असायचा. मनोज सिंग तिच्या त्या 'मॉर्निंग हँडसम'वर नुसताच उजवा हात हालवून तिला समोर बसायला सांगायचा तेव्हा ती बसून काचेतून दुसर्‍यांदा माझ्याकडे पाहायची. माझ्या छातीत कळा येण्याची तेव्हा दोन कारणे होती. एक म्हणजे हृदय चालू असणे... आणि दुसरे म्हणजे तीही 'चालू' असणे...

ती... एक वादळ.. झील आमिन! पाच सात! कडक फॉर्म! प्लेन, कोणतेही डिझाईन नसलेले ड्रेसेस! ओढणी फक्त आत्महत्या करण्यासाठी अस्तित्वात आलेली बाब आहे यावर ठाम विश्वास असल्याने एकाही ड्रेसला ओढणी नाही. तोंडाचा पट्टा अविरत चालू. समोर येईल त्याला पहिला कोलायचा. लग्न झाले आहे की नाही हेच कळू नये असे वागणे. नॉनव्हेज जोक्स स्वतःच सर्वांदेखत सांगणे आणि ते सांगताना स्वतः अजिबात न हासणे किंवा लाजणे! दहापैकी सहा बोटात रिंग्ज. गळ्यात रोज काहीतरी वेगळे. दोनच नखे वाघिणीसारखी वाढलेली. हलकासा मेकअप. चालताना हिल्सचा आवाज जरूरीपेक्षा खूपच जास्त. ती आली आहे हे शंभर फुटांवरूनही कळावे म्हणून की काय कोणास ठाऊक! वय, पोझिशन काहीही न बघता ताडताड बोलणे. मोठमोठ्या साहेबांना निर्भीडपणे विश करून त्यांच्यासमोर हवापाण्याचे विषय काढून बसणे! ऐकीव माहितीनुसार लफडेबाज! स्त्रीत्वाचे एक अत्यंत अनोळखी स्वरूप! झील आमिन! सुपरस्टार! त्या ऑफीसची फुफ्फुसे, हृदय आणि मेंदू तिच्या एकटीत सामावलेले आणि बाकीचे अवयव मनोज सिंग आणि इतर आलतूफालतू जण सांभाळत बसणार! पाहताक्षणीच जिच्याबद्दल जबरदस्त आकर्षण वाटावे आणि तिच्याशी ओळख होताक्षणीच ते आकर्षण पूर्णपणे विरून एक दडपण मनावर यावे अशी ती! पंचेचाळिशीच्या मेहेंदळ्यांना एकदा सर्वांदेखत म्हणाली होती. लग्न करा, किती दिवस पलंगाच्या दोन्ही बाजूंनी उतरणार? मेहेंदळेंच्या त्या भागात एवढा दम नव्हता की ते म्हणतील की बये तू असशील लफडेबाज, म्हणून इतरांनी लग्न करावेच असे कुठे आहे? दुसर्‍याला जमीनदोस्त करण्यावर तिच्या आयुष्याचा डोलारा यशस्वीपणे उभा होता. मी कराटे शिकलेली आहे हे ती कोणालाही कधीही काहीही संबंध नसताना सांगायची. एकदा 'ट्टमेटो' रजा मागायला आला त्याला म्हणाली रजा कशाला हवी? तर तो म्हणाला बीवी पेटसे है, डॉक्टरके पास लेके जाना है! ही त्याच जोमदार आवाजात म्हणाली. पहिलेही दो बच्चे है ना तेरे? शरम कर टमाटर, शरम कर! 'ट्टमेटो' स्वतःच प्रेग्नंट असल्यासारखा लाजला हे मी पाहिले. रजेच्या अर्जावर सही करताना सुस्कारा सोडत आणि स्वतःच्या छातीच्या हालचालींनी ऑफीस डचमळवत म्हणाली, देशकी बढती आबादी की वजह, पंजाब कार्बो प्रॉडक्ट्सका टमाटर!

झील आमिन!

मला त्या कंपनीत तीन महिन्यांसाठी टेबल स्पेस मिळाली होती कारण आमचा प्लँट तिथून शिफ्ट होणार होता. वास्तविक झील आमिनच्या ऑफीसशी माझा काहीच संबंध नव्हता. पण तिथे बसायचे असायचे. मी तिथे बसायला लागलो आणि त्या दिवसापासून आयुष्यातील कित्येक गोष्टी शिकलो. पैशाकडेच पैसा खेचला जातो असे म्हणतात. तसेच एनर्जीकडेच एनर्जी खेचली जाते. झील तेथील एनर्जी सोर्स होती. ती त्या वातावरणात इतकी एनर्जी ओतायची की त्यातून तिचीच एनर्जी पटींनी वाढत राहायची. माणूस ऑफीसमध्ये सकाळी सर्वाधिक फ्रेश आणि संध्याकाळी सर्वाधिक वैतागलेला असतो. झील संध्याकाळी परफॉर्मन्सच्या लाटा डोंगराएवढ्या करून दाखवायची. आश्चर्य म्हणजे एकही चेहरा वैतागलेला नसायचा. तिचे नुसते बोलणेच असे होते की माणसाला वीज मिळावी. कुठून ही विद्या तिने हस्तगत केली होती माहीत नाही. दुसरी गोष्ट जी मी शिकलो ती ही की स्त्रीने ठरवले तर कितीही बोल्ड वागूनही आपल्या वागण्याचा अजिबात गैर अर्थ निघणार नाही हे ती एन्शुअर करू शकते. झीलबाबत 'तसे' विचार निदान ऑफीसमधील कोणाच्याही मनात येणे अशक्य होते. इव्हन कस्टमर्स, इतर व्हिजिटर्स, तिला ओळखणारे असोसिएट्स, यांच्यापैकी कोणालाही विचारले की 'झील आमिनबद्दल तुमचे काय मत आहे' तर थोड्याफार फरकाने उत्तर तेच यायचे. 'शी इज एव्हरीथिंग देअर'! 'शी इज द होल अ‍ॅन्ड सोल'!

एकदा मी कोणी बघत नाही असे पाहून लिफ्टमध्ये तिला स्वतःहून डोळा मारून पाहिला. लिफ्टमध्ये काही बोलली नाही. ट्टमेटोला 'चाय बोल्दो' म्हणत आत घुसली आणि मागून मी 'पुल' करून आत गेल्यावर म्हणाली. "कटककर, तारा पान माहितीय का तुम्हाला?" "ऐकून आहे, का हो?" "तिथे खेमराज म्हणून नेत्रशल्यविशारद आहेत. पोरींना पाहून ज्यांचे डोळे लवतात त्यांचे डोळे ते दुरुस्त करतात"! हे वाक्य ऐकू आलेला मनोज सिंगसुद्धा हासला आतमध्ये! मी एक क्षणभर घाम फुटल्यामुळे थिजलो होतो. पण विचार केला, च्यायला ही येताजाता मला डोळे मारते, मी एकदा मारला तर ऑफीसमध्येच लाज काढतीय माझी? मीही किंचित धीर करत म्हणालो. "तुम्हीच जा त्यांच्याकडे, एकाच पेशंटवर एक सर्जन आयुष्यभर टिकू शकतो असे एक नवीन रेकॉर्ड तरी होईल"! त्यावर सर्वांदेखत माझ्या पाठीत बुक्की मारत म्हणाली. "मी तुम्हाला डोळा मारत नसते, एकाच डोळ्याने बघते तुमच्याकडे, बारीक लक्ष ठेवावे लागते घरापासून लांब एकटे राहणार्‍यांवर!" वर स्वतःच खदाखदा हासत सगळ्यांकडे बघत म्हणाली...

"जीव द्या लेकांनो"

आणि ऑफीसमध्ये जीव आला.

झील आमिन पंजाब कार्बोचा श्वास होती.

एकदा सकाळी काय झाले कोणास ठाऊक! ती जागेवर येऊन बसताक्षणी वादळी वेगाने मनोज सिंग बाहेर आला आणि तिला वाट्टेल तसा बोलला. काहीतरी मोठा घोळ झाला होता. कसल्यातरी अ‍ॅग्रीमेन्टमध्ये असायलाच हवेत ते दोन क्लॉजेस घेतलेच गेले नव्हते आणि दोन्हीकडून अ‍ॅग्रीमेन्ट्स साईनही झालेली होती. मी सव्वा महिन्यात पहिल्यांदाच झील आमिनने मान खाली घालून सगळ्या स्टाफसमोर बॉसच्या शिव्या ऐकून घेतलेले पाहिले. वातावरण भयानक तंग झाले होते. या अश्या बाईला कोणी असे आणि इतक्याजणांसमोर बोलू शकत असेल यावरच माझा विश्वास बसत नव्हता. पण मनोज सिंग ही काय ताकद असेल हे मात्र मला त्यादिवशी जाणवले. झील आमिनचा चेहरा पडलेला नव्हता, ती धुसफुसतही नव्हती, पण तिच्या चेहर्‍यावर प्रचंड विषाद होता. चूक आणि आपल्याकडून झाली? याचा विषाद!

तो दिवस आणि पुढचे चार ते पाच दिवस, झील एखाद्या सामान्य कर्मचार्‍याप्रमाणे वागत होती. काही जानच नव्हती वातावरणात. हळूहळू तंगता निवळली. तसा झीलचा पांढरा शुभ्र ड्रेस तिच्या अतीदीर्घ श्वासाने तंग झाला आणि हालचालींनी ऑफीस डचमळवले जाऊन अनेक दिवसांनी एक नेहमीसारखे वाक्य ऐकायला मिळाले.

"कामं करता का हजामती?"

फस्सकन हासलं पब्लिक! झील वॉज बॅक, बॅक इनटू अ‍ॅक्शन!

ती माझ्याशी असे काही बोलणे शक्यच नव्हते. सरळ कारण म्हणजे आम्ही एका ऑफीसमधले नव्हतोच. त्यामुळे कामाचा काही संबंधच नव्हता. आणि दुसरे म्हणजे आमच्यात काही मोकळेपणा निर्माण व्हावा याचाही काही संबंध नव्हता. लंचला मी बाहेर जायचो, ती टिफिन घेऊन यायची. मी शेअर ऑटो, ज्याला त्याकाळी औरंगाबादेत 'प्यागो' म्हणायचे त्यात बसून यायचो, ती स्कूटर घेऊन यायची. ती ऑफीसमध्ये सात सात, आठ आठ वाजेस्तोवर थांबायची आणि मी त्या ऑफीसचा नसल्याचमुळे साडे पाचला 'बाय' करून बाहेर पडायचो. ती रात्री तिच्या घरी करून जेवायची आणि मी रोज तेच तेच मेन्यू कार्ड पूर्ण वाचून आधी ठरवलेलीच ऑर्डर द्यायचो, शेवभाजी, दोन रोटी आणि हाफ राईस. कधी एखादी वाटी दही वगैरे! ती 'घरात' राहायची, मी हॉटेलवर! मी शनिवार रविवार पुण्याला यायचो ती शुक्रवारी, म्हणजे औरंगाबादच्या वीकली ऑफच्या दिवशी घरात पडून असायची.

एक दिवस सकाळी तिने पेढे वाटले. सँट्रो घेतली म्हणून. दुसर्‍या दिवशी ऑफीसला उशिरा आली. एक वाजता आली. का तर म्हणे सँट्रो ठोकली म्हणून! मधेच दोन दिवस भटिंड्याला जाऊन आली, एम डीं नी बोलावले म्हणून! येताना पुन्हा पेढे आणले. प्रमोट झाली म्हणून! झील आमिनच्या या विश्वाचे प्लेन माझ्या विश्वाच्या प्लेनशी कुठेही लिंक्ड नव्हते, आम्ही कोप्लेनरही नव्हतो. आमच्यात असलेल्या या अंतरामुळेच आमची पुरेशी ओळख होत नव्हती. आणि कोणालाही तिच्याशी पुरेशी ओळख होईपर्यंत तिचे जबरदस्त आकर्षण वाटत असे तसेच मलाही वाटत होते. चिंतन करत आहे असे दाखवत मी तिचे कर्व्हज बघत स्वतःला गरगरवून घेत बसायचो. तिचे लक्ष गेले की ती दुर्लक्ष करायची. मग हळूहळू दोघांचेही एकमेकांकडे लक्ष जाऊ लागले. हळूहळू लक्ष लागण्याची वारंवारता वाढली. मग मी तिच्या ऑफीसला येण्याची अपेक्षा करू लागलो. तिच्या त्या एकहाती उभारलेल्या वादळातील एक कस्पट बनण्याचा मनोज्ञ अनुभव चाखू लागलो. माझ्यातील हे बदल झील आमिनसारख्या अतीचाणाक्ष स्त्रीला समजले नसले तरच नवल. पण अर्थातच, माझ्यातील हे बदल तिला आवडलेले नव्हतेच. का आवडावेत? असले सतराजण तिने आजवर पाहिलेले असतील. ऐकीव माहितीनुसार काही जण तर अगदी जवळूनही पाहिलेले असतील. मी आज आहे उद्या नाही कॅटेगरीतला होतो. 'सुबहा पहली गाडीसे, घरको लौट जाओगे' या सदरात मोडत होतो.

पण सप्ताह संपण्याचे काँबिनेशन जरा विचित्र वाटू लागले आता मला. ती गुरुवारी वीक एन्डच्या मूडमध्ये यायची. शुक्रवारी ऑफीसला नसायचीच. मी शुक्रवारी चारची बस घेऊन पुण्याला निघायचो तो सोमवारी साडे अकराला ऑफीसला पोचायचो. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी पाच ते सोमवारी सकाळी साडे अकरा असे जवळपास साडे तीन चार दिवस, म्हणजे जवळपास अर्धा आठवडा झील आमिनच्या प्रपातापासून लांब राहणे आता मला नीरस वाटू लागले. इतके, की पुण्यावर अफाट जीव असूनही औरंगाबादलाच थोडेसे जास्त थांबावेसे वाटू लागले. माझ्यातील भ्याड स्त्रीलंपट धीट होऊ लागला. इंचाइंचाने झील आमिनच्या विश्वात पाय टाकता येतो का हे तपासू लागला. माझे पुढे सरकणे हे त्यावेळी तिच्यासाठी इतके हार्मलेस होते की त्यातील अर्थ तिच्या तरबेज मनाला माहीत असला तरीही त्याकडे ढुंकूनही पाहण्याची तिला गरज नव्हती. पूर्णपणे हार्मलेस शैलीने एखाद्याच्या विश्वात स्वतःला घुसवण्याच्या कलेत मी किंचित सराईत झालो होतो. किंबहुना, तोच माझा स्वभाव असल्याने माझ्याकडून ते आपोआपही झाले असेल. याचा परिणाम असाही व्हायचा की आपण ज्या व्यक्तीच्या आयुष्यात हार्मलेसली घुसत आहोत ती व्यक्ती आपल्या आयुष्यात मात्र अत्यंत जोमदारपणे घुसत आहे हे लक्षात यायचे आणि तरीही तेच हवेसे वाटायचे. ज्याच्या मनावर आपण थोडेसे तरी व्यापावे असे वाटायचे तो आपल्या मनावर पूर्ण व्यापलेला असतो हे समजायचे, पण आपला त्या व्यक्तीच्या मनात प्रवेश होण्यासाठी ते अत्यावश्यकच ठरायचे.

माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीही नाही असे दाखवून दुसर्‍याचे लक्ष आपल्याकडे वळवण्याच्या शाळकरी वयात आम्ही दोघेही नव्हतो. हे वय असे होते की येथे सुस्पष्ट नोंदी करणे व जबाबदारीने विधाने करणे हे शोभेलसे ठरले असते. खास तुझ्यासाठी म्हणून मी यावेळी पुण्याला गेलो नाही असे तिला सांगून तिने अचानक माझ्या गळ्यात हात टाकावेत असल्या टुकार कल्पना मनाला शिवत नव्हत्या. खरे तर, मी पुण्याला गेलो तरच औरंगाबादला परत येण्याची लज्जत अधिक आहे हे समजण्याचे ते वय होते. एखादी गोष्ट हवीहवीशी असण्यासाठी ती अप्राप्य असणे आवश्यक असते. जसे एखादी गोष्ट नकोनकोशी होण्यासाठी तिचे अतिरेकी आपलेसे असणे आवश्यक असते.

नात्यांचा प्रवास दिलचस्प असतो खरा, पण त्यात स्वतःहून दिलचस्पी ओतण्याची खुमारी औरच. दुसर्‍याला सुखद धक्के देणे नात्यातील वीण कितीतरी अधिक घट्ट करू शकते. हे सगळे ठीकच, पण दुसर्‍यासाठी काहीतरी सोसणे, ते त्याला माहीतच होऊ न देणे आणि त्या सोसण्यामुळे त्या दुसर्‍याच्या आयुष्यात कोणतातरी आनंद निर्माण झालेला असणे आणि शेवटी त्याला हे कळणे की आपला हा आनंद या दुसर्‍याच्या सोसण्यातून निर्माण झालेला आहे, हे नात्याला सार्वकालीनत्व बहाल करते.

असा कोणताही प्रसंग आमच्यात निर्माण करणे स्वतःहून शक्य नव्हते. पण नशिबानेच कधी तसा प्रसंग निर्माण झाला तर मी ती संधी हुषारीने वापरणार होतो.

कोणत्याही माणसाची कोणतीही क्षुल्लक कृतीदेखील निर्हेतूक असू शकत नाही यावर माझा विश्वास आहे. अगदी आपण सहज बसल्याबसल्या हाताची बोटे कडाकडा मोडतो हेही. त्यातून त्या बोतांच्या हाडांशी साचलेले रक्त पुन्हा प्रवाहात आल्यामुळे मिळणारा तात्पुरता उत्साह हाच फक्त महत्वाचा नसतो, तर त्या बोटांचा होणारा आवाज कानांवर पडणे हेही महत्वाचे असते. त्या आवाजाने 'आज किती काम पडलं मला' अशी एक जाणीव उगीचच मनात निर्माण होते आणि आपले आपणच सुखावतो. खरंच काम पडलं की नाही हे आपण चेक करत बसत नाही. वाटणे आणि वाटून घेणे या दोन बिंदूंमध्ये सर्व व्यक्तिमत्वे वेगवेगळ्या ठिकाणी फिट झालेली असतात. अब्जावधी माणसांची अब्जावधी व्यक्तिमत्वे याच दोन बिंदूंमधील रेषेवर कुठेतरी असतात आणि तरीही एकही व्यक्तिमत्व दुसर्‍या व्यक्तिमत्वाला नुसते स्पर्शही करू शकत नाही इतके लांब असते.

आपल्याला काहीतरी आपोआप वाटणे आणि आपण काहीतरी वाटून घेणे यातील पहिल्याचे प्रमाण वाढायला हवे आणि दुसर्‍याचे घटायला हवे. हा प्रवास सत्याचा प्रवास. तो करायला हिम्मत असावी लागते. नसली तर जोपासावी लागते. अनेक 'मी यंव केले, मी त्यंव केले' व्यक्तिमत्वे 'स्वतःलाच काहीतरी वाटून घेत असतात'. त्यांच्यापासून दुसरा हटकून लांब जातो ते त्यामुळेच लांब जातो हे त्यांच्या लक्षातही येत नाही. ते नाते तुटण्याचा दोष ते दुसर्‍याला देतात. त्यातून पुन्हा त्यांचे 'काहीतरी वाटून घेण्याचेच' प्रमाण वाढीस लागते. धोकादायक पातळी कधी ओलांडली हे समजत नाही. सन्यासी कोणी होऊ शकत नाही, पण नुसते कर्तव्य करत राहून जेव्हा जे काही वाटेल तेव्हा ते अनुभवणे येथपर्यंत तरी पोचण्याचे ध्येय ठेवायला हवे. व्यक्तीशः मी 'आपल्याला काहीतरी वाटून घेण्यात' अपार पुढे गेलेलो असल्याने सत्यापासून फारच दूरवर पोचलेलो आहे. हे सगळे मी लिहू शकतो याचा अर्थ इतकाच की असाअसा विचार करण्याइतपत तटस्थता कधीतरी मनात असते. त्याचा अर्थ हा नाही मी स्वतः ते पाळू शकत असतो, पाळू इच्छित असतो. ही फक्त पारदर्शकता आहे. निव्वळ पारदर्शक असणे म्हणजे महानता नव्हे. ती पारदर्शकता प्रेक्षणीय व मनोहारीही असायला हवी. इतरांना हवीहवीशीही वाटायला हवी. सहसा स्त्री पुरुषापेक्षा किंचित सत्याच्या जवळ असते. कारणे उघड आहेत. एक तर ती शारीरिक ताकदीत कमी असल्याने अधिक जागरूक राहते आणि अनेकदा दुय्यम ठरवली गेल्यामुळे 'जे आपोआप वाटते तेच अनुभवत राहण्याच्या' पातळीला आपोआप राहते. मात्र, हे 'सहसा' होते, हेच होते असे नाही. झील आमिन माझ्या तुलनेत सत्याच्या खूपच जवळ होती.

जेव्हा एखादा स्त्री लंपट पुरुष स्त्रीच्या प्राप्तीसाठी गंभीर प्रयत्न करतो, करू लागतो तेव्हा त्यात जर तो यशस्वी झाला तर मात्र सत्यापासून असलेली दोघांची अंतरे नेमकी उलटी होतात. स्त्री सत्यापासून काहीशी दुरावते आणि तो पुरुष सत्याच्या अधिक जवळ जातो. याचे कारण सत्याच्या अधिक जवळ गेल्याशिवाय त्याला ती स्त्री प्राप्तच करता येणार नसते आणि त्याने तिची प्राप्ती केली याचाच अर्थ तिला स्वतःची आधीची पोझिशन सोडून त्याच्या पोझिशनच्या दिशेने काहीसा प्रवास करावा लागलेला असतो.

स्त्रीलंपट हा शब्द मोठा टीकात्म शब्द आहे. एकाहून अधिक स्त्रियांच्या प्राप्तीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणारा, त्यासाठी जगाने अनैतिक मानलेले मार्ग स्वीकारणारा असा पुरुष असा काहीतरी भाव त्यातून प्रकट होतो. पण पुरुषाचे मन सतत कित्येक टक्के स्त्रीच्या विचारांनी व्यापलेले असते हे सत्य नाकारता येत नाही. सभ्य माणूस मनाच्या खासगी पातळीवर स्त्रीलंपट असू शकतो हेही नाकारता येत नाही. इतकेच काय तर स्त्री पुरुषलंपटच असते हेही नाकारता येत नाही. त्यातील 'लंपट' या शब्दाच्या गुणधर्मामुळे जो एक नकारात्मक झटका बसतो तो क्षणभर बाजूला काढून ठेवून विचार करता आला तर यात तथ्य आहे असे मानता येईल असे वाटते.

सुंदर दिसण्याचा कोणताही बाह्यांगी प्रयत्न करणे हा उदात्त प्रयत्न असला तरी त्याच्या मुळाशी 'मी आकर्षक दिसावे' हीच भावना असते. त्यात गैर काहीच नाही. बघणारा कसा बघणार हे त्याचे त्याच्यापाशी. पण कोणत्यातरी एका उत्क्रांतीच्या पातळीला आपण आज पोचलेलो आहोत, जेथे स्वतःची सजावट ही एक किमान बाब ठरलेली आहे आणि प्रत्येकाच्या मनात असलेल्या 'स्वतःपुरती बरोबर' अश्या एका नैतिकतेच्या व्याख्येची लक्ष्मणरेषा या सजावटीने ओलांडलेली तरी आहे किंवा नाही तरी! पण निदान तसे स्वातंत्र्य तरी आता व्यक्तिला आहे हे काय कमी आहे!

झील आमिन! काळाच्या सोबत चालणारे एक वादळ होते ते. माझ्या शाब्दिक पिंजर्‍यात अडकणे तर शक्य नव्हतेच, पण चुकूनमाकून पिंजर्‍यात शिरलेच तर आतून पिंजरा उद्ध्वस्त करून बाहेर उफाळणारे वादळ होते ते!

मी सरकत सरकत तिच्याकडे जात होतो. तसतसा मी सत्याकडे जाऊ लागलो होतो. 'आव आणणे' यापासून हळूहळू दूर व्हावे लागत होते कारण ती सत्याच्या अधिक जवळ होती. तिच्या प्राप्तीसाठी माझ्या मेंदूवरील खोट्या महानतेचे तकलादू पापुद्रे गळून पडणे अत्यावश्यक होऊ लागले होते. तिला हाक मारायची म्हंटली तरी खूप खरे, धैर्यशील आणि जबाबदार बनावे लागणार होते. स्वतःची भूमिका सतरांदा तपासून बघावी लागणार होती. तिच्याकडून कोणते प्रश्न विचारले जातील, कशी प्रतिक्रिया येईल, त्यावर आपण काय प्रत्युत्तर देऊ शकू हे सगळे विचार क्षणार्धात करावे लागत होते. पहिल्या नजरेत प्रेमबीम बसण्याच्या पातळीला कोणीच नव्हते. हा बालक पालक चित्रपट नव्हता. मुळात ती माझे म्हणणे ऐकून तरी कशाला घेईल यावरच आतल्याआत रक्त आटत होते. हे सगळे का? तर तिची प्राप्ती व्हावी यासाठी. एक प्रकारे, एक विवाहीत पुरुष स्वतःच्या विवाहीत असण्याची काळजी वेशीवर टांगून दुसरीच्या प्राप्तीसाठी मनन चिंतन करत आहे यातून मीच मला उलगडत होतो. हा आतला प्रवास अधिक देखणा वाटू लागला होता. झील आमिनपेक्षाही. झील आमिनने मला का स्वीकारावे यावर स्वतःशी चर्चा करताना मुद्यांचा कीस पडत होता. उसनी अवसाने गळून पडत होती. स्वतःचे समर्थन स्वतःलाच करायला लावणे आणि ते समर्थन स्वतःच खोडून काढणे या आलटून पालटून कराव्या लागणार्‍या भूमिकांमुळे जी लढाई मी लढत होतो त्यात माझा जीव जाऊ लागला होता. कित्येक वैचारीक पापुद्रे शहीद होत होते. काहीतरी लख्ख निघू शकेल का या प्रतीक्षेत मला मी अधिकाधिक सापडत होतो. आणि या सर्वाचा ट्रिगर असलेल्या झील आमिनला याचा पत्ताही नव्हता.

व्हॉट द हेल!

शेवटी एके दिवशी मनाने कौल दिला. बी डायरेक्ट!

मी झीलला थेट विचारले. हा शुक्रवार एकत्र कुठेतरी घालवायची कल्पना कशी वाटते म्हणून. तिने थेट उत्तर दिले. तिला शक्य नाही म्हणून. सगळे संपले. एक मोठाच दगड माझ्या मनावरून दूर झाला. उगाच इतका वैचारीक चिखल तयार करून डुकरासारखा लोळत होतो. आता निवांतपणे दारू प्यायला तरी मोकळा होतो मी! रविराजच्या बारला जाऊन बसलो. तरी ती विचारांची दलदल पुन्हा भिडलीच. ती नाही का म्हणाली असेल? रागवून म्हणाली असेल का? तिच्या मनात माझ्याबद्दल आता काय विचार असेल? मी जितका चीप आहे तितकाच तिला वाटत असेन का? की थोडासा कमी चीप वाटत असेन? आता समोरासमोर येऊ तेव्हा ती कशी रिअ‍ॅक्ट करेल? इत्यादी. या सगळ्या दलदलीत पुन्हा मी तेच करू लागलो होतो. माझी चूक कशी नाही हे स्वतःलाच पटवून देत बसलो होतो. ज्याने काही साध्यच होणार नव्हते ते करत होतो मी. आणि मेसेज आला.

"माझी आजी आजारी असते आणि एकच दिवस तिच्याबरोबर थांबता येते म्हणून नाही म्हणाले"

मी बिडीच पेटवली. सगळे काहीच्या काहीच पालटले होते. म्हणजे कदाचित 'आजी' हे कारण नसते तर ती आली असती की काय? की सांगायचे म्हणून काहीतरी कारण सांगत आहे? आता आपण उत्तर काय द्यायचे? वगैरे. मी आपले सभ्यासारखे 'आजीची काळजी घे, काही लागले तर सांग' वगैरे पुस्तकी दोन तीन मेसेजेस पाठवले आणि निदान प्रकरणाने घातक वळण घेतले नाही याबद्दल देवाचे आभार मानून बुडत बसलो अँटिक्विटी ब्ल्यूमध्ये!

तिच्या प्राप्तीसाठी स्वतःची सत्यापासून दूर असलेली पोझिशन सोडून सत्याच्या दिशेने जाताना मला मी अधिकाधिक समजलो इतकाच फायदा मी त्यातून काढत होतो. पण फायदा त्याहून जास्त झालेला होता. या वैचारिक दलदलीत मी लोळत असताना तिचा थोडासा प्रवास स्वतःच्या जागेपासून दूर, असत्याच्या दिशेला झालेला होता आणि आता तिचे तिच्या मनातील स्थान अढळ राहिलेले नव्हते.

अक्षरशः गणित सोडवावे तशी झील आमिनची प्राप्ती मला सोडवता येत होती. कुठल्या रसायनाचा मेंदू घेऊन मी आलो आहे समजत नव्हते. असे वाटू लागले की होते की या प्रवासाच्या नेमक्या कोणत्या बिंदूवर आणि दोघांचा नेमका किती प्रवास एकमेकांकडे झाल्यावर आम्ही एकमेकांना प्राप्त होऊ हेही आता गणिताने मांडता येईल. बहुधा व्हिस्कीचा अंमलच असणार हा, बाकी काही नाही.

रात्री तिचा स्वतःहून गुड नाईट असा एस एम एस आला. पुढच्या आठवड्यात आम्ही मंगळवारी संध्याकाळी भेटलोही. दिड महिन्यात एकमेकांना बर्‍यापैकी आवडायला लागलो. एकमेकांबरोबर वेळ घालवायचा हे नकळतच ठरू लागले. आणि एका शुक्रवारी दुपारी पैठण येथील शासकीय विश्रामगृहात आमच्यावर निसर्गाने मात केली.

झील आमिन मला झेपली नाही. सांगायला काय लाजायचे? नाही झेपली. जिथे मी संपतो तेथे तुझा आरंभ का होतो, किती आहेस तूही नेमकी घनदाट समजेना! स्त्रीदेहाचे आकर्षण, नाजूकपणा किंवा त्यावरील वर्चस्व यांचा प्रश्न नसतो. प्रश्न असतो की त्यातूनच पौरुषत्व का सिद्ध करता यावे? स्वतंत्ररीत्या पौरुषत्व म्हणजे काय? जसे स्त्रीत्व नि:संदिग्ध शब्दांमध्ये मांडता येते तसे पौरुषत्व हे कर्तबगारी, यश या शब्दांनी वर्णिता येईलही, किंवा युद्धात भाग घेतला तर शौर्याने वगैरे, पण स्त्री पुरुष संबंधांच्या संदर्भात पौरुषत्वाची व्याख्या 'वर्चस्व मिळवण्याचे सामर्थ्य' अशी असेल तर त्यादिवशी झील आमिन पुरुष होती. मी तिच्या नि:श्वासांनी गुदमरत होतो. जीव द्या लेकांनो, बांगड्या भर हातात, ही वाक्ये तिला का शोभायची हे त्यादिवशी समजले.

असत्याकडून सत्याकडे निघालेल्याची सत्यापासून थोडेसे ढळालेल्याशी झालेली ही टक्कर भीषण होती. माझ्यासाठी भीषण होती, तिच्यासाठी बहुधा ती धडकही नसावी. नुकतेच घर आवरून झाले, चला आता आपले आवरू आणि बाहेर पडू अश्या आविर्भावात ती स्वतःचे आवरत होती. त्या खोलीत तिच्यामते जणू मी तेव्हा उरलेलोच नव्हतो. मी तिच्याकडे पाहात होतो. हे तिला समजत होते. पण त्यात तिला काही 'वाटून घ्यावे' असेही वाटत नव्हते. आणि मला 'काय वाटून घ्यावे' हे समजत नव्हते. मधेच मान वळवून माझ्याकडे तिरका कटाक्ष टाकून फस्सकन हासली अन म्हणाली...

"तुम यहाँ? इस वक्त?"

दोघेही खदाखदा हासलो. पुन्हा मिठीत शिरलो. म्हणाली.. अब क्या जरूरत बची है तुम्हे मेरी?

गुदमरत व हासत मी उत्तर दिले..

"सांस मे सांस आये ना"

पुन्हा हासलो.

नंतर तीन दिवसांनी एक गंमत झाली. एका रेस्टोरंटमध्ये बसलेलो असताना नेमके तेरे बिना जिया जाये ना हेच गाणे लागले तेव्हा ती तिच्या सेलफोनवरून कोणालातरी मेसेजेस करत होती. तिचे लक्षच नव्हते गाण्याकडे. माझे लक्ष ह्याकडे होते की ती ओळ आली की तिला तो प्रसंग झटक्यात आठवतो की नाही? अगदी 'साजना' पर्यंत ती फोनमध्ये गुंगलेली होती. आणि सांस मे सांस आये ना ही ओळ ऐकून तिची मान झटकन वर झाली, जिकडून गाणे ऐकू येत होते तिकडे क्षणभरासाठी नजर वळली आणि पुढच्याच क्षणी माझ्या नजरेत नजर मिसळली. त्या नजरानजरीनंतर झील आमिन बेहतरीन लाजली आणि मग दोघेही हासत बसलो.

त्यानंतर दिड एक महिन्यांनी मला औरंगाबाद सोडावे लागणार होते. अर्थात, अधूनमधून तेथे जाता येणार होतेच, त्यामुळे फार प्रचंड दु:ख वगैरे नव्हते मनात दोघांच्याही. पण तरी रोजचे समीप असणे आणि एकदम दूर जाणे यामुळे भक्कपणा येतो. 'वो रोज रोज जो बिछडे तो कौन याद करे, जो एक रोज ना आये तो याद आये बहुत'!

झील आमिनचे माझ्या मनावर झालेले ठिबक सिंचन, मग पावसाची भुरभुर, मग मुसळधार, मग कोसळणे, मग प्रपात, मग मी वाहून जाणे मग मी जलसमाधी घेणे आणि शेवटी तिने मला व्यापून उरणे या प्रत्येक अवस्थेत काव्य होते. तेही हासरे काव्य! जखमा, वेदना, आर्त हाका, विरह असल्या शेकडो वर्षे कवी नावाची जमात टिकवून धरणार्‍या क्षुद्र भावनांना त्या अतीवृष्टीत शून्य स्थान होते. जे आहे ते आत्ता आहे, पुढचे विचारू नकोस बघ, अश्या थाटाची होती ती! 'तुम पहले तो होही नही, लेकिन आखरीभी नही हो' असे मला बिनदिक्कत म्हणाली होती ती! अविवाहीत होती. नंतर तर म्हणाली, 'तुम तो होही नही'! तेही खरेच होते म्हणा! माणसाने आपले स्थान सोडून प्रवास सुरू केला की तो माणूस, माणूस असतोच कुठे? तो होतो फक्त एक थेंब, वाहत्या प्रवाहातील, जाईल तेथे जाईल आणि स्वतःचे व्यक्तिमत्व अधिकाधिक त्यागत राहील. कशाचातरी भाग बनून राहील. नो आयडेंटिटी!

झील आमिनकडून मी अनेक गोष्टी शिकलो. स्वतःला काहीतरी समजणे गैर आहे. ज्या क्षणाला आपण जे असतो ते फक्त त्याच क्षणाला असतो, तो आपल्यावरील कायमस्वरुपी शिक्का नसतो. दुसरे म्हणजे आपण एखादा क्षण जितकी मानसिक उर्जा खर्च करून जगतो, त्याहून अधिक उर्जा आपल्याला देऊन तो क्षण मागे पडतो. मनाचेही व्यायाम असतात, मनाचाही आहार असतो, मनालाही विश्रांती असते. त्याआधी मला फक्त 'मनालाही आजार असतात' इतकेच माहीत होते. तिसरे म्हणजे 'हासवत ठेवल्यामुळे हासत राहता येते'. जवळपास फुकटच असलेले हे अस्त्र वापरून अनेक दुर्धर संकटे यूं नष्ट करता येतात. आणि सर्वात शेवटचे व तितकेच महत्वाचे म्हणजे, सत्याकडे प्रवास करणे व असत्याकडे प्रवास करणे हे दोन्ही ईक्वल असते, समान असते. त्यात कमीजास्त किंवा चांगले वाईट असे काहीच नसते. किंबहुना, दोन्ही एकच असते, वेगळे नसतेच.

झील आमिन! जी मला कळलीही नाही, पचलीही नाही आणि पूर्ण मिळालीही नाही. 'चार आंधळ्यांनी हत्ती असा असा असतो' म्हणावे तशी मला समजलेली झील आमिन ही अशी होती. आमची कधी ताटातूट, रडणे वगैरे प्रकार झालेच नाहीत. त्या प्रवासात कुठेतरी टक्कर होण्यापलीकडे आमच्यात अंतर पडले इतकेच! प्रवास चालूच आहे. कोणत्यातरी दिशेला. इतके नक्की, की आता प्रवास कधीच संपत नसतो हे माझ्या पचनी पडलेले आहे. आधी वाटायचे की इथे इथे पोचलो की झाले, आता तसे वाटतच नाही.

तू भेटली नसतीस तर मी गोठलो असतो पुरा
मुक्कामस्थानी पोचणे आता पदार्पण मानतो

-'बेफिकीर'!

(कथेतील नांव काल्पनिक)

===========================

नाहीच कोणीही उथळ, ही एक अडचण मानतो
गंभीर लोकांच्या जगाला मी रणांगण मानतो - http://www.maayboli.com/node/24826

जे रोज होते त्यामधे कर्तव्य मोठे वाटते
झालेच नाही जे कधी त्याला समर्पण मानतो - http://www.maayboli.com/node/24871

घसरायला मी लागलो की वाटते सुटलो बुवा
साधाच रस्ता लागणे याला विलक्षण मानतो - http://www.maayboli.com/node/25000

नाहीस माझी तू कुणी, मीही कुणी नाही तुझा
मग का तुला मी सोडणे माझी भलावण मानतो? - http://www.maayboli.com/node/25088

मी सारखा सार्‍या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो - http://www.maayboli.com/node/25230

दसरा दिवाळी पाडवा करते कुणीही साजरे
आलीस आयुष्यात त्या घटिकेस मी सण मानतो - http://www.maayboli.com/node/26898

त्याच्यासवे सीमा तुझ्या ओलांडण्या गेलीस तू
की जो नपुंसक सभ्यतेला फक्त भूषण मानतो - http://www.maayboli.com/node/27193

म्हणतीलही निर्लज्ज दोघांना समाजाच्या रुढी
हा प्रश्न आहे की कशाला काय आपण मानतो - http://www.maayboli.com/node/28432

माझ्या चुकांचा ग्रंथ हा भौतीक दलदल पण तरी
मी हा तुझा अध्याय वैचारीक प्रकरण मानतो - http://www.maayboli.com/node/30217

एका त्सुनामीने पुरे उद्ध्वस्त होणे यास मी
ही बेगडी वस्ती वसवण्याचे निवारण मानतो - http://www.maayboli.com/node/30399

मी जाणले नाही कधी तू पौर्णिमा आहेस हे
कोजागिरीच्या सिद्धतेचे फक्त कारण मानतो - http://www.maayboli.com/node/30963

जगलो किती ते जाउदे, आयुष्य म्हणजे फक्त मी...
जगलो तुझ्यासमवेत जितके तेवढे क्षण मानतो - http://www.maayboli.com/node/31177

ठरशीलही निष्पाप तू, म्हणतीलही पापी मला
पण कृत्य जे केलेस... मी त्यालाच शोषण मानतो - http://www.maayboli.com/node/31976

आवाहने मानायचो ज्यांना प्रवेशाची कधी
आलिंगनांना त्या तुझ्या मी आज कुंपण मानतो - http://www.maayboli.com/node/32642

शिखरावरी आरंभुनी गाठेल तळ... कळते तरी
माझ्या तुझ्या नात्यास मी अनिवार्य घसरण मानतो - http://www.maayboli.com/node/33399

थेंबाप्रमाणे क्षुद्र मी अन तू समुद्रासारखी
मोडायला विश्वास मी नात्यास आंदण मानतो - http://www.maayboli.com/node/34260

तू भार नात्याचा तुझ्या नेलास तेव्हापासुनी
मी एकही ओझे न असण्यालाच दडपण मानतो - http://www.maayboli.com/node/36341

त्या दोन अश्रूंची बचत आहे पुरेशी त्यास ... जो
या राहिलेल्या जीवनाला शुद्ध उधळण मानतो - http://www.maayboli.com/node/39414

मी स्त्री कधी बनलोच तर बदलेन इथली संस्कृती
प्रसवेन त्या मर्दास जो पुल्लिंग वेसण मानतो - http://www.maayboli.com/node/39478

====================================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निम्मी वाचलीये जबरदस्त पकड घेतेली आहे केथेने
पण लक्ष्क्षात आले की एक मैत्रीण =१ शेर असणारच

आताच वाचला
आवडला पण फार्सा नाही

चला आता कथा वाचून पूर्ण करतो

तसे जागोजागी एखादाशेर आठवावा नाही आठवला तर नवीन एखादा करावा वाटावा असे बरेच काही आहे कथेत

पण या ओळींवरून <<<<>तिच्या प्राप्तीसाठी स्वतःची सत्यापासून दूर असलेली पोझिशन सोडून सत्याच्या दिशेने जाताना मला मी अधिकाधिक समजलो इतकाच फायदा मी त्यातून काढत होतो. पण फायदा त्याहून जास्त झालेला होता. या वैचारिक दलदलीत मी लोळत असताना तिचा थोडासा प्रवास स्वतःच्या जागेपासून दूर, असत्याच्या दिशेला झालेला होता आणि आता तिचे तिच्या मनातील स्थान अढळ राहिलेले नव्हते. <>>>>>>>मला एक शेर आठवला

तुला वाईट वाटावे असे मी वागतो आहे
तुझा चांगुलपणा थोडातरी वाईट वागावा

कथेसाठी
___________________/\____________________

वा

वैवकु - अनेक आभार. शेर मस्तच

कैलासराव - 'वा; शेरासाठी (वैवकुच्या) की ललितासाठी? Proud

परांजपे - निवडक दहासाठी विशेष आभार!

-'बेफिकीर'!

परांजपे - निवडक दहासाठी विशेष आभार!
>>>
हे कसं कळालं?????

ललिताबद्दल प्रतिसाद थोड्या वेळाने देते. आता फारच वर वर उठळपणे वाचलय

टॅब्लेट वरुन प्रतिसाद दिलाय...त्यात टायपायला जमत नव्हतं... म्हणून विस्तृत प्रतिसाद न देता...सगळे शेर...ते अंतर्भूत असलेल्या गझल आणि कथेसाठी एकच प्रतिसाद दिला.

वा

Happy

हे कसं कळालं?????<<<

त्यात काय विशेष? Uhoh प्रतिसाद दिलेल्या तिघांचे निवडक दहा तपासले. (तेही मी कधी करत नाही, पण आज या सिरीजवर पहिले तीन प्रतिसाद अश्या तिघांचे होते की ज्यातील कोणी हे निवडक दहात घेऊन स्वतः बदनाम होणार्‍यातले वाटत नव्हते) Proud

शेवटचि कविता छान आहे. गोष्ट एवढि डिटेल कशाला लिहायचि? त्यातुन शिकण्यासारखे काहि आहे का? कि शिकवण्यासारखे? तुम्हि खुप छान लिहिता,.सहा वर्ष मायबोलि वाचत आहे..पण हि वर्णने वाचुन वेताग येतो. शुभेच्छा.,.रागावु नये. Happy

"कटककर, तारा पान माहितीय का तुम्हाला?" "ऐकून आहे, का हो?" "तिथे खेमराज म्हणून नेत्रशल्यविशारद आहेत. पोरींना पाहून ज्यांचे डोळे लवतात त्यांचे डोळे ते दुरुस्त करतात"!

हे खर असेल तर लिहायला गटस लागतात.

नात्यांचा प्रवास दिलचस्प असतो खरा, पण त्यात स्वतःहून दिलचस्पी ओतण्याची खुमारी औरच. दुसर्‍याला सुखद धक्के देणे नात्यातील वीण कितीतरी अधिक घट्ट करू शकते. हे सगळे ठीकच, पण दुसर्‍यासाठी काहीतरी सोसणे, ते त्याला माहीतच होऊ न देणे आणि त्या सोसण्यामुळे त्या दुसर्‍याच्या आयुष्यात कोणतातरी आनंद निर्माण झालेला असणे आणि शेवटी त्याला हे कळणे की आपला हा आनंद या दुसर्‍याच्या सोसण्यातून निर्माण झालेला आहे, हे नात्याला सार्वकालीनत्व बहाल करते.

कोणत्याही माणसाची कोणतीही क्षुल्लक कृतीदेखील निर्हेतूक असू शकत नाही यावर माझा विश्वास आहे. अगदी आपण सहज बसल्याबसल्या हाताची बोटे कडाकडा मोडतो हेही. त्यातून त्या बोतांच्या हाडांशी साचलेले रक्त पुन्हा प्रवाहात आल्यामुळे मिळणारा तात्पुरता उत्साह हाच फक्त महत्वाचा नसतो, तर त्या बोटांचा होणारा आवाज कानांवर पडणे हेही महत्वाचे असते. त्या आवाजाने 'आज किती काम पडलं मला' अशी एक जाणीव उगीचच मनात निर्माण होते आणि आपले आपणच सुखावतो. खरंच काम पडलं की नाही हे आपण चेक करत बसत नाही. वाटणे आणि वाटून घेणे या दोन बिंदूंमध्ये सर्व व्यक्तिमत्वे वेगवेगळ्या ठिकाणी फिट झालेली असतात. अब्जावधी माणसांची अब्जावधी व्यक्तिमत्वे याच दोन बिंदूंमधील रेषेवर कुठेतरी असतात आणि तरीही एकही व्यक्तिमत्व दुसर्‍या व्यक्तिमत्वाला नुसते स्पर्शही करू शकत नाही इतके लांब असते.

व पुं नंतर इतक सुंदर लेखन मी आजच वाचल. पाच दहा पारायण कर्तो पण प्रतिसाद आत्ताच देतो. ही कथा मास्टरपीस आहे राजे. झील समोर उभी राहिली.

मास्टरपीस .................

वा क्या खूब कहा सर !!

सुरुवातीला वातावरणनिर्मीती छान केलीत, छोट्या छोट्या किस्श्यामधून झील उभी राहत होती,
त्यानंतर अचानक तत्वज्ञानाचे मोठमोठाले उतारे आले जे संपायचे नावच घेत नव्हते, जे चांगले लिहिले गेले असूनही फार कंटाळवाणे वाटले, ओवरडोस झाल्यासारखे वाटले.
तरीही मोठ्या धैर्याने शेवटापर्यंत गेलो पण तिथेही निराशाच हाती लागली.
एखाद्या कथेतून तत्वज्ञान सांगण्याऐवजी तत्वज्ञानाचा लेक्चर सुसह्य व्हावा यासाठी त्यात उदाहरण म्हणून कथा गुंफण्यात आली असे वाटले.

आपण छान लिहिता, वाचायला आवडते म्हणून हे प्रामाणिक मत दिले. यानुसार सुधारणा झाली तर एक वाचक म्हणून मला आनंदच होईल, पण तसे नाही झाले किंवा आपल्याला तशी गरजच नाही वाटली तरी हरकत नाही, एक लेखक म्हणून तो आपला हक्क आहेच.

अंड्या जास्त बोलून गेला असेल तर क्षमस्व !

बेफिकीर,

आजून एक विचारात पाडणारी कथा!

कथा वाचल्यावर वाटलं की स्त्री आणि पुरूष यांची अदलाबदल झालेली आहे. तुमच्या नात्यात ती झालीये पुरूष आणि तुम्ही निभावताय स्त्रीची भूमिका. यात काही वावगं नाही. झीलसारख्या व्यक्तिमत्वाच्या सान्निध्यात कुठल्याही पुरुषाची स्थिती हीच होईल. पण हीच स्थिती बिछान्यातही तशीच राहावी हे मात्र नवल आहे. Happy

कथेतली ती लांब स्वगतं पालटलेल्या भूमिकांमुळे तर आली नाहीत? एक प्रश्न आपला चाटून गेला मनाला. मला बायकांचा फारसा अनुभव नाही. कमीअधिक बोललो असल्यास कृपया सांभाळून घ्यावे.

आ.न.,
-गा.पै.

अत्यंत कंटाळवाणं आणि शब्दबंबाळ लिखाण. म्हणजे अगदी लिहायचं म्हणूण बळंच लिहीलेलं वाटतंय.
कथेपेक्षाही वाईट त्यातलं तत्वज्ञान. झील अमीन च्या व्यक्तीमत्वाचं तुम्ही केलेलं परिक्षण / त्या बाईच्या वागण्याचे तुम्ही काढलेले अर्थ तर फारच वाईट आणि अत्यंत हीन दर्जाचे वाटले.

निळूभाऊ - बरेच दिवसांनी? Happy

अंड्या - नक्की विचार करतो Happy

सुरमयी, विजय आंग्रे - धन्यवाद Happy

गामा - आसावरी, झील आणि सौदामिनी या ललितांमधील व्यक्तिमत्वे मलाही गोंधळातच पाडणारी होती. खरे तर मीही संभ्रमितच झालो होतो. Happy

गिरीजा, श्री, पिल्या आणि मीन्वा - धन्यवाद, लोभ असावा Happy

-'बेफिकीर'!

मस्तच ललित बेफिजी!!
तुमची ही एकूणच 24 पैकी प्रकाशीत ी सिरिज मी वाचली आहे काही कथांची 2-2 पारायणेही झालीत...आता एक एक करून प्रतिसाद देणार आहे सगळ्यांवर!
बर्याचदा या सिरिजमधल्या कथांचा शेवट काय होणार ते जाणवतं...जसं इथं 'ती झेपली नाही' वैगेरे झालाय तसा......पण तुमच्या शैलीसाठी वाचतो.
>> नात्यांचा प्रवास दिलचस्प असतो खरा,
पण त्यात स्वतःहून
दिलचस्पी ओतण्याची खुमारी औरच.
दुसर्याला सुखद धक्के देणे नात्यातील
वीण कितीतरी अधिक घट्ट करू शकते. हे
सगळे ठीकच, पण
दुसर्यासाठी काहीतरी सोसणे, ते
त्याला माहीतच होऊ न देणे
आणि त्या सोसण्यामुळे
त्या दुसर्याच्या आयुष्यात
कोणतातरी आनंद निर्माण झालेला असणे
आणि शेवटी त्याला हे कळणे
की आपला हा आनंद
या दुसर्याच्या सोसण्यातून निर्माण
झालेला आहे, हे
नात्याला सार्वकालीनत्व बहाल करते.<<<
अशा प्रकारची काही नातेविषयक,जीवनविषयक जी भाष्ये तुम्ही करता त्यातून फक्त कथा वर्णिने याच्यापलीकडचं काहीतरी घडतं..
शुभेच्छा!!! Happy

एखादी गोष्ट हवीहवीशी असण्यासाठी ती अप्राप्य असणे आवश्यक असते. जसे एखादी गोष्ट नकोनकोशी होण्यासाठी तिचे अतिरेकी आपलेसे असणे आवश्यक असते. >>>> पटल Happy
हे सगळे ठीकच, पण दुसर्‍यासाठी काहीतरी सोसणे, ते त्याला माहीतच होऊ न देणे आणि त्या सोसण्यामुळे त्या दुसर्‍याच्या आयुष्यात कोणतातरी आनंद निर्माण झालेला असणे आणि शेवटी त्याला हे कळणे की आपला हा आनंद या दुसर्‍याच्या सोसण्यातून निर्माण झालेला आहे, हे नात्याला सार्वकालीनत्व बहाल करते. >>>> बकवास .. नाही आवडल Happy
वाटणे आणि वाटून घेणे या दोन बिंदूंमध्ये सर्व व्यक्तिमत्वे वेगवेगळ्या ठिकाणी फिट झालेली असतात>>>>>> आवडल Happy
उगाच इतका वैचारीक चिखल तयार करून डुकरासारखा लोळत होतो. >>>>>>> Rofl

खुप दिवसांनी वाचली तुमची कथा. छान Happy

Pages