नसलेल्या नात्याच्या दाहकतेचे नांव - शीतल

Submitted by बेफ़िकीर on 15 April, 2011 - 04:25

एका शासकीय कार्यालयात काही कारणाने गेलेलो होतो. झाली असतील दहा बारा वर्षे!

माणसाला स्वतःच्या आयुष्याचा कंटाळा यावा इतपत अस्वच्छता आणि गलथानपणा अनेक शासकीय कार्यालयांमध्ये असतो. आयुष्य निरर्थक आहे हे कन्फर्म करून घ्यायचे असेल तर येथे यावे.

पान गुटखा स्वरुपाचे चार पुरुष कर्मचारी, अनेक फायली, धूळ, पाली, जळमटे, धुरकटलेला रंग, कधीही न उघडलेल्या खिडक्या, पंखे स्वेच्छेने सहज फिरत असावेत असे व 'पडत कसे काय नाहीत' असा विचार मनात निर्माण करणारे, साहेबाच्या केबीनमध्ये दिवे आणि पंखा चालूच, पण साहेब गायब!

आणि एकच महिला कर्मचारी! टापटिपीने साडी नेसलेली, लक्षात येणार नाही पण आवडेल असा मेकअप केलेली, तिशीचे वय आणि मध्यम रूप! सावळा रंग वगैरे!

मी ज्याच्यासमोर बसलेलो होतो त्या पुरुष कर्मचार्‍याने दुसर्‍या पुरुष कर्मचार्‍याशी गायब असलेल्या साहेबाबाबत काहीतरी बोलताना मोठ्याने वाक्य टाकले.

"काल गाद्या खराब केल्या असतील साहेबाने, म्हणून बायकोनी ऑफीसला येऊ दिलं नसेल, कामाला लावला असेल त्याला, काय बाई? बरोबर ना?"

म्हणजे तुम्ही काय वाट्टेल ते बोलणार आणि ते बोलण्यामागचा मोटिव्ह काय? तर ऐकणारी एक स्त्री आहे जिला ते ऐकण्याशिवाय काहीही पर्याय नाही आहे आणि त्यातून ती स्त्री असल्याचे व आम्ही पुरुष असल्याचे तौलनिक कनिष्ठ - श्रेष्ठ स्थान दाखवून द्यायचे आहे व मनात एक कामोत्तेजक भावना निर्माण करून घ्यायची आहे.

शरम वाटली शरम मला!

खाडकन प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून माझी मान त्या स्त्रीकडे वळली तर जे अपेक्षित होते तेच दिसले.

ती स्त्री लाचारपणे आणि लाज वाटल्यामुळे मान खाली घालून हासत होती. त्या हासण्यात अनेक भावना होत्या. 'हो रे बाबा, मला तुझं हे गटारी बोलणं ऐकायलाच लागणार आहे' ही शरणागती! 'माझ्या हातात परिस्थिती असती तर याची मी अशी अवस्था केली असती की याला पुरुष असण्याबाबत घृणा वाटू लागली असती' ही सुप्त इच्छा! 'घराच्या आजूबाजूला असलेल्या झोपडपट्टीत रात्री दारुड्यांची यापेक्षाही अधिक किळसवाणी भाषा जाहीरपणे ऐकायला लागते त्यापेक्षा इथे निदान काही प्रमाणात तरी सोज्वळपणा आहे' ही केलेली तडजोड!

अनेक गोष्टी!

आणि त्या बोलणार्‍या आणि बाकीच्या पुरुषांना एक मोठा आनंद मिळाला होता. या बाईला आपण जे म्हणालो त्यावर हसावेच लागले आणि त्याबाबत ती काहीही करू शकत नाही. या प्रक्रियेत आपल्याला तिचा शरमलेला चेहरा पाहून स्वतःच्या पुरुषार्थाचा पुन्हा अभिमान वाटला. आणि पुढेमागे ही आपल्या जाळ्यात आलीच तर मजा येईल वगैरे वगैरे!

वर्षानुवर्षे एकत्र काम करत असूनही लोक असे वागतात. कारण लोक तसेच असतात. आता याबाबतचे कायदे एन्फोर्स होण्याची वारंवारता व तीव्रता अधिक झाली आहे हे सुदैव!

पण हे होणारच हे दुर्दैव आहे.

याहून मोठा धक्का म्हणजे अर्ध्या तासाने मी तेथून निघालो तेव्हाही एक असाच विनोद झाला. मात्र....

.... यावेळेस तो द्वयर्थी विनोद त्या स्त्रीने केलेला होता आणि ती आता खदाखदा हासत होती.

ही सुद्धा अ‍ॅडजस्टमेन्ट? ही सुद्धा तडजोड? नक्कीच! कोणत्याही स्त्रीला असे वागावेसे कधीच वाटणार नाही. पण आत्ताचे तिचे हासणे फार मनापासून होते. कारण तो 'तिने केलेला' विनोद होता व त्याला प्रचंड दाद मिळाली होती.

चकीत झालेल्या अवस्थेत मी तिथून निघालो. मी तिथे असतानाही तो विनोद तिने केला होता. एक बाहेरचा माणूस आलेला आहे हे का जाणवले नसेल तिला? की त्यात काही वाटलेच नसेल?

गावाच्या विविध कोपर्‍यातून त्या कचेरीत रोज कामाला येणारे ते पाचजण! पूर्णपणे भिन्न सामाजिक, कौटुंबिक आणि सांस्कृतिक स्तरांमधून आलेले पाचजण! त्यांच्यातील लिंगभेदाच्या अदृष्य भिंती पडल्या? वैचारीक नग्नता हे त्यांच्या विरंगुळ्याचे साधन झाले? आपल्या जीवन-साथीदाराच्या उपस्थितीत या ग्रूपमध्ये आपण हा विनोद कधीच केला नसता याचा विसर पडण्याइतके ते एकमेकांमध्ये गुंगले? स्त्रीला शरम वाटेल असे वर्तन करण्यातील त्या नालायक पुरुषांचे 'निषिद्ध' सुखही नष्ट व्हावे इतके त्या स्त्रीने आपले आचरण बदलले?

या आणि अशा किंवा खूप भिन्न अशा हजारो प्रसंगाना प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर मी या निष्कर्षाप्रत आलेलो आहे.

'असा माणूस नाही ज्यामधे सैतान नाही'

पण शीतल या व्यक्तीने मला ही ओळ बदलायला लावली.

अशी करायला लावली.

'असा सैतान मी की ज्यामधे माणूस आहे'

नागपूरमध्ये जन्माला आलेल्या अर्भकाचे नांव शीतल ठेवण्याइतका विनोद कसा काय सुचू शकतो काही समजत नाही. एकवेळ झिरोथ माईलकडून सीताबर्डीवरून रामनगरकडे जाताना अजिबात उद्धटपणे न बोलणार्‍या माणसाची रिक्षाही मिळू शकेल. किंवा हल्दीरामच्या सोहनपापडीच्या पुड्यात अळीही निघू शकेल. पण 'शीतल'? नागपूर हे शहर आवडण्याचे एक प्रमुख कारण शीतल! वयाने माझ्यापेक्षा सात वर्षांनी मोठी! त्यावेळेस मी असेन तीस वर्षांचा!

पस्तीस ते चाळीस या वयात स्त्री तिच्या सर्वोच्च सौंदर्याच्या पातळीला असते असे माझे आवडते मत आहे.

बिलासपूरच्या कोकाकोलाच्या फ्रॅन्चाईजीतील, नर्मदा ड्रिन्क्समधील मीटिंग आटोपती घेऊन मी हावडा एक्स्प्रेस पकडली तेव्हा टळटळीत दुपार होती. नागपूरच्या स्कायलार्कचे बुकिंग फोनवर करून मी तिथल्या मुर्ग 'कासोरी' या डिशची आठवण काढत खिडकीबाहेर बघत होतो.

स्कायलार्क हे तसे सामान्यच हॉटेल आहे. हजार एक रुपयाला असेल रूम! सेन्टर पॉईंटची मजा स्कायलार्कमध्ये नाही. पण स्कायलार्कच्या बेसमेंटला स्वर्ग आहे.

तेथे लाईव्ह ऑर्केस्ट्रा असतो. बहुतेकदा कुणीतरी किशोर किंवा पंकज उधासच्या आवाजात गात असतो. एक तबलजी, एक पेटीवाला आणि एखादी गायिका! ही गायिकाही मस्तच गाते. स्पेशली 'का करू सजनी' वगैरे गीते! एकदम सभ्य माहौल!

ते ऐकता ऐकता अ‍ॅन्टिक्विटी किंवा ब्लेन्डर्स प्राईडचे घुटके आणि शेवटी अती झाल्यासारखे वाटले की एक 'मूर्ग कासोरी' ! विश्वास ठेवा की त्यांच्या मेन्यूमध्ये तो शब्द 'कासोरी' असाच लिहिलेला आहे.

त्या मूर्ग कासोरीच्या एका घासावर जान कुर्बान! लुसलुशीत चिकन पिसेस अगदी थिक मसाल्यामध्ये आणि हे मिश्रण गरम गरम पांढर्‍या शुभ्र भातावर! हं! ही बिर्याणी मात्र नसते. मूर्ग कासोरीच म्हणायचे याला!

माझी ठरलेली ऑर्डर असल्याने वेटर मला तिथे एक नीप द्यायचा, एक रूममध्ये ठेवून द्यायचा आणि गाणी ऐकून झाली की मूर्ग कासोरी आणून ठेवायचा! जान कुर्बान!

पण मग शीतलच्या रेशमी मिठीवर काय कुर्बान करणार?

"शाममे आओगे क्या? आज कोई नही है"

रायपूर स्टेशन आले कधी अन गेले कधी हेही समजू शकले नाही असा तो प्रश्न होता शीतलचा! हातातल्या मोबाईलकडे कैक मिनिटे बघतच बसलो होतो मी!

नागपूरला मी त्या काळी महिन्यातून एकदा जायचो. तीन चार वेळा तर असे झाले की मी तब्बल दहा दहा दिवस नागपूरातच असायचो.

शीतलचा एक अवाढव्य बंगला होता. अवाढव्य हा शब्दही पुरेसे वर्णन करणार नाही असा बंगला! नवरा आणि एक कुत्रे! इतकेच जग!

बंगल्याच्या आऊट हाऊस मध्ये एक जीम! या जीमचे काही सभासद होते. स्त्री व पुरुषांसाठी भिन्न टायमिंग्ज होती. आजूबाजूच्या परिसरातील साधारण सहा ते सात सभासद तेथे रोज हजेरी लावायचे.

संध्याकाळी काम संपल्यानंतर मला उद्योग नसल्याने 'आपल्याला काय करता येईल' हा शोध त्या जीमच्या जाहिरातीने संपवला.

"सिर्फ हफ्तेभर? .. ठीक है.. आया कीजिये.. छेसौ फीस है.. आप डेढसौ दीजिये.. "

अजिंठ्यातील लेण्यांमधील अ‍ॅक्युरसी गडबडली तर नागपूरला येऊन शीतलला पाहावे आणि पुन्हा लेणी दुरुस्त करायला जावे इतकी घाटदार! ही अतिशयोक्ती मात्र नाही. इतक्या वर्षांनीही तिची आठवण पुसटसुद्धा झालेली नाही. आठवण तशीच ठळकपणे मनात आहे. 'आठवण पुसटसुद्धा झालेली नाही' याचा अर्थ 'पुसटशीही आठवण होत नाही' असा नसून 'आठवण पुसट होत नाही' असा आहे.

पुणे ते नागपूर हा प्रवास बाय रोड केल्यास:

शिरूर, अहमदनगर, नेवासे फाटा, औरंगाबाद, जालना, चिखली, देऊळगाव राजा, अकोला, अमरावती व नागपूर असा काहीसा रूट आहे. चिखली व देऊळगाव राजा यांचा क्रम चुकला असल्यास नक्की आठवत नाही. या मार्गावर असलेल्या गावामधील स्त्रिया वाढत्या तीव्रतेने फ्लर्टिंग करतात असा मला अनुभव आला. मातीचा गुण असावा! मात्र औरंगाबादहून जालन्याला न जाता जळगावकडे वळलो तर नागपूरपेक्षा दिलजल्या स्त्रिया असतात असाही अनुभव! वरवर वाटायला हे अत्यंत असभ्य, हीन व अश्लील विधान वाटेल, पण मी करू काय? मला अनुभवच तसे आलेले आहेत. त्यात मला गर्वही करावासा वाटत नाही आणि स्वतःची घृणाही येत नाही. 'मी हा असाच आहे, माझे असेच आहे, स्वीकार जे हवे ते, जेव्हा रुचेल तेव्हा'! इस्पिकचा काळा रंग नेहा ही जळगावचीच!

नाशिक सर्वात दिलजले!

या विधानांवरून कृपया वाद होऊनयेत. ही अत्यंत वैयक्तीक मते आहेत व अनंत लोकांच्या मते ती अत्यंत चुकीची असतील हे मला मान्य आहे. पण 'माझी मते' मी लिहीत आहे. त्यात कुणाचाही अपमान अभिप्रेत नाही.

तर अजिंठा लेणी!

ही लेणी हे शिल्पकाराचे स्वप्न असावे. बहुधा त्याला एक अती जाड पत्नी मिळाल्यामुळे त्याने 'माझ्या स्वप्नातील बायको' ही भावना लेण्यांमार्फत व्यक्त केली असावी.

शीतल त्याला दिसली असती तर असले व्यर्थ उद्योग त्याने केलेच नसते.

बेंचप्रेसला वेट सपोर्ट बाई करते?

जीममधील बेंचप्रेस हा व्यायाम प्रकार मला आवडतो. एका बाकावर उताणे झोपायचे. वेटच्या बारला आपापल्या क्षमतेप्रमाणे वजने जोडून ठेवायची. उताणेच पडून तो बार वर खाली करायचा. छातीपाशी आणायचा अन पुन्हा वर ढकलायचा. पुन्हा खाली! मस्तपैकी जीमचा आढा दिसतो. बाकी काही दिसत नाही. आरामात पडलेलो असल्यामुळे ती अ‍ॅक्शनही करणे अधिक सहज असते. वेट सपोर्ट करणारा आपल्या डोक्याशी उभा असतो. आपले दंड भरून आले की त्याला बार देऊन टाकायचा आणि उठायचे. एकदम चाळीस छाती झाल्यासारखे मिरवायला लागायचे. तो फीलही घरी येईपर्यंत तसाच राहतो. मग घरी एकदा बायको दिसली की पाठीत वाकल्यासारखे, खंगल्यासारखे वाटू लागते. तोवर तो फील नक्कीच राहतो.

उगाचच करत होती ती मला सपोर्ट! तितके वजन मी सहज उचलायचो. पण ती माझ्या मागे उभी राहून वेट सपोर्ट करत होती. एक म्हातारे गृहस्थ एका ठिकाणी डंबेल्स उचलत स्वतःच्या प्रतिबिंबाकडे निरखून पाहात होते. त्यांचा 'ऊं.. ह्ह ह्ह... हाSSS' असा ध्वनी ऐकून बाहेरच्या एखाद्याला तिसरीच शंका येणे शक्य होते. पण शीतल हासत नव्हती. ती फक्त माझ्या चेहर्‍यावर झुकत होती अन पुन्हा वर होत होती.

अशा पद्धतीने बेंच प्रेस त्यानंतर आजतागायत केला नाही मी!

अजिंठ्या लेण्याच्या त्या लयबद्ध हालचालींनी डोके कामातून गेलेलेच होते. शेवटी मी बार स्वतःच उचलून उठून बसलो. पुरुषी अहंकार! बाईच्या हातात कसली वेट्स द्यायची??

"अब सिट अप्स"

माझ्या किडकिडीत देहाने बर्‍यापैकी व्यायाम केलेला आहे याचे तिला आश्चर्य वाटत होते.

"आप क्या हमेशा आते रहते है??"

"हं... महिनेमे एक बार तो आताही हूं... अब आया करुंगा"

त्या दिवशीची मीटिंग तशीच संपली! इन फॅक्ट स्कायलार्कच्या बेसमेन्टमध्ये मूर्ग कासोरी खाताना मला शीतलची आठवणही राहिलेली नव्हती. दुसर्‍या दिवशी मी जाऊच शकलो नाही. आणि तिसर्‍या दिवशी पुण्याला परतलो.

आणि एका लॉटचे रिजेक्शन झाल्यामुळे पंधराच दिवसात पुन्हा नागपूरला धावलो.

यावेळेस तिच्याकडे चक्क दोन मुली योगासने करत होत्या. मी ते दृष्य पाहून बाहेर येऊन थांबलो. मग तिने पलीकडच्या दारातून मला आतल्या खोलीत जाऊन बसायला सांगितले. मी जाऊन बसलो. काही वेळाने त्या मुली निघून गेल्यावर तिने मला बोलावले.

माझ्यामते स्त्रीसाठी साडी हा जगातील सर्वात सुंदर पेहेराव आहे. आणि शीतलने साडी नेसणे हे साडी या पेहेरावाला भारतरत्न मिळाल्यासारखे आहे.

त्यातही काळी साडी!

साडी नेसून योगासने?

"आप कहीं जा रही थी क्या?"

"क्युं? नही तो.. कब आये आप नागपूर?"

"सुबह..."

"आप मेरे खयालसे उस दिनके बाद आयेही नही ना?"

"दुसरेही दिन भागना पडा..."

"अब कितने दिन??"

"हफ्तेभर तो हूं.. अब फीस तो नही देनी पडेगी ना?"

"यू शूड पे समथिंग ना? दॅट टाईम यू डिडन्ट कम.. यू कूड हॅव अटेन्डेड द जीम.. "

"ठीक है.. ये लीजिये... "

शीतल अस्खलीत इंग्लीश बोलायची.

त्या एका आठवड्यात मात्र शीतल आणि मी खूप जवळ आलो. खूपच गप्पा! व्यायाम बियाम बाजूला राहिले.

तिला एक मुलगा होता जो यू पी मध्ये कॉलेजला होता. नवरा चोवीस तास दारू पीत घरात पडलेला असायचा.

वयाने मोठी असल्याने मी नमून होतो.

पण माझ्या स्वभावातच फ्लर्टिंग असावे की काय कुणास ठाऊक!

या वेळेस पुण्याला आल्यानंतर मी तिला उगाचच फोन केला. शीतलच्या स्वरामध्ये आनंद सहज समजत होता. की मलाच तसे वाटत असावे? माहीत नाही. पुढच्या महिन्यात मात्र मी नागपूरला निघायच्या दिवशीच तिला फोन करून सांगितले की मी उद्या पोचतोय आणि उद्या संध्याकाळी जीमला येईन! यावेळेस का कुणास ठाऊक तिच्या आवाजात कसलाही उत्साह नव्हता. रुक्षपणे 'ठीक है' एवढेच म्हणाली.

आणि याहीवेळी तिने तीच साडी नेसलेली होती. त्यावरून मला लक्षात आले की हिचा पेहेरावच हा आहे. कारण तिला जीमचा पेहेराव करण्याची गरजच नाही. ती फक्त जीम चालवत आहे. कालचाच रुक्षपणा आजही होता. वागण्यात, चेहर्‍यावर आणि आवाजात समजत होता.

"आप करिये.. थोडी देर मे आती हूं मै.. "

ती बंगल्यात निघून गेली. मी उगाचच व्यायाम करत बसलो. बंगल्यातून कसलासा तीक्ष्ण आवाज ऐकू आल्यावर मी सेकंदभर भांबावलो. पण आपला संबंध नाही हे मनाला पटवून पुन्हा व्यायाम करू लागलो. माझ्या मनात असेही आले की कदाचित ती मला कुठूनतरी बघत असेल. आपण आपला व्यायाम केलेला बरा!

दहा मिनिटांनी ती आली तेव्हा तर चेहरा पूर्णच पडलेला होता तिचा! मला आता कशातच इन्टरेस्ट राहिलेला नव्हता. काही वेळाने मी निघताना तिच्या हातात या आठवड्याची फी दिली. तिने ती रुक्षपणे घेतली. बंगल्याच्या गेटमधून बाहेर पडताना जेव्हा मी मागे वळून पाहिले तेव्हा मात्र....

... त्या जीमच्या दारातून शीतल माझ्याकडे पाहात खिळलेली होती..

मनावर कसलं तरी उदास सावट घेऊनच मी परतलो हॉटेलवर! आता उद्या जायलाच पाहिजे का असेही वाटू लागले होते. स्वतःलाच चीअर अप करण्यासाठी बेसमेन्टमध्ये गेलो आणि ऑर्केस्ट्रा ऐकत बसलो.

एक मात्र होतं! शीतलला पाहणे म्हणजे एक वरदानच वाटावे!

मात्र गेलो मी दुसर्‍या दिवशी!

शीतल ट्रेडमिलवर स्वतःच होती. माझ्याकडे पाहून तिने दिलेले ते स्माईल मला एका प्रेयसीचे स्माईल वाटणे ही माझी चूक असावी. मी तिच्या हालचाली बघत बसून राहिलो. तिलाही त्यात अडचण नसावी. बर्‍याच वेळाने पाण्याची बाटली हातात घेऊन ती माझ्या शेजारी येऊन बसली.

"आज आप खुष है... कल क्या हुवा था??"

"जाने दो.. "

'जाने दीजिये' वगैरे फॉर्मॅलिटीज तिच्यासाठी आवश्यक नव्हत्या. माझ्यापेक्षा बरीच मोठी होती ती! त्या फॉर्मॅलिटीज मला पाळणे आवश्यक होते. दोन्ही हातांनी केस बांधत तिने माझ्याकडे पाहिले.

"यू.. आर ब्युटीफुल"

नॉर्मली मी असाच बोलतो. त्या परिस्थितीमध्ये आसपास कुणीच नसल्यामुळे आणि माझ्या या विधानावर प्रतिक्रिया द्यावीच लागणार असल्यामुळे गोरीमोरी व्हायला ती कुमारिका नव्हती. मला मात्र त्या शासकीय कार्यालयातील पुरुषासारखे आपण वागलो असे जाणवले. सेकंदाच्या लाखाव्या भागात मी स्वतःवर थुंकलो हे मला अजूनही आठवतंय!

पण स्वच्छ स्माईल देऊन शीतल म्हणाली...

"वो तो हम जानते है... आप एक्सरसाईझ करो..."

"बताईये ना? कल क्युं नाराज थी??"

माझा भोचकपणा! जो माझ्यातून वजा केला तर काहीच उरणार नाही!

मी पुण्याचा, कधीकाळी येणारा आणि दिसायला कदाचित जरा गोंडस वाटलो असेन त्या काळी! अशी माझी कल्पना की या कारणास्तव उठता उठता ती पुन्हा शेजारी बसली अन म्हणाली..

"औरत जैसी लगती है वैसी होती नही है.. मै आजभी कलकेही मूड मे हू.. लेकिन.. अब सीख रही हूं के चेहरेसे ये चीज किसीको पता ना चले.."

माझ्या प्रश्नाला गंभीरपणे घेतले गेल्याचा प्रचंड आनंद झाला मला! अभिनय या कलेत मी फार पुर्वीच प्रावीण्य मिळवलेलं आहे. आयुष्यात बहुतेकवेळा मी खोटाच वागतो. समोरच्याला आपलासा वाटेन असा किंवा शत्रू वाटेन असा ! जसे मला हवे तसे समोरच्याला वाटेल इतपत अभिनय मी सहज करतो. तेव्हाही केला.

जणू शीतलबद्दल बेसुमार सहानुभुती आहे असा चेहरा करत मी जमीनीकडे पाहू लागलो. शीतलला ते जाणवलेच.

"क्या हुवा?.. किस सोच मे??"

"कुछ नही... लगनेमे लगता है की आप इतने बडे घरमे कितनी खुष होगी.. मगर..."

"क्या मगर??"

"मगर है नही आप खुष..."

"व्हाय आर यू डिस्कसिंग ऑल धिस?? स्टार्ट एक्सरसाईझ.."

त्याही दिवशी व्यायाम केला आणि त्याही दिवशी गेटमधून पाहिले तेव्हा शीतल पुन्हा मलाच बघत होती.

त्या रात्री मात्र मला ती निकट बसलेली असताना जाणवलेली भावना विसरता येत नव्हती. असा माणूस नाही ज्यामधे सैतान नाही! माझ्या मनात खरच असे आले होते की तिला तिथल्यातिथे आवळावे. धीर झाला नाही इतकेच! पण जे वाटले ते वाटले. खरे लिहिण्यात कशाला घाबरायचे जर वागतानाच आपण घाबरत नाही तर?

त्या रात्री मी स्कायलार्कच्या बेसमेन्टला नाही गेलो. टीव्हीच पाहात राहिलो.

आणि दुसर्‍या दिवशी संध्याकाळी मी सरळ विचारले.

"कॅन आय किस यू?"

हे धाडस का झाले, मी नेमका कशा प्रकारचा माणूस आहे यावर काहीतरी लिहायलाच हवे का?

चांगले वागण्याचे वळण असूनही मी असा का वागतो, वागलो?

कारण मला तसे वागणे शक्य होते. इतकेच! आणि तसे वागावेसे वाटत होते.

मला स्त्रीबद्दल कीव वाटते असे मी मागे म्हणालो होतो त्याचे कारण हे आहे की बहुतांशी स्त्रिया मन मारून जगतात असे मला वाटते. बिचार्‍या नवर्‍याला किंवा कुणाला धडा शिकवू शकत नाहीत. आपल्या संस्कृतीने स्त्रीला दुर्बळ बनवले आहे असे मला वाटते. ही सर्व विधाने भारतात राहणार्‍या, मध्यमवर्गीय किंवा आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या व शिक्षण, नोकरी व अनेक क्षेत्रात वावर यापासून दूर असलेल्या बहुतांशी स्त्रियांसंदर्भात आहेत. सर्व स्त्रिया अशा नसतातच. पण दुर्दैवाने खूप जास्ती प्रमाणात अशाच स्त्रिया दिसतात.

शीतलची मला मुळीच कीव वाटत नव्हती. कारण तोवर मला सत्यच माहीत नव्हते. मला शीतलबद्दल प्रचंड आकर्षण निर्माण झालेलं होतं! त्या आकर्षणामुळे तिच्याबद्दल सहानुभुती वाटलेली दाखवणे, चौकशी करणे, नियमीतपणे जीमला जाणे या बाबी मी करत होतो.

आय स्टिल कान्ट बिलिव्ह, पण शीतलने मला किस घेऊ दिला. तीनवेळा विनंती केल्यावर!

लिप टू लिप!

दोघेही उभे राहिलो होतो. माझ्या शरीरातून कित्येक हजार व्होल्ट्सचा करंट जात होता. एका पूर्ण आणि परिपक्व व विकसित स्त्रीचे चुंबन! समवयीन अथवा वयाने लहान असलेल्या स्त्रीच्या चुंबनात बालिशपणा व पोकळपणा असतो. अधीरता, जिभेने रेटारेटी आणि 'फना' होण्याची ओढ! त्यात डिस्ट्रक्टिव्हनेस असतो. ओळख करून घेऊन ताबडतोब त्या ओळखीचे घनिष्ट प्रेमात आणि त्यानंतर कायिक शांततेत परिवर्तन करण्याचा आवेग असतो.

शीतलचे चुंबन प्रशांत महासागरासारखे होते. गडद, खोल, शांत, सुगंधी, स्वादिष्ट आणि आत आत खेचत बुडवून मारणारे आणि मरतानाही 'हेच मरण सर्वात उत्तम' ही भावना मरणार्‍याच्या मनात निर्माण करणारे!

ओह.... म्माय... ग्गॉड!

पुरुष इतका हतबल ठरू शकतो हे मला पहिल्यांदाच जाणवले. खूप काही करायचे असूनही काहीही न करता फक्त काय काय होते हे अनुभवण्याची इच्छा अधिक बळावणे यामागे शीतलच्या आणि माझ्या वयातील अंतराचा संबंध असावा असे वाटते.

तिच्या पावडरच्या गंधाला तिच्या गंधाशी स्पर्धाच करता येत नव्हती. एका कोणत्यातरी क्षणी मी माझे दोन्ही हात तिच्या पाठीवरून काढून घेतले आणि नुसतेच लटकवत ठेवले माझ्या खांद्यांना!

अशा क्षणी स्त्रीच्या हातातील बाहुले होण्याचे स्वर्गसुख कित्येक पुरुषांना ज्ञातही नसावे असा माझा अंदाज आहे.

बट दॅट वॉज इट!

त्या रात्री हॉटेलवर मी चार वाजेपर्यत जागा होतो. जे झाले ते झाले यावरच आधी विश्वास बसत नव्हता. नंतर ते कसे कसे झाले याची मनातल्या मनात उजळणी! आणि शेवटी एक पश्चात्ताप! विश्वासार्हता पूर्णपणे गमावलेली असल्याच्या भावनेतून येणारा पश्चात्ताप!

त्यानंतरच्या भेटींमध्ये असले काहीच झाले नाही. पण त्या प्रत्येक भेटींमध्ये 'असले कधीही होऊ शकते' हा स्मेल सतत होता. मुख्य म्हणजे शीतलला कोणताही पश्चात्ताप झाल्यासारखे वाटत नव्हते.

शीतलबाबतचे माझे आकर्षण त्यामुळेच दहा हजार पटींनी वाढले.

पुण्याला परतल्यानंतर यावेळेस केलेला फोन चालला केवळ अर्धे एक मिनिटच, पण त्यात आनंदाची कारंजी उडाली.

आणि महिन्याभराने मी पुन्हा फोन केला.

"शीतलजी है??"

नको होते मी ते विचारायला! कारण फोन घेणारा आवाज पुरुषाचा होता.

"आप कौन??"

"जी.. पुनासे.. भूषण..."

"नही अभी नही है वो... क्या काम था?"

"जी कुछ नही ऐसेही... नागपूर आ रहा था तो जीम जॉईन करनी थी..."

खट्टकन फोन ठेवला गेला.

पण तरी नागपूरला गेल्यावर मी बिनदिक्कत तिच्या बंगल्यावर गेलोच!

यावेळेस तिला माहीतच नव्हते की मी येणार आहे. कारण माझा फोन तिच्या नवर्‍याने घेतलेला होता आणि त्याने निरोप सांगीतलेला असणे शक्यच नव्हते. मला पाहून अत्यंत आनंदली ती!

माझ्या जीवात जीव आला. माझी कल्पना होती की 'हा पुण्याचा भूषण कोण' यावरून त्यांच्यात वाद झाले असतील की काय! आजूबाजूला इतर माणसे असल्यामुळे अर्थातच मी वेड्यासारखा वागणे शक्यच नव्हते.

पण तरी शीतलने एक वाक्य टाकलेच...

"कभी बाते भी करेंगे .. है ना??"

"कब??"

"बताउंगी.. कितने दिन के लिये हो??"

"बिलासपूर जा रहा हूं.. परसौ लौटुंगा.. "

"और उसके बाद??"

"हूं दोन तीन नागपूरमेही.. "

"हं... "

"ठीक है फिर.. मिलते है.. "

"हं..."

आजही तिने मला गेट ओढून घेताना पाहिले.

आणि हावरा एक्स्प्रेस रायपूर स्टेशनला घुसळून निघाली तेव्हा मला ती कल्पना सत्यात उतरलेली असल्याचे पहिल्यांदा नीटपणे जाणवले.

"शाममे आओगे क्या?? आज कोई नही है"

शीतलच्या घरी आज कुणीही असणार नव्हते. दारुडा नवरा बिहारमध्ये गेलेला होता. जीम तिने माझ्यासाठी बंद ठेवलेली होती. ती घरी अंडाकरी करणार होती. मी जाताना व्हिस्की घेऊन जायची होती.

"मै तो ट्रेनमे हूं.. पहुचुंगाही दस बजे..."

"तो ठीक है ना?? साडे दस तक पहुंच जाओ.. अं?? "

"जरूर.. मेरे फोनकी बॅटरी कम हो रही है.. नागपूरतक शायद बंद भी हो जाये.. लेकिन मै आ रहा हूं"

दुर्ग अन भिलाई ही स्टेशन्स मागे पडली आणि सूर्य मावळूनही एक तास झाला! आजचा प्रवास संपतच नव्हता.

अत्यंत अस्वस्थपणे मी खिडकीतून बाहेरच्या अंधाराला निरखत होतो. तेव्हा ट्रेनमध्ये बसल्याजागी सिगारेट ओढता यायची. नंतर मग पॅसेजपाशी जायची टूम निघाली अन नंतर बंदीच आली. अर्थात, बंदी येईपर्यंत माझे 'ट्रेन टू एअर ट्रॅव्हल' असे अपग्रेडेशन झाल्यामुळे मला त्या बंदीचे आता काहीच वाटत नाही. दोन तासात जमीनीवर उतरलो की येतेच की ओढता सिगारेट!

शीतलचा आणखीन एक कॉल आला तेव्हा फोनच्या बॅटरीला शेवटची घरघर लागलेली होती. साडे नऊ वाजलेले होते. मी तिला सांगीतले की गाडी किंचितच लेट आहे, मी फार तर पावणे अकराला पोचेन!

ती तरीही वैतागलेली नव्हती.

आणि गाडी चक्क थांबली!

माझ्या मनातील संतापाचे जर त्यादिवशी कुणी इंधन केले असते तर तेलाच्या खाणीला लागते तशी आग लागली असती.

हावरा एक्स्प्रेस आपल्या मोठ्या बहिणीच्या आदराप्रीत्यर्थ थांबली होती. मोठ्या बहिणीला मोकळी वाट देण्यासाठी! ........२०७२ डाऊन गीतांजली सुपरफास्ट!

गीतांजली एक्स्प्रेस वादळासारखी घोंघावत गेली तेव्हा माझ्या सिगारेटीही संपायला आलेल्या होत्या. मुठी वळून माझीच बोटे माझ्याच पंजात रुतायला लागलेली होती. आणि एक हलकासा धक्का बसला तेव्हा मी वेळ पाहिली.

एक तास!

गाडी एक तास लेट झालेली होती.

अकरा वाजता नागपूर स्टेशनवर पोचलो तेव्हा शीतलने फोनवरून संबंध संपल्यासारखा संताप व्यक्त केला आणि स्वतःचा फोन खटकन बंद केला. तिची स्वप्ने विखुरलेली असावीत! मला माझी स्वप्ने विखरू द्यायची नव्हती.

एक रिक्षा करून मी गीतांजलीच्या स्पीडने प्रथम दिसेल त्या हॉटेलमधील एक रूम माझ्यासाठी बूक केली. हा अत्यंत योग्य निर्णय होता माझा. कोणत्याही परिस्थितीत मला रात्रभर तिच्याकडे राहायचेच नव्हते. नंतर सिगारेट्स आणि व्हिस्की यांच्या शोधात काही मिनिटे गेली. पण मिळाल्या कशाबशा दोन्ही गोष्टी ! केवढी ती धावाधाव!

पावणे बाराला मी बंगल्याचे गेट उघडण्यापुर्वी तिला सेलफोनच्या बॅटरीच्या शेवटच्या श्वासावर तीन फोन केलेले होते. एकही तिने घेतलेला नव्हता. बहुतेक सगळे संपलेले होते. शेवटी गेट उघडले तेव्हा कुठेतरी आतमध्ये असलेले कुत्रे खच्चून ओरडले. तरीही शीतल दारात दिसली नाही की लाईटही लागला नाही.

मी सरळ इकडे तिकडे बघत बेल वाजवली. कुत्रा या प्राण्याला मी प्रचंड घाबरतो. अगदी पॉमेरियनलाही! त्यांचा भुंकण्याचा आणि अंगावर येण्याचा आवेग मला भयंकर वाटतो. ते कुत्रे बेलच्या आवाजाने तर बंगलाच दुमदुमून सोडायला लागले. नशीब इतकेच कीते आत होते आणि बाहेर येऊ शकत नव्हते.

खट्ट!

कोणताही दिवा न लागता दार उघडलेले होते. अत्यंत डिझायरेबल अवस्थेत शीतल दारात उभी होती. पण डोळे पूर्णपणे पेंगुळलेले होते. तिने आधीच 'घेतलेली' असावी माझी वाट पाहून!

"आओ"

म्हणून ती आत गेली. मी आत आल्यावर तिने दाराला अनेक कड्या लावल्या व एक कुलूपही लावले. मला आता भीती वाटू लागली. वॉज इट अ प्लॅन टू कॅच मी? मे बी फॉर ब्लॅकमेलिंग ऑर जस्ट फॉर थ्रेटनिंग ऑर फॉर एनीथिंग एल्स? तिने त्या कुलुपाची किल्ली एका चोरजागेत ठेवली. तिच्या नकळत ती मी उचलली आणि खिशात टाकली.

विलक्षण प्रचंड बंगला होता तो! आज पहिल्यांदाच मी तो आतून पाहात होतो. मला बेडवर बसवून ती माझ्याकडची व्हिस्की घेऊन किचनमधे गेली. दोन ग्लासेस भरून आणेपर्यंत मी पटकन खोली तपासली. वेडं मन आहे माझं! मला वाटत होतं की बंगल्यात कुणीतरी असणार आणि आपल्याला पकडणार रेड हॅन्ड! कशाहीसाठी, पण पकडणार! या भावनेने माझ्या मनाचा ताबा घेतला. शीतल ड्रिन्क घेऊन आली आणि एक ग्लास माझ्या हातात दिला. धीर यावा म्हणून की काय पण मी तो संपूर्ण एका घोटातच संपवला. ती मात्र एकही घोट न घेता पलंगावर तशीच लवंडली आणि झोपायला लागली. आता माझ्या मनात आणखीन तिसरीच शंका आली. हिने स्वतः आत्ता ड्रिन्क का घेतले नसावे? की आपल्या ड्रिन्कमध्ये काही मिसळलंय वगैरे? पण आता तो विचार करण्यात काही अर्थ नव्हता. मी तिला उठवून जागे करायला लागताच ती उसळून म्हणाली...

"तुम जाओ यार... जाओ अभी यहांसे... सारी शाम राह देखरही थी... "

अपराधी नजरेने मी जमीनीकडे पाहात उभा राहिलो. तिला तर मी तिथे आहे की निघून गेलो हेही माहीत नव्हते इतकी पेंगुळलेली होती.

कसला अपराध वाटत होता मला? बायकोला कल्पना नसताना मी एका स्त्रीच्या निमंत्रणावरून यावेळी तिच्या घरी गेलो? ती एकटी असताना? परस्त्रीचे आकर्षण वाटले हा अपराध? की शीतलला मीदिलेलीवेळ पाळली नाही याचे अपराधी फीलिंग?

सगळेच एकत्र! पुन्हा एकदा तीच नपुंसकता! आपण जगण्यास सर्वात अधिक नालायक आहोत हा साक्षात्कार!

एक पुरुष म्हणूनही अयशस्वी, एक माणूस किंवा नवरा म्हणूनही अयशस्वी आणि एक मित्र म्हणूनही!

आणलेल्या दोन्ही निप्स मी खिशात टाकल्या.

"आप दरवाजा बंद कर लीजिये.. मी जा रहा हूं"

शीतलने दरवाजे उघडले. कुलुपाची किल्ली शोधत असताना मी तिला अचानक ती किल्ली दिल्याचे आश्चर्यही तिच्या चेहर्‍यावर प्रकटले नव्हते.

आणि ....

.... त्याही रात्री... सव्वा बारा वाजता... गेट लावताना...

इतकी झोपेत असूनही... शीतल माझ्याकडेच बघत होती...

आय हॅड लॉस्ट एव्हरीथिंग... कशाचाही अभिमान वाटू नये अशा परिस्थितीत मी पोचलेलो होतो.

चालत आलो हॉटेलवर चालत!

विचारांमध्ये!

आणि पुढच्याच नागपूर व्हिजिटमध्ये.. मी पुन्हा असाच न सांगता तिच्या घरी गेलो तेव्हा..

जीममध्ये कुणीच नाही आणि जीम उघडी आहे हे पाहून मला आश्चर्य वाटले.. कसलातरी बोलण्याचा आवाज आला म्हणून मी मागच्याबाजूने आत गेलो... त्या बंगल्याच्या मागच्या बाजूला दोन नळ होते... धुणी भांडी तेथे करत असावेत... स्वयंपाकघराच्या पायरीवर उभा असलेला आणि ज्याला पाहून संतापाची तिडीकच यावी असा तिचा नवरा तिला म्हणत होता..

"भोसडीच्चे.. नुसती जीम जीम ... कामवाली आली नाही दोन दिवसांपासून... कामं कोण करणार?? भांडी पडलीयत.. धुणं पडलंय.. "

माझ्याशी अस्खलीत हिंदी आणि इंग्लीशमध्ये बोलणारी शीतल मध्यप्रदेशातील असली तरी मराठी माणसाशी लग्न केलेली होती. मराठीही तिला अस्खलीत येत होतेच.

ती खाली बसून भांड्यांचा एक मोठा ढिगारा धुवत होती. माझ्याकडे तिची पाठ होती. आणि नवर्‍यालाही मी दिसत नव्हतो.

खूप रडत रडत त्याला म्हणत होती...

"तुम्ही काय करता?? एक तरी मदत करता का मला... सारखे पिता.. मी एकटीने किती कमवायचं?? हा बंगला भाड्याने द्यायची किंवा विकायची वेळ आलीय.. "

तिरीमिरीने नवरा पायर्‍या उतरून खाली आला आणि त्याने तिच्या झिंज्या धरून तिच्या पाठीत लाथ मारली.

अवाढव्य बंगला, जोरात चालणारी जीम आणि त्या बंगल्याची आणि जीमची आकर्षक मालकीण केवळ एक छळ सहन करणारी गरीब पत्नी होती...

अवाक होऊन मी ते दृष्य पाहात राहिलो आणि भानावर आलो तसा चटकन गेटबाहेर निघून गेलो... मागे बघितलेच नाही कारण आज नक्कीच शीतल तिथे असणार नव्हती....

दुसर्‍या दिवशी मी पुन्हा जीमला गेलो होतो तेव्हा मागच्याच दोन मुली याहीवेळेस योगासने करत होत्या. शीतल मला जीमच्या आतल्या खोलीत घेऊन गेली. शेजारी बसून तिने मला मिठी मारली.

कोण होतो मी? तिची कोणती गरज भागवत होतो? काय करत होतो तिच्यासाठी? तिचे तोंड वर करून पाहिले तेव्हा तिचे डोळे भरून आले होते. मला म्हणाली..

"आ जाया करो हां.. एक तुमही दोस्त बचे हो जिंदगीमे.. "

परिपक्व आणि पूर्ण विकसीत स्त्रीचे चुंबन जरी कितीही महान असले तरी असे बोलल्यानंतर त्याच स्त्रीच्या खांद्यावर डोके ठेवून मला घळाघळा रडावेसे वाटत होते.

ही एक सत्यकथा आहे मित्रांनो, यात नावे सोडली तर काहीही खोटे नाही, जसे आधीच्याही तीन कथा सत्यकथाच होत्या.

हेही मी बायकोला सांगीतले. मोठी भांडणे झाली. माझ्या वक्तृत्वशैलीवर मी ते निभावून नेले. शीतल हा अध्याय संपवणे मात्र मला माणूसकीहीन वाटत होते. ती स्वतःहून कधीच फोनबिन करायची नाही. पण मी केला की आनंदायची. बायकोशी वाद झाल्यानंतर मी एक शेवटचा फोन केला. शीतलला नाही सांगीतले की हा शेवटचा फोन आहे म्हणून! पण नंतर फोन केला नाही मी! मात्र त्या फोनवर शीतल म्हणाली...

"हमलोग शायद एम पी मे जा बसेंगे एक दो महिनोमे.. हमेशा के लिये... एक बार.. मिलने आओगे क्या??"

रडलो हो मी.. मला आत्ताही रडू येतंय.. आपली कुणालातरी इतकी गरज का असावी?? कुणीतरी इतके अगतिक का व्हावे?? आज माझ्या गझलेत येणार्‍या प्रेमविषय शेरांपैकी कोणता शेर कोणत्या स्त्रीवर आहे हे मी नक्की सांगू शकतो... आणि तितकेच हेही सांगू शकतो की... किमान दहा टक्के शेर एकट्या शीतलसंदर्भात असतात..

एका नसलेल्या नात्याच्या दाहकतेचे नांव होते ते... शीतल!

नाहीस माझी तू कुणी, मीही कुणी नाही तुझा
मग का तुला मी सोडणे माझी भलावण मानतो?

-'बेफिकीर'!

===========================================

नाहीच कोणीही उथळ, ही एक अडचण मानतो
गंभीर लोकांच्या जगाला मी रणांगण मानतो - http://www.maayboli.com/node/24826

जे रोज होते त्यामधे कर्तव्य मोठे वाटते
झालेच नाही जे कधी त्याला समर्पण मानतो - http://www.maayboli.com/node/24871

घसरायला मी लागलो की वाटते सुटलो बुवा
साधाच रस्ता लागणे याला विलक्षण मानतो - http://www.maayboli.com/node/25000

===========================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

छान आहे फार..............आपण प्रत्येक वेळी ............माघार का घेतात..............??????

पस्तीस ते चाळीस या वयात स्त्री तिच्या सर्वोच्च सौंदर्याच्या पातळीला असते असे माझे आवडते मत आहे.>> अणि तो पर्यन्त पुरुष ४५ चा होतो............... Happy

या विधानांवरून कृपया वाद होऊनयेत. ही अत्यंत वैयक्तीक मते आहेत व अनंत लोकांच्या मते ती अत्यंत चुकीची असतील हे मला मान्य आहे. पण 'माझी मते' मी लिहीत आहे. त्यात कुणाचाही अपमान अभिप्रेत नाही......

बेफिकीर,

जेव्हा तुमची मते तुमच्यापर्यंत असतात, तोपर्यंत ती वैयक्तिक असतात, ज्याक्षणी तुम्ही सार्वजनिक व्यासपीठावर अशी हीन दर्जाची मते व्यक्त करतात, तेव्हा ती सरसकट सगळ्यांना लागु पडतात ह्याचे तुम्हाला भान राहत नाही असे मला तीव्रतेने जाणवले. सरस़कट ऊडदामाजी काळे गोरे ह्या न्याय सगळ्यांना लागु पडत नाही.

बादवे, तुमची family कुठल्या गावाची आहे हो? नाही म्हणजे, कोणाला तरी तिकडच्या गावाचे पण अनुभव निश्चीतच आले असतील ना? मग त्यांनाही सांगता येईल आंतरजालावर अनुभव शेअर करायला.

तुम्हांला काही अनुभव आले असतील म्हणुन सरसकट सगळ्यांना एकाच तराजुत तोलणे योग्य नव्हे.

Sad

छानच!!

लिहायची पद्धत आवडली.
एक कथा म्हणूनही वाचल्यास छान वाटतेय.
एका गोष्टीतच मायबोलीवरच्या लोकांना घाबरत किती डिसक्लेमर देता हो. Happy
ते डिसक्लेमर गाळून गाळूनच वाचावे लागतेय.

बाकी याच गावच्या बायका अशा नी त्याच गावच्या तशा असं प्रत्येकाच्या अनुभवातून ठरत असावं.
आता तुमच्या उदाहरणावरून सरसकट पुण्याचे सगळे पुरुष लंपट असाही निश्कर्ष कोणी एक स्त्री काढू शकेल बहुदा.
आमच्या मते सगळ्याच गावात स्त्री पुरुषांचे स्वभाव्,वृत्ती सारख्याच. बाहेरख्याली स्त्री-पुरुषांचे सरासरी प्रमाणही सारखेच. प्रश्न फक्त संधीचा असतो.

अहाहा !! प्रेमसागर विबास शिरोमणि बेफिकीर महाराजा.न्च्या प्रेमपोथीतील नविन अध्याय प्रसिद्ध झाला वाटते. अरेरे पण हे काय , यावेळी मात्र एक भक्त नाराज झालेले दिसतात.

<<आता तुमच्या उदाहरणावरून सरसकट पुण्याचे सगळे पुरुष लंपट >> अरेरे सातीताई काय हा शब्द 'लंपट' . तुम्ही अप्रत्यक्षपणे प्रेमसागर विबास शिरोमणि बेफिकीर महाराजांचा अपमान करत आहात.
सर्व रंजल्या गांजल्या , आयुष्यात आलेल्या पुरुषामुळे किन्वा आयुष्यात पुरुष नसल्यामुळे त्रासलेल्या स्त्रियांना आपले म्हणण्याचे , आधार देण्याचे आणि त्यांच्या हृद्ययातल्या प्रेमसागरात सामावून घेण्याचे महान कार्य बेफिकीर महाराज करत आहेत. त्या कार्याची अशी विटंबना करू नका बरे!!

लईच टुक्कार!
हायला, आजकाल लोकांना मी कित्ती महान, माझ्यावर कित्ती बायका कुर्बान इ. इ. पण स्वत:च लिहायला लागते!

बायदवे, फ्लर्टिंगचा गुण गावांच्या मातीत असतो? आणि तो बायकांनाच लागतो?
मला तर वाटायचे की मातीत फक्त जीवजंतू असतात! आणि मातीतून हिरवी झाडे इ. गोष्टी निर्माण होतात. आयकावे ते नवलच.

एखाद्यास 'भावनिक' आधार देण्यास काहीच हरकत नसावी... पण त्याचा गैर उपयोग करुन "कुस्वार्थ' साधुन घेउ नये. (इथे "सुस्वार्थ" या अर्थी 'एखाद्यास आधार देउन अधार देणार्‍याला मिळणारे 'आंतरीक सुख' असा आहे,... "कुस्वार्थ" सां.न.ल)

काही "उपमा" अत्यंत 'संवेदनशील' अश्या मनापासुन दिल्या आहेत. Happy

ही लेणी हे शिल्पकाराचे स्वप्न असावे. बहुधा त्याला एक अती जाड पत्नी मिळाल्यामुळे त्याने 'माझ्या स्वप्नातील बायको' ही भावना लेण्यांमार्फत व्यक्त केली असावी. > Biggrin

बेफिकीरजी , खूपच छान लिहीले आहे. असे अनुभव असतात फक्त तुंम्ही व्यक्त करण्याची हिंमत दाखवता. वरील संदिप आहेर यांना पुर्ण अनुमोदन
ही लेणी हे शिल्पकाराचे स्वप्न असावे. बहुधा त्याला एक अती जाड पत्नी मिळाल्यामुळे त्याने 'माझ्या स्वप्नातील बायको' ही भावना लेण्यांमार्फत व्यक्त केली असावी , हे मात्र खूपच आवडले.
असो पुढील लेखनास शुभेच्छा !