देअर इज अ गूड न्यूज - पायल

Submitted by बेफ़िकीर on 12 March, 2012 - 07:41

जुही चावलाने 'डर' सोडून आणि पायलने घर सोडून कुठेही एक्स्पोज केले नाही.

'सूं खबर' हे दोन शब्द सोडले तर ती माझ्याशी हिंदी किंवा मराठीत बोलायची. टोन मात्र गुजराथीच असायचा. माटुंगा की माटुंगा रोड येथे कोठेतरी डॉन बॉस्को नावाची शाळा आहे तेथे ती राहायची. गुजराथी कुटुंबातील ती मोठी मुलगी होती आणि लग्न झाल्यानंतर पुण्याला आली होती. एका जवळच्या ओळखीच्यांची ती नातेवाईक होती. नंतर ते जवळचे ओळखीचे लांब राहिले आणि ही जवळची झाली.

माणसाला दोन भुका असतात. पोटाची आणि पोटाखालची.

पहिली भूक भागल्याशिवाय माणूस जगू शकत नाही आणि दुसरी भूक भागल्याशिवाय जगला असे म्हणता येत नाही.

या जन्मी मी पुरुष आहे म्हणून पुरुष होऊन राहतो. पुढच्या जन्मी स्त्री झालो तर तसे वागावे लागेल. चॉईस काय आहे? आयुष्य आहे तसे स्वीकारावे, मस्त वाटते. स्विमिंग पूलमध्ये आपण उतरल्यावर 'पाणी नको झाले आहे आता' असे वाटले तर काय उपयोग? बाहेर पडल्यावरच समाधान मिळणार.

चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने समुद्राला भरती येते तशी पायलला लहान मुले पाहून भरती यायची. तिला मूल नव्हते तोपर्यंत.

मूल झाल्यावर तिला तेही नकोसे झाले. आय वन्डर, स्त्री हे रसायन समजेल तेव्हा मी बहुधा स्त्रीच होण्याचा प्रयत्न करू लागेन. सध्या बालक आहे. बालक असण्यात जी मजा आहे ती कर्तृत्ववान स्त्री पुरुषांना कशी समजायची?

'हूं सू करी शकू' या प्रश्नाचा अर्थ 'मी काय करू शकणार' असा आहे हे मला समजायला थोडा वेळ लागला कारण पायल तिच्या ओठांवर लिपस्टिक फिरवत होती आणि ते दृष्य मन करपवणारे होते मत्सराने! ज्याला कोणाला हे दृष्य सातत्याने पाहायला मिळत असेल त्याला मखरात बसवायला हवे. तिची सासू मुंबईहून फोन करून तिला नवर्‍याला संसारात लक्ष घालायला प्रवृत्त करण्याचा सल्ला कन्टिन्युअसली देत राहायची. याचे कारण सासूला पायलला मूल झालेले पाहायचे होते. बाईपेक्षा तिला मूल व्हावे ही इच्छा इतरांना जास्त असते हे आपल्या संस्कृतीचे मेजर फेल्युअर आहे. पायलचा नवरा छाटला गेलेल्या पतंगासारखा विहरत असायचा. तो ऑफीसहून परस्पर कुठेही जाऊन निवांत बारा वाजता घरी यायचा. त्याने तिला स्पष्ट सांगून टाकलेले होते. तू कशीही वाग, माझी हरकत नाही, मी कसाही वागेन, तुझी हरकत नसावी आणि यालाच लग्न करण्यातून मिळालेले खरे समाधान मानायला हवे.

पायलला मुले आवडायची. पण ती किरकिरी झाली की पायल संतापायची.

लिपस्टिक लावताना मुली मान थोडीशी पुढे करून आणि ओठांचा आकार किस घेताना जसा होतो तसा करून लिपस्टिक लावतात हे मला निसर्गाने स्त्रीत निर्माण केलेले रतीचे एक लक्षण वाटते.

'जोएछ' म्हणजे पाहिजे का? हेही एकदा असेच समजले. द्राक्ष खात होती आणि मधेच तिच्या लक्षात आले की मला तिने द्राक्ष हवीत का असे विचारलेच नव्हते. एवढे मोठे द्राक्ष प्रत्यक्ष समोर असताना ती द्राक्षे कोण खात बसणार!

त्या दिवशी फार भडकलेली होती. मी तिच्या घरी जायचो कारण तिचे घर ऑफीसच्या जवळ होते. मी तिच्या घरी जायचो हे आजही बायकोला माहीत नाही आहे. आणि तिच्या नवर्‍यालाही. मैत्री ठेवण्यात पायल गझब होती. तिचे असे काही गुप्त मित्रमैत्रीण असणे हे तिला भूषणास्पद वाटायचे. मी तिच्या घरी जाणे हे खिडकीतून वार्‍याची झुळूक आत येण्यासारखे सामान्य वाटायचे तिला. बेल वाजली की असेल तशी दार उघडून माझ्याकडे पाहून माझ्याकडेच पाठ करून आत निघून जायची. जणू मी घरातलाच एक आहे. मग ती ज्या दिशेला गेली त्या दिशेला मी जायचो. किचन, बेडरूम नाहीतर एक आणखी बेडरूम होती तिथे! तिच्या नवर्‍याचा छंद काय तर नाना प्रकारचे शूज विकत घेऊन ठेवणे. त्यांच्या हॉलमध्ये एका बुटक्या लाकडी कपाटात फक्त त्याचे शूज असायचे. एकदा तिने एक कुत्रे पाळून पाहिले होते. त्याने घाण केल्यावर तिने त्याला हाकलून दिले तरी काही दिवस ते बाहेर घुटमळायचे. नंतर त्याचे घुटमळणे बंद झाले तरी मी मात्र जातच राहायचो. कुत्रा होण्यातही मजा असते. ईमानी राहावे लागते आणि आशाळभूतासारखे फिरावे लागते. खोटारडे मुखवटे धारण करून 'मला काही प्रॉब्लेमच नाही आहे' असा भाव मिरवत जगणार्‍या करोडो लोकांच्या फसवेपणापेक्षा कुत्रे होण्यात गैर काय?

दारू ज्याला नम्र करते तो माणूस आणि दारू ज्याला उद्धट करते तो राक्षस! पायल ज्याला आपला म्हणते तो वेडा आणि पायल ज्याला आपला मानत नाही तो शहाणा!

लूज, स्लीव्हलेस, व बेंबीला त्रासिक जगापासून जेमतेम दडवणारा लाईट ग्रीन टीशर्ट आणि गुडघ्यांवर एक सेन्टिमीटर अंतरावर राहून मजा बघणारी जीन्स शॉर्ट अशा पोषाखात ती पूजा वगैरे आटोपली की टीव्ही बघत जेवायची. मी हा कधीही येऊ शकणारा एक सजीव आहे हे तिने मान्य केलेले होते. ज्योती मेहता नमकीन होती, पण नमकीन हा शब्द 'पायल' असतो असे म्हणावे लागेल.

"जेवायचे का?"

'जेवणारेस का' या मराठी प्रश्नाचे गुजराथी स्वरुप होते ते! त्यातील 'चे' हा पोचे मधील 'चे' नसून 'चेकाळणे'मधील 'च' असायचा आणि 'जे' हा राजे मधील 'जे' असून 'जेधे' मधील 'जे' नव्हता.

"मी खाऊन आलोय"

"अ‍ॅपल घे"

"काय काय झालं?"

मी घरातल्या कर्त्या पुरुषाच्या आवेशात हा प्रश्न विचारायचो.

एकदा ती उसळून म्हणालीही होती. 'तू कोण विचारणारा'! नंतर मी नाराज झाल्याचे पाहिल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आलेले मला दिसले. माझ्या आयुष्यात प्रत्यक्ष गझल अशी फक्त तेव्हाच झाली.

तिच्या चेहर्‍यावर एकदा एक पुटकुळी आली तेव्हा ती पिंजर्‍यात पकडल्या गेलेल्या वाघिणीसारखी गुरगुरत होती.

कोणालाही काहीही आयडेन्टिफिकेशनच नसणे अशी एक 'लय ब्येक्कार' मनोवस्था ती प्राप्त करून द्यायची.

" झगडे के अलावा कुछ होता है यहाँ? अब बापूभी कहरहे है तुम उसको समझाओ! मैने सीधा कहदिया, आपका लडका मेरी बात नही सुनता! मै क्या करूं? उसकी टेस्ट है तो बोलता है बच्चा क्यूं चाहिये? फिर टेस्ट दिया तो सबकुछ ओके आया! तो प्रॉब्लेम क्या है तो डॉक्टर बोलता है उसे मिलनेके के लिये लाओ! वो कोई बच्चा है के मै उठाके ले जाउंगी? वो आता नही. बोलता है टेस्ट ओके है तो अब डॉक्टरसे क्या लेना देना? मैने समझाया के उन्हे कुछ कहना होगा! बोला मेरेको सुननाही नही है! उसे कुछ एहसासही नही है के फॅमिली लाईफ क्या होती है, मॅरीड लाईफ क्या होती है! शादी क्युं की मै कहती हूं फिर! "

हे बोलताना ती आरामात टीव्ही बघत असायची. तिची तर्‍हा भिन्नच! ती डिसकव्हरी चॅनेलवर मगरी बिगरी किंवा हरीण वगैरे बघत बसायची.

पायलचा आवाज खास गुजराथी स्टाईलचा बसका वगैरे होता, किंचित घोगरा वगैरे! सतत खाऊनही तिच्या वजनात काही फरकच पडायचा नाही. मला मसाला चाय करून द्यायची. अनेकदा शेजारीच येऊन बसायची. गप्पा मारायची.

"एक विचारू का? तुमच्यात... म्हणजे.. नवरा बायकोची रिलेशन्स आहेत का?"

"है ना? क्यूं नही? मै सपनेमे देखती हूं के वो जल्दी घर आगया है! मुझसे प्यार कर रहा है! मै हस रही हूं! वो छेडरहा है! सारू प्रेम छे"

मला खरेखुरे हसू आले होते. ती जे बोलली त्याचेही आणि ते बोलताना ती निवांत एका बिबट्याने केलेली एक शिकार पाहात होती ह्याचेही. मी खरंच हासलो ते तिला कळूनही ती माझ्याकडे बघत नव्हती.

"त्याला तू आवडत नाहीस का?"

"क्या??"

"तुम उसे अच्छी नही लगती हो??"

"अरे वो तो बताये कम से कम के बाबा तुममे मुझे कोई दिलचस्पी नही है"

आमच्या या गप्पा अनेक महिने भेटल्यानंतरच्या असल्या तरी त्या पहिल्या दुसर्‍या भेटीतही होऊ शकल्या असत्या असेच मला वाटते.

'आखरी हिचकी तेरे जानूंपे आये, मौतभी मै शायराना चाहता हूं' या ओळींप्रमाणे खरच तिच्या मांडीवर डोके ठेवून तिच्या न दिसणार्‍या हनुवटीकडे बघत मरण यावे अशी कल्पना करायला फार मजा यायची.

आठवड्यातून एकदाचे आठवड्यातून दोनदा झाले.

एक दिवस तिने ऑफीसमध्ये फोन केला.

"बापू और मांजी आये है..."

'मत आना' हे दोन शब्द बोलली नाही. ते मला ऐकू मात्र आले.

कशात काहीही नसताना किंवा फारसे काही नसतानाही हुरहूर लागली. किती दिवस थांबतील? काय ठरवतील?

मी तिच्या घरी जात असताना तिने म्हणावे तसे काहीच कधीच गैरवर्तन केलेले नव्हते. माझ्यातील अपरिपक्व आणि हीन पुरुष मात्र तिला फॅन्टसीमध्ये सम्राज्ञीचे स्थान देऊ करत होता. तिचे वागणे मुक्त होते या पलीकडे काहीच नसावे / नव्हतेही.

पण आयुष्य तुम्हाला जे शिकवते ते जगातील कोणतीही आई, कोणतेही वडील आणि कोणतीही शाळा शिकवत नाही.

'मत आना' या न उच्चारलेल्या शब्दांमुळे मला आता माझ्या आयुष्यातील पायलसाठी असलेल्या खर्‍याखुर्‍या स्थानाची जाणीव झाली. ती माझी फॅन्टसी नव्हती. ती माझी मानसिक गरज होती. तिच्याशी बोलणे हा प्रचंड मोठ्ठा विरंगुळा होता. तिचे स्वतःवर, स्वतःच्या तथाकथित दुर्दैवावर आणि घरच्यांवर टीका करत करत एकंदर आयुष्यात कसा बेसिक घोळ आहे हे सांगताना प्राणीबिणी पाहणे आणि मी तेथेच असणे मान्य करताना जणू त्यात काय असे दाखवणे हा माझा फार मोठा विरंगुळा झालेला होता. आपल्या मनात एखाद्याबद्दलची जी प्रतिमा निर्माण झालेली असते ती तो आपल्यापासून प्रत्यक्ष दुरावल्यावर कोणत्या रुपात बदलते यावर नात्याचा दर्जा ठरर्तो. जर तिचे रुपांतर तिरस्कारात झाले तर ते नाते अस्तित्वातच नव्हते असे म्हणावे आणि जर व्याकुळता प्राप्त झाली तर म्हणावे की.... दुसरे काही अस्तित्वातच नव्हते.

एक नको ती लाट म्हणाली, ये चल माझ्यासोबत
सागरकाठी तडफडणारा व्याकुळ मासा जीवन

ऑफीसपासून चार इमारती सोडून तिचे बैठे घर, रोज येताजाता दिसले तरी टक लावून पाहणे शक्य नाही. तरी जमेल ते पाहायचो. एकदोनदा फोनच केला मी! एकदा एक पुरुषी आवाज ऐकू आल्यावर राँग नंबर लागल्यासारखे मीच दाखवले. सासरा बरा बोलला तसा! परत फोन केला तेव्हा तिने उचलला आणि मी आहे हे कळल्यावर म्हणाली नंतर करते. .................पायलने एकही फोन केला नाही.

ती मला त्या दिवसांमध्ये दिसलीसुद्धा नाही.

त्या दहा दिवसांमध्ये मी पुन्हा फोन नाही केला. त्या दहा दिवसांमध्ये मला कोणतीही गोष्ट रमवू शकत नव्हती. आज कळते की आकर्षणाला प्रेम मानून माझ्यासारखे अनेक जण जीवनाला दोष देतही असतील. पण ते मला तेव्हा कळणे अशक्य होते.

आणि एक दिवस तिचा फोन आला.

"इम्पॉर्टन्ट है... कितने बजे आओगे??"

"तीन?"

"ओके"

तीन वाजता मी तिच्याघरी गेलो.

ती टीव्हीसमोर बसलेली नव्हती. माझ्याकडे बघत होती. चेहरा कॉन्फिडन्ट होता. चेहर्‍यावर हसू होते. इकडच्या तिकडच्या चौकश्या तिनेच केल्या. मी पटकन मुद्यावर येऊ बघत होतो. मला काळजी होती की तिला तिच्या सासू सासर्‍यांनी मूळ गावी यायला सांगितले की काय नवर्‍याबरोबर?

"एक गूड न्यूज है"

"... क्या??"

दहा दिवसांच्या वाईट बातम्यानंतर माझ्यासाठी काय गूड न्यूज असेल असे मला वाटत होते.

"मेरी टेस्ट पॉझिटिव्ह है"

तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करून आणि चेहरा कधी नव्हे इतका पण खोटाच आनंदी करून या रात्री मी बारमध्ये एकट्याने जी दारू प्यायली... तिचे वर्णन मला नाही करता येणार

याचे कारण पायल सिसोदियाने मला एक वाक्य ऐकवले होते..

"अब हमे सब कम करना पडेगा"

'कम'!

बंद नव्हे, कमी!

पण या 'कमी करण्याला' तिच्या चेहर्‍यावरील दु:खाची साथ लाभलेली नव्हती तर तो आनंदीच होता. मला बोचत होते हे हेच!

तिच्या आयुष्यात आलेल्या सर्वाधिक महत्वाच्या आनंदाच्या वादळात आमचे नाते कस्पटासारखे उडून गेले होते.

मी कोणीच नव्हतो. माझी बायको माझी वाट पाहात असायची तेव्हा मी पायलशी गपा मारत असायचो. आता माझ्या बायकोने नोकरी स्वीकारलेली होती आणि ती लांब असल्याने ती रात्री आठ वाजता येऊ लागली होती. आता तिच्या गप्पांना मी मुकलो होतो. आणि पायललाही.

अर्थात, हे कळण्याइतकी अक्कल मला होती की तीच प्रेग्नंट आहे म्हंटल्यावर आमचे कसे काय सुरळीत चालू राहील? तिचे सासू सासरे एक महिन्याने कायमचे येऊन राहणर होते. त्या एक महिन्यात मी तिला मूकपणे भेटत राहिलो.

तिचे सासू सासरे यायच्या आदल्या दिवशी मात्र.. निघताना... पायल माझ्या खूप निकट आली... काय बोलायचे हेच आम्हाला समजत नव्हते.. एक नाते कुठल्याकुठे भरार्‍या मारू लागले होते. हासणारे, खेळणारे आणि उथळ वाटणारे नाते आता उगाचच गंभीर झालेले होते..

पुढचे सर्व पाच महिने मला राहवेना! ती प्रसूत झाल्याचेही समजले याचे कारण ज्या हॉस्पीटलमध्ये तिचे नांव होते तेथे मी चक्क गेलो. मला समजले की तिला मुलगा झाला. कोणत्याच निकषानुसार तिच्याघरी जाण्याइतके आमचे नाते समर्थनीय ठरत नव्हते.

या सर्व महिन्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या वेळी तिने मला फोन केले. असेही ठरले होते की तिच्या फोनची एकच रिंग वाजली तर तो फोन माझा होता हे तिने समजणे. त्याला प्रत्युत्तर म्हणून ती काही वेळा फोन करायचीही, पण बाकी वेळा कोणी ना कोणी असल्यामुळे ती फोन करू शकायची नाही. कबूतरे वगैए पाठवण्याच्या जमान्यात आम्ही पोचल्यासारखे झालेले होते आणि एवढे करून तिच्यादृष्टीने मी नेमका कोण आहे हे कळायला मार्गच नव्हता.

कसा कोणास ठाऊक, पण सर्वांची नजर चुकवून तिने अ‍ॅडमीट व्हायच्या आदल्या दिवशीही मला फोन केलेला होता.

तिला मुलगा झाल्यानंतर आमचे सर्व काही संपले. गप्पा, विनोद, सहज वावर, टीव्ही, तक्रारी आणि सहवास या सर्वाच्या आठवणी धूसर धूसर होत गेल्या. मुलगा झाल्यानंतर तिने तब्बल दोन महिन्यांनी मला एक फोन केला. दरम्यान मी दुपारच्या वेळी तीन चार वेळा एक रिंग वाजवून बघितली होती. तिने फोन केल्यावर मात्र उचंबळून आल्यासारखा बोललो.

मूल झाल्यावर स्त्रीच्या वागण्यात आमूलाग्र फरक होत असावा. जबाबदार वर्तन आपोआपच अंगी रुळत असावे. मी जणू एक 'कोणीतरी' आहे अशी ती बोलत होती. मधेच मुलाशी लाडेलाडे बोलल्याचाही आवाज येत होता. सासू सासरे मार्केटमध्ये गेल्यावर तिने तो फोन केला होता.

मला स्त्री समजतच नाही यावर मी ठाम होतो. याचे कारण माझ्याशी बोलताना ती जरी आधीपेक्षा खूप खूपच परक्यासारखी वागली असली तरीही.... संधी मिळाल्यावर तिने मला फोन केलाच होता ह मी कसे मनातून काढून टाकू?????

आणि नात्याबद्दलच्या निराश विचारांना चार महिन्यांनी हिरोशिमासारखा धक्का बसला. तिच्या सजेशनवरून त्या दिवशी मी तिच्या घरी गेलो कारण घरचे सगळे गावाला गेले होते आणि महिन्याने येणार होते.

प्रॉबेबली, एक महिना आम्हाला मिळणार होता. पण आता तिचा नवरा संध्याकाळी वेळच्या वेळी येत होता. पत्नीची नसली तरी मुलाच्या ओढीने त्याच्यात हा फरक पाडलेला होता. मला चार आणि पाच महिन्यांच्या मुलांचा लळाच लागत नाही. एक तर ती नेमकी कशी दिसतात हे मला समजतच नाही, मला त्या वयातली सर्व मुले सारखीच वाटतात. पण पायलसाठी मी त्याला चक्क हातात बितात घेतले. तिच्याघरात आधी नेहमी दिसायचा तो शिस्तबद्धपणा त्या मुलाच्या नाळेबरोबर नष्ट झालेला होता. जगापासून जेमतेम दडवली जाणारी तिची बेंबी आता पूर्णपणे दडली होती. नवरा वेळेवर घरी येतो आणि संसाराला अर्थ प्राप्त झाला आहे याचा आनंद तिच्या लिपस्टिकसकट सर्व नखर्‍यांना ड्रेसिंग टेबलच्या कपाटात अटक करून भरून राहिलेला होता. पोरगं बेणं माझ्याकडे संशयाने पाहिल्यासारखं पाहात होतं असं मला का वाटलं कोण जाणे!

त्या महिन्यात मी अक्षरशः एक दिवसाआड तिच्याकडे गेलो. बोलणे म्हणजे मुलाने आज काय केले आणि नवरा आता कसा वागतो हेच! टीव्ही बघणे नाही की काहीच नाही. गुलाबी रंगात हिरवेपणा मिसळत चालला होता. आमच्या नात्याला तिच्या संसाराच्या पालवीने झाकोळलेले होते.आधीपेक्षा थोडी सुटलेली पायल एकाचवेळेस लोभस आणि बेडौल वाटत होती. माझ्या एका डोळ्याला तिची ओढ होती आणि दुसर्‍याला तिचा तिरस्कार की काय!

पायलकडे जाणे अतिशय सुरक्षित होते. अवाढव्य इमारतींमध्ये वसलेल्या त्या बंगलीत कोण येते आणि जाते हे दिसायचेच नाही. पायलचे होणे मात्र अत्यंत असुरक्षित होते, कधी दूर फेकले जाऊ ते कळायचेच नाही. जवळ आहोत की दूर हेही कळायचे नाही.

आणि एक दिवस समजले की आम्ही खूप जवळ होतो. तेही कसे समजले तर दूर गेल्यावर!

तिच्या नवर्‍याने बीएसएनएलच्या बिलांवरून काहीतरी शोधले. त्यांचे वाद झाले म्हणे! तो मला कधीच भेटला नाही. म्हणजे त्या संदर्भात! पण तिचा एक शेवटचा फोन आला होता, आता सगळे बास म्हणून!

पीळ पडला होता मनाला! काय मिळवले आणि काय घालवले हे लक्षातच येत नव्हते. जगाला उदासी दाखवता येत नव्हती आणि आनंदात राहता येत नव्हते. हम आपके है कौन हा पिचर त्या सुमारास रिलीज झाला होता. मंगला टॉकीजला तो मी आणि बायकोने पाहिला तेव्हा लक्षच लागत नव्हते माझे! ही हासली की मी हासत होतो इतकेच!

आता काही प्रश्नच उरलेला नाही. मी दोन कंपन्या बदलल्या त्यानंतर!

पण हे नाते संपवताना तिला काय वाटले असेल हे मला समजत नाही. की अपत्यप्राप्तीनंतर या बाबी निरर्थक वाटणे सोपे जाते? की तसे दाखवले जात नाही? नेमके काय????

शिखरावरी आरंभुनी गाठेल तळ... कळते तरी
माझ्या तुझ्या नात्यास मी अनिवार्य घसरण मानतो

-'बेफिकीर'!

(नांवे काल्पनिक)

========================================

नाहीच कोणीही उथळ, ही एक अडचण मानतो
गंभीर लोकांच्या जगाला मी रणांगण मानतो - http://www.maayboli.com/node/24826

जे रोज होते त्यामधे कर्तव्य मोठे वाटते
झालेच नाही जे कधी त्याला समर्पण मानतो - http://www.maayboli.com/node/24871

घसरायला मी लागलो की वाटते सुटलो बुवा
साधाच रस्ता लागणे याला विलक्षण मानतो - http://www.maayboli.com/node/25000

नाहीस माझी तू कुणी, मीही कुणी नाही तुझा
मग का तुला मी सोडणे माझी भलावण मानतो? - http://www.maayboli.com/node/25088

मी सारखा सार्‍या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो - http://www.maayboli.com/node/25230

दसरा दिवाळी पाडवा करते कुणीही साजरे
आलीस आयुष्यात त्या घटिकेस मी सण मानतो - http://www.maayboli.com/node/26898

त्याच्यासवे सीमा तुझ्या ओलांडण्या गेलीस तू
की जो नपुंसक सभ्यतेला फक्त भूषण मानतो - http://www.maayboli.com/node/27193

म्हणतीलही निर्लज्ज दोघांना समाजाच्या रुढी
हा प्रश्न आहे की कशाला काय आपण मानतो - http://www.maayboli.com/node/28432

माझ्या चुकांचा ग्रंथ हा भौतीक दलदल पण तरी
मी हा तुझा अध्याय वैचारीक प्रकरण मानतो - http://www.maayboli.com/node/30217

एका त्सुनामीने पुरे उद्ध्वस्त होणे यास मी
ही बेगडी वस्ती वसवण्याचे निवारण मानतो - http://www.maayboli.com/node/30399

मी जाणले नाही कधी तू पौर्णिमा आहेस हे
कोजागिरीच्या सिद्धतेचे फक्त कारण मानतो - http://www.maayboli.com/node/30963

जगलो किती ते जाउदे, आयुष्य म्हणजे फक्त मी...
जगलो तुझ्यासमवेत जितके तेवढे क्षण मानतो - http://www.maayboli.com/node/31177

ठरशीलही निष्पाप तू, म्हणतीलही पापी मला
पण कृत्य जे केलेस... मी त्यालाच शोषण मानतो - http://www.maayboli.com/node/31976

आवाहने मानायचो ज्यांना प्रवेशाची कधी
आलिंगनांना त्या तुझ्या मी आज कुंपण मानतो - http://www.maayboli.com/node/32642

====================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

नेहमीप्रमाणेच प्रामाणिक.

पण नमकीन हा शब्द 'पायल' असतो असे म्हणावे लागेल. - सुरूवातीपासून इथपर्यंतचे आधिक आवडले.

जबराट!!

>>आपल्या मनात एखाद्याबद्दलची जी प्रतिमा निर्माण झालेली असते ती तो आपल्यापासून प्रत्यक्ष दुरावल्यावर कोणत्या रुपात बदलते यावर नात्याचा दर्जा ठरर्तो. जर तिचे रुपांतर तिरस्कारात झाले तर ते नाते अस्तित्वातच नव्हते असे म्हणावे आणि जर व्याकुळता प्राप्त झाली तर म्हणावे की.... दुसरे काही अस्तित्वातच नव्हते.

हे सर्वाधिक आवडलेलं वाक्य. पण दोन्ही असेल तर?

कुत्रा होण्यातही मजा असते. ईमानी राहावे लागते आणि आशाळभूतासारखे फिरावे लागते. खोटारडे मुखवटे धारण करून 'मला काही प्रॉब्लेमच नाही आहे' असा भाव मिरवत जगणार्‍या करोडो लोकांच्या फसवेपणापेक्षा कुत्रे होण्यात गैर काय? >>>

आणि

त्या दहा दिवसांमध्ये मला कोणतीही गोष्ट रमवू शकत नव्हती. आज कळते की आकर्षणाला प्रेम मानून माझ्यासारखे अनेक जण जीवनाला दोष देतही असतील. >> व्हेरी वेल सेड.. Happy

नंतर त्याचे घुटमळणे बंद झाले तरी मी मात्र जातच राहायचो. >>> हे तुम्हीच...(तुमच्या सारखा लेखक) लिहु शकता Biggrin

आणि हेही
<<आयुष्य तुम्हाला जे शिकवते ते जगातील कोणतीही आई, कोणतेही वडील आणि कोणतीही शाळा शिकवत नाही>>
<<आज कळते की आकर्षणाला प्रेम मानून माझ्यासारखे अनेक जण जीवनाला दोष देतही असतील. >>

आपले लिखाण वाचायला मिळणे म्हणजे 'भाग्य'.

ह्म्म्म्म विचार करण्यासारखी गोष्ट आहे.>>> दोन्ही झाले तर पुन्हा एकदा भेटुन घ्यायला हवे...... विचार करण्यात अर्थ नाही.
निकष हवे रिझल्ट हवा.

बेफिकीर,

म्हणतात ना की स्त्री ही क्षणभराची पत्नी आणि अनंतकाळाची माता असते...! हे मूलभूत सत्य सोडल्यास बाई म्हणजे केवळ गुंता असतो. Happy

आ.न.,
-गा.पै.

लेख उत्तम. आवडला वाचायला. एकूण तुमचा आवडीचा विषय human psychology आहे असंही वाटलं! आणि साऱ्या लेखात 'आधार' ही संकल्पना आहे...नात्यांच्या पलीकडे आपण जे शोधात असतो तो.....निव्वळ आधार! Happy

तुमच्या इतर कथांपेक्षा ही कथा पटलीच.
नायक कधी नव्हे इतका दुबळा, आणि हेल्पलेस झालेला वाटला. म्हणून ही कथा आवडली असे नाही, पण गरज संपल्यावर दूर करणारी ही बाई 'बायका असं वागतातच' हे दाखवून गेली...
अर्थात नात्यामध्ये शरीराचा मोह आला की दोन्ही बाजूंची बोलती आपोआप बंद होते..

मंदारभाऊंनी विचारलेला प्रश्न मार्मिक आहे फार... त्याला उत्तर असेल असं वाटत नाही..

तिचे असे काही गुप्त मित्रमैत्रीण असणे हे तिला भूषणास्पद वाटायचे

-- ही कोटी आहे का? Happy

>>बाईपेक्षा तिला मूल व्हावे ही इच्छा इतरांना जास्त असते हे आपल्या संस्कृतीचे मेजर फेल्युअर आहे

ब्येस्ट निरिक्षण

निलिमा | 23 March, 2012 - 20:37 नवीन
तिचे असे काही गुप्त मित्रमैत्रीण असणे हे तिला भूषणास्पद वाटायचे

-- ही कोटी आहे का? >>

निलिमाजी Proud

Happy

सर्वांचे खूप आभार