आपण म्हणजे 'फक्त आपण नाही' याचा शोध लागणे महत्वाचे असते. अनेकांच्या आपल्याकडून असलेल्या व्यक्त, अव्यक्त अपेक्षा हा आपलाच भाग असतो. कारण आपण त्या अपेक्षा जाणतो तरी किंवा त्यापासून अनभिज्ञ तरी राहतो. त्या अपेक्षा आपण पूर्ण करतो तरी किंवा नाही तरी करत! दोन्हींचा परिणाम त्या माणसांच्या आपल्याशी वागण्यावर, मग त्याचा परिणाम आपल्या त्यांच्याशी वागण्यावर, मग या चेनचा परिणाम आपली एक प्रतिमा बनण्यावर आणि शेवटी ती प्रतिमा बनलेली आहे हे समजल्यानंतर ती प्रतिमा नष्ट करण्याचा किंवा जोपासण्याचा आपण प्रयत्न करण्यावर होत राहतो. आपले अगदी मूलभूत स्वरूप म्हणजे आईच्या पोटात असताना पहिल्यांदा जेव्हा आपल्या शरीराला मानवी आकार प्राप्त होतो तेव्हाचे! त्यानंतर आपण म्हणजे आपण नाही ही गोष्ट प्रत्येक क्षणाला अधिकाधिक सत्य होत राहते. पुनर्प्रस्थापित होत राहते.
आईच्या पोटातील 'आपण म्हणजे आपणच' इथपासून 'आपण म्हणजे आपण नाही' ते पुन्हा 'आपण म्हणजे जास्तीत जास्त आपण' हा प्रवास या आयुष्यात करायचा असतो. पुढचे आयुष्य असलेच तर हा प्रवास त्यात नव्याने सुरू होतो. त्यात पुन्हा 'आपण म्हणजे आपणच' ही सुरुवात वेगळ्या आईच्या पोटात होते. आधीच्या आयुष्यात हाच प्रवास किती अचूकपणे केला होता यावर 'पुढच्या आयुष्यात कोणत्या आईच्या पोटात प्रवास सुरू होणार' हे ठरते.
'आपण म्हणजे जास्तीत जास्त आपण' ही अवस्था कधी येते? तर जेव्हा आपण मरतो. कारण तेव्हा आपल्यासंदर्भातील सर्व अपेक्षा संपलेल्या असतात. आपला देहही संपलेला असतो. राहिलेल्या असतात फक्त 'आपल्या इतरांच्या मनातील आठवणी'! हे म्हणजे पोटात गर्भ असलेल्या स्त्रीला रात्री 'आपले बाळ आतून पाय हालवत आहे' ही जाणीव होण्यासारखेच असते. त्यामुळेच 'जास्तीत जास्त आपण' ही फ्रेज! 'संपूर्णपणे आपण म्हणजे आपणच' ही अवस्था मृत्यूसमयी का येत नाही? कारण त्या अनेक दशकांमध्ये आपण जी कृत्ये केलेली असतात ती शुद्ध 'आपण म्हणजे आपणच' या निरागस अवस्थेपासून आपल्याला खूप दूर नेणारी असतात. त्यामुळे 'आपण म्हणजे आपणच वजा निरागसता' इज इक्वल टू मृत्यू! म्हणजेच.... 'आपण म्हणजे जास्तीत जास्त आपण' ही अवस्था!
"पण आपण म्हणजे आपणच हं?"
शेजारच्या खुर्चीवर बसून स्वतःच्या पीसीत डोके घालून इतर कुणालाही ऐकू येणार नाही मात्र मला स्वच्छपणे ऐकू येईल अशा स्वरात सौदामिनी ठाकूरने उच्चारलेले ते वाक्य लाडीकपणाचा कहर होते.
लाँग ड्राईव्ह सारखी जगात दुसरी गोष्टच नाही. कोणतीही सीडी लावायची नाही. हवे तर स्वतः गावे, गुणगुणावे! वेळ रात्री बेरात्रीची! हलकी हलकी नशा! गुडांग गरमच्या लवंगेचा ओठांवर दरवळणारा व खूप वेळ टिकणारा गोडवा आणि ....
.... एक चांगला सरळ रस्ता!
माणसाने आयुष्यात दुसरे काहीही करू नये, फक्त एकदा लाँग ड्राईव्हला जावे. तो गालिबचा कुठलातरी शेर आहे. बेसर्फाही गुजरती है हो गरचे उम्र-ए-खिज्र, हजरत भी कल कहेंगे कि हम क्या किया किये! कितीही लांबलचक आयुष्य असले तरी, अगदी पैगंबरांसारखे अमरत्व असले तरीही आयुष्य व्यर्थच जाते. फालतूपणा करण्यातच संपते. उद्या वर गेल्यावर मला विश्वाधिकारीही विचारेल, 'गालिब, इतके दिवस जगलास पण केलंस काय तू?'!
लाँग ड्राईव्हला जाऊन आलो!
चूपचाप! पुढचा प्रश्नच येऊ शकत नाही.
तू ज्या पृथ्वीवर धाडलं होतंस तिथे यापेक्षा दुसरी कोणती चांगली गोष्ट मी करू शकणार बाबा? आता कसले प्रश्न विचारतोस?
जाणे तिचे नि येणे, थांबून पाहते जग, दुर्मीळ फार हल्ली, हंसाचि चाल आहे!
सौदामिनी ठाकूर!
"हं"
माझ्या स्वरयंत्रातून निघालेला एकमेव उच्चार! 'आपण म्हणजे फक्त आपणच हं?' या कुजबुजत्या प्रश्नावरचा!
एकमेकांकडे अजिबात न पाहताही माणूस दिसू शकणे ही मैत्रीची शिखर पातळी! ही व्याख्या बदलावी लागली नंतर! कारण इथे मैत्रीचा प्रवास केवळ सुरू होतो हे सौदामिनीने शिकवले.
जिभेचे मनाशी लग्न लागते तेव्हा माणसाचा नशीबाशी घटस्फोट होतो. मनाप्रमाणे जीभ चालवणार्याचे नशीब दूर जाते. एकांत मंगल कार्यालयात जिभेचे मनाशी लग्न लागते तेव्हा संस्कार मंगलाष्टके म्हणतात कारण त्यांना फक्त कर्तव्यच माहीत असते. बेभान विचार आमंत्रीत नसले तरी येतात आणि अक्षता टाकतात. आजवरची सत्कृत्ये अंतरपाट धरतात. आणि मन नावाची लाजरी तरुणी जीभेने मांडलेला प्रस्ताव स्वीकारून अंतरपाट दूर होताच धीट होऊन जीभेच्या गळ्यात 'बिनहाडांची' वरमाला घालते. टाळ्यांचा कडकडाट करतात बेभान विचार! कित्येक न बोलले गेलेले पण 'आपण बोलले जावे' अशी घुसमट दाबून ठेवणारे मुद्दे फटाके लावतात कार्यालयाबाहेर! उद्दामता सनई वाजवते. बेभान विचार रांगेने येऊन आहेर देतात स्वत्वाचा! त्यांना मन आणि जीभ 'जेवून जा हं' म्हणतात आणि मग बेभान विचार त्यांनाच फुटलेल्या फांद्यांवरची नवीन पाने, फुले आणि फळे यांचा काल्पनिक आहार करून विखुरतात ते पुन्हा पुन्हा येण्यासाठीच! स्वप्नांच्या गाडीत बसून मन आणि जीभ मधुचंद्राला निघतात तेव्हा कोसळ नावाच्या रिक्षेत बसून नशीब कोर्टात धावते. मागोमाग माणूसही धावतो. आणि मग दुनियेतील सर्व आप्त आणि परकीय एकाच वकिलाची भूमिका निभावत या दोघांचा घटस्फोट कसा योग्य आहे हे न्यायाधीशाला समजावतात. शेवटी आयुष्य नावाचा न्यायाधीश नशीबाला आणि माणसाला वेगळे होण्याचा आदेश देतो. पोटगी म्हणून माणूस आपली पत आणि प्रतिष्ठा नशीबाला देऊन टाकतो आणि लज्जितावस्थेच्या एका खोलीत कायमचा वास्तव्याला निघून जातो. नशीब दुसरा माणूस शोधायला निघते पण विधवेप्रमाणे किंवा परित्यक्तेप्रमाणे किंवा घटस्फोटितेप्रमाणे नाही तर.... जेत्याप्रमाणे!
सौदामिनीच्या नवर्याच्या मनाचे त्याच्याच जीभेशी लग्न झालेले होते.
आणि त्याचे नशीब सौदामिनीकडे वास्तव्याला येऊन दुसरा माणूस शोधत होते. 'बेफिकीर'पणे!
चित्र काढले तेव्हा मोनालिसा म्हणे तीन महिन्यांची गर्भवती असणार व म्हणूनच तिच्या अजरामर हास्यात एक उदासीची छटा आहे असे एका समीक्षकाने म्हंटलेले मी मागे वाचले होते. समीक्षक ही एक अनावश्यक जमात असून ती अनियंत्रीतपणे वाढत असते. स्वतः निर्मीती करता येत नाही हा साक्षात्कार झाला की ते मान्य करण्यापेक्षा इतर निर्मीतींच्या मागची, पुढची, मधली, सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, वशीलेबाजीक वगैरे पार्श्वभूमी अत्यंत जड जड शब्दात सांगून सामान्य वाचकापासून अजेंडापुर्वक दूर जात साहित्यक्षेत्रात स्वतःचे एक घृणास्पद स्थान निर्माण करून मागेपुढे संमेलनाचे अध्यक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल करणारा माणूस म्हणजे समीक्षक! यांनी जर शालींचे दुकान काढले तर लक्ष्मी रोड बंद पडेल. आणि नारळ विकायला काढले तर दगडू हलवाई गणपती कसेसे तोंड करून बसेल! समीक्षा हा एक भरभराटीला आलेला व्यवसाय असून यात श्रेष्ठ, ज्येष्ठ, महान अशा उपाधी मिळू शकतात. ज्ञानेश्वरी प्राकृतात असल्यामुळे मी तिची मराठीत समीक्षा केली असे म्हणणार्यांना मी तोंडावर 'ज्ञानेश्वरीशिवाय मी आरामात जगतो' असे सांगून आलेलो आहे. त्यांच्याच घरात! मी जगू शकत नाही तो फक्त 'माझ्याशिवाय'! स्वतःला दोन ओळी लिहिता येत नाहीत त्या माणसाने कशाला तुकारामाचे काव्य या विषयावर ग्रंथ लिहायचे?
सौदामिनीच्या चेहर्यावर उदासीची छटा आणि मोनालिसाचे हास्य होते. पोटात गर्भ नसताना! आणि कुठल्याही समीक्षकाने तिला समीक्षेच्या पात्र समजलेले नसताना!
बॉस अद्वातद्वा बोलतो म्हणून नाकाचा शेंडा, हनुवटीचा निमुळता त्रिकोण आणि कानाच्या पाळ्या स्वतःची इच्छा नसतानाही लाल करून मेसमध्ये जेवणारी सौदामिनी पहिल्यांदा समोर जेवायला बसली तेव्हा मला ती 'कविता' वाटली. आणि कॉमन मीठाच्या 'ठिबक सिंचन' वाल्या प्लॅस्टिकच्या डबड्याकडे दोघांचे हात अचानक गेल्यावर स्वतःचा हात पटकन मागे घेऊन चमच्याने रायता तोंडात ढकलताना माझ्याकडे पाहताना ती मला 'मुसल्सल गझल' वाटली. आणि दुसर्या दिवशी मला पाहून हासताना आणि तिसर्या दिवशी मात्र संपूर्ण दुर्लक्ष करताना 'गैरमुसल्सल'! अर्थात, तेव्हा हे शब्द माहीत नव्हते. आता वाटते तसे!
पण आय टी सपोर्टच्या नावाखाली चक्क आमच्याच डिपार्टमेन्टला शेजारी येऊन बसायला लागली तेव्हा अख्ख्या डिपार्टमेन्टच्या विस्कळीत पोषाखाला सभ्यतेची झालर लागली.
मैत्री!
'आपले नांव काय' ते 'खरच वैताग आलाय आता जॉबचा' हा प्रवास दहा दिवसात पार पडण्यास बहुतेक तिच्याकडे वास्तव्यास असलेले तिच्या नवर्याचे आणि मला शोधणारे नशीब जबाबदार असावे. कारण तोवर मला असा काहीच अनुभव नसल्याने मी माझ्या नशीबाची निदान सौदामिनीच्या बाबतीत तरी फुकट स्तुती करणार नाही.
तिला सुंदर कुणीच म्हणणार नाही. चारचौघींसारखीच! केस मात्र मागे वळून पाहावेत असे!
"एनी प्रॉब्लेम?"
माझा हा प्रश्न काहीसा सलगीतला होता आणि स्टिल जस्टिफाईड कारण सौदामिनी त्या दिवशी सरळ सरळ रडलेलीच दिसत होती सकाळी ऑफीसला आली तेव्हा! परक्याप्रमाणे माझ्याकडे एक कोरडा कटाक्ष टाकून नकारार्थी मान हालवत कामात लक्ष घातले तिने! मला वाईट वाटले कारण कुणीही रडले की मला वाईट वाटते. अगदी लहान मुलाने भोकाड पसरला तरी! मग त्याची मागणी कितीही अन्याय्य किंवा असमर्थनीय असो! पण सौदामिनीला ती जवळीक अर्थातच नको होती. मीही तिच्याशी विशेष बोललो नाही. आणखीन काही दिवस तसेच गेले. ती सपोर्ट फन्क्शनमध्ये असल्याने रात्री साडे आठवगैरेपर्यंत थांबायची. मी आपला वेळेवर कटायचो.
त्या दिवशी दोघेही थांबलो आणि त्यामुळे थोड्या अधिक गप्पा झाल्या इतकेच ! त्यावेळेस मी मेहेंदळे गॅरेजजवळ राहायचो व ती पटवर्धन बागेपाशी राहते हे माहीत असले तरी मी विचारले व तिने सांगितले.
तुमच्याकडे कोण कोण असते आणि तुम्ही मुळचे कुठले या ओळखीच्या पायर्या ओलांडून 'आवडी निवडी' कळणे या पायरीवर परिचय होणे हे सव्वा महिन्यात झाले असावे.
आलीच नाही एक आठवडाभर!
कुणीतरी म्हणाले ट्रीपला गेलीय म्हणे एल टी ए घेऊन!
'साधं सांगीतलं नाही आपल्याला' हा विचार मनात आला माझ्या, पण बोलून दाखवण्याइतका तो समर्थनीय वाटत नव्हता मलाच! म्हणजे कुणालाच बोलून दाखवण्याइतका! नंतर मी दिल्लीला गेलो. तेव्हा मोबाईल वगैरे नसायचेच! कंपनीच्या इन्ट्रानेटवरून मी दिल्ली ऑफीसमधून माझ्या घरच्यांशी आणि ऑफीसशी संपर्कात होतो. तिकडेही असताना एक दोनदा आठवण झाली. पण तितकेच!
आणि दिल्लीतील हॉटेलमधून निघून दुसर्या दिवशी एस्कॉर्ट फरिदाबाद आणि न्यू हॉलंड ट्रॅक्टर्सच्या मीटिंग्ज संपवून पुन्हा दिल्ली ऑफीसला आलो तर काय!
सौदामिनी वॉज अॅट डेल्ही!
तेथील सिस्टीम व्यवस्थित करण्यासाठी!
"तुम्ही? "
"हं.. सिस्टीमसाठी.. तुम्ही इथे आहात ते माहीत होते मला.. "
"पण जॉईन कधी झालात? कारण मी निघालो तेव्हा तुम्ही काहीतरी एल टी ए वर होतात ना?"
"हो.. परवाच जॉईन झाले.. तुम्ही करोलबागेतच आहात?"
"नाही.. कॅपिटल प्राईड.. तुम्ही?"
"तृप्ती.. "
"ओक्के.. कधीपर्यंत? "
"उद्याच्याच दिवस आहे मी.. तुम्ही??"
"मीही उद्या निघालोय.. राजधानी.."
"ओह..."
"तुम्ही??"
"जेट.. "
आपल्यापेक्षा सौदामिनी बरीच सिनियर असणार हे जाणवले मला! पण तिचे हॉटेल मात्र माझ्या हॉटेलपेक्षा कमी किंमतीचे कसे काय कळेना!
संध्याकाळी भेटण्याइतकी मैत्री नव्हतीच! पण दिल्लीच्या हेडने डिनर प्लॅन केले होते. तो, त्याची पत्नी, दिल्लीच्या आणखीन एका ऑफिसरची पत्नी त्या ऑफिसरबरोबर, मी आणि सौदामिनी! प्युअर व्हेज! डिनरच्या वेळेस समजले. तिला इमर्जन्सी म्हणून उद्या तातडीने पुण्याला निघावे लागणार होते. घरी काहीतरी प्रॉब्लेम होता.
मग हळूहळू एकेक माहिती समजू लागली. तिच्या नवर्याचे स्मॉल स्केल युनिट बंद पडलेले होते. त्याच्या दुराभिमानी वक्तव्यांमुळे! वर्कर्सनी मारहाणही केलेली होती. दोन मोठ्या कस्टमर्सनी पेमेंट थांबवले होते कारण तेथेही याने काहीतरी तमाशा केलेला होता. अचानक पैसा मिळू लागल्यामुळे आणि सत्ता हातात आहे असा समज झाल्यामुळे जिभेने मनाशी लग्न करून टाकलेले होते. त्याचा परिणाम म्हणून नशीबाने त्याच्याशी घटस्फोट घेतलेला होता. घरी बसून होता तो आता! पण त्यातही स्वभाव तसाच होता. कुणालाही कसाही बोलायचा. सौदामिनीच्या आग्रहामुळे त्याने त्याच युनिटमधून एखादे अल्टरनेटिव्ह प्रॉडक्ट निघते का याचा अभ्यास सुरू केलेला होता. वेगवेगळ्या शेड्युल्ड बॅन्कांकडे लोन प्रपोजल्स दिलेली होती. कारण नॅशनलाईझ्ड बॅन्क्स आता त्याच्याकडे बघणारच नव्हत्या. उसनवारी सुरू झाल्यामुळे सौदामिनीने जॉब पत्करला होता. घरात ताणतणावाने कमाल मर्यादा गाठलेली असली तरी सौदामिनीच्या माध्यमातून पैसा मिळत असल्यामुळे साहेब तिच्याशी पूर्ण संबंध संपणार नाही याची काळजी घेऊन वागत होते.
परिणामतः सौदामिनी जमेल तितका वेळ घराबाहेर काढत होती. त्यांच्या घरी त्या दोघांशिवाय कुणीच नव्हते. त्यामुळे अनेकदा तिला आत्यंतिक मानसिक ताण सहन करावा लागायचा. मग ती घराबाहेर अधिक राहते म्हणून भांडणे सुरू झाली असेही समजले. त्यामुळे ती घड्याळ्याच्या काट्यावर ऑफीसमधून निघायला लागली. आमच्या कंपनीतील कुणीच त्याला माहीत नव्हते. पण एक दिवस त्याने उपलेंचवार नावाच्या त्याच्या एका जुन्या मित्राकडून पैसे घेतले. हा उपलेंचवार आमच्याचकडे टॅक्सेशनला होता. त्याने सौदामिनीला काही दिवस सांगितले नसावे. पण सी फॉर्म्सचा विषय हॉट झाल्यामुळे त्याच्याकडे गेलेलो असताना एक दिवस त्याने मलाच सांगितले. खरे तर ही सर्व माहितीही त्याच्यामुळेच मिळाली. मी त्याला सांगितले की ते पैसे तू विसर! तोही तेच म्हणाला! की त्याने आशा सोडलेली आहे, पण सौदामिनीला काही सांगू नकोस! मी ते तिला सांगणे शक्यच नव्हते. आणखीन कशाला दुखवायचे तिला? तिने नक्कीच जमेल तितक्या उधारीची परतफेड केलेली असणार होती आणि तरीही बरीचशी उधारी तशीच राहिलेली असणार होती.
आणि त्या दिवशी दुपारी अचानक सिनियर जी एम आय टी - एस एस कुलकर्णी आमच्या डिपार्टमेन्टला आला आणि सर्वांच्या समोर तिला बोलला. तिने चेहर्यावरची रेषाही न हालवता मान खाली घालून सगळे बोलणे ऐकून घेतले. चूक अशी होती की तिचे कामात लक्ष नसल्याप्रमाणे वाटत होते त्याला! तो निघून गेल्यानंतरही ती शांतपणे कामच करत होती. मला काही ते सहन होत नव्हते. शिव्या मीही खायचोच साहेबाच्या, आजही काहीदा खातो. प्रश्न तो नव्हता. ज्या परिस्थितीत ती जगत होती त्यात तिला असे बोलले जाणे पटत नव्हते. आणि इतके करून तिला जगाची सहानुभुती नकोच होती. लंच टाईममध्ये सगळे मेसला गेले. सौदामिनी नाही आली. कुणीतरी विचारले तर 'डबा आहे' म्हणाली. आम्ही सगळे परत आलो तेव्हा मात्र....
... गेला कितीतरी वेळ ती रडली असावी हे सरळ दिसत होते. पण विचारण्याची कुणाचीच हिम्मत होत नव्हती.
एक तिच्या वडिलांच्या वयाचे साने म्हणून होते ते तिच्याशी जाऊन दोन शब्द बोलले. तिने वरवर हासत उत्तरे दिली. दॅट्स इट!
सहकार्यांमध्ये चर्चा व्हायची. 'तिला खूप त्रास आहेत' या विधानावर चर्चा संपायची. डिपार्टमेन्टला आणखीन एक लेडी होत्या मिसेस भारती म्हणून! त्या सेक्रेटरी होत्या चीफच्या! पोक्त होत्या. त्यांच्याशीच सौदामिनी थोडेफार बोलायची.
माणसाला मन मोकळे करूनही दु:खे संपवता येत नाहीत हे सत्य आहे. समाधान इतकेच कुणीतरी सांत्वनपर दोन शब्द बोलते किंवा फार तर मदत करते एखादी! दु:ख जर आपण आपलेच सोसायचे असेल तर मग चौकश्या करायच्या कशाला आणि चौकश्या एन्टरटेन तरी कशाला करायच्या!
पण या बाबतीत स्त्री वेगळी असते. स्त्रीला ते दु:ख दुसर्याला सांगावेसे वाटते व हे केवळ नैसर्गीक आहे.
त्याचमुळे सौदामिनी मिसेस भारतींशी थोडीफार बोलत असावी.
मात्र एक दिवस... !!!
"थोडी कॅश आहे का?? .. बॅन्केत जावे लागेल म्हणून म्हणतीय.. एक दोन चार दिवसात देते"
सौदामिनीला तिच्या आणि तिच्यासारख्या स्त्रियांच्या दुर्दैवाने 'जमीनीवर' यावे लागले. खूप वाईट वाटले मला! दुर्दैवाने माझ्याकडे पैसेच नसायचे. तेव्हाचा पगार फार कमी असायचा आणि घरखर्चात बराचसा जायचा. झाली त्या जमान्याला आता सोळा वर्षे! एक बेल्ट घ्यायचा तर पुढचा महिना यायचा!
"सॉरी.. पण.. माझ्याकडे नाही आहेत आत्ता.. किती हवे होते??"
माणसाचा स्वभाव! स्वतः काही करू शकत नसलो तरी नाक खुपसायचा अधिकार सोडायचा नाही.
"हजारच हवे होते... ठीक आहे.. बघते..."
हेच पैसे मला हवे असते तर?? मी कुणाकडे मागीतले असते? कुठल्याही सहकार्याकडे! आणि त्याने दिलेही असते. पण एक स्त्री पैसे मागताना विचार करणारच! जो नक्की देईल आणि दिलेत याची जाहिरात करत बसणार नाही त्याच्याकडे मागेल ती! माणूस चुकला होता तिचा! माझ्याकडे नव्हतेच पैसे! असते तर दिले असते हे मात्र खरे!
मी एकाकडून मागून मात्र आणले पैसे! मधल्यामधे मी मात्र 'फार चांगला माणूस' ठरू पाहात होतो.
"अरे?.. नव्हते ना??"
"असूदेत... आत्तापुरते मॅनेज केले मी... तुम्ही द्या मात्र लवकर हं??"
"नक्कीच देईन.. "
आता मला अधिकार आला होता प्रश्न विचारण्याचा! हलवायाच्या घरावर की काहीतरी प्रमाणे केले होते मी!
"काही प्रॉब्लेम आहे का?"
"छे?? ..का?? बॅन्क बंद आहे उद्या, आणि परवा मला ऑफीसमधून बॅन्केत जाणे जमणार नाही. म्हणून म्हंटले एक दोन तीन दिवसात देते... "
"नक्कीच.. काही प्रॉब्लेम नाही.. सावकाश द्या.."
आयजीच्या जीवावर बायजी होतो मी!
सौदामिनीचा फुललेला चेहरा ही मी केलेल्या धावपळीची किंमत आहे हे पाहून कोण अभिमान वाटला मला माझा!
"अॅक्च्युअली... एस एस फार बोलतात.. मला आवडलं नाही त्या दिवशी ते बोलले ते..."
जवळीक साधण्याचा आणखी एक प्रयत्न!
"ते बॉस आहेत.. "
"हो पण.. "
सौदामिनीने माझ्या डोळ्यात कोरडी नजर भिनवत माझ्याकडे पाहिले..
"आधीच तुमची मनस्थिती जरा... म्हणजे.. त्रास आहेत ना तुम्हाला?"
आय पेड फॉर इट! माझ्या या भोचकपणाचे प्रायश्चित्त दिलेच तिने मला!
"हे... फार पर्सनल होतंय असं वाटत नाही का??"
अपमान झाला माझा! पण रागही आला. आत्ता हिला मी धावपळ करून पैसे आणून दिले. दोन वाक्ये मैत्रीची बोललो तर लगेच इतका कोरडेपणा आणायची घाई?
"सॉरी.. म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं.."
माझ्यातली नपुंसकता आधीच्या भोचक पुरुषाला गप्प बसवत उद्गारली.
"इट्स ओके.. "
आणि ते पैसे तिने दिले नाहीत. सहा दिवस झाले तरीही दिले नाहीत. आय कुड नॉट अॅफोर्ड टू पे इट फ्रॉम माय पॉकेट टू दॅट फेलो! तो विचारतच नव्हता. पण मला उगाचच त्याला असे तर वाटत नसेल ना की आपण त्याला चुकवून जातोय असे वाटत होते. आणि सौदामिनी?
सौदमिनीने मला सहाव्या दिवशी स्पष्ट सांगीतले.
"जरा वेळ लागतोय.. थोडी अडचण आलीय.."
मी त्या माणसाचे पैसे कंपनीतून अॅडव्हान्स घेऊन परत दिले. त्याकाळी बायको जॉब करत नव्हती. माझ्या तुटपुंज्या पगाराचा आकडा आणि त्याला फुटलेला व 'फुटणे अॅप्रोप्रिएट असलेला' प्रत्येक पाय तिला माहीत असायचा. आज आम्हाला आमच्या स्वतःच्याही सॅलरीज लक्षात नाहीत. एकेक जमाना! पण त्याकाळी मला भीती वाटली. काहीतरी नाटक केले होते मी इतकेच आठवते. कुणीतरी उसने मागीतले म्हणून अॅडव्हान्स काढून दिले. पुढच्या महिन्यात देईन म्हणतोय वगैरे स्वरुपाचे!
"इट्स ओके"
बायकोशी पैशांबद्दल खोटे बोलल्याचा फायदा मी सौदामिनीला 'माफ' वगैरे करून घेतला. आता तिला माझ्याशी जपून बोलणे भागच आहे असे मला त्या क्षणी वाटलेले असणार, आत्ता नीट आठवत नाही.
एक मात्र घडत होतं! सौदामिनी ठाकूर हे अधिकाधिक गूढ होत चालेललं होतं माझ्यासाठी! तिने तो स्पष्टपणे कोरडेपणा आणणारा संवाद बोलणे, पुन्हा माझ्याचकडून उधारी घेणे आणि एवढे होऊनही काहीच झाले नाही असे वागतानाच एक दिवस अचानक..
"भेंडीची भाजी... घेणार थोडी??"
डब्यात तिने भेंडीची भाजी आणली होती. मला आवडते हे तिला कसे समजले यावर विचार नंतर करता आला असता.
"मी मेसमध्ये चाललोय.. माझ्याकडे पोळी वगैरेही नाहीये.. असूदेत..."
"पोळी आहे की?? .. घ्या..."
हंसाची चाल आहे!
डिपार्टमेन्टच्या पॅन्ट्रीपासची डिश आणायला जात असताना पाठमोर्या सौदामिनीच्या चालण्याकडे बघून पुन्हा एकदा माझ्या मनात डोकावलेला विचार!
मी हो म्हणतोय की नाही याला तिने शुन्य महत्व दिलेलं होतं! मला तिचं हेच आवडायचं नाही. एखाद्याची मदत घ्यायची आणि त्याच्या मताला किंमतच नाही.
पण मी गेलो नाही मेसमध्ये! कुणीतरी विचारलं त्यावर 'आलोच, व्हा तुम्ही पुढे' असे म्हणालो.
"कुणी केलीय भाजी??"
हा माझा प्रश्न चुकीचा होता हे तिच्या चेहर्यावरून समजले. तिच्याशिवाय कोण करणार?
"बाजारातून पाव किलो भेंड्या आल्या चालत चालत निवांत.. मग बेसीनमध्ये स्वतःला धुवून वगैरे घेतले"
"म्हणजे??"
ती उपरोधाने बोलत होती. बायकांनी उपरोधिकपणे बोलणे मला अत्तिशय आवडते. त्यात राग, निराशा, वैताग आणि बावळटपणा यांचे एक अजब मिश्रण असते.
तिचे वाक्य ऐकून मी हसू लागलो.
"मस्त झालीय भाजी.. "
"थॅन्क्स.... तुमच्याकडच्यासारखी नसेल झालेली ना??"
ब्राह्मणांनी मराठ्यांना आणि सूड म्हणून मराठ्यांनी ब्राह्मणांना छळून आता कित्येक दशके झालेली असली तरी हा मुद्दा निघतोच!
"छे छे.. उलट मला अशीच आवडते.. "
"मी... तुमचे... पैसे देणार आहे हं??"
"अहो काहीतरी काय?? केव्हाही द्या.."
"......."
"पण... मला एक.. विचारायचं होतं..."
सौदामिनीचे डोळे तिच्या डब्याकडे झुकले. मला अबोल करणारे कृत्य होते ते!
"सॉरी... पण.. नेमका काय प्रॉब्लेम आहे ते... मला.."
"... मला माहीत आहे की तुम्हाला सगळे माहीत आहे.. "
".. अॅक्च्युअली... हो.. माहीत आहे मला... पण.."
"अजितला.. माय हसबंड.."
"माहीत आहे... बोला.."
"त्याला खूप प्रॉब्लेम्स आहेत.. युनिट बंद झालंय.. फिफ्टी सेव्हन एफ फोर वर करण्यासारखेही काहीही काम नाही... ही एज इन डीप ट्रबल.. मीनिंग वुई आर इन डीप ट्रबल.. दोन प्रपोजल्स आहेत विचारात.. पण स्लो प्रोग्रेस आहे.. "
"मी.. असं ऐकलं की... ते ... म्हणजे पैसे वगैरे..."
"उधार घेतो.. जो देईल त्याच्याकडून.... पाचशे मिळाले तर पाचशे.. दोनशे तर दोनशे.."
"व्यसन वगैरे आहे का??"
"स्मोकिंग, ड्रिन्क्स... दोन्ही.. पण.. आता कमी आहे.. कारण आता पैसेच नसतात... मग रोज पिणार्या मित्रांपैकी कुणालातरी जाऊन संध्याकाळी भेटायचे.. मग तो एखादं ड्रिंक देतो वगैरे.. "
"पण हे झालं कसं सगळं??"
"त्याच्या स्वभावामुळे झालंय.. हायली इगोइस्टिक... दुसर्याचा अपमान करणे.. तोंडावर... माणसे दुरावली.. कुणीच राहिलेलं नाही.. माझ्याशिवाय.. "
"आणि मग.. पण म्हणजे.. एखादा जॉब वगैरे??"
"तो आणि जॉब?? त्याला ते पटत नाही... "
"तुम्ही दोघेच आहात ना??"
"मुलगा आहे.. बोर्डिंगवर असतो.. "
"केवढा आहे??"
"अकरा वर्षांचा..."
"मग तो खर्च कसा परवडतो??"
"किड्स शुड लर्न टू स्टे अलोन... माझ्या नवर्याचं आवडतं वाक्य.. त्यामुळे तो खर्च सोसावा लागतो.."
"म्हणजे.. म्हणजे तो बाहेर उधारीवर पैसे घेणार आणि तुम्ही जॉब करून मुलाला बोर्डिंगवर ठेवायचंत... असंच ना?? "
"कटककर.. तळ्याबाहेर बसून तळ्यात शेवाळं साचलंय म्हणणं सोपं असतं... "
" म्हणजे काय??"
"तुम्ही तळ्याच्या बाहेर आहात! माझं अजितवर माझ्या स्वतःपेक्षाही जास्त प्रेम आहे.. मी त्याला सोडू शकत नाही.. तो आहे तस्साच मला आवडतो... मला एक मुलगा झालेला आहे त्याच्यापासून.. मुलावर तर प्रेम आहेच... पण.. आजही केव्हातरी अजित रात्री.. माझ्या... आय मीन.. मला पाहून रडतो.. तेव्हा मला तो माझा दुसरा मुलगा वाटतो... पण त्याचा स्वभाव नाही बदलत.. हे शेवाळं आत्ता फक्त दिसायला लागलंय.. ते आधीपासूनच आहे.. पण.. ते मी स्वीकारलेलं आहे.. मला तेच आवडतं.."
सौदामिनीच्या चेहर्यावर 'फर्म कॉन्फिडन्स' होता. जो पाहून खरे तर मी चपापलोच! कारण ती अत्यंत भावनिक वाटायची मला! आत्ता त्याच्या बरोब्बर विरुद्ध भाव होते तिच्या चेहर्यावर!
" आय अॅम सॉरी अगेन... पण.. मल वाटते तुम्ही.. या सगळ्याला काही दिशा देताय असे .. दिसत.."
"असे दिसत नाही ना?? खरे आहे.. दिशा देण्यासाठी कपॅसिटी लागते.. मी जेमतेम एक जॉब करून संसार चालवू शकते.. त्याला हाताला धरून कुठल्यातरी फर्ममध्ये नोकरीला लावू शकत नाही... घरी गेल्यावर पाहते तेव्हा तो कुठून तरी मिळवलेली दारू पीत नुसता आडवा पडलेला असतो.. मला सगळं करावं लागतं.. माझ्यावर चिडतो.. काय वाट्टेल ते बोलतो.. कधी कधी.. शिव्या वगैरे.. नशेत.. इट्स नॉट सो सिम्पल कटककर.. प्रेम या प्रकारात काहीही होऊ शकतं.. "
"मला वाईट वाटतंय.. "
"हेच जास्तीत जास्त तुम्ही करू शकता.. वाईट वाटू शकतं तुम्हाला"
"सौदामिनी... अंध प्रेम... आहे असं... नाही... वाटत???"
"लंच टाईम संपत आलाय... आवरूयात.. "
काहीच साध्य केलं नव्हतं मी! तिला दुखावण्याशिवाय! माझा दुसर्याच्या दु:खाबाबत बोलतानाचा दृष्टिकोन अत्यंत साफ असतो. फक्त आणि फक्त मदत! पण आज मला ते तर करता आलेच नव्हते, उलट माझी प्रतिमाही केवळ एक तळ्याबाहेरचा मुसाफिर अशी झाली होती.
दहा बारा दिवसांनी मी पेढे वाटले. जुन्या एम एटी च्या जागी नवी कोरी काळी कुळकुळीत हिरो होंडा स्लीक आली होती. घसरड्या सीटची, कॉलेह्जिअन्सला भावेल अशी! सुसाट जायची!
"अरे वा?... आम्हाला कधी राईड?? "
डिपार्टमेन्टमधल्या एकाही पुरुषाने विचारला नव्हता तो प्रश्न सौदामिनीने पेढा तोंडात टाकत असताना हासत हासत विचारला.
"केव्हाही.. हवी तर आजच.. "
तेव्हा लाँग ड्राईव्ह मला आवडतो की नाही हे माहीतच नव्हतं कारण गाडी नव्हती. पण राईड फार फार आवडायची!
आणि अनेक दिवस झाल्यानंतर असेच एकदा संध्याकाळी दोघेच डिपार्टमेन्टला उरल्यानंतर मी विचारले..
"राईड राहिली की?? "
"अरे हो की? .. "
"येताय का??"
"छे छे.. उशीर झालाय.. आता नको..."
"जस्ट.. कॅन्टोन्मेन्टपर्यंत?? "
"अंहं.. नको.. "
"नाहीतर घरी सोडतो.. उद्या माझ्याबरोबर या.. "
"नाही.. परत कधीतरी... "
बरेच दिवस गेले. एकदा स्वतःहूनच म्हणाली.
"आज सोडाल का मला?? स्कूटर नाहीये माझी.."
"निश्चीत.. मी साडे सहाला निघणार आहे.."
" माझं झालंय काम.. "
सौदामिनी मला घरी घेऊन गेली. नवर्याशी ओळख करून दिली. अत्यंत गर्विष्ठ स्वभावाच्या माणसाला भेटलो मी! माझ्याशी बोलताना डोळे रोखून बोलत होता. मी चहा घेऊन निघालो.
दुसर्या दिवशी ती आली नाही. तिसर्या दिवशी.....
"छान आहे घर तुमचं.. "
एका क्षणभंगुर स्मितहास्यापलीकडे काहीच रिअॅक्शन नाही.
दिवसभरात मी बोलण्याचे केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ!
"काय?? आज एकदम सिरियस??"
निघताना मी कुजबुजत प्रश्न विचारला. तिने खाडकन माझ्याकडे पाहिले. काय कुणास ठाऊक! पण त्या क्षणापुरता मात्र मी आयुष्यातील कुणाचाही नव्हतो, सौदामिनीशिवाय! तिच्या डोळ्यांमध्ये अजब व्याकुळता होती. काहीतरी महत्वाचे हातून निसटल्यासारखी भावना!
"कॅन्टीनला चलताय??"
सौदामिनीने ही ऑफर द्यावी??
"अं??.. कॅन्टीन नको.. प्रीतीमध्ये चहा घ्यायचा का??"
नपुंसकता!
"मी पावणे सहाला पोचते.. तुम्ही व्हा पुढे"
प्रीतिच्या फॅमिली रूममधील थंड वातावरणात अधिकच थंड करणारे बोल ऐकत होतो मी!
"तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही खरे तर... पण तो म्हणाला की तुम्हालाही फोन करेल.. म्हणून बोलतीय तुमच्याशी.. "
"कोण फोन करेल?"
"अजित!"
"... का??"
"ही थिंक्स.. ..."
सौदामिनीचे डोळे कॉफीकडे झुकले तेव्हाच माझी मूठ टेबलवर आपटली.
उत्स्फुर्तपणे मी म्हणालो....
"ही इज सिक.. "
"ही इज.. आय नो.. "
" त्याचा मला फोन आलाच तर मी काय करू??"
"सरळ सांगा.. तुम्ही मला.... "
'बहिण मानता' हे का कुणास ठाऊक पण तिलाही म्हणावेसे वाटत नसावे आणि मलाही ऐकावेसे वाटत नव्हतेच!
तिची ती गॅप फायद्याची धरून मी म्हणालो..
"आय विल टेल हिम दॅट वुइ आर गुड फ्रेन्ड्स"
" मी.. निघते..."
मला तसाच अवाक ठेवत सौदामिनी निघून गेली. मला काही फोन बिनालाच नाही दोन चार दिवस झाले तरी! नंतर ती व्यवस्थित हसून वगैरे बोलायला लागली. मिटले असावे.
ट्रिप! शांतीबन! सेम डे रिटर्न!
डिपार्टमेंटच्या मिसेस भारती येणार म्हणून सौदामिनीही आली. प्रत्येकाने आपापली दुचाकी काढलेली होती. माझ्यामागे देवधर बसला. मिसेस भारती सौदामिनीच्या मागे!
आणि शांतीबनातील एका विचित्र क्षणी...
"आता जायचं का राईडला??"
सौदामिनीचा तो प्रेयसीच्या चेहर्याने विचारलेला प्रश्न ऐकून मी सातव्या अस्मानात पोचलो. पब्लिकला सरळ सांगीतले. यांना नवीन गाडीवर राईड हवीय! एक गुप्ते म्हणून होता तोही म्हणाला की त्यालाही ती गाडी चालवायचीय!
तिघेही रस्त्यावर आलो. पहिल्यांदा सौदामिनीला मागे बसवून फिरवून आणले. मग गुप्तेच्यामागे बसून फिरून आलो तेव्हाही ती तिथेच!
"मला.. चालवायचीय मोटरसायकल.. "
"घ्या की मग.."
गुप्ते पचकला.
"मॅडमच्या मागे बस रे... पडायच्या कुठेतरी.. "
गुप्ते चांगला पचकायचा! आय मिस हिम!
घमघमाट! घमघमाट आणि गुदगुल्या! स्पीड फक्त वीस किलोमीटर्स पर अवर! पण केसांनी होणार्या गुदगुल्यांचा स्पीड प्रचंड होता. आणि केसांच्या घमघमाटाची तीव्रता स्फोटक!
सौदामिनी काय बोलतीय हे समजतच नसावे असा मी धांदावलेलो होतो.
आज वाटते आय अॅम बॉर्न टू बी अ फ्लर्ट!
काय हे घाणेरडे विचार!
पण जग कुठल्याकुठे पोचलं आहे!
प्रामाणिकपणे सांगतो की माझा तोल जायची वेळ आलेली होती.
पण संपला तो प्रवास!
आणि आज महिन्याभराने डिपार्टमेन्टमधले सगळे कामात कंप्लीटली गुंगलेले असताना मी सौदामिनीला म्हणालो..
"हिरो होंडावर त्या शांतीबनच्या शांत रस्त्यावर मजा येते नाही?? "
स्त्री लाजते तेव्हा सत्तरीची असली तरी बरी दिसते!
सौदामिनी भर तारुण्यात होती.
"पुन्हा एकदा जायला हवे... "
इतक्या महिन्यांच्या ओळखीमुळे मी मिश्कीलपणे आणि 'माझी फार इच्छा आहे तुम्हाला गेहून जायची' हे सूचकपणे चेहरा करत म्हणालो...
त्यावर ती ते वाक्य बोलली होती...
"आपण म्हणजे आपणच हं!"
लवकर सटकलो आणि खूप फिरलो आणि एका रेस्टौरंटमध्ये खूप... खूप बोललो..
फार कॉम्प्लेक्स प्रक्रिया असतात मनाच्या!
एखादा माणूस आवडण्याची अनंत कारणे असतात. सुरुवातीला नुसतीच छाप पडू शकते किंवा वैताग येऊ शकतो. मग स्वभाव, बोलणे, आयुष्याबाबतचे विचार, छंद वगैरे! काहीसा सहवास, जो सर्वांसमोर व उघड पद्धतीचाच असतो आणि सर्वांबरोबर असलेल्या सहवासासारखाच असतो. मग त्यातून निर्माण होते अपेक्षांचे जाळे! आत्ता असे असे झाले की हा असा असा वागेल वगैरे! त्यातच कुठेतरी भिन्नलिंगियाबद्दल वेगळ्याच अपेक्षा! मग त्यात अनेक सामाजिक नीतीनियमांच्या पगड्याचा होणारा परिणाम! त्यातून मग फुलते एक भावना! फुलतेच असे नाही. फुलणारच असे नाही. फुलायला हवी असे नाही. पण जेव्हा फुलते तेव्हाचे सांगत आहे. मग हासण्यात नशा येते तर बघण्यात उत्सुकता! बोलण्यात उत्स्फुर्तता येते तर ऐकण्यात तन्मयता! प्रसंगांच्या आठवणींची माला तयार होते. ओवणारा धागा म्हणून रोजचा सहवास असतो. सुई असते समाजाच्या भीतीची! जी एकदा प्रसंगाला टोचली आणि प्रसंग धाग्यात गोवला गेला की मग त्या प्रसंगाला सुईचे भय वाटण्याची आवध्यकता राहात नाही. सूर्याच्या पहिल्या किरणाने पृथ्वीवरील दवाला कुरवाळावे आणि दवाखालील फुलाला जाग आणावी तसे एकेक दिवस मखमलीचे! लग्न झालेले असो वा नसो!
विवाहबाह्य संबंध!
समाजाने नाकारलेली बाब! निदान भारतीय समाजाने!
संबंध म्हणजे शरीर संबंध, चुंबने, मीलनोत्सुक क्रिया आणि त्याच क्रियांची ओढ असे मुळीच नाही. इन फॅक्ट अजिबातच नाही. भिन्नलिंगी व्यक्तीबरोबरच्या आपल्या नात्यातील तीव्रतेची ती पातळी, जी आपण आपल्या लाईफ पार्टनरला स्वतःहून सांगत नाही आणि ती पातळी जी आल्याचा आपल्याला आनंद होत असतो.. त्या पातळीला शरीर संबंधच आले पाहिजेत असे मुळीच नाही. सौदामिनीला मी आलिंगनात घेणे हा माझ्या आयुष्यातील एक अत्यंत जिवंत प्रेमानुभव! पण तो तिथे संपला!
कोणताही माणूस पूर्णपणे विचारांनी शुद्ध असतो यावर माझा विश्वास नाही. माझा विश्वास कसा असेल असा युक्तिवाद कदचित होईलही! पण युगानुयुगे ज्या आकर्षणावर निसर्गाला फोफावता येत आहे ते आकर्षण मनाच्याही पातळीवर एकदाही न येणे हे एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या बाबतीत घडलेले असेल असे मला वाटत नाही.
स्त्री! एक विशिष्ट प्रकारचे व्यक्तीमत्व! अत्यंत कॉप्लेक्स, ज्यावर एका पुरुषाने तर कधी भाष्यच करू नये. म्हणजे करूच शकणार नाही. विविध कवयित्रींनी स्त्रीचे स्वरूप साकारले. तरीही ते अर्धवट वाटावे अशी स्त्री!
ही स्त्री बाहेरच्या जगात वावरते. तिच्याकडे बघण्याचा आम पुरुषांचा दृष्टिकोन सगळ्यांना ज्ञातच आहे. पण आपल्या सर्वात प्रिय व्यक्तीला घरातून निघताना 'बाय बाय' केल्यानंतर सुरू होते तिचे एक स्वतःचे विश्व! ज्यात स्वतःचा सन्मान जोपासणे व इतरांना तो जोपासायला भाग पडेल असे वर्तन करणे हे कोणतीही स्त्री करतेच! पण आयुष्य तितकेच नसते. त्या बाहेरही माणूस म्हणून तिच्या अनेक अपेक्षा असू शकतात. मी फक्त सेक्सबाबत लिहीत नाही आहे. मन मोकळे करणे, कुणीतरी किंवा कुणाशीतरी भरपूर गप्पा मारणे, उगाचच फिरणे, एक मित्र मिळवणे, स्वतःला चीअर्ड अप ठेवणे आणि सौदामिनीप्रमाणे..
.... अजितवरच्या अतिरिक्त प्रेमातून अलगदपणे व तात्पुरते का होईना पण एक भिन्न भावविश्व मिळवणे, ज्यात अजितला स्थान नाही.. त्याच्या त्या दुराभिमानाचे टेन्शन नाही... तिथे आहे निखळ मैत्री आणि हो... प्रेमच... ज्याला प्रेम म्हणायचे धाडस एकांतातही स्त्रीला होऊ नये.. म्हणजे स्त्री एकटीच असतानाही.. !
हिंदी पिक्चर आणि कथा कादंबर्यांमध्ये रंगवलेले प्रेम स्वप्नवत असते. प्रेम ही कितीही दीर्घकालीन भावना असली तरी काही काळापुरती ती वेगळ्या व्यक्तीकडूनही मिळू शकते.
यात पश्चात्ताप करण्यासारखे काही नाही. पाय घसरणे म्हणण्यासारखे काही नाही. धिस इज लाईफ! कुणी बायकांच्या मागे लागत नाही. किंवा बायका अशा वाटेल त्याच्या मागे लागत नाहीत. हे होत असावे. हा विनोद वेगळा की माझ्याबाबतीत जरा जास्त झाले.
आता या व्हिडिओत आहे ती माझी बायको! मुशायर्यात मी गझल सादर करत असताना माझ्यावर कॅमेरा रोखून बसलेली आणि तिच्यावरही एक कॅमेरा रोखलेला! माझ्या लॅपटॉपला सध्या आवाज नसल्याने मी नेमका कोणता शेर त्याक्षणी उच्चारला ते मला आठवत नाही आहे. असो!
http://www.youtube.com/watch?v=vDXgDIlzyvw
माझ्याबाबतीत घडलेल्या अनेक बाबी तिला माहीत आहेत. जे आहे ते आहे! मी स्वभावाने चालू आहेच! पण तेवढेच करायला हिंडत नाही. असो! स्पष्टीकरणे द्यायची तर लेख कशाला लिहायचा?
सौदामिनीने जॉब सोडला. अधिक चांगली नोकरी मिळाली. नंतर तिच्या नवर्याला कानपूरला पंकी इंडस्ट्रिअल इस्टेटमधील एका मोठ्या कंपनीत कन्सल्टन्ट म्हणून घेतले गेले. ते आता तिकडे असतील किंवा माहीत नाही. संपर्कही संपलाच!
मी सारखा सार्या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो
-'बेफिकीर'!
(कथानायिकेचे व इतर सर्वच नावे काल्पनिक!)
======================================
नाहीच कोणीही उथळ, ही एक अडचण मानतो
गंभीर लोकांच्या जगाला मी रणांगण मानतो - http://www.maayboli.com/node/24826
जे रोज होते त्यामधे कर्तव्य मोठे वाटते
झालेच नाही जे कधी त्याला समर्पण मानतो - http://www.maayboli.com/node/24871
घसरायला मी लागलो की वाटते सुटलो बुवा
साधाच रस्ता लागणे याला विलक्षण मानतो - http://www.maayboli.com/node/25000
नाहीस माझी तू कुणी, मीही कुणी नाही तुझा
मग का तुला मी सोडणे माझी भलावण मानतो? - http://www.maayboli.com/node/25088
========================================
धन्यवाद!
मी सारखा सार्या ऋतूंची चौकशी
मी सारखा सार्या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो>>>>>>>>>>
खूप चांगल लिखाण नि तिच बेफिकीरी..................... बॉस तुसी जैसे भी हो आपल्याला आवडून गेलेत.
भुषराव, आपल्या कोणत्याही
भुषराव, आपल्या कोणत्याही रचनेत 'सुरुवात' आणि 'शेवट' नेहमीच मला भावतो.., पण या लेखाचा खासच..!
यात पश्चात्ताप करण्यासारखे काही नाही. पाय घसरणे म्हणण्यासारखे काही नाही. धिस इज लाईफ! कुणी बायकांच्या मागे लागत नाही. किंवा बायका अशा वाटेल त्याच्या मागे लागत नाहीत. हे होत असावे. >> अगदी नैसर्गिक आहे..!
मधला भाग 'जाणुन' गाळला!
धन्यवाद!*
जीभेचे मनाशी लग्न ही कल्पना
जीभेचे मनाशी लग्न ही कल्पना आवडली. तो अख्खा परिच्छेदच मस्त आहे.
समिक्षकाची व्याख्या वाचून हहपुवा झाली.
कथा फुलवण्याची पद्धत छान! व.पु. टच आजही जाणवला आणि आनंद झाला.
शेवटचा शेर अतिशय आवडला.
पु.ले.शु.
लेख, मधले मधले
लेख, मधले मधले चिंतन,समीक्षकांना कोपरखळ्या आवडल्या.
मी सारखा सार्या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो
सहीच!
संदीप, चातक, सानी,
संदीप, चातक, सानी, साती,
मनापासून आभारी आहे.
-'बेफिकीर'!
कितीही म्हंटले तरी तुमचे
कितीही म्हंटले तरी तुमचे लिखाण इग्नोर करता येत नाही.
मी सारखा सार्या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो.
सहीच.
सुंदर आणि संयत!!
सुंदर आणि संयत!!
मी सारखा सार्या ऋतूंची चौकशी
मी सारखा सार्या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो.
>>>>>>>>>>
यात सगळ्या कथेचं सार आहे.
पुढील प्रकरणांच्या प्रतिक्षेत 
छानच झाला आहे हा भाग
छानच झाला आहे हा भाग सुद्द्धा..विशेषतः शेवटचा शेर अप्रतिमच.
छान लिव्हलय...
छान लिव्हलय...
छान लिहिलय , पुढचा अध्याय कधी
छान लिहिलय , पुढचा अध्याय कधी ?
काही बोलत नाही...... फक्त
काही बोलत नाही......
फक्त
__/\__
चंचल, कणखर, भुंगा, नितीन,
चंचल, कणखर, भुंगा, नितीन, रोहित, शोले व प्रसन्न अ!
मनापासून आभारी आहे सगळ्यांचा!
-'बेफिकीर'!
मी सारखा सार्या ऋतूंची चौकशी
मी सारखा सार्या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो
>>> सुंदर !!
ही कथा पहिल्या कथांपेक्षा जास्त "खरी" वाटली !
... इन फॅक्ट अजिबातच नाही. भिन्नलिंगी व्यक्तीबरोबरच्या आपल्या नात्यातील तीव्रतेची ती पातळी, जी आपण आपल्या लाईफ पार्टनरला स्वतःहून सांगत नाही आणि ती पातळी जी आल्याचा आपल्याला आनंद होत असतो.. त्या पातळीला शरीर संबंधच आले पाहिजेत असे मुळीच नाही.
>>>
शेवटी आलेला शेर उत्तम/समर्पक
शेवटी आलेला शेर उत्तम/समर्पक आहे.
अवांतर- एकदा तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या नात्याबद्दल वाचायला आवडेल.
नवीन प्रतिसादकांचे आभार!
नवीन प्रतिसादकांचे आभार!
-'बेफिकीर'!
अवांतर- एकदा तुमच्या आणि
अवांतर- एकदा तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या नात्याबद्दल वाचायला आवडेल.
>>>
माझे आणि पत्नीचे नाते अवांतरच म्हणायला हवे
तेही लिहिणार आहेच