"माल्तकैकळतच्नै" - रेखा

Submitted by बेफ़िकीर on 31 October, 2011 - 08:02

उतरलेले मन पुन्हा 'काळी चारला' लावून देण्याचे कौशल्य रेखाकडे मोठ्या प्रमाणावर होते.

ऊन चढू लागले की माझ्या पायातील स्टीलचा रॉड तापून दुखायला सुरुवात होते ती पार तिन्हीसांजा होईपर्यंत तशीच वेदना राहते. खर्‍या अर्थाने पोलादी पुरूष झालो २००५ पासून! आठवण्याचे कारण म्हणजे रेखाला तिन्हीसांजेपर्यंत भेटण्यात अर्थच नसायचा. कारण ती शेजारी बसून अखंड बडबड करत असताना अचानक काहीतरी ठामपणे पटवून देण्यासाठी तिचा उजवा हात जोरात माझ्या डाव्या मांडीवर आपटायची आणि मला कळवळल्यासारखे होऊनही 'स्त्रीच्या हाताने मला काय होणार' अशी गर्विष्ठ भावना माझा चेहरा मख्खच ठेवायची.

आणि तिन्हीसांजेनंतर मला भेटण्यात अर्थ उरलेला नसतो.

तरीही दोघे सतत भेटायचोच!

दिवसाला रात्र करण्याचे तंत्र तिला अवगत होते .... केवळ तिच्या बडबडीने! तिची बडबड ऐकून तापणार्‍या उन्हाचा रंग सावलीसारखा व्हायचा.

मी आयुष्यात तीनच व्यक्तींसमोर गप्प राहतो किंवा गप्प होतो. साहेब, कस्टमर.......... आणि रेखा!

रेखाला फक्त ऐकावे. डोळे मिटून ऐकले तरी चालेल, पण ते ऐकणार्‍याला चालेल, तिला नव्हे.

उकाड्याने हैराण होऊन एस टी च्या लाल डब्यात बसलेल्या प्रवाश्याला गाडी सुरू झाल्यावर जसा हालत्या हवेने गारवा मिळतो तशी रेखा आयुष्यात आली. आणि पृष्ठभागावर असंख्य लाटा असलेल्या सागरासारखाच तिचा तळही स्तब्ध, थंड, अंधारलेला आणि गूढ होता. ती मला आता भेटत नाही. पण लाटा कानात गर्दी करतात आणि तळ मनात साचून राहतो. मग आपणही गूढ होऊ लागतो. आपल्यालाच आपला सुगंध येऊ लागतो.

एसी रूमच्या दाराबाहेर असताना बाहेरचा कोलाहल जाणवावा पण दार उघडून रूमच्या आत गेल्यावर बाहेरच्या दुनियेशी संबंध संपावा तसे रेखाची आठवण आली की होते.

विद्या नावाची एक मुलगी लांबच्या नात्यात होती पण आमच्या जवळ राहायची. तिच्या लग्नात तिची मावशी असलेली विवाहीत रेखा मला पहिल्यांदा भेटली. तिचा नवरा अंबर एस के एफ मध्ये अकाउंट्सला होता. रेखाचे आणि माझे मात्र काहीच नाते नव्हते. पहिल्यांदा भेटली तेव्हा अत्यंत नखरेल आणि जादा शहाणी वाटली. मीही तिला असाच काहीतरी वाटलो असेन! आणि मग तिच्यातील गोडवा जाणवू लागला.

नॉर्मली आंब्याची कोय गरापेक्षा आंबट असते. रेखाचे उलटे होते. कडू भाव चेहर्‍यावर, तुरट जाणिवा डोळ्यांमध्ये, खारट शब्द जिभेवर, तिखट विचार मनात आणि बाकी सगळी साखर!

विशाल या आपल्या मुलाशी बोलत असताना मात्र रेखा अंतर्बाह्य साखरच व्हायची. तिने त्याला जवळ घेऊन त्याच्या गालांवर ओठ टेकवताना मी कित्येकदा पाहिले. मनात विचार यायचा की रात्री अंबरलाही असेच जवळ ओढून त्याच्याही गालावर ओठ टेकवत असेल. ओठ टेकवताना ती पूर्ण समर्पीत झालेली दिसायची. डोळे मिटून मुलाच्या गालावर हळूच ओठ टेकवून तोंड बाजूला करून मुलाकडे स्नेहार्द्र नजरेने बघताना तिला पाहिले की काही वेळा तर असे वाटायचे की आपली आईही अशी असायला हवी होती. रेखाचे 'कोणीतरी' असणे यातही खूप काही होते. तिचा प्रियकर किंवा नवराच व्हायला पाहिजे असे काहीच नाही. फक्त आणि फक्त तिचे आपण 'कोणीतरी' असायला हवे इतकेच! मग मित्र असो, शेजारी असो, भाऊ असो, मुलगा असो, बाप असो किंवा..... तिचे वादळ सोसणारा आणि पडत राहणारा एक जुनाट वाडा असो! पण तिचे 'कोणीतरी'! अशा व्यक्ती फार कमी असतात. माझ्या अनेक किश्श्यांपैकी रेखा हा किस्सा (किस्सा हा शब्द उथळपणे वापरलेला नसून दुसरा शब्द पटकन न सुचल्यामुळे घेतला आहे इतकेच) मनावर कायमस्वरुपी व 'जवळपास' सर्वाधिक कोरीवकाम करून गेला आहे.

पहिल्यांदा झालेल्या भेटीत बनलेले मत लग्नाच्या धांदलीत केवळ दुसर्‍याच दिवशी बदलले.

लग्न अजून एका महिन्यावर होते. पण तिला लग्न चढले होते आणि मला ती!

विद्याच्या घरात एखाद्या मालकी हक्काने ती वावरायची. अगदी फरशी पुसण्यापासून ते विद्याच्या आई वडिलांना, जे तिच्यापेक्षा दहा दहा बारा बारा वर्षांनी मोठे होते, त्यांना सर्वांसमोर खडे बोलही सुनवायची. हवा जशी कोठेही असते तशी रेखा असली की केवळ रेखाच भरून उरलेली असायची. ह्याला टाळी देऊन हास, त्याच्यावर कमेंट कर, एकावर रागव, दुसर्‍याला गोंजार, कामे उरक असले प्रकार ती दशभुजा देवीसारखी करत असायची.

रेखा ही एक अवस्था होती मनाची! तुला काय झाले आहे असे कोणी विचारले तर म्हणावे की 'मला रेखा झाली आहे' इतपत अवस्था!

तिला भेटल्याच्या तिसर्‍याच दिवशी माझ्या मनाने मला आज्ञा केली.

'फक्त ऐक, तिला एक कान हवा आहे आणि तुला वादळ, फक्त ऐक'

'अवघड आहे'

'अवघड आहे' हे रेखाचे अनेक पेटंट विधानांपैकी एक विधान होते. तिची अनेक पेटंट विधाने खालीलप्रमाणे:

'अवघड आहे' (उच्चार 'अवघडे')

'मला तर काही कळतच नाही' (उच्चार - माल्तकैकळतच्नै)

'एक्झॅक्टली' (उच्चार - एक्झॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅक्टली)

'पिल्लू ये इकडे' (उच्चार - पिलुयीकडे)

'ह्याला काही अर्थ आहे का?' (उच्चार - याल्कैअर्थ्थय का)

'हे मी आज नाही सांगत आहे' (उच्चार - हे मी आज्ञैसांगतए)

गंमत म्हणजे आम्हाला शेवटचे 'सिरियस' भेटून आज चार वर्षे होत आली असली तरीही तिची 'मला तर काही कळतच नाही' आणि 'ह्याला काही अर्थ आहे का' ही विधाने माझ्याही तोंडात बसली आहेत, जणू माझीच जीभ बनून!

तर तिची ही विधाने जी होती, ती तिला ट्रिगर करायलाही वापरता यायची. पहिल्या तीन दिवसात जवळपास वीस एक वेळा ती अवघड आहे असे म्हणालेले मी पाहिल्यानंतर चवथ्या दिवशी जेव्हा विद्याचे वडील घरातच सिगारेट ओढू लागले तेव्हा मी गंमत म्हणून किचनमध्ये जाऊन तेथे काहीतरी करत असलेल्या आणि हवेशी बोलत असलेल्या रेखाला पाठमोरी पाहून एक वाक्य टाकले.

"अवघड आहे"

गचकन मागे वळून मला पाहताना तिचे केस नर्तिकेसारखे उडून परत बसले आणि ते बसायच्या आत रेखाचा प्रश्न कानांवर आदळलाही!

"काय?"

रेखा तुफान स्पीडमध्ये बोलायची.

"तुमचे नर्‍याकाका हॉलमध्ये स्मोक करतायत"

विषय संपला!

इतका ट्रिगर अनेक मिनिटे 'रेखाळण्यासाठी' पुरेसा असतो, हे मला तेव्हा पुरते माहीत नसले तरी बर्‍यापैकी माहीत होते.

"अवघडे म्हणजे? अक्षरशः हॉरीबल आहे, हे काय मी आज नाही सांगत! वीस वर्षं पाहतीय वीस वर्ष! माझं काय म्हणणं आहे, इफ यू हॅव ऑल दीज हॅबिट्स दॅट्स फाईन, अंबर अल्सो स्मोक्स, पण घरात? तेही लग्नघरात? पहिल्या मजल्यावर घर आहे, पटकन खाली उतरता येते, पण ऐकणार नाहीत. मुलाकडच्यांनी पाहिलं आणि काही बोलले की मग समजेल. इथे केळवणं चाललीयत, धार्मिक विधी होतायत आणि हे फुंकणार! ह्याला काही अर्थ आहे का?"

मी फक्त होकारार्थी मान हालवत तिच्या मागे वळून फास्ट बोलताना होणार्‍या विभ्रमांकडे बघत बसलो. त्याच क्षणी मला समजले. की ही कोणाशीही तितक्याच मोकळेपणाने बोलत असणार! म्हणजेच मन स्वच्छ असणार! आणि आपले तरी निदान जमणार, तिला जमवायचे नसले तर राहूदेत! पण असे मोकळेपणाने बोलणारी व्यक्ती आपल्याला तरी आवडते बुवा!

सलूनमध्ये शेव्हिंग करायच्या आधी न्हावी चेहर्‍यावर पाणी मारतो तसे रेखाचे शब्दांचे शिडकावे असायचे आणि अ‍ॅस्ट्रिंजंट लोशनसारखे भाव बोलण्यात! आग आग तर व्हायची, पण हवीहवीशी आग वाटायची. आपण फक्त गुंगायचे.

अनेकदा झर्‍यांमध्ये झरे मिसळत मिसळत नदी होते. दोन झरे मिसळले की एकत्र वाहू लागतात उताराकडे! मग हळूच तिसरा ओघळ येऊन त्यात सामावतो आणि स्वतःचे स्वतंत्र स्वरूप घालवण्याचा त्यागही करतो. कित्येक किलोमीटर्सनंतर त्या वाहण्याच्या, सामावण्याच्या आणि त्यागाच्या कृतीच्या मालिकेला नदी हे नांव पडते. अगदी माणसांच्या नातेसंबंधांसारखेच! संसार या नदीत अनेक जण सामावलेले असतात. हा हिचा नवरा, ती त्याची बायको अशी नावे पडतात. स्वतंत्र व्यक्तीत्व प्रभावित होत होत शेवटी सर्वांचे मिळून एक व्यक्तीत्व निर्माण होते. मात्र संसार आणि नदी यातील मुख्य फरक म्हणजे सर्व एकत्रित होणार्‍या प्रवाहांची वाहण्याची दिशा एकच नसते. वेगवेगळ्या दिशांना वाहायचे असते प्रत्येकाला!

रेखा या नदीत मात्र सगळे आपोआप एकाच दिशेला जाऊ लागायचे. माझी बायकोही मला म्हणाली. 'स्वभावाने चांगली आहे नाही का रे ती?' मीही 'हो' म्हणालो. प्रश्नच नव्हता, रेखा दिलखुलास होतीच! पण...

... पण!

नर्‍याकाका आणि विद्याच्या आईने घोळ केला. आम्ही त्यांना केळवण केले तेव्हा रेखाला अर्थातच बोलावले नव्हते कारण ती आणि आम्ही इतके परिचित नव्हतोच. तिने त्यांना केळवण केले तेव्हा तिनेही अर्थातच आम्हाला बोलावले नव्हते. पण नर्‍याकाका आणि काकू यांनी आमच्याकडे जसे निमंत्रण केले तसे रेखाकडे केलेच नाही. यात निमंत्रण न करण्याचा हेतू तर अजिबातच नव्हता. केवळ कॅज्युअली घेणे! ही काय, घरचीच आहे असा काहीसा दृष्टिकोन! अतिशय विचित्र होते हे सगळे! काही असले तरी आपण सख्ख्यांनाही निमंत्रण देतोच! रेखाने ते लक्षात ठेवले. तिने त्यांना केळवण केले तेव्हा लग्नाला फक्त आठ दिवस राहिलेले होते.

हे सर्व आठ दिवस मला वाटले त्याहीपेक्षा वेगळे गेले. विद्याचे माझ्या पत्नीवर असलेले प्रचंड प्रेम आम्हाला दोघांनाही सारखे त्यांच्या लग्नघरातच डांबून ठेवत होते आणि रेखा आइ तिचा मुलगाही सारखे तिथेच वावरत होते.

सतत संबंध, गप्पा, हास्यविनोद, येणारे जाणारे नातेवाईक आणि शेजारीपाजारी.... आणि 'रेखाळलेपण'!

तिच्यात आणि माझ्यात एक वेगळे नाते निर्माण करणारे हेच ते आठ दिवस होते!

"माळा आणल्यास का तू?"

विद्याच्या आईने रेखाला केलेला हा प्रश्न तीमलाकरूच शकत नव्हती कारण ती मला कामे सांगत नव्हती. पण रेखा मात्र तिच्याकडे राबायची, जशी माझी पत्नीही राबायचीच!

रेखा या प्रश्नाने ट्रिगर झाली.

"माल्तकैकळतच्नै! काल नरूकाका आणणार होते ना माळा? ते निवांत पाय पसरून शोभा डे वाचत पडलेत आणि तू मला राबवतीयस.. हे असलं चालणार नाही मला... गुड्डी तू कॉलेजला जा.. बघत बसू नकोस इथली नाटकं... ती कधी संपणार नाहीत... अवघडे सगळं.. आता मला गेलंच पाहिजे... चिवडा कोण करणार आता?? यशश्री, तू किचन सांभाळ मी जाते.. अहो.. उठा... निदान माझ्याबरोबर तरी याल का नाही?? "

नरूकाका अजिबातच जाणार नव्हते तिच्याबरोबर!

"एकटी जाते मी... मुलाकडच्यांनी व्याहीभोजनाला बोलावलंय का मला?? त्यांना माहीतच नसेल लग्न कुणामुळे उभ राहिलंय.. एकदा इकडे येऊन बघा म्हणाव.."

मी तेवढ्यातल्या तेवढ्यात पुटपुटलो.

"अ‍ॅक्च्युअली काल हेच आणणार होते माळा असे मीही ऐकलंय बर का?"

"एक्झॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅक्टली .... जाऊदेत... मी माझी गाडी घेऊन जाते.. "

कोणीतरी बडबडलं... "भूषण तू जा की??"

मी 'ओके' म्हणालो तशी रेखा काय बोलली असावी?

"ह्यांची कंपनी मला आवडतेच... चला हो... आपण माळा आणू"

किचनमधून बाहेर येऊन यशश्री माझ्याकडे पाहून कपाळाला आठ्या चढवून पुन्हा आत गेली.

आम्ही चालत चालत तिच्या पार्किंगपाशी गेलो तेव्हा मला धक्का बसला. ती अ‍ॅक्च्युअली आमच्या सोसायटीपासून शंभर मीटर्सवर असलेल्या एका सोसायटीत राहायची. त्यामुळे इथे येताना ती नेहमीच चालत यायची. मला वाटले की माळा स्वयंचलित दुचाकीवरून आणायच्या असाव्यात!

एस एक्स फोर!

ही अवाढव्य गाडी!

मी बावळटासारखा प्रश्न विचारला.

"काय करतात मिस्टर?"

"एस के एफ ला अकाऊंट्सचा हेड आहे.. आणि घरचे हिशोब समजत नाहीत..मलाच करायला लागतात... बसा.."

च्यायला इलेक्ट्रिकच्या माळा इतक्या लांबून का आणाव्या लागत असतील असा प्रश्न मी विचारताच तिने विद्याच्या आईच्या एका लांबच्या नातेवाईकालाच रोषणाईचे कंत्राट दिल्यामुळे तिथून आणायच्यात असे सांगितले.

'तू किसी औरकी जागीर है ऐ जाने-गझल
लोग तुफान उठायेंगे मेरे साथ न चल'

लग्न व त्यासंदर्भातून माणसांचे येत असलेले अनुभव आणि व्यथा!

अखंड बडबड, वाहतुकीला उद्देशून शिव्या आणि मधूनच माझ्याकडे बघत 'अवघडे' किंवा 'माल्तकाईकळत्च्नै' चा जप!

आम्ही माळा घेऊन घरी आलो आणि जेवायलाही बसलो.

मला सुट्टी नसली तरी साहेब दिल्लीत बसत असल्याचा फायदा घेऊन मीही जमेल तितका वेळ तिथेच काढत होतो, अर्थात, तो काही रेखासाठी नव्हे, पण आता मात्र रेखासाठीच वेळ काढावा असे वाटू लागले होते.

याचे कारण होते. वाट्टेल ती मुलगी, स्त्री बोलायला लागली की आवडतेच असे मुळीचच नाही. पण रेखामध्ये एक पुरुषी थाट होता जो फार कमी स्त्रियांमध्ये असतो. ती अत्यंत आक्रमकपणे वागायची. तोंड सोडायची. त्याचवेळेस दिसायची मात्र अतिशय नाजूक! गोरी पान होती, पण बरीच बारीक होती. ती एरवीही नटलेलीच असायची. आता तर काय, लग्नच होतं म्हणा!

रेखा मनापासून वागणारी स्त्री होती. मला या गोष्टीचा आदर वाटायचा. सहसा लाजाळूपणा किंवा शिष्ठपणा करत वागणार्‍या स्त्रियांच्या गर्दीत रेखाला मी मनातल्या मनात फार वरचे स्थान देऊन टाकले होते. अर्थात, यशश्री आणि तिची आमच्या दोघांपेक्षाही जवळची मैत्री झालेली होती हे वेगळेच!

आता मी सकाळी विद्याच्या घरी गेलो की रेखाची वाटच पाहायला लागलो होतो. कोणीतरी तिचा नंबर मलादेऊन तिला फोनवर 'कधी येणार आहे' हे विचारायला सांगितले. मी विचारले तेव्हा ती म्हणाली निघतेच आहे आणि हा तुमचा नंबर आहे का? म्हंटले हो! अर्थातच आम्ही दोघांनी एकमेकांचे नंबर्स सेव्ह करून ठेवले.

लग्नाची बरीचशी जबाबदारी तिने आणि माझ्या पत्न्ने उचललेली असल्याने मला तेथे सहज वेळ घालवणे शक्य असायचे. मीही काहीबाही करतच असायचो. या कालावधीत रेखा आणि माझे नाते जरी पक्के होऊ लागले असते तरी ते वरवरचेच आहे हे मला आणि तिलाही माहीत होते.

पण ती रात्र!

रात्री अकरा वाजता मी तिला तिच्या घरापाशी सोडायला गेलो. तिचा नवरा खाली येऊन मुलाला वर घेऊन गेला. तिने त्याला सांगितले की जरा वेळ भूषणशी बोलून येते. यशश्री अजून लग्नघरीच होती. आज मेंदीचा कार्यक्रम होता.

आणि रेखा काहीशी अबोल, काहीशी भावनिक झाल्याचे मला लक्षात आले.

"काय झालं?... काही प्रॉब्लेम??"

'छे छे.. आय डोन्ट केअर..."

"म्हणजे??"

"मला एक सांगा... माझ घराणं आणि ह्यांच वेगळं आहे ना?? मला घरचीच समजून अजूनही बोलावलं नाहीये! परवाच्या दिवशी कार्यालयात जायचंय सीमांतपूजनाला! त्यांना तुम्ही काहीही सांगू नका.. मी बघणारच आहे.. बोलावतात की नाही ते! मला नाही तर निदान माझ्या नवर्‍याला तरी नको का बोलवायला?? ह्याल काही अर्थ्थ आहे का? मी काय राबायला ठेवलेला घरगडी आहे? "

आज अगदी पहिल्यांदाच, अगदी प्रथमच मी रेखाच्या स्वरात 'काळी दोन' ही पट्टी ऐकली. एरवी काळी चारच्या खाली न येणारी रेखा आज ओलावल्यासारखी बोलत होती.

"मी यशश्रीलाही बोलले, पण तिलाही सांगितलं की तिथे काही बोलू नकोस... मला बघायचंच आहे... "

एक मात्र होते. खरोखरच रेखा तिथे राबत होती आणि मनापासून सगळं करत होती. विद्याच्या आई वडिलांना काहीच करायचे नसल्यासारखे नुसते फर्माने सोडत होते. मला वाईट वाटले.

"आय अ‍ॅम सॉरी... पण आता काही वाटून घेऊ नका.. लग्न झाल्यावर काय ते बोला... "

"मी बोलणारच नाही आहे.. ओके... जाते... गुडनाईट.. उद्या भेटू"

"गुड नाईट.. विचार नका करू... "

होकारार्थी मान हालवून ती लिफ्टपाशी पोचेपर्यंत मी तसाच उभा राहिलो. ती लिफ्टच्या आत जाताना मी तिला हात केला तेव्हा मात्र अगदी नेहमिसारखेच हसून तिने नाजूकपणे हात हालवला.

तो क्षण होता जेव्हा आम्ही एकमेकांना खूप खूप आवडलो.

त्याच क्षणानंतर अशा गोष्टींना सुरुवात झाली की एकमेकांची वाट पाहणे, टाळी देऊन हासणे, नजरानजर, कॉम्प्लिमेन्ट्स, अधिकाधिक बोलायचा प्रयत्न, एकमेकांबरोबर बाहेर जाऊन काहीतरी काम करायचा प्रयत्न!

सगळ्यांनाच सगळेच समजत असेलही, पण त्यात कुणालाही काहीही वावगे वाटु शकत नव्हते कारण रेखा अशीच आहे हे सगळ्यांना माहीत होते.

पण आता आम्ही काही कामाने बाहेर गेलो की एकमेकांशी अधिक जवळीकीने बोलत होतो. सारखेच जात होतो असे नाही, पहिल्यांदा गेल्यानंतर मोजून दोनच वेळा गेलो असू! बाकी वेळा ती आणि यशश्री किवा इतर कोणी असे जायचे.

मात्र सीमांतपूजनाला निघायच्या वेळेस यशश्रीने मला थेट सांगितले. सारखे तिच्याशी बोलू नकोस. गैरसमज होऊ शकतो. मी हादरलोच!

प्रत्यक्ष संबंध येतात तेव्हा नात्याची खोली जाणवतही नाही किंवा नसतेच तरी! सगळे होऊन गेल्यावर मात्र चुटपूट लागते.

रेखा विद्याच्या आई बाबांना कधीच म्हणाली नाही की तिला निमंत्रण केलेच गेले नाही. ती तशीच वादळासारखी लग्न पेलत आणि काळज्या उडवत कार्यालयाच्या वातावरणाला शोभत राहिली.

पाच सवाष्णींनी ओवाळायचे असते तेव्हा तिने ड्रेस घातलेला असल्याने विद्याच्या आईने रेखा समोर असूनही तिला बोलावले नाही आणि सर्वांदेखत सांगितलेही की तू ड्रेस घातलेला आहेस. हे मात्र मला यशश्रीकडून समजले.

असे काय फारसे असते आयुष्यात? थोडासा सन्मान, थोडेसे अ‍ॅप्रिसिएशन आणि थोडीशी मायेची ओल! पण माणसाला तेही मिळत नाही. म्हंटले तर आम्हा सर्वांपेक्षा खूप खूप जास्त श्रीमंत होती ती! तिचे आणि तिच्या नवर्‍याचे प्रेमही खूप होते एकमेकांवर! पण तिला विद्याच्या आई वडिलांकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्णच होत नव्हत्या, उलट अपमानच पदरी येत होते.

लग्न झाल्यानंतरची सामसूम महाभयंकर होती. सगळेच आपापल्या घरी क्लांत होऊन पडलेले! सगळी मजा संपलेली!

माझं आणि रेखाचं तिथेच संपणार असं वाटत असताना... तिसर्‍या दिवशी दुपारी मला तिचा फोन आला..

मला! यशश्रीला नाही.

"ह्याला काही अर्थ्थ आहे का? मी त्यांच्याच घरात असताना नरूकाका अंबरला कुठेतरी घेऊन गेलेले असताना गाडीत एकट्या अंबरलाच पत्रिका दिली... हे काय हे?? मी आज अंबरला म्हणाले आपल्याला निमंत्रणच नाही तर म्हणे मला दिली की पत्रिका... माझ्या कारमध्येच राहिली म्हणे"

"मला वाटते आपण भेटू"

"एक्झॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅक्टली.. एकदा काय ते ठरवूच.. तुम्ही याल का??"

"केव्हा??"

"आज संध्याकाळी?? घरीच या.. चहा घ्यायला.."

"हो पण... हिला उशीर होतो यायला... आठ वाजता येते ही..."

"ओह..."

एक दोन सेकंदांची गॅप! मला समजेना की ती मला एकट्यालाच या म्हणतीय की दोघांना! मी आपले सेफ साईड म्हणून 'मी तरी दोघांना समजतोय' असे भासवून टाकले.

मग पुन्हा ती म्हणाली..

"कारण अंबरलाही दहा वाजतात यायला.. ठीक आहे मग... रविवारी वगैरे.. ???"

"चालेल... नाहीतर मग... "

"...... "

"नाहीतर मी येतो चहा घ्यायला.. मला चहा आणि चहाला बोलावणारे आवडतात"

इतक्या दिवसात पहिल्यांदाच तिच्या 'काळी चार' मधून लाजरं हसू उमटलं! आवाजावरून तसं वाटलं! तसं हासताना ती दिसते कशी हे पाहायची इच्छा होती खरी, पण ती या क्षणी पूर्ण होणे शक्य नव्हते.

"अवश्य या... मलाही चहा पाजायला आवडतो.."

संध्याकाळी सहा ते सव्वा सात!

'विद्याचे लग्न' या विषयावर एक अवाक्षरही बोलले गेले नाही या कालावधीत!

परिचय वाढवण्याचीच चर्चा झाली. कोण काय करते, काय काय आवडते, इत्यादी!

आणि आज वादळ मंद झुळुकीसारखं झालं होतं! त्यात वादळी आवेगच नव्हता. त्यात होता हळुवार पणा जो कानांना आणि डोळ्यांना सुखावून जात होता. उलथापालथ नव्हती. हळुवारपणे घडी विस्कटणे होते. विस्कटण्यात मजा येते. डायल्यूट होण्यात खरी मजा आहे.

एकदा, दोनदा! दॅट्स इट! वाटले की आता हे थांबेल!

पण आता मला थांबायचे नव्हते. आता मी संपर्कातील सातत्य मेंटेन करू लागलो. फोन कॉल्स होऊ लागले.

तेच ते नेहमीसारखे साचे! मला तर आता आता पुढे काय होऊ शकेल याचा अंदाजही आल्यासारखा वाटायचा.

मात्र एके दिवशी तिच्या घरी गेल्यावर वेगळा प्रकार घडला.

तिने थेट विषय काढला.

"मला एक विचारायचंय... आपण हे काही वेळा असे भेटलो याचा काही वेगळा अर्थ होतो का?? होऊ शकतो??"

मी पुन्हा हादरलो. हो म्हणावे आणि तिला ते अभिप्रेत नसले तर रागवायची. नाही म्हणावे आणि तिला 'हो' अभिप्रेत असले तर उलट्या अर्थाने रागवायची.

"वेगळा म्हणजे कसला ते माहीत नाही.... पण... मला एक गोष्ट बोलायची आहे"

माझा आवाज गांभीर्याला शरण गेल्याचे दिसल्यावर तिचे स्त्रीत्व शालीनतेला शरण गेले. खाली मान फिरवून तिने अस्पष्टपणे विचारले.

"काय?"

"रेखा, मला हे माहीत आहे की समाज कशाला चूक म्हणतो आणि कशाला बरोबर! मीही त्याच समाजाचा एक असहाय्य किंवा सामान्य भाग आहे. विद्याचे लग्न हे आपण भेटण्याचे एक कारण होते आणि आत्ता आपल्या भेटण्याला ते कारण अजिबात उरलेले नाही. आत्ताच्या भेटण्याचे कारण उघड आहे पण ते उघडपणे व्यक्त करायचे नसते इतकेच! समाजाच्या प्रथा पाळताना मनातील भावना आवरता येत नसतात, केवळ आवरल्याचा अभिनय करावा लागतो. फक्त बायकांनाच नव्हे तर आम्हालाही! आणि कोणाला कोण का कधी आणि किती आवडावे यावर कोणाचेच नियंत्रण नसूनही नियंत्रण असायला हवे असा नियम असलेल्या समाजातील आपण दोन माणसे! खोटे काय आणि खरे काय त्याचा उघड उल्लेख न करताही खोटे काय आणि खरे काय हे सतत समजत राहणे इतकेच मनाला काम! आत्ता या क्षणी अंबर घरी आला तरी आपल्या मैत्रीबाबत जगात कोणालाही आणि त्यालाही शंका येणार नाही. पण ती पहिल्या वेळेस येणार नाही, दुसर्‍या वेळेस येणार नाही, तिसर्‍या वेळेस मात्र येऊ शकेल. हिलाही समजले तर शंका येऊ शकेल. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपण दोघेही हे जाणतो की शंका येऊ शकण्याचे पोटेन्शिअल असलेली गोष्ट आपण हेतूपुरस्पर व जाणीवपुर्वक स्वेच्छेने करत आहोत. याचाच अर्थ ते पोटेन्शिअल असले तरीही आपल्याला ...... "

'काळी चार'ने वर पाहिले. मी साहसाने पुढचे शब्द उच्चारले.

"तरीही आपल्याला हेच हवे आहे... "

काही वेळानंतर चहा घेऊन घरातून बाहेर निघताना रेखाने दार उघडण्यापुर्वी मी तिच्या जवळ गेलो. इतके समीप मी आल्याचे जाणवल्यामुळे तिने पटकन माझ्याकडे पाहिले.

माझ्यातला अंध इसम जागा झाला.

"आय वॉन्ट टू किस यू... "

बाजूलाही झाली नाही, दारही उघडले नाही आणि हो ही म्हणाली नाही.

या रिअ‍ॅक्शनचा अर्थ समजण्याइतका सूज्ञ मी नक्कीच होतो.

तिने तो प्रस्ताव स्वीकारूनही प्रत्यक्ष कृती करताना विशेष उत्साह न दाखवणे याचे मला भयंकर नवल वाटत होते.

पाणी पिऊन तहान भागू नये तसा प्रकार होता तो! घरी पोचल्यावर मी तिला 'सॉरी' असा एस एम एस केला. त्यावर तिचे उत्तर आले.

'आय थॉट यू वूड डू इट ऑन द फर्स्ट डे व्हेन यू केम अ‍ॅट माय प्लेस... डोन्ट बी सॉरी'

ही माफी होती. यात 'तू असे करावेस' अशी इच्छा नव्हती. 'करू शकशीलही' असा अंदाज आणि 'केलेच आहेस तर अपराधी भावना ठेवू नकोस' अशी माफी होती.

मला ती तिच्या 'पिलू'ला जवळ ओढून त्याचा किस घेताना होत असलेली तिच्या ओठांची हालचाल आठवली आणि जाणवले की रेखा ही अशी स्त्री आहे जिच्यावर पूर्णपणे विसंबून असलेल्यावर ती जग उधळून प्रेम करत असावी. मी माझ्यावरही अवलंबून नसल्याने तिच्यावर अवलंबुन असणे मला शक्यच नव्हते.

तिच्याकडे पुन्हा जायचे नाही असा निर्णय घेऊन मी तिसर्‍या दिवशी तो मोडला.

तिने आग्रह तर सोडाच साधे बोलावणेही केलेले नसताना मी दारात उभा राहिलो.

नेहमीप्रमाणे गप्पा वगैरे झाल्या पण त्या सर्वांवर एक विचित्र सावट असल्यासारखे जाणवले. माझ्या मनात द्वंद्व सुरू होते. चांगले व वाईट याचे मुळीचच नाही. कारण ते द्वंद्व असते तर आधीच्याच दिवशी झाले असते. द्वंद्व वेगळेच होते. माझा प्रस्ताव स्वीकारूनही त्यात मनाने सहभागी न होणे हे तिचे कृत्य मला आता अपमानास्पद वाटत होते. तिने त्यात सहभागीही व्हायला हवे असा माझ्या एका मनाचा आग्रह होता जो शेवटी मी बोलून दाखवलाच!

"त्या दिवशी... सॉरी... असे व्हायला नको होते... पण... एक विचारू का??"

"मला त्यावर काहीही डिस्कशन करायचे नाही आहे आता"

रेखा रागावलेली नव्हती, पण ठाम होती.

"पण तरीही एक प्रश्न फक्त विचारू का??"

"... हं"

"तू परवानगी दिलीस मला तसे करायला.... पण.. तुला ते अजिबातच आवडलेले दिसत नव्हते... हो ना? म्हणजे... केवळ मी आग्रह केला म्हणून तू मान्यता दिल्यासरखे झाले.. जे ... जे मला .. माझ्या मनाला खात आहे"

रेखा उठली आणि पुन्हा माझ्याकडे पाहात सोफ्यावर बसली. आज तिने दार आतून लावून घेतलेले नव्हते. उठण्याचे आणि माझ्याकडे पाहात पुन्हा बसण्याचा निर्णय घेण्याचे कारण मला समजले नाही. पण ती थोड्या क्षणांनी बोलू लागली.

'मैत्रीची जबाबदारी आणि अधिकार दोन्ही असतात. तुला अधिकार आठवला, मला कर्तव्य! मला अधिकार आठवत नाही असे नाही. आपल्यापैकी कोणीच स्वतःच्या संसारात असमाधानी नसते. तरीही मने जुळतात किंवा जुळल्याचा भास होतो. दोन ओठांनी दोन ओठांना व्यापणे हे कृत्य म्हंटले तर नगण्य आणि म्हंटले तर मोठेच पाप ठरू शकते. किंवा ते प्रेमाचे चिन्हही ठरू शकते. माझ्यासाठी ते नगण्य होते. एरवी ते माझ्यासाठी मोठे पाप झाले असते. पण तो तू होतास, जो गेले काही दिवस मला दिसत आहेस, आपण भेटत आहोत, आपल्या भेटींना एक गहिरा रंग आलेला आहे. तो तू होतास म्हणून मी त्याला पाप न समजता नगण्य मानले. प्रेमाचे चिन्ह मानणे शक्यच नाही. एकच विचार कर, माझ्याजागी एक पुरुष मित्र असता तर तू इतक्या वेळा चहा घ्यायला आला असतास घरी? तू त्याला म्हणाला असतास चल रे, बाहेर भटकू आणि कुठेतरी जेवून घरी येऊ. एक स्त्री म्हणून तू मला दिलेली सभ्य वागणूक ज्या कारणाने होती त्याच कारणाने एक स्त्री म्हणून तू जे कृत्य केलेस तेही तुला सुचले होते. मात्र मला त्यात यूझ्ड झाल्यासारखे वाटले म्हणून मी गंभीर झाले. मला स्पर्शही न करता तू किती मैत्री करू शकतोस?"

"... अवघडे"

मी तिच्याच स्टाईलमध्ये म्हंटल्यावर ती खळ्ळकन हासली.

"चल जाऊदेत... न बोलावता आल्याबद्दल तुला एक चहा प्यावा लागेल.. "

चहा झाला आणि निघताना... मी फक्त तिच्याकडे पाहिले. शक्यच नव्हते मला पुन्हा तसे वागणे! आणि माझ्या मनात पुन्हा तोच विचार आला. आपण इतके साधे यश मिळवू शकत नाही? आपण साधे तिला त्या कृत्यात मनापासून सहभागी करून घेऊ शकत नाही?

व्यथित बिथित होऊन मी माझ्या घरी आलो.

हळूहळू भेटींची तीव्रता कमी होऊ लागली. त्यात माझ्यातील स्वार्थी पुरुष होता. मुख्य कामच होण्यासारखे नसेल तेथे मने कशाला जपत बसण्यात वेळ घालवायचा हा विचार माझ्या मनात डोकावू लागला होता. खरे तर अशा माणसाला सुदृढ समाजात राहण्याचा नैतिक अधिकार नाही. खरे तर मी मनाने चांगला आहे, पण रेखाच्या बाबतीत मी एका विशिष्ट अपेक्षेमुळे किंवा अपेक्षापूर्तीपासून वंचित असल्यामुळे पूर्णपणे चांगला वागू शकत नव्हतो.

एस एम एस, कॉल्स अधून मधून व्हायचे. तिच्याकडून ती 'काळी चार'लाच असायची. माझी पट्टी कोणतीही असली तरी!

आणि एक दिवस घरी, माझ्या घरी विषय निघाला. समवन हॅड सीन मी व्हिजिटिंग हर अ‍ॅन्ड टोल्ड माय वाईफ अबाऊट दॅट!

कोणतेही समर्थन अर्थपूर्ण होऊ शकत नव्हते. मुळात असे काही झाल्याचे पत्नीला माहीतच नसणे हेच विचित्र होते. त्यामुळे समर्थनाची गरजच नव्हती. तेथे गरज होती भावनिक समर्पणाची! शरणागतीची!

माझ्यातल्या स्वार्थी पुरुषाने शरणागती हा पर्याय निवडायला नकार दिला. वाट्टेल ती कारणे सांगून मी तो प्रसंग टाळला. मीच खूप चिडल्यासारखे वगैरे दाखवले. प्रकरण अजून वाढू नये म्हणून त्यावर चर्चा बंद झाली तरी दोन मने दुखावलेलीच राहिली. जखमेचा व्रण नष्ट होऊनही हात हालवताना दुखावे तशी मने झालेली होती. खरे तर त्यानंतरच्या संसारात लगेचच इन्टरेस्ट घेणे तिला तरी शक्य नव्हते आणि माझेही तिच्यावर जीवापाड प्रेम असल्याने मी तिला स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो.

दुसर्‍या दिवशी दुपारी मी तश्याच ताणयुक्त मनस्थितीत ऑफीसमध्ये असताना रेखाचा एस एम एस आला. काहीतरी नेहमीप्रमाणेच, गूड आफ्टरनून वगैरे! मी उत्तर दिले नाही. मग एका तासाने पुन्हा आला. त्यावेळेस मी ठरवले की तिला फोन करून एकदाच सगळे सांगून टाकायचे.

मी तिला फोन केला. पहिल्यांदा तिची मनस्थिती तयार केली तेव्हाच तिला काहीसा संशय आला. नंतर खरे ते सांगून टाकले तेव्हा मला वाटले ती प्रचंड भडकेल.

रेखा ती रेखाच!

"हे होणारच होते... आपण जवळ जवळ राहतो म्हंटल्यावर.. त्यात काय विशेष! प्रश्न हा आहे की यानंतर काय करायचे! माझ्याकडून मी तुला फ्री करायला तयार आहे...... तुला काय करायचंय??"

मी कधीच माणसे पूर्णपणे तोडू शकत नाही. एखाद्याला दुखावले असल्यास तो पुन्हा भेटेल तेव्हा मनापासून माफी मागतो. मला रेखाला तोडायचे नव्हते. मी घेतलेली गॅप तिला सहन झाली नाही. तीच म्हणाली उत्कटपणे!

"आज चहा घ्यायला ये.. काय ते एकदा बोलून टाकू"

मी आणखीन विचित्र! मी बायकोला फोन करून सांगितले की मी रेखाला फोन करून म्हणालो की असे असे उठले आहे तेव्हा आपण भेटून सोक्षमोक्ष लावून टाकू.

बायको म्हणाली तुला काय गरज असे काही करण्याची ? आणि भेटायची काय गरज आहे? काही जायचे वगैरे नाही.

नंतर तासाभराने बायकोचा फोन आला की म्हणे जा! जा???

नंतर माझ्या लक्षात आले. ज्या अर्थी एवढे होऊनही मी तिच्याकडे जायचे म्हणतोय त्या अर्थी मी निष्पाप बिष्पाप असावा असे तिला वाटले असावे.

ती स्वतः मात्र येण्यात अर्थातच इन्टरेस्टेड नव्हतीच.

मी रेखाला फोन करून मी सव्वा सहाला घरी येत असल्याचे कळवले. तिलाही नवलच वाटले.

त्या दिवशी मी तिच्या घरात प्रवेश केल्यानंतर जे काही झाले ते मी विसरू शकत नाही.

मी नेहमीच्या ठिकाणी बसताच तोवर हासत असणारी रेखा कमालीची गंभीर झाली आणि मला काहीश्या रागाने बघत बोलू लागली.

"हं! आता काय मत आहे तुझं? माझ्या 'सहभागी' होण्याबाबत? आता तशी इच्छा आहे? नसेलच बहुधा! कारण आता पोळला गेला आहेस. आता तुला तसे काहीही करायची इच्छा नसेल कारण आता स्वतःचा संसार तुला महत्वाचा वाटत असणार! आणि मी जणू रस्त्यावर पडलेली एक बाई! कधीही स्वतःकडे बोलावते आणि तुझी इच्छा असली की तिने त्या कृत्यात सहभागी व्हावे असेही तुला वाटते. निखळ नात्यामध्ये या गोष्टी का शिरकाव करतात? मने जवळ येणं हे अपोझिट सेक्सच्या माणसांमध्ये झाले की त्याचा हा एकच अर्थ का निघतो? आत्ता मी तुझ्या जवळ आले तर तू सहभागी होऊ शकशील? नाही. आत्ता तू तयार करून आला असशील कित्येक मुद्दे, जे तुला मला सांगावेसे वाटत असतील. की काही झाले तरी आपली मैत्री आहेच, फक्त अती भेटणे नको, सारखे फोन नकोत, शेवटी तुला मला आपापला संसार आहेच वगैरे वगैरे! हो ना? हे मी कधी बोलले? एका रेप्युटेड सोसायटीत राहणारी एक मुलगा असणारी स्त्री असून आणि नवर्‍याची अतिशय लाडकी असूनही केवळ तुझ्याशी मैत्री करणे आवडले म्हणून मी तुला माझ्या घरी बोलवायचे. कारण बाहेर कोणी आपल्याला पाहिले तर बदनामी होऊ शकेल. मी तुझ्या घरी येणं शक्य नाही कारण तुमच्याकडे सगळे असतात. मला एक सांग, गेल्या दहा भेटींमध्ये तू केलेला प्रकार सोडला तर माझ्या वागण्यात तुला एकदा तरी तसे काही जाणवले? मग तू अशी अशी चूक केलीस हे बायकोपासून लपवून मला काय सांगायला आला आहेस? असो! मीच तुला बोलावले आहे तर सांगते. ऊठ आणि माझ्या जवळ ये! किस मी नाऊ! किस मी आय से!"

कित्तीतरी.... कित्तीतरी क्षण मी तिच्याकडे भकास नजरेने बघतच बसलो होतो. एक स्वार्थी हिजडा! तिने अत्यंत सभ्य भाषेत मला ती शिवी दिली होती जी मला मान्य होती. पुरूष ती होती. मी स्त्री आणि पुरुष यातला काहीच नव्हतो.

"रेखा... आय हॅव कम टू टेल यू की"

"जस्ट शट अप अ‍ॅन्ड गेट अप अ‍ॅन्ड किस मी.. अ‍ॅन्ड यू आर गोईन्ग टू टेक द इनिशिएटिव्ह... नॉट मी.. किस मी कम्मॉन???"

"मला... आय मीन... आत्ताच्या या परिस्थितीत.."

"बदललेल्या... बदललेल्या परिस्थितीत म्हण... कालच तुझे अन बायकोचे वाद झाले नसते तर आत्ता तू मला उचलूनसुद्धा घेतले असतेस... किस मी नाऊ आय से"

रेखा भयानक भडकलेली होती. मला घामच फुटला. तिने आता खोटा जरी कांगावा केला आणि कोणाला बोलावले असते तर मला आत्महत्या करावीशी वाटली असती.

मी धीर एकवटून म्हणालो.

"माझं ऐकून घेणार आहेस का??"

"नो... नॉट अ‍ॅट ऑल.. तू माझ्या घरात आहेस. तू यापुर्वी हे स्वेच्छेने केलेले आहेस.. यू डू इट नाऊ"

"आय कान्ट... आय जस्ट कान्ट"

स्तब्ध शांतता! मग रेखाचे उठून चहा टाकायला जाणे! माझे निर्हेतूकपणे इकडे तिकडे बघत बसणे! दहा मिनिटांनी तिने दोन चहाचे कप घेऊन बाहेर येतानाच ते बॉम्बस्वरूपी वाक्य टाकणे!

" माझे अन तिचे बोलणे झाले आहे.. मी तिचे गैरसमज दूर केलेले आहेत आणि मीच तिला म्हणाले की त्याला आज माझ्याकडे यायला सांग... आमचे नाते आणि मैत्री इतकी स्वस्त नाही हेही तिला सांगितले आहे... तिने हासत हासतच घेतले सगळे! खरे तर ती कशी आहे आणि मी कशी आहे हे समजण्याची तुझी कुवत नाही भूषण... फक्त एक रिक्वेस्ट आहे... तू इथे केव्हाही येऊ शकतोस... कोणतीही बाई आपल्याबद्दल काहीही बोलली तर मला काहीही वाटत नाही... यू नो?? अंबरला माहीत असते की तू येणार आहेस... ही नोज एव्हरीथिंग... मात्र तुझा हेतू स्वस्त होता.. आता तो तसा नसेल असे मला वाटते... माझी फक्त एक रिक्वेस्ट आहे.."

मी चहाचा एक घोटही घेऊ शकत नव्हतो. आपली मान किती खाली जाऊ शकते हे मला त्या दिवशी नव्यानेच समजले होते. तिची काय रिक्वेस्ट असावी हे पाहण्यासाठी मी वर केली मान!

"यापुढे केव्हाही माझ्याकडे तू येण्याआधी मला यशश्रीचा फोन आला पाहिजे की तू येतोयस... हे करू शकशील??"

नवीन दिशा! नात्याचा नवीन पैलू!

मला खूप काहीतरी समजले होते. खूप काही समजलेच नसावे असेही वाटत होते. मी अपराधीही वाटून घेत होतो आणि सुधारल्यासारखाही वाटत होतो. अंधारल्यासारखे आणि उजळल्यासारखे दोन्ही एकदम वाटत होते.

उठलो आणि तिच्याकडे बघून काय करावे समजेना! आत्ता या क्षणी मला तिच्याबद्दल प्रचंड आदर आणि प्रचंड प्रेम वाटत होते. आत्ता खरच मला तिच्याशी हस्तांदोलन करून आभार मानायची इच्छा होती. त्या स्पर्शाची आत्ताच्या क्षणाची गरज होती. त्यात कोणताही हेतू नव्हता.

मी उभा राहिलो तशी तीही उभी राहिली आणि बघत बसली माझ्याकडे!

"थॅन्क यू.. अ‍ॅन्ड... एक्स्ट्रीमली सॉरी"

मला तिच्या त्या 'पिलूयीकडे'ची आठवण झाली. तसे ती बोलली नाहीच. मात्र...

.... मात्र खर्‍याखुर्‍या प्रेमाने दारापाशी जाऊन दार थोडेसे लोटून घेऊन माझ्याकडे येत तिने पटकन माझ्या गालांवर ओठ टेकवले आणि ते मला कळायच्या आतच बाजूलाही झाली.

दोन चुंबनांच्या मागील विचारांच्या दर्जात किती प्रचंड फरक होता. खिन्नतेला बुजवाबुजवीची झालर लावण्यासाठी मी आज इथे आलो होतो. पण जाताना समाधानाला आनंदाची झालर लावून घेऊन जात होतो. क्रेडिट गोज टू रेखा!

मी इतका सुदैवी कसा काय ठरलो हेच मला समजेना! किंचितही अपेक्षा नसताना रेखाने माझे घर आणि आमच्या दोघांची मैत्री या दोन्ही पातळ्यांवर मला समाधानी केलेले होते.

मी इतकेही प्रेम मिळवण्याच्या लायकीचा नाहीच! पण निदान ते तरी मी लिहून मोकळा होत आहे.

लिहायचे ते लिहून टाकू.... इथे कुणाची फिकीर आहे
कुणी न माझा हुजूर येथे... न मी कुणाचा वजीर आहे...

रेखा या वादळावर मी दोन शेर रचले होते.

एकही नाते मला सांभाळता आले कुठे?
तू तरी हा डाग माझ्यानावचा मिटवून जा

आजही मी बोलताना शेकडो केल्या चुका
आजही तू ऐकल्यावर त्या चुका विसरून जा

आता रेखा भेटतच नाही असे नाही. पण आता गढूळले आहे सगळे! कारण मी गढूळ केले.

प्रश्न असा अहे की रेखाने मला साथ दिली असती तर? तर तो एक मोठा इश्यू होऊन बसला असता. माझा हेतू स्वच्छ नव्हता. मुळात तिने पहिल्या प्रस्तावाला मान्यताच कशी दिली हे आता मला समजेनासे झाले आहे. कोणतेही स्पष्टीकरण नाही त्या गोष्टीला, तिने दिलेले असले तरीही! मग असे तर नाही? की एका क्षणासाठी दोघेही गढूळले होते? की दोघे एकाच क्षणापुरते फक्त सत्य वागले होते?? माझ्यासाठी हे नाते अप्रामाणिकतेच्या व विश्वासाचा गैरफायदा घेण्याच्या पायावर उभे राहिलेले होते आणि तिच्यासाठी बहुधा निखळ मैत्रीच्या! पण आज मी हे का मान्य करू असा मलाच प्रश्न पडतो. निखळ मैत्रीत गोष्टी या थराला जाऊ न देण्याची जबाबदारी तिची नव्हती का? पण एक मात्र खरे! ती खोटे बोलत असावी याची शक्यता जवळपास नाहीच. कारण घरी आल्या आल्या रात्री बायको म्हणाली. काय रे मला फोन करता तुम्ही? मला काही प्रॉब्लेम आहे का? त्या बाई तसे बोलल्या म्हणून मी फक्त विचारले.

बायकोच्या मनस्थितीत हा फरक घडवून आणण्याइतके रेखाचे वक्तृत्व महानही नव्हतेच. मग असे झाले कसे?

की माझ्या बायकोने ही परिस्थिती स्वीकारली की आम्ही दोघे मिळून हे सेटल करणार असे म्हणत आहोत याचा अर्थ त्या प्रकरणात दम नसावा किंवा असला तरी संपेल? की रेखाने तिला हेड ऑन घेतल्यामुळे तिचाच आत्मविश्वास ढळला वगैरे? की नवर्‍याचा हा प्रकार कदाचित कायमचा संपत असला तर बरेच असे म्हणून तिने रेखाबरोबर असलेली तिची स्वतःची मैत्री टिकवली?

लोक काही वेळा असे कसे काय वागतात हे प्रश्न कायम प्रश्नच राहतात.

पण पुन्हा काही माझ्या मनाची 'काळी चार' लागलेली नाही. त्यानंतर मी कायम बदललेल्या मनस्थितीतच असायचो. जोवर........ ते जाऊदेत...

पण रेखाने नात्याची जी पातळी दाखवली..... तिला सलाम तरी कसा काय करता येईल??

प्रत्येकाचीच थोडी तरी चूक होती अशा पुन्हा एकदा स्वार्थी विचारानेच मी स्वत:ची समजूत घालतो.

पण ती समोर येते तेव्हा मात्र माझा मुखवटा क्षणभरासाठी गळतोच! तो कसाबसा सावरत मी जगाला आणि स्वतःला दाखवत राहतो की मी 'बेफिकीर' नाही, फार हळवा व चांगला आहे.

खरे तर... एक 'स्वार्थी हिजडा'!

........................ अवघडे................

माझ्या चुकांचा ग्रंथ हा भौतीक दलदल पण तरी
मी हा तुझा अध्याय वैचारीक प्रकरण मानतो

-'बेफिकीर'!

(नांवे काल्पनिक - अर्थातच, माझ्या पत्नीचे नांव सोडून)

=======================================

नाहीच कोणीही उथळ, ही एक अडचण मानतो
गंभीर लोकांच्या जगाला मी रणांगण मानतो - http://www.maayboli.com/node/24826

जे रोज होते त्यामधे कर्तव्य मोठे वाटते
झालेच नाही जे कधी त्याला समर्पण मानतो - http://www.maayboli.com/node/24871

घसरायला मी लागलो की वाटते सुटलो बुवा
साधाच रस्ता लागणे याला विलक्षण मानतो - http://www.maayboli.com/node/25000

नाहीस माझी तू कुणी, मीही कुणी नाही तुझा
मग का तुला मी सोडणे माझी भलावण मानतो? - http://www.maayboli.com/node/25088

मी सारखा सार्‍या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो - http://www.maayboli.com/node/25230

दसरा दिवाळी पाडवा करते कुणीही साजरे
आलीस आयुष्यात त्या घटिकेस मी सण मानतो - http://www.maayboli.com/node/26898

त्याच्यासवे सीमा तुझ्या ओलांडण्या गेलीस तू
की जो नपुंसक सभ्यतेला फक्त भूषण मानतो - http://www.maayboli.com/node/27193

म्हणतीलही निर्लज्ज दोघांना समाजाच्या रुढी
हा प्रश्न आहे की कशाला काय आपण मानतो - http://www.maayboli.com/node/28432

==================================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

क्या बात है!
माबोवर एक लेखक, कवी, वगैरे वगैरे सोडुन प्रत्यक्ष संवाद नसतानाही ज्यांच्यशी स्वता:ला रिलेट करु शकेन आणि ते व्यक्ती म्हणुन लक्शात राहतील असे दोघेच - बेफिकीर आणि झक्की!

इतकंच म्हणेन "बेफिकीर".......बाकी बोलण्यात अर्थ नाही.

पु.ले.शु.. Happy

खिन्नतेला बुजवाबुजवीची झालर लावण्यासाठी मी आज इथे आलो होतो. पण जाताना समाधानाला आनंदाची झालर लावून घेऊन जात होतो.................. हम्म्म्म्म...

अप्रतिम अनुभव...

फारच आवडलं बुवा हे..... अवघडे. Happy

उत्तम ,सच्चा लेख .तुमच्या लेखनातून वारंवार सौ यशश्रीबद्दल आदर वाढतच जातो .संशय येउनही त्या स्त्रीकडे नवर्‍याला बिनधास पाठवण व आपल्या अपरोक्षही संधी देऊनही त्या स्त्रीला नैतीक बंधनात रहाण्याची जरब ठेवण हे केवळ तुमची पत्नीच करू शकते .तुम्ही खूप खूप लक्की आहात तुम्हाला तुमच्या गुणदोषासह तीने पदरात घेतलय .उभयतास अनेकानेक शुभेच्छा.

मस्त भूषणराव..! छान लिहले आहे..... Happy

मला स्पर्शही न करता तू किती मैत्री करू शकतोस? >. सर्वव्यापी वाक्य/प्रश्न आहे ......

रेखाने शेवटी केलेला संवाद फार आवडला......

आवडलं.............

पण काय?

लेख का रेखा?

दोन्ही?

रेखा जास्तच.....

तुम्हाला बेफिकीरजी आणी वहिनींना...

___/\____

निशब्द.............

................./\......................
अवघडे..:)

***************
खरच काही नाती अशी असतात की त्याला काही नाव नसते...

शिर्षक वाचल्यावर वाटलं रेखा सामान्य, थिल्लर व इम्मॅच्युअर्ड बाई असावी... पण वाचनाच्या ओघात रेखा उलगडत गेली, समजत गेली, चक्क आवडत गेली. अतिशय प्रामाणिक, विचारी, मॅच्योर, आरस्पानी व्यक्तीमत्व!

रेखा ही अशी स्त्री आहे जिच्यावर पूर्णपणे विसंबून असलेल्यावर ती जग उधळून प्रेम करत असावी.>> हे फार फार आवडलं!!

छाया देसाईशी सहमत!

पुन्हा एकदा एक उत्तम व्यक्तीचित्रण!!! रेखा पटली आणि आवडलीही मनापासून!!! Happy

Pages