बेभानतेची अमावास्या - कोजागिरी

Submitted by बेफ़िकीर on 8 July, 2011 - 08:23

कोल्हापूर ओलांडून पुढे गेलो की मला एक ब्रह्मानंद मिळतो. कारण तेथे सासुरवाडी आहे आणि त्यांना चकवून आपण पुढे चाललेलो आहोत ही जाणीव दोन चार गुदगुल्या करतेच मनाला!

सोबतानंद पहिल्यादाच मिळाला.

एन एच फोर मोठा झाल्यानंतरची कहाणी आहे ही!

"डायरेक्ट हुबळीला जायचं नाही हां?" घरातल्यांनी आधीच दटावलेले होते. त्यांचे म्हणणे मी कोल्हापूरला स्टे करून उद्या सकाळी हुबळीला निघावे. कोल्हापूरला स्टे करणे किती अशक्यप्राय आहे याची सर्व ऑफिशियल कारणे त्यांना पटल्यानंतर बेळगाववर सौदा तुटला. म्हणजे मी बेळगावला स्टे करायचा यावर!

आणि तरीही मला पुण्यातून निघाल्यापासूनच कोल्हापूरहून फोन यायला लागले. आज राहा येथपासून ते चहा घेऊन जा येथपर्यंत सर्व विनवण्या झाल्या आणि त्या मोडून मी कोल्हापूर मागे टाकले आणि अत्यानंदाने एका ढाब्यावर जेवलो आणि निघालो.

मी असा का वागलो याची़ कारणे आहेत.

स्वातंत्र्य ही माझी टॉप प्रायॉरिटी आहे. मला मिळालेला वेळ मला हवा तस्साच घालवण्याची माझी एकमेव इच्छा आयुष्यात आहे, बाकी काहीही नाही. माझा वेळ दुसर्‍याला देतानाही मी हे बघतोच की तो वेळ मला हवा तसाच जाणार आहे ना. त्याचमुळे थापेबाजी आलेली आहे. पण ठीक आहे, हे काही पाप नाही म्हणता येणार!

पाप रस्त्यात भेटणार होते.

तसाही मी एकट्याने काय करतो? तर इथे जे करतो ते तुम्ही बघताच, प्रसिद्धीसाठी हपापल्यासारखा लिहीत सुटतो, ताळतंत्र सोडतो वगैरे! बाकी स्मोकिंग, ड्रिन्क्स या आवडी पार पाडतो. पण कुणाचीही शप्पथ घ्यायला तयार आहे, 'तसल्या' भानगडीत स्वतःहून पडणे मला अजूनही जमलेले नाही. एकतर नशीब मला तिथे नेते किंवा नशीबाचे नशीब त्याला!

अमूल बटर लावलेला रस्ता!

किंवा झुळझुळीत सुळसुळीत साडीसारखा!

क्रोध आणि ताण या दोन खांबांमध्ये उदासीची भर टाकून आणि स्फोटकतेचे लेप चढवून जीवन नावाचा महाल बांधला आहे निसर्गाने!

आज प्रत्येक माणूस रागात आहे, ताणात आहे, कोणत्याही, कसल्याही! उदासही आहेच आहे आणि स्फोट कधी होईल हे सांगता येणार नाही.

पण या महालाच्या बाहेरून मात्र रोषणाई आहे. सुगंध आहे, मखमल आहे, हिरवळ आहे, लावण्य आहे, पाण्याचे झरे आहेत, दिवाळी आहे, चांदणे आहे, पोर्णिमा आहे आणि.... कोजागिरीही आहेच!

बाह्य रुपावर भाळून जीव आत जातो आणि आतून बाहेर पडताना भुलभुलैय्या लागतो. मग तिथेच! मग बाहेर आपण कोण होतो आणि कुठे होतो हेही लक्षात राहात नाही. चौर्‍यांशी लक्ष पावले टाकल्यावर एक बीळ दिसते, पण तेव्हा ते मोक्षाकडे उघडणारे द्वार आहे हे कळत नाही. माणसाला वाटते हा तोच मार्ग आहे ज्याच्या मोहाने आपण स्त्रीशी रत झालो.

आणि स्त्री असली तर तिला ते दिसतच नाही.

पोटाच्या वळ्या हे दाक्षिणात्य अभिनेत्रींनी व रसिकांनी सौंदर्याचे लक्षण मानले आहे. एक दोनच, पण म्हणे असाव्यात!

अर्थात, मुद्दाम कुणी जाड नाही होत त्यासाठी, पण झाले तर उत्तम म्हणतात.

सौंदर्याच्या या बदलत्या व्याख्यांच्या वादळात हा जीव कितीवेळ उघडा ठेवावा? आणि कधीतरी उडून कसा काय गेला नाही?

जयपूरच्या त्या थंडीत त्या थिएटरमधील ती स्त्री, शालीने सर्वांग लपेटलेली! काय अप्रतीम सौंदर्य होते. तेही पूर्ण झाकलेले ! तिच्या पोटाला वळी तर राहोच, अर्धा किलो वजनही जास्त नसेल तिचे उंचीच्या प्रमाणात!

मग सगळेच आवडते असा कसा काय हा जीव?

पहिल्या वेळेस भेटलेल्या प्रेमा कतलानीची टेलरकट फिगर अजून मनातून जात नाही तेव्हाच शीतलचा विकसीत देहही मनाला चटके देत असतो? असे का?

बाजीप्रभूंपेक्षा वाईट खिंड! 'गहन खिंड'! त्यांचा फक्त देह पडला, तोफांचे आवाज ऐकल्यावर! येथे मनावरचे सुसंस्कृतपणाचे लक्तर गळून पडते. हातांना कंप सुटतो. स्पर्शासाठी बोटे शिवशिवतात. सुगंधाने बरबटलेले मन त्यातच मुरू पाहते. एकांत धैर्य देतो. वारा बेभान करतो. वेग उद्दाम बनवतो. वेळ टेकू देते. मग मन सकाळी झोपून संध्याकाळी उठलेल्या वेश्येप्रमाणे सजू लागते, मोहरू लागते.

लाखो पिढ्यांच्या माझ्या पितरांच्या वीर्याच्या मिश्रणातून जन्माला आलेला मी... आणि तुम्हीही तसेच...

आपण संत तर सोडाच, माणूससुद्धा होऊ शकत नाही. निसर्गाचा महाल त्याक्षणी तुम्हाला आत घेत असतो, ज्या क्षणी आईच्या उदरातून बाहेर येऊन तुमचा पहिला ट्यॅहॅ ऐकू येतो. जन्म झाला म्हणून सुखावणार्‍या हरामखोरांना माहीत नसते की आपल्याला आधार मिळावा म्हणून आपण एका अपत्याला पुढचे सत्तर ऐंशी वर्षे या भीषण जगात जगायला लावत आहोत. अमानवी कृत्ये! मुलाच्या भवितव्याबाबत काहीच चिंता नाही याचा पुरावा जेव्हा शासन दिवस गेल्या गेल्या मागायला लागेल तेव्हा खरी फाटेल साल्यांची!

'मी का आहे' हा प्रश्न मला वर्षानुवर्षे पुरलेला असला तरी त्या दिवशी पंधराच मिनिटात बाजूला सारावा लागला.

"बेलगांम??"

"यॅ"

"गो??"

खल्लास!

विश्वासच बसला नाही माझा! जे घडले त्यावर! एक पन्नाशीचा पुरुष आणि तिशीची महिला! पुरुषाने मला हात दाखवून थांबवून मी बेळगावलाच जात असल्याची खात्री करून घेतली आणि चक्क त्या मुलीला म्हणाला की जा याच्याबरोबर??? मला वाटत होते दोघेही बसणार आहेत.

दोन आंब्यांची खोकीच बसली मागच्या सीटवर! आणि तो आंब्यांचा घमघमाट जाणवेनासा झाला ज्या क्षणी...

... कोजागिरी एन शेजारी बसली...

"गणाचार गल्ली"

आपण बोलण्याआधीच दुसर्‍याचे कान लोणी, साखर व मध यांच्या मिश्रणाने लेपून ठेवावेत तशा आवाजात ती म्हणाली गणाचार गल्ली!

आपण आहोत कुठे हेही बघत नाहीत माणसे! अजून बेळगाव सत्तार किलोमीटर! इथे काय मी टर्न घेणार होतो त्या गल्लीकडे?

प्रवासात अत्यंत अचानक झालेला हा बदल मला नेहमीप्रमाणे विचार करण्यास प्रवृत्त करतच होता. ही महिला व्यवस्थित असेल ना! काहीतरी बोंब मारून पैसे काढण्यासाठी आपल्याला अडकवणार नाही ना! आपल्यालाच अक्कल नाही आपण थांबलो कसे! असो! आपण कविता म्हणत राहू आणि दोन चार फोन करून टाकू कुणालातरी, म्हणजे पुरावे निर्माण करून ठेवता येतील. मधे कुठेतरी चहा वगैरे घेऊ! काय सत्तर किलोमीटरचा तर प्रश्न आहे.

मी एकदा तिच्याकडे बघितले.

"अरे? बेल्ट लगाईये"

मदत करायला लागणार असे वाटले मला, पण नाही. सराईतपणे लावला तिने बेल्ट! आणि हिंदीही कळतंय म्हणजे अगदीच साऊथ दिसत नाहीये.

जुळून येताच दोन रेषा नवीन रेषा तयार झाली
पुढे कुठे पोचणार याची कुणासही कल्पना नसावी

मी पहिला फोन घरी, दुसरा प्लँटमध्ये आणि तिसरा एका मित्राला करून टाकला आणि कविता म्हणू लागलो.

शत्रू हवा कुणाला हे दोस्त बास झाले
धोकाच द्यायचा तर कुणिहि तयार आहे

कसले हिशोब करता, थोडे तुम्हीहि बिघडा
थोडा सुधारण्याला मीही तयार आहे

सत्यात प्राप्त व्हावी कशि, हा सवाल आहे
स्वप्नात यायला तर तीही तयार आहे

माझ्या स्तुतीमुळे ती आली फुलून आणी
दुसर्‍याचसाठी कोणा सजुनी तयार आहे

"यू सिंग व्हेरी नाईस"

या बाईचा आवाजच सेक्सी होता. प्रणयाच्या अनावर प्रसंगी स्त्री जसे बोलेल तसे ती नॉर्मल बोलायची. कुजबुजत, एकदम सॉफ्ट व्हॉईसमध्ये! तिचे ते ' यू सिंग व्हेरी नाईस ' मला 'यू आर सो हॉट' वगैरे सारखे जाणवले.

मीही जरा हासलो. खरे तर ती इंग्लीश बोलली हे पाहून मला बरे वाटले.

९९ टक्के माणसे हातात अजून न आलेल्या क्षणावर किवा हातातून निसटलेल्या क्षणांवर जगतात. १ टक्का माणसे सध्याच्या क्षणावर जगतात.

मीही सर्वांप्रमाणेच दोन्ही प्रकारच्या माणसांमध्ये फार स्विफ्टली शिफ्ट होतो. त्यामुळे मी कुठलाच नसतो. नाही सध्याचा, उद्याचा आणि नाही कालचा! आहे की नाही इतकाच प्रश्न उरतो.

आहे किंवा नाही या दोन अवस्थांमध्ये नेमका काय फरक आहे यावर विज्ञानाने जरी डोके फोडले असले तरी शायरांनी उत्तर दिलेले आहे.

कवी आणि शास्त्रज्ञ यात एक असामान्य साम्य आहे. प्रत्येक गोष्टीचे कारण शोधत शोधत मुळापर्यंत जाणे हे शास्त्रज्ञांचे काम आहे तर केवळ कल्पनेने 'मुळाशी काय असेल हे वर्तवणे' हे कवींचे!

वरवर ही कल्पना थिल्लर वाटली तर कालिदासाच्या काव्यात ढगांच्या हालचालींचे इतके सशक्त व अचूक वर्णन कसे आले यावर अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञांना विचारा!

आहे की नाही?

त्याक्षणी मी माझ्या पत्नीचा नव्हतो, आईवडिलांचा नव्हतो, साहेबांचा नव्हतो आणि... माझाही नव्हतो.

तरी होतो.

फुलाच्या गंधाने वार्‍याची दिशा धरावी आणि कुठेही आनंदाने मुक्तपणे विहरत राहावे तसे माणसाने जगावे.

उजाडले की निघायचे, मन दमेल तेथे निजायचे
रुचेल तेव्हा उठायचे मन म्हणेल तेथे फिरायचे

"यू आर फ्रॉम ?"

"पुणे, यू?"

"हुबलि"

बोंबला!

"हुबलि ऑर बेलगाँ?"

"माय पेरेन्ट्स आर अ‍ॅट बेलगाम"

"हंहं?"

"इन लॉज अ‍ॅट हुबलि"

"ओह... बट देन... जस्ट नाऊ व्हेअर यू गॉट इन... व्हॉट वॉज देअर?"

"वुई हॅव अ फार्म हाऊस देअर"

"ग्रेट.... ही वॉज यूअर फादर?"

"नो.... हसबंड"

मेंदू थांबला.

या महिलेकडे पाच एक मिनिटांनी जरा नीट बघावे असा मी विचार केला. मेक अप मुळे ती बहुधा तिशीची दिसत असून कदाचित पन्नाशीचीही असेल हे मी मला पटवले.

"आय अ‍ॅम हिज सेकंड वाईफ... माय एल्डर सिस्टर एक्स्पायर्ड थ्री इयर्स बॅक... "

"ओह .. सॉरी... यू मीन... यूअर सिस्टर वॉज मॅरीड टू हिम?"

"यॅ"

आता पुढचे प्रश्न विचारणे अयोग्य होते. मुले आहेत का, असली तर कुणाला झाली, तुम्हाला की बहिणीला? आपला काय संबंध? पण मला एक समजेना! की तीन वर्षापुर्वी हिची बहीण मेली तेव्हा ही किमान पंचविशीची तरी असेलच, मग ही लग्नाची का थांबलेली असावी?

हा भुंगा मात्र चांगलाच गेला डोक्यात!

"यू मीन... यू वेअर अनमॅरीड अ‍ॅट दॅट टाईम अ‍ॅन्ड फॉ द चिल्ड्रेन यू डिसाईडेड टू मॅरी हिम?"

"देअर आर नो चिल्ड्रेन"

आता मेंदू थिजला!

एखाद्या फंक्शनमध्ये ओळख झाली असती तर इतके विचारलेच नसते. पण आत्ता समोर होता लांबलचक रिकामा हायवे आणि आम्ही दोघंच अजून किमान एक तास बरोबर असणार होतो. त्यामुळे विचारले...

"आय मीन.. आय डोन्ट नो... व्हाय यू वूड... यु नो??"

"व्हाय आय डिड दॅट? माय फादर हॅड टेकन लोन फ्रॉम हिम..."

"वॉज धिस द रीझन?"

"हं"

"बट... टिल देन... आय मीन.. यू वेअर अनमॅरिड??"

"आय वॉज स्टेईंग विथ हिम ओन्ली अ‍ॅन्ड विथ माय सिस्टर... इन द सेम हाऊस.. आय वॉज गिव्हन इन मॅरेज... आय स्टिल स्टे देअर इटसेल्फ... वुई नेव्हर गॉट मॅरिड... बट ... ही इज माय हसबंड ओन्ली"

कमीतकमी तीन ते चार मिनिटे फक्त रस्त्याकडे बघत मी गाडी चालवत राहिलो.

अविश्वसनीय बाब होती ती!

फ्ल्युएंट इंग्लीश बोलणारी ही सुंदरी, अशी कशी काय दिली गेली लग्नात? या अशा प्रथा आहेत? म्हणजे हिला लाईफच नाही? ही ते का ऐकून घेत असेल? नाही ऐकले तर समाज स्वीकारत नसेल? मातेरं होईल आयुष्याचं? एक स्त्री नाही जगू शकत एकटी?? ही माहेरीच राहिली तर?? फार फार तर आयुष्यभर कर्ज फिटवत राहावं लागेल त्या नालायकाचं इतकंच! पण तरी स्वातंत्र्य तर आहे ना? ही काय देवाला सोडलेली मुलगी आहे? आणि त्या माणसाने आत्ता आपल्यासोबत हिला कसं काय पाठवलं मग? अपघात झाला तर? मी हिच्याबाबत काय एक्स्प्लनेशन देणार कुणालाही? .... मी जगलो तर...

कधी एकदा बेळगाव येतंय याची वाट पाहायला लागलो आता मी! चूपचापपणे!

काही वेळाने चहा घ्यायला थांबलो. एका टोलनाक्यापुढे टपर्‍या होत्या तिथे ! तिने काहीच घेतले नाही. शेवटी मी एक बिसलरीची बाटली तिला दिली.

मात्र यावेळेस मी तिला नीट पाहू शकलो. पन्नास एक टक्केच सुंदर होती ती! ठीकठाक! फक्त आवाज डेंजरस होता.

"ही डिडन्ट कम विथ अस?"

"हू? ही? नो नो... ही वोन्ट कम.. ही विल कम इन हिज कार"

"देन व्हाय आर यू ट्रॅव्हलिंग अलोन?"

"आय वॉन्ट टू सी माय पेरेन्ट्स... ही डझन्ट कम देअर... "

"सो.. मीन्स.. आफ्टर दॅट यू आर गोईंग टू हुबलि??"

"येस.."

"व्हॉट इज यूअर क्वॉलिफिकेशन"

"आय हॅव पास्ड ट्वेल्थ... "

"बट यू स्पीक इंग्लिश वेल..."

"ही हॅज टॉट मी ... फॉर लास्ट टेन इयर्स..."

"ही हॅज टॉट मीन्स?? इज ही अ टीचर बाय प्रोफेशन?"

"ही इज अ लॉयर.... अ व्हेरी बिग लॉयर अ‍ॅट हुबलि..."

"सो ही वॉन्ट्स यू टू बी स्पीकिंग इंग्लिश वेल.... अ‍ॅन्ड ऑल दॅट??? मस्ट बी लव्हिंग यू अ लॉट अं?"

तिने खिडकीबाहेर पाहिले.

मी तिच्याकडे!

'एचएमटी ट्रॅक्टर्सचे स्पेअर पार्ट्स चे मार्केट' हुबळीला का आहे या प्रश्नाने पुण्यात असताना वैतागलेला मी आता 'बरे झाले हुबळीलाच आहे' या मतावर आलो होतो. कारण तिचे निकट बसणे आता हळूहळू झिंग आणायला लागलेले होते. गप्पांमधून काहीशी अधिक व्यक्तीगत माहिती बोलून झालेली होती. आता प्रश्न फक्त बेळगाव येईपर्यंत काय करायचं हाच होता.

तो सुटला.

तो प्रश्नही सुटला.

"व्हेअर आर यू गोईंग?"

"आय अ‍ॅम गोईंग टू बेलगाम ओन्ली, बट टूमॉरो आय'ल गो टू हुबलि"

"व्हेअर अ‍ॅट बेलगाम?"

"वेल... एनी हॉटेल... दॅट इज डिसेन्ट"

"छाया इज देअर.. निअर बस स्टॅन्ड"

"ओक्के.. "

"टुमॉरो व्हेन आर यू लीव्हिंग फॉ हुबलि?"

" मॉर्निंग... "

"....."

"व्हाय... यू वॉन्ट टू कम??"

"नो नो.... आय अ‍ॅम गोईन्ग टुडे.."

"हंहं... आय मीन... इफ आय अल्सो गो टुडे... यू वॉन्ट टू कम?"

"बट यू हॅव वर्क अ‍ॅट बेलगाम नो?"

आता हिला काय सांगायचं? बाई ग, मी घरच्यांचे ऐकले असते तर आपली भेटच झाली नसती कारण मी कोल्हापूरलाच थांबलो असतो. मला कसलं आलंय काम बेळगावात?

"आय कॅन ड्राईव्ह टुडे इटसेल्फ"

शांतता!

म्हणजे मी ड्राईव्ह करणार असलो तर मी एकट्यानेच करायचे आहे, की ती येणार आहे, की मीही जायची गरज नाही आहे, की केवळ तिच्या सहवासासाठी हपापल्याने मी आजच पुढे जाण्याचा हा निर्णय घेत आहे हे तिला मला दाखवून द्यायचंय की मी अगदी तिच्या मनातले बोलल्यासारखे वाटल्यामुळे खिडकीतून बाहेर पाहात आहे यातले मला काहीही समजले नाही व मी पुन्हा एकदा 'स्त्रीचे हावभाव व त्यांचे विश्लेषण' या विषयात नापास झालो.

पण बेळगावला गणाचार गल्लीपाशी तिला मी सोडले तेव्हा ती काय म्हणाली असेल???

"इफ यू अरे गोईन्ग देन आय कॅन जॉईन यू... इन अ‍ॅन अवर ऑर सो.."

"अ‍ॅन अवर?... अ‍ॅन्ड व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू फॉर अ‍ॅन अवर?"

माझ्या घरी ये म्हणणे तिला अशक्य असावे. माझा प्रश्नच चुकीचा होता. आणि तिचे वाक्यही! तिने असे विचारायला हवे होते की 'तुम्ही एक तास थांबाल का, मीही येते'! पण तसे विचारणे हा स्त्रीत्वाचा अपमान होता आणि शेकड्याने बसेस असताना एका परक्याने तासभर थांबावे हा प्रस्ताव मांडणे हा माणुसकीचा अपमान होता. त्यामुळे तिला असा स्टॅन्ड घेणे क्रमप्राप्त झाले की 'तू म्हणतोयस म्हणून मी यायला तयार आहे, पण तासभर थांबावे लागेल'. आणि मी त्याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन 'मी काय करू तासभर' असा प्रश्न अत्यंत अलिप्तपणे विचारला होता.

"इट्स फास्टर नो? यू विल रीच बिफो द बस"

'गरज मला आहे' हा सूर लागल्यानंतर मी तिला स्पष्टपणे सांगीतले.

"आय अ‍ॅम अ‍ॅट दॅट हॉटेल फॉर नेक्स्ट हाफ अ‍ॅन अवर... कॅन आय हॅव यूव नंबर? "

"आय विल बी देअर बिफो दॅट... "

मला काहीही नंबर वगैरे न देता सुळ्ळकन ती निघून गेली आणि अर्धा तास मी इडली, कॉफी असे काहीही करत बसलो.

लहानपणापासून मी पाल, झुरळ अशा गरीब सजीवांना अजिबात घाबरत नाही. पण एकदा कधीतरी तिसरी चौथीत असताना मी अभ्यास करत असताना एक प्रकार घडला अचानक! एका भिंतीवर टक्क असा आवाज आला म्हणून मी मान वर करून सरळ पाहिले तर .................

.......... उडणारे झुरळ?????

मी तोवर कधीही झुरळ उडताना पाहिलेले नव्हते. अन्नशोध मोहिमेत अती दिरंगाई होऊ नये या हेतूने एखाद्या झुरळाने आपल्या पंखांचा वापर करून आकाशमार्गे स्वच्छंदपणे विहार करावा हे शक्य असल्याची कल्पनाच नव्हती मला! मी दोन तीन क्षण त्या झुरळाचे निरिक्षण केले. मला हेच ठरवता येईना की या वेगळ्या प्रकारच्या झुरळाला मी घाबरावे की घाबरू नये?

पण त्या झुरळाने तो प्रश्न सोडवला माझा. ते त्याच भय़ंकर गतीने दाराबाहेर उडून गेले. मी तो विचार तिथेच सोडला. आत्ताही मला आठवते की माझ्या मनाने शेवटच्या क्षणी इतकाच विचार केला होता की तीच व्यक्ती वेगळ्याच रुपात दिसते तेव्हा आपण किती दचकतो नाही???

दचकणारच की!

मगाचच्या पोटाच्या नाजूक दाक्षिणात्य वळ्या झाकणारा टीशर्ट आणि जीन्स घालून कोजागिरी 'एन' हॉटेलबाहेरून मला हात करून बोलावत होती.

अगर तुम मिलजाओ .... जमाना छोडदेंगे हम..

माझ्या मनात आपोआप हे गाणे आले.

भावनांच्या टिकण्याच्या कालावधीपेक्षा भावनांच्या टिकणार्‍या तीव्रतेला जेव्हा हे जग महत्व द्यायला लागेल तेव्हा मी जगणे सुरू करणार आहे.

काय गप्पा मारणार? इंग्लिशमध्ये गप्पा मारायचा कंटाळा येतो. त्यात दोघांचे विश्व भिन्न! इतकेच समजले की फार्म हाऊसवर तिच्या त्या वकील नवर्‍याने तिला भांडून हाकलून दिलेले होते. कारण तिने त्याला दारू प्यायला नाही म्हंटले. म्हणजे त्याने दारू पिऊ नये असे म्हंटले म्हणून! आणि हा पोशाख कसा काय चालतो यावर ती म्हणाली की त्यालाच आवडतो.

आता घरून फोन यायला लागलेले होते. मी काय वाट्टेल ते सांगत होतो. पोचतोय, पोचलोच आहे, खातोय, थांबलोय! हॉटेल शोधतोय हेच मी अर्धा तास सांगीतले.

नेक्टर बेव्हरेजेस! म्हणजे पेप्सी धारवाडचा प्लॅन्ट मागे पडला तेव्हा तिने चक्क पर्समधून टॉफी काढून माझ्या तोंडासमोर धरली?????

हुबळीपर्यंत मात्र कविता, कविता आणि कविता!

नंबर्स दिले आणि घेतले गेले. मी हॉटेलवर गेलो. रात्री फोनवर घरच्यांशी बोलताना चुकून हुबळी म्हणालो तेव्हा वादंग निर्माण होऊ लागला. मग 'स्लिप ऑफ टंग' हा उपाय जारी केला. खरच दमलो होतो.

ही झाली कथा!

कथानक पुढेच होते. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी मी पुन्हा बेळगावला आलो तोवर शांतता होती. तिसर्‍या दिवशी सातार्‍यापर्यंत पोचलो असताना एसेमेस जे सुरू झाले, ते पुढचे महिनाभर चालूच राहिले.

हे होणार होते हे मला माहीत होते.

असे आधी अनेकदा झालेले होते. पण कित्येक व्यक्तींना तर मी आयुष्यात एकदाच भेटलो. नेहा, प्रेमा कतलानी इत्यादी!

पण कोजागिरीचा फॉलो अप असह्य होऊ लागला होता. काहीही केलेले नसताना बरेच काही केल्यासारखे वाटू लागलेले होते.

माणूस म्हणून ती कशी होती याहा मला काहीही अनुभव नव्हता आणि माझा तिला!

मनाची पावले भरकटलेल्या अवस्थेत असतात तेव्हा प्रवासात लागणारे कोणतेही गाव आपलेच वाटते आणि आपले गाव अनोळखी!

दिशाहीनतेमध्येही एक दिशा असतेच! दिशाहीनतेची दिशा!

पण ड्राय आईस जमीनीवर ठेवल्यावर उडू लागतो तसे मनातील विचार उडायला लागतात तेव्हा दिशाही बावचळतात कारण त्यांना माहीत नसलेल्या मिती त्यांच्या त्यांनाच दिसायला लागतात. कोजागिरीचे मन ड्राय आईस होते.

आणि शरीर हॉट चॉकोलेट!

दोन व्हिजिट्स झाल्या माझ्या हुबळीला त्यानंतर! पहिल्या वेळेला मी तिला सांगीतले की मी याच गावात आलो आहे.

हॉटेलसमोर येऊन उभी राहिली होती खाली रस्त्यावर पाच मिनिटे!

मला खाली येऊ नकोस असा कडक आदेश होता. मी खिडकीतून हात हालवला. तिचे ते हासणे पाहून शहारलोच मी!

जणू तिला आयुष्यात मला भेटायचे नाही आहे असे कुणीतरी सांगीतलेले आहे आणि मी नुसते दिसणे हेही तिच्यासाठी प्रचंड आनंददायी आहे असे काहीतरी! अविश्वसनीय बाब म्हणजे तिच्या हातात असलेल्या दोन साखळ्यांना .... दोन भली मोठी अजस्त्र कुत्री होती... आणि यच्चयावत पब्लिक त्या कुत्र्यांच्या आकारमानाकडे पाहात लाबून जात होते बिचकत! हा दिवस पहिल्या व्हिजिटनंतर साधारण दोन महिन्यांनंतरचा!

तिचे दिसणे हे माझ्यासाठी जितके आनंददायी होते तितकेच दु:खद! कारण हे असे एकमेकांकडे बघणे म्हणजे सरळ सरळ अपराध होता. त्यात एक छुपी कमिटमेन्ट होती. की मी तुला पाहण्यासाठी आणि तू मला पाहण्यासाठी हे सगळे करत आहोत. गेले दोन महिने मी तिच्या एसेमेसना सिलेली उत्तरे आठवली. गुड नाईट फ्रेन्ड, हाऊ आर यू ब्युटी, वगैरे वगैरे! माझ्यात दोन माणसे होती. एक, जो इम्प्रेस करण्यासाठी विविध उपाय योजत राहील तो आणि दुसरा, शेपूटघालू संसारी गृहस्थ!

तिला तसे पाहून मात्र मी तात्काळ हुबळी सोडावी अशा निर्णयाप्रत आलो. पण ते शक्य झाले नाही. उद्याचे काम करायलाच हवे होते.

रात्रीचा तिचा एसेमेस वाचून क्षणभर मलाही कसेतरीच वाटले.

"इन द सेम सिटी, बट वुई कान्ट मीट, सॉरी फ्रेन्ड'

प्रचंड अपराधी वाटले मला! या नात्याला काहीही अर्थ नव्हता. मी तिला काहीही दिलेले नव्हते. आणि कमिटमेन्ट तर अजिबातच नव्हती कसलीही!

दुसरा दिवस मात्र अजब घटनाक्रम घेऊन उजाडला.

"व्हेन यू लीव्ह फॉ पुणे, जस्ट एसेमेस, आय'ल मीट यू निअर सो अ‍ॅन्ड सो प्लेस... आय अ‍ॅम गोईन टू बेलगाम'

मी पाघळलो.

आणि त्या प्रवासातही पाघळलो.

कोजागिरी नावाप्रमाणे शीतल नव्हती.

मला चारित्र्य नावाची बाब फार पुर्वी माहिती होती. पहिला बीअरचा घोट घेतला तेव्हाच आई वडिलांच्या शिकवणीला मी लाथाडले होते हे आजही आठवते. आंब्याच्य पेटीतील एक आंबा नासका आहे की सगळे या प्रश्नाला अर्थ नाही. नासका म्हणजे नासका! पण प्रयत्नपुर्वक एखाद्या स्त्रीशी संधान बांधून काही वेगळे रंगढंग करत राहणे व त्यासाठी वाट्टेल ते करणे ही कल्पना अजूनही शिवत नाही मनाला! अर्थात, कोजागिरीमुळे जाणवते तरी की मि असे काही करू वगैरे शकेनही!

सहा महिने त्याच प्रसंगाचा, गाडीतून केलेल्या प्रवासाचा व त्यातील स्वस्त व तत्कालीन माधुर्याचा उल्लेख संदेशांमध्ये अपरिहार्य होता. पण विचारांमध्ये पडत असलेली तफावत दुसर्‍या जाणवून द्यावी याचा धीर होत नव्हता.

म्हणजे, मला धीर होत नव्हता.

जी पावले चाललेलो होतो ती चालायचीच नव्हती असे कसे म्हणता येईल चालल्यावर?

किंवा, 'माझा उद्देश चीप होता' असे कसे म्हणता येईल?

ज्योती मेहता वेडी नव्हती. कोजागिरी वेडी होती. किंवा मी तरी नक्कीच!

माझ्या मेंदूला पोखरत असलेला प्रश्न एकच होता, तिला रागाने हाकलून देणार्‍या नवर्‍याला तिच्या आणि माझ्या एसेमेसबद्दल काहीही कल्पना नसेल?

सहा महिन्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर मिळालेच!

आय अगेन ट्रॅव्हल्ड देअर!

आणि यावेळेस, मी तिला सांगीतलेच नाही की मी हुबळीला आलो आहे. मनात विचार होता, एकदम सांगून आनंदाचा 'वगैरे' धक्का द्यावा का? पुन्हा कदाचित ती बेळगाव सहल ठरवेल का?

पण माझ्यातील शेपूटघालू गृहस्थ माझ्या पिढ्यानपिढ्यांची सरळता हातात घेऊन मनावर प्रहार करत होता.

अत्यंत डिसेन्ट वेळ!

संध्याकाळी साडे पाच!

मी कोजागिरी 'एन' च्या घरी गेलो.

'अ‍ॅडव्होकेट नरेंद्रन'

कोजागिरी 'एन' मधील 'एन' आज समजला.

चक्क पुण्यातील मोठ्या वाड्यासारखे घर! त्यामुळे बेल वगैरे प्रकारच नाहीत.

आणि आत पाय टाकायची हिम्मतच होणार नाही.

तेच दोन अजस्त्र कुत्रे!

मी नुसता दारात दिसताच त्यांनी थैमान घालायला सुरुवात केली. पण ते दोघे इतके भुंकत आहेत हे कळूनही कुणीही आले नाही.

मला भीती वाटल्याने मी सरळ सरळ मागच्या बाजूला आलो आणि एक खोली दिसत होती, त्या खोलीच्या उंबर्‍यात पाऊल टाकले.

मुखवटा गळून पडलेला होता. ते किचन होते.

स्वयंपाकघराच्या ओट्यावर काहीतरी काम करणार्‍या कोजागिरीने मला पाहिले आणि खाडकन तिचा चेहरा पडला.

पण क्षणभरच! मी हासल्यावर तिच्या जीवात जीव आला. हा कोणत्याही गैर हेतूने आलेला नाही हे समजल्यावर हासत आणि सावधगिरी बाळगत ती म्हणाली...

"कम फ्रॉम फ्रन्ट साइड"

"डोग्ज आर देअर"

"आय'ल टेक केअर ऑफ दॅट"

कोजागिरी 'एन'!

तो दक्षिणी, उसळणारा लाव्हा घरात असताना अत्यंत डिझायरेबल वाटत होता. पण मी चरकून पुन्हा समोरच्या बाजुला आलो.

"हू इज दॅट"

"धिस जन्टलमन हॅड ड्रॉप्ड मी यू रिमेंबर?? फ्रॉम कोल्हापूर टू हुबलि, ही केम टू मीट मी"

गेल्या आठ महिन्यांमध्ये जणू 'मी तिला कोल्हापूरहून हुबळीला सोडण्याशिवाय काहीही केलेले नसावे तसे ती बोलली.

कोणता नवरा ऐकून घेईल?

"ओह.. ही ड्रॉप्ड यू अ‍ॅट बेलगाम ऑर हुबलि??"

दुसर्‍यांदा मुखवटा गळून पडला. वकील होता तो! तेही निष्णात! त्याचा तो अवाढव्य वाडा, मोठाल्या खोल्या! ते वैभव! कोजागिरीसारख्या गरीबघरच्या सुनेला, सुनेलाही नाही, बक्षीस म्हणून दिलेल्या मुलीला तिथे काय व्हॉईस असणार!

"आय'ल गेट कॉफी फॉर यू"

"फर्स्ट गिव्ह हिम सम स्नॅक्स"

कोजागिरी 'कॉफी आणते' म्हणून पळणार तोच नवर्‍याने खणखणीत आज्ञा सोडली. ती जि आत गेली ती दहा मिनिटे आलीच नाही. ह्या गृहस्थाशी मी काय बोलणार? त्याला काय माहीत आहे तेही मला माहीत नाही.

पण तो अफाट माणूस होता. कोणताही व्यक्तीगत प्रश्न न विचारता त्याने फक्त माझा व्यवसाय व पुणे शहर इतकेच विचारले व त्यानंतर तो मला त्याच्या पुण्यातील आठवणी सांगण्यात रमून गेला. खरच महान माणूस होता. अनुभव, ज्ञान, वय, सन्मान सर्वच दृष्टींनी!

आणि अचानक कोजागिरी आली. तिच्या हातात इडली चटणी होती. मी खात असताना ती एक क्षणही तेथे थांबली नाही. पुन्हा दहा मिनिटांनी आली तेव्हा तिचा तो 'एन' मला दिल्लीचा इतिहास सांगत होता.

आता ती आलीच आहे कॉफी घेऊन आणि आपण तिच्या आणि आपल्या मैत्रीवर फॅमिली फ्रेन्ड असा शेपूटघालू शिक्का मारण्याह्या घाईने येथे आलेलो आहोत तर तिच्याशी शब्द तरी बोलायला पाहिजे म्हणून मी म्हणालो...

"ओह मिसेस नरेंद्रन... दिज डॉग्ज आर ह्यूज"

कुत्र्यांचा विषय काढताना तिला 'मिसेस नरेंद्रन' हाक मारण्याचा उद्देश आहे हे फक्त मला आणि तिलाच समजले.

आणि आजवरच्या माझ्या आयुष्यात मी कधीकुणाचाही ऐकला नसेल असा अपमान त्या 'एन' ने केलेला पाहिला.

माझ्या त्या विधानावर त्याने जहरीले वाक्य उच्चारले.

"येस, द डॉग्ज आर ह्यूज.. अ‍ॅन्ड आय ट्रस्ट देम... मोर दॅन माय वाईफ"

विषयच संपलेला होता. खाडकन चेहरा पाडून माझ्याकडे निमिषार्धापुरते बघून कोजागिरी 'एन' आत गेली...

.... त्यानंतर ती मला सोडायलाही आली नाही... आणि त्यानंतर तिने संपर्कही केला नाही...

मला त्या नात्याला नांव द्यायचे होते जे तिच्या आणि माझ्या घरच्यांना स्वीकारार्ह वाटेल.. त्यात मी केलेली घाई आणि ते कृत्य, दोन्ही अविचारी ठरलेले होते... तिला तरी विश्वासात घ्यायलाहवे होते... पण मी ते केले नाही...

की मला ते तसेच संपवायचे होते??? बहुधा तसेच ! कारण मला तो ताण असह्य होत होता.

पुन्हा एकदा तीच शेपूट घालू वृत्ती सभ्य ठरलेली होती... ठरायलाच हवी होती... मुळात ते रिलेशन इतक्या पातळीला जायलाच नको होते... पण वाईट एकाच गोष्टीचे वाटते..

एका नाही.... सॉरी... दोन गोष्टींचे..

एक म्हणजे ... कोजागिरी खोटे बोलली असावी... कारण दिवाणखान्यात तिचा आणि 'एन'चा लग्नातला फोटो होता... आणि त्यात ती आत्तापेक्षा लहान वाटत होती... कोणत्यातरी कारणाने ती.. माझ्याशी खोटे बोललेली असावी की बहीण मेली वगैरे... की त्यातही हाह संदेश द्यायचा होता??? 'माझ्याकडे तू तसे बघू शकतोस'??????

पण दुसरे जे वईट वाटले ते हे... की मी ते प्रकरण जसे संपवले.. त्यातून तिच्या भावनांच्या ठिकर्‍या उडाल्या... त्या रात्री त्याने तिलामारले बिरले असेल कीकाय???? की काय केले असेल??

नाही सहन होत जे घडले असेल त्याची कल्पनाही...

!!!!!!!!!

त्याच्यासवे सीमा तुझ्या ओलांडण्या गेलीस तू
की जो नपुंसक सभ्यतेला फक्त भूषण मानतो

(कथेतील नावे काल्पनिक)

-'बेफिकीर'!

=========================================================

नाहीच कोणीही उथळ, ही एक अडचण मानतो
गंभीर लोकांच्या जगाला मी रणांगण मानतो - http://www.maayboli.com/node/24826

जे रोज होते त्यामधे कर्तव्य मोठे वाटते
झालेच नाही जे कधी त्याला समर्पण मानतो - http://www.maayboli.com/node/24871

घसरायला मी लागलो की वाटते सुटलो बुवा
साधाच रस्ता लागणे याला विलक्षण मानतो - http://www.maayboli.com/node/25000

नाहीस माझी तू कुणी, मीही कुणी नाही तुझा
मग का तुला मी सोडणे माझी भलावण मानतो? - http://www.maayboli.com/node/25088

मी सारखा सार्‍या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो - http://www.maayboli.com/node/25230

दसरा दिवाळी पाडवा करते कुणीही साजरे
आलीस आयुष्यात त्या घटिकेस मी सण मानतो - http://www.maayboli.com/node/26898

==================================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

बेफी.......August madhe india la yetoy.....arthaat punyalahi....please please spare an evening for me and a frnd of mine......उपकार होतील्......अतिक्शयोक्ती नाही. मला कळवा.....amol.shastri@gmail.com......"'बसू'यात!!!" Happy ;)......प्लिज....

भारी आहे. तुम्ही या सर्व ललितांची लेखमालिका का करत नाहित?
दुसरी गोष्ट कदाचित ती तुमच्याशी खोटे बोललीही नसेल "ती आत्तापेक्षा लहान वाटत होती..." ती तिची बहिणही असु शकेल.

काय प्रतिक्रिया द्यावी कळत नाही. पहिल्या भेटीत तिर्‍हाइताला बहिण मेली वगैरे खोटे सांगायची गरज तिला का भासली असेल? आणि नवराही ग्रेटच. एवढा ७० किमीचा प्रवास तिर्‍हाइताबरोबर सहज पणे करायला सांगतो. आणि वर परत बायकोवर विश्वास नाही म्हणतो. Sad

बेफिकीरजी,
खुपच भन्नाट लिहिताय तुम्ही !
स्टार्ट टु एंड संपल्याशिवाय ब्रेक नाहीच..
Happy

आयुष्याच्या प्रवासात आपल्याला जाता जाता अशा सहज स्वतःहुन भेटलेल्या, पण वेळेअभावी राहुन गेलेल्या जुन्या गोष्टी हे वाचुन आठवल्या नाहीत तर नवलच !

:नॉर्मल मोड ऑन :
मस्त लिखाण आहे. गुंगलो मी... खूप सुंदर
:नॉर्मल मोड ऑफः

फुलाच्या गंधाने वार्‍याची दिशा धरावी आणि कुठेही आनंदाने मुक्तपणे विहरत राहावे तसे माणसाने जगावे.
अच्छा यासाठी सासुरवाडी नको वाटते का ? ( हा अभिप्राय माझ्या विपुतली सुंदरी लाडिकपणे देतेय असं समजावें Proud )

अवांतर : तरूणी भेटली तो स्पॉट कुठे आहे त्याचा नकाशा काढून दाखवता का ? दिवसभर गाडी घेऊन थांबेन म्हणतो

दिवसभर गाडी घेऊन थांबेन म्हणतो
>>>>>>>>>>>>>>>>>>>>

गाडीवर आधी लिही "बेफिकीर तुमचा आशिर्वाद"..... तरच, प्रयत्नांना यश येईल Proud

क्रोध आणि ताण या दोन खांबांमध्ये उदासीची भर टाकून आणि स्फोटकतेचे लेप चढवून जीवन नावाचा महाल बांधला आहे निसर्गाने!

आज प्रत्येक माणूस रागात आहे, ताणात आहे, कोणत्याही, कसल्याही! उदासही आहेच आहे आणि स्फोट कधी होईल हे सांगता येणार नाही.

सुंदर

फारच सुन्दर....

एका दमात सर्व लेख वाचले...अतिशय खरे खुरे अनुभव...

तुमच्या daring ला सलाम!!!

everyone feels the same..but you have guts to share these experiences honestly!!!

भावनांच्या टिकण्याच्या कालावधीपेक्षा भावनांच्या टिकणार्‍या तीव्रतेला जेव्हा हे जग महत्व द्यायला लागेल तेव्हा मी जगणे सुरू करणार आहे...वाह वाह!!

नाहीच कोणीही उथळ, ही एक अडचण मानतो
गंभीर लोकांच्या जगाला मी रणांगण मानतो -

जे रोज होते त्यामधे कर्तव्य मोठे वाटते
झालेच नाही जे कधी त्याला समर्पण मानतो - ..:)

घसरायला मी लागलो की वाटते सुटलो बुवा
साधाच रस्ता लागणे याला विलक्षण मानतो - ...true!!

नाहीस माझी तू कुणी, मीही कुणी नाही तुझा
मग का तुला मी सोडणे माझी भलावण मानतो? -

मी सारखा सार्‍या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो - fab!!

दसरा दिवाळी पाडवा करते कुणीही साजरे
आलीस आयुष्यात त्या घटिकेस मी सण मानतो -

त्याच्यासवे सीमा तुझ्या ओलांडण्या गेलीस तू
की जो नपुंसक सभ्यतेला फक्त भूषण मानतो - फिदा!!!

म्हणतीलही निर्लज्ज दोघांना समाजाच्या रुढी
हा प्रश्न आहे की कशाला काय आपण मानतो -..परत फिदा!!!..

माझ्या चुकांचा ग्रंथ हा भौतीक दलदल पण तरी
मी हा तुझा अध्याय वैचारीक प्रकरण मानतो

:):):)

you made my evening!!!

पु. ले. शु.!!

रसिका!!

प्रत्येक अनुभव शब्दात मांडता येण्याची कला तुम्हाला अवगत आहे.
लेख वाचल्यावर कुठे तरी तुमच्या डोक्यातून कोजागिरी गेली नाहिये हे स्पष्टपणे जाणवतंय. त्या दिवशी तिच्या घरी भेट दिल्यावर तिचे पुढे काय झाले? तिच्या लग्नाचा फोटो पाहून तिने तुमच्याबरोबर प्रतारणा केली आहे हा विचार.. किंवा ७० किमी त्या बाईला तुमच्या बरोबर तुमच्या कार मधून येऊ देणारा नवरा.. यांबद्दल तुमच्या डोक्यात जे वादळ उठलं ते अनुत्तरीतच राहिलय. तुम्ही कधी त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न केलाय का हो?