रवा बेसनाचा शिरा आणि भरल्या मिरच्या

Submitted by दिनेश. on 15 December, 2010 - 12:00
लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

शिर्‍यासाठी :

एक कप रवा,
अर्धा कप मिल्क पावडर (किंवा एक ते सव्वा कप दूध )
एक टेबलस्पून बेसन (आमच्याकडे अखंड चण्याचे पिठ मिळते, ते वापरलेय ).
एक टिस्पून मेथीदाणे (वगळल्यास चालतील)
एक पिकलेले केळे,
दोन ते तीन टेबलस्पून तूप
पाऊण कप किंवा आवडीप्रमाणे साखर (मी साखर वापरलेली नाही, शुगर फ्री वापरलेय.)

भरल्या मिरच्यांसाठी :
दहा ते बारा हिरव्या मिरच्या ( विशेषणे आपापली लावा )
एक कप जाडसर बेसन,
एक टिस्पून प्रत्येकी तीळ आणि जिरे
बारिक चिरलेली कोथिंबीर मूठभर
तेल, हिंग, हळद, साखर, मीठ
आंबटपणासाठी चिंचेचा कोळ किंवा आंबट दही किंवा लिंबूरस

क्रमवार पाककृती: 

शिर्‍यासाठी,
एक टेबलस्पून तूप गरम करुन त्यात रवा भाजायला घ्या. रवा थोडा भाजला गेला कि (वापरत असाल तर ) त्यात मिल्क पावडर घाला आणि दोन्ही मोकळे होईपर्यंत भाजून घ्या. रवा एका भांड्यात काढून घ्या.
मग उरलेले तूप तापवून त्यात मेथीदाणे गुलाबी करुन घ्या. त्यावर बेसन टाकून भाजून घ्या (बेसन जास्त घेतले तरी चालेल.) मग त्यात केळे कुस्करुन टाका व ते बेसनात नीट मिसळून घ्या. मग त्यात रवा टाकून थोडा वेळ कोरडेच परता.
मग त्यात गरम दूध वा पाणी टाका. (पाण्याचे प्रमाण रवा कितपत जाड आहे त्यावर ठरेल)
झाकण ठेवून वाफ येऊ द्या. मग झाकण काढून जरा हलवून घ्या.
मग त्यात साखर घाला. साखर घातल्यावर मिश्रण पातळ होईल, ते जरा कोरडे होईपर्यंत परता. दूध वापरल्याने हा शिरा मऊसरच होईल, अगदी कोरडा होणार नाही.

तयार शिरा असा दिसेल.
=====
भरल्या मिरच्यांसाठी.
भरल्या मिरच्यांसाठी मिरच्या दोन प्रकारे कापता येतील. एकतर उभी चिर द्या किंवा देठाकडची चकती कापून टाका. मग आतल्या बिया काढून टाका.
तेल गरम करुन त्यात जिरे तडतडून घ्या. त्यात तीळ घाला. मग हिंग व हळद घालून बेसन परतून घ्या.
मिश्रण आचेवरुन काढून पुरते थंड होऊ द्या. मग त्यात बाकीचे जिन्नस मिसळा (मिरच्या सोडून) हे सारण कोरडेच ठेवायचे आहे.
सारण असे दिसेल.

सारणात जरा जास्त मीठ घालावे लागेल कारण, मिरच्यांना मीठ लावलेले नाही. मग हे सारण मिरच्यात भरा. फार दाबून भरायचे नाही, कारण हे सारण मग फूगते.
मग या मिरच्या मंद आचेवर तेलात परतून घ्या.

या आहेत तळल्या जाणार्‍या मिरच्या. (आणखी थोड्या खरपूस करुन घ्या )

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

खरे तर हे दोन वेगळे पदार्थ पण मी आज दोन्ही केले आणि एकत्र खाल्ले, मजा आली.
मिरच्या फार तिखट नसतील, तर सारणात थोडेसे तिखट घाला.
हेच सारण भरुन, सिमला मिरच्या, ढेमसे (टिंडे), कारली, भोकरे, पडवळ, भेंडी वगैरे करता येतील, अर्थात त्यावेळी सारणात तिखट घालावे लागेल. चिंच वापरून केल्या तर या मिरच्या प्रवासात नेता येतील. एक दोन दिवस टिकतील.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<( विशेषणे आपापली लावा )>>....:हाहा:
शिर्‍याचं आणि माझं सख्य नाही.
पण भरली मिरची.....यमी ! चित्र बघूनच तों.पा.सु.

दिनेश दा.. तुस्सी ग्रेट हो ज्जी !!! Lol
असा शिरा मी (फार्र कधीकधी) करते.. पण मिर्च्या एक्दमतोंपासु.. आय लव तिखट्ट
उद्याच ट्राय कर्णार Happy

मस्त वो! काय तोंपासु फोटोज व पाकृ आहे. रवा-बेसनाचा असा एकत्र लाडू खाल्लेला पण असाच शिराही करता येईल हे कधी डोक्यात आलेच नाही. आता हा प्रकार करून बघायला पाहिजे. आणि गोड शिर्‍याबरोबर तिखट भरलेल्या मिरच्या सह्ही लागत असणार!

वा. कालच मी पण केल्या होत्या, फक्त तीळ नव्हते वापरले. आणि १ - मिश्रण थंड झाले की थोडा गुळ पण मिसळल्यास छान लागते. कमी तेलासाठि १ वाफ आली की या मिरच्या microwave मधे वाफवता येतात.

दिनेशदा मी तुमच्या या रेसिपीने भरल्या मिरच्या केल्या होत्या. अशक्य टेस्टी झाल्या होत्या.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/104330.html?1149737509
जुन्या मायबोलीवर आहे ना? ही पा.कृ. इकडे पण आणा ना प्लीज.
ते बेसनाचं मिश्रण मी दुधीच्या भाजीतही चमचाभर घातलं, तीही खूप छान झाली..

आभार...
मी पण बर्‍याच दिवसात केले नाहीत हे पदार्थ. जोडी छान जमते यांची.