तुकाराम हे कोडे अवघड
तुकाराम हे कोडे अवघड
कधी कुणाच्या ठायी
भाग्यविधाता विठू एकला
पिसे सर्वथा देई
अभंगातली कधि एखादी
ओळ खुणावत नेई
थेट डोही त्या इंद्रायणीच्या
जळात निर्मळदायी
निश्चळ सारा डोंगर परिसर
भंडाराचे माथी
वृक्ष वेलीही अजून झुलती
विठ्ठलनामावरती
आर्त सुरातील एक विराणी
काळिज विंधत जाई
थरथरणारी ज्योत दिव्याची
विठूस चमकून पाही
कंठ रुंधला झुके पापणी
देह पालखी भोई
अंतरातली वीट थरारे
निळे निरामय न्हाई
एका उदास संध्याकाळी
कोणी गात होती विराणी ||
शब्दांत अशी आस नव्हती
चाल नव्हती अशी कोणती
धारही नव्हती त्या शब्दांना
तरी काळीज जाय चिरूनी ||
संधीप्रकाश निळा जांभळा
खालून गेला वर आभाळा
कुंद हवा वाराही पडला
हवेत सूर राही भरूनी ||
धिरगंभीर सूर कवळूनी
गीत हृदयीचे आळवूनी
उलगडे आर्त सरगम
भरूनी राहिली कानी ||
- पाषाणभेद
०५/०२/२०२०
पावसा पावसा ये रे चिंब भिजवून जा रे ||ध्रु||
अंग माझे काहिले रे तन माझे कावले रे
देऊन थंडावा जा रे चिंब भिजवून जा रे ||१||
वस्त्र माझे मळले रे पाय धुळीने काळे रे
धुवून काजळी जा रे चिंब भिजवून जा रे ||२||
डोळे माझे चुरले रे गळा पुरा भरला रे
पुसून काळिमा जा रे चिंब भिजवून जा रे ||३||
शोधुनिया पथ सारे रे थकले हातपाय रे
करून शिडकावा रे चिंब भिजवून जा रे ||४||
हृद्य माझे पेटले रे खवळे शरीर सारे
फुंकून वणवा जा रे चिंब भिजवून जा रे ||५||
मन माझे वितळे रे उभ्या उभ्या पेटले रे
पेटवून जाळ जा रे चिंब भिजवून जा रे ||६||
सुख सारे विटले रे दु:ख सारे नटले रे