समोर रक्ताचा ओघळ वाहत असताना
त्याला सहन करतो पांढरपेशी माणूस
रक्ताला सरावलेली पावलं
घसरत नाहीत त्यावरून
आणि निर्ढावलेलं मन
बघू शकतं,
दुसरया मनांच्या झालेल्या चिरफाळ्या
थंडपणे
------------------------------------------------------------------------------------
माणसाला स्वप्नांची सवय झाली आहे
सुंदर, सुखी आणि आनंदी
माणसाला वास्तव नाही पचवता येत
कारण ते कटू असतं
वास्तवाच ओंगळ आणि गलिच्छ अस्तित्व
त्याला मान्य नसतं
आणि अशा वास्तवाचं दर्शन झाल्यावर
तो कोलमडून पडतो
------------------------------------------------------------------------------------
इथे मरण महाग आहे
मी एक अश्वत्थामा
मी एक अश्वत्थामा
वाहतं मन घेऊन फिरणारा
जगाच्या कुठल्याश्या कोपरयात
समदु:खी शोधणारा
मनाच्या भळाळत्या जखमेवर
दवापाणी शोधणारा
आणि सतत गर्दीत असूनही
सलग एकाकी असणा्रा
नाही मी चिरंजीव
पण वाहतं मन आहेच
म्हणूनच ठरलो कदाचित
मी एक अश्वत्थामा
मन माझं गोगलगाय
खुट्टं वाजता शंखात जाय ॥
प्राजक्ताचा दरवळ घेऊन
रांगत पहाटवारा आला
शिंका येतील ! आल्या शिंका !!
नाक हाती शंखात पाय !
मन माझं गोगलगाय । खुट्टं होताच शंखात जाय ॥
खुणावताना हिरव्या वाटा
मनास दिसतो केवळ काटा
काटा टोचेल ! टोचला काटा !!
मान फिरवून शंखात जाय
मन माझं गोगलगाय । खुट्टं होताच शंखात जाय ॥
समोर फुटली लाट अनावर
सरसरून ये नभ धरणीवर
थेंब उडतिल ! कपडे भिजतिल
भिजेल डोकं ! भिजतिल पाय !!
मन माझं गोगलगाय । खुट्टं होता शंखात जाय ॥
घुसुन बसावे शंखी आपुल्या
हळु काढावी बाहेर मान
इकडुन तिकडे सरपटताना
टवकारावे दोन्ही कान
विजा नि लाटा, झुळुक नि वाटा
मन नाव घनाचे,कधी बरसते खुप
मन उडता कापूर,दरवळणारा धूप...
मन भणंग साधू,तयास नाही गाव
मन फक्त एकटे,विश्वाचा महाराव...
मन चिरंजीव हे,वनवननारा वारा
मन अश्वत्थामा,जयास नाही थारा...
मन बांधविन,बेडीची असते साक्ष
मन मुक्तीविन,मुक्ताचा असतो मोक्ष...
मन शून्यवरती,संख्येचाच आरोप
मन नसते,असतो दोरीवरचा साप... 