'अठरा धान्यांचं कडबोळं' - अनुवाद : डॉ. विद्युल्लेखा अकलूजकर
Submitted by चिनूक्स on 27 March, 2011 - 23:54
मराठी साहित्यात अनुवादांचं स्थान मोठं आहे. वामन मल्हार जोश्यांपासून भारती पांडे, अपर्णा वेलणकरांपर्यंत अनेकांनी परभाषेतील साहित्य मराठीत आणलं. मात्र हे अनुवाद बहुतांशी नाटकं, कादंबर्या आणि क्वचित कविता व प्रवासवर्णनांपर्यंतच मर्यादित राहिले. उत्तमोत्तम कथा मराठीत फारशा आल्या नाहीत. फार वर्षांपूर्वी जयवंत दळवी 'यूसिस'मध्ये कार्यरत होते, तेव्हा त्यांनी प्रभाकर पाध्ये आणि शांताबाई शेळक्यांकडून इंग्रजी कथांचे मराठीत अनुवाद करून घेतले होते. हे अनुवाद बरेच गाजले. शांताबाईंनी केलेल्या या अनुवादांचं दुर्गाबाई भागवतांनी स्वतंत्र लेख लिहून कौतुक केलं होतं. नंतर मात्र असे प्रयत्न झाले नाहीत.