'अठरा धान्यांचं कडबोळं' - अनुवाद : डॉ. विद्युल्लेखा अकलूजकर

Submitted by चिनूक्स on 27 March, 2011 - 23:54

मराठी साहित्यात अनुवादांचं स्थान मोठं आहे. वामन मल्हार जोश्यांपासून भारती पांडे, अपर्णा वेलणकरांपर्यंत अनेकांनी परभाषेतील साहित्य मराठीत आणलं. मात्र हे अनुवाद बहुतांशी नाटकं, कादंबर्‍या आणि क्वचित कविता व प्रवासवर्णनांपर्यंतच मर्यादित राहिले. उत्तमोत्तम कथा मराठीत फारशा आल्या नाहीत. फार वर्षांपूर्वी जयवंत दळवी 'यूसिस'मध्ये कार्यरत होते, तेव्हा त्यांनी प्रभाकर पाध्ये आणि शांताबाई शेळक्यांकडून इंग्रजी कथांचे मराठीत अनुवाद करून घेतले होते. हे अनुवाद बरेच गाजले. शांताबाईंनी केलेल्या या अनुवादांचं दुर्गाबाई भागवतांनी स्वतंत्र लेख लिहून कौतुक केलं होतं. नंतर मात्र असे प्रयत्न झाले नाहीत. मालतीबाई दामले अनेक वर्षं 'मेनका' या मासिकातून इंग्रजी कथांचे मराठीत अनुवाद करत असत. या कथा वाचकप्रिय ठरल्या तरी त्या बर्‍यापैकी एकाच साच्यातल्या असल्यानं नंतर त्यांचं नावीन्य ओसरलं. सध्या अनुवादित साहित्य खूप मोठ्या प्रमाणात प्रकाशित होत असूनही पद्मगंधा प्रकाशनातर्फे लवकरच येणार्‍या सॉमरसेट मॉमच्या लघुकथांचा मराठी अनुवाद वगळता कथांच्या वाटेला अजूनही कोणी गेलेलं दिसत नाही.

डॉ. विद्युल्लेखा अकलूजकर मात्र गेली तीस वर्षं सातत्यानं अनेक जागतिक भाषांतल्या कथांचा मराठीत अनुवाद करत आहेत. कॅनडात स्थायिक असलेल्या अकलूजकरांनी 'एकता' मासिकासह 'मौज', 'केसरी', 'सा. सकाळ', 'मिळून सार्‍याजणी' अशा नियतकालिकांमधून या कथा प्रसिद्ध केल्या. वाचकांनी, समीक्षकांनी या अनुवादांचं स्वागतही केलं. यांपैकी काही निवडक कथांचा संग्रह मेनका प्रकाशनानं 'अठरा धान्यांचं कडबोळं' या नावानं प्रकाशित केला आहे.

या कथानुवादसंग्रहात एकूण अठरा कथा आहेत. मूळ कथा यिदिश, उर्दू, इंग्रजी, जपानी, फारसी, स्पॅनिश, चेक्, हिंदी या भाषांमधल्या आहेत. असंख्य भावभावना या कथांमधून दिसतात. त्या त्या देशाची, भागाची संस्कृतीही दिसते. पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे माणसं इथून तिथून सारखीच, हे कळतं. माणसं सारखी आणि त्यांच्या वागण्याची मूलप्रवृत्तीही तीच. 'माझा इडिपस गंड' या आयरीश लेखकाच्या इंग्रजी कथेतल्या लहान मुलाचा युद्धावरून परतलेल्या, आणि आईच्या प्रेमात नव्यानं वाटेकरी झालेल्या आपल्या वडिलांबद्दलचा आकस इतका खराखुरा आहे की, कुठल्याही वाचकाला तो ओळखीचा वाटतो. 'सागमीट' या भीष्म साहनींच्या कथेतली खाण्यावर प्रेम करणारी, खाण्यासाठी हपापलेली, स्वार्थ दागिन्यासारखा मिरवणारी मंडळीही आपल्या आसपासचीच. 'अनुभवी नवरी' ही अब्राहाम राइझनची यिदिश कथाही ओळखीची वाटावी अशी. एकूणात अतिशय वैश्विक असलेल्या, तरी त्या त्या संस्कृतीचा साज चढवून आलेल्या या कथा आहेत. आपापल्यापरीनं उत्कृष्ट असलेल्या या कथांचा अनुवादही अतिशय सहज आणि वाचनीय झाला आहे.

वेगवेगळ्या भूमिकांतून, वेगवेगळ्या कारणांसाठी या कथांचे अनुवाद केले गेले. याबद्दल, तसंच या कथांबद्दल, त्यांच्या लेखकांबद्दल डॉ. अकलूजकरांनी कथांच्या शेवटी सविस्तर पूरक टिपणं दिली आहेत. कथांइतकीच ही टिपणंही महत्त्वाची आहेत. या कथानुवादसंग्रहातल्या दोन कथा इथे आपल्याला वाचता येतील.

मेनका प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या डॉ. विद्युल्लेखा अकलूजकरांच्या 'अठरा धान्यांचं कडबोळं' या कथानुवादसंग्रहातील या दोन कथा...

हे पुस्तक मायबोलीच्या खरेदी विभागात उपलब्ध आहे - https://kharedi.maayboli.com/shop/Athara-Dhyanyanche-Kadabole.html

Cover_Athara Dhanyache Kadbole(2).jpg

मुतारीतील बुद्धत्व

खूप खूप वर्षांपूर्वीच्या क्योतोमधील आराशियामा पर्वतावरचा वसंतऋतू. क्योतोच्या थोरथोर खानदानांतील स्त्रिया, त्यांच्या कन्यका, सुखसदनातील गेयशा आणि वारयोषिता आपापल्या सुंदरसुंदर पोशाखांत चेरीचा बहार बघायला येत. शेतावरील ओबडधोबड घराच्या फाटकाशी येऊन कमरेत वाकवाकून लालबुंद चेहर्‍याने बाया विचारत, "माफ करा हं, पण जरा तुमच्या शौचालयात जाऊन येऊ का?" मागीलदारी जाऊन त्या बघत तेव्हा गवताच्या तट्ट्या लोंबकळत असलेली ती मुतारी त्यांना फारच जुनाट आणि घाणेरडी वाटायची. दर खेपेला वार्‍याची झुळूक आली की त्या शहरी बायांच्या अंगावर काटा यायचा आणि त्याबरोबरच वात्रट कारट्यांच्या खिदळण्याचे आवाजही त्यांना ऐकू यायचे.

क्योतोच्या शहरी बायांचे हे हाल पाहून एका शेतकर्‍याने चांगलं डोकं लढवलं. त्याने एक चांगली छोटीशी मुतारी बांधली आणि तिच्यावर काळ्या शाईत एक पाटी रंगवून लावली - 'सार्वजनिक शौचालय - दर ३ मॉन'. फुलांचा बहार बघायच्या मोसमात ती फारच यशस्वी ठरली आणि बघताबघता तो शेतकरी गबर झाला. "अलीकडे सार्वजनिक मुतारी बांधून त्या हाचिहाईने बक्कळ पैसा केलाय. पुढच्या मोसमात, मला वाटतं, आपणही त्याच्याशेजारी आपली एक मुतारी बांधावी आणि त्याचा धंदा बसवावा, कसं?" हाचिहाईचा मत्सर करणारा एक शेतकरी त्याच्या बायकोला म्हणाला. "घिसडघाई होईल. मुतारी बांधाल, पण हाचिहाईचा धंदा चांगला रुजला, त्याला त्याची गिर्‍हाइकं बांधलीत, तुमच्या मुतारीला गिर्‍हाइकं मिळाली नाहीत की आहात त्याहून अधिक गरीब घाल झालं".
"च् च् तुझ्या लक्षात आलं नाही मी काय म्हणतोय ते. मी जी मुतारी बांधायची म्हणतोय ती काही त्या हाचिहाईसारखी गावंढळ बांधणार नाही. राजधानीत चहा पिण्याचा समारंभ फार गाजतोय म्हणतात, तेव्हा मी जी मुतारी बांधीन ती त्या चहासमारंभासाठी जी खोली असते नं, तशी बांधावी म्हणतोय. त्यातदेखील चार खांबांसाठी योशिनो लाकडाचे कळकट ओंडके नाही काही वापरायचे, कितायामाचं गाठाळ लाकूड वापरणार आहे मी. छत बुलरशचं असेल आणि दोरीच्या जागी मी किटलीची साखळी लावणार आहे. भन्नाट कल्पना आहे की नाही? जमिनीखालच्या पातळीवर मी खिडक्या बसवणार आहे आणि तुळया झेलकोव्हा लाकडाच्या करणार आहे. भिंतींना प्लास्टरचे दोन हात द्यायचे आणि दार करायचं सायप्रसचं. छपराला सीडरची कौलं घालायची, हिरव्या बांबूने यामातो शैलीमध्ये अडण्या घालायच्या. पायर्‍यांसाठी कुरामा पर्वतावरचा दगड वापरायचा. या सगळ्याच्या भोवताली सगळीकडे मी बांबूची जाळी बसवणार आहे आणि दगडी पायधुणीजवळ लाल पाईनची झाडं लावून टाकणार आहे. अशी सुंदर मुतारी बांधायची की ती चहासमारंभाच्या सगळ्या शाखांतल्या लोकांना - सेनके, एन्शू, उराकू, हायामी, सगळ्यांना - इथे खेचून आणील". मख्ख चेहर्‍याने हे सगळं ऐकून त्याच्या बायकोने विचारलं, "आणि दर काय लावणार या सगळ्याचा?"

पुढच्या चेरी-बहार मोसमाच्या तोंडावर त्या माणसाने बर्‍याच खटपटीनंतर कशीबशी एक अप्रतिम मुतारी बांधून काढली. एका पुजार्‍याकडून टांग शैलीतल्या रेखीव अक्षरांनी त्याने एक पाटी रंगवून घेतली. 'सार्वजनिक शौचालय - दर ८ मॉन'. राजधानीतल्या स्त्रिया येऊन नुसत्या आशाळभूतपणे त्या मुतारीकडे बघतच राहिल्या. एवढी सुंदर मुतारी वापरायची कशी असा त्यांना प्रश्न पडला. त्या माणसाची बायको जमिनीवर आदळआपट करायला लागली. "तरी मी सांगत होते, या भानगडीत पडू नका. एवढा सगळा पैका ओतलात त्याच्यात आणि आलं काय हातात?"
"एवढं आकांडतांडव करायला काय झालं तुला? उद्या बघ तू. मी बाहेर जाऊन जाहिरात करायचा अवकाश, की लागलीच माणसांची रांग लागेल मुंग्यासारखी. उद्या तूही लवकर उठून मला खाणं बांधून दे. मी जाऊन फेर्‍या घातल्या की गावच्या जत्रेला जमावेत तसे लोक जमतील बघ." एवढं बोलून तो गप्प झाला. पण दुसर्‍या दिवशी नेहमीपेक्षा तो थोडा उशिरा, जवळजवळ आठ वाजता उठला, त्याने किमोनो कसला आणि गळ्याभोवती खाण्याचा डबा लटकवला. बायकोकडे हसून बघताना त्याची नजर खिन्न होती. "बयाबाई, तुला वाटतंय मी स्वप्नात वावरतोय, खुळचटपणा करतोय. पण आज बघशील तू. एकदा का मी फेर्‍या घातल्या की त्यांची रीघ लागेल रीघ. जर बादल्या भरून चालल्या तर बाहेर 'बंद'ची पाटी लाव आणि शेजारच्या जिरोहेईला एक दोन-चार पाट्या टाकून यायला सांग."

त्याच्या बायकोला हे सगळं भयानक चमत्कारिक वाटत होतं. 'फेर्‍या घालणार' म्हणे! म्हणजे काय राजधानीमध्ये जाऊन रस्तोरस्ती ओरडणार का काय 'सार्वजनिक मुतारी!!! या आणि वापरा!!!' म्हणून? ती या विचारात असतानाच एक मुलगी आली आणि आठ मॉनचं नाणं पेटीत टाकून शौचालयात शिरली. त्यानंतर एकामागून एक जी काय माणसांची रांग लागली, ती थांबेचना. त्याची बायको नवलच करत राहिली आणि पैसे मोजताना तिचे डोळे एवढे मोठे झाले. थोड्याच वेळात तिला 'बंद'ची पाटी लावावी लागली आणि बादल्या रिकाम्या करून होईपर्यंत बाहेरचा गलका वाढतच होता.

दिवस संपण्यापूर्वी तिने आठ कान नाणी गोळा केली आणि पाच वेळा बादल्या रिकाम्या केल्या.
"बोधिसत्व मंजूचा अवतारच असला पाहिजे माझा नवरा. त्याची स्वप्नं खरी होण्याची मात्र ही पहिलीच खेप म्हणायची."
खुशीत येऊन तिने थोडी दारू विकत आणली आणि त्याची वाट पाहत ती बसली असतानाच लोकांनी त्याचं प्रेत घरी तिच्या पुढ्यात आणलं.
"हाचिहाईच्या मुतारीत त्याला मरण आलं असावं. बहुधा हातपाय आखडून."
स्वतःच्या घरून सकाळी निघाल्यानिघाल्या त्याने तीन मॉन देऊन हाचिहाईच्या मुतारीत प्रवेश मिळवला आणि दाराला आतून कडी लावून घेतली होती. आत येऊ पाहणार्‍या कुणाचीही बाहेर चाहूल लागली की, तो घसा खाकरायचा. असं इतका वेळ चालू राहिलं की शेवटी त्याचा घसा धरला आणि त्या गरम, मोठ्या दिवसाच्या शेवटी त्याला उभंदेखील राहता येईना.

राजधानीतल्या लोकांच्या कानावर ही गोष्ट गेली.
"इतक्या चांगल्या माणसाचा काय हो हा शेवट!"
"खरा उस्ताद हं तो! त्याला तोड नाही!"
"जपानमधली सर्वांत कल्पक आत्महत्या!"
"शौचालयातील परिनिर्वाण! जय अमित बुद्ध!"

फार थोडे लोक असे होते की त्यांनी असल्या घोषणा दिल्या नाहीत.

*

यासुनारी कावाबाता (१८९९-१९७२) - श्रेष्ठ जपानी लेखक. १९६८मध्ये साहित्याच्या नोबेल पारितोषिकाचे मानकरी. ओसाकामध्ये कावाबाता जन्मले. पण दोन वर्षांचे असतानाच आईबापांवाचून अनाथ झाले आणि लवकरच आजीआजोबांचे छत्रही हरपले. त्यामुळे त्यांच्या लिखाणात प्रेम, काल वगैरेंबरोबरच एकाकीपण, मृत्यू वगैरे विषयांवरही मौलिक चिंतन सापडते. युद्धाआधीपासून जपानात त्यांच्या युकिगुनी (Snow Country)सारख्या कादंबर्‍या गाजल्या. युद्धानंतरही सेंबाझुरु (Thousand Cranes) आणि यामा नो ओतो (The Sound of the Mountain), कोतो (The Old Capital) अशा कादंबर्‍यांमुळे कावाबाता प्रख्यात झाले. नोबेल पारितोषिक मिळाल्यावर कावाबाता म्हणाले की, आपल्या साहित्यातून आपण माणूस, निसर्ग आणि शून्यता यांच्यात संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. १९७२ साली त्यांनी आत्महत्या केली.

जपानमध्ये त्यांच्या कादंबर्‍यांना भरपूर मान्यता मिळालेली होती. आणि नोबेल पारितोषिकासाठीही त्यांच्या तीन कादंबर्‍याच निवडल्या गेल्या, तरी स्वतः कावाबाता यांच्या मते त्यांच्या कलेचा अर्क त्यांच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टींमध्ये सापडतो. 'तळहाताएवढ्या गोष्टी' या नावाने त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या. त्यांतील सत्तर गोष्टींचा मूळ जपानीवरून अनुवाद लेन डनलॉप आणि जे. मार्टिन हॉलमन या दोघाजणांनी केला आहे. सान फ्रान्सिस्कोच्या नॉर्थ पॉइंट प्रेसने हे पुस्तक १९८८मध्ये प्रकाशित केलेले आहे. मला या पुस्तकातल्या कित्येक गोष्टी आवडल्या. कावाबातांच्या या छोट्याछोट्या कथांमध्ये कमीत कमी शब्दांत कथेतील घटनाक्रम उलगडला जातो, अगदी बारक्याशा तपशिलांमधून व्यक्तिचित्रे उभी राहतात, आणि प्रत्ययकारी नाट्य निर्माण होते. त्यांची भाषा काव्यात्म आहे. तरल प्रतिभेचा आविष्कार करण्यासाठी ते प्रख्यात आहेत, पण मी निवडलेली त्यांची कथा धक्कादायक विषयावर, धक्कादायक शैलीत लिहिलेली आहे. या कथेच्या इंग्रजी अनुवादाचा प्रामाणिकपणा तपासून पाहण्यासाठी आणि मूळ जपानी शब्दांचे नेमके अर्थ समजून घेण्यासाठी मला माझे सहकारी प्राध्यापक केन त्सुरुता यांची मदत झाली.

***

अर्धा दिवस

माझ्या अब्बाजानच्या शेजारी मी चालत होतो. त्यांचा उजवा हात पकडून, त्यांच्या लांब लांब ढांगांच्या बरोबरीने राहण्यासाठी पळतच होतो म्हणा. माझे सगळे कपडे नवेकोरे होते. शाळेचा हिरवा गणवेष, काळे बूट आणि लाल तारबूश. नव्या कपड्यांचा मला हवा तितका आनंद मात्र झाला नव्हता, कारण मी काही कुठे मेजवानीला चाललो नव्हतो. मला आज पहिल्यांदा शाळेत घालायला ते घेऊन जात होते. आमची चाललेली वरात बघत माझी आई खिडकीत उभी होती आणि मदतीच्या आशेने तिच्या दिशेने मी सारखा वळून बघत होतो. दोन्ही बाजूंनी बागबगिचांनी लगडलेल्या रस्त्यातून आम्ही चाललो होतो. दोन्ही बाजूंनी लांबलचक पिकांनी भरलेली शेतं लागत होती, त्यातून नाश्पतीची झाडं होती, मेंदीची झुडपं होती आणि दोन-चार खजुराचीही झाडं होती.

"पण शाळा हवीच कशासाठी?" मी अब्बांना सरळच सवाल केला. "मी तुम्हांला त्रास देतो का कधीऽतरी?"
"पण मी काही तुला शिक्षा नाहीये करत! शाळा म्हणजे शिक्षा नाही काही. लहान मुलांना उपयुक्त नागरिक बनवण्याचा तो एक कारखाना आहे. तुला तुझ्या अब्बा आणि भाईजानसारखं व्हायचंय की नाही?"

माझी काही समजूत पटली नाही. मला मुळीच विश्वास वाटत नव्हता की जे चाललंय त्यातून काही चांगलं घडणार आहे म्हणून. माझ्या घरच्या उबेतून मला हिसकावून घेऊन या रस्त्याकडेच्या इमारतीत लोटून देत होते हे लोक. कसली इमारत ही! भली दांडगी, उंचच उंच भिंतींनी वेढलेली गढीच जणू, अफाट गंभीर आणि कानकोंडी.

आम्ही दाराशी आलो तसं आम्हांला आतलं पटांगण दिसायला लागलं. मुलामुलींनी ते गच्च भरलेलं होतं.

"आपण होऊन आत जा कसा!" माझे अब्बा म्हणाले, "आणि मिसळून जा त्यांच्यात. चेहरा हसरा कर जरा."

मी अळंटळं करत त्यांच्या हाताशी चिकटायला लागलो, पण त्यांनी हळूच मला हातावेगळं केलं.

"पुरुषासारखा वाग!" ते म्हणाले. "आज तुझ्या खर्‍या आयुष्याला सुरुवात होतेय. घरी जायची वेळ झाली की मी इथेच तुझ्यासाठी थांबलेला दिसेन तुला."

मी थोडी पावलं चाललो आणि थांबून पाहिलं, पण मला काहीच दिसेना. मग हळूहळू मुलामुलींचे चेहरे दिसायला लागले. मी त्यांतल्या कुणालाच ओळखत नव्हतो आणि मलाही कुणीही ओळखत नव्हतं. मला वाटलं की मी वाट चुकून भरकटलेला कुणीतरी आहे. पण कुतूहलाच्या नजरा माझ्या दिशेने वळत होत्या आणि एका मुलाने माझ्या जवळ येऊन मला विचारलं, "कुणी आणलं रे तुला?"

"माझ्या बाबांनी." मी कुजबुजलो.

"माझे बाबा वारलेत." तो सहजपणे म्हणाला.

यावर काय बोलावं ते मला कळेना. रडल्यासारखा आवाज करत दरवाजा बंद होऊन गेला. काही मुलांनी भोकाड पसरलं. घंटा वाजली. एक बाई आल्या आणि त्यांच्यामागून काही पुरुष आले. ते पुरुष आम्हाला वेगवेगळ्या रांगेत उभे करायला लागले. त्या भल्यामोठ्या पटांगणात आम्हां सगळ्यांना घेऊन एक किचकट नक्षीच जणू काढली होती. त्या पटांगणाच्या तिन्ही बाजूंनी कित्येक मजले उंच अशा उंचाड्या इमारती होत्या आणि प्रत्येक मजल्यावरून आमच्यावर नजर ठेवणारी लाकडी छपराची लांबोळकी बाल्कनीदेखील होती.

"हे आता तुमचं नवीन घर, बरं का?" ती बाई म्हणाली, "इथेदेखील आया आहेत आणि अब्बादेखील आहेत. इथे आहे ते सगळं काही छान छान आहे, धर्म आणि ज्ञान मिळवण्यासाठी सगळं काही उपयुक्त आहे. आता डोळे पुसा आणि आनंदाने जीवनाला सामोरे जा."

आम्ही वास्तवापुढे नम्र झालो आणि ही नम्रताच आम्हाला समाधान घेऊन आली. सजीव प्राणी सजीव प्राण्यांकडे आकृष्ट होत गेले आणि ज्या मुलांशी माझी मैत्री व्हायची होती, त्यांच्याशी मी मैत्री केली आणि ज्या मुलीशी माझं प्रेम जमायचं होतं, त्या मुलीच्या प्रेमात मी पडलो आणि असं वाटलं, की माझ्या शंकाकुशंकांना काही आधार नव्हताच. शाळेत इतक्या विलक्षण तर्‍हतर्‍हा असतील, याची मला कल्पनाच नव्हती. आम्ही हरतर्‍हेचे खेळ खेळलो. झोके घेतले, घोडा घोडा केला, चेंडूफळी खेळलो. संगीतशाळेत पहिले गाण्याचे धडे घेतले. भाषेशी पहिली तोंडओळख करून घेतली. आम्ही पृथ्वीचा गोल पाहिला, ज्याच्या गोलगोल फिरण्यातून आम्हांला कितीतरी देश आणि खंड दिसले. आकडे आणि आकडेमोड आम्ही शिकायला लागलो. या विश्वाच्या कर्त्याची कथा आम्हांला सांगितली गेली. त्याच्या या विश्वाबद्दल आणि यानंतरच्या परलोकाबद्दलही आम्हांला सांगण्यात आलं आणि त्याचे काही बोलही आम्हांला ऐकवले गेले. आम्हांला छानछान खाणं मिळालं, आम्ही एक डुलकी काढली आणि झोपून उठल्यावर पुन्हा आम्ही मैत्री आणि प्रेम, ज्ञान आणि खेळ यांच्यात रमून गेलो.

जसजशी आमची वाट आमच्या दृष्टिपथात येऊ लागली, तसतसं आमच्या लक्षात येऊ लागलं, की आधी वाटलं होतं, तशी ती काही केवळ सुंदर, केवळ निरभ्र नव्हती.

वावटळीमुळे धुळीचे लोट कधी उठत होते, कधी अचानक अतर्क्य अपघात वाट्याला येत होते आणि सर्वांतून निभावून जायला आम्हांला सतत सावध राहायला लागत होतं, सतत सांभाळून राहावं लागत होतं. अतिशय धीराने वागावं लागतं होतं. हे नुसतं खेळ आणि टिवल्याबावल्या, गंमत एवढंच काही नव्हतं. चढाओढीतून मत्सर आणि चीड निर्माण होत आणि चिडीतून भांडाभांडी आणि मारामारी होई.

आमची बाई कधीकधी हसायची, पण अनेकदा ती चिडत आणि रागावतही होती आणि खूप वेळा ती आम्हांला चक्क ठोकही देत असे. शिवाय, पुन्हा घरच्या स्वर्गाकडे परतण्याची वेळ केव्हाच निघून गेली होती आणि आता मागे वळून घराकडे जाण्याचा सवालच उरला नव्हता.

आमच्यासमोर कष्ट, धडपड आणि चिकाटीने मार्ग काढण्यापलीकडे काही राहिलं नव्हतं. ज्यांना शक्य होतं, त्यांनी मिळालेल्या संधीचा फायदा करून घेतला आणि काळज्यांमधूनदेखील यश आणि आनंद मिळवला.

काम संपल्याची घंटा वाजली आणि दिवस संपत आल्याची सूचना मिळाली. मुलांचे लोंढेच्या लोंढे दाराकडे निघाले आणि दार उघडलं गेलं. मी मित्रांचा आणि मैत्रिणींचा निरोप घेऊन दारातून पलीकडे गेलो. मी सगळीकडे न्याहाळून पाहिलं, पण माझ्या अब्बांचा कुठेच पत्ता नव्हता आणि त्यांनी तर वचन दिलं होतं मला तिथे येण्याचं. मी तिथेच वाट पाहण्यासाठी म्हणून बाजूला होऊन थांबलो. खूप वेळ थांबूनही काही उपयोग होईना, तेव्हा मी स्वतःच एकट्याने घरी परतायचं ठरवलं. मी थोडीफार पावलं चालत गेलो, इतक्यात एक मध्यमवयीन माणूस जवळून गेला आणि माझा हात हातात घेऊन हसत, हस्तांदोलन करत म्हणाला, "किती काळ लोटला आपल्याला भेटल्याला! कसा आहेस?"

त्याच्याशी सहमत होत मी मान डोलावली आणि त्याला विचारलं, "आणि तू, तू कसा आहेस?"
"बघतोच आहेस तू, फारसा काही ठीक नाही, देवाची दया!"

पुन्हा माझ्याशी हस्तांदोलन करून तो निघून गेला. मी आणखी काही पावलं चाललो आणि एकाएकी दचकून थबकलोच. अरे देवा! ती बागबगिच्यांनी भरलेली वाट कुठे गेली? कुठे बरं नाहीशी झाली ती? ही इतकी वाहनं कुठून आली तिच्यावर? आणि हे एवढे सगळे माणासांचे थवे कुठून जमा झाले एकाएकी? इतके सारे हे केरकचर्‍याचे डोंगर कुठून निर्माण झाले इथे? आणि ती सगळी रस्त्याकडेची सुंदर शेतं कुठे गेली? उंच उंच इमारतींनी सगळंच व्यापून टाकलेलं होतं आणि रस्त्यात लहान लहान मुलांच्या लाटा उठत होत्या आणि त्रासदायक आवाजांनी वातावरण भारून गेलं होतं.

जिकडेतिकडे जादूगार आपापला जादूचा खेळ दाखवत उभे राहिले होते आणि टोपलीतून साप काढून दाखवत होते. एकीकडे बँड वाजत होता. सर्कशीची दवंडी पिटली जात होती, विदूषक आणि वजन उचलणारे सँडो मिरवणुकीपुढे चालत होते. मध्यवर्ती सरकारी सैनिकांना वाहून नेणार्‍या ट्रकांच्या रांगा मधूनच आरामात पुढे सरकत होत्या. मध्येच आगीच्या बंबांची घंटा घणाणली आणि मला कळेना की एवढ्या गर्दीतून तो आगीचा बंब कशी काय वाट काढणार? आणि कशी ती आग विझवणार? एका टॅक्सी ड्रायव्हरचं त्याच्या गिर्‍हाईकाशी भांडण जुंपलं आणि गिर्‍हाईकाची बायको ओरडून मदत मागू लागली, पण तिच्याकडे कुणाचं लक्षच जाईना. परमेश्वरा! माझ्या डोळ्यांपुढे अंधारी आली. माझं मस्तक चक्रावलं. मला जवळजवळ वेड लागायची पाळी आली. हे सगळं फक्त अर्ध्या दिवसात कसं घडलं? फक्त सकाळपासून सूर्यास्तापर्यंत? घरी गेलो तर अब्बांना याचं उत्तर माहीत असेल. पण माझं घर कुठे गेलं? मला तर फक्त उंच उंच इमारती आणि माणसांचे थवेच्या थवे दिसत होते. बागेच्या आणि अबू खोदाच्या मधल्या चौकात मी आलो. अबू खोदा पार केल्यावर माझं घर मला सापडलं असतं. पण गाड्यांच्या गर्दीच्या लोटाला खळ नव्हता. आगीचा बंब गोगलगायीच्या गतीने पुढे सरकत असताना कानठळ्या बसवणार्‍या किंकाळ्या मारत होता. शेवटी मी मनाशी म्हटलं की, 'जळो जे काय जळतंय ते आणि आगीला मिळो'. मी अत्यंत क्षुब्ध झालो, आणि हा रस्ता कधी ओलांडायला मिळणार या विचारात पडलो. मी तिथे बराच वेळ उभा राहिलो तेव्हा कुठे कोपर्‍यावरच्या इस्त्रीच्या दुकानात काम करणारा पोरगा माझ्याजवळ आला. आपला हात माझ्यापुढे करून उमदेपणाने तो मला म्हणाला, "आजोबा, मी घेऊन जातो तुम्हांला पलीकडे!"

*

नगीब महफूझ यांची शब्दकळा

नोबेल पारितोषिकासकट जागतिक किर्ती मिळवलेले अरबी साहित्यिक नगीब महफूझ सध्या आपली पत्नी व दोन कन्यका यांच्यासह कैरोच्या एका उपनगरात राहतात आणि कथा कादंबर्‍या लिहितात. तसंच ते 'अल अहराम' नामक इजिप्तमधील सुविख्यात वृत्तपत्रात स्तंभलेखनही करतात. कैरोमध्ये १९११ साली त्यांचा जन्म झाला आणि सतराव्या वर्षीच त्यांनी लेखनाला सुरूवात केली. अनेक लेखकांच्या कृती त्यांनी वाचून काढल्या आणि अनेक पाश्चात्य लेखकांचा त्यांच्या लेखनावर परिणामही झाला, असं म्हणतात. फ्लॉबेर, बालझाक, झोला, कामू, टॉलस्टॉय, दोस्तोएव्हस्की आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे प्रूस्ट या लेखकांचा प्रभाव त्यांच्या लेखनावर आहे.

साहित्यासाठीचं नोबेल पारितोषिक त्यांना १९८८ साली मिळालं आणि तेव्हापासून त्यांनी लिहिलेल्या तिसाच्या वर कादंबर्‍यांचे इंग्रजी आणि इतर जागतिक भाषांतून जगभर अनुवाद होत राहिले. या कादंबर्‍यांखेरीज नगीब महफूझ यांच्या केवळ कथांचे देखील चौदा खंड अरबी भाषेत प्रकाशित झालेले आहेत. पण इंग्रजीत त्यांच्या कथा फारशा वाचायला मिळत नाहीत. The Time and The Place and Other Stories या नावाचं त्यांच्या काही कथांच्या अनुवादांचं एक छोटेखानी पुस्तक नुकतंच माझ्या वाचनात आलं. या पुस्तकात महफूझ यांच्या वीस कथांचे अतिशय सुंदर इंग्रजी अनुवाद केलेले आहेत. अरबी साहित्याचे प्रथितयश अनुवादक डेनिस जॉन्सन- डेव्हिस यांनी हे अनुवाद केलेत आणि त्यांचीच या पुस्तकाला प्रस्तावनाही आहे. नगीब महफूझ यांच्या जवळजवळ तिसेक वर्षांच्या साहित्ययात्रेतील वेगवेगळ्या काळातील या कथा आहेत. अनेक कथांतून लेखकाच्या दृष्टीने महत्त्वाचे असे एकदोन विषय म्हणजे काळ - समय आणि मृत्यू पुनःपुन्हा वेगवेगळ्या स्वरूपात समोर येत राहतात. या कथा वाचताना आपल्याला एका उत्कट संवेदनशील मनाचा परिचय होत जातो. हा लेखक तत्त्वचिंतकही आहे, हे पदोपदी जाणवत राहतं आणि बहुतेक कथा वाचून झाल्यावर आपण डोळे मिटून विचार करत राहतो, इतकी ती प्रभावी असते.

या नव्या पुस्तकात मला Half a Day (अर्धा दिवस) ही कथा वाचायला मिळाली. वाचतावाचता मी त्या साध्या पण अर्थगर्भ शब्दांच्या संमोहनात गुंतून राहिले आणि कथेच्या शेवटाला येतायेता एकदम दिवा लागून उजेड पडावा, तसं वाटलं. एकदम जागच आली. किती थोड्या शब्दांची ही छोटीशी कथा! लांबवरच्या वस्तूकडे दुर्बिणीने पाहावं, तसं या कथेत काळाच्या लांबवरच्या पल्ल्याकडे दुर्बिणीने पाहिल्यासारखं वाटतं. घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास, शाळेतला अर्धा दिवस आणि परतीची वाट एवढ्याच घटकांबद्दलची ही कथा पण किती हलक्याफुलक्या शैलीत सुरूवात करून किती गंभीरपणे संपून जाते ते पाहण्यासारखं आहे. या तरल कथेला कवितेचा सूर लाभला आहे, असं म्हणावंसं वाटतं. कथेच्या सुरूवातीपासून शेवटाकडे जाईपर्यंत नुसता काळच बदलून जातो असं नाही, तर परिप्रेक्ष्य(perspective) ही बदलून जाताना आपल्याला दिसतो. प्रथम आपल्याला भोवतालचं जग कसं दिसतं, ते निवेदक सांगतो आहे आणि शेवटी इतरांना आपण कसे दिसतो, याचा मर्मभेदक साक्षात्कार त्याला
होताना दिसतो. अर्धं आयुष्य संपत आल्यावर 'गेले तरी कुठे ते सगळे दिवस?' अशी जी बोचरी टोचणी लागते, त्यावर की कथा अगदी सुंदर भाष्य करते.

लहानपणात जग किती सरळ, साधं आणि सुंदर दिसतं आणि वार्धक्यातील संध्याछायांच्या वेळेला मात्र इतरांचा गोंगाट आणि गर्दी कशी अंगावर येऊ लागते, तोही व्यक्तीच्या दृष्टीतील थारेपालट या छोट्याशा गोष्टीत सुरेखपणे प्रतिबिंबित झालेला आहे. 'शाळा संपेल तेव्हा मी येईनच तुला घ्यायला' असं वडिलांनी दिलेलं वचन ते का पाळू शकले नाहीत याचा उलगडादेखील फक्त शेवटच्या ओळीतच होतो आणि मग गोष्टीच्या सुरवातीची साधी साधी वाक्यं वाचतानाही त्यात आध्यात्मिक अर्थ शोधायला लागतो. पण एखादी रूपककथा घेतली, तरी तिच्या प्रत्येक ओळीतून व्यवस्थित वेगळा अर्थ निघेलच असंही नाही. एका पक्षी मुलाचे वडील त्याच्याआधीच निजधामास गेले म्हणून ते 'दिवसा'च्या म्हणजे मुलाच्या आयुष्याच्या अखेरीस त्याला घ्यायला येऊ शकत नाहीत. पण दुसर्‍या पक्षी मुलाचे वडील म्हणजे ईश्वर असं जर मानलं, तर मग शाळा म्हणजे दुनियेचंच रुप असावं आणि जो मुलगा म्हणतो की 'माझे वडील वारलेत' तो मुलगा म्हणजे 'God is Dead' म्हणणार्‍या नीत्शेसारख्या किंवा चार्वाकांसारख्या फक्त इहवादी तत्त्वज्ञांचा प्रतिनिधी वाटतो आणि देवावर खंबीरपणे भरवसा ठेवणार्‍या कथानायकाला अशा नास्तिकाला काय उत्तर द्यायचं ते समजत नाही, हेही साहजिकच. पण नक्की मी म्हणते तोच अर्थ यातून निघेल, असंही नाहीच. कधी या बाजूचा, कधी त्या बाजूचा असा छायाप्रकाशाचा खेळ सर्व गोष्टभर चालू आहे, असंही शेवटी वाटतं. काही काही गोष्टी एकदाच वाचायला लागतात, पण त्यानंतर त्या कायमच्या आपल्या संज्ञाप्रवाहाचा अविभाज्य भाग होऊन जातात , त्याच जातीची ही कथा मला वाटली. 'जीवत्सु तातपादेषु नवे दारपरिग्रहे, मातृभिश्चन्त्यमानानां ते हि नो दिवसा: गता:' असं आर्तपणे म्हणणारा भवभूतीचा राम आणि 'How could all this have happened in half a day, between early morning and sunset? I would find the answer at home with my father. But where was my home?' म्हणणारा कथेचा नायक एकसारख्याच अनुभूतीला शब्दरुप देत आहेत आणि आपणा सर्वांनाच ही अतिपरिचयाची अनुभूती आहे, म्हणूनच इतक्या अप्रतिम साध्या रूपकातून इतक्या सहजपणे ती मांडलेली पाहून आपण थक्क होतो आणि क्षणभर का होईना, पण आपल्या सवयीच्या सुरक्षित कोशातून आपल्याला ढकलून देऊन बाहेर काढण्याचं काम ही कथुली करते.

***

अठरा धान्यांचं कडबोळं

अनुवाद - डॉ. विद्युल्लेखा अकलूजकर
मेनका प्रकाशन
किंमत - रुपये १४०
पृष्ठसंख्या - १६८

***

टंकलेखन साहाय्य - अश्विनी के, श्रद्धा, अनीशा, साजिरा

***

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी हे पुस्तक ५-६ वर्षांपुर्वी वाचलं होतं आणि त्याबद्दल जुन्या माबोवर लिहिलंही होतं. मला अतिशय आवडलेलं पुस्तक आहे हे... (वरचं अजून वाचायचय) Happy

डॉ. चिन्मय,
त्या अर्जुनासारखा अक्षय भाता वगैरे आहे का तुमच्याकडे ? आणि दर वेळेस काही नविन नविन काढून चकितच करत असता तुम्ही !
या अफलातून पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल खूप धन्यवाद.

या कथा आणि त्यावरचे भाष्य दिल्याबद्दल धन्यवाद.
पहिली गोष्ट टॉलस्टॉयच्या माणसाला किती जमीन लागते गोष्टीशी नाते सांगणारी वाटली.

त्या अर्जुनासारखा अक्षय भाता वगैरे आहे का तुमच्याकडे ? >>> शशांक Happy , प्रत्येकाकडे एक खजिना असतो जो कधी कुणी चोरून नेऊ शकत नाही, जो वाटून टाकल्याने कमी होत नाही की संपत नाही. फक्त वाटायची वृत्ती पाहिजे.

धन्यवाद. एका चांगल्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल.आणखी कुठल्या पुस्तकांची ओळख इथे करून दिली असेल तर मला सांगा. Happy

धन्यवाद गोजिरी Happy

'अक्षरवार्ता' या सदरातली इतर पुस्तकं आपल्याला http://www.maayboli.com/aksharvarta इथे बघता येतील.
याशिवाय 'मी वाचलेले पुस्तक' या बाफवर आपल्याला अनेक पुस्तकांची परीक्षणं सापडतील. मायबोलीच्या खरेदी विभागात यांपैकी अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत.