स्पंदन

तू ऐक ना

Submitted by Meghvalli on 14 September, 2025 - 03:23

तू ऐक ना

शेर १:
माझ्या वेदनांचे रुंजन तू ऐक ना।
माझ्या हृदयाचे स्पंदन तू ऐक ना।।

शेर २:
रात्रभर जागते स्वप्नांचे हे सिंचन।
हळव्या मनाचे सर्जन तू ऐक ना।।

शेर ३:
पावलोपावली भग्न स्वप्नांचे स्मरण।
डोळ्यांत दाटलेले मूक रुदन तू ऐक ना।।

शेर ४:
हृदयाच्या ठोक्यांना गाण्याचे कोंदण।
ह्या गाण्यांतले यमन तू ऐक ना।।

शेर ५:
अश्रूंच्या धाग्यांने गुंफलेले जिवन।
तुझ्या स्मिताने झाले उन्मन तू ऐक ना।।

शेर ६:
आयुष्य एक संवेदनशील ग़ज़ल।
त्या ग़ज़ली चे चरण तू ऐक ना।।

ग़ज़ल : कदाचित-१

Submitted by Meghvalli on 12 September, 2025 - 12:48

तुला वाटलं असतं तर मी जगलो असतो कदाचित।
हृदयात तुझ्या स्पंदलो असतो कदाचित।।

तु जपून ठेवलं आहेस का त्या फुलांना।
सांज वेळी, आठवणीत भेटलो असतो कदाचित।।

तु चांदणी सारखी बरसलीस जर।
मी रातराणी सारखा मोहरलो असतो कदाचित।।

ते दूरचे क्षितिज रोज खुणावते मला।
पलिकडे आपण भेटलो असतो कदाचित।।

'मेघ', स्वप्नांना देऊ चल उजाळा।
हळव्या क्षणांत गुंतलो असतो कदाचित।।

शुक्रवार, १२/९/२५ , ६:३३ PM
अजय सरदेसाई -मेघ

रुधिराची प्रार्थना

Submitted by नारूचेता on 8 June, 2020 - 04:00

क्षणैक अवघा रुधिर सांगे
का लुप्त साऱ्या धमन्या
अन शिरा शिरांमधे येथल्या
आटला तप्त ज्वाला रुधिर सांगे

झाली जखम कशी मनगटी
सांधल्या मी शिरा साऱ्या
अणू अणूतून पुनश्च संचरले
रोम रोम अंगी रुधिर सांगे

त्याच शिरा अन त्याच धमन्या
अबोल रिक्त झाल्या कशा
पानगळ होई जशी ऋतुकाळीं
प्राजक्त विरला रुधिर सांगे

कोण आपुले कोण परके
हा नसावा विद्रोह मनी
हीच धमनी अन हीच शिरा
रुजवात होवो अंगी रुधिर सांगे

स्पंदन

Submitted by राजेंद्र देवी on 11 March, 2019 - 11:27

स्पंदन

मुके झाले शब्द सारे
बोलू लागल्या भावना
भावनेतून उमटल्या
त्या अंतरीच्या वेदना

जवळच होता दुरावा
येत होता दुरून पुकारा
अलग असूनहि नव्हतो
सोडू शकत मी बंधना

शतशकले आठवणींची
विखुरला सारा पसारा
जगता जगता मागतो मी
थांबण्यास हृदयीच्या स्पंदना

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

तू कैफ शांभवीचा......

Submitted by कौतुक शिरोडकर on 14 February, 2011 - 02:38

तू कैफ शांभवीचा, रमतो तुझ्या सवे मी
अन घोट घोट जगणे, जगतो तुझ्या सवे मी...

ये चोरपावलांनी, स्वप्ने कुशीत भोळी
अलवार त्या कळ्यांसम, फुलतो तुझ्या सवे मी...

ते लाघवी उसासे, श्वासात धुंद गाणी
आवेग स्पंदनाचा, झुलतो तुझ्या सवे मी...

नक़ळे शशी कधी तो, सुर्यास साद घाली
नयनातल्या निशेला, छळतो तुझ्या सवे मी...

भलतीच जीवघेणी, ही रीत प्रीतवेडी
घेऊन घाव गहिरे, हसतो तुझ्या सवे मी...

क्षण सांगतील सारे, माझ्या नव्या कहाण्या
तुज आठवून कैसा, झुरतो तुझ्या सवे मी...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - स्पंदन