गेल्यावर्षी म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये, जवळजवळ दोन दशकांहून जास्त वर्षांनी, मी आणि माझ्या मैत्रिणींने दक्षिण मुंबईतील फोर्ट, नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह भागाची मस्त सैर केली, आमच्या जुन्या आठवणी जागवण्याचा केलेला तो एक छोटा प्रयत्न होता.
भुरभुरत्या पावसातील दक्षिण मुंबईची ही काही क्षणचित्रे आणि आठवणी.
***
२६ जुलै २००५, मुंबई.
दुपारच्या चहानंतर बातम्या येऊ लागल्या की कुठे कुठे पाणी भरतयं, लोकल्स उशिरा धावतायत (लोकल्स म्हणजे तेव्हा तरी मुंबईची जीवनवाहिनीच होती). तोवर दिवसभर आत एसीत बसून कॉम्पुटरमध्ये डोकं खुपसलेल्या आम्हाला बाहेर कोसळणाऱ्या पावसाची सुतराम कल्पना नव्हती. पटापट सगळं आवरून लॉग ऑफ करून खाली येऊन बघते तो, आज जो तो बस पकडण्याच्या घाईत होता. रस्ताभर कंपनी बसच्या मोठ्या रांगा लागलेल्या. मी ही माझी नेहेमीची बस हेरून सीट पटकावली. हां हां म्हणत काही मिनिटांतच बस भरून, निघाली सुद्धा.