दृष्यमयी कविता

रातभूल..(मी मुसाफिर एकटा..)

Submitted by अ'निरु'द्ध on 19 April, 2020 - 06:43

रातभूल..(मी मुसाफिर एकटा..)

ती शरदामधली रात्र 
अन मी गावाकडल्या घरी
पहुडलो बाजेवरती 
लिंब ढाळे चवरी वरी

ती शिशिरामधली रात्र
अन मी उघड्या माळावरी
तृणपाती हलवी वारा
मज भरे थंड शिरशिरी

ती अचंद्र काळी रात्र
अन मी रानवाटे वरी
काजऽवे लगडले तरुला
ठिणग्या हलती खाली वरी

ती चांदणकाळी रात्र 
अन् मी उजाड दुर्गावरी 
आसमंती मी एकटा
पेटत्या दिवट्या दिसती दुरी

ती लखलखणारी रात्र 
अन मी उघड्या व्योमाखाली
चांदणफुले चमकती गगनी
उधळण रत्नांची अंबरी

झरा निळा सावळा

Submitted by अ'निरु'द्ध on 17 April, 2020 - 15:03

झरा निळा सावळा

डोंगरमाथ्यावरुन झरते हळुहळु झुळझुळा
वाहत जाई शुभ्रजल ते प्रतिबिंबे घननिळा

इथले तिथले मिसळत बिलगत रुंदावे ते पाणी 
दगडादगडातून जन्मला झरा शुभ्र अन् निळा

सपाट रानी काठांवरती तरुवेलींची दाटी
संथ प्रवाही वाहत जाई प्रौढ झरा सावळा

संथावल्या पाण्यामध्ये उठवी तरंग मासोळी,
क्षणी त्याच टिपे तिला ध्यानस्थ शुभ्र बगळा

काठावरच्या वृक्षावरती सानरंगुला पक्षी
लकेर घेई मजेत फुलवून गळा निळाजांभळा

हलके हलके वहात जाई पान एक हिरवे
खुडलेल्या सृजनाचा तरंगत जाई सोहळा

Subscribe to RSS - दृष्यमयी कविता