तुझ्या पत्रातला मजकूर का ओलावला होता ?

Submitted by मयुरेश साने on 6 November, 2011 - 02:47

दुरावा एकमेकांचा तुला जर भावला होता
तुझ्या पत्रातला मजकूर का ओलावला होता ?

हवे होते मला जे ते तुला सांगायचे होते
खुळ्या शब्दास अडवाया अबोला धावला होता !

पहाटे पाहिले स्वप्नात आपण एकमेकांना
मनाचा सूर्य ही तेव्हा जरा सांजावला होता !

तुझे काळीज दगडाचे तसे मी फूल नाजुकसे
तुझ्या काट्यातही माझा बहर सामावला होता !

निराळा कैफ होता तो तुझ्या लावण्यवर्खाचा
नशा होती तुझी प्याला जरी धुडकावला होता

तुझ्या हातून हरण्याला सखे मी जिंकणे म्हणतो
पणाला हारलेला डाव ही मी लावला होता !

चितेवर फूल चढवाया अता येणे तिचे होते
जरासा देवही उशीराच मजला पावला होता

मयुरेश साने..०६- नोव्हेंबर-११

गुलमोहर: 

खयाल सुंदर... पण जमता जमता थोडक्यात हुकली असं मावैम.

पहाटे पाहिले स्वप्नात आपण एकमेकांचे
काय??
की एकमेकांना?