स्वानंद

खोटे हसणे जमले नाही....

Submitted by स्वाकु on 1 March, 2014 - 07:11

खोटे हसणे जमले नाही काय करावे
येथे रमणे जमले नाही काय करावे

दु:खांना भिडलो आम्ही डगमगलो नाही
मागे हटणे जमले नाही काय करावे

इतका हरलो की जगण्याचे दडपण येते
डोळे मिटणे जमले नाही काय करावे

शब्दांचाही गुंता होता बावरलो मी
अलगद सुटणे जमले नाही काय करावे

समजत नाही मागायाचे कोणासाठी
नाती जपणे जमले नाही काय करावे

'स्वानंदा'चे झाले स्वागत सुरवातीला
शेवट करणे जमले नाही काय करावे
-----------------------------------------------

शब्दखुणा: 

शब्द माझे....

Submitted by स्वाकु on 19 February, 2014 - 11:40

शब्द माझे जुळत नव्हते
फार काही सुचत नव्हते

टाळली मी भेट अपुली
पण दुरावे पचत नव्हते

हासलो मी कैक वेळा
हुंदके पण लपत नव्हते

वाहणार्‍या आसवांना
थांबणे ही जमत नव्हते

हरवला स्वानंद आता
का मनाला कळत नव्हते
-------------------------------

शब्दखुणा: 

स्वप्न मी जे पाहिले...

Submitted by स्वाकु on 16 February, 2014 - 00:40

स्वप्न मी जे पाहिले ते भोगतो आहे
आसवांना आज ही कुरवाळतो आहे

या जगाची रीत कोठे वेगळी होती
मीच माझे घाव हे गोंजारतो आहे

शक्य नाही भावनांशी खेळणे आता
भेट वेडी मी तुझी मग टाळतो आहे

बांधले जे मी मनाशी फास प्रेमाचे
संपणारे श्वास मी कवटाळतो आहे

द्यायचे देऊन झाले संपले आता
राहिलेले श्वासही मी जाळतो आहे

शब्दखुणा: 

जरी भेटलो ना....

Submitted by स्वाकु on 7 December, 2013 - 05:57

जरी भेटलो ना तरी तू रुसावे
जसा भेटलो मी तसे तू रडावे

कळेना मला काय होते मनी रे
जरी पाहिले ना तरी का दिसावे?

जशी आवडावी तशी दूर गेली
नको होत होते तसे का घडावे?

जसा काल होतो तसा आज नाही
नवा पाहुनी मी तिने का खुलावे?

कधी दूर केले न मी आसवांना
तरी आसवांनी मला का छळावे?

शब्दखुणा: 

तिच्याशी नाते माझे...

Submitted by स्वाकु on 12 November, 2013 - 03:02

तिच्याशी नाते माझे, नावापुरतेच सुंदर आहे
जरी दिसे जोडलेले तरी, अंतरी समांतर आहे

तैलथेंबासम आयुष्य, पाण्यावर तरंगत आहे,
होत नाही एकजीव, वेगळे होणे अशक्य आहे

वेदना नात्यामधली, साहवेना ती मला आता,
दाह उरला नाही जरी, चटका तरी लागत आहे

संपतच नाही रात्र, भिती वाटे स्वप्नांची मला
वेळ जाता जाईना, दिवस असाच सरत आहे

जरी वाद होते तरीही, ते जगणे जिवंत होते
शांत शांत तू अन मी, घर दोघांचे स्मशान आहे

शब्दखुणा: 

तू दूर दूर जातांना....

Submitted by स्वाकु on 12 November, 2013 - 02:57

तू दूर दूर जातांना, एक आठवण होशील का?
नसतांनाही तू असण्याचा भास मज होईल का?

करीन कविता आणि गाणी, तुझ्या श्रुंगारावरती,
खळीसंगे सहज लाजूनी, सांग सखे पाहशील का?

कार्तिकमासे भल्या पहाटे, जरी कधी गारठलो मी
ऊन बनुनी तव किरणांनी, कधी ऊब देशील का?

कधी भितीने, दु:खाने, गंध विरला जीवनाचा
बनून अबोली गोड हसूनी, सांग तू येशील का?

श्वास माझा तू नसतांना, अर्थहीन वाटे मला
दूर जातांना श्वासांची, सोबत तू घेशील का?

शब्दखुणा: 

तो पापणीस माझ्या...

Submitted by स्वाकु on 12 November, 2013 - 01:53

तो पापणीस माझ्या, ओले करून गेला
पाहून घाव ताजा, वेडा हसून गेला

नाही मला जमेना, हा खेळ मांडलेला
अर्ध्यात जोडलेला, रस्ता खचून गेला

डोळ्यांत सांजवेळी, अश्रू भरून आले,
जाळून काळजाला, अग्नी विझून गेला

आनंद जीवनाचा होतास तू सख्या रे
टाळून तू मला का? वैरी बनून गेला

मागेच टाळलेला, 'स्वानंद' आठवांचा
मागून हा कशाला, अश्रू पुसून गेला

शब्दखुणा: 

जगलो आनंदाने ते शब्दच उदास होते....

Submitted by स्वाकु on 8 November, 2013 - 04:16

जगलो आनंदाने, ते शब्दच उदास होते
जगण्याला अर्थ माझ्या देणारे श्वास होते

न होती काळजी मजला, कधीही संपण्याची
सभोवताली माझ्या, ओळखीचे फास होते

जरी श्वासांना कळेना, भावना माझी कधी
खोट्या प्रेमाचे इथे, वेडे आभास होते

मी रित्या हाताचा, नावाचा नाही भुकेला,
माझ्यामागे पचलेले, माझेच घास होते

देऊ दोष कुणाला, अलवार वार झाला
थांबलेल्या श्वासांचे, क्षण ही झकास होते

शब्दखुणा: 

गेले भिजून डोळे...

Submitted by स्वाकु on 2 November, 2013 - 00:53

जागली रात्र सारी गेले थकून डोळे
मिटताच पापण्या आज गेले भिजून डोळे

सुचले जरी शब्द मला, मांडू कसे कळेना
मांडताच शब्द माझे, आले भरून डोळे

अश्रू पुसून टाकी ते ओठांवरचे हसू
तरी शोक अंतरीचा पाही कुठून डोळे

आज भयाण शांतता किती ग बोलकी होती
हुंदके देत देत ते गेले सुकून डोळे

कोरून जखमा जुन्या अश्रूंना पूर आला
अश्रूंशी नवे नाते गेले जोडून डोळे

अशी तू....

Submitted by स्वाकु on 30 October, 2013 - 08:46

जणु लाजाळूसम पापण्या मिटतेस तू,
कशी ग स्वतःमध्येच सखे रमतेस तू ||

स्वप्नी स्पर्श तुझा वाटतो खराखुरा ,
भास होतो जेव्हा समोर असतेस तू ||

नकळतपणे मजला नजर कळते तुझी ,
शहारते मन जशी सुंदर हसतेस तू ||

चिडतो ग वारा, चुकतोही त्याचा रस्ता ,
चुकवून नजर जेव्हा अश्रू ढाळतेस तू ||

तू नसतांना हे जीवन भकास वाटे ,
झकास वाटे जेव्हा हळुच लाजतेस तू ||

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - स्वानंद