फ्री वर्स

कवडसा

Submitted by बागेश्री on 5 August, 2014 - 08:59

गर्द घनदाट छायेच्या प्रदेशात
ओल्या सुखद अंधारात
तू कवडसा होऊन ये

अंगा- खांद्यांवरून वावर
मनात झिरपत जा

तिथे तुला अनेक ठसे दिसतील
अशाच कुठल्या कवडश्यांचे
आत आत उमटून वस्ती करून राहिलेले

त्यांनी तमा बाळगलीच नव्ह्ती
अंधाराची
किर्र झाडीची
बिकट वाटेची
तिथे खोल पोहोचण्याचा हक्क मिळवला होता त्यांनी
कुठला डोळ्यांतून उतरला
कुठला श्वासांतून

तू ही पोहोच!
तुझी वाट तूच निवड!

त्यांच्या ओळीत जाऊन बैस
त्यांच्यातला होऊन जाऊ नकोस

शब्दखुणा: 

तू आणि तो

Submitted by बागेश्री on 17 July, 2014 - 23:35

तुझ्या दमदार हातात हात घेतोस, तेव्हा
बाहेर तो कोसळत असतो!
ओंजळीला सवय झालेली असते
तुझ्या उबेची,
त्याच्या गारव्याची!
तुमच्या दोघांतले साम्य शोधण्यात, भेद मिटवण्यात,
अनेक पावसाळे सरलेत..

आता तोही प्रौढ झालाय!
तुझ्याइतकाच समजूतदारही!
रुसत नाही फारसा.
कधी संध्याकाळी तो
हळवासा कातर,
कोसळत राहतो
अनेक तास
कित्येक प्रहर...
मी मात्र आडोश्याला!
त्याला पाहत
तुला आठवत,
काही साठवत..
कुठल्याशा क्षणी मी बाहेर पडते
चालत राहते
आता तो, मी, अंधार आणि त्याचा समजूतदारपणा!

फुलं
पानं
झाडं
ओहोळ
डबकी
पागोळ्या
असा सगळीकडे तो...
त्याची व्याप्ती अपार!
त्याच्यात गुंतणं म्हणूनच धोक्याचं!

शब्दखुणा: 

तुझी अर्धोन्मिलीत कविता!

Submitted by बागेश्री on 24 March, 2014 - 05:03

तुझ्या प्रतिभेच्या काठाशी मी ओणवी बसताच,
उग्र डोळ्यांत दिसते एक कविता..
धसमुसणारी, अर्ध्यावर सोडलेली, व्यथित!
दुसर्‍या डोळ्यांत मात्र ओलं हितगुज...
हिंदकळत राहते मी काठाशी
कधी व्यथेने, कधी ओलेती..
तुझ्या व्याकुळ शब्दांचा वारा
घालमेल वाढवत उर धपापता ठेवणारा
ना बुडता येतंय,
ना तरंगता...
उठून जायचा विचार करू तर,
पायात येते,

तुझी अर्धोन्मिलीत कविता!

 
-बागेश्री

शब्दखुणा: 

खारं पाणी

Submitted by बागेश्री on 5 March, 2014 - 09:39

समुद्राकाठी रेतीचं घर करण्याचा अट्टहास....
त्या घराचं आयुष्य- माहीती नाही
त्याच्या -तिच्या नात्याचंही!

घर खोटं,
नात्याचा अखंडपणा खोटा,
सागर खरा,
त्याची गाज खरी..
पाणी खरं,
त्याची लाट खरी...
त्याने किमया दाखवली
एक लाट, सारं भूईसपाट...
ढासळत्या घराला सावरायला
मग चार हातांची अशक्य लगबग

वर्ष सरलीत..
आता कधी कागदाला लेखणी टेकते तेव्हा
रेतीचे वाळलेले कण
कागदभर विखुरतात,
वेगवेगळे आकार साकारतात...
स्वप्न कागदभर उतरतात,
बघता बघता धूसर होतात..
डोळाभर धुकं साचतं, 
ओघळतं..

शब्दखुणा: 

द्वंद्व

Submitted by बागेश्री on 15 January, 2014 - 22:39

अविरत धडपड करून
मी चढून येते आतून,
बघते जग बाहेरचे
चेहर्‍याच्या बाल्कनीतून..

दोन डोळ्यांच्या खोबण्यात
मी घट्ट दडून असलेली,
बाहेरच्या जगातले
संभ्रम जोखत बसलेली

कधी तुला वाटते मी
पाहू नये काहीही,
मला आत ढकलण्याची
करतेस मग तू घाई..
तू डोळे मिटता गच्च
पापण्यांचा सुटतो हात,
मी खोल ढासळत जाते
कोसळते आत आत

झटकते पुन्हा स्वतःला
जग बघायचे हे आहे
मी चढेन पुन्हा पुन्हा
पडझड नेमाची आहे...
हे द्वंद्व तुझे नि माझे
सरणार एकदा आहे

शब्दखुणा: 

विश्वरूप

Submitted by बागेश्री on 8 January, 2014 - 10:29

सांजेचं अस्ताव्यस्त रूप
पाहून चर्र झालं..

तिची ती ओढत नेलेली पाऊले
पायात ना मावळतीच्या चपला,
ना खांद्यावर मेघांचा पदर..
आकाशी भाळावरचं,
भलं मोठं बिंबही... फिकूटलेलं
झटापटीत पुसल्या गेल्यासारखं मलूल
विरत विरत चाललेलं..

काळोखाचे पडदे झरतील आता..

परतेल तीही, तिच्या घरी..
जरा अवघडली- जरा बरी

तिच्या ह्या विश्वव्यापी रुपाला
मेणबत्त्यांचा मोर्चा पुरेल?

शब्दखुणा: 

मना, कर सुटका जाता जाता

Submitted by बागेश्री on 30 December, 2013 - 09:30

चैतन्य सोबतीला घे,
अन् श्वासोच्छवास माझे,
श्वासाच्या गाजेने, नुसता
वाजतो देहाचा भाता..
मना, जा दूर जा तू आता

हा पडो सुनासा देह
अवसान नको कशाचे,
मातीशी राखले, जुने
चाखेन नाते आता..
मना, ने भान जाता जाता

किट्ट भावना, प्रश्नही क्लिष्ट
सुरूवात जेथे तेथेच अंत
छेदून वर्तुळाला, फुटावे
फसवे परिघ आता.
मना, कर सुटका जाता जाता

आयुष्याचे जुने बहाणे
जीर्ण गाणे, मिटते तराणे
सळसळून नवचैतन्याचे,
दे सूर नवेसे आता..
मना, हो गीत जाता जाता

शब्दखुणा: 

मसीहा

Submitted by बागेश्री on 5 November, 2013 - 06:38

तू माझ्यातली संवेदनशीलता
परतवून दिलीस,
जगताना हरवलेली..

जणू जत्रेतून,
वाऱ्यावर गोल फिरणारं चक्र घेऊन दिलंस,
मी धावतेय,
हात उंचावून...
आशेच्या नव्या वाऱ्यावर रंगीत चक्रही गरगरतंय..
माझ्यातला रुक्षपणा माझ्याच अनवाणी पायाखाली उडतोय,
धूळ होऊन!

कित्येक दिवसात असं मुक्त धावले नव्हते..
कपड्याचं भान नको,
रस्त्याचं नको, काट्याकुट्यांच नको...
दिशेची तमा नाही,
सुसाट धावणं...

डोळ्याच्या कडा आज जरा ओलसर,
कोरड्या गालांवर मृद्गंध फ़ुलतोय..
हृदयाची धडधड ऐकू येण्याइतपत
जिवंतपणा जाणवतोय...

गती थोडीही कमी न करता आता तुझ्या दिशेने निघालेय,
माझं असं रूप तुझ्या डोळ्यांत पहायचंय...

शब्दखुणा: 

अंतर्नाद

Submitted by बागेश्री on 29 October, 2013 - 23:57

अनेक न निनादलेल्या घंटाचा गुच्छ..
त्या तिथे
शरीरात..!

बेसावध क्षणी कुठलीतरी वायुलहर
शरीरमर्यादा ओलांडून आत शिरते..
अन्..

घंटांची एकत्रित किणकिण कानी येते
आजवर कधीही न ऐकलेला,
तो सूर
आपल्याच आतून...

बाहेर आपण सैरभैर...

आत महत्त्व न दिलेल्या भावना,
असहाय्य- अगतिक, निजलेल्या..!
आता मात्र संधिसाधू,
सोबत करतात त्या त्रयस्थ लहरीची....

आता आतल्या आत बेभान तरंग...
सौम्य निनादाचं उग्र होणं...
कानातून बाहेर फुटू पाहणं...

शब्दखुणा: 

पावसाळा

Submitted by बागेश्री on 6 October, 2013 - 06:32

घनघोर दाटलेले मेघ
रिते न होता घोंघावत राहतात

रस्त्याच्या कडेला,
अर्धवट जगलेले क्षण फेर धरतात
आठवणी भिरभिरतात,
मोडक्या स्वप्नांचे कपटे,
वाळून भुरभूरीत झालेल्या आशा
धूळ होऊन पिंगा घालतात,

वावटळ उठते!

जमिनीपासून उठाव घेते...
सगळं गरागरा फिरवते..
थोडी पलीकडे जाते...

स्थिरावते..

तिथेच कुठेशी.. मी त्रयस्थ...
डोळ्यांच्या पापण्यांवर,
हाता-पाया, कपड्यांवर.. फक्त धूळ घेऊन उभी...!!

निजलेली वावटळ पाहून ढगांचं बेमालूम पांगणं...

आजही पावसाने कोसळणं टाळलं

हल्ली सोशिक झालाय फार..

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - फ्री वर्स