पक्षीनिरिक्षण - Hummingbirds & Bushtits

Submitted by वर्षा on 11 July, 2026 - 18:19

जूनमध्ये कॅलिफोर्नियाचा निरोप घेतला. आतापर्यंत अनेक वेळा अपार्टमेंट्स बदलली आहेत, त्यामुळे त्यात नवीन असे काही नव्हते. पण इथे मात्र वाईट वाटले फार सोडून जाताना! कारण अर्थातच पक्षी! इथे मी चार वर्षे सलग राहिले. त्यामुळे मला पक्ष्यांची आणि पक्ष्यांना माझी ओळख व सवय झाली असणार, नव्हे झाली होतीच. बर्ड बाथ साफ करण्याच्या वेळेस अगदी पाच मिनिटेही तो बर्ड बाथ नजरेस पडला नाही तर बाजूच्याच फांद्यांवर चिवचिवाट करत थांबून राहताना, बर्ड बाथच्या रिकाम्या जागेवर अधीर चकरा मारताना, शोधाशोध करताना पक्ष्यांना पाहिलेय. स्वच्छ पाण्याच्या थाळ्या खाली ठेवून मी उभी राहतेय तोवरच्या काहीएक सेकंदांमध्ये पाण्यावर येणार्‍या हमिंगबर्ड्जना खूप जवळून पाहिलेय, आणि मला न घाबरता, तिथल्या तिथे त्यांनी मनसोक्त पाणीही प्यायलेय, आंघोळही केलीय.

या पक्ष्यांच्या नोंदींमध्ये माझ्या यादीतल्या सगळ्या पक्ष्यांबद्दल फोटोंसमवेत अद्याप बोलून झाले नाहीये, पण त्यात हमिंगबर्ड आणि बुशटिट्स या गोजिरवाण्या आणि आकाराने चिंटुकल्या असणार्‍या पक्ष्यांबद्दल स्पेशल बोलले नाही, तर काय उपयोग! तर हा भाग त्यांना बहाल!

(१) Anna’s Hummingbird

हमिंगबर्ड हा पक्षी मी भारतात कधीही पाहिला नव्हता. तिथे माझ्याकडे असणार्‍या जमैकन स्पाईकच्या जांभळ्या-गुलाबी तुर्‍यांवर सनबर्ड पुष्कळ यायचे. त्यांचीच आठवण हमिंगबर्ड्जना बघून यायची. पण हमिंगबर्डचे पंख हलवत (जे त्या पंख फडफडवण्याच्या वेगामुळे स्पष्ट दिसतच नाहीत) हवेत तरंगणे केवळ कमाल! नंतर सर अ‍ॅटनबरोंमुळे हमिंगबर्ड अधिकच रोचक वाटू लागल्याने काळजीपूर्वक त्यांचे निरीक्षण केले जाऊ लागले.

हमिंगबर्ड्ज यावेत यासाठी बरेच लोक मध/Nectar किंवा तत्सम फीडर्स लावतात, पण पक्ष्यांना खायला घालायचे नाही असा मी अनुभवांती निर्णय घेतल्यामुळे तो ऑप्शन माझ्यासाठी बाद झाला होता. नेक्टर पित असले तरी त्या बोटाएवढ्या आकाराच्या पक्ष्यांना पाण्याची तहानही लागू शकते, हे डोक्यातच आले नव्हते त्यामुळे बर्ड बाथच्या कारंज्यावर हमिंगबर्ड नियमित येऊ लागले तेव्हा आश्चर्यमिश्रीत आनंद झाला. हमिंगबर्ड्ज भरपूर पाणी पितात आणि पाण्यात आंघोळ करायला त्यांना प्रचंड आवडते! सकाळी उठल्यावर मी बर्ड बाथचे कारंजे जेव्हा सुरु करायचे तेव्हा बहुतेक वेळेस येणारा पहिला पक्षी हा हमिंगबर्डच होता.

बर्ड बाथमध्ये पाण्याचा पंप आहे त्याच्या नळीवर किंवा नळीच्या तोंडावर बसवलेल्या कारंजे उडण्याच्या टोपणावरच, थोडक्यात पाण्याच्या स्रोताच्या थेट उगमावरच स्थानापन्न होणारा तो हमिंगबर्डच. बहुतेक जाकुझी फिलिंग मिळत असावी. अशा प्रकारे पाण्यात मनसोक्त न्हाऊन झाले की भुरकन तरंगत जवळच्या फांदीवर बसायचे आणि सुईसारख्या चोचीने चांगली पाच मिनिटे पिसे/अंग साफसूफ करीत बसायचे हा नित्यक्रम.

पंखांचा पंख्यासारखा फर्र आवाज, चुक चुक किंवा आणखी एक विशिष्ट प्रकारची शीळ ऐकू आली की तो हमिंगबर्ड हे न बघताच ओळखू येण्याइतकी प्रगती झाली. "अ‍ॅनाज हमिंगबर्ड" हे त्या प्रजातीचे नाव हेही कळले. हा हमिंगबर्ड (नर) डोक्यापासून गळ्यापर्यंत उत्कृष्ट चमकदार गुलबक्षी (magenta) रंग बाळगून असतो जो पाहिजे तेव्हा योग्य वेळी झळकवून आपले डोळे दिपवतो! सोबत सुरेख चमक असलेल्या गडद हिरव्या आणि चॉकलेटी पिसांचे अंग आणि मण्यांचे काळे डोळे ल्यालेले ते रुप बघणे म्हणजे शब्दश: visual feast!

पक्षीनिरीक्षणासाठी बाहेर गेल्यावर हवेत तरंगणारे, झूमकन इकडे तिकडे बाणासारखे जाणारे हमिंगबर्ड पुष्कळ दिसतात. खूप वेळा ते एखाद्या झाडाच्या सर्वात वरच्या फांदीच्या अगदी टोकावर बसलेले दिसतात. अगदी पुष्कळ वेळ. तिथे अगदी झोपलेलेही पाहिलेय त्यांना. बोटाएवढा छोटा जीव, इतक्या सहज दिसू शकणार्‍या जागी का बसून (त्यातही झोपून) शत्रूपक्षाला (predators) आमंत्रण कशाला देत असावा, हा मला वारंवार पडलेला प्रश्न! फांदीवर बसून मानेच्या मजेदार हालचाली करणेही गंमतीशीर.

झोपी गेलेला....

जागा झाला.... Happy

हमिंगबर्ड्जच्या अनेक जाती पोटजाती आहेत पण मी अद्याप अ‍ॅनाज हमिंगबर्डच्या पलिकडे गेले नाहीये, बघू कधी योग येतो ते.

(२) Bushtits

अपार्टमेंटच्या एका छोट्या खिडकीला अगदी लागूनच लेमनवुडचे झाड होते, त्याच्या फांद्या खूपच जवळ म्हणजे, जरा वारा आला की खिडकीच्या काचेला टेकू शकतील इतपत जवळ होत्या. त्या खिडकीला बारीक जाळी लावून दिलेली नव्हती त्यामुळे इतक्या जवळ फांद्या/झाड असल्याने खिडकीचे काचेचे दार आम्ही कायम बंदच ठेवायचो, उघडल्यास नकळत प्राणी/किडेमकोडे आत शिरल्यास काय घ्या!

पण त्याच फांद्यांवर चिमण्यांपेक्षा छोट्या आकाराचे, राखाडी रंगाचे चिमुकले, चंचल पक्षी बागडताना दिसत. फांद्या काचेच्या अगदी जवळ असल्याने मस्तपैकी खूप जवळून त्यांचे निरीक्षण करता यायचे. त्यांना आम्ही दिसत नसू बहुतेक. एक-दोन नाही तर सात-आठ कधीकधी दहाचा थवाही यायचा. पानांच्या मागे असलेले किडे वगैरे टिपायचे. त्यांचा आवाजही परीचयाचा झाला होता. बुशटीट्स असे नाव आहे ते लवकरच कळले.

या बुशटीट्सची एक गंमत आहे. वरवर श्री आणि सौ अगदी सारखे दिसतात. पण त्यांना ओळखण्याची खूण म्हणजे त्यांचे डोळे. आता आधीच एवढासा तो जीव, त्यात त्यांचे डोळे म्हणजे बारीक मणीच. पण त्या बारीक मण्याचा रंग फिकट (pale yellow) असेल तर त्यातली डोळ्यांची बाहुली स्पष्ट दिसते. ती दिसत असेल तर ती सौ.

आणि त्यामुळे ती थोडी रागीट आहे असेही वाटते :))

आणि पूर्ण काळेभोर मणी म्हणजे श्रीयुत. Happy

झाडांवर बागडणारे बुशटीट्स रोज दिसायचे पण बर्ड बाथवर यायला त्यांनी बराच वेळ घेतला. तोपर्यंत हे पक्षी पाणी पित नसावेत किंवा आंघोळ वगैरे त्यांना आवडत नसावी असे माझे त्यांच्यबद्दल मत झाले होते. कारण असंख्य वेळा बर्ड बाथच्या अगदी जवळच्या झाडावर बागडताना त्यांना बघत होते. पण एकदा मात्र एका संध्याकाळी त्यांच्यापैकी एकाला वाटले पाणी प्यावे, आंघोळ करावी, म्हणून तो उतरला आणि मग चालू झाला त्यांचा सिलसिला!

हे थव्यात राहतात, सर्व आयुष्य एकत्र कुटुंबासारखे. त्यामुळे पाणी पिणे, आंघोळ करणेही एकत्रच! एक, दुसरा, तिसरा, चौथा असे करत एकेकजण बर्ड बाथमध्ये आडव्या ठेवलेल्या काठीवर किंवा पाण्याच्या पंपाच्या पाण्यावर समांतर धावणार्‍या वायरवर येऊन बसतात (नक्की बघा!), ते बघणे खूप खूप आनंद देणारे. सुरुवातीस दबकत, बिचकत येणारे एकेक, पाण्याचे तुषार अंगावर पडल्याने खूष होऊन कारंज्याच्या जास्तीत जास्त जवळ बसण्याच्या प्रयत्नात एकमेकांना बिलगून बसतात किंवा मध्ये पाचर मारतात, थोडी धक्काबुक्की करतात, एकमेकांच्या डोक्यावरही बसू पाहतात (आम्ही त्याला दहीहंडी म्हणायला लागलो) किंवा शिस्तीत आळीपाळीने कारंज्याजवळचे मोक्याचे स्पॉट्स शेअर करतात, ते सर्वच गंमतीशीर. आम्ही मोजले तर एकदा दहा-बारा बुशटीट्स आले होते, केवळ कमाल! (तेव्हाच माझा नेमका ऑफिस कॉल चालू होता. इतक्या मोठ्या संख्येने आलेले पक्षी समोर दिसत आहेत पण मला तर कॉलवर लक्ष द्यायचे आहे अशी नेमकी नको असलेली परिस्थिती! इतकी हळहळले होते त्या दिवशी)
त्यांचे एकमेकांना बिलगून बसणे इतके क्यूट दिसते की काय बोलावे.

बघायला गेलं तर हमिंगबर्ड किंवा बुशटीट्स - दोन्ही आकाराने छोटेसे पक्षी. हमिंगबर्डचे वैशिष्ट्यपूर्ण उडणे, चमकदार दिसणे, धीट वागणे खास तर कुठलेही ठळक रंग जराही नसलेले राखाडी बुशटीट्स त्यांच्या मोहक, चंचल हालचालींमुळे आणि एकमेकांना धरुन,समूहात राहण्याच्या वैशिष्ट्यामुळे लक्षात राहण्यासारखे. या गोंडस पक्ष्यांना विसरणे केवळ अशक्य आहे ते यामुळेच!

हॅपी बर्डींग!

क्रमशः

या सिरीजमधील आधीचे लेखः

छंद पक्षीनिरीक्षणाचा - Window birding!
पक्षीनिरीक्षण - फिंच!
पक्षीनिरीक्षण - Hermit Thrush आणि अमेरिकन रॉबिन
पक्षीनिरीक्षण - Cedar Waxwing!
"पक्षीनिरिक्षण - Warbler अध्याय
"पक्षीनिरिक्षण - अमेरिकन वुडकॉक"
पक्षीनिरिक्षण - निळे पक्षी! (बर्ड्ज इन ब्ल्यू!)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद!
मामी, नव्या जागेत बर्ड बाथ नाहीये. पण ठिके, मला कल्पना होती. पण इथे आउटडोअर बर्डींग चालूच ठेवणार आहे.
वावे, नक्की बघ, आवडतील, तुला.
बोकलत, बहुतेक सर्वच फोटो Nikon P1100 ने काढले आहेत. बर्ड मोडवर. डीएसएलआर/एसएलआर चॅलेन्ज्ड माझ्यासारख्यांसाठी हे पॉईंट अ‍ॅन्ड शूट कॅमेरे बेस्ट आहेत. मी निकॉन, सोनी, पॅनसॉनिक वापरुन पाहिलेत, मला निकॉन सर्वोत्तम वाटतात. माझा पहिला पॉईंट अ‍ॅन्ड शूट Nikon P600 होता, तोही फारच छान होता.

वर्षा, किती छान लिहीलंयंस. तुझं पक्षांचं निरीक्षणही फार भारी आहे. तुझे व्हिडिओ बघताना इतकं छान वाटतं मला.

आता जिथे कुठे गेली आहेस तिथे बर्ड बाथ लावायचा काहीच स्कोप नाही कां?

बहुतेक सर्वच फोटो Nikon P1100 ने काढले आहेत. बर्ड मोडवर. डीएसएलआर/एसएलआर चॅलेन्ज्ड>>>
हा कॅमेरा खरच मस्त आहे. मी वापरला नाही पण reviews आणि फोटो वरून नक्कीच dslr आर चॅलेंजड.

खूप सुंदर फोटो. वर्षा, तू वर्णन फार सुंदर करतेस.

खूप सुंदर फोटो आणि लेख!!

इथल्या nursery मध्ये बर्‍याच फुलझाडांवर वर hummingbird friendly / magnet अशी पाटी लावली असते. म्हणजे - निरनिराळ्या प्रकार चे Saliva, lantna, phlox इत्यादी. मी यातले काही लावलेत आणि खरच येतात की hummingbirds!! संध्याकाळी त्यांची वाट बघत बॅकयार्ड मध्ये बसायला छान वाटते Happy

धन्यवाद मानव, मीस्वच्छंदी, आडो, कंसराज, मनमोहन, अस्मिता.

आडो, मी जर्सी सिटीत आहे न्यूपोर्टमध्ये आणि इथल्या एका skyscraperमध्ये अकराव्या मजल्यावर राहते. सध्याच्या अपार्टमेंटला बाल्कनी नाही. आणि असती तरी बाल्कनीजवळ येऊ शकतील अशी झाडेच नाहीत. कॅलिला दुमजली अपा. बिल्डींग आणि बाल्कनीवर अगदी झुकणारे दोन वृक्ष असा मामला मस्त जमून आला होता. Happy
कंसराज, बर्‍याच दिवसात तुमचे कलर्ड पेन्सिल चित्रे पाहिले नाही, बघायला आवडेल, प्लीज मनावर घ्या Happy
मनमोहन, मस्तच. कुठल्या प्रकारचे हमिंगबर्ड येतात तुमच्याकडे?

Wow.
नेहमीप्रमाणे सुंदर लेख आणि फोटो.
डेव्हिड अ‍ॅटनबरों लिंक भारीच दिसतेय.
निवांत पाहतो.
हमिंगबर्ड बद्दल फार आकर्षण आहे.