पक्ष्यांमध्ये निळ्या रंगाच्या पक्ष्यांचे आकर्षण मला जास्तच आहे. कारण नक्की सांगता येणार नाही कदाचित पण मुंबईसारख्या शहरात रंगीबेरंगी म्हणण्यापेक्षा बोल्ड कलर्स ल्यालेले पक्षी तसे कमी दिसत. अगदीच नाहीत असं नाही अर्थात कारण, सोनसळी रंगाचा हळद्या, पिवळे-लालभडक पॅच असलेला तांबट किंवा हिरवेगार पोपटही घरबसल्या दिसत आणि नेत्रसुखद वाटत. त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी पाहिले गेलेले मोर, किंगफिशरही परिचयाचे, पण ते सोडल्यास निळ्या रंगाचे पक्षी झाडावर बसलेत, असं काही कधी मी पाहिले नव्हते. त्यामुळे त्यांचं मला आजतागायत विशेष सुप्त कौतुक आहे.
Australian Birds नावाचे एक सुरेख photo magazine आमच्याकडे होते, त्यातल्या Splendid Fairy-wren चा फोटो कितीवेळा पुनःपुन्हा बघितला असेन कुणास ठाऊक. एका फांदीवर एकमेकांना अगदी खेटून अशी wren फॅमिली बसली आहे आणि त्यात मधोमध निळाजर्द रंग आणि छातीवर आडवा काळा पट्टा मिरवणारा एक wren, असा तो फोटो आत्ताही नजरेसमोर आहे.
अश्या अशक्य शॉकिंग इलेक्ट्रीक ब्ल्यू रंगाचा अख्खा पक्षी प्रत्यक्षात काय देखणा दिसत असणार, असे वाटायचे.
इथे घरामागच्या पार्कात चालत असताना नजरेसमोरुन अचानक निळ्याशार रंगाचा एक ठिपका वेगात उडताना दिसला आणि लवकरच Western Bluebird या पक्ष्याने दर्शन दिले. चमकदार निळे डोके, डिप ब्लू पिसे असणारे निळे पंख, पोटा-छातीवर पांढर्या आणि नारिंगी रंगाचा शिडकावा, असे देखणेपण वेस्टर्न ब्ल्यूबर्डला निसर्गाने बहाल केले आहे.
पक्षीजगतातल्या नियमानुसार हे देखणेपण मिस्टरांचे असते आणि सौ. ब्लूबर्ड राखाडी-करड्या जास्त आणि फक्त नावापुरती थोडी निळी छटा धारण करतात. पूर्वकिनार्यावरील याच्या बंधूला Eastern Bluebird म्हणतात.
निळाईकडे वाटचाल करणारा बाळ- ब्ल्यूबर्ड!
बर्डींगला बाहेर पडले आणि अगदी नेमके काहीही खास दिसत नाही (हे कैक वेळा घडतेच) असे असले तरी तुम्ही रिकाम्या हाती (पक्षी: रिकाम्या मेमरी कार्डासहीत) घरी जाण्याची वेळ येऊ नये, इतपत काळजी हे ब्लूबर्ड घेतात. 
छोट्या अळ्या, गांडुळे, किडे हे यांचे आवडते अन्न असल्याने कुठल्याही पार्कात हिरवळीवर बारीक नजर ठेवून असणारे हे ब्ल्यूबर्ड्ज अगदी सहजगत्या दिसतात. झाडांव्यतिरिक्त कुंपण, दिव्यांचे खांब, पार्कींगची छपरे अशा ठिकाणी हमखास पोज देतात.
मला सगळ्यात हे जास्त आवडतात यासाठी की, अवाजवी नाचरेपणा, चंचलपणा, पाव सेकंदही स्थिर न बसणे असले उद्योग हे करीत नाहीत. वर बसून बारकाईने हिरवळीचे निरीक्षण करीत असतात आणि खाद्य दिसले की मगच त्यावर झेपावतात. या प्रकारात तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ घ्यायला पुरेशी मिनिटे हे नक्की देतात. त्यामुळे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ आता पुष्कळ जमले आहेत. सकाळच्या कोवळ्या उन्हात मॉर्निंग ग्रूमिंग करत असलेल्या ब्ल्यूबर्डला शांतपणे निरखणे हा एक सुंदर अनुभव असतो.
घरामागच्या पार्कात जवळपास दररोज हे दिसत असतात पण माझ्या बर्ड बाथवर काही हे येत नाहीत. अगदी एकदाच सौ. किंवा पिल्लू ब्ल्यूबर्ड पाणी पिऊन गेले तेव्हा मी आनंदले की चला! आता हे येत राहतील, पण कसंच काय. परत कधीच ते आले नाहीत. बर्ड बाथ पसंत पडला नाही बहुतेक!
ब्लूबर्डनंतर निळ्या रंगाचा दुसरा कॉमन पक्षी म्हणजे स्क्रब जे. (California Scrub Jay). हा बर्यापैकी मोठा आहे, आणि चेहरामोहरा थेट कावळ्यासारखा. (कारण दोघे Corvidae या फॅमिलीतले आहेत!) चोचीचा आकारही तसाच. पांढरे-राखाडी पोट, निळे (अॅझूर ब्ल्यू) आणि राखाडी रंगाचे अंग आणि डोळ्यावर पांढरी भिवई - ती लक्षात राहण्यासारखी. लांब निळी शेपटी सावरत, बोजडपणे चालायला लागले की, भारद्वाजाच्या चालीची आठवण यावी.
बहुतेक वेळेस चोचीत एक मोठ्ठी बी पकडलेली तरी असते किंवा या बियांच्या शोधात कायम जमिनिवर फिरत असलेले दिसतात. हे पक्षी या खाद्याची साठवण करतात. पण आजच एका बर्डींग ग्रूपवर एकाने फोटो शेअर केले - त्यात स्क्रब जे ने चक्क एका हाऊसफिंचची शिकार केली होती!
मी जाते त्या ट्रेलच्या माहितीफलकावर स्क्रब जेचा फोटोच लावला आहे इतक्या विपुल प्रमाणात हे दिसतात. कावळ्याप्रमाणेच निसर्गाचा सफाईकामगार ही पदवी याला दिली आहे की नाही कल्पना नाही!
याव्यतिरिक्य पाहिलेला इथला तिसरा निळा पक्षी म्हणजे Stellar's Jay. हा मला बोटॅनिकल गार्डनमध्ये प्रथम दिसला होता. हा थोडा विनोदीच आहे. विधात्याने याला घडवताना दोन शक्यता झाल्या असाव्यात -
(१) निळ्या कुंचल्याने फॉर अ चेंज शेपटीपासून सुरुवात केली असणार, पण मधेच निळ्या रंगाची टंचाई उद्भवली, त्यामुळे नाईलाजाने उर्वरित अंग काळ्या रंगाने रंगवावे लागले.
(२) किंवा कावळ्याला घडवल्यानंतर लगेच याचा नंबर लागला पण अजाणतेपणी काळ्या रंगाचा ब्रशच फिरत राहिला आणि तुरा, डोके मान झाल्यावर अचानक लक्षात आले की अरेच्चा याला तर निळा रंग द्यायचा होता! कोई बात नही, अब देंगे. उसमे क्या!
पण jay वर्गातील माझ्या दृष्टीने सर्वात हॅन्डसम आहे तो Blue Jay! पण हा अमेरिकेच्या फक्त पूर्वेस दिसतो. आता लवकरच Californiaला बाय करुन मी पूर्वेकडे प्रयाण करणार असल्याने ब्लू जे साहेब दर्शन देतील अशी आशा आहे. बघूया! भारतात उत्तरेकडे दिसणारे grandalas हे अशक्य निळे पक्षी पाहणे हेही माझं एक स्वप्न आहे.
जाताजाता,
जवळच्या तळ्यावर अविरत चकरा मारणारी ट्री स्वॅलो (पाकोळी?) चक्क एकदा शांतपणे एका खांबावर बसलेली दिसली . मी थक्कच, कारण हा पक्षी आयुष्यात बसतो/थांबतो की नाही असे वाटावे इतक्या वेगवान चकरा यांच्या सतत चालू असतात की ते बघून आपणच दमावे.
स्वॅलो ही निळी असते हे त्यादिवशी ती शांत बसली, तेव्हा कळले!
हॅपी बर्डींग!
क्रमशः
या सिरीजमधील आधीचे लेखः
छंद पक्षीनिरीक्षणाचा - Window birding!
पक्षीनिरीक्षण - फिंच!
पक्षीनिरीक्षण - Hermit Thrush आणि अमेरिकन रॉबिन
पक्षीनिरीक्षण - Cedar Waxwing!
"पक्षीनिरिक्षण - Warbler अध्याय
"पक्षीनिरिक्षण - अमेरिकन वुडकॉक"
फोटो मस्त आलेत.
फोटो मस्त आलेत.
Wow मस्त..
Wow मस्त..
माहिती सुद्धा छान दिली आहे.
तो काळा निळा पडलेला पक्षी खरेच हटके आहे. मधूनच रंग बदलला आहे.
मस्त!
मस्त!
भारतात आढळणारा नीलपंखी इंडियन रोलर माझा आवडता पक्षी. उडताना त्याच्या नील पंखांचा जो आकाशी आणि गर्द नीळा रंग दिसतो, त्याला तोड नाही.
बाकी आमच्या बॅकयार्डात ठेवलेल्या बर्ड बाथवर कावळे सोडून फार कोणी पक्षी येत नाहीत. आणि कावळेकाका नुसती घाण आणून टाकतात त्या बर्डबाथमध्ये. एकदा तर एक छोटा साप आणून टाकलेला.
Btw, Cali तून कुठे मूह होतेयंस?
किती सुरेख! मस्तच.
किती सुरेख! मस्तच.
लिखाण आणि प्र चि दोन्ही आवडलं
लिखाण आणि प्र चि दोन्ही आवडलं.
विंदा करंदीकरांचा निळा पक्षी
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=http:/...
देखणे फोटो आहेत पक्ष्याचे
देखणे फोटो आहेत पक्ष्याचे
खरंच सुंदर रंग आहे
लेख ही छान
सुंदर फोटो आणि लिखाण.
सुंदर फोटो आणि लिखाण.
मला वाटतं वर्षा तो निळा
मला वाटतं वर्षा तो निळा तुरेवाला बुलबुल/ दुरंगी ब्लु जे हटके किंवा दुर्मिळ आहे. याहु ला संपर्क कर. न्युझ (सकारात्मक) होइल.
सुंदर!!
सुंदर!!
आमच्याकडे ब्लू जे अगदी भरपूर दिसतात. इतका सुंदर पक्षी, पण कॉल मात्र काहीसा कर्कश असतो.
सुंदर
सुंदर चित्र. खूप छान वर्णन केलं. वाह!
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
ऋन्मेष - काळा-निळा पडलेला
रायगड - न्यू जर्सी! हो हो इंडीयन रोलरही फार देखणा आहे. मला एकदाच दिसला होता. बापरे, साप! Alison Kondler (insta handle: birding-by-ear) हिला फॉलो करतेस का? तिच्या बर्ड बाथ संदर्भातले सल्ले/आयडीया चांगल्या असतात.
पक्षी यायला वेळ लावतात हेही तितकेच खरे.
अनन्तयात्री, निळा पक्षी कविता मस्त.
सामो - दुर्मिळ नाहीये गं स्टेलार जे. वेस्ट कोस्ट वर कॉमन आहे.
स्वातीने लिहिलेल्या कॉलवरुन लक्षात आलेय की वेस्टर्न ब्लूबर्डचा आवाज मी अक्षरशः एकदाही ऐकला नाहीये. बर्ड अॅपवरच ऐकावा लागेल.
इंडिगो बंटिंग हा अजून एक
इंडिगो बंटिंग हा अजून एक सुंदर निळा पक्षी आहे. या रविवारी मला दिसला - सध्या इथे स्प्रिंग मायग्रेशन सुरू आहे.
निळासावळा लेख फारच छान आहे.
निळासावळा लेख फारच छान आहे. पक्षी आवडले.
काय सुंदर फोटो आहेत. बेबी
काय सुंदर फोटो आहेत. बेबी ब्लू बर्ड आणि पाकोळी फार आवडली.
लिहिलंय सुद्धा छान.