पक्षीनिरिक्षण - Warbler अध्याय

Submitted by वर्षा on 3 January, 2026 - 19:07

पानगळीची, थंडीची चाहूल लागते तशी झाडांच्या पानांच्या बदलणार्‍या छटांची मी जितकी वाटत बघते त्यापेक्षा काकणभर जास्त वाट मी स्थलांतर करुन उडत येणार्‍या पाहुण्यांची बघते. Warblers हे त्यापैकीच एक. छोटेसे, अतिशय चंचल, आणि जरासे लाजरे. माझ्या बर्ड बाथवर पाच प्रकारचे Warblers येतात.

Wilson's warbler
Yellow warbler
Orange-crowned warbler
Yellow-rumped warbler
Townsend's warbler

एकेक पाहूया.

Orange-crowned warbler:

नावाप्रमाणेच याच्या डोक्यावर केशरी/नारंगी पिसे (क्राऊन) असतो. पण ही पिसे इतकी लपलेली असतात की याला बघितल्यावर, कशाबद्दल याला Orange-crowned म्हणायचं, आहे कुठे तो क्राऊन? असंच वाटतं. अर्थात, आता तो त्याच्या इतर वेळच्या आयुष्यात तो केशरी मुकुट मिरवत, flaunt करतही असेल कदाचित पण माझ्या बर्ड बाथवर आंघोळ करायला आला आणि ते सचैल स्नान झाल्यावर डोक्यावरील पिसे चिंब झाली की मग आतला केशरी ऐवज मध्येमध्ये दर्शन देतो!

याच्या पिवळसर रंगामुळे मला उगाचच सुरुवातीस हा Yellow warbler आहे असे वाटायचे पण पुढे खर्‍या Yellow warblerने दर्शन दिल्यावर गैरसमज दूर झाला. आता प्रत्येक वेळेस दिसला की केशरी मुकुट दिसतोय का हे आपसूकच आधी बघितले जाते. बाकी पाण्यात उतरण्याआधीचा त्याचा नाचरेपणाही प्रेक्षणीय असतो ते वेगळेच!

Yellow-rumped warbler:

Warbler सिझन चालू झाला, म्हणजेच सप्टेंबर-ऑक्टोबरच्या सुमारास दक्षिणेच्या दिशेने पक्ष्यांचे स्थलांतर चालू झाले की Yellow-rumped warblers पुष्कळ संख्येत आसपासच्या झाडांवर चुक चुक असा आवाज काढत, भुरकन इकडून तिकडे उडताना दिसू लागतात. अगदी ओझरते नजरेस पडले तरी पटकन ओळखू येतात त्याला कारण त्यांच्या अंगावरील विशिष्ट ठिकाणी असलेले पिवळेजर्द, बोल्ड ठिपके.

ठिपके म्हणण्याइतके छोटे नाहीत, खरंतर पिवळेजर्द भाग म्हणायला हवे. गळ्यावर, दोन्ही पंख चालू होतात तिथे पंखांखाली, डोक्यावर, पाठीवरुन उतरुन शेपटीकडे गेलं तर तिथे शेपटीच्या उगमापाशी हे पिवळे पॅचेस दिसतात. एरवी काळी-राखाडी, मधूनच निळी अशी पिसे ल्यालेला हा पक्षी बर्ड बाथमध्ये उतरला, पंख फडफडवत चिंब झाला, की हे पिवळेजर्द भाग इतके ठळक, उठून दिसतात की काय बोलावे! अगदी हायलाईट या शब्दाला चपखल न्याय द्यायला योग्य उदाहरण म्हणजे हे Yellow-rumped warblers! Bold & Beautiful! अगदी बघत रहावेसे वाटतात.

Townsend's warbler:

पोस्टर कलर्सच्या संचातला पिवळा आणि काळा रंग ब्रशवर घ्यायचा आणि चेहेर्‍यावर आलटून-पालटून दोन्ही रंगांच्या ब्राईट पट्ट्या ओढायच्या. झाला आमचा Townsend's warbler तयार! आता याचे असे नाव का आहे हे कळायला मार्ग नाही पण Warbler सिझनमध्ये याला पाहिले तेव्हा 'प्रथम तुज पाहता' अगदी मनात बॅकग्राउंडमध्ये चक्क वाजलेच.

प्रचंड ठळक अश्या काळ्या व पिवळ्या रंगाचा तोंडवळा, ऑलिव ग्रीन-काळा-पांढरा यांच्या रंगसंगतीत तयार झालेल्या पिसांच्या नक्षीत तयार झालेले इतके देखणेपण दारात येतेय म्हटल्यावर बर्ड बाथ प्रकरण सार्थकी लागले असे म्हणावेच लागले.

इतर warblers खासकरुन Yellow-rumped जितक्या संख्येत दिसतात तितका हा दिसत नाही, एखाद-दुसर्‍या जोड्याच दिसतात पण Warbler सिझनमध्ये बर्‍यापैकी नियमितपणे दिसतात हेही नसे थोडके!

Wilson's warbler आणि Yellow warbler:
बर्ड बाथवर Warbler कुळातील सर्वात कमी वेळा आलेले सदस्य म्हणजे हे दोघे - Wilson's warbler आणि Yellow warbler.
विल्सनसाहेबांना कुणीही प्रथम बघितलं तरी लक्षात रहायला तेव्हढे दर्शन पुरेसे ठरावे. पिटुकले पिवळे-ऑलिव ग्रीन शरीर आणि डोक्यावर काळीशार टोपी! काळेभोर, मण्यांसारखे डोळे.

पहिल्यांदा पाहिलं तेव्हा अर्थातच त्याचं नाव कुठे माहित होतं पण ती टोपी पाहून आपसूकच 'टोपीवाला' असं तोंडून बाहेर पडलं होतं आणि त्यामुळे त्यानंतर जेव्हाकेव्हा साहेब दिसले तेव्हा 'टोपीवाला येऊन गेला' अशीच वार्ता झाली. ही काळी चमकदार टोपी मिरवणारा हा warbler अधूनमधून दर्शन देतो तेव्हा छान वाटतं.

Yellow warbler मात्र सर्वात कमी वेळा दिसलेला आणि त्यामुळे फक्त एकदाच फोटो काढता आलेला warbler आहे. अर्थात एक-दोनदा का होईना, त्याने हजेरी लावल्यामुळे पक्ष्यांच्या यादीत त्याला समाविष्ट केले. का माहित नाही पण यंदा परत काही दिसलेला नाही.

Warblers ना मराठीत काय म्हणतात ते मला ठाऊक नाही, कुणाला माहिती असेल तर जरुर सांगा. पक्ष्यांची यादी करायला घेतल्यावर त्यात बर्‍यापैकी repeat होणार्‍या पक्ष्यांचा हा प्रकार आहे हे लक्षात आले आणि warblers बद्दल अधिक जिव्हाळा निर्माण झाला आणि आपल्याकडे पाच प्रकारचे warblers येतात याचा स्पेशल आनंद झाला!
Happy birding!

क्रमशः

या सिरीजमधील आधीचे लेखः
छंद पक्षीनिरीक्षणाचा - Window birding!
पक्षीनिरीक्षण - फिंच!
पक्षीनिरीक्षण - Hermit Thrush आणि अमेरिकन रॉबिन
पक्षीनिरीक्षण - Cedar Waxwing!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मराठीत यांना सातभाई म्हणतात. पण त्यांना वार्बलर्स म्हणतात. बॅबलर्स आणि वार्बलर्स एकच का ते कोणी तरी सांगा म्हणजे मलाही कळेल. Happy

हे नेहमीच झुंडीत फिरतात. कर्कश आवाजात गप्पा मारत हे पक्षी झाडाण्वरुन जमिनीवर आणि जमिनीवरुन परत झाडांवर असे स्थानबदल करत राहतात. म्हणुन बॅबलर का वार्बलर म्हणतात का??

इथे मातकट रंगाचे दिसतात. अजुनही प्रकार असतील पण मला कसले कळतेय त्यात काय. जे ठळक दिसतात तेवढे कळतात

तिकडचे अगदी देखणे दिसताहेत. फोटो सुंदर आलेत. यलो वाला इकडे सुभग म्हणजे आयोरा म्हणुन सहज खपुन जाईल.

ओह सातभाई माहिती आहेत. मला वटवट्या असू शकेल असा रेफ दिसला (Blyth's Reed Warbler = ब्लीथचा बोरु वटवट्या) पण ह्या warblersना वटवट करताना अजिबात पाहिले नाहीये त्यामुळे वटवट्या म्हणवत नाही Happy

मस्त फोटो आहेत. माझ्या कवितांच्या पुस्तकात वार्बलर वर कविता शोधली पण नाही सापडली.
यलो वार्बलरला 'बटरबट' (Butterbutt) म्हणतात म्हणे. म्हणजे आपल्या लालबुड्या बुलबुल. तसा शब्द आहे Happy
>>>>>डोक्यावरील पिसे चिंब झाली की मग आतला केशरी ऐवज मध्येमध्ये दर्शन देतो!
हाहाहा
काय सुंदर छंद जोपासलेत तू.

छान फोटो आहेत.
>>Warblers ना मराठीत काय म्हणतात >>
मारुती चितमपल्ली यांनी पक्षीकोशासाठी नावे गोळा करायचा प्रयत्न केला होता. शिवाय Latin scientific unique names प्रमाणे पक्ष्यांना नावे असावीत हा हेतू होता. डॉ सलीम अलींना त्यांनी विचारले तेव्हा ते म्हणाले की तसे करू शकतो. संस्कृत शब्दांचा वापर करून नावे करता येतील पण प्रमाणीकरण करावे लागते. मग पनवेल येथे येऊन चितमपल्ली संस्कृत शिकले. (सरकार किंवा पक्षी पाहणाऱ्या संस्थांनी एक होऊन ते काम करणे आवश्यक आहे.)
...
चिप चिप, टिक टिक , चिक चिक किंवा असेच काही आवाज काढत छोट्या झुडपांतून किटक शोधत फिरणाऱ्या warblers ना फुटकीम्हणतात. हे साधारणपणे चिमणीएवढे पक्षी असतात.
चिमणी पेक्षा मोठे, चार पाच किंवा अधिक गटाने वावरणारे आणि सतत काही आवाज करणाऱ्या पक्ष्यांना babblersना वटवट्या हे नाव असते. कधीकधी काही विशेष नावेही असतात. उदाहरणार्थ सातभाई, कोळणी, केकाटे ( common jungle babbler) वगैरे.

धन्यवाद साधना, धनश्री, अस्मिता
एसआरडी, मस्त माहिती!
>>चिप चिप, टिक टिक , चिक चिक किंवा असेच काही आवाज काढत छोट्या झुडपांतून किटक शोधत फिरणाऱ्या warblers ना फुटकीम्हणतात. हे साधारणपणे चिमणीएवढे पक्षी असतात.

हो हे वर्णन जुळतेय इथल्या वार्बलर्सशी. Yellow-rumped चुक चुक चक चक आवाज करीत असतात.