पक्षीनिरीक्षण - Hermit Thrush आणि अमेरिकन रॉबिन

Submitted by वर्षा on 21 October, 2025 - 22:44

Hermit Thrush

हा पक्षी माझा अजून एक लाडका पक्षी. Hermit Thrush. स्केचिंगसाठी हा योग्य होताच पण तरीही याच्याबद्दल आधी लिहावे आणि मग स्केच काढावे असे ठरवले होते. पण उलट झाले आणि माझे स्केच आधी काढून झाले आणि आत्ता त्याच्याबद्दल लिहायला घेतलेय. त्यामुळे या लेखात त्याचे स्केच आणि फोटो दोन्ही असतील.

गंमत म्हणजे मागील वर्षी काढलेल्या एका फोटो रेफरन्सवरुन स्केच करायला घेतले आणि मी मनात म्हणतच होते की ऑक्टोबर आलाय, तर आता हा दिसायला हवा. गंमत म्हणजे स्केच पूर्ण झाल्याच्या दिवशीच सिझनच्या पहिल्या हर्मिट थ्रशने मला दर्शन दिले! योगायोगच.

रंगीबेरंगी नसला तरी चॉकलेटी-विटकरी रंगाची चमकदार पिसे असलेली पाठ आणि गळ्यापासून पांढर्‍या रंगावर गडद चॉकलेटी रंगाच्या ठिपक्यांच्या नक्षीची सुरुवात होऊन ती छाती-पोटावर उतरेपर्यंत फिकट होत जाते ते फार मनोहर दिसतं. काळ्या मण्यांच्या डोळ्यांनी अंदाज घेत घेत पाण्यात डुंबायला याला फारच आवडतं.

शेपटी वर उडवत टुणटुण उड्या मारणे याची सिग्नेचर अ‍ॅक्शन आहे. त्या स्थितीतले त्याचे चोचीपासून शेपटीच्या टोकापर्यंत बाक आलेले शरीर इंग्रजी U अक्षरासारखे दिसते.

Thrush म्हणजे मराठीत कस्तूर. हा अगदी हिवाळ्याची, सुखद थंडीची चाहूल लागते तसा येऊ लागतो ते पार जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत येत राहतो.

अमेरिकन रॉबिन
पक्ष्यांसाठी पाणी ठेवायचा निर्णय घेतल्यानंतर मी एक साधारण दहा इंच व्यासाची थाळी आणली आणि त्यात काठोकाठ पाणी भरुन ठेवू लागले. फिंच, जुन्को चिमण्या वगैरे येऊ लागल्या होत्या. एक दिवस अचानक गॅलरीतून 'टोक टोक' असा आवाज येऊ लागला. बघितलं तर केशरी पोटाचा एक मोठा, ढब्बू पक्षी पाण्यात उतरुन, मान खाली करुन, पाण्यात चोच मारुन, पंख फडफडवून पाणी उडवायचा प्रयत्न करत होता. पाण्यात त्याचे पाय जेमतेम बुडत होते. पाण्याचा हा स्विमिंग पूल त्याला फारच छोटा पडत होता ते सरळच दिसत होतं. तर या थाळीसमवेत, आणखी मोठ्या व्यासाची थाळी आणायला कारणीभूत ठरला तो हाच पक्षी - अमेरिकन रॉबिन.

आता रॉबीनसाठी स्पेशल मोठी थाळी आणल्यावर न्यूटनसारखे होण्याची फारच शक्यता होती. म्हणजे, मोठ्या मांजराला यायला जायला मोठी खिडकी आणि छोट्या पिलासाठी छोटी खिडकी असे जरी केले तरी मांजरांनी ते समजून उमजून योग्य तीच खिडकी वापरण्याची शक्यता किती? त्यामुळे, मोठी थाळी - त्यात जास्त पाणी, थाळी जास्त खोल, असे जरी असले तरी रॉबिन्सना ते कळणार होते का?
पण सुदैवाने कळलं काहींना. Proud खाली फोटोत दिसतेय ती मोठ्या व्यासाची थाळी आहे. यातच मी वॉटर फाऊंटनही ठेवते. बहुतेक रॉबीन्स अंघोळीसाठी तरी यातच उतरतात.

हा माझ्याकडे येणारा एक बर्‍यापैकी मोठा आणि बोजड पक्षी आहे. हा काही ठराविक महिन्यातच येतो. आजूबाजूंच्या पार्कातही हिरवळीवर गांडुळे किंवा इतर किडेमकोडे शोधत फिरताना अनेकदा दिसतो. साधारण स्प्रिंग (एप्रिल पासून पुढे) ते समर (जुलैपर्यंत). नंतर गायबच होतो. तेव्हा कळलं की हा स्थलांतर करणारा पक्षी असल्याने हिवाळा येऊ लागला की दक्षिणेकडे स्थलांतर करतो.

याच्या डोळ्यात मला नेहमी काहीश्या अविश्वासाचे, संशयाचे भाव दिसतात. खरं म्हणजे पाण्याचा एकदा सुगावा लागल्यानंतर बरेच पक्षी नियमितपणे येताना दिसतात, निदान काही दिवस, महिने तरी. रॉबिन्सही न चुकता रोज येतातच, पण 'येऊ की नको', 'नुसतं पाणीच प्यावं की थोडं डुंबावं पण?" असले विचार करत असल्यासारखे दबकत येतात सुरुवातीस. नंतर मग जरा कॉन्फिडन्स आला की टुणटूण करीत पाण्याशी येतात.

यांचा केशरी रंग म्हणजे अगदी लाल भोपळ्याच्या फोडी असतात ना, थेट तीच शेड वाटते मला. गोल मण्यांसारख्या डोळ्यांभोवती पांढरे आयलायनर लावल्यासारखे दिसते. पिवळी चोच. छाती-पोटावर खवल्यांसारखी पिसे असतात, त्याचा पॅटर्न सुरेख दिसतो.

फोटोंपेक्षा त्यांच्या व्हिडिओ क्लीपाच (शॉर्ट्स) मी जास्त काढल्यात.
रॉबीनची टुणटुण चालआणि रॉबिनची आंघोळ पहा. Happy

क्रमशः
या सिरीजमधील आधीचे लेखः
छंद पक्षीनिरीक्षणाचा - Window birding!
पक्षीनिरीक्षण - फिंच!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगले रेखाटन आहे.
थाळीचा तळ पारदर्शक आहे त्यामुळे ती किती खोल आहे पक्ष्यांना अंदाज येत नाही. बारीक खडे तळाला पसरून पाहा काय होते. काही पक्षी खोल पाण्यात उतरत नाहीत.

आम्ही एक छोटा ट्रे (दहाx आठ xदीड इंच) ठेवला आहे. त्यात बुलबुलची एक जोडी आंघोळीला आणि पाणी प्यायला येते.

हो हो मी त्या मोठ्या थाळ्यात मोठे दगड (गोटे) ठेवले आहेत. एक काठीही ठेवली आहे. हे चांगले वर्क झाले आहे.

>>आम्ही एक छोटा ट्रे (दहाx आठ xदीड इंच) ठेवला आहे. त्यात बुलबुलची एक जोडी आंघोळीला आणि पाणी प्यायला येते.
मस्त!

धन्यवाद!

वा फारच छान. सुंदर चित्रे आणि स्केटचेस . Warblers त्तर special, माझे आवडते पक्षी . मला वाटतं, तुम्ही जर दिवसा आणि रात्री Merlin App चालु करून ठेवलं तर सगळे येणारे जाणारे पाहुणे पक्षी document होतील .

धन्यवाद SPNAIK, तुम्हालाही पक्ष्यांची आवड दिसते?
Merlin App चालु करून ठेवलं म्हणजे? नक्की कळले नाही काय/कसे ते

वर्षा, पक्षी ओळखण्यासाठी आणि त्यांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी Merlin अ‍ॅपचा वापर केला जातो हे तुला माहीतच असेल. मी म्हणत होतो कि, बाल्कनीच्या दाराशी फोन ठेवला तर, पक्षांच्या आवाजावरून त्यांचे दस्तऐवजीकरण, ओळख आणि यादी मर्लिनद्वारे केली जाईल, especially, रात्रीचे/तुम्ही घरी नसताना येणारे पक्षी document होतील . मर्लिन हे app Ornithology department , Cornell University ने विकासीत केलेलं आहे. e-bird ही पण पक्षीमित्रांसाठी चांगली site आहे. तुम्ही फार lucky आहात की तुमच्या अंगणात Warblers सारखे भरपूर पक्षी येतात.

@SPNAIK
तुम्हाला स्पेशल थँक्स!!! __/\__
मर्लिन अ‍ॅप अप्रतिम काम करतंय माझ्यासाठी. काही मिनिटांमध्येच त्याने माझ्या आजूबाजूचे १४-१५ पक्षी दाखवले. त्यातले ३-४ बर्ड बाथवर कधीही येत नाहीत पण आजूबाजूंच्या झाडांवर असतात ते कळलं!
एक विशिष्ट शीळ जी मला अजिबात ओळखता येत नव्हती ती वॅक्सविंगचीच असल्याचं कळलं अ‍ॅपमुळे!

बाकीच्यांसाठी-
मर्लिन अ‍ॅपमध्ये साउंड ऑप्शन आहे तो ऑन करुन पक्ष्यांचे आवाज येतात त्या ठिकाणी फोन ठेवून द्या. अगदी काही मिनिटांतच आजूबाजूच्या वातावरणातले पक्ष्यांचे आवाज बरोब्बर grasp करुन अ‍ॅप तुम्हाला त्या पक्ष्यांची नावा-फोटोंसकट लिस्ट देईल! अगदी ती शीळ घातली जात असताना लिस्टमधले ते नाव अ‍ॅक्टीवेट होत असलेलेही दिसते. केवळ अमेझिंग. नक्की ट्राय करुन पहा! आता मला वेगवेगळ्या वेळी आणि स्थळी हे अ‍ॅप वापरुन पहायचा छंदच जडणार आहे..

मर्लिन कधी मधी गंडतो आणि चुकीच्या पक्षाचे नाव देतो. माझ्या इथे बाल्टिमोर ओरिओल चे घरटे होते आणि त्यात दोन पिल्ले होती. पिल्लांच्या आवाजाला मर्लिन वार्बलर म्हणून ओळखत होता.

>>>
आता मला वेगवेगळ्या वेळी आणि स्थळी हे अ‍ॅप वापरुन पहायचा छंदच जडणार आहे..
>>>
वेलकम टू द क्लब. आता तुम्हाला संध्याकाळी फिरताना वगैरे मर्लिन अ‍ॅप ऑन करून पक्षी शोधत चालणारी माणसे ऑळखता येतील

>>मर्लिन कधी मधी गंडतो आणि चुकीच्या पक्षाचे नाव देतो.

ह्म्म शक्य आहे. आतापर्यंत माझ्या लिस्टीतले पक्षी मी आधीच आयडेंटीफाय करुन ठेवले असल्याने त्यावर शिक्कामोर्तब झालं आणि पर्फेक्ट नाव कळले. उदा. मी नुसतेच चिकाडी म्हणायचे ती चेस्टनट बॅक्ड चिकाडी आहे, किंवा गोल्डफिंचमधे लेसर गोल्डफिंच म्हणून पण आहेत ते कळलं.
पण हो चुकू शकते अ‍ॅप. अ‍ॅप मला एक हाऊस स्पॅरो दाखवित होते, अगदी भारतात असते तशी चिमणी, ती मला आजपर्यंत इथे दिसली नाहीय.
पण ओवरॉल अ‍ॅप मस्त आहे!

>>>>अगदी भारतात असते तशी चिमणी, ती मला आजपर्यंत इथे दिसली नाहीय.
इथे हजारो चिमण्या आहेत. अगदी त्श्श्या भारतातल्या सारख्या.

@वर्षा,
मला आनंद आहे की MERLIN तुमच्यासाठी काम करत आहे. इतर कोणत्याही ॲपप्रमाणे यात वेळोवेळी glitches येतात परंतु बऱ्याच birders साठी हे उपयुक्त साधन आहे.
तुमच्या अंगणात अनेक पक्षी येतात कारण तुम्ही त्यांना पाणी आणि दाणे देता, जे महत्त्वाचे आहे....

मर्लिन बरोबर एक इबर्ड नावाचे अ‍ॅप आहे. दोन्ही अ‍ॅप कॉर्नेल लॅबोरेटरीने डेव्हलप केलेली आहेत.
इ बर्ड मध्ये तुम्हाला दिसलेल्या पक्षांची नोंद केलीत तर ती माहिती एकूण पक्षांची संख्या, मायग्रेशन पॅटर्न वगैरेसाठी वापरली जाते.

हो इ-बर्डपण केलंय मी डाऊनलोड....
>>इ बर्ड मध्ये तुम्हाला दिसलेल्या पक्षांची नोंद केलीत तर ती माहिती एकूण पक्षांची संख्या, मायग्रेशन पॅटर्न वगैरेसाठी वापरली जाते.
अरे वा, हे माहित नव्हते. धन्यवाद

@SPNAIK, पाणी ठेवते फक्त... Happy

मस्त चित्र आणि फोटो आणि वर्णनही.
मर्लिन अ‍ॅप मी पण डालो करेन आणि बघेन कोणते पक्षी आहेत अजूबाजूला.

इकडची पक्षांची चर्चा, मरलीन ॲप याविषयी वाचून खूप उत्सुकता तयार झाली.
आमच्याकडे सकाळी किंवा दुपारी संध्याकाळी पक्षांचे खूप आवाज आणि किलबिलर येतो छान ऐकायला पण पक्षी लपून असतात झाडांमध्ये.

म्हणून आज सकाळी ते मॉर्निंग खिडकीजवळ चहा करताना ठेवून दिलं

आणि ५ - १० मिनिटांत हे सगळे पक्षी त्याला सापडले.

बरेचसे येता जाता दृष्टीस पडले होते.

Screenshot_20251101-075205.png

वर्षा, तू मागे निळ्या पक्षाविषयी बोलली होतीस.
इकडे दिसतो तो 'कॅलिफोर्निया स्क्रब ब्लू जे' - वर चित्रात दिसतोय त्यापेक्षा थोडा गडद ग्रे/ करडा रंग असतो.

सायो नक्की पहा.
छंदीफंदी, मस्तच की! स्क्रब जे - हो बरोबर तोही एक निळा पक्षी आहे. बर्‍याचदा पाहिलाय कम्युनिटी पार्क्समध्ये.
मॉकिंगबर्ड किती वेगवेगळे आवाज काढतो! मी पूर्वी एकदा त्याची क्लीप रेकॉर्ड केली होती, १३ वेगवेगळे आवाज काढले होते त्याने.

कांदेपोहे (केपी) हा प्राचीन माबोकर उत्तम पक्षीनिरिक्षक आणि फोटोग्राफर आहे. त्याच्या फेसबूक वर खूप फोटो तो टाकतो.

हा मला दिसलेला स्क्रब जे ग्रॅन्ड कॅनियन मध्ये

6493d3fe-5279-4ac3-a3ac-f57f27b91440.jpeg

आणि हा आमच्या इथला ब्लु जे. लेट्स गो ब्लु जे, लेट्स गो

bluejay.jpg

छान!
झाडांचे रंग किती छान ब्राईट आहेत.

छानच आहेत पक्षी.
भारतात वेगवेगळ्या भागातील पक्षी यासाठी मी wildlifewithmanishkadam चानेल पाहतो.
कोकणातील तटवर्ती पक्षी,
उत्तराखंडातील पक्षी,
आंबोलीतील रात्रीचे प्राणी,
माथेरानमधले रात्रीचे प्राणी
आणि इतर बरेच विडिओ चांगले आहेत. विशेष म्हणजे माहिती देतात ती आवडते.

@टवणे सर, किती सुंदर फोटो आहेत! तुम्हीपण बर्ड फोटोग्राफी करता का? असतील तर अजून फोटो बघायला आवडतील.
हो हो केपी भारीच फोटोग्राफर आहे.
एसआरडी, धन्यवाद. wildlifewithmanishkadam हे चॅनेल बघते आता.

छंदीफंदींच्या यादीत असलेला डार्क आइड जुन्को हा पठ्ठ्या हिवाळा आला की टोरोंटो मध्ये येतो आर्क्टिक सर्कल मधून आअणि हिवाळा इथल्या ‘गरम’ हवेत घालवतो Proud सध्या माझ्या बर्ड फीडरवर हे शेकड्याने आले आहेत.

वर्षा, तुझी स्केचेस तर आवडतातच आधीपासूनच. सांबारवडी/सांबारवाडी नावाचं एक इन्स्टा हॅंडल आहे ते बघ. ती ही पक्षांची भारी स्केचेस काढते.

पक्षांबद्दल बोलतोय तर https://www.maayboli.com/node/86386 इथेही एक नजर टाका.

वर्षा, काय सुरेख लिहीतेस गं. निरीक्षणं आणि वर्णनं एकदम चपखल असतात. सहज, ओघवतं लिखाण आहे तुझं. फोटो तर छानच पण स्केच अफलातून आहे. मस्त सिरीज सुरू केली आहेस.

Pages