सावल्यांच्या जाळ्यात - भाग १
सावल्यांच्या जाळ्यात - भाग २
सावल्यांच्या जाळ्यात - भाग 3
सावल्यांच्या जाळ्यात - भाग ४
सावल्यांच्या जाळ्यात - भाग ५
पूर्वभाग
आर्यन मेहताने रिया मोईत्रा बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर इन्स्पेक्टर देशमुख तपास सुरू करतात. तपासात रियाचा शेवटचा संपर्क तिच्या आई इरा मोईत्राशी झाल्याचे उघड होते. सीसीटीव्ही आणि कॉल रेकॉर्ड्समधून रिया इराच्या कारमध्ये बसल्याचे स्पष्ट होताच संशय गडद होतो; पेनजवळील जंगलात जळालेल्या ठिकाणी मानवी अवशेष आणि रियाचे लॉकेट सापडताच प्रकरण साध्या बेपत्ता प्रकरणावरून गंभीर गुन्ह्याकडे वळते. इराच्या कॉल रेकॉर्डमधून एक अनोळखी नंबर समोर येतो; चेंबूरमध्ये तपासादरम्यान संशयित पळून जातो, मात्र त्याचा फोन पोलिसांच्या हाती लागतो आणि तपासाला पहिला ठोस बाह्य दुवा मिळतो. यानंतर देशमुख इराची कडक चौकशी सुरू करतात. चौकशीदरम्यान रिया आणि इरात त्या रात्री कारमध्ये तीव्र वाद झाल्याचे उघड होते; रिया तिच्या भूतकाळाबद्दल चौकशी करत होती आणि सत्य जाणून घेण्याचा हट्ट धरून बसली होती.
*************************************************************************************************************************
भाग ६ — फोनचा उलगडा
“रिया तुमच्या भूतकाळात नेमकं काय शोधत होती, मॅडम?” देशमुखांचा आवाज एखाद्या थंड सुरीसारखा खोलीत फिरला.
इरा मोईत्रा समोर बसली होती—पण आता तिच्या चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास कुठेतरी सैल पडला होता. तिच्या श्वासाची लय आता समसमान राहिली नव्हती. तिची बोटं अजूनही टेबलावर होती, पण त्यांची पकड ढिली झाली होती.
देशमुख शांतपणे तिच्याकडे पाहत होते. अखेर इराने हालचाल केली.
“…ती जरा जास्तच खोलात शिरत होती,” ती अत्यंत क्षीण आवाजात पुटपुटली.
देशमुखांनी आपली मान किंचित तिरकी केली. “कशात?”
इरा काही क्षण गप्प राहिली. मग म्हणाली— “माझ्या जुन्या आयुष्यात.”
देशमुखांनी फाईल उघडली. काही कागद चाळल्यासारखं केलं—जरी त्यांना हवं ते आधीच ठाऊक होतं.
“रिया अचानक तुमच्या भूतकाळात का रस घेऊ लागली?”
इरा आपले ओठ चावत गप्प राहिली. शेवटी म्हणाली, “मुलं असतात तशी… उत्सुक.”
देशमुखांनी तिच्याकडे सरळ पाहिलं. “नाही मॅडम. ही साधी उत्सुकता नव्हती. ती काहीतरी विशेष शोधत होती.”
देशमुखांनी टेबलावरून एक नवीन प्रिंटआउट पुढे सरकवलं. ई-मेल ट्रेल. रियाने एका जुन्या शाळेच्या ॲडमिनला पाठवलेला मेल: ‘मला इरा मोईत्रा यांच्या पूर्वीच्या रेकॉर्ड्सबद्दल माहिती हवी आहे.’
इऱाची नजर त्या ओळीवर खिळली.
या वेळी तिने लगेच वर पाहिलं नाही.
देशमुखांनी हलक्या आवाजात विचारलं— “मॅडम… रिया नक्की काय शोधत होती?”
काही सेकंद शांततेत गेले. मग—इऱाचा आवाज पहिल्यांदाच स्पष्टपणे मंद झाला.
“…तिला गैरसमज झाला होता. तिला वाटत होतं की मी तिच्यापासून काहीतरी लपवलं आहे.”
देशमुखांनी डोळे निमिषभर मिटले. शिकार जाळ्यात अडकत होती.
“लपवलं होतं का?”
खोलीत आता श्वास रोखणारी स्तब्धता होती. इराच्या नजरेत उघड अस्वस्थता दिसू लागली. तिने थरथरत्या हाताने पाण्याचा ग्लास उचलला. पाण्याचा घोट घेताना काचेचा टेबलावर झालेला हलका आवाजही देशमुखांनी टिपला.
“मॅडम…” ते म्हणाले, “रिया तुमच्यावर रागावलेली होती. तिचा तुमच्यावर विश्वास उरला नव्हता... आणि म्हणूनच ती तुम्हाला त्या रात्री भेटायला आली, बरोबर?”
इराचा श्वास आता स्पष्टपणे खोल झाला होता. तिने पहिल्यांदाच थेट देशमुखांच्या नजरेला नजर दिली. त्या नजरेत थकवा आणि एक अनामिक भीती होती.
“त्या रात्री कारमध्ये काय झालं, मॅडम?”
इरा काही क्षण स्तब्ध बसली. मग तिच्या खांद्यांचा ताण हळूहळू सैल पडला. पहिल्यांदाच ती हताश वाटत होती. “…आमच्यात वाद झाला,” ती पुटपुटली.
देशमुखांच्या नजरेत विजेची चमक “कशावरून?”
इरा डोळे मिटून बसली. ओठांवर शब्द अडकले होते, पण अखेर ते बाहेर पडलेच— “…ती हट्ट धरून बसली होती. सत्य जाणून घेण्याचा हट्ट.”
देशमुखांना माहीत होतं—कबुलीजबाब आता फार दूर नाही.
३० एप्रिल. सकाळ.
मुंबईच्या उन्हाची दाहकता वाढू लागली होती. खार पोलीस ठाण्याच्या सायबर फॉरेन्सिक लॅबमध्ये मात्र वेगळंच वातावरण होतं—थंड, निळसर.
देशमुख काचेतून आत पाहत उभे होते. टेबलावर तोच स्वस्त स्मार्टफोन होता— रमेशचा फोन.
“सर, डेटा रिकव्हरी जवळपास पूर्ण झालीये,” सायबर तज्ज्ञ सावंत म्हणाला.
देशमुखांनी संमतीदर्शक मान हलवली. खरा खेळ आता इथून सुरू होणार होता.
डिजिटल पोस्टमॉर्टेम
सावंत स्क्रीनवर फोल्डर्स उघडत होता.
“सर, फोन लॉक नव्हता पण बराच डेटा मुद्दाम डिलीट केला गेलाय, आम्ही रिकव्हरी चालू केली आहे.”
“मला जे उरलंय ते नको… जे पुसलं गेलंय ते पाहिजे.”— देशमुख म्हणाले.
सावंत हलकंसं हसला. “समजलं, सर.”
स्क्रीनवर कॉल लॉग मोठा करून दिसू लागला.
सावंत म्हणाला—“सर, या फोनवरून गेल्या तीन दिवसांत जास्त कॉल नाहीत. पण—” तो थांबला.
“पण…?” देशमुख.
सावंतने स्क्रीन फिरवली. “२४ एप्रिलच्या रात्री… सलग तीन कॉल.”
कदम पुढे झुकला. स्क्रीनवर नंबर दिसत होता. नाव सेव्ह नव्हतं. पण देशमुखांना तो नंबर पाठ झाला होता.
इरा मोईत्रा.
“लोकेशन?”
सावंतने दुसरी विंडो उघडली. मॅपवर लाल ठिपका चमकला.
“सर… कॉलच्या वेळी हा फोन चेंबूरमध्ये आहे. पण रात्री १०:३८ ला फोन पेन हायवे बेल्टमध्ये मूव्ह झालेला दिसतोय.”
देशमुखांनी टेबलावर बोटाने हलका ठोका दिला. एक... दोन... तीन. साखळी वेगाने जुळत होती.
इरा — कॉल | रमेश — फोन | लोकेशन — पेन.
“कदम… आपल्याला मदतीचा हात सापडलाय. रमेश शेट्टीचा पूर्ण बॅकग्राऊंड काढा,” देशमुखांनी आदेश दिला.
कदमने मान हलवली.
“सर… ड्रायव्हर?”
देशमुखांच्या ओठांवर हलकी रेष उमटली.
“बहुधा.”
दुसरा धक्का, सावंत पुन्हा बोलला. “सर, अजून एक गोष्ट आहे.”
देशमुखांनी वर पाहिलं. सावंतने गॅलरी फोल्डर उघडला.
“डिलीट केलेले मीडिया फायली रिकव्हर होतायत… आणि त्यात एक मेटाडेटा मिळालं.”
स्क्रीनवर फोटो थंबनेल दिसला—अर्धवट खराब.
“ओपन करा.” देशमुख उतावळेपणाने म्हणाले.
फोटो उघडला. चित्र स्पष्ट नव्हतं. रात्रीचं. हेडलाइटचा प्रकाश.
आणि…
एका सिल्वर कारची धूसर आकृती.
सावंत पुढे म्हणाला—“सर, टाइमस्टॅम्प—२४ एप्रिल, रात्री १०:४२.”
देशमुखांची आता खात्री पटली होती. रमेश त्या रात्री तिथे होता.
देशमुख सरळ उभे राहिले.
“कदम.”
“यस सर.”
“रमेश शेट्टीचा पूर्ण बॅकग्राऊंड काढा. जुने पगार रेकॉर्ड, पत्ता, नातेवाईक—सगळं.”
कदम वळला.
देशमुख दाराकडे निघाले. मग थांबले आणि मागे न वळता धारदार आवाजात म्हणाले— “कदम, यावेळी तो निसटायला नको.”
इंटरोगेशन रूम (रिकामी)
खोलीत तोच पांढरा दिवा पेटलेला होता. टेबल आणि दोन रिकाम्या खुर्च्या. देशमुख दारात उभे राहून त्या रिकाम्या खोलीकडे पाहत होते. त्यांच्या ओठांवर एक विजयाचं हसू उमटलं.
ते हळूच पुटपुटले— “आता बाजी पलटतेय…”
३० एप्रिल. दुपार सरत होती.
खार पोलीस ठाण्याच्या तपास कक्षातली हवा आता जड झाली होती. खिडकीतून येणारं तिरपं ऊन टेबलाच्या कडेवर येऊन थांबलं होतं. संगणकांच्या स्क्रीनवर डेटा वेगाने स्क्रोल होत होता—नंबर, लोकेशन्स आणि वेळेचे गणित मांडले जात होते.
देशमुख आपल्या खुर्चीत मागे टेकून बसले होते. डोळे मिटलेले, पण डोक्यात चक्रं वेगाने फिरत होती. समोर सावंतने पाठवलेला प्राथमिक डिजिटल अहवाल उघडा होता.
कदम घाईत आत आला, त्याच्या हातात एक फाईल होती.
“सर… बॅकग्राऊंड मिळालं.”
देशमुखांनी सवयीने आपली तीक्ष्ण नजर वर केली. “बोल.”
कदमने फाईल टेबलावर सरकवली. “नाव — रमेश शेट्टी. वय बेचाळीस. तब्बल आठ वर्षं तो इरा मोईत्राकडे खासगी ड्रायव्हर होता. दोन वर्षांपूर्वी त्याने अचानक नोकरी सोडली.”
“अचानक?”
“हो सर. अधिकृत कारण ‘गावाला जातो’ असं दिलंय, पण त्याचा ठावठिकाणा अजूनही मुंबईतच आहे.”
देशमुख खुर्चीतून किंचित पुढे सरकले, जणू सावज जवळ आल्याचा भास त्यांना झाला होता. “इराशी काही संपर्क?”
कदमने फाईलचा पुढचा कागद उघडला. “वरवर पाहता नाही… पण फोन रेकॉर्ड्स एक वेगळीच, कथा सांगतायत.”
देशमुखांनी टेबलावर बोटाने एक तालबद्ध ठोका दिला. “कदम, टाइमलाइन पुन्हा वाच.”
कदमने तातडीने माहिती दिली— “२४ एप्रिलची ती रात्र. इराचे सलग तीन कॉल रमेशला जातात. त्यानंतर रमेशचा फोन चेंबूरमधून हलतो… आणि रात्री १०:४८ ला थेट 'पेन'च्या त्या निर्जन पट्ट्यात सक्रिय होतो.”
देशमुख हळूच पुटपुटले, “म्हणजे तो तिथे पोहोचला होता.”
ते काही क्षण विचारात गढले. मग त्यांचा आवाज अधीर झाला.
“लोकेशन काय आहे?”
“चेंबूर, टिळक नगरमागची दाटीवाटीची वस्ती. शेवटचा सिग्नल तिथलाच आहे.”
देशमुख ताडकन उभे राहिले. “टीम तयार करा. यावेळी हा माणूस आपल्या हातांतून निसटता कामा नये!”
सायंकाळ — टिळक नगरचा औद्योगिक पट्टा
सूर्य मावळतीला लागला होता, पण एप्रिलचा उकाडा अजूनही अंगाला चिकटून होता. अरुंद गल्ल्या, दुतर्फा असलेल्या जुन्या इमारती, खिडक्यांतून वाळत टाकलेले कपडे आणि हवेत मसाल्याचा, उग्र धुराचा संमिश्र वास दरवळत होता. पोलिसांची साधी, अनमार्क्ड गाडी हळूच त्या गल्लीत शिरली.
देशमुख पुढच्या सीटवरून डोळ्यांत तेल घालून परिसर न्याहाळत होते. “कदम, घर क्रमांक?”
“समोरची ती तिसरी चाळ, सर. वरचा मजला.”
गाडी थांबली. देशमुखांनी दरवाजा उघडला आणि पाय जमिनीवर ठेवले. “चल.”
चाळ — तो जुनाट जिना
जिना इतका अरुंद होता की दोघांनाही सावरून चालावं लागत होतं. वरून एखाद्या जुन्या पंख्याचा थकलेला 'किरकिर' आवाज खाली येत होता. भिंतींवर ओलसर डाग आणि काळवंडलेले कोपरे होते. देशमुख सावधपणे वर चढत होते—प्रत्येक पाऊल मोजून, कोणताही आवाज न करता. कदम त्यांच्या सावलीसारखा मागे होता.
तिसऱ्या मजल्यावर पोहोचताच ते एका दारासमोर थांबले. दार अर्धवट उघडं होतं. देशमुखांनी कदमकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच इशारा केला— 'तयार राहा.'
देशमुखांनी दार अलगद आत ढकललं.
आत एक छोटीशी, कोंदट खोली होती. एक मोडकं टेबल, कोपऱ्यात जुना टीव्ही आणि मधोमध तो बसला होता— रमेश.
तो खुर्चीत बसून कसल्यातरी विचारात आपल्या फोनकडे पाहत होता. दाराच्या आवाजाने तो दचकला आणि त्याने वर पाहिलं.
देशमुखांची भेदक नजर थेट त्याच्यावर रोखलेली होती. त्या एका क्षणात रमेशच्या चेहऱ्यावरचं रक्त जणू गोठलं.
“रमेश शेट्टी?” देशमुखांनी शांतपणे विचारलं.
रमेशची बोलतीच बंद झाली. तो फक्त इतकंच पुटपुटला, “…साहेब?”
देशमुख खोलीत शिरले. त्यांचा आवाज अजूनही संयत होता, “थोडं बोलायचं आहे.”
रमेशचा चेहरा घामाने निथळत होता . त्याने घाबरून उठायचा प्रयत्न केला, पण कदमने लगेच पुढे होऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला. “बस.”
पहिली चौकशी — जागेवरच
रमेशच्या हाताची बोटं थरथरत होती आणि त्याने ती एकमेकांत घट्ट गुंफली होती. देशमुख त्याच्यासमोर पहाडासारखे उभे राहिले.
“२४ एप्रिलच्या त्या रात्री... कुठे होतास तू?”
रमेशची जीभ अडखळली. “मी… मी घरीच होतो साहेब. शप्पथ सांगतो.”
देशमुखांनी काही न बोलता फक्त त्याच्या डोळ्यांत पाहिलं. मग अत्यंत थंड आवाजात म्हणाले, “खोटं बोलायला अजून खूप वेळ मिळेल, रमेश. आता खरं सांगून स्वतःला वाचवण्याची संधी आहे. विचार करून बोल.”
खोलीतलं वातावरण आता इतकं तणावपूर्ण झालं होतं की श्वासाचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. रमेशचा घसा कोरडा पडला होता.
“साहेब… मी काहीच केलं नाहीये.”
देशमुख किंचित पुढे झुकले. त्यांचा आवाज आता खाली आला होता, पण तो थेट काळजाचा थरकाप उडवणारा होता.
“मी पुन्हा विचारतोय — त्या रात्री कुठे होतास तू?”
रमेशचा आत्मविश्वास त्या एका प्रश्नासरशी पत्त्याच्या बंगल्यासारखा ढासळला. त्याच्या कपाळावरचा घाम आता टप टप जमिनीवर पडू लागला होता.
देशमुखांनी परत विचारलं, “इराचा फोन आला होता ना तुला त्या रात्री? सांगावंच लागेल, रमेश… कारण तुझे कॉल रेकॉर्ड्स माझ्या खिशात आहेत.”
रमेशचे डोळे विस्फारले. त्याची नजर शून्यात स्थिरावली. देशमुखांच्या नजरेत आता ठाम खात्री होती— आता आपण सत्याच्या खूप जवळ पोहोचलो आहोत .
वेगवान कथा...
वेगवान कथा...
भाग पटपट येत आहेत याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद धनवन्ती!
धन्यवाद धनवन्ती!
फटापट लिहिताय.. छान.. :thumps
फटापट लिहिताय.. छान.. :thumps up:
वाचतेय!
वाचतेय!
शीना बोरा, इंद्रायणी मुखर्जी
शीना बोरा, इंद्रायणी मुखर्जी केस वर आधारित वाटतेय
छान चालली आहे
येऊ दे पुढचे भाग
धन्यवाद अनघा, स्वाती, मन्या.
धन्यवाद अनघा, स्वाती, मन्या.
वेगवान
वेगवान
धन्यवाद झकासराव!
धन्यवाद झकासराव!