सावल्यांच्या जाळ्यात - भाग ३

Submitted by नितनवे on 1 March, 2026 - 12:43

सावल्यांच्या जाळ्यात - भाग १
सावल्यांच्या जाळ्यात - भाग २

पूर्वभाग
आर्यन मेहताने रिया मोईत्रा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर इन्स्पेक्टर देशमुख तपास सुरू करतात आणि रियाचा शेवटचा कॉल तिच्या आई इरा मोईत्राला झाल्याचे उघड होते.
सीसीटीव्ही आणि कॉल रेकॉर्ड्समधून रिया इराच्या कारमध्ये बसल्याचे तसेच फोनचे लोकेशन पेन हायवेवर गेल्याचे स्पष्ट होते.
इराच्या विधानांतील तफावत स्पष्ट होत गेल्याने ही साधी मिसिंग केस नसल्याची खात्री देशमुखांना पटते.
तपास आता निर्णायक व अधिक गंभीर टप्प्यात प्रवेश करतो.
*************************************************************************************************************************

भाग ३ — राखेतले उत्तर

२६ एप्रिल, सकाळी ११:२०
खार पोलिस ठाणे

इंटरोगेशन रूम नेहमीसारखीच थंड होती. भिंतींवरचा फिका रंग, वरचा पांढरट दिवा, आणि मधोमध ठेवलेलं साधं टेबल—इथे बसलेल्या माणसाचं मनोबल हळूहळू ढासळावं, असंच ते वातावरण होतं.

इरा मोईत्रा ताठ बसली होती. हात टेबलावर हलकेच ठेवलेले, चेहरा कमालीचा संयत आणि शांत.

इन्स्पेक्टर विजय देशमुख आत आले तेव्हा त्यांनी पहिली नजर तिच्या डोळ्यांवर रोखली.

त्यांचा अनुभव सांगत होता—जास्त शांत माणूस कधी कधी खूप काहीतरी लपवत असतो.

ते बसले. फाईल उघडली. मुद्दाम घाई केली नाही.

“२४ एप्रिलला तुम्ही रियाशी बोललात?”

“हो. अगदी नॉर्मल कॉल होता.” इराने तत्परतेने उत्तर दिले .

देशमुखांनी पेन हलकं फिरवलं.

“ती त्या दिवशी तुमच्यासोबत होती का?”

“नाही. ती तिच्या कामात व्यस्त होती.”

हे उत्तरसुद्धा खूप पटकन आलं.

देशमुखांनी क्षणभर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. फक्त कदमकडे मान हलवली.

लॅपटॉप फिरला.

स्क्रीनवर टाइमस्टॅम्प गोठला—

20:47 — सिल्वर कार

इऱाची नजर नकळत स्क्रीनकडे गेली. फक्त अर्धा सेकंद.

देशमुखांनी तो क्षण टिपला.

“ही तुमची कार आहे ना, मॅडम?”

इऱाच्या ओठांवर हलकी रेष उमटली.

“दिसतंय तसं.”

देशमुख पुढे झुकले. आवाज अजून शांत झाला.

“आणि या कारमध्ये बसणारी व्यक्ती—रिया मोईत्रा.”

आता खोलीतील हवेत ताण दाटून आला.

घड्याळाचा टिक… टिक… आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता.

इरा काही सेकंद स्क्रीनकडे पाहत राहिली. मग हलकंसं हसली.

“ऑफिसर, मुंबईत अशा हजारो सिल्वर कार असतात.”

देशमुखांच्या नजरेत धार आली.

“बरोबर. पण या कारचा GPS लॉगही आहे.”

कदमने नकाशा उघडला.

स्क्रीनवर मार्ग चमकू लागला—

बांद्रा → सी लिंक → पेन हायवे

या वेळी इऱाच्या बोटांनी नकळत टेबलावर ठोका दिला.

एकदा.
दोनदा.

देशमुखांच्या नजरेत हलकी चमक आली.

इराची अस्वस्थता देशमुखांनी तात्काळ टिपली

“मॅडम,” देशमुखांचा आवाज आता किंचित थंड झाला,
“काल तुम्ही म्हणालात रिया तुमच्यासोबत नव्हती.”

इरा पुढे झुकली.

“ऑफिसर, तुम्हाला काय म्हणायचं आहे?”

दोघांची नजर भिडली.

हा आता प्रश्नोत्तरांचा भाग नव्हता—
हा मानसिक दबावाचा खेळ होता.

देशमुख हळू आवाजात म्हणाले—

“मी फक्त टाइमलाइन जुळवत आहे.”

शांतता...

लांबलेली... ताणलेली...

इऱाने पहिल्यांदा नजर वळवली.

देशमुखांनी मनात खूण केली.

तेवढ्यात दरवाजा हलकासा ठकठकला.

कदम आत आला. चेहरा गंभीर.

“सर… हायवे टीमचा कॉल आहे.”

देशमुख उठले. बाहेर आले.

कॉरिडॉरमध्ये पंख्याचा घरघर आवाज घुमत होता.

“बोला.”

कदमचा आवाज खाली आला—

“सर… पेन जवळ जंगलात जळालेलं ठिकाण सापडलं आहे. लोकल पोलिस म्हणतायत—मानवी अवशेष असण्याची शक्यता आहे.”

देशमुख काही क्षण स्तब्ध झाले.

“लोकेशन दाखवा.”

स्क्रीनवर लाल बिंदू चमकला.

देशमुखांच्या डोळ्यांत क्षणात ओळखीची चमक आली.

कारण—

तो बिंदू अगदी तिथेच होता…

जिथे इरा मोईत्राच्या कारचा GPS सिग्नल शेवटचा दिसला होता.

देशमुखांनी एक दीर्घ श्वास घेतला.

“टीम तयार करा. आपण लगेच निघतोय.”

**दुपारी ३:४०

पेनजवळील जंगलपट्टा**

एप्रिलचं रखरखीत ऊन अंग भाजत होतं.
जीप कच्च्या रस्त्यावरून आत शिरली तसे धुळीचे ढग मागे उठले.

परिसर निर्जन. फक्त दूरवर कावळ्यांचा आवाज.

आणि हवेत अजूनही दरवळणारा जळल्याचा उग्र वास.

देशमुख गाडीतून उतरले. त्यांच्या बुटाखाली करपलेली माती चरचरली.

लोकल अधिकारी पुढे आले.

“सर, सकाळी गावकऱ्यांनी वासाची तक्रार केली. आम्ही पाहणी केली तेव्हा हे ठिकाण सापडलं.”

देशमुख काही न बोलता पुढे गेले.

जमीन काळवंडलेली होती. झुडपांच्या टोकांवर राख चिकटली होती.

फॉरेन्सिक अधिकारी गुडघ्यावर बसून ब्रश फिरवत होता.

त्याने वर पाहिले.

“सर… प्राथमिकदृष्ट्या मानवी हाडांचे तुकडे वाटत आहेत.”

कदमने नकळत आवंढा गिळला.

देशमुखांचा चेहरा मात्र निर्विकार होता.

क्राइम सीन प्रोसेसिंग सुरू झाली.

कॅमेऱ्यांचे फ्लॅश.
मार्कर फ्लॅग्स.
पुरावे पिशव्यांत सील.

“टायर मार्क्स?” देशमुख.

“दोन वेगवेगळे पॅटर्न, सर. प्लास्टर कास्ट घेतोय,” कदम.

देशमुख आजूबाजूला बारकाईने पाहत होते.

अचानक—

“सर… इथे काहीतरी मेटल आहे,” फॉरेन्सिक अधिकारी.

सगळे तिकडे वळले.

राख अलगद बाजूला झाली.

एक अर्धवट जळालेलं लॉकेट बाहेर आलं.

क्षणभर कोणी हललं नाही.

“क्लोज शॉट घ्या,” देशमुख.

लॉकेट काळजीपूर्वक उघडलं.

आत—

अर्धवट जळालेला फोटो. एका तरुण मुलीचा.

कदम कुजबुजला “सर… हे—”

देशमुख शांतपणे म्हणाले “रिया मोईत्रा.”

आता हि फक्त मिसिंग केस राहिली नव्हती .

**सायंकाळी ६:५५

खार पोलिस ठाणे**

इरा मोईत्रा अजूनही इंटरोगेशन रूममध्ये बसली होती.

पण आता तिच्या बोटांची हालचाल वाढली होती. पायाची बोटं हलके हलत होती.

दार उघडलं. देशमुख आत आले.

त्यांनी एक शब्दही न बोलता टेबलावर पुराव्याचा पाउच ठेवला.

पारदर्शक पिशवीत—जळालेलं लॉकेट.

इऱाची नजर त्यावर खिळली आणि यावेळी मात्र तिच्या चेहऱ्यावरची शांतता स्पष्टपणे ढळली.

देशमुख पुढे झुकले आणि धारदार आवाजात म्हणाले,

“मॅडम… आता स्टोरी बदलायची का?”

घड्याळाचा आवाज पुन्हा घुमू लागला.

इरा पहिल्यांदाच पूर्ण निःशब्द बसली.

देशमुख खुर्चीत रेलले.

त्यांच्या नजरेत आता ठाम खात्री होती—

असत्याच्या भिंतीला भेग पडली होती.

सावल्यांच्या जाळ्यात - भाग ४

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users