सावल्यांच्या जाळ्यात - भाग १
सावल्यांच्या जाळ्यात - भाग २
सावल्यांच्या जाळ्यात - भाग 3
सावल्यांच्या जाळ्यात - भाग ४
पूर्वभाग
आर्यन मेहताने रिया मोईत्रा बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर इन्स्पेक्टर देशमुख तपास सुरू करतात. तपासात रियाचा शेवटचा संपर्क तिच्या आई इरा मोईत्राशी झाल्याचे उघड होते. सीसीटीव्ही आणि कॉल रेकॉर्ड्समधून रिया इराच्या कारमध्ये बसल्याचे स्पष्ट होताच संशय गडद होतो; पुढे फोनचे लोकेशन पेन हायवेपर्यंत गेल्याने देशमुख तपास अधिक आक्रमक करतात. पेनजवळील जंगलात जळालेल्या ठिकाणी मानवी अवशेष आणि रियाचे लॉकेट सापडताच प्रकरण साध्या बेपत्ता प्रकरणावरून गंभीर गुन्ह्याकडे वळते. इराच्या कॉल रेकॉर्डमधून एक अनोळखी नंबर समोर येतो; चेंबूरमध्ये तपासादरम्यान संशयित पळून जातो, मात्र त्याचा फोन पोलिसांच्या हाती लागतो आणि तपासाला पहिला ठोस बाह्य दुवा मिळतो. यानंतर देशमुख इराची कडक चौकशी सुरू करतात.
*************************************************************************************************************************
भाग ५ — कबुलीजबाबाच्या उंबरठ्यावर
२८ एप्रिल. संध्याकाळ.
संध्याकाळ ओसरता ओसरता खार पोलीस ठाण्याच्या लांबच लांब कॉरिडॉरमध्ये एक जड शांतता दाटून येते. दिवसभराची ती तक्रारींची आणि गुन्ह्यांची वर्दळ आता शांत झालेली असते, पण भिंतींच्या कोपऱ्यात दिवसभराच्या कोलाहलाचे प्रतिध्वनी अजूनही साचल्यासारखे भासतात.
छतावरच्या ट्यूबलाईट्समधून पांढरट, हॉस्पिटलसारखा कोरडा उजेड खाली झिरपत होता. त्या प्रकाशाच्या धूसर पट्ट्यात प्रत्येक थकलेला चेहरा आणि त्याखालील काळी वर्तुळं कामाच्या दडपणाची साक्ष देत होती.
इंटरोगेशन रूमच्या बाहेर देशमुख काही क्षण थांबले. त्यांनी काचेमधून आत नजर टाकली.
इरा मोईत्रा खुर्चीत बसली होती. पाठ ताठ ठेवायचा तिचा प्रयत्न अजूनही सुरू होता… पण आता त्या प्रयत्नातला थकवा स्पष्ट दिसत होता. तिचे हात टेबलावर होते, बोटं एकमेकांत घट्ट गुंफलेली.
देशमुखांच्या चेहऱ्यावर समाधानाची एक पुसटशी लकीर उमटली. दबाव काम करू लागला होता.
ते दार उघडून आत गेले.
आत आल्यावरही देशमुखांनी लगेच बसायची घाई केली नाही. ते टेबलाजवळ काही वेळ उभेच राहिले. त्यांनी जाणीवपूर्वक त्या खोलीत शांतता पसरू दिली.
इराने नजर वर केली; तिच्या डोळ्यांत अजूनही तोच आव आणलेला स्थिरपणा होता, पण त्यामागे अस्वस्थतेची एक लहर खोलवर लपलेली दिसत होती.
देशमुख शांतपणे बसले. ना फाईल उघडली, ना फोन. ते फक्त तिच्याकडे पाहत राहिले. पूर्ण तीस सेकंद.
शेवटी इरानेच मौन सोडलं.
“ऑफिसर… हे सगळं अजून किती दिवस चालणार आहे?” आवाज स्थिर ठेवण्याचा तिचा प्रयत्न केविलवाणा होता.
देशमुखांचा आवाज निर्विकार—“जोपर्यंत पूर्ण सत्य बाहेर येत नाही.”
क्षणभर दोघांमध्ये एक निःशब्द द्वंद्व सुरू झाले. देशमुख थोडे पुढे सरकले.
“मॅडम, पुन्हा सुरुवातीपासून जाऊ. २४ एप्रिल. तुम्ही आणि रिया त्या दिवशी भेटलात की नाही?”
इरा तडक म्हणाली—“नाही.”
उत्तर खूप पटकन आलं. देशमुखांच्या नजरेत एक तीक्ष्ण चमक उमटली.
ते मागे रेलले. “ठीक आहे.”
त्यांनी टेबलावरून एक फोटो तिच्यासमोर सरकवला. सीसीटीव्ही फुटेजचा तो एक स्थिर फोटो होता. सिल्वर कार, दरवाजा उघडलेला आणि रियाची पुसटशी आकृती आत बसताना.
इऱाची नजर त्या फोटोवर खिळली. फक्त अर्धा सेकंद. पण देशमुखांनी ते पकडलं.
“मॅडम,” देशमुख संथपणे म्हणाले, “ही तुमची कार आहे.”
इरा गप्प राहिली.
देशमुख पुढे म्हणाले, “आणि यात बसणारी मुलगी—रिया मोईत्रा.”
इरा आता सावध होऊन सरळ बसली. “ऑफिसर, मी आधीच सांगितलंय—”
देशमुखांनी हाताने तिला थांबवण्याचा इशारा केला. “नाही मॅडम. यावेळी मी बोलतो.”
त्यांच्या आवाजात आता पहिल्यांदाच धार जाणवली.
“रिया तुम्हाला भेटायला येते. तुमच्या कारमध्ये बसते. त्यानंतर तिचा फोन बंद होतो. तुमची कार शहराबाहेर जाताना दिसते…” देशमुख प्रत्येक शब्द तोलून-मापून फेकत होते.
ते क्षणभर थांबले आणि मग अगदी खालच्या आवाजात म्हणाले— “आणि पेनच्या जंगलात आम्हाला एक जळालेलं ठिकाण सापडतं.”
इराच्या गळ्यातील स्नायू क्षणभर ताणले गेले. देशमुखांनी लगेच पुढचा वार केला— “योगायोग खूप झाले, मॅडम.”
“तुम्हाला नेमकं काय सिद्ध करायचं आहे, ऑफिसर?” इराच्या आवाजात आता कडवटपणा उतरला होता.
“मला काहीही सिद्ध करायचं नाहीये. मला फक्त तुमच्या तोंडून 'खरं' ऐकायचं आहे.”
इराची बोटं टेबलावर अस्वस्थपणे हलू लागली. देशमुखांनी अचानक विषय बदलला.
“रिया तुमच्याशी शेवटच्या काही दिवसांत वाद घालत होती का?”
प्रश्न अनपेक्षित होता. इरा क्षणभर थबकली.
“नाही.” पण यावेळी तिच्या उत्तरातली ती आधीची धार नव्हती.
देशमुख पुढे झुकले. त्यांचा आवाज आता भेदक झाला होता.
“मॅडम… रिया घाबरलेली होती. तिने तिच्या मित्राला सांगितलं होतं की घरी काहीतरी काळं-बेरं सुरू आहे.”
इराच्या चेहऱ्यावरचा तो मुखवटा आता ढळू लागला होता. खूप हलके, पण स्पष्टपणे.
देशमुख खुर्चीतून अजून थोडे पुढे सरकले. “ती नेमकं काय सांगणार होती, मॅडम?”
इरा निरुत्तर होती. तिच्या श्वासाची लय आता बिघडली होती.
देशमुखांनी आवाज अधिकच खोल नेला— “रिया आणि तुमच्यात नेमकं काय चाललं होतं?”
खोलीत पुन्हा एकदा भयाण शांतता पसरली.
काही क्षणांनंतर इरा अत्यंत क्षीण आवाजात म्हणाली— “…ती खूप हट्टी होती.”
देशमुखांच्या डोळ्यांत क्षणात चमक आली. पहिलं खरं वाक्य.
इराची नजर टेबलावर स्थिरावली. तिच्या बसण्यातला तो ताठपणा आता पूर्णपणे गळून पडला होता. बोटांची पकड ढिली झाली होती. देशमुखांना जाणवले—तडा गेला आहे, आता फक्त शेवटचा धक्का द्यायचा.
“हट्टी होती… कशाबाबत, मॅडम?”
इराने ओठ आवळले. “…नेहमीसारखंच. छोट्या छोट्या गोष्टींवर.”
देशमुख पुढे सरसावले “मॅडम, रिया तुमच्याशी ‘छोट्या’ गोष्टींवर वाद घालत नव्हती.”
त्यांनी जाणीवपूर्वक शब्दांना विराम दिला. “ती धास्तावलेली होती.”
देशमुखांनी टेबलावरून एक प्रिंटआउट तिच्या दिशेने सरकवला. व्हॉट्सअॅप चॅट — रिया → आर्यन.
‘मम्मी काहीतरी लपवत आहे.’
इराची नजर त्या ओळीवर खिळली. फक्त दोन सेकंद. पण त्या दोन सेकंदांत खोलीतली हवाच जणू श्वास रोखून धरल्यासारखी स्तब्ध झाली. वातावरणात एक अनामिक दडपण दाटून आले.
“काय लपवत होतात तुम्ही, मॅडम?”
इरा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत म्हणाली, “ऑफिसर, मुलं असं काहीही बरळतात—”
“रिया ‘काहीही’ बोलणाऱ्यांतली नव्हती.” देशमुखांचा आवाज आता कठोर झाला. काचेपलीकडच्या कदमने देशमुखांचा हा अवतार क्वचितच पाहिला होता.
“मॅडम… आपण दोघंही आपला वेळ वाया घालवतोय.”
पुन्हा तीच शांतता. फक्त घड्याळाचा टिक… टिक… आवाज आता एखाद्या घनासारखा खोलीत घुमत होता. इऱाच्या कपाळावर घामाची एक बारीक रेघ उमटली.
देशमुखांनी अचानक वळण घेतले—“रिया आणि तुमचं नातं कसं होतं?”
प्रश्न साधा होता, पण वार अचूक.
इरा क्षणभर गोंधळली. “नॉर्मल,” ती कोरडेपणाने म्हणाली.
देशमुखांच्या ओठांवर एक व्यंग्यात्मक रेघ उमटली.
“नॉर्मल लोक आपल्या आई-वडिलांबद्दल भीती व्यक्त करत नाहीत, मॅडम.”
इरा आता उघडपणे अस्वस्थ दिसत होती. तिने पाण्याचा ग्लास उचलला, पण हात किंचित थरथरत होते. देशमुखांच्या नजरेतून ते निसटले नाही. ते खुर्चीत मागे रेलले.
“चला… दुसऱ्या मार्गाने जाऊ.”
त्यांनी फाईल उघडली. “२४ एप्रिल. संध्याकाळी ७:५८. रियाचा मेसेज—” ते वाचू लागले: ‘मम्मी, आपण बोलूया का? मला काही सांगायचं आहे.’
देशमुखांनी तिच्या डोळ्यांत पाहत विचारले, “काय सांगणार होती ती? कशासाठी भेटायला येत होती?”
तीस -चाळीस सेकंद कुणीच काही बोलले नाही.
मग इरा म्हणाली—“…तिला काही गैरसमज झाले होते.
“कशाबद्दल?”
इरा पुन्हा गप्प. तिच्या शांत मुखवट्याला पडलेला तडा आता स्पष्टपणे दिसत होता.
देशमुखांनी आवाज आणखी खाली आणला, “सत्य जितकं दाबाल, तितकं ते तुम्हाला आतून पोखरत राहील. रिया नेमकं काय शोधत होती?”
इराचा श्वास आता धापा टाकल्यासारखा जड झाला होता. तिने पहिल्यांदाच नजर चोरली.
ती…” इरा थांबली. ओठ पूर्ण वाळलेले. “…ती माझ्या जुन्या गोष्टींमध्ये नाक खुपसत होती.”
खोलीत पुन्हा एकदा श्वास रोखणारी शांतता पसरली.
“कुठल्या गोष्टी?” देशमुख हळुवारपणे पुटपुटले.
इराने डोळे मिटले. जेव्हा उघडले, तेव्हा त्या नजरेत तो आधीचा आत्मविश्वास उरला नव्हता.
“…माझा भूतकाळ,” ती पुटपुटली.
देशमुख मागे रेलले. त्यांच्या चेहऱ्यावर विजयाची एक पुसटशी छटा उमटली. सत्याचे दार आता उघडले होते. त्यांनी आपला शेवटचा, सर्वात टोकदार बाण सोडला—आवाज अत्यंत मृदू, पण थेट काळजाला भिडणारा.
“रिया तुमच्या भूतकाळात नेमकं काय शोधत होती, मॅडम?”
इरा काहीच बोलली नाही, पण तिच्या असत्याचा अभेद्य वाटणारा किल्ला आता पूर्णपणे ढासळत चालला होता.
रोचक ...
रोचक ...
धन्यवाद धनवन्ती!
धन्यवाद धनवन्ती!