सावल्यांच्या जाळ्यात - भाग ४

Submitted by नितनवे on 2 March, 2026 - 11:59

सावल्यांच्या जाळ्यात - भाग १
सावल्यांच्या जाळ्यात - भाग २
सावल्यांच्या जाळ्यात - भाग 3

पूर्वभाग
रिया मोईत्रा बेपत्ता झाल्यानंतर आर्यनच्या तक्रारीवरून इन्स्पेक्टर देशमुख तपास सुरू करतात आणि तिचा शेवटचा संपर्क आई इरा मोईत्राशी झाल्याचे उघड होते.
सीसीटीव्ही, कॉल रेकॉर्ड्स आणि लोकेशन तपासात रिया इराच्या कारमध्ये बसल्याचे व फोन पेनपर्यंत गेल्याचे स्पष्ट होते. पेनजवळील जंगलात जळालेल्या ठिकाणी मानवी अवशेष आणि रियाचे लॉकेट सापडते.
हा पुरावा प्रकरणाला गंभीर वळण देतो. देशमुख इरावर मानसिक दबाव वाढवतात. तिच्या शांत मुखवट्याला पहिला तडा जातो.
*************************************************************************************************************************
भाग ४ — पहिला दुवा

२७ एप्रिलची सकाळ.

एप्रिलच्या उन्हाने सकाळपासूनच मुंबईला चटके द्यायला सुरुवात केली होती. सकाळचे नऊही वाजले नव्हते, तरी खिडकीबाहेरचा रस्ता उन्हात चमकत होता. हवेतला उकाडा मनाची चिडचिड वाढवत होता.

खार पोलिस ठाण्याच्या जुन्या इमारतीत मात्र वेगळंच वातावरण तापलं होतं. तपासाचं.

इन्स्पेक्टर विजय देशमुख आपल्या केबिनमध्ये व्हाईटबोर्डसमोर उभे होते. बोर्डवर गेल्या काही दिवसांत इतक्या वेळा खाडाखोड झाली होती की काही जुन्या रेषांचे फिके ठसे अजूनही दिसत होते. मध्ये रिया मोईत्राचा फोटो पिनने लावलेला—तिच्या चेहऱ्यावरचं हसू आता या सगळ्या कागदी रेषांच्या जाळ्यात विचित्र वाटत होतं.

देशमुखांनी पुन्हा एकदा टाइमलाइन वाचली.

८:३५ — रियाचा इराला कॉल
८:४७ — रिया सिल्वर कारमध्ये बसते
९:०२ — रियाचा फोन बंद
लोकेशन — पेन

ते काही क्षण तसेच उभे राहिले. त्यांच्या भुवया किंचित जुळल्या.

त्यांचा अनुभव सांगत होता—साखळी जुळते आहे… पण अजून कुठेतरी एक अदृश्य कडी आहे.

तेवढ्यात दार हलकंसं ठकठकलं.

“या,” देशमुख न वळताच म्हणाले.

कदम आत आला. हातात प्रिंटआउट्स होते, आणि चालण्यात हलकी घाई दिसत होती.

“सर… एफएसएलचा प्राथमिक अपडेट.” (Forensic Science Laboratory)

देशमुख वळले. कागद घेतला. नजर झरझर वेगाने ओळी ओलांडत गेली.

“…मानवी अवशेष असण्याची शक्यता जास्त… डीएनए रिपोर्ट प्रतीक्षेत…”

त्यांनी कागद अलगद टेबलावर ठेवला.

“हं… ठीक,” ते पुटपुटले.

कदम अजून थांबला होता. देशमुखांनी ते ओळखलं.

“आणखी काही आहे?”

कदम जरा पुढे सरकला.

“सर… इरा मॅडमचे कॉल रेकॉर्ड्स डीटेलमध्ये पाहिले. रिया गायब झाल्यानंतर तिने एका अनोळखी नंबरवर तीन कॉल केले आहेत. सलग.”

देशमुख त्याच्याकडे वळले.

खोलीत क्षणभर गहिरी शांतता पसरली.

“वेळ?” देशमुखांनी शांतपणे विचारले .

“रात्री ९:१५ ते १०:०२.”

देशमुख हळूच खुर्चीत बसले. बोटांनी टेबलावर हलका ठोका दिला—त्यांचे विचारचक्र सुरू झाल्याची खूण.

“नंबर ट्रेस?”

“सिम बनावट कागदांवर आहे, सर. पण लोकेशन पॅटर्न मिळाला.”

देशमुख पुढे झुकले.

“कुठे?”

“चेंबूर. इंडस्ट्रियल पट्टा.”

मग देशमुखांच्या कपाळावर हलकी आठी उमटली.

“कदम… कुणीतरी फार घाईत फोन केले आहेत.”

साडेनऊ — ब्रीफिंग रूम

लहान कॉन्फरन्स रूममध्ये पंखा घरघर करत फिरत होता. टेबलावर चेंबूरचा मोठा नकाशा पसरलेला. त्यावर लाल मार्करने काही ठिपके आधीच केलेले.

देशमुख उभे राहून बोटाने एक ठिकाण दाखवत म्हणाले—

“हा नंबर. रिया गायब झाल्यानंतर लगेच अ‍ॅक्टिव्ह होतो आणि वारंवार इथे दिसतो.”

“जुन्या गोडाऊन्सचा भाग आहे, सर. काही बंद, काही अर्धवट सुरू.” कदमने पुस्ती जोडली.

देशमुखांनी क्षणभर सगळ्यांकडे नजर फिरवली.

“आधी शांत पाहणी. कुठलाही गाजावाजा नको. आपल्याला फक्त खात्री करायची आहे—समोरचा कोण आहे ते.”

“यस सर.”

११:१२ — चेंबूर, औद्योगिक पट्टा

दुपारच्या उन्हात लोखंडी शेड्स तापून निघाले होते. हवेत गरम धातूचा, जळक्या तेलाचा आणि जुन्या धुळीचा मिसळलेला वास दरवळत होता. दूर कुठेतरी वेल्डिंगचा निळसर प्रकाश चमकत होता आणि एक भटका कुत्रा भिंतीलगत सावलीत पडला होता.

पोलिसांची साधी अनमार्क गाडी हळूच एका मोडकळीस आलेल्या गोडाऊनसमोर येऊन थांबली.

समोर अर्धवट तुटलेला फलक लटकत होता.

शर्मा लॉजिस्टिक्स — वेअरहाउस १७

देशमुख खाली उतरले. त्यांनी नेहमीच्या सवयीने आजूबाजूच्या परिसरावर धावती नजर टाकली —गेट, वरच्या खिडक्या, बाजूची गल्ली, समोरचा रिकामा पट्टा.

सगळं शांत होतं.

ती शांतता संशयास्पद भासत होती.

“कदम, सिग्नल तपास,” त्यांनी कुजबुजल्यासारखं म्हटलं.

कदमने उपकरण काढलं. स्क्रीनकडे पाहत राहिला.

मग हलक्या आवाजात पुटपुटला,

“सर… नंबर शेवटचा इथेच अ‍ॅक्टिव्ह होता. काल रात्री.”

देशमुख गेटजवळ गेले. गेट अर्धवट लावलेलं. कुलूप नाही.

त्यांनी गेट अलगद आत ढकललं.

किर्र… आवाज रिकाम्या गोडाऊनमध्ये लांबवर घुमला.

देशमुख थांबले. कानोसा घेतला.

दूरवर हलकी खसखस.

त्यांच्या नजरेत क्षणात सावधपणा आला. त्यांनी हाताने सर्वांना शांत राहण्याचा इशारा केला.

ते हळूहळू आत शिरले. कदम त्यांच्या मागोमाग.

पुढे एक वळण आलं. वळण ओलांडताच जुन्या लाकडी खोक्यांच्या आड एक माणूस उभा दिसला—हातात फोन. तो अचानक वळला आणि क्षणभर त्याची नजर देशमुखांशी भिडली. त्या एका क्षणात परिस्थिती दोघांनाही कळून चुकली; पुढच्याच क्षणी तो झटकन मागे फिरला आणि धूम ठोकत पळाला.

“कदम!”

देशमुख झेपावले.

माणूस मागच्या दरवाजातून बाहेर सटकला. बाहेरचा गरम वारा अंगावर आपटला. तो अरुंद गल्लीत घुसला.

देशमुख पूर्ण वेगात त्याच्या मागे धावले .

बुटांचा आवाज दणदण घुमत होता.

कदम मागून ओरडला—

“अरे थांब! पोलिस!”

पण तो थांबणाऱ्यांतला नव्हता.

गल्ली संपली.

समोर मुख्य रस्ता लागला.

आणि अचानक—एक मोठा ट्रक आडवा घुसला.

क्षणभर सगळा ताल बिघडला.

धूळ उडाली.

लोकांचा एकच गलका उडाला.

… आणि त्या एका क्षणाच्या गोंधळात तो माणूस गर्दीत विरघळून गेला.

देशमुख रस्त्याच्या कडेला थांबले. त्यांचा श्वास अजून जोरात चालू होता, पण नजर अजूनही गर्दीत त्याला शोधत होती.

कदम धावत आला.

“सर… हातातून निसटला.”

देशमुख दोन क्षण निःशब्द उभे राहिले. मग हळूच खाली बोट दाखवत म्हणाले.

“पण घाईत एक चूक करून गेला.”

पुरावा...

जमिनीवर एक स्वस्तातला स्मार्टफोन पडलेला होता.

कदमने तो उचलला.

देशमुखांनी ग्लोव्हज चढवले. फोन सुरू केला.

लॉक नव्हता.

कॉल लिस्ट उघडली.

क्षणभर दोघेही स्तब्ध झाले.

वरचा नंबर होता - इरा मोईत्रा

कदमचा आवाज मंद झाला—

“सर…”

देशमुखांनी फोन पुरावा पिशवीत ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची हलकी छटा उमटली.

“आता एक दुवा हातात आलाय.”

सायंकाळ — खार पोलिस ठाणे

इंटरोगेशन रूममध्ये पुन्हा तोच पांढरट दिवा पेटला होता.

इरा मोईत्रा समोर बसली होती. चेहरा अजूनही सावरलेला… पण जवळून पाहिलं तर थकव्याची एक बारीक छटा उमटली होती.

दार उघडलं. देशमुख आत आले. ते बसले नाहीत.

सरळ टेबलावर फोन ठेवला.

इऱाची नजर क्षणात त्यावर खिळली.

त्या एका क्षणात—

तिच्या श्वासाची लय किंचित बिघडली.

देशमुख शांत आवाजात म्हणाले—

“मॅडम… ओळखीचा वाटतोय का?”

इऱाच्या बोटांनी टेबलाची कड घट्ट पकडली.

“रिया गायब झाल्यानंतर तुम्ही यालाच फोन केलेत.”

घड्याळाचा टिक… टिक… आवाज स्पष्ट ऐकू येत होता.

इरा काही बोलली नाही.

पण तिच्या चेहऱ्यावरचा संयतपणा ढळायला सुरुवात झाली होती. तिच्या कपाळावर घामाचा एक बारीक थेंब उमटला.

पहिल्यांदाच.

देशमुख खुर्चीत रेलले. नजर सरळ तिच्यावर रोखून म्हणाले.

“मॅडम… सत्य फार काळ लपून राहत नाही.”

सावल्यांच्या जाळ्यात भाग ५

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users