कशाला काय म्हणायचं?

Submitted by वामन राव on 15 July, 2025 - 10:15

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात, महाराष्ट्राबाहेरही जिथे जिथे मराठी बोलली जाते त्या त्या प्रांतात एकाच वस्तूला वेगवेगळी नावे, वेगवेगळे शब्दप्रयोग असतात. भिन्न प्रांतातील लोक अशा एकाच वस्तूबद्धल किंवा एकाच वस्तूच्या काही उपप्रकारांबद्दल बोलत असतील तर अनेकदा गोंधळ उडतो. फळे-फुले-भाज्या यांबद्दल तर हा प्रकार अनेकदा घडलेला आढळून येतो. कित्येक जणींच्या माहेरी एक आणि सासरी दुसराच शब्दप्रयोग असतो. संयुक्त कुटुंबात अशा स्त्रियांची अनेकदा धांदल उडते.‌

उदाहरणार्थ, इंग्लिश मधील bottle gourd किंवा हिंदीमधील लौकी या भाजीला मराठीत दुधी, दुधी भोपळा, कद्दू अशी वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत. सर्वपरिचित टोमॅटोला ईशान्य विदर्भात भेदरे म्हणतात!

फळे, फुले, भाज्या यांची नावे आणि सामान्यतः आढळून येणाऱ्या इतर वस्तूंची नावे यांना आपापल्या भागात काय म्हणतात याची चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.

एखाद्या वस्तूला आपल्या भागात काय म्हणतात, त्या वस्तूचे संक्षिप्त वर्णन आणि शक्य असल्यास फोटो, माहित असल्यास इतर भागात काय म्हणतात, असे प्रतिसाद द्यावेत.

- वामन राव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> ...हे झाड धरलं का ?
Lol Lol

BTW, पूर्वी आमच्याकडे "झाड धरलं", "झपाटलं" यापेक्षा "भुतानं धरलं" असा शब्दप्रयोग होता असं वाटते. "झपाटलं" हा शब्द बहुधा कालांतराने बऱ्यापैकी रुळला.

"भानामती केली" हे कुणी ऐकलंय का?

शेवग्याला आम्हीही शेगट/शेकट! Lol ममो, तुमच्या कोकणातही Wink शेगट म्हणतात तर शेगूल कुठे म्हणतात? मी समजत होते की तळकोकणात शेगूल म्हणतात.

कोशिंबीर - पचडी

कटाची आमटी - चणाडाळ, चिंच गुळ, गोडा/ काल मसाला, खोबरं, कोथिंबीर.. पुरण पोळी बरोबर खातात. खरंतर पुरण वाटायचे वगळतात
आणि त्याची आमटी करतात.

घावने - धिरडी - आंबोळ्या - पोळा

टोमॅटो सार - ताक किंवा नारळाचं दूध घालून फोडणी द्यायची
सूप - नुसतंच उकळवलेलं आणि लोणी सोडलेल.

पात्रा - अळूवडी
सुरळीच्या वड्या - खमणी

गुजरातेत (?) खमणी ची पाककृती वेगळी असते.
वाटलेल्या डाळीचा, आंबवून ढोकळा करायचा, तो कुस्करायचां त्यावर कांदा, कोथिंबीर शेव वगैरे घालू.न खायच. त्याला काहीं ठिकाणी सुरती खमणी असेही म्हणतात

मुंबईत मिळणारा खमण ढोकळा/ ढोकळा वेगळा , त्याची कृती आणि चवही वेगळी.. गुजरात साईडला मिळतो तो खमण म्हणजे डाळीचा बनवतात. त्याची चव आणि टेक्शर वेगळे असते.

भांड्यांच्या बाबतीत
पक्कड - चिमटा - गावी
पेला - भांड - फुलपात्र
पातेल - तसराळ

वरती फणसाचा उल्लेख आला.

त्यात मला माहीत असलेले २ प्रकार
कापा ( बाजारात मिळतो तो)
बरका - भयंकर गिळ गिळीत असतो. त्याचा गरा चावता पण येत नाही.. गिळूनच टाकायचा. लहानपणी खाल्लाय.

इर्जिक ला आमच्याकडे वारंगुळा म्हणतात>>>

' इर्जिक ' mhanje काय?

हा शब्द एका पुस्तकात आला होता.. संदर्भाने अर्थ लावण्याचा प्रयत्न केला.

तसेच माहेरहून सासुरवाशीणीला न्यायला आलेल्याला मुराळी म्हणतात. <<<
तसेच,

  • नवीन लग्न होऊन प्रथमच सासरी जाणार्‍या मुलीसोबत घरातली किंवा अगदी जवळच्या नात्यातली एक जाणती स्त्री सोबत जाते, तिला पाठराखीण म्हणतात. ही काही दिवस मुलीची सासरी सोबत करते. पाठराखीण तिथून परत यायला निघते तेंव्हा सासरचे तिचा मानपान करून पाठवतात.
  • लग्न मुलाच्या दारी लागते. त्यादिवशी नवरी आणि नवरीकडचे वर्‍हाड उतरायला गावातले एखादे एक मोठे घर राखीव ठेवले जाते. त्याला जानवस घर म्हणतात.

वर वामन यांनी जे फड्याचे चित्र दिलं आहे, त्याला सांगलीकडे साळुता म्हणतात. हा पुढून झिजून झिजून छोटा झाल्यावर त्याला मुडगा म्हणतात.

नाळके म्हणजे नरसाळे.

लहानपणी हातून काहीतरी मोठा गडबड घोटाळा झाल्यावर त्यासाठी झापताना आजी रागाने अनेकदा 'ए नाळका' असे संबोधत असे. Lol

पुण्याचे लोक कलींगड म्हणतात त्याला आम्ही विदर्भात टरबुज म्हणतो.

आणि पुण्यात ज्याला टरबूज म्हणतात त्याला आम्ही खरबुज म्हणतो.

ज्याला इथले बरेच मराठी लोक फ्लॉवर म्हणतात त्याला आम्ही फुलकोबी म्हणतो.

कोथिंबीर = सांभार .... अमरावतीची सांभारवडी फेमस आहे.

तुमच्याकडे साबुदाना खिचडी असते, तर ती आमच्यासाठी उसळ असते.

नांदेडला शिकायला असताना एकदा शिवरात्रीला किंवा मोठ्या एकादशीला पुण्याचा एक मित्र खिचडी खाऊन आलो म्हणाला तेव्हा त्याला विचारले की म्हणजे तू उपास नाही केलास? त्यावर तो म्हणाला की उपास आहे म्हणूनच तर खिचडी खाल्ली. तो पर्यंत माझ्यासाठी खिचडी म्हणजे मुगाचीच होती! आणि त्याच्यासाठी उसळ म्हणजे मटकी किंवा इतर कडधान्यांची.

कडधान्यांवरून आठवलं, चवळीला विदर्भात बऱ्याच ठिकाणी बरबटी म्हणतात.

पोळी म्हंटलं की पाश्चिम महाराष्ट्रातले बरेचजण पुरणपोळी समजतात, त्यांच्यासाठी आमची पोळी म्हणजे चपाती असते.

>>> जेनेरीक +१
_/\_

आमच्याकडे -

>>> काही भागात कपड्याच्या बटनाला गुंडी म्हणतात

हो, लहानपणी सदऱ्याच्या गुंड्या नेहमी तुटायच्या!

>>> डिंकाला (खायच्या नाही) खळ म्हणतात.

कणिक किंवा मैदा शिजवून कागद चिटकवण्याची ती खळ.

>>> चिकटवण्याच्या डिंकाला गोंद. खाण्याच्या डिंकाला डिंकच.

गोंद आणि डीग हे शब्द जेनेरीक; डिंक हा ममव

>>> कडची, सांडशी, चिमटा

आमची आजी कडची म्हणायची, आई चिमटा म्हणते.

>>> पाठराखीण

पाठराखणीला जाणारी बहुधा वधूपेक्षा थोडीफार मोठी बहीण किंवा मावशी वगैरे असायची / असते.

"करवली" याही लग्नातल्या दोन्ही बाजूंच्या अत्यंत महत्वपूर्ण व्यक्ती (लग्नाळू व्यक्तीच्या PA!) असतात.

>>> नरसाळे

Funnel ला आम्ही नरसाळेच म्हणतो. पण धुळे भागात बहुधा जब्बं किंवा शिपलं असं काहीतरी म्हणतात.

>>> डांब = विजेचा खांब

लाईटचा खांबा. खंबा नव्हे हं !

आमची आजी कडची म्हणायची, आई चिमटा म्हणते.>>>
आम्ही सांडशी म्हणतो.

बायदवे, उलथन्याला आम्ही सराटा म्हणतो.

आपण जी फोडणीची पोळी करतो तिला काही भागात माणिकपैंजण म्हणतात .

छोटी केरसुणी - साळुता/ झाडणी.
चिमटा - पक्कड / सांडशी

लहान असताना जी केरसुणी मिळायची ती आता बघायला सुद्धा मिळत नाही. दाट आणि मऊ गवताची पाती असायची. आता पालापाचोळा असतो बांधलेला.

चांगला. धागा

आमच्या घरात मालवणी मुख्य भाषा, तसेच मराठीवरही मालवणीचा प्रभाव त्यामुळे मलाही बरेच वर आलेले शब्द मैत्रिणी व शाळाकृपने समजले.
माडाच्या झावळ्या पासून हीर काढून त्यापासून वाडवण बनवतात त्याला सुरेख हॅण्डल ( काथा दोरीचे) असतं. वरती मणिमोहोर नी लिहिले तसा त्याच जीवनप्रवास असतो. पूर्वी बरेच जण ST मधून ते मुंबईला आणत ( अवांतरासाठी क्षमस्व)
बहुत जण स्वयंपाक नं म्हणता जेवaण केले असच बोलतात.
पातेल् _ टोप
आईकडे गवारी चीटकी म्हणतात
जेवणात भाताबरोबर निसत्याक व तोंडाक (अनुक्रमे पातळ व सुके)
सांडशी _ पक्कड
वरण _ डाळ सगळ्या डाळी ( गोडी खोबर हळद हिंग जिर तेल) व तिखट (फोडणी, लाल मसाला, हळद, कोकम , खोबर)
सुके मासे_ सुक्या
मोदक फक्त संकष्टील करायचं पदार्थ नसून त्याच नावाचा एक मासा पण असतो
अंगण_ खळ
विळी _ आडाळा/ ळो
स्वयंपाक घरात ओट्या वरच्या फडक्याला भांनसूर म्हणतात
ज्यावर गरम भांड उतरून ठेवतात त्याला निवन् ( मला शेवटी अनुस्वार देता येत नाहीय) म्हणतात ( मी गवताची सुरेख निवनि वापरलीत गावात)
बरेच पुल्लिंगी शब्द स्त्रीलिंगी पण करतात)

तवस म्हणजे अतिशय मोठी जून काकडी
Honey melon, musk melon, cantaloup melon इ पेक्षा
चिबुड ही सर्वस्वी वेगळी जात आहे. मी लहानपणापासून खात आले ( विशेषता गणपतीत अमाप पीक , मालवणात सर्वांकडे प्रसादात तोच असतो) .
इडलिंबू प्रकार गावातच माझ्या बहिणीच्या सासरी पहिल्यांदा बघितला.
तसंच पोपनीस नामक citrus वर्गीय एक फळ असते. मला ते pomelo आहे की grapefruit हे अजूनही समजले नाहीये.

तसेच सगळ भाकरी खाऊ असल्यामुळे गव्हाची फक्त चपाती आणि पुरणपोळी असते असा मला वाटायचं पण शिवाजी पार्कातल्या शाळेत सगळेजण पोळी बोलत व मेडिकल कॉलेज मधल्या गुजराती पोरीच्या ( मुंबईच्या डबेवाला मार्फत आलेल्या) गरमागरम डब्यात फुलके असत. मग हळूहळू समजल की घडीची पोळी, नुसती लाटून भाजून तेल लावलेकी चपाती, व विस्तव वर शेकून केले ते फुलका. ( असच आहे ना ते?)

फोनवरून लिहिता येत नाहीय

हिराची केरसुणी जेव्हा पुढचे हिर मऊ असतात तेव्हा असते वाडवण जी घरात केर काढायला वापरतात. >>> सासरी हेच म्हणतात (वाढवण म्हणतात) . कोकणात पावसाळ्यात घरीच करतात. एकदा मी नालासोपारा इथे नारळाच्या पडलेल्या पात्या आणून हिर घरात काढून केलेली हिराची केरसुणी.

सांडशीला पक्कड, चिमटा आणि गावी ही म्हणतात. माझ्या तोंडात चिमटा आणि गावी जास्त येतं.

पोळी म्हंटलं की पाश्चिम महाराष्ट्रातले बरेचजण पुरणपोळी समजतात, त्यांच्यासाठी आमची पोळी म्हणजे चपाती असते. >>> हे मला उशीरा समजलं, म्हणजे आम्ही पोळी म्हणतो त्याला बरेच जण चपाती म्हणतात माहीतेय पण पोळी म्हणजे पुरणपोळी हे माहीती नव्हतं. आम्ही पोळी आणि पुरणपोळी असं म्हणत असल्याने, पुरणपोळीला नुसती पोळी म्हणतात माहीती नव्हतं.

होना फार अलंकारीक. नालासोपारा इथे रहात असताना, शेजारचे एकदा म्हणाले आम्ही मसाला राईस केलाय म्हटलं मसालेभात का, वेगळी काही रेसिपी आहे का तर तसं नव्हतं, शेजारीण म्हणाली कालचा भात उरलेला तो असा असा केला, मी म्हटलं अच्छा फोडणीचा भात हा आमचा.

आमच्याकडे चपाती / चपात्या म्हणणं हे थोडं ग्राम्य आहे. ममव शब्द म्हणजे पोळी.

गव्हाची कोणतीही पोळी ही पोळीच. मग तिचे प्रकार पुरणपोळी (खरंतर पुरणाची पोळी), सांज्याची पोळी, तिळाची पोळी, खव्याची पोळी वगैरे. आणि वर फारएण्डनी म्हटल्याप्रमाणे ज्या दिवशी पुरण असतं त्या दिवशी रोजची पोळी ही पांढरी पोळी / साधी पोळी होते!

माणिकपैंजण हा शब्द आमच्या घरी अधूनमधून ऐकू येतो!

म्हणजे पुलंचा धोंडो भिकाजी जोशी जर आमच्या तिकडचा असता, तर त्याच्या पूर्वजांनी बांधाच्या दोन बाजूंना उभं राहून एकमेकांना शिव्याशाप दिले असते (शिव्याशाप दिले असतेच, कारण ते कॉमन आहे Wink ) >>>> Lol हे फार भारी आहे.

बाय द वे, पडघवली की तुंबाडचे खोत यात "पर्‍या"चाही उल्लेख आहे ना? तेही सेमच का? रत्नागिरीत पर्‍याचा उल्लेख ऐकला आहे.

हिराची केरसुणी वाचल्यावाचल्या "...एक उंच हिराची केरसुणी माझ्या नाकपुड्या झाडत होती" आणि "मंग हीर नाय मोडत!" हे आपोआप आठवते. पण त्या वर्णनावरून ती पुण्यात कुंचा म्हणतात ती असावी असे वाटते. त्यामानाने पुण्यात झाडू हा एक जेनेरिक शब्द आहे केरसुणी, कुंचा व खराट्याकरता. कदाचित फक्त केरसुणी व कुंच्याकरता.

चिमटा, सांडशी, गावी, पक्कड हे चारही शब्द पुण्यात ऐकले आहेत. फक्त पक्कड हा शब्द जास्त "टूल्स" मधल्या त्या हातोडी बरोबर सहसा असलेल्या पकडीकरता ऐकला आहे.

बहुत जण स्वयंपाक नं म्हणता जेवaण केले असच बोलतात. >>> "जेवण करते पुरणाची पोळी" हे "येऊ कशी कशी मी नांदायला" मधे आहे Happy

मात्र यावरून विविध लोकांना - बहुतांश मुलींना- सोमिवर जेवण झाले का असा जो प्रश्न येतो तो फ्लर्टिंग आहे की स्वयंपाक झाला म्हणून आस्थेने केलेली चौकशी आहे यावर विचार व्हायला हवा.

पुण्याचे लोक कलींगड म्हणतात त्याला आम्ही विदर्भात टरबुज म्हणतो. >>> हो हे ज्ञान त्यामानाने लौकर मिळाले. सत्ते पे सत्ता मधे अमिताभ हेमाला कलिंगड भेट देतो पण संवादात तरबूज उल्लेख होता.

मूकनायक - तुमची पोस्ट फार सुंदर आहे. एक नाद आहे त्यात. (नादमय या सांगितिक अर्थाने, कोल्हापूरच्या "नाद करायचा नाय" या अर्थाने नव्हे Happy )

असा न्यूनगंड इतरांनाही आपल्यापेक्षा भारी समजलेल्या गेलेल्या ठिकाणी जाताना सहसा सुरूवातीला येतो. भारतातून अमेरिकेत आल्यावर, अमेरिकनांना फ्रान्समधे गेल्यावर , इव्हन अमेरिकेतील ग्रामीण भागातून न्यू यॉर्क मधे आलेल्या अमेरिकन लोकांना. पण महाराष्टातील व्यक्तीला महाराष्ट्रातच यावा हे बरोबर नाही. इतक्या अवाढव्य राज्याला एकच प्रमाण भाषा असणे बरोबर आहे का असेही वाटते.

मूक नायक ,
इतक्या मोठ्या महाराष्ट्राच्या विविध भागात (विशेषतः ग्रामीण) रोजच्या वापरातल्या वस्तूंना थोडीशी वेगळी नावे असणे साहजिकच आहे. त्यात न्यूनगंड वगैरे बाळगायचे कारण नाही. कर्नाटक सीमेवरील मराठी भाषेत काही कन्नड शब्द येणे साहजिक आहे.

मूक नायक -

पाठ्यपुस्तके प्रमाण भाषेत असणे काही चूक नाही. महाराष्ट्रात किती विविध प्रादेशिक हेल, शब्द शक्य होतील पाठ्यपुस्तकात आणणे?
पण मला तुमचा मुद्दा पटला. हे मी खेड्यापाड्यातल्या शाळात पाहिले आहे. इथे जबाबदारी शिक्षकांची आहे. त्यांनी पाठ्यपुस्तक आणि स्थानिक भाषा/संदर्भ यातले अंतर समजून घेऊन शिकवायला हवे.

Pages