मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 April, 2025 - 14:06

मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?

हो, जोरदार चर्चा चालू आहे
बातम्या बघत असाल तर कल्पना असेलच.

१) असे झाल्यास सर्वसामान्य जनता ज्यांना राजकारणात फारसा रस नसतो त्यांचे मत काय असेल हे जाणून घ्यायला कुठल्या बातम्या बघायची किंवा सर्व्हे करायची गरज नाही.
पण तरी या व्हिडिओ मधील मतेच कानावर पडतील याची खात्री आहे.

https://youtu.be/rtSd_uMpi1I?si=tSmz4uAb7xdlO5hD

२) राज ठाकरे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे अशा दोन-तीन गटात विखुरले गेलेल्या जुन्या शिवसैनिकांना, बाळासाहेबांना मानणाऱ्या जुन्या मतदारांना, त्यांच्या घरातील नव्या पिढीला सुद्धा या दोन भावांनी एकत्र यावे असे आतून कुठेतरी वाटत असावे हे खात्रीने सांगू शकतो.

३) इकडचे तिकडचे फुटलेले सारे मावळे शिंदे ठाकरे एकत्र होण्याची शक्यता आहे. कारण भाजपला घेऊन सध्या सारेच नाराज आहेत.

४) गेले काही वर्षे आपण महाराष्ट्रात अगदी कोणाचीही… कोणाशीही आणि केव्हाही युती झालेली बघितली आहे. त्यामुळे या दोघांना एकत्र यायला लाजायची बिलकुल गरज पडणार नाही.

५) सध्या मराठी विरुद्ध हिंदी मुद्दा जोरदार चालू आहे. अशा पार्श्वभूमीवर हे मराठीचा मुद्दा घेऊन एकत्र आले तर नक्कीच भरघोस पाठिंबा मिळणार याची खात्री वाटते. कारण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकायला पाठवणाऱ्या मराठी माणसांकडे तसाही दुसरा कुठला पर्याय दिसत नाही. राजकीय इच्छाशक्ती शिवाय आपली मराठी वाचू शकत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे यांनी ही वेळ साधली तर तो मास्टरस्ट्रोक ठरेल.

काय बोलता?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> पण मग बाहेरचे येऊन तुम्ही काहीही करा मी ऐकणार नाही असं म्हणतात ना.

दादागिरी, मारहाण, नासधूस सातत्याने झाल्यावर अलीकडे त्यांची ही भूमिका टोकदार झाली आहे. आधी निमूट होते.

दैनंदिन व्यवहारात लक्षपूर्वक पाहिले तर बरेच व्यावसायिक मराठी बोलतात, थोडी शैली वेगळी असते. मुद्दाम हुडकून मराठी न बोलणारे शोधून त्यांना बडवणे वेगळे व 'पाट्या मराठीतही ठेवा' , मराठी बोलत जा असा आग्रह धरणे वेगळे!

मुळात हे त्यांचे भाषेवरील प्रेम नसावे, राजकीय लाभासाठी सहाय्यकारक ठरणारी भूमिका असावी. अन्यथा, हिंदी महाराष्ट्राच्या मराठी भाषिकांमध्येच इतकी रुजली आहे की सर्व स्तरांवर हिंदीचा विरोध व मराठीचा पुरस्कार सखोलपणे करणे अशक्य आहे.

पुन्हा हेही लिहितो की देशातील कोणताही माणूस कोणत्याही राज्यात जाऊन जमेल त्या भाषेत संवाद करू शकतो. चेन्नईला गेल्यावर तमिळ समजूनच घ्या व तमिळच बोला असे कायद्यानुसार तेथील कोणीही म्हणू शकत नाही. (म्हणतात किंवा अपेक्षा ठेवतात हे वास्तव मी अनुभवले आहे, पण त्याबाबत ते फार आक्रमक होते असे नव्हे)

बेफिकीर ह्यांनी कळीचा मुद्दा मांडला आहे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात कुणी म्हणाला की, "मला मराठी कळत नाही, आणि बोलायचे नाही.काय करायचं ते करा." तर काय झाले पाहिजे? मारहाण करणे हे त्यावर उत्तर नाही. (महाराष्ट्रात सरसकट मारहाण होत नाही. काही जण खूपच उर्मटपणे बोलतात तेव्हाच एखाद दुसऱ्या वेळेला कानशिलात लगावली जाते. हे अपवाद झाले. तरीही). आदर, सन्मान वगैरे vague शब्द वापरून काहीही होणार नाही. अमराठी लोक प्रेमाने मराठी बोलणार नाहीत. हे बळाच्या रेट्यावरच घडेल. ते बळ कायद्याचे असेल किंवा मराठी न येण्यामुळे व्यवहारात होणाऱ्या अडवणुकीचे असेल.
तर ह्याचे दोन भाग आहेत.
१) कायदेशीर भाग. रिक्षा, टॅक्सी वगैरेचा परवाना मिळण्यासाठी मराठी भाषा येणे अनिवार्य आहे. असा राज्य सरकारचा कायदा आहे. त्यामुळे जर रिक्षावाला मराठीत बोलणार नाही म्हणाला तर त्याचा परवाना रद्द होणे, दंड होणे अशी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या कारभार मराठीतच चालला पाहिजे असा नियम आहे. त्यामुळे सोसाटीतल्या मराठी माणसांनी सोसायटी मीटिंग, परिपत्रके वगैरे मराठीतच करण्याचा आग्रह धरला पाहिजे. तसेच केंद्र सरकारी बँकांमध्ये काम करण्यासाठी त्या त्या राज्याची भाषा बोलता येणे बंधनकारक होते. हा नियम मोदींनी रद्द केला. असा नियम पुन्हा केला पाहिजे. केंद्राने नाही केला तर राज्याने केला पाहिजे. केंद्र सरकारच्या बँक असतील तरी राज्यात व्यवसाय करण्यासाठी त्यांना राज्य सरकारची परवानगी लागत असेल. बँकाच काय इतर सर्व व्यवसायांसाठी (काही अपवाद वगळता) राज्य सरकारने व्यवसाय परवाना देताना मराठीत सेवा देणे अनिवार्य केले पाहिजे. जर नियमभंग केला तर त्यासाठी punitive actions ची तरतूद असावी. व्यावसायिकांनी आणखी इतर कुठल्याही भाषेत सेवा दिली तरी हरकत नसावी. पण "मराठी नही आती. हिंदी मे बात करो." असे बोलून मराठी माणसाला हिंदी बोलायला फोर्स केले जाते. हे खपवून घेता कामा नये.
असे नियम करण्याची संधी १९९५ साली शिवसेना-भाजपचे सरकार आले तेव्हा बाळासाहेबांना होती. पण कारणे काही असोत. त्यांनी केले नाही.
२) इतर सामान्य व्यवहारांत समोरचा माणूस "मी मराठी बोलणार नाही" म्हणाला तर सामान्य मराठी माणसाने सुद्धा, "मग मी तरी महाराष्ट्रात उत्तर प्रदेशाच्या भाषेत बोलावं अशी अपेक्षा का करतोस?" असा पवित्रा घेतला पाहिजे. कुणी हिंदीत बोलत असेल तर "हिंदी समजत नाही. मराठीत बोला" असं म्हणून अडवणूक केली पाहिजे. (हे अति वाटेल, पण हिंदी भाषक exactly हेच करतात आणि त्यांच्यासाठी मराठी माणूस हिंदीत बोलतो. अमराठी माणसाने मराठी न बोलणं हे normalize झालेलं आहे. पण मराठी माणूस मला हिंदी येत नाही म्हणाला की तोबा तोबा!). मराठी माणूस हिंदी भाषकांशी मराठीतच बोलण्यावर अडून राहिला की त्यातले जे genuinely मराठी शिकून बोलू इच्छितात (मराठी कशी बोलू? आमच्या कानावर मराठी पडतच नाही. अशी बऱ्याच जणांची तक्रार असते) ते तरी मराठी बोलायला लागतील.
#२ ला #१ चे कायदेशीर पाठबळ असेल तर ते परिणामकारक होईल. आणि त्यासाठी राज्य सरकारची इच्छाशक्ती हवी. पण इथे कुंपणच शेत खातंय.
महाराष्ट्रात हिंदीला पंजाबी, बंगाली वगैरे इतर भारतीय भाषांपैकी एक असेच वागवले पाहिजे. इतर काही खास स्टेटस द्यायची गरज नाही. पाचवीपासून सुद्धा हिंदी शिकवायला नको. आठवीपासून तिसरी भाषा म्हणून, संस्कृत, फ्रेंच वगैरेंसारखाच एक ऑप्शन म्हणून ठेवले पाहिजे. महाराष्ट्रात सगळ्यांना हिंदी येतेच किंवा यायला पाहिजे अशी जी इमेज केली जात्येय तिला तडा दिला पाहिजे.इतर काही नाही तरी मराठी लोकांनी "हिंदी येत नाही. मराठीत बोला" असं न लाजता ठणकावून बोललं पाहिजे.

दुकाने व व्यावसायिक आस्थापनांच्या नावाच्या पाट्या मराठीत् असाव्यात असा नियम मुंबई मनपाने / राज्यशासनाने केला. त्याविरोधात ही मंडळी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचली.
https://www.hindustantimes.com/india-news/supreme-court-urges-mumbai-sho...
https://www.ndtv.com/india-news/high-court-upholds-maharashtra-governmen...

आता या पाट्या मराठीत हव्यात , याचा अर्थ त्या देवनागरीत हव्यात. विशेषनामं इतर भाषेतली असली , तरी त्याचं भाषांतर होत नाही. क्लिनिकला दवाखाना , शॉपला दुकान. इ. होईल. त्यालाही यांचा विरोध.

म्हणतात किंवा अपेक्षा ठेवतात हे वास्तव मी अनुभवले आहे, >> हेच मी मराठी बद्दल म्हणतो आहे ना. की आम्ही ही अपेक्षा ठेवतो आहे - मराठीत बोला.

हे तुम्हाला मान्य नाही का?

>>> त्रागा

मी जे लिहिले त्यात त्रागा नाही. हिंदीचा विरोध हा फक्त 'हिंदीभाषिक व्यावसायिक मराठी बोलत नाहीत' या एकाच पातळीवर का असावा, असे ते म्हणणे आहे. विरोध हिंदीला करायचा असेल (जसा तमिळनाडू मध्ये केला जातो) तर शाळा, हिंदी चित्रपट सृष्टी, लाखोंच्या बोलीभाषेवरील हिंदीचा प्रभाव अश्या अनेक पातळ्यांवर केला गेला असता. तसा तो केला जात नाही. फक्त हिंदी व्यावसायिकांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला जातो.

बहुतेक, याचा अर्थ असा असावा की विरोध हिंदीला नाहीये. आणखी एक अर्थ असाही असावा की 'इतरभाषा प्रभावहीन मराठीचे प्रेमही' नाहीये. याचा अर्थ असा आहे की माथी भडकवणे, एक विशिष्ट लोकमत तयार करणे हे उद्देश आहेत. हे इच्छा नसूनही मान्य करण्याच्या वळणावर त्यांना फडणवीसांनी आणून सोडले आहे असे दिसते. आता ही भूमिका तर आधीपासूनच होती. मात्र, राष्ट्रीय पातळीवर ही भूमिका चालणार नाही याचे भान हळूहळू येऊ लागले आहे. परिणामतः, राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे की युतीबद्दल मला विचारल्याशिवाय काहीही बोलू नका. उद्धव ठाकरे वेगळ्याच आनंदात मश्गुल असताना हे विधान आले आहे.

>>> हे तुम्हाला मान्य नाही का?

मी वर दोनवेळा लिहिले आहे की अपेक्षा व्यक्त करण्याचे मार्ग वेगळे असावेत.

एकदा हे लिहिले आहे देशातील माणसे कोठूनही कोठेही गेली तरी जमेल तसा संवाद करतातच.

आपल्या भाषेबद्दल आग्रही असणे म्हणजे नुसते मारहाण करून व्हिडीओ काढणे नव्हे, सर्व स्तरांवर त्या भाषेबद्दल आग्रही असणे हा खरा अर्थ आहे.

तामिळनाडू सारखा मराठी प्रचार करणार असतील तर आनंदच आहे की.

चित्रपटाबद्दल म्हणत असतील तर ते मधून मधून मराठी चित्रपटांना मुख्य खेळ मिळावेत म्हणून आरडा ओरडा करत असतातच.

अजबरावांची पोस्ट आवडली.

पाचवीपासून सुद्धा हिंदी शिकवायला नको. आठवीपासून तिसरी भाषा म्हणून, संस्कृत, फ्रेंच वगैरेंसारखाच एक ऑप्शन म्हणून ठेवले पाहिजे. महाराष्ट्रात सगळ्यांना हिंदी येतेच किंवा यायला पाहिजे अशी जी इमेज केली जात्येय तिला तडा दिला पाहिजे.इतर काही नाही तरी मराठी लोकांनी "हिंदी येत नाही. मराठीत बोला" असं न लाजता ठणकावून बोललं पाहिजे >> +१

पाचवीपासून सुद्धा हिंदी शिकवायला नको. आठवीपासून तिसरी भाषा म्हणून, संस्कृत, फ्रेंच वगैरेंसारखाच एक ऑप्शन म्हणून ठेवले पाहिजे. महाराष्ट्रात सगळ्यांना हिंदी येतेच किंवा यायला पाहिजे अशी जी इमेज केली जात्येय तिला तडा दिला पाहिजे.इतर काही नाही तरी मराठी लोकांनी "हिंदी येत नाही. मराठीत बोला" असं न लाजता ठणकावून बोललं पाहिजे>>>+१

हिंदी ही तिसरी भाषा म्हणूनच असावी पण पर्यायी भाषा शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने बहुसंख्य शाळांमध्ये हिंदी शिकवली जाते. असे मला वाटते कारण जिथे शिक्षक उपलब्ध असतात तिथे हिंदी ऐवजी संस्कृत शिकवली जाते.

मराठी माणूस हिंदी भाषकांशी मराठीतच बोलण्यावर अडून राहिला की त्यातले जे genuinely मराठी शिकून बोलू इच्छितात (मराठी कशी बोलू? आमच्या कानावर मराठी पडतच नाही. अशी बऱ्याच जणांची तक्रार असते) ते तरी मराठी बोलायला लागतील.>>>> अजबराव तुमचा अख्खा प्रतिसाद योग्य आहे. त्यातही वर डकवलेला मुद्दा, हे करणं आपल्या सर्वांच्या हातात आहे. इतरांनी काय करावं‌, सरकार ने काय करावं, विरोधीपक्षांनी काय करावं, या वेळोवेळी फोल ठरणाऱ्या अपेक्षांपेक्षा आपल्या हातात जे आहे ते आपण कसोशीने करावं. या एका सामुहिक कृतीने फार मोठा फरक पडू शकतो.

परिणामतः, राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे की युतीबद्दल मला विचारल्याशिवाय काहीही बोलू नका. उद्धव ठाकरे वेगळ्याच आनंदात मश्गुल असताना हे विधान आले आहे.>>> चला हे एक बरं झालं की मग Happy

याचा अर्थ असा आहे की माथी भडकवणे, एक विशिष्ट लोकमत तयार करणे हे उद्देश आहेत. हे इच्छा नसूनही मान्य करण्याच्या वळणावर त्यांना फडणवीसांनी आणून सोडले आहे असे दिसते. आता ही भूमिका तर आधीपासूनच होती>>>
त्यांनी काय भूमिका घ्यावी ते त्याचं ते ठरवतील. मारहाण किंवा नासधूस करू नये ही फक्त अपेक्षा.

पण तुमची काय भूमिका आहे? तुम्ही हिंदी सक्तीला विरोध करत आहात का? तुमचा मराठीच्या वापराचा आग्रह करण्यासाठी पाठिंबा आहे का?

तसाही, झुंडीने येऊन मारहाण करणे, नुसत्या मासाच्या प्रकाराच्या संशयावरून मारहाण करणे, हत्या करणे ह्यात भारतीय समाज प्रगत झाला आहे आणि सत्ताधारी पक्षाची त्याबद्दलची भूमिकाही उघड आहे. समाजही त्या विरोधी प्रतिक्रिया द्यायच बंद झाला आहे.

>>> महाराष्ट्रात सगळ्यांना हिंदी येतेच किंवा यायला पाहिजे अशी जी इमेज केली जात्येय तिला तडा दिला पाहिजे

भौगोलिकदृष्ट्या भाषिक प्रभाव पडतो हे वास्तव आहे. हिंदी ही भाषा शाळेत शिकवली नाही तरी चित्रपट, TV या माध्यमातून आपोआप शिकली जाईल / जाते. 'यहांका ट्रॅफिक ऐसाही रहता है' चे 'इथले ट्रॅफिक असेच राहते' असे बोली भाषेत बोलले जाते. (असते, असे म्हणत नाहीत) (अशी असंख्य माणसे आहेत)

तसेही, महाराष्ट्रात सगळ्यांना हिंदी यायला हवी अशी 'प्रतिमा' कोण तयार करत आहे? हिंदीची सक्ती जाहीर करून मग ती मागे घेणे ही राजकीय खेळी असावी. त्या खेळीमुळे दोन स्थानिक पक्ष अचानक एकत्र आले व डोंगराच्या कड्यावर पोचले. तेथून ते सर्व काही जिंकतील किंवा सर्व काही हरतील, पण अधलेमधले काहीच नाही एवढे निश्चित झाले. आता त्यात राज ठाकरे वेगळे बोलत आहेत.

मराठी न बोलू इच्छिणारे परप्रांतीय हिंदू हे यांचे शत्रू आहेत हे चित्र निर्माण झाले.

>>> पण तुमची काय भूमिका आहे? तुम्ही हिंदी सक्तीला विरोध करत आहात का? तुमचा मराठीच्या वापराचा आग्रह करण्यासाठी पाठिंबा आहे का?

भूमिका वगैरे काय घेणार मी! नुसती येथे मुक्ताफळे उधळतो फार तर! माझे मत एवढेच आहे की जश्या प्रकारे संवाद व सुसंवाद साधता येत असेल तसा साधावा व विसरून जावे की आपण मारवाड्याच्या दुकानातून गहू घेतले की मुसलमानाच्या बेकरीतून ब्रेड! त्यांना व आपल्याला कोणत्यातरी भाषेत बोलता आले हे पुरे आहे. ज्या भाषा भौतिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरतात त्या शाळेत शिकवल्या जाव्यात किंवा मुलांनी त्या बाहेर शिकाव्यात. भाषेवरून मारहाण होऊ नये, याचे कारण देश भाषेवर नव्हे तर संविधानावर आधारित आहे. या पलीकडे काही म्हणणे नाही.

तुमच्या प्रतिसादातील तिसऱ्या परिच्छेदाला माझा 'पास'!

भूमिका वगैरे काय घेणार मी! नुसती येथे मुक्ताफळे उधळतो फार तर! माझे मत एवढेच आहे की जश्या प्रकारे संवाद व सुसंवाद साधता येत असेल तसा साधावा व विसरून जावे की आपण मारवाड्याच्या दुकानातून गहू घेतले की मुसलमानाच्या बेकरीतून ब्रेड! त्यांना व आपल्याला कोणत्यातरी भाषेत बोलता आले हे पुरे आहे. ज्या भाषा भौतिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरतात त्या शाळेत शिकवल्या जाव्यात>>>
+१

फक्त एक जोडतो की शाळेत विज्ञान तसेच तंत्रज्ञान ह्यावर जास्त भर द्यावा, भाषा शिकवण्यावर कमी.

अजबराव, चांगला प्रतिसाद
------------
इथे भाषा शुध्दीचा, इतर भाषा प्रभावहीन मराठी आणण्याचा, इतर भाषा हद्दपार करण्याचा मुद्दा नाहीये. व्यवहारात मराठी न वापरल्याने ती अडगळीत जाऊ नये याचा आहे.. म्हणून व्यायायिकांना मराठी बोलायला, तोडकी मोडकी असेल तरी बोलायला हवी याबद्दल लोकांनी आग्रही रहायलाच हवं.. कारण नाहीतर मग आपला नेहमीचा करंटेपणा आहेच ज्यामुळे मराठी बोलण्यात महाराष्ट्रातील शहरातील लोकांनाच कमीपणा वाटतो..

अजबराव यांच्या प्रतिसादाशी सहमत.
----

<हिंदीची सक्ती जाहीर करून मग ती मागे घेणे ही राजकीय खेळी असावी. त्या खेळीमुळे दोन स्थानिक पक्ष अचानक एकत्र आले व डोंगराच्या कड्यावर पोचले.....मराठी न बोलू इच्छिणारे परप्रांतीय हिंदू हे यांचे शत्रू आहेत हे चित्र निर्माण झाले.>

म्हणजे आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी फडणवीसांनी शालेय शिक्षणाचा खेळखंडोबा केला, लाखो विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना वेठीस धरलं ? मोदींच्या प्रत्येक कृतीचं मास्टरस्ट्रोक असं वर्णन करायची सवय फडणवीसांच्या कृतींपर्यंत पोचली की असं होतं.

महाराष्ट्रात राहून ते लोक मराठी बोलू इच्छित नाहीत , हा मुद्दा महत्त्वाचा नाही? साध्या दुकानांच्या नावांच्या पाट्या मराठीत ठेवा या नियमाविरोधात ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचले. आम्ही नाही बोलणार मराठी, काय करायचे ते करा , यांना लॉकडाउनसारखा अनुभव देऊ म्हणत दुकाने बंद ठेवली. हा उद्दामपणा नाही? यात महाराष्ट्राचा , मराठीचा आणि मराठी भाषकांचा अवमान नाही?

इतर बाबतींत संविधानाचा हवाला देताना खाण्यापिण्यावरून मुस्लिमांच्या मॉब लिंचिंग बद्दल मात्र पास म्हणतात याला काय म्हणावं ते कळत नाही.
----
राज आणि उद्धव ठाकरे पुढे एकत्र राहतात की नाही, यात मला रस नाही. त्यांनी मराठी हिंदीचा मुद्दा उचलायच्या आधी तो मराठी भाषेबद्दल जिव्हाळा वाटणार्‍यांनी उचलला होता. या एका बाबतीत राज ठाकरेंशी मी सहमत आहे - हिंसाचार , धाकदपटशा सोडून. मागे बँका इ. मध्ये मराठीचा आग्रह धरायचे प्रकार थांबवताना त्यांनी मराठी जनतेलाच आता हे आंदोलन तुम्ही पुढे न्या, असं म्हटलं होतं, तेही पटलं.

या धाग्यावर राडा हा शब्द आला होता, म्हणून थोडं अवांतर - निकृष्ट जेवण दिलं म्हणून आमदार निवासात संजय गायकवाड यांचा राडा अशा शीर्षकाने बातमी नुकतीच आली आहे. व्हिडियोही आहे. थोबाडीत मारणे, गुद्दे मारणे असे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत.

तुम्ही वकील नाहीत, मी आरोपी नाही. कृपया प्रश्न विचारू नयेत, मतप्रदर्शन करावेत.

पास - विषय वेगळा होता व धागा वेगळीकडे जाईल असे वाटल्याने पास दिला

>>> यात महाराष्ट्राचा , मराठीचा आणि मराठी भाषकांचा अवमान नाही?

सातत्याने मारहाण होते. ते मराठी भाषिकांशी वाईट वागत नाहीत. तोडके मोडके मराठी बोलतातही. कधीतरी संतापाचे स्वरूप उग्र होते.

>>> राज आणि उद्धव ठाकरे पुढे एकत्र राहतात की नाही, यात मला रस नाही

तुम्हाला रस आहे की नाही हे जाणून घेण्याची त्या दोघांना व जगाला यत्किंचितही गरज नाही.

राडा - हे झाले म्हणून विरोधी पक्ष सद्गुणी ठरत नाहीत.

खेळखंडोबा - असे काही झालेले असेल तर माहीत नाही. शासकीय शाळा व्यवस्थित सुरू आहेत. (काही कारणाने माझे अश्या शाळांमध्ये जाणे होते म्हणून लिहिले).

मारहाणीचे समर्थन इथे कोणीही करत नाही. जिथे प्रकरण वाढले, तिथे त्यांनी मराठी बोलायला नकार दिला असे दिसते. दुकानाच्या पाट्याही मराठीत करायच्या सरकारी नियमालाही यांचा विरोध आहे.

एप्रिलमध्ये पहिल्यांदा पहिलीपासून हिंदी सक्तीची घोषणा झाली, तिथून ते जी आर रद्द झाल्याची घोषणा होईपर्यंतचा घटनाक्रम वाचा. जमलं तर लिहून काढा. शाळांची वेळापत्रक किती वेळा बदलली? तिसर्‍या भाषेच्या शिक्षणाची काय सोय होती? इ.इ. माहिती घ्या. पहिलीतल्या मुलांशी आणि त्यांच्या पा लकांशी , शिक्षकांशी बोलून पहा. खेळखंडोबा नसेल. गोंध ळाची स्थिती निर्माण झाली की नाही? आणि हे तुमच्या म्हणण्यानुसार राजकीय फायद्यासाठी आहे. म्हणजे शालेय शिक्षणासंबंधीचे निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताऐवजी स्वतःच्या राजकीय फायद्याचा विचार करून घेतले, असे तुम्हीच म्हणताय.

ज्याला आता तुम्ही विरोधी पक्ष म्हणताय तो (आता एकाचे दोन झाले) इतकी वर्षे भाजपसोबतच होता आणि तेव्हाही राडे घालतच होता. शिवसेनेची सुरुवातच मराठी भाषकांसाठी राडे घालून झालेली आहे.

होय, नेते राजकीय लाभ व्हावा यासाठी कुटील डाव खेळतात. ज्यांना कोणीतरी इथे पूर्वी 'माकड' म्हणाले होते त्यांनी बहुधा राजकीय खेळी केली आहे. हे आधीपासूनच मी म्हणत आहे. हे राजकारण आहे. हे इंदिराजी, शरदराव यांनीही केले आहे.

माझी भूमिका वगैरे मांडण्याची माझी योग्यता नाही. फक्त एवढेच लिहितो की देशात कोणीही कोठेही व्यवसाय करू शकतो व जर थोडेफार संवाद साधणे जमत असेल व व्यावसायिक आणि ग्राहक या दोघांचेही काम होत असेल तर स्थानिक भाषेवरून इतके आक्रमक होणे बरोबर नाही.

फडणवीसांनी शालेय शिक्षणाच्याबाबत पक्षीय स्वार्थासाठी राजकारण केलं हे सांगितल्याबद्दल धन्यवाद.
---
हिंदी ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे, हेही असत्य आहे. उत्तर प्रदेश, बिहार इ. राज्यांतील बहुसंख्य लोक भोजपुरी, मैथिली अशा भाषा बोलतात. हिंदी आल्यापासून यांना बोलीचा दर्जा मिळाला.
https://www.facebook.com/watch/?mibextid=rS40aB7S9Ucbxw6v&v=741697174893545

>>> फडणवीसांनी शालेय शिक्षणाच्याबाबत पक्षीय स्वार्थासाठी राजकारण केलं हे सांगितल्याबद्दल धन्यवाद.

त्यात काय धन्यवाद.

>>> हिंदी ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे, हेही असत्य आहे

ओके

भ्रमर सर,

आपण सगळे मराठी आहोत म्हणून आपल्याला प्रेम व आदर आहे मराठी भाषेबद्दल!

येथे व्यवसाय करणारे अ-मराठी असले तर त्यांना 'नेमका तितकाच' आदर असायला हवा असे नाही. तरीही ते तोडके मोडके मराठी बोलतात. पण देश एकच आहे. भाषावार प्रांतरचना ही देशाच्या मुळावर उठणारी असायला हवी का, हा प्रश्न आहे.

राजकारण देऊ सोडून क्षणभर!

आपण हिंदी गीते गुणगुणत नाही का?हिंदी बातम्या बघत नाही का?

हिंदीची सक्ती केल्यासारखे दाखवून, ती मागे घेऊन, दोन पक्षांना एका संवेदनशील विषयावर आणून त्याच विषयावर मर्यादित ठेवणे व एकूण हिंदुत्वापासून दूर सारणे हे राजकारण कोणतीही हिंसा न करता, काहीही फसवणूक न करता, गलिच्छ राजकारण म्हणता येणार नाही.

सापळ्यात अडकायचे की नाही हे राज ठाकरे यांनी थोडे लवकर ठरवल्यासारखे 'वाटते'. तसे असेलच असे नाही, हे माहीत आहे.

{तरीही ते तोडके मोडके मराठी बोलतात. }
काही, नाही बोलणार. काय कराल? असे म्हणतात. जे मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात, त्यांना कोणी त्रास दिल्याचे ऐकले वा दिसलेले नाही.

आणि तुम्ही त्यांचे प्रवक्तेपद घेतलेच आहे, तर दुकानांच्या नावाच्या पाट्या मराठीत असाव्यात या नियमाला सर्वोच्च न्यायालयापर्यंत जात पैसा आणि वेळ खर्च करण्याइतका त्यांचा मराठीला विरोध का आहे, किंवा तो मराठीला विरोध नाहीच, ते कसे, हेही लिहून टाका.

ते मागे घ्यायच्या हिंदी सक्तीबद्दल लिहाल, तेव्हा त्यात हे माझे मत आहे किंवा असा माझा अंदाज आहे, हेही जोडलेत तर बरे होईल.

समस्त मराठीजनांसाठी प्रस्तावित जाहीरनामा :

१. मराठी माणसांनी हिंदीची सक्ती स्वीकारू नये. आणि दुसऱ्यास "मराठीतच बोला" हीदेखील थेट सक्ती करू नये. आधी मराठी न येणाऱ्यांना मराठी शिकून घेण्याची विनयशील विनंती करावी. मराठी शिकायला मदत लागत असेल तर मदत करण्याची तयारी दाखवावी. ह्यावर जर अरेरावी किंवा माजोरडी उत्तरे मिळत असतील तरच कठोर व्हावे.

२. महाराष्ट्रात फिरायला आलेल्या किंवा नवीन असणाऱ्या अमराठी लोकांना मदत करावी. त्यांना त्रास होणार नाही ह्याची तसदी घ्यावी.

३. तथापि, तीन वर्षांपेक्षा जास्त काळ महाराष्ट्रात राहिलेल्या (स्थलांतरित) लोकांशी आग्रहाने मराठीतच बोलावे. बोलण्याची सुरुवात हिंदीतून करू नये.

४. मराठीजनांनी दुसऱ्या राज्यात व्यवसाय व अन्य कारणांनिमित्त दुसऱ्या राज्यात अथवा देशांत स्थलांतर केल्यास आग्रहाने स्थानिक भाषा शिकून घ्यावी. स्थानिक संस्कृतीचा आदर करावा.

५. शाळा किंवा कॉलेजची संवादीभाषा अघोषितरित्या हिंदी होणार नाही ह्याची काळजी शाळा-कॉलेजेसनी घ्यावी. सरकारी आस्थापने व कंपन्या येथेही मराठीचा आग्रह धरावा. मराठी येत नसल्यास आपल्याला जमेल तश्याप्रकारे इंग्रजीत संवाद साधावा.

६. प्रवासाच्या ठिकाणी उदा. ट्रेन, बस, ऑटो, इ ठिकाणी मराठीचा वापर आग्रहाने करावा.

७. आपल्या मुलामुलींना घराबाहेरही, मित्रपरिवारात व इतर ठिकाणी मराठीत संवाद साधण्यासाठी प्रेरणा द्यावी.

८. हिंदीप्रेमींशी वाद उद्भवल्यास तो कायद्याच्या चौकटीत राहूनच सोडवावा. विनय राखावा. महाराष्ट्राची संस्कृती विसरून हिंदीपट्ट्याच्या पायरीवर उतरू नये. जर समोरच्या व्यक्तीकडून आगळीक होत असेल तर शांतपणे समविचारी लोकांची आणि पोलिसांची मदत घेऊन त्या व्यक्तीस धडा शिकवावा.

९. मराठीचा आग्रह करताना कायदा हातात घेऊ नये. कोणाला घेऊ देऊ नये.

१०. स्थानिक भाषांना खाणारी हिंदी हीच भाषा आहे. तिचा जरूर विरोध करावा. पण ज्ञानभाषा व जगाची संपर्कभाषा असलेल्या इंग्रजीला दूर लोटू नये. हिंदीऐवजी इंग्रजीचा वापर करावा. मराठी वाचवण्यासाठी एकमेव सूत्र. हिंदी टाळा. मराठी-इंग्रजी द्विभाषासूत्र पाळा.

- टीम अजिंठा

(ह्या यादीत आपल्याला अन्य काही मुद्दे जोडावेसे वाटत असतील तर अवश्य कळवा.)

दरवर्षी अब्जावधी रुपयांची उलाढाल करणारे बॉलिवूड अर्थात हिंदी सिनेमा सृष्टी मुंबईत आहे. इथले अनेक दिग्गज कलावंत ४०-५०-६० वर्षे मुंबईत रहातात आणि एक अक्षरही मराठी बोलत नाहीत. ह्यातले अनेक सुपरस्टार अर्थात महानायक जातकुळीतले आहेत. अनेक प्रतिभावंत आहेत.
ह्या सर्वांची आणि बॉलिवूडची मुंबईतून हकालपट्टी करावी का? की मनसे स्टाईलने त्यांना थोबाडून काढावे?
कारण हिंदीच्या अफाट लोकप्रियतेचे, पूर्ण भारतात (मोजके अपवाद वगळता) ती संवादाची भाषा बनली आहे ह्याचे एक मोठे कारण बॉलिवूड आहे. त्यातले संगीत, संवाद, अभिनय, पटकथा हे सगळे हिंदी मातृभाषा नसणारेही मोठ्या प्रमाणात आनंदाने बघतात, त्यातील बारकावे समजून घेतात.
तर मुंबईत राहून हिंदीची लोकप्रियता वाढवणारे बॉलिवूड मराठीच्या जिवावर उठलेला उद्योग आहे, एक बांडगूळ आहे आणि म्हणून हा उद्योग महाराष्ट्राबाहेर न्यावा का? निदान तसा प्रयत्न करावा का?

इतरांना मराठीची सक्ती करण्याआधी , रूढार्थाने मराठी भाषिक घरात जन्मलेल्या, मातृभाषा असलेल्या लोकांना मराठी बोलायला सांगा. दर २ मराठी शब्दांमध्ये एक इंग्लिश किंवा हिंदी शब्द , हिंदीसदृश वाक्यरचना, हिंदी वाक्प्रचार मुबलक असतात. याचा माझ्यावर झालेला दुष्परिणाम म्हणजे मराठी लोकांशी मराठीत बोलताना समोरच्याला आपले म्हणणे नीट कळते आहे का याची खात्री नसल्याने इंग्लिश / हिंदी शब्द / वाक्प्रचार वापरते. इंग्लिश किंवा हिंदीचे अतिक्रमण इतके झाले आहे की ते चक्र आता उलटे फिरणे अशक्य वाटते.

इतरांना मराठीची सक्ती करण्याआधी , रूढार्थाने मराठी भाषिक घरात जन्मलेल्या, मातृभाषा असलेल्या लोकांना मराठी बोलायला सांगा. दर २ मराठी शब्दांमध्ये एक इंग्लिश किंवा हिंदी शब्द , हिंदीसदृश वाक्यरचना, हिंदी वाक्प्रचार मुबलक असतात. याचा माझ्यावर झालेला दुष्परिणाम म्हणजे मराठी लोकांशी मराठीत बोलताना समोरच्याला आपले म्हणणे नीट कळते आहे का याची खात्री नसल्याने इंग्लिश / हिंदी शब्द / वाक्प्रचार वापरते. इंग्लिश किंवा हिंदीचे अतिक्रमण इतके झाले आहे की ते चक्र आता उलटे फिरणे अशक्य वाटते.

Pages