कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी / आम्रचर्चा

Submitted by अनिंद्य on 10 April, 2025 - 06:57

कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा

भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.

आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.

617389ef-2ed4-409d-9c77-679aaddec669.jpegपन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.

e06f854a-ccc5-48f2-b10e-37ed0beafb74.jpeg

देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.

8557ffd6-bc55-4a19-bdb9-663450d5f197.jpeg

तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.

भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !

a123d0e0-8fb6-408e-87e0-575c581b70b5.jpeg

चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …

Man, go, get a Mango !!

* * *

(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसला कातील फोटो हेमाताई, एकदम natural .

गुढीपाडव्याला रसाची बाटली फोडलेली. आम्ही दिवाळीनंतर गावाला गेलेलो तेव्हा एका शेजाऱ्यांनी दिलेली बाटली. माहेरी आणि शेजारी थोडा रस दिलेला. आता गावाहून आंबे आले की करू. तेव्हा माहेरी शेजारी आंबेच देते, तेव्हा रस नाही देत.

चला, पहिला आमरस फोटो आला !

थँक्यू मनीमोहोर.

मेथांबा फोटो क्र ३ साठी थँक्यू भरत. आता चौथ्याची वाट बघतो 🙂

रस आलाय तर मग आईसक्रीम नको ?

e37f6194-6671-48bb-a1e5-e0d4ec2c4809.jpeg

या सीझनचे पहिले होम मेड आईसक्रीम. यात mango chunks आणि ribbon effect यावा -दिसावा असा बहिणीचा प्रयत्न होता, तसा तो आलाही पण फोटो मात्र मी नीट नाही काढला. खाण्याची घाई 😀

पुढल्यावेळी ते आंबा कोरून वगैरे कुरेमल स्टाइल क़ुल्फ़ी करणार आहोत.

आत्ता मी जाड्या पोह्यात तेल, तिखट, मीठ, कैरी,कांदा घालून खातेय. फोटो काढला नाही पण उन्हाळ्याच्या दिवसात आमच्याकडे हीट आहे हे. ओलं खोबरं ही छान लागते सोबत. मी चिरते कैरी कांदा, किसून नाही आवडत पण किसूनही करू शकता. हवं तर पातळ पोहे घेऊ शकता. मला जाडे पोहेच आवडतात. अगदी कोवळी कैरी असेल तर त्यातली कोय आवडते मला, तीही चिरून घालते. लहानपणी असे पोहे उन्हाळी सुट्टीच्या दिवसात बाबा आख्ख्या चाळीतलया शाळेत जाणाऱ्या मुलं मुलींसाठी दोनदा तरी करायचे, दुपारी पत्ते खेळून किंवा इतर बैठे खेळ खेळून झाल्यावर बाबांच्या हातचे पोहे, सर्वांना आवडायचे.

बाठा झाल्यावर त्याची आई सुपारी करायची म्हणजे ते वाळवून फोडून आतली बी खायची. कडक तुरट अशी लागते. मी हे उद्योग नाही करत पण कोवळी कोय मला आवडते छान थोडी तुरट लागते. मी ती तिखट मीठ लाऊनही खाते.

साल कोवळे असेल तोपर्यंत मी कोय म्हणते आणि नंतर बाठा म्हणते. मागे मा बो वरच लिहिलेलं हे मी.

कुरेमल स्टाइल कुल्फी म्हणजे काय ?
इकडे आमरसाला वेळ आहे अजून . तोवर ही या सीझन ची पहिली कांदा-कैरी चटणी. ब्रेड बटर सोबत, किंवा धिरड्या /डोस्यासोबत फार यम्मी लागते!!
kandakairi.jpg

सीझनची पहिली कांदा-कैरी चटणी 👌

… कुरेमल स्टाइल कुल्फी म्हणजे काय ?..

वर सायो, भरत, दसा यांनी कृती, व्हिडियो डकवलेत. आमची प्रतिसादातली चर्चा वाचा Happy

मला नुसताच खायला आवडतो काहीही मिक्स न करता अगदी ओरिजनल..... +१.
माझ्या लहानपणी आजीच्या माहेरून मोठा डबा भरून आंब्याचा मावा आला होता.आजी त्याला मलिदा म्हणत असे.फार सुरेख लागतो.
मेथांबा 4_५ दिवसांपूर्वी केला आहे.फोटो उद्या डकवेन.
लॉक डाऊन मध्ये आंबा कोरून त्यात आटवलेले दूध घालून आंबा कुल्फी केली होती.खायला देताना साल काढून स्लाईसेस केले होते .मला फारशी आवडली नाही.
आंबे इतक्या प्रमाणात खाल्ले जातात की बाकी काही करावसं वाटत नाही.

मी जेव्हा आंब्याची कुल्फी करेन तेव्हा सर्व करताना स्लाईस न करता पोखरुन पोखरुन खाईन. आणि पाहुण्यांकरता वगैरे न करता फक्त आमच्याकरताच करेन.

काय खतरनाक मस्त फोटो आहे आमरसाचा ममो! जबरदस्त रंग!

माझी रायवळ आंब्यांची आठवण मंचरच्या बाजारातली आहे. काका बरोबर तेथील बाजारात फिरत होतो. रायवळ आंबे बरेच होते विकायला. एका ठिकाणी खूप चांगले दिसले म्हणून घेतले. अगदी स्वस्त. घरी जाउन आमरस काढला तर अगदी हापूसच्या जवळ जाणारी चव होती. आणि हापूसचा एक आंबासुद्धा येणार नाही इतक्या किमतीत डझनभर मिळाले होते Happy

अंजू, अनिंद्य, फा धन्यवाद.
हापूस ही एक जात म्हटली तरी त्याच्या आकारात , रंगात, चवीत, कोयीच्या साईज मध्ये , सालीच्या जाड पात्तळ पणात वगैरे तो कोणत्या बागेतला आहे, कलम रोपट आहे तरुण की वयस्कर, मागास मोहोरचं फळ आहे की लवकरच्या ह्या नुसार थोडा फरक पडतो. अमक्या बागेतला अमक्याला आवडतो म्हणून त्याला ते आंबे मुद्दाम पाठवणं वगैरे ही केलं जातं . पेटी आली की आंबा बघून काही मंडळी गेसिंग ही करतात. असो. ह्या धाग्यावर माझ्याच पोस्ट्स अधिक पडतायत पण विषयच असा असल्याने इलाज नाही.

हे घ्या तयार आंबे... कापा आणि खा..

… हे घ्या तयार आंबे...

सुंदर पिकलेले आंबे !

… कोणत्या बागेतला आहे, कलम रोपट आहे तरुण की वयस्कर, मागास मोहोरचं फळ आहे की लवकरच्या ह्या नुसार फरक पडतो…

एका हापूस बागाइतदारांकडून असे ऐकलेय- त्याच्यामते सपाट जमिनीवरच्या, खडकावरच्या आणि खोल दरीत आत असलेल्या सेम टू सेम जातीच्या हापूस कलमांमधे आंब्याचा रंग, आकार आणि स्वाद वेगवेगळा येतो.

ऐकले तेव्हां मला ती अंधश्रद्धा वाटली होती पण तुमच्या first hand माहितीमुळे पालशेतकरांच्या बोलण्यात तथ्य असावे असे वाटतेय Happy

हेमाताई एन्जॉय अप्रतिम आंबे.

कधी कधी हापुसच्या मोठ्या फळांत साका धरलेला असतो (बाठयाच्या आजुबाजुला पांढरा रंग) बाहेरुन समजत नाही आणि लहान दिसणारे फळ अप्रतिम निघतं. बाहेर मोठ्या फळाला मागणी असते जास्त.

माहेरी रायवळचे असंख्य प्रकार होते. बहीण भाऊ अगदी ताव मारायचे, मी माफक खायचे. आजी तर भाताबरोबर खायची रोज आंबा. त्यातले आठवणारे बिटकी आणि दही आंबा. बिटकी अगदी गोड, छोटा तो खायचे. दही आंबा थोडा आंबट असायचा चवीला. आजी साटं करायची, ती खायचे. एकंदरीत हापुसप्रेमीच मी. माहेरी मात्र झाडं कुठे कुठे डोंगरात आहेत, आता कोणी जातही नाही. सेम काजुबाबत होतं तिथे. पुर्वी वेगळी गोष्ट होती. आता माणसंही करायला मिळत नाहीत. हळदही कोणाला करायला दिली आहे, तो एक किलो देतो. ती हल्ली कोणाला मिळत नाही.

सासरी हापुसवाले म्हणून त्यांना रायवळ आकर्षण, मागे थोडे रायवळ आंबेही आलेले गावाहून. तेव्हा कोयाडं पहील्यांदा केलेलं, दुसरीकडे रेसिपी बघून.

तोतापुरी.
हो. आपल्या शेतातले आहेत. रंग केशरी आणि चवीला फार छान आहेत.

हे घे तुझे आवडते हापूस.
WhatsApp Image 2025-04-14 at 3.07.22 PM.jpeg

हापूस मध्ये साका ... होय हापूस नाजुकच फळ आहे, हापूस बरा एवढा पायरी नाजूक ... परफेक्ट पिकलेला पायरी जेमतेम एक दिवस टिकतो ...
दही आंबा नाव आवडलं. आमच्याकडे एक केळांबा होता त्याची साल केळया सारखी काढता यायची म्हणून. पूर्वी अनेक जण रस भात खात असत. कोकणात पोळ्या होत्याच कुठे , त्यामुळे रस भाताची सवय आणि मग आवड लागली असेल हा माझा तर्क. असो. कोणी करणारं असेल तिकडे तरच राखलं जात सगळं..

अनया मस्त आंबे. तोतापुरी माझा सर्वात आवडता. हापूस ही भारी दिसतोय.

ऐकले तेव्हां मला ती अंधश्रद्धा वाटली होती >> अंधश्रद्धा नाही वस्तुस्थिती आहे. दोन्ही बाजूला टेकड्या आणि मध्ये वहाळ अशा डोंगर उतारावरची बाग सर्वात बेस्ट समजली जाते. कलमांना पाणी घालायचा त्रास होतो लहान असताना पण टेस्ट बेस्ट असते. आमच्या आजे सासऱ्यांनी दीड एकशे वर्षापूर्वी लावलेली बाग अजून ही चांगली धरते पण हल्ली फळ लहान असत त्या बागेतलं.

@ अनया, तोतापरी/तोतापुरी नाव सार्थ करताहेत ते आंबे. ऐटबाज चोच आणि चोचीचा रंग लाल !

ह्याची कैरी नुसतीच मीठ लाऊन खाण्यात मजा.

.. दोन्ही बाजूला टेकड्या आणि मध्ये वहाळ अशा डोंगर उतारावरची बाग सर्वात बेस्ट समजली जाते.….

हेच सांगत होते आमचे मित्र. आंबे होतेही खूप छान.
ईंशागोविंदा यावर्षीही लाभतील.

… आंब्याला फळांचा राजा कुणी केले?… There is a very naughty girl residing inside your mind. 😀

सगळे फोटो फारच छान!
>>आंब्याला फळांचा राजा >> Biggrin हापुस हा फळांचा नगरसेवक आहे असं म्हणायचं का आजपासून?

हेमाताई मस्त पोस्ट सगळ्याच आणि आमरस तर तोंपासू !!
माझी आई पिक्या हापूस आंब्याचा उकडांबा घालायची दरवर्षी. आता झेपत नाही. पण माझा भयंकर आवडीचा पदार्थ होता.
(उकडलेले आंबे जास्त तेलाच्या फोडणीत मुरवायचे. वर्ष अखेरीला तर सालपण इतकी मुरून मऊसर खुसखुशीत लागायची... आंबा तिखट आणि किंचित मेथ्यांचा स्वाद! नॉस्टॅल्जिया!!)

उकडांबा >>> माझाही नॉस्टॅल्जिया. आई रायवळ आंब्यांचा करायची. इतर वेळी रायवळ काही मिळत नाहीत इकडे पण वटपौर्णिमेच्या आसपास बिटक्या (छोटे रायवळ आंबे) मिळतात ठाण्या/मुंबईत. मग आई तेंव्हाच करायची उकडांबा. मुरलेल्या उकडांब्याची साल तर मस्त लागतेच पण त्याची बाठ फोडून आतली कोय भाजून खायलाही भारी लागते (चुलीत भाजलेली तर अजूनच भारी लागत असावी). प्रज्ञा, रेसिपी असेल तर द्या प्लीज.

ऐकले तेव्हां मला ती अंधश्रद्धा वाटली होती >>> उताराची जागा (ज्यात पाणी राहणे कठीण), मुरमाड जमीन अशा सर्व्हावलला कठीण जागी असलेल्या कलमाचे आंबे चवीला बेस्ट असतात असे ऐकले आहे. आणि अन्जूताई म्हणाल्या तसे मोठ्या फळांत साक्याची शक्यता जास्त असते म्हणून मध्यम आकाराची फळे उत्तम.

रच्याकने, या बाफच्या हेमाताई आणि अन्जूताई या अनभिषिक्त राण्या आहेत.

>> हेमाताई आणि अन्जूताई या अनभिषिक्त राण्या >>
तुम्हाला नगरसेविका म्हणायचं आहे का? Lol हा जोक आवडलेला असल्याने आता भोआकफ!

तुम्हाला नगरसेविका म्हणायचं आहे का? >>> नको नको त्यांना राण्याच राहू दे. मायबोलीकरांवर वाईट संस्कार झाले तर होऊ देत.

तसंही हेमाताई आणि अन्जूताई यांना या बाफच्या राण्या कुणी केले या प्रश्नाचे उत्तर आहे आपल्याकडे. त्यामुळे त्यावर विचार प्रवर्तक लेख येण्याची शक्यता कमी आहे.

नको, राणी वगैरे सन्मानास मी पात्र नाही, हेमाताई यांचं खरोखर योगदान आहे, त्यांना माहितीही बरीच आहे आणि विविध रेसिपीज ही निगुतीने करतात. फोटो क्वालिटिही उत्तम असते.

अंजू सारखच सेम माझं ही.. नको राणी नको नगरसेविका.. माझ्या
आयडी मध्ये मोहोर आणलाय हौशीने तेवढा बास आहे. Happy
उकडांब्याची रेसिपी मला ही हवी आहे. मी ऐकलंय फक्त खाल्ला नाहीये अजून. माधव प्र, मस्त आठवणी.

भोआकफ म्हणजे भोगा आपल्या कर्माची फळं Happy

Pages