कणकेची पुरण पोळी

Submitted by मनीमोहोर on 14 March, 2025 - 23:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कणकेच्या पुरणपोळ्या ...

महाराष्ट्रीयन घरांमध्ये होळी साठीचे पक्वान्न म्हणजे पुरणाची पोळी. आज वेळे अभावी पुरणाच्या पोळ्या बहुतेक घरात विकत आणल्या जातात. विकतच्या पोळ्या जरी चांगल्या असल्या तरी त्यात पारी साठी मैदाच वापरला जातो. कणीक वापरून केलेल्या पोळ्या जास्त स्वादिष्ट आणि हरवाळ होतात. अजिबात मैदा न वापरता नुसत्या कणकेच्या पातळ, मऊ, हरवाळ पोळ्या कशा करायच्या हे होळी होऊन गेली आहे तरी इथे लिहून ठेवत आहे. पुराणावर जास्त लक्ष केंदीत न करता फोकस कणकेवर आहे.

पुरण करण्यासाठी
एक वाटी चणा डाळ , एक वाटी गुळ अथवा तुम्ही नेहमी घेता तेवढा , वेलची, जायफळ , किंचित मीठ आणि एक चमचा तेल.
पारीसाठी
वस्त्रगाळ कणीक एक वाटी , थोडं तेल आणि मीठ.
लाटण्यासाठी
तांदळाची पिठी.

क्रमवार पाककृती: 

एक वाटी चणा डाळ त्यात चमचाभर तेल घालून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्या. त्यातील पाणी काढून टाकून नंतर त्यात गुळ घालून कालथा पुरणात उभा राही पर्यंत शिजवा. त्यात चवीपुरतं मीठ आणि स्वादासाठी वेलची जायफळ घालून आणि गरम असतानाच वाटून घ्या. पुरण पूर्ण गार झाले पाहिजे पोळ्या करताना.

कणीक

१) कणीक पातेल्याला मलमल च फडक बांधून त्यावरून वस्त्रगाळ करून घ्या. म्हणजे कोंडा सगळा वर राहिल. हे वाचायला जरी कठीण, वेळखाऊ वाटत असलं तरी खूप वेळ लागत नाही त्याला. मलमल च्या कापडातून पटकन वस्त्रगाळ करून होते कणीक.

२) कणके मध्ये चवीनुसार मीठ घालून पोळ्याना भिजवतो त्या पेक्षा किंचित घट्ट कणीक भिजवा आणि तो गोळा एक फडक्यात बांधून ती पुरचुंडी पाण्यात पूर्णपणे बुडवून ठेवा दोन तीन तास.

३) दोन तीन तासांनी कणकेचा गोळा पाण्याबाहेर काढून ती परातीत घेऊन थोडं तेल घालून चांगली मळून घ्या. वाटल्यास पाण्याचा हात ही लावा मळताना. पाण्यात भिजवल्यामुळे कणीक मऊ पटकन होते जास्त मळावी लागत नाही. कणकेची आणि पुरणाची कन्सिस्टंसी सेम असायला हवी म्हणजे लाटताना पुरण विनासायास कडे पर्यंत पसरत.

४) पोळी लाटताना वरून लावायला कणीक न वापरता नेहमी तांदळाची पिठी च वापरा. त्यामुळे पोळी मस्त फिरते पोळपाटावर.

५) कणकेच्या गोळ्याच्या दुप्पट तरी पुरणाचा गोळा घ्या. वरील प्रकारे कणीक भिजवली असेल तर हे अजिबात कठीण नाही. कणीक वरील पद्धतीने भिजविली असेल तर पोळी सहज लाटता येते अजिबात फुटत नाही मैदा नसला तरी.

इतकी पातळ लाटली आहे की फडक्याच डिझाइन दिसत आहे.

20250314_125634.jpg

६) पोळपाटाला मलमल किंवा सुती फडकं बांधा व त्यावर poli लाटा . त्याने पोळी पोळपाटाला चिकटत नाही अजिबात. फडकं न वापरता बटर पेपर ठेवला पोळपाटावर तरी तोच रिझल्ट मिळतो. तसेच बटर पेपर सकट उचलून तव्यावर टाकता येते पोळी हा बटर पेपरचा आणखी एक फायदा. जे सोयीचं वाटेल ते घ्या पण डायरेक्ट पोळपाटावर पोळी कधी लाटू नका.

७) लागेल तशी पिठी घेऊन हलक्या हाताने पोळी लाटा. आणि अलगद पणे तव्यावर टाकून मध्यम गॅस वर पोळी भाजून घ्या. मस्त मऊ, हरवाळ स्वादिष्ट पोळ्या तयार होतात.

बदामी रंगाच्या स्वादिष्ट पुरणपोळ्या तयार
FB_IMG_1742008840759.jpg

अधिक टिपा: 

१) वस्त्रगाळ कणीक च घ्याची आहे पण हे तुम्ही चार दिवस आधी ही करू शकता. पुरण ही दोन दिवस आधी करून फ्रीज मध्ये ठेवू शकता म्हणजे आयत्या वेळी ताण येणार नाही.
२) पाण्यात भिजवल्यामुळे कणीक एकदम मऊ होते, जास्त मळावी लागत नाही आणि तेल ही जास्त घालावे लागत नाही मैद्यात घालावे लागते तसे.

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फडकं न वापरता बटर पेपर ठेवला पोळपाटावर तरी तोच रिझल्ट मिळतो.>>>>>>>> या वेळी बटर पेपर वापरून करेन. पण तो पोळ्पाटावरून सटकेल की काय असं वाटतं. आज पुरण शिजवणार आहे. उद्या पोळ्या. वन अ‍ॅट अ टाईम स्टेप! Wink

वस्त्र तुला येथे हवं असेल तर cheese cloth म्हणून मिळते ते चालावे. मी श्रीखंडाच्या चक्क्यासाठी वापरलेय.>>>>>>>>> धोतर पण चालेल. Lol
परवाच संकर्षण चा विडीओ पाहिला. तो सांगत होता आमचे आजोबा चट्टेरीपट्टेरी चड्डीवर फिरताना दिसले की समजायचं आज धोतर श्रीखंड बांधायच्या कामी आलेलं आहे.... सॉरी फॉर अवांतर...पण मोह आवरलाच नाही :हहपुवा:

चीज क्लॉथ खूप जाळीदार असतो. त्यातून काही चाळलं जाईल असं वाटत नाही. पण वस्त्र म्हणून काय वापरावं हा खराच प्रश्न आहे. मी गेल्या वर्षी ह्या पद्धतीने केल्या तेव्हा असेच प्रश्न मला पडले होते.

हो! पार्शमेंट पेपर आहे. पण मला पोळपाटावर नीट लाटता येते. पार्शमेंटपेपर अंजली म्हणत्येय तसा घरंगळेल वाटतं. तसले प्रयोग नको. वन अ‍ॅट अ टाईम. यंदा फक्त कणकेला पाण्यात डुबवणार Happy
अंजली Biggrin
आता धोतराच्या सोग्याने चाळलेल्या कणकेची पुपो करण्यापेक्षा ... जाउद्या. फार कल्पनेच्या भरार्‍या नको.
चाळणे हा इतका मोठा प्रश्न नाही. हायजिनिकली सोडवेन. Lol

आयकियात पंचे ही मिळायला लागले! आता टावेल टोप्या मिळाल्या की सुडोमि!
हा! ते किचन टॉवेल का? ते तेराव्याला वापरतात तशा विशविशीत कापडाचे असतात ना? काय एकेक आयड्या देतोय आपण! Lol

अमितव, बटर पेपर वापर असं म्हणेन. मी बटर पेपर पोळपाटावर ठेऊन उरलेला पोळपाटाच्या पायांखाली दुमडला. त्यामुळे तो सरकला नाही. बटर पेपरमुळे पोळी कमी पिठी वापरून लाटता येते आणि पोळपाटाला चिकटण्याची शक्यता शून्य होते.

डुबवणार नाही, बुडवणार Wink
अंजली Lol
सपिटाची चाळणी इथे मिळत नाही. माझ्या एका साडी खरेदीबरोबर मलमल टाईप पिशवी आली होती ती गेल्या वर्षी कामी आली.

डिश टॉवेल आहे तो बहुतेक.. पण मी पंचाच म्हणते.. Lol
मला ते चक्का टांगायला, मुग, मटकीच्या मुसक्या बांधायला फार कामी येते.

https://shop.static.ingka.ikea.com/category-images/Category_kitchen-text...

मी बटर पेपर पोळपाटावर ठेऊन उरलेला पोळपाटाच्या पायांखाली दुमडला.>>>>> हो तसं करूनच तो घरंगळायचा/सरकायचा थांबू शकेल. माझ्याकडे एक सिलिकॉनची बेकिंग मॅट आहे त्यावर पण लाटता येईल का बघते.

पुण्यातल्या कोणत्या तरी पुपो विकणार्‍या मोठ्या स्टोरचा विडीओ पाहिला. ते लाटतच नव्हते. नुसते सरसर पसरवत होते बटर पेपरच्या लेयरमधे.

पोळपाटाच्या आकाराचा बटर पेपर कापून घ्यायचा आणि पोळी लाटताना तोच फिरवायचा . पोळी उचलायची नाही लाटताना. बटर पेपरवर अजिबात चिकटत नाही, हवी तेवढी पातळ लाटता येते . पीठ ही खूप कमी लागतं. शेवट ही बटर पेपर सकट उचलायची तव्यावर टाकायची आणि पेपर काढून घ्यायचा.

मीही कणकेच्या पुरण पोळ्या करते. वस्त्रगाळ ( माझ्या आळशीपणामुळे) कधीच केले नाही, आजही नाही. सकाळी स्टँड मिक्सर मध्ये पुरणपोळीसाठी पीठ पहिल्यांदाच मळले , त्यामुळे काहीच कष्ट नाही, नेहेमी पिठाला पाणी लावत असे . त्याऐवजी आज त्याच पातेल्यात पाणी ओतले. संध्याकाळी पोळ्या करण्याआधी पाणी फेकले, परत mixer थोडासा फिरवला.
Butter paper ची कल्पना छान आहे. इथे वाचून मी अखंड बेकिंग पेपर वर पोळी लाटली तर कागद सरकत होता. माझ्याकडे पोळपाट नाही म्हणून chopping बोर्ड वर कागद ठेवला, पण सरकत होता, एकदा पुरण चिकटले ही, मग कागद गोलाकार कापून त्यावर पोळ्या लाटल्या, तेव्हा तंत्र जमले. तुमच्या पुरणपोळ्या तर अगदी एक नंबर दिसतात म मो! धन्यवाद

आमची पुरणपोळी. तव्यावरच्या पोळीचा फोटो काढायचा मोह आवरला नाही. मी फक्त कणकेच्याच करते. कणीक दोन तास पाण्यात भिजवून ठेवली होती. मी कणेकतपण थोडं केशर घातलं होतं.
आमच्याकडेपण पुरण अर्धं अर्धं - साखर-गूळ. त्यामुळे जास्त खमंग चव येते.
20190321_182137_0.jpg20190321_182133_0.jpg20190321_182131_0.jpg

आज ममोच्या रेसिपीने पुपो केल्या इतक्या सुरेख जमल्या, मागे एकदा सईने लिहल होत तस कणीक भिजवुन ती पाण्यात ठेवायचा प्रयोग आधि करुन झालाच होता पण,
वस्त्रगाळ कणीक कधी केली नव्हती, वस्त्रग्राळ यातल वस्त्र कुठल यावरच गाडी अडली होती...चिझ क्लॉथ आहे याची खात्री होती ते सापडल पण त्याच्या लान्ब स्ट्रिप कापुन काही प्रयोगशिल मण्डळीनी प्रयोग फसल्यावर गुपुचुप ते पॅक करुन परत त्याच्या पिशवित कोन्बुन ठेवले होते...
मग जरा शोधाशोध करुन झाल्यावर "परत बारिक होवु तेव्हा घालु" असा डेकेड ओल्ड ड्रेसची ओढणि दिसली...ओढण्या फ्रिसाइझ असल्याबद्दल देवाचे आभार मानले....मग काल ती निट स्वच्छ धुवुन ठेवली...कालच पुरण करुन ठेवल आणी आज कणीक वस्त्रगाळ करुन घेतली आणी आता परत पुरचुन्डीची व्यवस्था करा...म्हणजे परत वस्त्र शोधा त्याला फाटा देवुन फक्त रेसिपित दिलीये तशी कणीक भिजवुन स्नॅपवेअरच्या डब्यात झाकण लावुन पाण्यात मुरायला ठेवली...१ तासात इतर स्वयपाक करुन घेतला...आणि कणीक मळायला घेतल्यावर चुटकीसरशी मस्त तलम मौ कणीक झाली.
मी काही पोलपाटाला वस्त्र(कारण वर दिलय तेच) किवा बटर पेपर वापरला नाही पण त्याची गरज पडली नाही... सर सर सरकत होती पोळी.भाजल्यावर छान फुगली आणी छान मौ झाली.

तुमच्या इतक्या तलम जमल्या नाहि तरी मी माझी लेव्हल थोडी एक पायरी वर आणली अस वाटल.
ममो, तुम्ही जवळ असता तर आज तुम्हाला खाऊ घातली असती कारण आम्ही काही तुमच्या इतक्या सुगरण नाहि..त्यामुळे आज जमलेला प्रयोग आम्हाला परत जमेल याची खात्री नाही.
2739f471-e754-4981-9d8f-f5d2f60d6e7e.jpeg72e4e1e8-3da5-47fa-a203-aa2399da26d2.jpeg

फोटो पाहून डोळे सुखावले. आमच्याकडेही छान झाल्या नेहमीप्रमाणे. काल आणि आज पुरणपोळ्याच खाणार आहे.

>> वस्त्रं कोणते?>>
रंग विकणाऱ्या हार्डवेअरच्या दुकानात मिळते. रंग गाळण्यासाठी वापरतात.

ममो ताई खूप खूप धन्यवाद. तुम्च्या मुळे पुरणपोळी करायची हिम्मत केली. तुमच्या रेसिपी ने काल आणि आज पुरणपोळ्या केल्या. पहिली थोडी फसली मग मात्र थोडे थोडे जमले. कणिक 1 तास च पाण्यात ठेवली आणि मग तेल आणी पाणी लावून छान मळून घेतली. पुढच्या वेळी दोन तीन तास ठेवीन आणि मग करीन. पुन्हा एकदा धन्यवादIMG_20260303_132428.jpg

हो आणि एक सांगायचे आहे.मी साधा कॉटन चा पातळ कपडा घट्ट बांधला गोल ताटाला आणि त्यावर केल्या पुरणपोळ्या. छान पसरत होत्या. मी पोळपाट वापरत नाही म्हणून स्टील चे गोल ताट वापरले

सर्वांना धन्यवाद...
अंजली, प्राजक्ता आणि मेघ किती सुंदर अलवार दिसतायत पुरणपोळ्या.
ममो, तुम्ही जवळ असता तर आज तुम्हाला खाऊ घातली असती >> किती गोड प्राजक्ता... एवढं लिहिलंस ह्यातच मिळाली असं समजते. खूप छान वाटलं वाचून
बरेच वेळा लिहिलंय तरी पुन्हा आज लिहिते, तुम्ही नोकरी वगैरे संभाळून घरी करता पुरणपोळ्या ह्याच खूप म्हणजे खूपच कौतुक वाटतं, कमाल वाटते, असं सगळच वाटत.

तुम्ही नोकरी वगैरे संभाळून घरी करता पुरणपोळ्या ह्याच खूप म्हणजे खूपच कौतुक वाटतं, कमाल वाटते, असं सगळच वाटत.>>>>>>>>> हेच मोटीव्हेशन आहे!! Happy

Pages