( दैनंदिन जीवनातील किरकोळ प्रश्न आणि उत्तरे- या धाग्यावर सहज सुरू झालेल्या चर्चेनंतर मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी सर्वानुमते हा स्वतंत्र धागा काढणं योग्य वाटलं. )
----------------------------
चाळीशी ते साठीच्या दरम्यान आयुष्य निरर्थक वाटणं, ध्येय किंवा उद्दिष्टांबाबत गोंधळ होणं किंवा ती नाहीत असं वाटणं, आपल्या अपेक्षेनुसार एखादं नातं उंचीवर गेलं नाही ह्याची तळमळ वाटणं, आपण आता जे करत आहोत त्याची पाळंमुळं आपल्या बालपणात शोधत बसणं. आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टींना न स्वीकारता आल्याने दिशाहीन वाटणं, धड तरुणही नाही आणि धड म्हातारंही नाही अशी शरीराची सुद्धा चढावरून उताराला लागायची सुरुवात नकोशी वाटणं. वरवरच्या कलकलाटात आतून रिक्त वाटत रहाणं - याला ढोबळपणे Mid life मधली तगमग म्हणता येईल. पण हे याच वयात अशाच पद्धतीने व्हायला हवं याला काही आधार नाही. शंभर वर्षे आयुष्य गृहीत धरून मध्यावर जे स्थैर्य मिळते किंवा ज्या स्थैर्यासाठी अथक झगडलो ते मिळाल्यावर त्याला काही विशेष अर्थ नव्हताच असं लक्षात आल्याने अडकल्यासारखे वाटून जी घुसमट होते त्या प्रकारातील मानसिक द्वंद्वाला- संभ्रमावस्थेला हेच वय असायचं कारणही नाही.
हे जन्मभर अधुनमधून वाटूच शकतं. कुठलंही 'वाटणं' अगदी निराधारही नसतं. विचारपूर्वक घेतलेले निर्णय एवढे चूक निघाले, इतरांनी माझ्यासाठी घेतलेले निर्णयांनी तर बरेचसे मार्ग खुंटले. त्यामुळे जे काही थोडेबहुत चांगले निर्णय घेतले गेले ते सुद्धा अपघाताने झाले असावेत आणि आपलं श्रेय काडीमात्र नाही. आत्मविश्वास सुद्धा काचेचा आणि सकारात्मकता सुद्धा कचकड्याची. वय वाढतंय तसं तसं शक्यतांचे एकेक दरवाजे बंद व्हायला लागले आहेत. स्वतंत्र व्यक्ती म्हणून विशेष पाऊलखुणा उमटवता आल्या नाहीत, सगळी शक्ती संघर्षात पणाला लागतेय.
हल्लींच्या नात्यांबद्दल काय बोलावे, एवढं 'वरवरचं' आयुष्य कुठल्याही पिढीला बघावं लागलं नसेल. सगळा सोशल मीडिया, संवाद, छोट्याछोट्या गोष्टी, अगदी आस्थेवाईकपणे केलेल्या चौकशा वगैरे सुद्धा अतिशय कृत्रिम आणि यांत्रिक वाटतात. जणू हे कालचेच शब्द आज वापरले आहेत आणि उद्या आपणही हेच वापरू किंवा फेकून मारू. सखोल-अर्थपूर्ण बोलायला गेलं तर लोक घाबरून पळायला लागतात. 'आहेत पण आणि नाहीत पण' नात्यांत आपणही 'सेलेक्टिव्हली' वागायला शिकतोच हळूहळू. इकडचं कॉपी-पेस्ट तिकडं करू, वर केक-फुगा चिकटवून टाकू. हाकानाका. जितकं पोकळ तितकं शब्दबंबाळ. जिवंतपणाच नाही कुठे..! तू माझं लक्षात ठेव तरच मी तुझं लक्षात ठेवेन. तेही जर असं भावहीन -कृत्रिम असेल तर विसरलेले उत्तमच नाही का ?!
या सगळ्या गोंधळात आंतरिक ओलावाच किंवा अकृत्रिम ओढच नसण्याने एकतर आपल्यालाही 'यंत्रमानव' व्हावं लागतं, नाहीतर माणसात असूनही प्रचंड एकाकीपणा अनुभवावा लागतो. कधीकधी यंत्रमानवाचा अभिनय जमतोही, कधीकधी we are just too tired to care. दुसऱ्या गटातच बहुतेक वेळा असणाऱ्यांचं वर्तुळ इतकं लहान होत जातं की एका हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकीच लोक हृदयात उरतात. बाकीच्यांना का 'मेन्टेन' करायचं जे कुठलीही सोबत करत नाहीत, कुठलीही भर घालत नाहीत. मग आपण मात्र त्यांच्यासाठी मूळ स्वभावाप्रमाणे 'इमोशनली अव्हेलेबल' रहावे की नाही कळत नाही. हातचं राखून ठेवायचा स्वभाव नाही आणि ही बेगडी नाती ओढण्याची मानसिक ताकदही ..!
कुठल्यातरी अनोळखी गर्दीत मनाला बरं वाटावं म्हणून जायचं तर 'फिट इन'च्या प्रयत्नांत 'रोबॉटिक इंटरॅक्शन' करत पार थकून जावं आणि पुन्हा आपल्याच 'लाईफ चॉईसेसचा' पूनर्विचार करावा. आपण नॉर्मल का ॲबनॉर्मल? नॉर्मल म्हणजे नेमकं कसं? सगळे वेडे आणि मीच एकटी-टा शहाणी -ते - ज्याअर्थी मला हे जे वाटतंय, त्याअर्थी सगळे शहाणेच मीच महामूर्ख असले-लो पाहिजे इतके वेगवेगळे निष्कर्ष आणि पुन्हा प्रश्न. उत्तर मिळतच नाही अर्थात..!
आपापल्या भावनांशी प्रामाणिक रहाणं सकारात्मक रहाण्यापेक्षाही महत्त्वाचे आहे. त्यामुळे सगळंच 'ओके' ठरवावं आपल्यापुरतं. Pseudo positivity चं तणाव घेण्यात अर्थ नाही. हल्ली तर हा दबाव सर्वांवर नकळतपणे असतोच. फ्रॉईड म्हणतो तसं अशा अनैसर्गिकपणे दाबलेल्या भावना कधीतरी कुरूप होऊन बाहेर पडतातच. मानसिक द्वंद्वाचा लंब या टोकापासून त्या टोकापर्यंत नेण्याऐवजी सगळ्याला 'जे आहे ते आहे' ह्या मध्यावर उभा करत रहाणं मानसिक आरोग्यासाठी - मनःशांतीसाठी योग्य वाटतं आणि हळूहळू त्यातूनच स्वीकार येतो.
त्यासाठी स्वतः सोबत/ एकांतात वेळ घालवून याचा पुनःपुन्हा निचरा करणं फार आवश्यक. एकदा निचरा केला म्हणजे ते विचार पुन्हा येणार नाहीत ही अपेक्षाही अवास्तव. ते पुन्हा दार ठोठावणारच सरळ एक दार उघडून दुसऱ्या दाराने त्यांना घालवून दिल्याशिवाय त्यांच्या प्रदक्षिणा कमी होत नाहीत. कमीच करायचं आहे- बंद करणं अशक्य आहे. अशक्य गोष्टींचा पाठपुरावा करण्यापेक्षा ध्येयच सोपं ठेवणं नैसर्गिक आणि साध्य वाटतं. आपले विचार म्हणजे आपण नाही. आपली परिस्थिती म्हणजे सुद्धा आपण नाही. अशा प्रकारे चिंतन करीत राहिलो तर त्यांच्यापासून दूर जाता येते. मग ते येत राहिले तरी त्यांची तीव्रता तितकी रहात नाही, बोथट व्हायला लागतात. रस्ता ओळखीचा होतो आणि ह्या चक्रव्यूहातून लवकर बाहेर पडता येतं. आपण सहजासहजी सुखी होऊ शकत नाही, कारण ते मानण्यावर असतं म्हणे. जेव्हा मानता येत नसेल तेव्हा यामार्गाने त्यातल्या त्यात सुखकर जीवन मात्र जगू शकतो.
व्यक्तिसापेक्ष असलं तरी सगळ्यांनाच नेहमीच कमीअधिक प्रमाणात यातून जावे लागते. वयाचं सुद्धा तितकं खरं नाही. असे ठोकताळे माणसाच्या मनाला बांधता येत नाहीत. आपल्या मनात आपल्या शरीरात स्थिर वाटतच नाही आपल्याला कधी. दूरगामी परिणाम वगैरे होत असतील-नसतील पण हा गोंधळ कमी व्हावा यासाठी 'या' क्षणात जगून घेतलं पाहिजे नाही तर आपण कधीच जगू शकत नाही. मला वाटत नाही कुणी ऐंशी वर्षांची व्यक्ती सुद्धा माझा गोंधळ संपून मला आयुष्याचा अर्थ कळला आहे असं प्रामाणिकपणे सांगू शकेल. मग आपण चाळीस वर्षे वाट बघण्यात काय अर्थ आहे , आणि तेवढं जगलोच नाही तर तेही गेलं. त्यापेक्षा आहे त्यातच 'वेचता' आलं पाहिजे.
कदाचित हे सगळं निरर्थक असेलही पण आपापल्या छोट्याशा परीघात त्याला अर्थपूर्ण समजल्याशिवाय- निदान तसा आभास निर्माण केल्याशिवाय आपण समर्पित राहूच शकत नाही- तृप्तता अनुभवू शकत नाही. As Osho once said "Human mind is a great slave but a terrible master..! "
अर्थ शोधण्यापेक्षा समर्पण- कर्मनिष्ठता जास्त मोलाची आहे, किमान जीव जाताना पस्तावा राहणार नाही. तेव्हा ताठ मानेने जाता आलं पाहिजे... नाही का ?! कारण ज्या एकसंधतेची आपण प्रतिक्षा करत असू ती अस्तित्वातच नसेल आणि 'सर्वनाशे समुत्पन्ने ह्यर्धं त्यजति पण्डित:' उक्तीप्रमाणे थोडं फार सातत्याने 'जाऊ दिले' तरीही तुकड्यातुकड्यांतच काही तरी भरीव मिळत जाईल. या सगळ्या सांसारिक महासागरात बहुतेक नाती 'यथा काष्ठम् च काष्ठम् च' ठरतात आणि म्हणूनच शेवटी आपलं स्वतःशी असलेलं नातच आपल्याला सगळ्यातून तारून नेतं. ते आरस्पानी रहायला हवं...!
------------
**तळटीप: आता हे सगळं मला जमलंय का - कधीकधी जमतं. पण शब्दात मांडून ठेवलंय कारण त्याने कुणालातरी सोबत होईल. आयुष्यातील स्थित्यंतरांप्रमाणे हे विचार बदलतही रहातील, कोण सांगावे..!
( शीर्षक:
सपनों से भरे नैना , तो नींद है ना चैना -
Luck by chance - शंकर महादेवन
https://youtu.be/4Q9Ul9PwmxA?si=NEWBoKtntQPHdO98
विश्वास ठेवा या गाण्याइतकं चपखल शीर्षक या भावनांना दुसरं काही असूच शकत नाही असं या क्षणी तरी वाटतंय. ऐकून बघाच. )
आशु, कधीकधी सगळीकडूनच
आशु, कधीकधी सगळीकडूनच त्रासदायक परिस्थिति निर्माण होते, ठावूक आहे. तुला उत्तम आरोग्य आणि मनाजोगी शांतता मिळो.
ब्लू कोलंबसे, सुचवणीसाठी आभार. इंटरेस्टिंग वाटतेय.
मोड तो आए
मोड तो आए
एक सेकंद वाटले
मोदी तो आये
आत्ता नीट ध्यनात आलं.
आत्ता नीट ध्यनात आलं.
हा मोड म्हणजे मराठीतला मोड नाही.
म्हटलं असेल चवळी, मटकीच्या या अवस्थेचा या क्रायसिसशी संबंध. समजलं नाही तर गप्प बसा !
अमितव, असामी, अतुल, अनु,
अमितव, असामी, अतुल, अनु, स्वातीताई, प्राजक्ता, माझेमन, अनिंद्य, धनुडी, ऋतुराज, अतरंगी, फारएण्ड, शर्मिला, ऋन्मेष, केशवकूल, आचार्य, प्राचीन, हर्पा, भरत, मंदार, छल्ला, जिज्ञासा, अंजली कूल, दत्तात्रय साळुंके, सामो, सुमुक्ता, मृणाली, स्वाती आंबोळे, वृषाली, ब्लू कोलंबसे, मामी, आशु२९-- प्रतिसादांसाठी आभार.
तुमच्या कौतुकामुळे असं काही लिहायला जे धाडस किंवा रोखठोकपणा लागतो, तो पुन्हापुन्हा करायला हरकत नाही असं वाटतं. कारण यात लिहिणाऱ्याची ऊर्जा उतरते- ती तशी जगासमोर 'मांडावी' का, खरोखरच याची काही गरज आहे का?! याचे किंतुपरंतु नाही म्हटलं तरी येतच असतात, अगदी दरवेळी येतातच. त्यामुळे तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.
The shruti box म्हणून एक बँड
The shruti box म्हणून एक बँड आहे. व्हर्जनियातला संगीत दिग्दर्शक शंकर टकर हा सुंदर clarinet वाजवतो. मी त्याच्या प्रेमातच आहे. त्याची आणि 'माटी बाणी' ग्रूपची बरीच गाणी आवडली आहेत. त्यांचे 'सपनोसे भरे नैनाचे' फिमेल व्हर्जनही छान आहे, त्यातला clarinet चा भागही फार आवडता आहे. ती लिंक इथे देत आहे.
https://youtu.be/MiOdN6omGP8?si=rQmdRkpqQINrmNus
>> हजार वर्षे झाली लग्नाला...
>> हजार वर्षे झाली लग्नाला... चाकाचा शोध मी लावला, लेकरं लहानाची सेपियन मी केली...
तुमच्यापेक्षा उत्क्रांत स्थळं आली होती
वाह!
सिद्धहस्त लेखणी.
प्रणाम _/\_
पण तुम्हाला एक हरिण सापडेल तर
पण तुम्हाला एक हरिण सापडेल तर शप्पथ, तिकडे शेजारी बघा... जेवणात कधी डुक्कर, कधी रेडा, काल तर चक्क गेंडा होता म्हणे. माझं मेलीचं नशीबच दळभद्री तुमच्यापेक्षा उत्क्रांत स्थळं आली होती पण काय पाहिलं बाबांनी काय माहीत. गिळा ती थालीपीठं आणि पडा आता.>>>>>>.
अस्मिता
(No subject)
(No subject)
वाचत आहे.
वाचत आहे.
पण तुम्हाला एक हरिण सापडेल तर
पण तुम्हाला एक हरिण सापडेल तर शप्पथ, तिकडे शेजारी बघा... जेवणात कधी डुक्कर, कधी रेडा, काल तर चक्क गेंडा होता म्हणे. माझं मेलीचं नशीबच दळभद्री तुमच्यापेक्षा उत्क्रांत स्थळं आली होती पण काय पाहिलं बाबांनी काय माहीत. गिळा ती थालीपीठं आणि पडा आता.>>>> भारी!
परत परत वाचतेय
>> त्यांचे 'सपनोसे भरे नैनाचे
>> त्यांचे 'सपनोसे भरे नैनाचे' फिमेल व्हर्जनही छान आहे
ओहह! अरे मी हेच तर व्हर्शन ऐकले आहे की अनेकदा. धागाभर ज्याची चर्चा आहे ते हेच हे मात्र लक्षात नाही आले.
जेव्हा बघावं तुमचं हेच. सात
जेव्हा बघावं तुमचं हेच. सात हजार वर्षे झाली लग्नाला... चाकाचा शोध मी लावला, लेकरं लहानाची सेपियन मी केली, शेती मी केली. पण तुम्हाला एक हरिण सापडेल तर शप्पथ, तिकडे शेजारी बघा... जेवणात कधी डुक्कर, कधी रेडा, काल तर चक्क गेंडा होता म्हणे. माझं मेलीचं नशीबच दळभद्री तुमच्यापेक्षा उत्क्रांत स्थळं आली होती पण काय पाहिलं बाबांनी काय माहीत. गिळा ती थालीपीठं आणि पडा आता.>>>>>>>
थालीपीठ या मराठमोळ्या पदार्थाचा इतिहास प्रागैतिहासिक काळाइतका जुना आहे हे वाचून आनंद झाला.
जेव्हा बघावं तुमचं हेच. सात हजार वर्षे झाली लग्नाला>>>>>>
या स्वभावाची जनुके इतक्या लाखो वर्षांनंतर सुद्धा अजूनही शाबूत आहेत
अस्मिता .. तु हे असं मनातलं
अस्मिता .. तु हे असं मनातलं फार भारी लिहतेस.. चर्चा वाचतेय!
पण तुम्हाला एक हरिण सापडेल तर शप्पथ, तिकडे शेजारी बघा... जेवणात कधी डुक्कर, कधी रेडा, काल तर चक्क गेंडा होता म्हणे. माझं मेलीचं नशीबच दळभद्री तुमच्यापेक्षा उत्क्रांत स्थळं आली होती पण काय पाहिलं बाबांनी काय माहीत. गिळा ती थालीपीठं आणि पडा आता.>>>>>>
छान लेख आहे
छान लेख आहे
तगमग व्यक्त झाली आहे नेमकेपणाने
झकासराव, चना, मंजूताई, किल्ली
झकासराव, चना, मंजूताई, किल्ली- धन्यवाद सर्वांना
प्रागैतिहासिक काळाइतका जुना आहे हे वाचून आनंद झाला. >>>>> मलाही हल्लीच सापडला उत्खननात
अतुल.
,
धाग्यावर ज्याची चर्चा आहे ते मूळ गाणं शंकर महादेवननी 'लक बाय चान्स' चित्रपटात गायलेलं आहे. हे फिमेल व्हर्जन ओरिजनल नाही आणि तितके ताकदीने गायलेलेही नाही.
मला असं वाटतं की
मला असं वाटतं की आपल्यासारख्या सामान्य लोकांनी ४० नंतर फक्त आणि फक्त स्वतःच्या इच्छा पूर्ण करायची जवाबदारी घेतली पाहिजे. तेवढं जरी केलं तरी पुरे आहे. आपलं लहानपण घरच्या परिस्थितीनुसार जातं. generally, आई-वडिलांच्या इच्छेनुसारच शिक्षण घेतलं जातं. त्यानंतर नोकरी, लग्न, घर, मुलं पाठोपाठ करण्याचं societal/peer pressure असतंच. या सगळ्या धामधुमीत चाळीशी कधी आली कळतही नाही. चाळीशी आल्यावर जरा सुटवंग होतो तेव्हा वेळ मिळतो. मग कळतं की अरेच्चा आतापर्यंत आपण तसं पाहिलं तर सगळंच समाजाच्या नियमांप्रमाणे केलं, पण आपल्याला खरंच हे करायचं होतं का? की हे नसतं केलं तर कदाचित माझं आयुष्य काही वेगळं घडलं असतं? पण आता जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात, तुमच्या आयुष्यावर अधिकार गाजवायला नवरा/बायको, मुलं आणि वृद्धत्त्वेकडे वाटचाल करणारे आई-वडील/सासू-सासरे पण असतात. मग सुरु होतो हा नकोसा प्रवास ज्याचा शेवट काय होणार हे आई-वडिलांकडे पाहून कळलेलं असतं. कदाचित जे लोक स्वतःच्या अत्यंत आवडीचं करिअर आणि life पार्टनर निवडतात त्यांचा हा प्रवास तितका टोकदार नसेल.
अनेकदा मोट्ठ्या लोकांचे interviews प्रसिद्ध होतात ज्यात ते म्हणतात की आयुष्यात सगळं कमावलं पण कुटुंबासोबत म्हणावा तसा वेळ नाही घालवता आला. interviews फक्त मोठया लोकांचेच प्रसिद्ध होतात ना, त्यामुळे एक समज पसरलाय समाजात की फॅमिली टाइम इस मोस्ट इम्पॉर्टन्ट. पण घरी राहणाऱ्या housewife ला कोणी विचारलं की आयुष्य छान मनासारखं गेलं ना तुझं? तर आयुष्याच्या शेवटी सगळ्याच नाही पण मेजॉरिटी बायका म्हणतील की काही केलंच नाही मी, माझं काही वर्तूळंच निर्माण नाही करू शकले मी याचा रिग्रेट आहे. आज आईच्या/सासूच्या होणाऱ्या चिडचिडीच मूळ "माझ्यात potential होतं पण मी त्याचा लाभ नाही करून घेऊ शकले, घर-संसारातच अडकून पडले" यात आहे. त्यामुळे हेच खरंय की कितीही हातपाय मारा, काही ना काही तर करायचं राहूनच जातं. आणि हेच सुटलेलं मग ६० नंतर क्लेश देतं. "कितना भी कर लो बनी, कूछ ना कूछ तो छूटेगा ही" हा मंत्र लक्षात ठेवावा प्रत्येकाने.
पण यात आपल्या इच्छाही बदलत
>>> कदाचित जे लोक स्वतःच्या अत्यंत आवडीचं करिअर आणि life पार्टनर निवडतात त्यांचा हा प्रवास तितका टोकदार नसेल.
पण यात आपल्या इच्छाही बदलत जातात हे लक्षात घेत नाही आहात तुम्ही.
त्या त्या वेळी शिक्षणाबाबतचे, जोडीदाराबाबतचे (जोडीदार हवा की नको हाही) निर्णय तुम्हाला स्वतंत्रपणे घेण्याची मुभा असली तरीही ही फेज येणारच नाही याची गॅरेन्टी नसते. 'तेव्हा ते बरोबर वाटलं, पण आता यात राम वाटत नाही' असं होऊ शकतंच, नव्हे होतंच.
उलट अशा वेळी तुमच्या कुटुंबियांना फसवलं गेल्यासारखं वाटतं! माझ्या पाहण्यात उदाहरणं आहेत.
हो स्वाती, तुम्ही म्हणताय ते
हो स्वाती, तुम्ही म्हणताय ते तर आहेच. तरुणपणी आपण इतके व्यापात असतो की जे करतोय ते सहज सोडता येत नाही. मग जेव्हा सोडायची वेळ येते तेव्हा वाटतं की उगाच इतकं केलं, त्यात काही अर्थच नव्हता. चाळीशी एक टप्पा आहे जेव्हा आपण क्षणभर थांबून विचार करतो आयुष्याचा. तेव्हा लक्षात येतं की आता आहे त्यात इतकं गुरफटलो आहे की मागे फिरू शकत नाही. म्हणून मग निराशा येत असेल.
आस्वाद, पोस्ट आवडली.
आस्वाद, पोस्ट आवडली.
प्रत्येकाने या टप्प्यात (या टप्प्यात कशाला! नेहेमीच) जे मनात येईल ते ट्राय करुन बघायचा, जितका जमेलं तितका लिफाफा पुढे ढकलत रहायचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे. आपपली चौकट आखून त्यात आधी लिफाफा पुढे ढकलत, मग चौकट तोडून आणखी मोठ्या चौकटीत पुढे जात राहिलं पाहिजे.
आपले प्राधान्यक्रम ठरवले असतील तरी प्राधान्यक्रम १ बरोबर २ - ३ - ४ याची ही वेळ येईल याची तजवित सतत करत राहिलं पाहिजे. प्रा. २ येतच नसेल तर, प्रा-१ ला मुरड घालुन, काही तरी बदलुन २- ३ येतील हे बघितलं पाहिजे.
माणूस बदलतो, त्याचे विचार बदलतात हे समजुन काही तरी उगाच तत्त्वांना चिकटून रहाणं तर अजिबात करू नये.
कदाचित जे लोक स्वतःच्या
कदाचित जे लोक स्वतःच्या अत्यंत आवडीचं करिअर आणि life पार्टनर निवडतात त्यांचा हा प्रवास तितका टोकदार नसेल >> करिअर बाबत असहमत. मला अमुक एक करिअर आवडतं, पण करिअरला मी आवडायला पाहिजे ना! माझ्या अनेक मित्रांनी त्यांचं आवडतं करिअर वैतागून सोडलं वयाच्या चाळिशीत आणि आता नवीन करिअर शोधलं जिथे फार डोक्याला ताप पडणार नाही असं. मी पण त्याच मार्गावर आहे.
हरपा >>> आवडीचं करीअर
हरपा >>> आवडीचं करीअर निवडल्यावर त्याचा त्रास/बर्न आउट होऊच शकतो. पण बोचणी लागत नसावी की हे आपण इतरांसाठी करतोय. ‘मी हे केलं असतं तर’ ही गोष्ट त्यांच्या बाबतीत होणार नाही कारण किमान काही प्रमाणात त्यांनी त्यांची स्वप्न जगलेली असतात. स्वप्न बदलूही शकतात नंतर. पण ज्यांनी स्वप्न/इच्छांचा बळीच दिला असेल, त्यांच्या बाबत ही बोच तीव्र असेल.
अच्छा.
अच्छा.
@आशू२९ - वाड्यावर या. तिथे मन
@आशू२९ - वाड्यावर या. तिथे मन मोकळे करा.
@आस्वाद - खूप छान लिहिले आहेत.
अवांतर आहे पण बरेच दिवस झाले
अवांतर आहे पण बरेच दिवस झाले हा प्रश्न पडला आहे - वाड्याचा पत्ता काय आहे?!
https://www.maayboli.com/node
वाडा - https://www.maayboli.com/node/79374
जर नसशील आधीच तर विरंगुळा ग्रूपची मेंबर हो जि. मी काढलेला गप्पांचा वाहता धागा आहे.
विरंगुळा -https://www.maayboli.com/node/1559
धन्यवाद ग अस्मिता! टाकते
धन्यवाद ग अस्मिता! टाकते चक्कर वाड्यावर
अस्मे तुझं आमंत्रण : बाई
अस्मे तुझं आमंत्रण : बाई वाड्यावर या
असं इमॅजिन केलं.
धनुडी
धनुडी
बाई वाड्यावर या >>> मी पण….
बाई वाड्यावर या >>> मी पण तसंच वाचलं.
Pages