मोड़ तो आए, छाँव ना आए- अर्थात Mid Life मधली मनाची तगमग

Submitted by अस्मिता. on 13 May, 2024 - 10:56

( दैनंदिन जीवनातील किरकोळ प्रश्न आणि उत्तरे- या धाग्यावर सहज सुरू झालेल्या चर्चेनंतर मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी सर्वानुमते हा स्वतंत्र धागा काढणं योग्य वाटलं. )

----------------------------

चाळीशी ते साठीच्या दरम्यान आयुष्य निरर्थक वाटणं, ध्येय किंवा उद्दिष्टांबाबत गोंधळ होणं किंवा ती नाहीत असं वाटणं, आपल्या अपेक्षेनुसार एखादं नातं उंचीवर गेलं नाही ह्याची तळमळ वाटणं, आपण आता जे करत आहोत त्याची पाळंमुळं आपल्या बालपणात शोधत बसणं. आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टींना न स्वीकारता आल्याने दिशाहीन वाटणं, धड तरुणही नाही आणि धड म्हातारंही नाही अशी शरीराची सुद्धा चढावरून उताराला लागायची सुरुवात नकोशी वाटणं. वरवरच्या कलकलाटात आतून रिक्त वाटत रहाणं - याला ढोबळपणे Mid life मधली तगमग म्हणता येईल. पण हे याच वयात अशाच पद्धतीने व्हायला हवं याला काही आधार नाही. शंभर वर्षे आयुष्य गृहीत धरून मध्यावर जे स्थैर्य मिळते किंवा ज्या स्थैर्यासाठी अथक झगडलो ते मिळाल्यावर त्याला काही विशेष अर्थ नव्हताच असं लक्षात आल्याने अडकल्यासारखे वाटून जी घुसमट होते त्या प्रकारातील मानसिक द्वंद्वाला- संभ्रमावस्थेला हेच वय असायचं कारणही नाही.

हे जन्मभर अधुनमधून वाटूच शकतं. कुठलंही 'वाटणं' अगदी निराधारही नसतं. विचारपूर्वक घेतलेले निर्णय एवढे चूक निघाले, इतरांनी माझ्यासाठी घेतलेले निर्णयांनी तर बरेचसे मार्ग खुंटले. त्यामुळे जे काही थोडेबहुत चांगले निर्णय घेतले गेले ते सुद्धा अपघाताने झाले असावेत आणि आपलं श्रेय काडीमात्र नाही. आत्मविश्वास सुद्धा काचेचा आणि सकारात्मकता सुद्धा कचकड्याची. वय वाढतंय तसं तसं शक्यतांचे एकेक दरवाजे बंद व्हायला लागले आहेत.‌ स्वतंत्र व्यक्ती म्हणून विशेष पाऊलखुणा उमटवता आल्या नाहीत, सगळी शक्ती संघर्षात पणाला लागतेय.

हल्लींच्या नात्यांबद्दल काय बोलावे, एवढं 'वरवरचं' आयुष्य कुठल्याही पिढीला बघावं लागलं नसेल. सगळा सोशल मीडिया, संवाद, छोट्याछोट्या गोष्टी, अगदी आस्थेवाईकपणे केलेल्या चौकशा वगैरे सुद्धा अतिशय कृत्रिम आणि यांत्रिक वाटतात. जणू हे कालचेच शब्द आज वापरले आहेत आणि उद्या आपणही हेच वापरू किंवा फेकून मारू. सखोल-अर्थपूर्ण बोलायला गेलं तर लोक घाबरून पळायला लागतात. 'आहेत पण आणि नाहीत पण' नात्यांत आपणही 'सेलेक्टिव्हली' वागायला शिकतोच हळूहळू. इकडचं कॉपी-पेस्ट तिकडं करू, वर केक-फुगा चिकटवून टाकू. हाकानाका. जितकं पोकळ तितकं शब्दबंबाळ. जिवंतपणाच नाही कुठे..! तू माझं लक्षात ठेव तरच मी तुझं लक्षात ठेवेन. तेही जर असं भावहीन -कृत्रिम असेल तर विसरलेले उत्तमच नाही का ?!

या सगळ्या गोंधळात आंतरिक ओलावाच किंवा अकृत्रिम ओढच नसण्याने एकतर आपल्यालाही 'यंत्रमानव' व्हावं लागतं, नाहीतर माणसात असूनही प्रचंड एकाकीपणा अनुभवावा लागतो. कधीकधी यंत्रमानवाचा अभिनय जमतोही, कधीकधी we are just too tired to care. दुसऱ्या गटातच बहुतेक वेळा असणाऱ्यांचं वर्तुळ इतकं लहान होत जातं की एका हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकीच लोक हृदयात उरतात. बाकीच्यांना का 'मेन्टेन' करायचं जे कुठलीही सोबत करत नाहीत, कुठलीही भर घालत नाहीत‌. मग आपण मात्र त्यांच्यासाठी मूळ स्वभावाप्रमाणे 'इमोशनली अव्हेलेबल' रहावे की नाही कळत नाही. हातचं राखून ठेवायचा स्वभाव नाही आणि ही बेगडी नाती ओढण्याची मानसिक ताकदही ..!

कुठल्यातरी अनोळखी गर्दीत मनाला बरं वाटावं म्हणून जायचं तर 'फिट इन'च्या प्रयत्नांत 'रोबॉटिक इंटरॅक्शन' करत पार थकून जावं आणि पुन्हा आपल्याच 'लाईफ चॉईसेसचा' पूनर्विचार करावा. आपण नॉर्मल का ॲबनॉर्मल? नॉर्मल म्हणजे नेमकं कसं? सगळे वेडे आणि मीच एकटी-टा शहाणी -ते - ज्याअर्थी मला हे जे वाटतंय, त्याअर्थी सगळे शहाणेच मीच महामूर्ख असले-लो पाहिजे इतके वेगवेगळे निष्कर्ष आणि पुन्हा प्रश्न. उत्तर मिळतच नाही अर्थात..!

आपापल्या भावनांशी प्रामाणिक रहाणं सकारात्मक रहाण्यापेक्षाही महत्त्वाचे आहे. त्यामुळे सगळंच 'ओके' ठरवावं आपल्यापुरतं. Pseudo positivity चं तणाव घेण्यात अर्थ नाही. हल्ली तर हा दबाव सर्वांवर नकळतपणे असतोच. फ्रॉईड म्हणतो तसं अशा अनैसर्गिकपणे दाबलेल्या भावना कधीतरी कुरूप होऊन बाहेर पडतातच. मानसिक द्वंद्वाचा लंब या टोकापासून त्या टोकापर्यंत नेण्याऐवजी सगळ्याला 'जे आहे ते आहे' ह्या मध्यावर उभा करत रहाणं मानसिक आरोग्यासाठी - मनःशांतीसाठी योग्य वाटतं आणि हळूहळू त्यातूनच स्वीकार येतो.

त्यासाठी स्वतः सोबत/ एकांतात वेळ घालवून याचा पुनःपुन्हा निचरा करणं फार आवश्यक. एकदा निचरा केला म्हणजे ते विचार पुन्हा येणार नाहीत ही अपेक्षाही अवास्तव. ते पुन्हा दार ठोठावणारच सरळ एक दार उघडून दुसऱ्या दाराने त्यांना घालवून दिल्याशिवाय त्यांच्या प्रदक्षिणा कमी होत नाहीत. कमीच करायचं आहे- बंद करणं अशक्य आहे. अशक्य गोष्टींचा पाठपुरावा करण्यापेक्षा ध्येयच सोपं ठेवणं नैसर्गिक आणि साध्य वाटतं. आपले विचार म्हणजे आपण नाही. आपली परिस्थिती म्हणजे सुद्धा आपण नाही. अशा प्रकारे चिंतन करीत राहिलो तर त्यांच्यापासून दूर जाता येते. मग ते येत राहिले तरी त्यांची तीव्रता तितकी रहात नाही, बोथट व्हायला लागतात. रस्ता ओळखीचा होतो आणि ह्या चक्रव्यूहातून लवकर बाहेर पडता येतं. आपण सहजासहजी सुखी होऊ शकत नाही, कारण ते मानण्यावर असतं म्हणे. जेव्हा मानता येत नसेल तेव्हा यामार्गाने त्यातल्या त्यात सुखकर जीवन मात्र जगू शकतो.

व्यक्तिसापेक्ष असलं तरी सगळ्यांनाच नेहमीच कमीअधिक प्रमाणात यातून जावे लागते. वयाचं सुद्धा तितकं खरं नाही. असे ठोकताळे माणसाच्या मनाला बांधता येत नाहीत. आपल्या मनात आपल्या शरीरात स्थिर वाटतच नाही आपल्याला कधी. दूरगामी परिणाम वगैरे होत असतील-नसतील पण हा गोंधळ कमी व्हावा यासाठी 'या' क्षणात जगून घेतलं पाहिजे नाही तर आपण कधीच जगू शकत नाही. मला वाटत नाही कुणी ऐंशी वर्षांची व्यक्ती सुद्धा माझा गोंधळ संपून मला आयुष्याचा अर्थ कळला आहे असं प्रामाणिकपणे सांगू शकेल. मग आपण चाळीस वर्षे वाट बघण्यात काय अर्थ आहे , आणि तेवढं जगलोच नाही तर तेही गेलं. त्यापेक्षा आहे त्यातच 'वेचता' आलं पाहिजे.

कदाचित हे सगळं निरर्थक असेलही पण आपापल्या छोट्याशा परीघात त्याला अर्थपूर्ण समजल्याशिवाय- निदान तसा आभास निर्माण केल्याशिवाय आपण समर्पित राहूच शकत नाही- तृप्तता अनुभवू शकत नाही. As Osho once said "Human mind is a great slave but a terrible master..! "

अर्थ शोधण्यापेक्षा समर्पण- कर्मनिष्ठता जास्त मोलाची आहे, किमान जीव जाताना पस्तावा राहणार नाही.‌ तेव्हा ताठ मानेने जाता आलं पाहिजे... नाही का ?! कारण ज्या एकसंधतेची आपण प्रतिक्षा करत असू ती अस्तित्वातच नसेल आणि 'सर्वनाशे समुत्पन्ने ह्यर्धं त्यजति पण्डित:' उक्तीप्रमाणे थोडं फार सातत्याने 'जाऊ दिले' तरीही तुकड्यातुकड्यांतच काही तरी भरीव मिळत जाईल. या सगळ्या सांसारिक महासागरात बहुतेक नाती 'यथा काष्ठम् च काष्ठम् च' ठरतात आणि म्हणूनच शेवटी आपलं स्वतःशी असलेलं नातच आपल्याला सगळ्यातून तारून नेतं. ते आरस्पानी रहायला हवं...!

------------

**तळटीप: आता हे सगळं मला जमलंय का - कधीकधी जमतं. पण शब्दात मांडून ठेवलंय कारण त्याने कुणालातरी सोबत होईल. आयुष्यातील स्थित्यंतरांप्रमाणे हे विचार बदलतही रहातील, कोण सांगावे..!

( शीर्षक:
सपनों से भरे नैना , तो नींद है ना चैना -
Luck by chance - शंकर महादेवन
https://youtu.be/4Q9Ul9PwmxA?si=NEWBoKtntQPHdO98
विश्वास ठेवा या गाण्याइतकं चपखल शीर्षक या भावनांना दुसरं काही असूच शकत नाही असं या क्षणी तरी वाटतंय. ऐकून बघाच. )

©अस्मिता.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिज्ञासा, अगदी अगदी. Happy
मलाही 'मिलाक्रा' शब्द योग्य वाटत नाही. मला हा लेख गोळीबंद, स्पष्ट आणि कुणालाही रिलेटेबल वाटावा असाच ठेवायचा होता.

----------
"but I have promises to keep" हे आयुष्याचे प्राईम मूवर असलं कि सर्वकाही आसान होत जातं. >>> Happy अनुमोदन. म्हणूनच तर त्यावर लिहिले होते आणि काही विचारांची पुनरावृत्ती सुद्धा झाली तिथली इथे.
https://www.maayboli.com/node/84485
-----------

छल्ला, तुला अगदी पोचलं आहे. Happy तुझे खास आभार, तू विचारले आणि मी लिहिले आणि मग लेखही लिहिला. काहीच ठरवून केले नाही, आपोआपच 'घडलेला' लेख आहे.
-----------

पण वैश्विक तत्वाला अनुसरून आहे. त्यामुळे असे हेलकावे अनैसर्गिक नाहीतच. म्हणून आव्हान असते ते एकतर "सकारात्मक वाटलेली" अवस्था टिकवून ठेवण्याचे किंवा या लहरींचा स्विकार करण्याचे.>>> हेच सार आहे लेखाचे. आवडले. Happy

---------

पुढे त्याने काहीसं निराळं (तुझं) वळण घेतलं आहे असं वाटलं. >>> हो. couldn't help it. Happy मी फार तांत्रिक लिहूच शकत नाही, रुक्ष वाटतं मला ते. ही कधी ताकद होते कधी मर्यादा.!

अशा वाटण्याच्या परिणाम होऊन जे निर्णय घेतले जातात ते क्रायसिस असतात याच्याशी सहमत. त्या असुरक्षिततेच्या मुळाशी हा रितेपणाच असावा. मी क्रायसिसपेक्षा 'काय वाटू शकतं' हेच जास्त लिहिलं आहे असं मलाही कुठंतरी वाटलं होतं.

तुम्ही कोणी 'यंग शेल्डन' बघता का? मला त्यातला शेल्डन फिलॉसॉफीचा क्लास घेतो तो एपिसोड महाप्रचंड आवडतो.
फिलॉसॉफिकल थॉटची परिणिती "(Eh!) what's the point?!" अशी उद्बिग्नतेची होण्याऐवजी "(So,) what IS (could be) the point?" अशी कुतुहलाची व्हावी, मग मजा असते.
तो 'सेन्स ऑफ वन्डर' ही समाधानाची गुरुकिल्ली आहे यावर माझा ठाम विश्वास आहे.

तो 'सेन्स ऑफ वन्डर' ही समाधानाची गुरुकिल्ली आहे यावर माझा ठाम विश्वास आहे.
>>> आपल्यातलं लहान मूल कुठेतरी जिवंत राहायला हवं हाच आटापिटा असतो माझाही. ते दिसलंच असेल अर्थात. Lol

अंजली कूल , छान आणि माहितीपूर्ण प्रतिसाद.
मानसशास्त्रात संज्ञा आहेत. त्या माहिती नसल्यास "अरेच्चा ! हे होय ते ?" असं होतं कधी कधी.

थोडं फार ऐकून आहे त्या लक्षणांचा सामना कधी केलाय हे लक्षात नाही. मध्यंतरी पाच वर्षे मात्र वेगळ्या काही कारणांसाठी अस्वस्थतेत गेली. त्या वेळी इईटेशन लेव्हल पीकला असायची. थोडे ओशो कामी आले, काही जैन मुनी कामी आले, कुठे समर्थ रामदास स्वामी धावून आले तर कुठे बुद्ध. मात्र कुणाच्याच आहारी नाही. त्यानंतर खूप शांतावत गेलो अगदी वडलांसारखा. ती वर्षे आयुष्यातून काढून टाकली गेली आहेत. आत्ता या लेखामुळे अचानक आठवली. हा मिड लाईफ क्रायसिस आहे का एव्हढी एक उत्सुकता होती. गडबडीत असल्याने युट्यूब, गुगल करता आले नाही.

डिप्रेशन येणे किंवा महिलांच्या बाबतीत मध्यमवयात दुर्लक्षिणे जाणे हे पण यातच येते का ?
मराठीत अशा संज्ञा का नाहीत ? मध्यान्हीचे पेच असं काव्यात्मक नाव देता आलं असतं की.

मध्यान्हीचे पेच असं काव्यात्मक नाव देता आलं असतं की. >>>> Happy

त्या गाण्यात जावेद अख्तरनी ती तगमग बरोबर चिमटीत पकडून दाखवली आहे. शंकर महादेवनने गायलंयही दणदणीत..!
मलाही ही तगमग अशीच स्ट्रेटफोरवर्डली आणि दणदणीत पोचवायची होती.
ज्यांना सुंदर वाटला-पोचला/ आवडला त्यांचे मनापासून आभार. तुमच्या प्रतिक्रिया बघून 'याजसाठी होता केला अट्टहास' वाटले. /\ Happy

वॉव मोमेंट! सेन्स ऑफ वंडर! कुतुहल!
आईनस्टाईनचा कोट आहे ना... My sense of god is my sense of wonder about the universe. काही तरी गोष्ट पण आहे. आता लक्षात नाही.

मला मिडलाईफ क्रायसिस समजलेला नाही हाच क्रायसिस असल्याने एक स्वतंत्र लेख म्हणून त्याकडे पाहिले नाही.
पण यात जास्तीच काही आहे ते जाणवलं. स्वतः शी बोलल्याप्रमाणे आहे. स्वसंवाद !
पुरूष आपल्या आत कधी इतका डोकावून बघतो का ? कदाचित बायकांप्रमाणे ( महिला म्हणायचा खूप कंटाळा आलाय, कृत्रिमता येते. बाजूला अजितदादा बसलेत आणि भाषण करतोय असा फील येतो) पुरूषांना मानसिक ताणतणावांना सामोरे जावे लागत नसेल.
जेव्हढ्या बायकांशी संपर्क आला त्या नातेसंबंध, भावभावना, वर्तणूक यावरची एव्हढी बारीक निरीक्षणं मांडायच्या कि आपले अज्ञान उघडे पडेल ही भीतीच वाटायची. कदाचित त्या अशा विषयात सीक्रेटली पीएचडी करत असाव्यात.

ढोबळमानाने पुरूष बाहेर असतो. बाहेरचे ताणतणाव बाहेर सोडून येतो. सगळ्यांनाच जमते असे नाही. स्त्रियाही आता मागे नाहीत. पण त्या दोन्हीकडचे ताण स्वतःजवळ वागवतात. हे कंडीशनिंग आहे कि स्त्री स्वभाव ?
लेखाच्या निमित्ताने विषयापासून भरकटलो त्याबद्दल एक उनाड विद्यार्थी म्हणून क्षमा करावी.
( विषयातले काही येत नसेल तर ज्या विषयातले आल्यासारखे वाटते त्याबद्दल बोलले पाहीजे हा मंत्र एका महान व्यक्तीने शिकवला होता).

मनन करावे असे प्रतिसाद आहेत एकेक.

विशेषतः @anjali_kool, @जिज्ञासा, @स्वाती_आंबोळे यांचे प्रतिसाद.

मिलाक्रा (किंवा तत्सम) हा जर रोग मानला तर...

>>'आत्ता नाही तर कधी?!' अशा काहीशा आततायी मनःस्थितीतून काही विचित्र निर्णय घेतले जातात, त्यांचं पर्यवसान 'क्रायसिस'मध्ये होतं. त्यात उगाच महागडी गाडी विकत घेण्यापासून जॉब सोडून देणं, अफेअर करणं, असलं काहीही केलं जातं.

हे त्या रोगाचे कारण आहे. हाच तो विषाणू.

>>It is not really a crisis. ही स्वीकाराची जाणीव तू लिहीले आहेस तशी कोणत्याही वयात होऊ शकते. And it's a beautiful realization

हि लस आहे. रोग होऊ नये म्हणून आधीच घ्यावी. (कारण अशी स्वीकाराची जाणीव आली कि मग crisis हा crisis वाटत नाही)

>>आपल्याला जे काही वाटतंय ती सर्व भडास, चिडचिड, शिव्या, अद्वा तद्वा बोलणे, सगळं उलथवून टाकलं पाहिजे, वगैरे वगैरे सर्व सर्व मनमोकळेपणाने भराभर भराभर लिहायचे व तो कागद पुन्हा अजिबात न वाचता, एकदाही वाचायचे नाही हा नियम imp आहे!!

आणि हे औषध आहे. रोग झाल्यावर घेऊन बघायचे असते.

तुम्ही कोणी 'यंग शेल्डन' बघता का? मला त्यातला शेल्डन फिलॉसॉफीचा क्लास घेतो तो एपिसोड महाप्रचंड आवडतो.>> युट्यूबवर शोधतेय , पण स्वाती ह्याची नेमकी लिंक असेल तर शेअर करतेस का?

स्वातीचा प्रतिसाद योग्य असल्याने शीर्षक misleading वाटतेय, खुपायला लागलं चक्कं. तेवढं बदलून 'मनाची तगमग' ठेवतेय. धन्यवाद गं. Happy कारण मी क्रायसिस बद्दल न लिहिता तगमगीबद्दलच फक्त लिहिले आहे. कृपया समजून घेणे. मी गडबड केली होती ती दुरुस्त केली आहे. क्षमस्व आणि आभार. Happy

नाही नाही, धन्यवाद काय! तुझ्या या प्रकट चिंतनाच्या निमित्ताने माझंही थोडं विचारमंथन झालं, शिवाय इतकं छान गाणं हाताला लागलं.
तेव्हा 'तुम्ही कसले थँक्यू, आम्हीच थँक्यू!' Proud Happy

वृषाली, नेटफ्लिक्सवर आहे - सीझन ४ एपिसोड ७.

हा लेख हे प्रामाणिक आणि मनस्वी कथन आहे.

चर्चेचा धागा थोडा पुढे नेतो.

आयुष्य आणि माझी समज

माझी टिन एजपासून ' आयुष्याचा अर्थ ' समजण्याची तगमग सुरू होती. समर्थांचा ' दासबोध ' वाचल्याने समजेल असे वाटले. थोडेफार बरे वाटले पण या आणि त्या काळात खूप फरक असल्याने relevance काही बाबतीत नाहीये.

पुढे ' मिलिंद बोकील ' यांच्या गवत्या या पुस्तकातून काही cues मिळताहेत असे वाटले , पण त्यातूनही आयुष्याचा बराच बेस बनला. पुन्हा पोकळी आलीच, करणं पुस्तक व माझे जग पूर्ण वेगळे.

पुढे भरपूर इंटरनेट आणि Quotes चे पीक मोबाईल आणि मेमरी कार्डमध्ये तरारून आले. काही उपयोगी पडले कारण releavant होते, जबरदस्त. रुमी, खालिल जिब्रान फारच मदत करतात, to anchor self.

मात्र एक प्रश्न मला कोणताही निर्णय बेधडक घेण्यास उपयुक्त ठरतोय, त्यामुळे विचारचक्राच्या चरकातून (overthinking) मी दरवेळी सुटतो तो म्हणजे, ' Will I regret of this decision on my deathbed? '
आणि मग कोंडी आपोआप फुटते.

या विचारांसंबंधी 2 दुवे -
1. सातत्याने विचार लिहून काढणे व त्यावर लक्ष ठेवून स्वतःच उपाय देऊ करणे. (ज्याबद्दल याच दुव्यात आधी एकदा उल्लेख झाला आहे.)
2. ' what advice will you give to your younger self? shorts

हाहा ! भारी relation लावले अतुल. तुम्ही !
मात्र हे औषध त्यांनाच लागू होते ज्यांना खरोखर बाहेर पडायचे आहे एखाद्या समस्येतून.. नाहीतर काहीजण असतात बघा त्यांना सतत आपले दुःख उगाळायचे असते .. त्यातून सहानुभूती मिळवत राहायची असते, सतत सतत आणि सतत ..! त्यांना हेच आवडते. त्यामुळे त्यांना काही नि कितीही दिले नि ते कसेही असले तरी त्यात फार समाधान नाही वाटत वाटले तरी ते टिकत नाही, लगेच ते काही ना काही कुरबुरी सुरु तरी करतात किंवा त्याना जे मिळाले आहे ते कोणत्या ना कोणत्या भंपक कारणामुळे हातातून घालवुन बसतात.. ! थांबते.
आज पुन्हा वाचला हा लेख.. मस्तच लिहिलंय !

रुमी, खालिल जिब्रान फारच मदत करतात, to anchor self.
>>> अगदी. रुमीचे एक कोट वाचले तरी दिवसभर चिंतन करता येईल असं त्यातून प्रत्येकवेळी काहीतरी नवीन मिळतंच. पुस्तक वाचायची सुद्धा गरज राहू नये इतकं ते एका वाक्यात लिहून जातात.

Will I regret of this decision on my deathbed? '>>> खरंच. Happy

तुम्हाला जे दासबोधाने दिले ते काहीसे मला ज्ञानेश्वरीने दिले. मी संक्षिप्त ज्ञानेश्वरी वाचली आहे, समग्र नाही.

पोस्ट आवडली ब्लू कोलंबसे. Happy

तेव्हा 'तुम्ही कसले थँक्यू, आम्हीच थँक्यू!'
>>> Lol

हो, अंजली कूल. असतात अशी लोक.
आपली शारीरिक/ मानसिक ताकद सुद्धा मर्यादित आहे. हे लक्षात ठेवून प्राधान्यक्रम बनवायचा आणि क्षुल्लक आणि निरूपयोगी गोष्टींमधे अ जि बा त एनर्जी घालवायची नाही एवढं लक्षात ठेवलं आहे.

आचार्य, स्त्री-पुरुष असं काही नसावं यात. आपण (कदाचित स्मरणशक्ती, संवेदनशीलता या गोष्टींप्रमाणे ) निरीक्षण-शक्ती जन्माला घेऊन येत असू सोबत. नंतर काहीजणं ही गमावत असावेत, काहीजणांची तीव्र होत जात असेल, आनुवंशिकता आणि ट्रेनिंग दोन्ही असावं. मी तज्ज्ञ नाही पण सर्वच गुणावगुणांबाबत बाबतीत मला असेच वाटते. काही जणांचा मेंदू स्वतःच स्वतःला शिकवू शकतो, ते निरीक्षणातून आणि आकलनातून होत असावे. यापैकी एकही नसेल तर ती प्रक्रिया थांबते/ मंदावते. आपलं मन आणि मेंदू किती adaptive/ receptive आहे , यावर आपले बरेच आनंद आणि क्लेश - त्यांच्या तीव्रता - जाणिवा अवलंबून असाव्यात. कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला वेगळीवेगळी पोचते- उतरते.

स्त्रियांच्या बाबतीत अनेक मेडिकल कंडिशन्स 'हॉर्मोनल बिहेवियर' म्हणून डिसमिस केल्या जातात हे एक दुर्दैवी वास्तव आहे. त्यामुळे 'स्त्रियांचा मिडलाइफ क्रायसिस' यावर पुरेसा अभ्यासच झालेला नसण्याची शक्यता आहे.

शक्य आहे..!

माझा प्रतिसाद याला छेद देत असेल तर कळव, मी उडवेन. कारण कुणाचा गोंधळ वाढावा असं जाणूनबुजून काही करायचं नाहीये.

नाही नाही, तूही 'स्त्री-पुरुष असं काही नसावं यात' असंच म्हटलं आहेस की.

शिवाय नेमक्या याच वयात स्त्रिया पेरिमेनॉपॉजल, मेनॉपॉजल असतात - त्यामुळे त्यांची सगळी शारीरिक/मानसिक लक्षणं त्या रकान्यात नोंदवली जाण्याची शक्यता असते - तेही मुळात त्या लक्षणांकडे गांभीर्याने पाहिलं गेलं तर!

अवांतर : मेडिकल, फार्मासूटिकल रीसर्च आणि ट्रायल्समध्ये स्त्रियांचा अभ्यास कमी - नगण्यच - केला जातो असा विदा आहे. त्याचं कारण ट्रायलच्या दरम्यात त्यांच्यात सतत/दरमहा हॉर्मोनल बदल होत राहातात, त्यात शिवाय प्रेग्नन्सीची शक्यता असते. परिणामी आपण जी औषधं किंवा त्यांची जी मात्रा (डोसेज) घेतो, त्यांचा फीमेल बॉडीसाठी खरंतर अभ्यास झालेलाच नसतो.
त्यात लक्षणं लपवण्याकडे, उपचार टाळण्याकडे स्त्रीचा आणि दुर्लक्ष करण्याकडे तिच्या नातेवाईक आणि डॉक्टर्सचा कल असला की दुष्काळात तेरावा महिनाच!

पुन्हा एकदा मूळ विषयाशी संबंधित नसल्याने आधीच माफी.

स्त्री पुरूषांमधे स्त्रीचं निरीक्षण हे काही बाबतीत पुरूषापेक्षा इतकं सरस असतं कि कधी कधी कॉम्प्लेक्स येतो. स्त्री वाद, समानता हे एकीकडे ठेवूयात. कारणे काय असतील ती असोत , पण बहुतेक पुरूषांना घरातल्या (एकत्र असतील तर) सासू सून, नणंद भावजय,जावा जावा या वादात लक्ष द्यायचं नसतं. मुलं, पुरूष घरात असून नसल्यासारखे असतात. अपवादांनी स्वतःला वगळावे. घरातले हे ताणतणाव स्त्रीच्या वाट्याला येत असल्याने असेल कदाचित, तिचं निरीक्षण हे परिस्थितीजन्य प्रॉडक्ट असावं.

त्याला उत्क्रांतीचा ग्राफ कारणीभूत आहे असं वाचनात आलं होतं.
आपल्या हंटर गॅदरर पूर्वजांपैकी पुरुष सहसा अन्नाच्या शोधात फिरत, तर स्त्रिया कळपात राहून मुलं वाढवणं, कालांतराने शेती इत्यादी सांभाळत.
त्यामुळे उदा. दिशांचा अंदाज (स्पेशिअल रेकग्निशन) पुरुषांत विकसित होत गेला, तर (कळपाशी जुळवून घेण्याची गरज जास्त असल्यामुळे) 'रीडिंग द रूम' म्हणतात ते कसब स्त्रियांनी जास्त चांगलं आत्मसात केलं.

(तुम्ही माफी मागितली आहेच, तेव्हा आता मी निराळी मागत नाही. Proud )

असंच अवांतर करत न्या आता आदिमानवापर्यंत...! Happy
------------
निरीक्षणशक्ती मला मानवी मेंदूचा cerebral part / वर्तणुक वाटायची जिथे सगळं लिंगनिरपेक्ष आहे. अर्थात थोडंफार acquired सुद्धा. स्वातीने महिला दिनानिमित्त लिहिलेल्या लेखात 'महापुरात तगणारी लव्हाळी' म्हटले होते, तेही शारीरिक पातळीवर किंवा कायम अधिकच्या संघर्षामुळे hone झालेले genetical adaptation वाटले होते. असो.

हंटर्सना निरीक्षणशक्ती हवीच ना, नाहीतर हरीण समोरून निघून गेलं तरी हे भालाच शोधत बसतील. तिकडे गॅदरर्स घरी आल्यावर, 'जेव्हा बघावं तुमचं हेच. सात हजार वर्षे झाली लग्नाला... चाकाचा शोध मी लावला, लेकरं लहानाची सेपियन मी केली, शेती मी केली. पण तुम्हाला एक हरिण सापडेल तर शप्पथ, तिकडे शेजारी बघा... जेवणात कधी डुक्कर, कधी रेडा, काल तर चक्क गेंडा होता म्हणे. माझं मेलीचं नशीबच दळभद्री तुमच्यापेक्षा उत्क्रांत स्थळं आली होती पण काय पाहिलं बाबांनी काय माहीत. गिळा ती थालीपीठं आणि पडा आता.
Wink

फार भारी लिहिलंयस गं. तुझी चिंतनं अतिशय आवडतात.

आपल्यामुळे जग चालत नाहीये हे उमगणे, ते स्वीकारणे म्हणजेच ego death असावी. नंतरचं आयुष्य बर्‍यापैकी शांत होतं.

हे स्त्री च्या निरीक्षणावरून यंग शेल्डन आणि त्याच्या बहिणीचा स्टडी आठवला.एका चित्रावरून शेल्डन फक्त 'माकड चहा पितंय' इतका निष्कर्ष काढतो आणि त्याची बहीण पूर्ण 10 निष्कर्ष काढून त्या स्त्री डॉक्टर ला 'त्या अमक्या डॉक्टर ला तू आवडतेस' हे पण सांगते Happy
एक पुस्तक वाचायला घेतलंय त्यात वाचलं की फिमेल बॉडी केलेला एकाच प्रायोगिक औषधाचा प्रयोग (थॅलिडोमाईड) इतका महाग पडला की 'चाईल्ड बेअरिंग एज' च्या बायकांना कोणत्याही औषध प्रयोगात घ्यायला कायदेशीर मनाई करणारे कायदे आले.

अस्मिता.. Lol
अवांतर झाली असली तरी किती छान चर्चा! खूप पैलू सापडले, तुझ्या या स्वगतातून !
Happy
आणि मुख्य म्हणजे, कुणीही याला ' भरल्या पोटाची थेरं..! ' असं हिणवलं नाही.

स्त्री पुरुष विचार कसे करतात याचं धाग्याशी संबंधित -

मी नुकतेच 'अंजली चिपलकट्टी ' यांचे ' माणूस असा का वागतो ?' हे पुस्तक पूर्ण वाचले. मला मानवी वर्तनाच्या बऱ्याच पैलूंचा सहज उलगडा झाला.
जिज्ञासू लोकांनी नक्की वाचावे.

https://www.amazon.in/Manoos-asa-Vagto-Anjali-Chipalkatti/dp/9395483865

तुम्ही माफी मागितली आहेच, तेव्हा आता मी निराळी मागत नाही >> माफी मागायचं नाटक होतं ते. मनातून अजिबात नव्हतं. Proud

माझी आजी (वडलांची आई) पाच फूट आठ इंच उंचीची. डबल हड्डी (व्याख्या नका विचारू). दणकट होती. दोन दोन बैलं शिंगांना धरून गोठ्यात आणून बांधायची ताकद अंगात होती. लहानपणापासून गुरं राखायला शेतात जायची. तिच्या माहेरी परिस्थिती चांगली होती. मात्र सासरी पती, दीर आणि नणंद एव्हढेच लोक. गरीबी.

तिच्याकडे आपोआप सत्ता आली. निर्णय घेणारी तीच होती. आजोबाच काय त्यांचे मित्र सुद्धा तिला घाबरायचे. तिच्या वाटेला घरातले शह काटशहाचे राजकारण आले नाही त्यामुळे तिची ही समज कधी फारशी विकसित झाली नाही. ती पुरूषाप्रमाणेच थेट प्रतिक्रिया द्यायची.
ही गोष्ट आत्या एकमेकींशी गप्पा मारायच्या तेव्हां समजली.

काही काही गोष्टी मात्र परिस्थितीजन्य नसाव्यात असे वाटते. उदा. एखाद्या स्त्री ला आपण टाळू लागलो कि तिला ते सिक्स्थ सेन्स असल्याप्रमाणे जाणवते आणि आडवळणाने ती विचारतेच. असा सिक्स्थ सेन्स ( प्रतिकात्मक आहे ते Proud ) असलेले लोक ( बहुधा स्त्रिया) आजूबाजूला असल्या कि स्कॅनर खाली वावरल्याचा फील येतो.

बायकांच्या मनाचा थांग लागत नाही आणि आपले सगळे खुली किताब. उलट जितके लपवावे तितके ते टिंगल करत उघड करून दाखवले जाते. Lol

इथे थांबवतो अवांतर.

सद्ध्या फार त्रासातून जात आहे मित्रंमंडळी जीवघेण्या आजाराच्या कचाट्यात सापडलीत & मी ऑफिसात १ बुलींग ला तोंड देत आहे. मनोबल वाढण्याची गरज आहे.
हा लेख निवडक मधे टाकलाय, ऑथर बघून Happy मनन करत वाचण्यात येईल Happy

आचार्य, मला आवडली तुमची आज्जी..! अपारंपरिक असायला आणि ते वागवायला सुद्धा एकप्रकारचे धाडस लागते , त्यामुळे कौतुकच वाटले. Happy

असा सिक्स्थ सेन्स ( प्रतिकात्मक आहे ते ) असलेले लोक ( बहुधा स्त्रिया) आजूबाजूला असल्या कि स्कॅनर खाली वावरल्याचा फील येतो.>>> Lol Wink

Pages