मोड़ तो आए, छाँव ना आए- अर्थात Mid Life मधली मनाची तगमग

Submitted by अस्मिता. on 13 May, 2024 - 10:56

( दैनंदिन जीवनातील किरकोळ प्रश्न आणि उत्तरे- या धाग्यावर सहज सुरू झालेल्या चर्चेनंतर मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी सर्वानुमते हा स्वतंत्र धागा काढणं योग्य वाटलं. )

----------------------------

चाळीशी ते साठीच्या दरम्यान आयुष्य निरर्थक वाटणं, ध्येय किंवा उद्दिष्टांबाबत गोंधळ होणं किंवा ती नाहीत असं वाटणं, आपल्या अपेक्षेनुसार एखादं नातं उंचीवर गेलं नाही ह्याची तळमळ वाटणं, आपण आता जे करत आहोत त्याची पाळंमुळं आपल्या बालपणात शोधत बसणं. आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टींना न स्वीकारता आल्याने दिशाहीन वाटणं, धड तरुणही नाही आणि धड म्हातारंही नाही अशी शरीराची सुद्धा चढावरून उताराला लागायची सुरुवात नकोशी वाटणं. वरवरच्या कलकलाटात आतून रिक्त वाटत रहाणं - याला ढोबळपणे Mid life मधली तगमग म्हणता येईल. पण हे याच वयात अशाच पद्धतीने व्हायला हवं याला काही आधार नाही. शंभर वर्षे आयुष्य गृहीत धरून मध्यावर जे स्थैर्य मिळते किंवा ज्या स्थैर्यासाठी अथक झगडलो ते मिळाल्यावर त्याला काही विशेष अर्थ नव्हताच असं लक्षात आल्याने अडकल्यासारखे वाटून जी घुसमट होते त्या प्रकारातील मानसिक द्वंद्वाला- संभ्रमावस्थेला हेच वय असायचं कारणही नाही.

हे जन्मभर अधुनमधून वाटूच शकतं. कुठलंही 'वाटणं' अगदी निराधारही नसतं. विचारपूर्वक घेतलेले निर्णय एवढे चूक निघाले, इतरांनी माझ्यासाठी घेतलेले निर्णयांनी तर बरेचसे मार्ग खुंटले. त्यामुळे जे काही थोडेबहुत चांगले निर्णय घेतले गेले ते सुद्धा अपघाताने झाले असावेत आणि आपलं श्रेय काडीमात्र नाही. आत्मविश्वास सुद्धा काचेचा आणि सकारात्मकता सुद्धा कचकड्याची. वय वाढतंय तसं तसं शक्यतांचे एकेक दरवाजे बंद व्हायला लागले आहेत.‌ स्वतंत्र व्यक्ती म्हणून विशेष पाऊलखुणा उमटवता आल्या नाहीत, सगळी शक्ती संघर्षात पणाला लागतेय.

हल्लींच्या नात्यांबद्दल काय बोलावे, एवढं 'वरवरचं' आयुष्य कुठल्याही पिढीला बघावं लागलं नसेल. सगळा सोशल मीडिया, संवाद, छोट्याछोट्या गोष्टी, अगदी आस्थेवाईकपणे केलेल्या चौकशा वगैरे सुद्धा अतिशय कृत्रिम आणि यांत्रिक वाटतात. जणू हे कालचेच शब्द आज वापरले आहेत आणि उद्या आपणही हेच वापरू किंवा फेकून मारू. सखोल-अर्थपूर्ण बोलायला गेलं तर लोक घाबरून पळायला लागतात. 'आहेत पण आणि नाहीत पण' नात्यांत आपणही 'सेलेक्टिव्हली' वागायला शिकतोच हळूहळू. इकडचं कॉपी-पेस्ट तिकडं करू, वर केक-फुगा चिकटवून टाकू. हाकानाका. जितकं पोकळ तितकं शब्दबंबाळ. जिवंतपणाच नाही कुठे..! तू माझं लक्षात ठेव तरच मी तुझं लक्षात ठेवेन. तेही जर असं भावहीन -कृत्रिम असेल तर विसरलेले उत्तमच नाही का ?!

या सगळ्या गोंधळात आंतरिक ओलावाच किंवा अकृत्रिम ओढच नसण्याने एकतर आपल्यालाही 'यंत्रमानव' व्हावं लागतं, नाहीतर माणसात असूनही प्रचंड एकाकीपणा अनुभवावा लागतो. कधीकधी यंत्रमानवाचा अभिनय जमतोही, कधीकधी we are just too tired to care. दुसऱ्या गटातच बहुतेक वेळा असणाऱ्यांचं वर्तुळ इतकं लहान होत जातं की एका हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकीच लोक हृदयात उरतात. बाकीच्यांना का 'मेन्टेन' करायचं जे कुठलीही सोबत करत नाहीत, कुठलीही भर घालत नाहीत‌. मग आपण मात्र त्यांच्यासाठी मूळ स्वभावाप्रमाणे 'इमोशनली अव्हेलेबल' रहावे की नाही कळत नाही. हातचं राखून ठेवायचा स्वभाव नाही आणि ही बेगडी नाती ओढण्याची मानसिक ताकदही ..!

कुठल्यातरी अनोळखी गर्दीत मनाला बरं वाटावं म्हणून जायचं तर 'फिट इन'च्या प्रयत्नांत 'रोबॉटिक इंटरॅक्शन' करत पार थकून जावं आणि पुन्हा आपल्याच 'लाईफ चॉईसेसचा' पूनर्विचार करावा. आपण नॉर्मल का ॲबनॉर्मल? नॉर्मल म्हणजे नेमकं कसं? सगळे वेडे आणि मीच एकटी-टा शहाणी -ते - ज्याअर्थी मला हे जे वाटतंय, त्याअर्थी सगळे शहाणेच मीच महामूर्ख असले-लो पाहिजे इतके वेगवेगळे निष्कर्ष आणि पुन्हा प्रश्न. उत्तर मिळतच नाही अर्थात..!

आपापल्या भावनांशी प्रामाणिक रहाणं सकारात्मक रहाण्यापेक्षाही महत्त्वाचे आहे. त्यामुळे सगळंच 'ओके' ठरवावं आपल्यापुरतं. Pseudo positivity चं तणाव घेण्यात अर्थ नाही. हल्ली तर हा दबाव सर्वांवर नकळतपणे असतोच. फ्रॉईड म्हणतो तसं अशा अनैसर्गिकपणे दाबलेल्या भावना कधीतरी कुरूप होऊन बाहेर पडतातच. मानसिक द्वंद्वाचा लंब या टोकापासून त्या टोकापर्यंत नेण्याऐवजी सगळ्याला 'जे आहे ते आहे' ह्या मध्यावर उभा करत रहाणं मानसिक आरोग्यासाठी - मनःशांतीसाठी योग्य वाटतं आणि हळूहळू त्यातूनच स्वीकार येतो.

त्यासाठी स्वतः सोबत/ एकांतात वेळ घालवून याचा पुनःपुन्हा निचरा करणं फार आवश्यक. एकदा निचरा केला म्हणजे ते विचार पुन्हा येणार नाहीत ही अपेक्षाही अवास्तव. ते पुन्हा दार ठोठावणारच सरळ एक दार उघडून दुसऱ्या दाराने त्यांना घालवून दिल्याशिवाय त्यांच्या प्रदक्षिणा कमी होत नाहीत. कमीच करायचं आहे- बंद करणं अशक्य आहे. अशक्य गोष्टींचा पाठपुरावा करण्यापेक्षा ध्येयच सोपं ठेवणं नैसर्गिक आणि साध्य वाटतं. आपले विचार म्हणजे आपण नाही. आपली परिस्थिती म्हणजे सुद्धा आपण नाही. अशा प्रकारे चिंतन करीत राहिलो तर त्यांच्यापासून दूर जाता येते. मग ते येत राहिले तरी त्यांची तीव्रता तितकी रहात नाही, बोथट व्हायला लागतात. रस्ता ओळखीचा होतो आणि ह्या चक्रव्यूहातून लवकर बाहेर पडता येतं. आपण सहजासहजी सुखी होऊ शकत नाही, कारण ते मानण्यावर असतं म्हणे. जेव्हा मानता येत नसेल तेव्हा यामार्गाने त्यातल्या त्यात सुखकर जीवन मात्र जगू शकतो.

व्यक्तिसापेक्ष असलं तरी सगळ्यांनाच नेहमीच कमीअधिक प्रमाणात यातून जावे लागते. वयाचं सुद्धा तितकं खरं नाही. असे ठोकताळे माणसाच्या मनाला बांधता येत नाहीत. आपल्या मनात आपल्या शरीरात स्थिर वाटतच नाही आपल्याला कधी. दूरगामी परिणाम वगैरे होत असतील-नसतील पण हा गोंधळ कमी व्हावा यासाठी 'या' क्षणात जगून घेतलं पाहिजे नाही तर आपण कधीच जगू शकत नाही. मला वाटत नाही कुणी ऐंशी वर्षांची व्यक्ती सुद्धा माझा गोंधळ संपून मला आयुष्याचा अर्थ कळला आहे असं प्रामाणिकपणे सांगू शकेल. मग आपण चाळीस वर्षे वाट बघण्यात काय अर्थ आहे , आणि तेवढं जगलोच नाही तर तेही गेलं. त्यापेक्षा आहे त्यातच 'वेचता' आलं पाहिजे.

कदाचित हे सगळं निरर्थक असेलही पण आपापल्या छोट्याशा परीघात त्याला अर्थपूर्ण समजल्याशिवाय- निदान तसा आभास निर्माण केल्याशिवाय आपण समर्पित राहूच शकत नाही- तृप्तता अनुभवू शकत नाही. As Osho once said "Human mind is a great slave but a terrible master..! "

अर्थ शोधण्यापेक्षा समर्पण- कर्मनिष्ठता जास्त मोलाची आहे, किमान जीव जाताना पस्तावा राहणार नाही.‌ तेव्हा ताठ मानेने जाता आलं पाहिजे... नाही का ?! कारण ज्या एकसंधतेची आपण प्रतिक्षा करत असू ती अस्तित्वातच नसेल आणि 'सर्वनाशे समुत्पन्ने ह्यर्धं त्यजति पण्डित:' उक्तीप्रमाणे थोडं फार सातत्याने 'जाऊ दिले' तरीही तुकड्यातुकड्यांतच काही तरी भरीव मिळत जाईल. या सगळ्या सांसारिक महासागरात बहुतेक नाती 'यथा काष्ठम् च काष्ठम् च' ठरतात आणि म्हणूनच शेवटी आपलं स्वतःशी असलेलं नातच आपल्याला सगळ्यातून तारून नेतं. ते आरस्पानी रहायला हवं...!

------------

**तळटीप: आता हे सगळं मला जमलंय का - कधीकधी जमतं. पण शब्दात मांडून ठेवलंय कारण त्याने कुणालातरी सोबत होईल. आयुष्यातील स्थित्यंतरांप्रमाणे हे विचार बदलतही रहातील, कोण सांगावे..!

( शीर्षक:
सपनों से भरे नैना , तो नींद है ना चैना -
Luck by chance - शंकर महादेवन
https://youtu.be/4Q9Ul9PwmxA?si=NEWBoKtntQPHdO98
विश्वास ठेवा या गाण्याइतकं चपखल शीर्षक या भावनांना दुसरं काही असूच शकत नाही असं या क्षणी तरी वाटतंय. ऐकून बघाच. )

©अस्मिता.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुख है अलग और चैन अलग है
पर ये जो देखे वो नैन अलग है
चैन तो है अपना सुख है पराए!! क्या बात है! जावेद अख्तर!
हे गाणं कार मध्ये अनेकदा ऐकुनही फक्त चालीकडे लक्ष दिलेलं. चपखल शीर्षकाबद्दल अगदीच! +१०० आज दिवसभर चावायला मस्त गाणं मिळालं. Happy

पस्तावणार नाही, आणि 'हे 'केलं नाही. करायला हवं होतं असं ज्या बद्दल वाटेल ते ते सगळं करायचा प्रयत्न करतो. आणि कर्मनिष्ठतेला ही +१. सातत्य आणि एकदा काही ठरवले आणि मग ते चुकीचे निघाले तरी ठरवताना काथ्याकूट केलेला असला की मागुन पश्चात्ताप होत नाही, असं वाटतं. बाकी परत वाचुन विचार करेन.

सुरेख लिहिलयस. "त्यासाठी स्वतः सोबत/ एकांतात वेळ घालवून याचा पुनःपुन्हा निचरा करणं फार आवश्यक. एकदा निचरा केला म्हणजे ते विचार पुन्हा येणार नाहीत ही अपेक्षाही अवास्तव" हे एकदमच चपखल आहे.

विश्वास ठेवा या गाण्याइतकं चपखल शीर्षक या भावनांना दुसरं काही असूच शकत नाही >> त्रिवार अनुमोदन !

>> आपले विचार म्हणजे आपण नाही. आपली परिस्थिती म्हणजे सुद्धा आपण नाही. अशा प्रकारे चिंतन करीत राहिलो तर त्यांच्यापासून दूर जाता येते.
>> अर्थ शोधण्यापेक्षा समर्पण- कर्मनिष्ठता जास्त मोलाची आहे

ok-hand_medium-light-skin-tone_1f44c-1f3fc_1f3fc (1).png

लेखिकेच्या नावासहित नोंदवून ठेवलं!
संपूर्ण लेख वैचारिक रवंथ आहे आणि अशी रवंथ होणे हाच मिलाक्रा वर उपाय आहे.
Pseudo positivity तकलादूच. पण खरी सकारात्मकता सुध्दा अशक्य नाही. आव्हान असे असते की ती टिकून राहत नाही. चमकून जाते मध्येच. एका क्षणी सकारात्मक वाटणे दुसऱ्या क्षणी निरर्थक वाटणे. लाटा/तरंग/लहरी काही म्हणा याला. पण वैश्विक तत्वाला अनुसरून आहे. त्यामुळे असे हेलकावे अनैसर्गिक नाहीतच. म्हणून आव्हान असते ते एकतर "सकारात्मक वाटलेली" अवस्था टिकवून ठेवण्याचे किंवा या लहरींचा स्विकार करण्याचे.

सर्कशीत उंच उंच जागी विदूषक उभा असतो. झोका येतो त्या दांडीस तो पकडतो. पकडून ठेवतो. ती पकड तशीच राहिली तर त्या झोक्यासोबत पलीकडे जाण्यात यशस्वी होतो. पण नाही राहिली तरी काय झाले? खाली जाळीवर पडून हसतोच ना?

हे सकारात्मकतेचे विचार त्या झोक्याप्रमाणे, आणि आपण सारे जोकर!

मस्त लिहिलंयस अस्मिता.चपखल व्याख्या.सर्वच पटलं त्यामुळे काय काय कोट करावं हाच प्रश्न आहे.>> अगदी अगदी!

प्रत्येक वाक्याला अगदी अगदी झालं.तू किती छान लिहू शकतेस अस्मे. आता या वरती प्रतिसादपण तेवढेच छान आणि वाचनीय येतील. वाट बघतेय.

छान लिहीले आहे. बरेचसे समजले, काही रिलेट झाले. काही अजून नीट समजून घ्यावे लागेल.

ते गाणेही वरवरच ऐकले आहे. आता पुन्हा लिरीक्स पाहिले आणि लक्षात आले की भारी आहेत.

फारच सुंदर लिहिले आहे. अख्खा लेख कोट करतोय..
नवीन धागा काढल्याबद्दल धन्यवाद.
तूर्तास रुमाल
प्रतिसाद वाचतोय... तितकेच वाचनीय येतील असे वाटते कारण इथे बहुतांश लोकांना रीलेट होणारा विषय आहे.

छान लिहीले आहे. बरेचसे समजले, काही अजून नीट समजून घ्यावे लागेल. >> +१
असेच वाटले.
(मानसिक वय १९ असल्याने असेल, रिलेट व्हायला अवघड आहे. ३१ वर्षानंतर कदाचित समजेल हा लेख. Happy )

अनु ला अनुमोदन. सगळंच कोट करण्याजोगं आहे. अस्मिता, (जनसामान्यांच्या) चाळिशीतील 'अस्मिते' चे भावतरंग सुरेख टिपले आहेस तू.

अतिशय सुंदर धागा. शीर्षक माझ्या आवडत्या गाण्यांपैकी आल्याने लेख वाचता वाचता पार्श्वभूमीला शंकर महादेवनच्या आवाजात त्या ओळी वाजत राहिल्या आणि या विषयाला त्या चपखल बसत आहेत हे ही जाणवलं. मैने इस गाने को कभी 'उस नजर से' नहीं देखा था Wink

स्वतंत्र लेख लिहिल्याबद्दल अनेक आभार अस्मिता. तो प्रश्न किरकोळ प्रश्नांच्या धाग्यावर आला असला तरी विषय किरकोळ अजिबात नाही. लेखातले सर्वच मुद्दे विचार करण्यासारखे आणि आचरणात आणावेत असे आहेत. वरचा अतुल यांचा प्रतिसादही आवडला.

खूप खूप सुंदर आणि अगदी मनातलं लिहिलं आहे.
बऱ्याच गोष्टी रीलेट झाल्या.
पुन्हा एकदा वाचून, मनन करून प्रतिक्रिया देईन.

मला वाटतं हा सेलेब्रीटींचा प्रॉब्लेम असावा. जेव्हा जेव्हा क्रिकेटर्स, टेनिस प्लेअर्स इ.रिटायरमेंट जाहीर करतात, तेव्हा त्यांच्या पेक्षा मीच जास्त अस्वस्थ होतो. आता हे पुढचे आयुष्य कसे काढणार? त्यापेक्षा अंबानी अडाणी बेझो इ. जास्त नशीबवान. अजून येऊ द्या, अजून येऊ द्या, म्हणत असतात. त्यांच्या आयुष्यात हे प्रश्न येत नसणार. ह्या वरून एक लक्षात यावे कि डोक्यात काही तरी वेड असायला पाहिजे.
हीरो हिरोईन? ते रिटायर होत नाहीत, ते फेड होत जातात. मी इंडिअन आयडॉल कार्यक्रमात बघितलाय कि काळाच्या पडद्या आड केलेले कलाकार जेव्हा स्टेज वर येतात, आणि लोकांनी केलेली खोटी खोटी स्तुती ऐकतात तेव्हा अगदी रडायच्या स्टेजला पोहोचतात. अरे, आहे,कुणीतरी आपली आठवण करत आहे. ही सुखद जाणीव.
मिलाक्राशी (हा शब्द प्रचंड आवडला आहे.) जमवून घेणे काहींना जमत असावे, काहीना नसावे. ह्याची एक्स्ट्रीम केस बघायची असेल तर पहा "Sunset Boulevard" हा मूवी. किंवा मग Moby-Dick च्या monomaniacal captain Ahab सारखं जगावं. त्यांच्या साठी मिलाक्रा वगैरे काही असत नाही.
आमच्या सारख्या सर्वसाधारण आयुष्य जगणाऱ्या प्राण्यांना मिलाक्रा असं काही असतं हे या लेखावरून समजतं. ओ या ओके. असेल काहीतरी. आई बाबांची औषध,मुलांच्या फीय, मुलीच्या लग्नासाठी सेविंग, प्रॉविडंट फंडातून कर्ज.., ह्यात मन गुंतलेलं.
"but I have promises to keep" हे आयुष्याचे प्राईम मूवर असलं कि सर्वकाही आसान होत जातं.
हे लोक सर्वात नशीबवान.
मनात आले तसे लिहिलंय. पटलं तर घ्या नाहीतर कचऱ्याची टोपली आहेच की.
पुन्हा एकदा लेख चांगला झाला आहे.

छान लेख. सध्या मी पण 'हम इन सबसे ऊपर ऊठ चुके है' मोड मधे असतो. देशाच / ऑफिसमधले राजकारण याबद्दल काहिच राग लोभ वाटत नाही.
बरीच पुस्तके आणली आहेत पण वाचायचा मुड बनत नाही.

लेख आवडला.

बरेच विचार रिलेट झाले.

फार सुंदर लिहीले आहेस अस्मिता.
मिलाक्रा माहिती असो वा नसो..मला वाटतं प्रत्येकच जण कमी अधिक प्रमाणात त्यातून जातोच कधीतरी.
अगदी शब्दनशब्द रिलेट झाला.
मला असे वाटते की आपली काहीतरी छाप उमटवून जायला हवे.... ! लोकांनी, (फॅमिली सोडून) काही मोजक्याच का होईना पण इतरांनी , आपली आठवण अगदी मनापासून काढायला हवी!
आत्तापर्यंतच्या आयुष्याचा टॉप व्ह्यू घेतला तर ज्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नं..आपण अगदी आसूसून , ध्यास घेऊन पाहिली... ती किती तकलादू होती हे जाणवतं. म्हणजे आपला तो ध्यास, पूर्ण न झाल्याने आलेले नैराश्य, बरेचदा आजूबाजूच्या लोकांना दिला गेलेला दोष, अटीतटी, रागलोभ, सर्वच काचेचे... !
पण त्याचा मनावर खोलवर ठसा उमटला...स्वभाव बदलत गेला, बरा वाईट!

अर्थ शोधण्यापेक्षा समर्पण- कर्मनिष्ठता जास्त मोलाची आहे, किमान जीव जाताना पस्तावा राहणार नाही.‌ तेव्हा ताठ मानेने जाता आलं पाहिजे... नाही का ... हे फारच आवडलं.

आपण आपल्या मनाशी प्रामाणिक राहिलो तरी खूप झाले!
मला आत्ता शब्द सुचत नाहीयेत. तू लिहीलेलं फार आतून पटतं आहे पण.
Thank you for elevating my mind!

फारच सुरेख! या लेखातली सलगता सर्वात जास्त आवडली. हे इतके स्वच्छ आणि स्पष्ट विचार असे एकापाठोपाठ एक वाचताना मला "हे आहे हे असं आहे" याची जाणीव करून देते आहेस असं वाटलं. मग नंतर स्वीकारायचा उल्लेख आला ती आहा मोमेंट होती! आणि गीतेत सांगितलेला कर्मयोग ही सहाजिकच पुढची पायरी. असे फार छान प्रवाही मनोगत झाले आहे!
पण या उमगण्यासाठी मिलाक्रा ही term अयोग्य वाटते. It is not really a crisis. ही स्वीकाराची जाणीव तू लिहीले आहेस तशी कोणत्याही वयात होऊ शकते. And it's a beautiful realization! You start focusing on what really matters! The fluff goes away. याला काहीतरी छान नाव हवं!

सुंदर आणि वाचनीय लेख, पुन्हा पुन्हा वाचनीय लेख. मिलाक्रा बद्दल फार नाही माहिती पण pseudo पॉसिटीव्हिटी वगैरे पटलं!

एकदा निचरा केला म्हणजे ते विचार पुन्हा येणार नाहीत ही अपेक्षाही अवास्तव. ते पुन्हा दार ठोठावणारच सरळ एक दार उघडून दुसऱ्या दाराने त्यांना घालवून दिल्याशिवाय त्यांच्या प्रदक्षिणा कमी होत नाहीत. कमीच करायचं आहे- बंद करणं अशक्य आहे>>>>> होतात !! गोष्टी बंद होतात! माणसाची किती दृढ इच्छाशक्ती आहे त्यावर अवलंबून असावे कदाचित, मात्र यावर आम्ही असा उपाय सांगतो की, हे जे shadow parts उफाळून वर येतात जसे की साध्या गोष्टीही इतके days आवडीच्या असतात पण नंतर काहीच आवडत नाही, तोचतोचपणा येतो अगदी यापूर्वी घरातील सदस्याने काहीही कसेही फेकले तरी आपण प्रेमाने आवरून ठेवायचो, वर लाडिक कौतुक करायचो काय हे अजागळपणा नेहेमीचे आहे हं तुझे! पण हेच आता त्याने पेन जरी तिरके ठेवले तरी चिडचिड होते. (फक्त between the lines बघा ) अशा वेळी आरडे ओरडे न करता किंवा करून झाल्यानंतर एका कागदावर आपल्याला जे काही वाटतंय ती सर्व भडास, चिडचिड, शिव्या, अद्वा तद्वा बोलणे, सगळं उलथवून टाकलं पाहिजे, वगैरे वगैरे सर्व सर्व मनमोकळेपणाने भराभर भराभर लिहायचे व तो कागद पुन्हा अजिबात न वाचता, एकदाही वाचायचे नाही हा नियम imp आहे!! जसाच्या तसा फाडायचा बारीक तुकडे करायचे व पंचतत्वांपैकी एका कशात तरी (जे अर्थात सहज शक्य आहे) त्यात टाकायचा.. जसे, जाळायचा / मातीत पुरायचा /वाहत्या पाण्यात टाकायचा वगैरे वाहते पाणी दूषित होते असे वाटत असेल तर टॉयलेट flush केले तरी चालेल मात्र भरपूर कागद असतील तर ते ही नकोच. तो कागद इतर कोणालाही वाचायला द्यायचा नाही, अजिबात!

आता आपली भडास चिडचिड निघून गेली. ती निघून गेलेली जागा आहे ती भरून येण्यासाठी आपल्या समोर आपल्या मनातील स्वप्नं/ आपल्या आयुष्याचे आदर्श पण वास्तविक चित्र समोर बघायचे. आपण जेही आयुष्य जगताना करतोय त्यातून शांती, समाधान, आनंद, सुख मिळत आहे, आपण unconditional love देत आहोत व घेत सुद्धा आहोत / आपल्याला मिळत आहे वगैरे वगैरे .. so भडास चिडचिड या नेगेटिव्हिटी ची जागा आपल्याल्या आनंद देणाऱ्या उत्साह वाढवणाऱ्या पॉसिटीव्ह गोष्टींनी भरले जाते! ही प्रॅक्टिस करत करत एकदिवस आपल्याला कागद लागत नाही मनातून आपण अपॉप तयार होतो याचा निचरा करायला व असे विचार आपल्या मनात येतच नाहीत. आलेच समजा तरी त्याचा अंमल काही क्षण टिकतो व निघून जातो. व आपण जे चित्र रंगवलेले असते ते हळूहळू मॅनिफेस्ट व्हायला सुरवात होते.

>>>>आपण चाळीस वर्षे वाट बघण्यात काय अर्थ आहे , आणि तेवढं जगलोच नाही तर तेही गेलं. त्यापेक्षा आहे त्यातच 'वेचता' आलं पाहिजे.>>>>+१

सुंदर विचारधन... पुन्हा वाचेल, पुन्हा विचार करेल....

क्या बात है! चपखल व प्रामाणिक.
खूप सुंदर लेख आहे. माझ्या प्रायव्हेट संग्रही नक्की ठेवेन.
तू संवेदन्स्शीलही आहेस व उत्तम लेखिकाही. भावना ओघवत्या मांडता येतात.

छान लिहिले आहे. खूप रिलेट झाला लेख. माझ्याच मनातल्या भावना लिहिते आहेस असे वाटले. अर्थात मला अजून प्रश्नच पडलेले आहेत. उत्तर मिळविण्यासाठी दिशा दाखविल्याबद्द्ल धन्यवाद!!

अंजली कूल, तळमळीने लिहिलेली छान पोस्ट. काही वाचकांना ह्याचा नक्कीच उपयोग होईल. Happy

ह्या किंवा वैचारिक लेखांच्या मुळाशी फक्त self awareness आहे अक्षरशः, दुसरं काहीही नाही.

छान लिहिलंयस.
लिखाणाची/चिंतनाची सुरुवात MLCपासून झाली असली तरी पुढे त्याने काहीसं निराळं (तुझं) वळण घेतलं आहे असं वाटलं.

मध्यवयीन व्यक्तींमध्ये केवळ हे सगळं वाटणं हा क्रायसिस नसतो, तर असं वाटल्यामुळे 'आत्ता नाही तर कधी?!' अशा काहीशा आततायी मनःस्थितीतून काही विचित्र निर्णय घेतले जातात, त्यांचं पर्यवसान 'क्रायसिस'मध्ये होतं. त्यात उगाच महागडी गाडी विकत घेण्यापासून जॉब सोडून देणं, अफेअर करणं, असलं काहीही केलं जातं. जणू काही अ‍ॅडल्ट होताना वाढ झालेला फ्रन्टल लोब पुन्हा shrink व्हावा आणि मेंदूने 'एकदा शेवटचं' म्हणत टीनएजर मोडमध्ये जावं, दूरगामी परिणामांचं भान राहू नये अशी एक फेज येते - हा क्रायसिस असतो.

गाण्याची खरंच 'अतिपरिचयात् अवज्ञा' झाली होती, किती सुंदर गहन शब्द आहेत!

Pages