Tour du Mont Blanc भाग १ - पूर्वपीठिका उर्फ माझे पुराण

Submitted by वाट्टेल ते on 6 August, 2023 - 09:21

किलीमांजारो ट्रेकचे वर्णन मायबोलीबर टाकल्यावर पुष्कळ प्रोत्साहन मिळाले. इतर ट्रेकबद्दल लिहा, फोटो टाका वगैरे अभिप्राय त्यावर होते. प्रामाणिकपणे सांगायचे तर आपल्या ट्रेकचे वर्णन आणि फोटो दुसऱ्याला दाखवायचे म्हणजे तात्काळ ‘मी आणि माझा शत्रुपक्ष’ आणि त्यातले epic dialogue आठवून धडकी भरते. तर ती धाकधूक मनात ठेऊनच, नुकताच Tour du Mont Blanc हा युरोपातील ट्रेक केला त्याबद्दल लिहित आहे. एकूण अनुभव कितीही उच्च असला तरी तो बराचसा स्वतःपुरता असतो. इतरांपर्यंत तो तसाच पोहोचवण्याचे सामर्थ्य नाही पण प्रयत्न करीत आहे. किलीमांजारो ट्रिपच्या वर्णनात येणारे कुटुंबीय, काही मित्रमंडळ यांची नावे इथेही आहेत, ती मजकूरातील संदर्भाने लक्षात येतील असे वाटते, म्हणून बदलत नाहीये.
---------------------------------------------------
किलीमांजारो ट्रेक संपल्यावर २-३ वर्षे कोरोना , घरांतील जेष्ठांची आजारपणे आणि त्यामुळे कोरोना काळातल्या अमेरिका-भारत प्रवासातील विविध भानगडी यांतच गेली. फक्त एकदा कोलोरॅडो ट्रिप केली तेव्हा Mount Bierstadt हे एकच fourteener ( १४००० फुटांच्या वरचे शिखर) पायी असे केले. जरा स्थिरस्थावर झाल्यावर Tour du Mont Blanc खुणावू लागले. २०२२ च्या उन्हाळ्यात जमण्यासारखे नव्हते. ऑगस्ट २०२२ नंतर नेहमीच्या चालण्याची पार्टनर अनिता सिंग पाठी लागली, की कशाला थांबलो आहोत, booking करूया वगैरे. तेव्हा मी शोधाशोध सुरु केली. त्याबरोबर आनंदने (नवरा) लगेच हिमालय आणि इतर पर्याय सुचवायला सुरुवात केली ( सगळ्यांच्याच घरी असे होते का ?). “हिमालय उत्तमच आहे, पण मला आल्प्स -युरोपात(च) ट्रेक करायचा आहे” हे मी त्याच्या गळी उतरवले. ( हे ही सगळ्यांच्या घरी होते का ?)

कसे जायचे यासाठी पर्याय भरपूर होते. गाईड न घेता, तंबू, खाणे, पिणे सगळे स्व:त करूया अशी एक सूचना ( देव जाणे काय विचार करून ) घरातून आली. ती कितीही आकर्षक वाटली तरी आपल्या वकुबापलिकडची आहे हे माहीत असल्याने त्या फंदात पडले नाही. लॉज, हॉस्टेल घ्यायचे तरी, किमान ७ दिवसांचा ट्रेक, ६ रात्री वेगवेगळ्या ठिकाणी बुकिंग करणे फार जिकिरीचे वाटले. Utracks कंपनीचे ७ दिवस guided walk चे पॅकेज बहुगुणी आखूडशिंगी इ. इ. असल्याने तेच घ्यायचे ठरले. दीपशिखा उर्फ DS,जी माझ्याबरोबर किलीला आली होती, TMB चे कळताच तिने स्वतःचे नाव नोंदवले. आम्ही घरचे ३ आणि २ मैत्रिणी असा ग्रुप जमला. एकूण मजा घेत जास्त कष्ट नाहीत असा ट्रेक करायचे ठरवले. ११० किमी ७ दिवस किंवा १६० -१७० किमी १० दिवस असेही पुष्कळ variants आहेत. ट्रेकचा routeही अगदी एकाच्या एक असा नाही, वातावरण आणि एकूण आपापल्या capacity नुसार सोपे अवघड routes, पुष्कळ आहेत. आमचा त्यातल्या त्यात moderate - tough म्हणता येईल असा route होता. सरासरी १५-१६ किलोमीटर दर दिवशी. अर्थात डोंगरात किलोमीटरला फारसा अर्थ नसतो असे माझे प्रामाणिक मत आहे, कधी कठीण वाटेवर ४५ -५० मिनिटेही एकेक किमी साठी लागतात.७ दिवसांत ११० किलोमीटर ( हा.का.ना. का. !) अशा हवेत मी, अनिता व DS होतो. तिथे जाईपर्यंत नवऱ्याने जमिनीवर आणण्याचे काम केले, उरलेले ट्रेक व गाईडने केले.

२५ जून ते १ जुलै असे ट्रेक चे बुकिंग केले. बुकिंग केल्यावर, एक नवरा कमी की काय म्हणून अनिता आणि DS यांना असंख्य प्रश्नाचे भुंगे चावायला लागले. किरण कुलकर्णी (ऑरलँडोचे ट्रेकप्रेमी - पहा किलीवर्णन ! किती ती जाहिरात !) यांनी हा ट्रेक केलेला असल्याने, एक दिवस त्यांना व बायको -पारूला जेवायला बोलावले. तसेच अनिता व DS यांनाही बोलावले आणि दोघांची (गाठ) लावून दिली. याचा परिणाम म्हणजे दुसऱ्या दिवशी पारूचा फोन आला की त्या दोघांनाही आमच्याबरोबर ट्रेकला यायचे आहे. अधिकस्य अधिकं फलं ! utracks शी बोलून त्यांचीही नावे आमच्या group मध्ये नोंदवली. राहण्याचे पर्याय होते त्यात स्वस्तातला हॉस्टेल चा पर्याय निवडला. थोडे अधिक घालून स्वतंत्र खोली मिळाली असती पण त्याच्या गरज वाटली नाही, एकतर बाथरूम common च असणार आणि एकत्रच जास्त मजा करता येईल असा हेतू होता.

ट्रेकचे बुकिंग सहज झाले पण विमानाचे बुकिंग ही एक खास प्रोसेस होती. आमचा ट्रेक Chamonix ( उच्चार शामनी) फ्रांस येथून चालू होणार होता. हे स्वित्झर्लंड फ्रांस बॉर्डरजवळचे फ्रांस मधले लहानसे शहर आहे. त्याला सर्वात जवळचा एअरपोर्ट जिनिवा नाहीतर झुरिक. पण जिनिवाच जास्त सोयीस्कर. एकूण प्रवाश्यांपैकी मी व मुलगा ऑर्लॅंडो - युरोप - मुंबई - ऑर्लॅंडो, नवरा, अनिता व DS - ऑर्लॅंडो -युरोप - ऑर्लॅंडो , कुलकर्णी तसेच पण काही दिवस स्विर्झर्लंडमध्ये घालवून परत येणार होते. स्वस्त, मस्त, लोकशाहीसंमत पर्याय निवडताना ज्या काही कसरती केल्या त्या अभूतपूर्व होत्या. शेवटी साधारण एकदाच वेळी मायामीहून निघणाऱ्या आणि सुमारे एकाच वेळी जिनीवाला पोहोचणाऱ्या, अनुक्रमे लिस्बन पोर्तुगाल आणि हिथ्रो लंडन यांच्या मार्गे जाणाऱ्या २ विमानांवर बुकिंग केले. मी व मुलगा लिस्बनमार्गे, उरलेले ३ मेम्बर लंडनमार्गे तर कुलकर्णी एक दिवस आधीच्या विमानाने त्यांना लंडनला काही काम असल्याने लंडनमार्गे.

हे सर्व काम आणि हॉटेल बुकिंग जानेवारी २०२३ मध्ये उरकून स्वस्थ बसलो. आता किरकोळ बस बुकिंग, इतर माहिती काढणे इतकेच राहिले होते. ऑर्लॅंडोत पारुने आमची बरीच हव्वा केल्याने सगळे विचारीत. मी सगळ्या बुकिंगची कथा सांगत असे. एका काकूंनी तर,” काय म्हणे तू मैय्यादेवींना भेटायला आल्प्समध्ये जाणार” वगैरे बोलून माझी विकेट घेतली ( पहा - असा मी असामी ). नवऱ्याची टिप्पणी म्हणजे सगळे बुकिंग झाले आहे फक्त बॉडीबरोबर बुकिंग बाकी आहे. खरं सांगायचं तर तेच तसं लाइटली घेतलं. आठवड्यात ३-४ वेळा जिम, कधी वीकेंडला ७ मैलाच्या black bear trail ला जाणे याहून जास्त काही केलं नाही. याबद्दल जरा चुटपुट आहे, पण तरी ट्रेक एकूण झेपवला. हा ट्रेक म्हणजे Mont Blanc ( फ्रेंच उच्चार मॉं ब्लॉ ) या आल्प्समधील पर्वतरांगातील सर्वांत उंच शिखराच्या भोवती घातलेली प्रदक्षिणाच. सुरुवात फ्रांसमध्ये करून मग स्वित्झर्लंड - इटली - पुन्हा फ्रांस अशी clockwise किंवा उलट फ्रांस- इटली - स्वित्झर्लंड - पुन्हा फ्रांस अशी counter clockwise करतात. आम्ही clockwise केली, पण त्याला काही खास कारण नाही. रस्त्यात उलट जाणारे लोकही खूप भेटले. एका देशातून दुसऱ्या देशांत पायी चालत जाणे याचे उगीचच कौतुक होते. प्रत्यक्षात डोंगरात देश कधी ओलांडला ते कळत नाही कॅनडा-अमेरिका बॉर्डरसारखेच . मी केलेल्या अन्य ट्रेकला बहुतेककरून एक summit point होता, तर इथे रोजचा एक high point. रोज एक डोंगर चढायचा आणि एक उतरायचा म्हणजे पायथ्याशी ( गावडेवाडी !! पहा - वाऱ्यावरची वरात ) आमचे रोजचे राहण्याचे ठिकाण. एकूण उंची ८०००-९००० फूट फक्त, आपण याच्या दुप्पट उंचीवर जाऊन आलो आहोत, याचा माज नव्हता पण त्याने ढिलाई आली होती. Always respect the mountains हे कधी विसरत नव्हते पण या प्रदक्षिणेने ते अधोरेखित केले हे नक्की.

शेवटच्या १० दिवसांत तिथल्या लोकल बसचे बुकिंग करताना क्रेडिट कार्ड compromise वगैरे झाली, नवीन कार्ड आम्ही प्रवास सुरु करण्याच्या अगोदर येणार नव्हती. पण दुसरी होती. आम्ही जाणार ती सगळी अगदी लहान लहान गावे, त्यात क्रेडिट कार्ड चालणार नाही किंवा हाताशी हवे म्हणून बँकेतून युरो आणले. २१ जूनला रेंटल गाडी आणणे, २२ ला ऑर्लॅंडो-मायामी प्रवास, मग विमान, २३ ला जिनीवा - शामनी बस, शामनी ते Les Houches या जवळच्या गावात हॉटेल होते तिथे जाण्याची बस व टाईमटेबल, २४ जूनला शामनीच्या आसपासची attractions, २५ जून ते १ जुलै ट्रेक, २ जुलैला शामनी-जिनीवा बस आणि जिनीवात काय करायचे, ३ जुलैला परतीचा प्रवास, खाण्याची ठिकाणे, रस्ते, wifi, हवामान, पाऊस, internet कोणाचे कधी वापरायचे याचा काटेकोर , अक्षरश: hour to hour plan केला पण ........
1_1.JPG
क्रमश: https://www.maayboli.com/node/83829

भाग १ https://www.maayboli.com/node/83827
भाग २ https://www.maayboli.com/node/83829
भाग ३ https://www.maayboli.com/node/83831
भाग ४ https://www.maayboli.com/node/83834
भाग ५ https://www.maayboli.com/node/83835
भाग ६ https://www.maayboli.com/node/83839
भाग ७ https://www.maayboli.com/node/83844
भाग ८ https://www.maayboli.com/node/83846
भाग ९ https://www.maayboli.com/node/83850
भाग १० https://www.maayboli.com/node/83854

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. ही आणि मानस सरोवर ची प्रदक्षिणा करायचा विचार मनात आहे. त्यामुळे उत्सुकतेने वाचतोय.

छान सुरुवात.
उंचीचे आकडे मिटर्समध्येच बरे वाटतात. अमेरिकेत फुट, माईलस असले तरी डोंगर उंची मिटर्समध्ये चांगली कल्पना देते.
बाकी एकाच देशांकडून त्यांच्याकडचा आल्प्स चढून खाली आलो आणि इतर देशाकडचा आल्प्स यांत झाडे,प्राणी वगैरेत फरक आहे का हे जाणून घ्यायचे आहे.

वगैरेत फरक आहे का हे जाणून घ्यायचे आहे. >>
landscape मध्ये थोडा थोडं फरक आहे, आमच्या route मध्ये तरी फ्रांस स्विस बाजूला खूप हिरवाई ( west of mont blanc ) आणि फुलं, इटलीच्या बाजुने उंच कडे, आणि प्रचंड खडकाळ ( east - south of mont blanc), खडक मातीचा रंग थोडे थोडे बदलत जाते. फ्रांस north of Chamonix - बऱ्यापैकी हवा, स्विस - चांगलाच उन्हाळा, इटली व south of Chamonix - पाऊस, प्रचंड थंडी, धुकं असे सगळे हवामान ७ दिवसात लागले. मला वाटते, season , route ( आणि नशीब ) नुसार गोष्टी थोड्या थोड्या बदलत जातात. यत्र तत्र सर्वत्र गाई वगळता डोंगरात प्राणी जवळजवळ दिसले नाहीत, एकदा शेवटच्या दिवशी मात्र ibex दिसले जवळून